सुंदर असं पिवळं सोनारी पुरण, त्यात मस्त वेलची जायफळ पूड, ८-९ केशराच्या काड्या, त्यांचा मंद सुवास, छान तिंबलेली कणिक.. मोठा पुरणाचा गोळा त्या कणकेच्या पारित भरून हळुवार लाटलेली पोळी नाजुक हाताने तापलेल्या तव्यावर अलगद ठेवायची, जसजशी पोळी भाजली जाते एक अप्रतीम खरपूस सुवास अख्ख्या घरभर दरवळतो, दोन्ही बाजूंनी छान भाजलेली गरम गरम भरलेली पोळी अलगद आई पेपर किंवा जाळी वर ठेवते. त्यावर भरपूर तुपाची धार, लागलंच तर थोडं दूध. अहाहा मला सांगा स्वर्गाची व्याख्या ह्याहून वेगळी असेल का? पुरण पोळी करणे हे कोणा सोम्या गोम्याचे काम नव्हेच. पुरणाचे परफेक्ट प्रकरण जमायला हवे. थोडं पुरण सैल झालं तर पोळ्या एकदम हळुवार होतात, थोडं घट्ट झालं तरी बिनसतात. म्हणूनच पुरणपोळीचा डौलच निराळा आहे. आपल्या कडे महाराष्ट्रात पुरणपोळीला बाकीच्या गोड पदार्थांपेक्षा म्हणूनच थोडं मानाचं स्थान आहे. विशेषतः होळी, पाडवा, गौरी गणपती. सण म्हणले की अग्रस्थानी पोळी बाई विराजमान असतात. पुरणपोळीचा इतिहास तसा जुना..पुराण काळापासून अगदी १२व्या शतकात सुद्धा पुरण पोळीचा उल्लेख आढळून आला आहे. त्याशिवाय १३व्या शतकात ज्ञानेश्वरी ग्रंथातही पुरणपोळीचा उल्लेख 'मांडे' म्हणून आढळतो. पेशवेकाळातही पुरणपोळीचे अनेक दाखले आढळून येतात. असं म्हणतात की पुरणपोळीचे मूळ हे खरंतर कर्नाटक राज्यात आहे, ही मूळची तिकडची. अनेक अनेक वर्षांपूर्वी जेव्हा व्यापारा निमित्त महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत देवाणघेवाण झाली त्यात कुठेतरी कधीतरी त्यांच्याकडची ही पुरणाची पोळी आपल्याकडे आली आणि नुसती आली नाही तर पक्वान्नांची राणी झाली.
भारताच्या दक्षिण भागात आपण जसजसे जात जाऊ तसतशी आपल्या लाडक्या पुरणपोळीची अनेक रूपं आपल्याला पहायला मिळतात.
केरळात परप्पू पोळी/बोळी, कर्नाटकात होळीगे, ओबट्टू, बेळे ओबट्टू. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात बोबाट्टू ह्या अश्या विविध नावांनी आणि रूपांनी पुरणपोळी भेटीला येते.. दाक्षिणात्य भागांत काही ठिकाणी चणा डाळी ऐवजी मुगाची डाळ किंवा हिरव्या मुगाचे पुरण किंवा कधी नुसतंच ओलं खोबरं आणि गुळ वेलची असे पुरण करून पुरणपोळ्या केल्या जातात. उगादी, ओणम, होळी, चैत्र पाडवा अशा विविध सणांना इथे गोड पुरणाच्या पोळ्या केल्या जातात.
दक्षिण सोडून आपल्या बाजूचे गुजरात राज्यही पुरणपोळीशी नाळ जोडून आहे. गुजरात मध्ये काही ठिकाणी चण्याच्या डाळी ऐवजी तुरीच्या डाळीचा वापर केला जातो.
ही झाली पुरणपोळीचीच भावंड. पुरणाचे कडबू ही आपण करतो. कणकेच्या पारित पुरणाचा छानसा गोळा भरून त्याला करंजी किंवा हातानेच चोकोनी आकार देऊन तेलात तळून मस्त कडबू तयार होतात. गरम गरम कडबू त्यावर रवाळ साजूक तूप अहाहा आणि काय हवं? नागपंचमीला कडबू बऱ्याच घरी केले जातात. ह्या कडबूची मामे-मावस-चुलत भावंड म्हणजे कोकणात किंवा गोव्यात आणि मंगळूर मध्ये केले जाणारे शुक्रुंडे/सुकुरुंडे किंवा तामिळनाडू मधील सिसियम/ सेसीयम. चणा किंवा मूग डाळीच्या पुरणात गुळ खोबरं वेलची जायफळ घालून हे पुरण गव्हाच्या पिठात किंवा काही ठिकाणी उडीद डाळीच्या पिठात घोळवून भजी सारखे तळून काढतात की झाले आपले सुकुरुंडे किंवा सिसियम तय्यार.
तुपाची धार मात्र कुठेही गेलो तरी कॉमन!
गंमत म्हणजे मध्यंतरी श्रीलंकेला गेले असताना एका तामिळ हॉटेलात मेन्यू मध्ये सिसियम वाचून राहवलं नाही म्हणून मागवले तर मस्त हिरव्या मुगाचे खोबरं गूळ घातलेले सुंदर सिसियम समोर आले.. परप्रांतात ह्या ना त्या रूपात आपलं पुरण समोर आल्याने जो काही आनंद झाला काय सांगू.
त्यावर येथेच्छ ताव मारून पुन्हा आता मायदेशी येऊन होळीची आतुरतेने वाट बघते आहे. पुरणपोळीचा बेत आहेच. पुरणपोळी म्हणलं की कटाची आमटी आलीच, अगदी पोळीची सख्खी मैत्रीण, गरम गरम वरण तूप भात, सोबत लिंबाची फोड, बटाट्याची भाजी, कुरडया पापड, काकडीची कोशिंबीर आणि पानात पुरणाचा गोळा विथ भरपूर तूप असा जामानिमा हवाच. पण खरं सांगायचं तर मन फक्त त्या पुरणपोळीच्या घमघमाटाने त्यातल्या पुरणाच्या चकाकीनेच भारून जाते. आणि पुरण पोळी संपली तरी आमच्या घरी डब्बा भरून पुरण करून ठेवलेलं असतं त्यावर मग पुढचा आठवडा पण खूप मजेत जातो. आता पुढच्याच आठवड्यात पुरणाचा बेत आहे, डाएट वगरे गोष्टींना न भुलता पुरणपोळी वर बिनधास्त ताव मारण्याचा प्लॅन आहे.

सिसियम इन श्रीलंका
पुरणपोळीचे पुराण!
Submitted by TI on 26 February, 2026 - 12:35
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त!!!
मस्त!!!
पुराण आवडले!
पुराण आवडले!
अरे वा TI, समयोचित पुरण
अरे वा TI, समयोचित पुरण-पुराण.
होळीला पुरणपोळी मस्ट असण्याचे दिवस बघितले आहेत. सोबत कटाची आमटी. 🤤 ताटात बाकीचे सर्व पदार्थ ऑप्शनल. घरोघरी हाच मेन्यू.
आता फार आवडत नाही पण खाल्ली तर वरील सर्वप्रकारच्या पुरणपोळीत आपली पारंपरिक चणाडाळवाले पुरण गच्च भरून केलेली, खरपूस भाजलेलीच खातो, बेसिक इज बेस्ट.
या नियमाला एकमेव अपवाद - चारोळ्यांचे सारण असलेली पुरणपोळी, पण ती देवदुर्लभ आणि तिथे माझे पुण्य कमी पडते.
पुरण आवडते, पुराण नाही पण
पुरण आवडते, पुराण नाही पण पुरण पुराण आवडले.
मस्त.. पुरण पुराण आवडले..
मस्त.. पुरण पुराण आवडले..
धन्यवाद शर्मिला, मंजूताई,
धन्यवाद शर्मिला, मंजूताई, मानव, मनीमोहोर

@अनिंद्य वाह चारोळ्यांचे सारण वाचून tempting वाटते आहे..आता फार आवडत नाही पण खाल्ली तर वरील सर्वप्रकारच्या पुरणपोळीत आपली पारंपरिक चणाडाळवाले पुरण गच्च भरून केलेली, खरपूस भाजलेलीच खातो, बेसिक इज बेस्ट--- हे मात्र एकदम खरं
चारोळ्यांचे सारण असलेली
चारोळ्यांचे सारण असलेली पुरणपोळी>> कधी खाल्ली नाही पण ह्याचा उल्लेख बहुतेक सुनीताबाईंच्या पुस्तकात वाचलाय.
पुरणाचं पुराण पुरेपूर जमलं
पुरणाचं पुराण पुरेपूर जमलं आहे!
चारोळ्याचे पुरण? खुप उष्ण
चारोळ्याचे पुरण? खुप उष्ण नाही?
मी एकदा चुकुन भरपुर चारोळी करंजीत घातली (संपवायची म्हणून) मग मला एकदम जड वाटत होते आणि अॅसीडीटी.
सगळ्या राज्यातल्या पुपो खावुन झाल्या आहेत. आता तर पुपो घर म्हणून आहे तिथे सुद्धा कितीतरी प्रकार मिळतात.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
पण मला कटाची आमटी, कुरडई, भजी हेच जास्त आवडते.
पुरणपोळीला पास असतो माझा.
@ चारोळ्यांचे पुरण,
@ चारोळ्यांचे पुरण,
हो झंपी, ते जरा हेवीच असते, high on protein + high on fats कारण ही पुरणपोळी तुपाशी खातात. मजबूत खवैय्ये, खादाड माणसे सुद्धा “एक या दो बस” म्हणतात.
@ शर्मिला,
सुनीताबाईंच्या पुस्तकात ? असेलही. थोडा कमी प्रसिद्ध प्रकार आहे. आता मला दुर्लभ आहे.
छान लेख .
छान लेख .
पुरण पुराण आवडले.
पुरणाची पोळी, कटाची आमटी ,भात,बटाट्याची भाजी ,भजी ,तळण असं ताट सणाला लहानपणीपासून बघण्याची सवय आहे .असं ताट होळीला नसेल तर चुकल्यासारखे वाटते.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद
प्रतिसादांबद्दल धन्यवाद