"घडणं की बिघडणं?"

Posted
2 months ago
शेवटचा प्रतिसाद
2 months ago

एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एकमेकांच्या आयुष्यावर काही ना काही परिणाम होत असतो. कधी कमी, कधी जास्त; कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक. या प्रभावामुळे माणसाच्या विचारांमध्ये आणि वर्तनात बदल होतात. काही बदल अतिशय सूक्ष्म असतात, तर काही इतके ठळक की ते सहज जाणवतात. असे बदल बहुतांशी घरच्यांना जाचक वाटू लागतात.

“आता तू बदललास/बदललीस”, “पूर्वीसारखा/सारखी राहिला नाहीस”, “तुझं काहीतरी नवीनच सुरू झालंय” अशा वरवरच्या टिप्पणी कानावर पडू लागतात. कारण त्या क्षणी ती व्यक्ती त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागत नसते.
मग कधीतरी A मुळे B बदलला/ली, असा निष्कर्ष काढला जातो आणि घरात “तिने/त्याने तुला बिघडवले” अशी भाषा सुरू होते. इतकंच नाही, तर A ला देखील “तू त्याच्या/तिच्या आयुष्यात सायलेंट इंटरव्हेन्शन करत आहेस” असे भाष्य ऐकावे लागते.

पण या दोन्ही बाजूचे लोक हा साधा विचार करायला तयार होत नाहीत की B च्या आयुष्यात जे बदल झाले, ते मुख्यतः त्याचे स्वतःचे choices होते. कोणीही कुणामध्ये जबरदस्तीने बदल घडवू शकत नाही. आणि जबरदस्तीने झालेले बदल टिकतही नाहीत. गंमत म्हणजे सकारात्मक बदलही अनेकदा सहज स्वीकारले जात नाहीत.
बरीच वर्षे दबून राहिलेल्या व्यक्तीला जेव्हा हळूहळू आपल्यावर झालेला अन्याय जाणवू लागतो तेही कुणाच्या तरी संवादामुळे तेव्हा ती व्यक्ती आपल्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करू लागते. हा स्वतःचा एक संघर्ष असतोच; आणि त्यावर “तू बदललास” हे सतत ऐकणं हा आणखी एक मानसिक संघर्ष असतो.
इथे A चा संघर्षही कमी नसतो. अनेकदा B चे कुटुंबीय किंवा आजूबाजूचे लोक अशा A पासून अंतर ठेवू लागतात. जणू काही ती एक शिक्षा असते कारण A ने B ला वेगळा दृष्टिकोन दिलेला असतो, त्याचा सेल्फ अवेअरनेस जागृत केलेला असतो.

हा बदल काही छडीच्या धाकाने झालेला नसतो. मला शाळेतली अनेक उदाहरणे माहिती आहेत छडी खाऊन गणित शिकलेली मुलं, ज्यांना तो विषय ना कधी मनापासून जमला, ना आवडला. खरी बदलाची सुरुवात होते ती रुची निर्माण झाल्यावर. एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळल्यावरच त्या दिशेने वर्तन बदलतं.

म्हणूनच या बदलांवर टीका करणाऱ्या जवळच्या माणसांनी एकदा तरी अंतर्मुख होऊन विचार करावा रिप्लेस तेच होतं, जे आता त्या व्यक्तीसाठी अप्रासंगिक झालेलं असतं.

पण “घडणं” आणि “बिघडणं” यातील नेमका फरकच न उमगणाऱ्या लोकांकडून आपण इतकी समजूतदार अपेक्षा ठेवावी का? हा खरा प्रश्न आहे.

*****************************************************************************************************

प्रकार: 

पण “घडणं” आणि “बिघडणं” यातील नेमका फरकच न उमगणाऱ्या लोकांकडून आपण इतकी समजूतदार अपेक्षा ठेवावी का?>>>> अजिबात ठेवू नये ही अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही. आपल्याला आलेल्या अनुभवातून,निरीक्षणातून आपलं सॉफ्टवेअर अपडेट करत रहावं . ह्या ह्या व्यक्ती/गरजा कमी केल्या/डिलीट केल्या तर शांत वाटत असेल तर नक्की करावं. बदल कुणाला घडणं वाटत असेल कुणाला बिघडणं ते समोरच्या व्यक्तीवर सोडून द्यावं

असे प्रश्न माझ्यासारख्या कमी बुद्धीच्या माणसाला प्रसंग, उदाहरणे सांगून समजतील. मानवी व्यवहार म्हणजे काही शास्त्र नाही. माझ्यासारख्या वाचकांचा " खूप जास्त विचार करते" किंवा " आयुष्य जगण्याची कला आहे , एव्हढं किचकट विचार करून चालत नाही" असा समज होण्याची शक्यता आहे. त्यामुळं थोडं विस्ताराने लिहीलं तर छान होईल असं वाटतं. आग्रह नाही. सध्या मत देणं योग्य वाटत नाही ( ती ही सक्ती नसते हे मान्यच).

एक लेखक उदा. देते.

समजा मी एका विशिष्ट पद्धतीने आयुष्य जगते आहे . (उदा स्वतंत्र) आणि माझे विचार समानतेवर आधारित आहेत. खास करून लग्न झाल्यावर स्त्रियांना समानता मिळायला हवी किंवा लग्न नेमकं कसं असावं , याबद्दल माझी काही ठाम मतं आहेत. या दरम्यान माझी दुसरी लग्न झालेली मैत्रीण माझ्या नियमित संपर्कात आहे. आणि ती सुद्धा विशिष्ट पद्धतीने जगते आहे , पण माझे विचार ऐकून तिला कालांतराने असे वाटू लागते कि ती जे जगते आहे , त्यात किंवा तिच्या नात्यात काही बदल आवश्यक आहेत. इतके वर्ष एका विशिष्ट पद्धतीने जगात आलेल्या व्यक्तीला जेव्हा स्वतःच्या आयुष्यात काही बदल करावेसे वाटतात तेव्हा ते फार अवघड असते. मैत्रीण जेव्हा हे बदल राबवण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या घरचे (नवरा / सासरचे) लोक म्हणतात "ती बिघडली आहे किंवा बदलली आहे " हा झाला तिचा संघर्ष. दुसरीकडे ते असे हि बोलतात कि ती माझ्यामुळे बिघडली आहे .

इथे तिला जे बदल हवेत ते तिच्यासाठी हवेहवेसे आहेत , पण तिच्या घरच्यांना नको आहेत कारण त्यामुळे त्यांचे नुकसान होणार . त्यामुळे मैत्रिणीचे विचार बदलणं हे तिच्यासाठी 'घडणं' आहे आणि तिच्या घरच्यांसाठी तिचं 'बिघडणं.'

दुसरीकडे समजा माझ्या जवळचे लोक आहेत ज्यांना माझी विचारसरणी माहिती आहे आणि ती त्यांना पटते. त्यामुळे ते मला माझ्या मैत्रीणीबद्दल असं म्हणतात कि " तू तुझे विचार तुझ्या जवळ का ठेवत नाहीस? तिचं बिचारीचं चांगलं सुरु होतं , अज्ञानात सुख असतं. आता तू तुला जाणीव करून देऊन , तिच्या आयुष्यात नकळतपणे ढवळाढवळ केली आहेस . (असं काहीतरी )

प्रत्येक जण आपापल्या फ्रेम मधून बरोबरच असतो. त्यामुळे आपण योग्य जागी आहोत याची खात्री असेल तर कोण काय म्हणतंय याचा विचारच करू नये. दोघीत काय झाले हे दोघींना सर्वात चांगले माहिती. तिची घुसमट होत होती किंवा ती आधी अज्ञानात सुखी होती आणि आता तिला साक्षात्कार झाला हे कुणी इतर जज्ज करू शकत नाही, तसेही त्याने फरक पडत नाही.

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे एक लेखक . पण आपल्या वागण्याचा आपल्या जवळच्या व्यक्तींना काही अंशी फायदा तोटा दोन्ही होत असतो , पण जेव्हा तोटा जास्त व्हायला लागतो तेव्हा घरातले लोकच जास्त जज्ज करतात .

घडणारे बदल हे घडणे कि बिघडणे या मुद्द्या्वर चर्चा होईलच . पण हे बदल परस्पर पूरक असे आहेत का? हा प्रश्न मला महत्वाचा वाटतो..जीवनातील परस्पर पूरकता आयुष्यभर टिकणे ही व्यक्तिस्वातंत्र्य व बुद्धिवादाच्या चौकटीत बसवणे अवघडच आहे.एकमेकांची स्पेस जपत व एकमेकांना स्पेस देत जगण खरच तारेवरची कसरत असते. परस्पर उपयुक्तता संपुष्टात यायला लागली की बदल जाचक वाटू लागतात.

नवीन Submitted by दक्षिणा on 19 February, 2026 - 15:19 >>> दक्षिणा या उदाहरणा संदर्भात जे accusation झालं आहे त्याबाबत एक खोच मला स्वतःला लक्षात येते, ती म्हणजे जर एखादा आपल्या नैसर्गिक स्वभावाला मुरड न घालता जगत असेल, तर त्या सोबत येणाऱ्या ट्रेड ऑफ्सना, ड्रॅबॅक्सना तो ईतका सरावलेला असतो की त्याला स्वतःला ते दखलपात्र देखील वाटत नाहीत, साहजिकच त्या गोष्टींचा उल्लेख त्रयस्था समोर होत नाही....Everything comes at a cost, पण तुम्हाला त्या किमतीचं काही वावडं नसतं कारण you could inherently afford it...आता जर या दृष्टिस न पडणाऱ्या क्षमतेमुळे एखाद्या त्रयस्थाला जर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कसेही वागू शकता, फक्त तुम्हाला तसं वागता यायला हवं (झुकती है दुनिया टाईप) असा भ्रम झाला आणि त्याचे ट्रेड ऑफ्स, ड्रॉबॅक्स अफॉर्ड करण्याची क्षमता नसतानाही जर तो तसा वागू लागला तर, अशा वेळी अनुकरण करणाऱ्या व्यक्तीची अधिक चूक आहे असं‌ मी म्हणेन, कारण जसं इंन्स्टाग्रामच्या चकचकीत पोस्ट्स पाहून सर्व गुडी गुडी आहे असा समज करुन घेतला जातो तसंच काहीसं त्याने स्वतःच्या जिवनात महत्वाचा बदल अंगिकारताना केलं... आपण फार फार तर कुणाही समोर स्वतः ला प्रेझेंट करतो ते्व्हा आपल्या सो कॉ्ल्ड आकर्षक ट्रेट्ससोबत येणारे हॅसल्स आठवणीने त्यांना सांगू शकतो, याहून अधिक आपण काय करणार?

नाही फार्स तुम्ही याला अनुकरण असं नाव देऊन मुद्द्याला थोडी बगल दिलीयेत. ते सगळं मटेरियलिस्टिक बाबतीत ठीक आहे. मी इथे पूर्णपणे वैचारीक बदलांविषयी बोलते आहे. आणि ते एखाद्या व्यक्तीला आतून पटल्याशिवाय होत नाहीत. शिवाय कोणा लहान वयातल्या व्यक्तीबद्दल बोलत नाहीये चांगल्या मोठ्या अडल्ट व्यक्तीबद्दल बोलते आहे.

कारण आधीच कित्येकवर्ष मनाविरुद्ध जगलेलं असतं , आणि आता बदल नाही करणार तर कधी? हे मला आवडत नाहीये हे सांगणार कधी ? शिवाय खूप वर्ष घरच्यांना किंवा आजूबाजूच्या लोकांना त्यांचं सतत पडतं घेणं सवयीचं झालेलं असतं .

आपल्याला आलेल्या अनुभवातून,निरीक्षणातून आपलं सॉफ्टवेअर अपडेट करत रहावं .
>>> १००+

एखादा बाह्य फोर्सची मदत मिळाल्याखेरीज दगडही आपली जागा सोडत नाही. त्यामुळे एखाद्या नात्याचा पाया भुसभुशीत असेल तर दगड हलणार. पण तोच दगड कुठल्यातरी सिमेंटने बांधून ठेवला असेल तर बाह्य शक्तीही उपयोगी ठरत नाही. त्यामुळे बाहेरच्यांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्या माणसाला प्रेमाच्या बंधनात बांधतोय की मानसिक जाचात हे त्यांनी पाहायचं. आणि ज्यांना आपल्या घरातल्या माणसांचं मन ओळखता येत नाही त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवणार?

फार व पु काळे स्टाईल प्रतिसाद झालाय पण तीच ऍनॉलॉजि डोळ्यापुढे आली.

नाही माझेमन छान आहे प्रतिसाद. मला खूप आवडला.
ज्यांना आपल्या घरातल्या माणसांचं मन ओळखता येत नाही त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवणार? >> हे वाक्य तर इतकं पटलं कि सांगू शकत नाही. कारण आजूबाजूला अशी उदाहरणे बघते आहे.

आणि ते एखाद्या व्यक्तीला आतून पटल्याशिवाय होत नाहीत. शिवाय कोणा लहान वयातल्या व्यक्तीबद्दल बोलत नाहीये चांगल्या मोठ्या अडल्ट व्यक्तीबद्दल बोलते आहे. >>> तुम्हाला 'आतून पटलेल्या असणे' म्हणजे 'नॉन निगोशिएबल' च्या पातळी पर्यंत पोहचलेले असणे, अस म्हणायचं असल्यास ठीक आहे. कारण नॉर्मल आयुष्यात देखील आपल्याला कित्येक moral गोष्टी खरोखरीच आतून पटतात, पण आपण त्या प्रमाणे आपले आचरण करतोच असे नाही, आणि जर एखादी गोष्ट 'नॉन निगोशिएबल' च्या पातळी पर्यंत पटलेली असेल, तर मग त्याला कुणी बाह्य फोर्स कसा आवरणार.

कारण आधीच कित्येकवर्ष मनाविरुद्ध जगलेलं असतं , आणि आता बदल नाही करणार तर कधी?>>>खूप काळ तडजोड करत जगल्या नंतर, जर मूळ स्वभावाला खत-पाणी मिळू शकेल असं एखादं जवळचं उदाहरण समोर/ संपर्कात आलं तर मुळात त्या दिशेने कल असलेला स्वभाव 'नॉन निगोशिएबल' निर्धाराच्या पातळी पर्यंत पोहचणं स्वाभाविकपणे शक्य असतं

फार्स , दुसरा पॅरा एकदम परफेक्ट.

कृतीत उतरेपर्यंत पटल्या गोष्टी कि बदल आपोआप होतात .

>> बरीच वर्षे दबून राहिलेल्या व्यक्तीला जेव्हा हळूहळू आपल्यावर झालेला अन्याय जाणवू लागतो तेही कुणाच्या तरी संवादामुळे तेव्हा ती व्यक्ती आपल्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करू लागते. हा स्वतःचा एक संघर्ष असतोच; आणि त्यावर “तू बदललास” हे सतत ऐकणं हा आणखी एक मानसिक संघर्ष असतो.<<<<
+१००० ह्या मध्ये पॉवर प्ले असतो जो तुम्हाला, बदललास/ लीस म्हणतात त्यांचा. कारण त्यांची ईन्सिक्युरिइटी वाढते.
सौ टके कि बात!!
पण एक गोची आहे, अ सुद्ध ब ला कशाप्रकारे व काय हेतुने करतोय हे महत्वाचे.

आणि ज्यांना आपल्या घरातल्या माणसांचं मन ओळखता येत नाही त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवणार? >>हे नाही पटलं. मन ओळखणं असं काही नसतं. आपण आपलं म्हणणं/विचार/भुमिका चांगल्या प्रकारे (=समोरच्या व्यक्तीला स्पष्ट कळेल अशाप्रकारे) दुसऱ्यापर्यंत पोचवत नसू तर दुसरी व्यक्ती आपलं मन ओळखेल ही अपेक्षा चुकीची आहे.

" तू तुझे विचार तुझ्या जवळ का ठेवत नाहीस? तिचं बिचारीचं चांगलं सुरु होतं , अज्ञानात सुख असतं. आता तू तुला जाणीव करून देऊन , तिच्या आयुष्यात नकळतपणे ढवळाढवळ केली आहेस . (असं काहीतरी )>>>>
कुणीतरी आरसा दाखवणारं हवं होतं तुमच्या मैत्रिणीला तो तुम्ही दाखवला आणि उगाच वाईटपणा ओढवून घेतला असंही, पण हे सगळं मैत्रिणीच्या फायद्यासाठी असेल तर काही हरकत नाही, नाहीतर कित्येक सासुरवाशिणी डोळ्यावर झापडं लावून जो मार्ग सासरच्यांना योग्य वाटतो तोच मानून सुख मानतात, त्यात समानतेचा लवलेश केवळ दाखवण्यापुरता असतो किंवा अजिबात नसतो . डोळे एखादि केवळ मैत्रीण म्हणते किंवा तिचे विचार आहेत म्हणून उघडत नाहीत.तर एखादा लेख वाचून, चित्रपट पाहून किंवा समुपदेशन घेऊनही उघडत असतात.

आणि कोणी असं कोणाला बिघडवत वगैरे नसतं जो पर्यंत त्या मैत्रिणीला तसं वाटत नाही . शेवटी आपलं भलं बुरं समजण्याची अक्कल प्रत्येकात असते ज्यांच्यात नसते त्या काहींच्या बाबतीत तुमच्यसारखे वाईटपणा घेणारे अँजेल्स यावे लागतात सो फार विचार करू नका.

माणसात बदल होणे हे सामान्य आहे, कधी लहान सहान तरी कधी मोठे. कधी तात्पुरते, कधी 'काम चालू आहे प्रकारातले' तर कधी कायमचे. आता या मुळे त्या व्यक्तीशी संबधीत लोकांच्या आयुष्यातही काहीतरी बदलणार. हा बदल त्यांच्यासाठी सोयीचा असेल तर ते सहसा त्याचे श्रेय कुणाला द्यावे वगैरे विचार करत नाहीत पण बदल गैरसोयीचा असेल तर मात्र ब्लेम गेम सुरु! मग बदललेल्या व्यक्तीला बोलणार आणि जी व्यक्ती बदलाला कारणीभूत आहे असे वाटते तिच्या नावाने तर डबल खडे फोडणार. हे कुटुंबात होते ,कामाच्या ठिकाणी होते, सोशल सर्कल मधेही होते. माणूस हा तसा स्वार्थी प्राणी आहे. बरेचदा, माझ्यासाठी अमुक वागणे योग्य पण तुला मात्र तसे वागायला परवानगी नाही कारण मग त्यात माझी गैरसोय होणार असा सगळा प्रकार असतो. हे सगळे व्यवस्थित समजून उमजून असते. त्यामुळे सामंजस्य दाखवावे वगैरे अपेक्षा ठेवूच नयेत. कुणी आरोप करायला लागले तर शांतपणे एकदाच सांगायचे की माझी विचारधारा /वावर संबंधीत व्यक्तीला स्वतःसाठी कुठेतरी योग्य वाटला ठीक आहे, बाकीच्यांना नाही पटत तरीही ठीकच असे म्हणून विषय संपवायचा. गिल्ट ट्रिप द्यायचा प्रयत्न झाला तर मनाला लावूनही घेवू नये. ज्या व्यक्तीने बदल केलाय तिच्या बाजूने स्पष्टीकरण देणे वगैरेही करत बसायचे नाही. तुम्ही सॉफ्ट टार्गेट होणार नाही हे लक्षात आले की लोकं गप बसतात.

काही वेळा आपण योग्य गोष्ट करतो पण ती व्यावहारीक शहाणपणात बसत नाही. आपल्या घरचे , वाडवडील ज्यांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेले आहेत, त्यांना आपल्या एखाद्या योग्य गोष्टीचे अन्य परिणाम काय होतील याची कल्पना असते. कदाचित आपल्यालाही माहीत असते म्हणून काही गोष्टी आपण त्यांना न विचारता करतो. नंतर चांगल्या गोष्टीचे साईड इफेक्टस समोर येतात. जर आधीच त्यांचा विचार केला असेल तर तोंड द्यायची तयारी ठेवावी लागते.

आणि तसे परिणाम समोर आल्यावर घरचे चीडचीड करणं स्वाभाविक आहे. कारण आपल्याबद्दल त्यांना काहीतरी वाटत असतं. प्रेमातून आपली माणसं चिडतात सुद्धा. अर्थात प्रत्येक कुटुंबात वेगळी परिस्थिती असू शकते. थंब रूल असा काही नसतो.

(स्पेसिफिक उदाहरण नाही लिहीलं तर प्लँक्स फॉर्म्युल्यावर गहन गप्पा चालू आहेत असं वाटतं. )