आधीचा भाग : https://www.maayboli.com/node/87781
मधमाशीच्या घराची ओळख झाल्यावर आपण आता मधमाशीची ओळख करुन घेऊ. ही माहिती सर्व माश्यांना सारखीच लागू पडत असली तरी माश्यांचे आकार त्यांच्या प्रजातीनुसार लहान मोठे असतात. मधमाशीवरचे बहुतांश संशोधन अॅपिस मेलिफेरावर झालेले आहे. ही युरोपियन माशी आहे पण भारतातही आढळते. आपली भारतीय माशी अॅपिस सेरेना जिला महाराष्ट्रात सातेरी म्हटले जाते. ही मेलीफेरापेक्षा लहान आहे आणि तिच्यावर फारसे संशोधन अद्याप झालेले नाही. मधमाश्यांच्या प्रजातीबद्दल जास्तीची माहिती आपण नंतरच्या भागात घेऊया.
प्राणीजगतातील प्रत्येकाची शरीररचना सहसा नर किंवा मादी यापैकी एका प्रकारात मोडते. मधमाशीत राणीमाशी मादी आहे, ती पुनरुत्पादन करते. नरमाशी नरात मोडते, ती राणीला फलित करते. कामकरी माशी पुनरुत्पादन करु शकत नाही पण तिची शरीररचना राणीमाशीशी मिळतीजुळती असते म्हणुन तिला मादी ठरवले आहे.
आपण मधमाशीच्या शरीररचनेची माहिती करुन घेऊ.
सर्व किटकांप्रमाणे मधमाश्यांनाही डोके, थोरॅक्स म्हणजे डोके व पोट यांना जोडणारा भाग आणि पोट असे तिन भाग असतात. इतर किटकांपेक्षा मधमाश्यांना मध पोट ( honey stomach), पराग पेटी (pollen bag) आणि डंख (sting) हे जास्तीचे भाग असतात. मधपोट हे तिच्या नेहमीच्या अन्न पचन करणार्या पोटाच्या आधी असते, परागपेटी मागच्या पायांवर असते आणि डंख बुडाला असतो.
मध व पराग हे मधमाशीचे अन्न आहे. कामकरी माशी फुलातला मकरंद व पराग गोळा करत हिंडते. मकरंद म्हणजे मध नाही. फुलातल्या मकरंदात प्रामुख्याने साखर व पाणी असते. इतर घटक जसे तेल, सुगंध, अमिनो अॅसिड्स वगैरे फुलांच्या प्रकाराप्रमाणे थोडेफार असतात. परागीवहनासाठी फुलाला मधमाशीची गरज पडते आणि तिला आकर्षित करायला मकरंदात सुगंध व इतर घटक असतात.
कामकरी माशी फुलावर बसते तेव्हा ती आपल्या सोंडेने फुलातला मकरंद (nectar) ओढुन घेते. ही सोंड म्हणजे Proboscis. हिला मधमाशीची जीभ म्हणता येईल. हिचा आकार स्ट्रॉ सारखा असतो आणि आपण जसे स्ट्रॉने ग्लासातले पेय ओढुन घेतो तसे मधमाशी तिच्या सोंडेने फुलातला मकरंद ओढुन घेते.
तर माशी फुलावर बसुन मकरंद ओढुन घेते व तो चिटुकला थेंब तिच्या मधपोटात साठवते.. मकरंद फुलाच्या अगदी तळाशी असतो. तिथे घुसून तो खेचताना फुलाचे पराग तिच्या अंगाला चिकटतात. पराग चिकटावेत म्हणुन तिच्या केसांना फाटे फुटलेले असतात आणि केसांवर ईलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज असतो.
फुलांवर बसलेली असतानाच ती हे परागकण अंगावरुन झाडुन एकत्र करते आणि स्वतःची लाळ व फुलाचा मकरंद यांच्या साहाय्याने त्याची गोळी बनवुन ती आपल्या परागपेटीत ठेवते. ही झाडाझडती सुरू असताना तिच्या अंगावर चिकटलेले पराग फुलांच्या योग्य जाग्यावर पडुन परागीवहन होते आणि फुलांचे काम फत्ते होते.
मधमाशीचे हे वैशिष्ट्य आहे की ती एका वेळी एकाच प्रकारच्या फुलांकडे आकर्षित होते. म्हणजे ती सकाळी बाहेर पडली की दोन मिनिटे आंब्यावर, तिथुन काजुवर, तिथुन नारळीवर असे नाचत बसत नाही. आंब्यावर जायचा हुकूम सकाळी मिळाला की ती दिवसभर आंब्यांवरच फिरत राहते. (हा हुकुम कसा मिळतो ते नंतर पाहु). त्यामुळे आंब्याचे पराग काजुवर किंवा नारळीवर पडुन फुकट गेले असे होत नाही. (हे फक्त उदाहरण आहे
)
काही जातीच्या झाडांमध्ये नर व मादी भाग एकाच फुलात असतात, काही झाडांमध्ये नर व मादी फुले वेगवेगळी असतात. जिथे एकाच फुलात दोन्ही भाग असतात तिथे परागकणांची गोळी बनवताना परागीवहन होते. जिथे फुले वेगवेगळी असतात तिथे माशी आधी नरफुलाला भेट देते आणि नंतर मादीफुलावर बसते. फुलांना माहित असते की माशीला मकरंद व पराग हवेत. जिथे नर व मादी फुले वेगवेगळी असतात तिथे नरातला मकरंद जास्त सुवासिक असतो आणि चटकन उठुन दिसणारे पराग असतात. त्यामुळे मधमाशी आधी नरावर बसते आणि मग कमी सुवासिक व थोडेसेच पराग असलेल्या मादीफुलाला भेट देते. ज्या फुलाला आधीच एका मधमाशीने भेट दिलीय अशा फुलावर दुसरी मधमाशी बसत नाही. फुलाचा ईलेक्ट्रिकल चार्ज, वास आणि रुपडे पाहुन तिला लांबुनच कळते की ये फुल तो लुट गया है
मादीफुलावर बसुन पराग झाडणी सुरू असताना आधीचे चिकटुनच राहिलेले नर फुलाचे पराग मादी फुलावर पडतात आणि परागीवहन होते. फुलांचे परागीवहन ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि सामान्यपणे आपल्याला त्याची शुन्य माहिती असते. 
डोके, थोरॅक्स व पोट तिघांनाही असले तरी राणी, कामकरी व नर हे वेगवेगळे दिसतात आणि मानवी डोळ्यांना वेगळे ओळखु येतात.
राणी माशी (Queen Bee): पोळ्यात राणीमाशी चटकन ओळखता येते ते तिच्या लांबट मोठ्या पोटामुळे. तिच्या पोटात अंडी असतात आणि पुनरुत्पादन करण्यास आवश्यक अवयव असतात. त्यामुळे पोट मोठे असते. राणीचे आयुष्य दोन ते तिन वर्षांचे असते व ती दररोज ऋतुनुसार व फुलांच्या उपलब्धतेनुसार ५००-२००० अंडी घालते. फुले भरपुर असतील तर अंडीही भरपुर घालते, फुले कमी तर अंडी कमी. पण रोज घालावीच लागतात. हे असे का ते नंतर पाहु. तिचे पंख पोटापेक्षा आखुड असतात. म्हणजे पंख नेहमीच्याच आकाराचे असतात पण पोट मोठे असल्यामुळे ते आखुड दिसतात. राणीला डंख असतो पण त्याला काटेरी कड नसते. डंखाचा उपयोग ती प्रामुख्याने दुसर्या राणीमाशीला मारण्यासाठी करते. हे ती का करते हे नंतर पाहुया.
कामकरी माशी (Worker Bee): ही माशी दिसायला राणीमाशीसारखी असते पण पोट लहान असते. हिचा डंख काटेरी असतो. मानवी त्वचेच्या वैशिष्ट्यपुर्ण रचनेमुळे मधमाशीने डंख मारताच तो डंख त्वचेत रुतुन बसतो. मी डंखाचा प्रसाद घेतलाय.
इलेक्ट्रिक शॉक लागल्यासारखे वाटुन काही कळायच्या आत डंखाच्या जागेवर जोरात हाताने झटकुन देण्याची प्रतिक्रिया पुढच्या सेकंदातच आपल्या हातुन होते. झटकली गेल्यामुळे माशीचा डंख तिच्या आतल्या काही अवयवांसहित मानवी त्वचेत रुतुन बसतो आणि माशी लांब फेकली जाते. आतले अवयव उचकटुन गेल्यामुळे बिचारी माशी मरते. आमच्या सोबत ट्रेनिंगला डहाणूच्या एक बंगाली आजी आलेल्या ज्या कित्येक वर्षे हौशी माशीपालन करताहेत. डंखाबद्दल आम्ही बोलत असताना त्या म्हणाल्या की माशीचा डंख त्वचेत रुतला की त्याच्याभोवती असे हळुहळू गोल बोट फिरवत डंख बाहेर काढायचा म्हणजे माशी मरत नाही. मी त्यांना म्हटले की तो भयंकर डंख बसल्यावर कसलीही तात्काळ प्रतिक्रिया न देता माशीला वाचवायचे प्रयन्त करण्याइतपत संतपणा माझ्यात अजुन आलेला नाहीय आणि डंख बसल्यावर जे वाटते ते पाहता यायची शक्यताही नाही 
नरमाशी (Drone) : नरमाशीचे डोळे वर एकत्र चिकटलेले असतात, शरीर जाडजुड, लांबट, कामकरी माश्यांपेक्षा मोठे असते आणि पोट चौकोनी असते. नरमाशीला डंख नसतो.
(वरिल सर्व फोटो नेटवरुन)
परागपेटीत परागगोळी घेऊन पोळ्याकडे परतलेली माशी
(क्रमशः)
सुरेख!
सुरेख!
सोपे करून सांगितले आहे.
शेवटच्या फोटोतील माशी इतक्या सहजपणे पकडली कशी?
देवकी धन्यवाद.
देवकी धन्यवाद.
ती मेलीफेरा आहे. ती आरामात हातात पकडता येते. चावायचे तर अजिबात मनावर घेत नाही. आपल्या सातेरी चावट आहेत म्हणजे चावर्या
हा लेखही मस्त झालाय! सहज,
हा लेखही मस्त झालाय! सहज, सोपा, ओघवता.
शेवटचा फोटो कसा घेतला?
फार भारी!
फार भारी!
हा भागही खूप छान.
हा भागही खूप छान.
उत्तम.
उत्तम.
यांचे जगच निराळे.
वाचतोय.
मधाचं एक बरं आहे विक्रीची घाई
मधाचं एक बरं आहे विक्रीची घाई नसते. मध खूप टिकतो.
छान लेखमाला सुरू आहे. वाचतोय.
छान लेखमाला सुरू आहे. वाचतोय.
दोनही भाग अत्यंत वाचनीय
दोनही भाग अत्यंत वाचनीय झाले आहेत.
मधमाशी हा अत्यंत बुद्धिमान कीटक आहे.
मला वाटतंय कि तुम्हाला ह्या विषयात अत्यंत रुची दिसतेय. ह्या विषयी जास्त माहिती पाहिजी असेल तर
https://biologicalrecording.co.uk/2025/02/18/mind-of-a-bee/
इथे मिळेल.
दोनही भाग मस्त
दोनही भाग मस्त
रोचकता वाढत आहे पुभाप्र.
रोचकता वाढत आहे
पुभाप्र.
सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत
सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं याचा प्रत्यय निसर्गातल्या या अत्यंत क्लिष्ट आणि तरीही सहज चालणाऱ्या व्यवहारांकडे पाहीलं की येतो हे खरं!
पुभाप्र!
छान लेखमाला . वाचतेय.
छान लेखमाला . वाचतेय.
छान झालाय हा भाग! मधल्या
छान झालाय हा भाग! मधल्या मधल्या पंचलाईन मजेशीर! त्यामुळे एकसुरी होत नाही
छान झालाय हाही भाग.
छान झालाय हाही भाग.
हे असं का होतं हे नंतर पाहुया असं खूप वेळा आलय लेखात. ह्यावरऊन लवकर पडदा उठूदे पुढल्या भागांमध्ये. उत्सुकता टिकून आहे.
रोचक आहे
रोचक आहे

वाचतोय
डंख जोरदार असतो
अनुभव हीच खात्री ;
सातेरी विषयी भारतात संशोधन नाही होत का?
वेडा राघू (green bee eater ) मुळे किती नुकसान होऊ शकते?
शेवटचा फोटो कसा घेतला?>>>
शेवटचा फोटो कसा घेतला?>>>
मी नुकतेच पंजाब कृषी विद्यापिठाचे बी किपिंग ट्रेनिंग घेतले. भारतातले हे एकमेव विद्यापिठ असावे ज्यांचे स्वतःचे बी फार्म आहे व पुर्ण ट्रेनिण्ग देतात. तिथे माश्यांची संख्या खुप जास्त होती आणि माशी सहज हातात येत होती. आमच्या टिममधल्या एकाने पोलन दाखवायला माशी पकडली तेव्हाचा फोटो. त्याला माहिती होती त्यामुळे तो इजा न करता माशी हाताळु शकला.
हा विडिओ: https://youtube.com/shorts/LXHV7lFK_aw?si=nyGz52UyPWKTzFvM
सातेरी विषयी भारतात संशोधन
सातेरी विषयी भारतात संशोधन नाही होत का?>>>>
युरोपियन माशी जगभर आहे, सातेरी फक्त आशियात. त्यामुळे युरोपात जेव्हा संशोधन सुरु झाले तेव्हा अर्थातच ते मेलिफेरावर झाले. आणि मेलिफेरा वर्षातुन ३० किलोपर्यंत मध गोळा करते, सातेरी १० किलोपर्यंत. एकतर आशिआई लोकांमध्ये संशोधनाबद्दल किती उत्साह आहे हे सगळ्यांना माहित आहे आणि आता मेलिफेरा म्हणजे पैसा. जिथे पैसा तिथे संशोधन.
पुढे मी माहिती देईनच. सगळी माहिती एकत्र लिहित गेले तर मुळ मुद्दा राहुन फाटे फुटत राहतील म्हणुन खुप काळजीपुर्वक फक्त रिलेटेड माहितीच लिहिलेय. लेख मोठा झाला तर वाचायचा पण कंटाळा येऊ शकतो त्यामुळे विषयवार लिहितेय.
(काल पुढचा भाग थेट माबोवर लिहिला पण गुगल कीपमध्ये सेव करायचे विसरले. टाईपताना कायतरी की दाबली गेली आणि सगळे उडाले
रिकवर करायचा प्रयत्नही फेल गेला. मग मुडच गेला आणि काय लिहिले होते तेही आठवेनासे झाले. लॅपटॉप बंद करुन बाहेर भटकायला गेले
. इथे लिहिताना कीपवर सेव करत राहते कारण असा सगळे उडायचा अनुभव आधीही घेऊन झालाय, पण काल राहुन गेले आणि व्हायचे ते झाले
)
व्हिडिओ मदत आहे.
व्हिडिओ मदत आहे.
गुगल कीप माहीत नाही.
डाटा गेला, मेहनत पाण्यात गेली की वैताग/राग येतो. वाईट वाटते.
मी गुगल डॉक वर लिहिते. ऑटो सेव्ह होते.
गुगल वापरुन मराठी लिहायला मला
गुगल वापरुन मराठी लिहायला मला कंटाळा येतो. माबोवर रोमन टाईप केले की मराठी होते. मी जो गुगल इन्पुट वापरते तो सतत सजेशन देतो आणि स्वतचे नसलेले डोके वापरुन करेक्ट करतो.
वाचतोय.
वाचतोय.
छान लेखमाला सुरू आहे.
अनेक नवीन गोष्टी कळताहेत.
मधमाशीचा डंख बुडाला असतो माहीत नव्हते.
मराठीत अधिकाधिक असे लिखाण होत राहीले तर मराठी ज्ञानभाषा व्ह्ययला नक्की मदत होईल.
छान लेखमाला.
छान लेखमाला.
वेगळंच जग आहे निसर्गाच्या जवळ जाणारं, यातली इतकी माहिती नव्हती फक्त पोळं पाहिलंय बऱ्याचदा झाडाला चिकटलेलं .शेवटचा मधमाशी पकडलेला फोटो कमाल आहे.
खूप रोचक माहिती आहे ही. छान
खूप रोचक माहिती आहे ही. छान झालाय हा ही भाग. हात आखडता घेऊ नकोस. तपशीलात लिही. तुझी लिहीण्याची शैली मला आवडते.
फुलाचा ईलेक्ट्रिकल चार्ज, वास आणि रुपडे पाहुन तिला लांबुनच कळते की ये फुल तो लुट गया है >>
पण हे फारच अद्भुत आहे.
हा भाग ही सुंदर झाला आहे
हा भाग ही सुंदर झाला आहे साधना...
फारच सुंदर आणि माहीतीपूर्ण
फारच सुंदर आणि माहीतीपूर्ण मालिका होते आहे.
फारच अद्भुत माहिती आहे .
फारच अद्भुत माहिती आहे . निसर्गाची किमया, कमाल जे काय असेल ते! _/\_
आणि तूही रंजक होईल असे लिहीते आहेस. नाहीतर मधमाश्यांबद्दल मी मुद्दाम कुठे काही जाऊन वाचले असते असं वाटत नाही
मुलुंड पूर्व वामुमाविचे कुणी आहे का - आमच्या शाळेत शेवटच्या मजल्यावर बाहेरील बाजूस भलीथोरली पोळी असायची..
हा भागही फार छान. फोटोमुळे
हा भागही फार छान. फोटोमुळे वाचायला अजून मजा येतेय.
साधनाताई,
साधनाताई,
हा भाग सुद्धा खूप माहितीपूर्ण झाला आहे.
तिला लांबुनच कळते की ये फुल तो लुट गया है >>
मादीफुलावर बसुन पराग झाडणी सुरू असताना आधीचे चिकटुनच राहिलेले नर फुलाचे पराग मादी फुलावर पडतात आणि परागीवहन होते.>>>>>>> इथे परागण असा शब्द पाहिजे ना?
ऋतुराज… मी शाळेत असताना
ऋतुराज… मी शाळेत असताना परागीभवन हा शब्द होता. मी हा लेख लिहिल्यावर आपले शशांकदादा पुरंदरे मला म्हणाले की आता परागीवहन हा शब्द जास्त शास्त्रिय म्हणुन स्विकारला गेला. आता तुम्ही परागन म्हणता आहात. अर्थात तोही योग्यच असणार.
कृपया प्रत्येक शब्दात काय अभिप्रेत आहे ते सांगा. कारण तुम्हा मंडळींनी अभ्यास केलाय. माझी माहिती शाळेत शिकवलेली आहे. नंतर या शास्त्राशी तितकासा संबंध राहिला नाही.
साधनाताई,
साधनाताई,
परागीवहन म्हणजे परागाचे वहन. ते वारा, कीटक, पाणी, पक्षी याद्वारे होते. म्हणजे शब्दातून तसा अर्थ व्यक्त होतो.
परागण म्हणजे पराग स्त्रीकेसरावर पडणे/ चिकटणे. (प्रत्यक्ष क्रिया. जिथून फलधारणा सुरू होते)
शाळेत असताना मी परागसिंचन हा शब्द शिकलो. परागीभवन हा देखील योग्य वाटतो.
जाणकारांनी अधिक भर घालावी.
Pages