सुपर मॅन

Submitted by Meghvalli on 8 February, 2026 - 09:38

आठवतंय…
तू खूप लहान होतास.तुझी जिज्ञासा खूप मोठी होती.तेव्हा मी तुझ्यासाठी सुपरमॅन होतो.तुझ्यासाठी मी सूर्यसुद्धा आणू शकतो, असं तुला वाटायचं.
या जगातला सर्वात ताकदवान माणूस जर कुणी असेल,तर तो नक्कीच मीच (तुझा बाबा)आहे, असाच तुझा दृढ विश्वास होता.
तो काळ…
जेव्हा मी नुकताच बाबा झालो होतो.मी मात्र नेहमी थोडा घाबरलेलाच असायचो…
एका विचाराने —
तो दिवस आला तर काय करीन,जेव्हा तुला कळेल की
तुझे बाबा काही सुपरमॅन नाहीत, ही-मॅन नाहीत,ते तर फक्त या शहरातले,साधीशी नोकरी करणारे,अगदी साधा माणूस आहेत.
कदाचित त्या भीतीमुळेच
मी दिवस-रात्र धावत राहिलो,काम करत राहिलो.
तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी,हेच माझं आयुष्य बनून गेलं.तुझ्या नजरेत मी कायम
तुझा सुपरमॅन राहावं,एवढीच माझी धडपड होती.
कळलंच नाही…
या धावपळीत आयुष्य कधी निघून गेलं आणि तू कधी मोठा झालास.आता तू एक तगडा, देखणा तरुण झाला आहेस.माझ्यासाठी तर तूच आता सुपरमॅन आहेस.
मी मात्र थोडा थकलोय…
धावायची स्पर्धा अजूनही आहे,पण शरीर आणि मनाचा ताळमेळ आता जुळत नाही.
थांबायचं नाही मला…
मला अजून उडायचं आहे,
पण पंखातलं बळ जरा कमी पडलंय.
सांग ना…आता तू माझा सुपरमॅन होशील का?

शुक्रवार, २२/६/२०२३
९:४० रात्री
अजय सरदेसाई-मेघ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!