ऑपरेशन अबॉर्शन

Submitted by सोकाजीरावत्रिलोकेकर on 5 February, 2026 - 09:25

दहा-अकरा वर्षांपूर्वी ऑफिसच्या कामानिमित्त माझी आमच्या मलेशियातील ऑफिसमध्ये इंटर्नल ट्रान्स्फर झाली. त्या वेळी मलेशियाला ट्रान्स्फर घेण्यामागची अनेक कारणं होती; त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मलेशियातलं अफाट फूड वैविध्य. लोकल मलेशियन, चायनीज, थाय, व्हिएटनामी, फिलिपिन्ससारख्या साऊथ-ईस्ट एशियन देशांच्या नानाविध रुचकर डिशेस, शिवाय इतरही अनेक युरोपियन, मिडल-इस्टर्न देशांच्या खाद्यसंस्कृती, कौलालंपुर ह्या मलेशियाच्या राजधानीतल्या प्रत्येक कोपऱ्यावरच्या रेस्टॉरंटमध्ये सहज उपलब्ध आहेत.

मलेशियात आलो तेव्हा तब्येतीने मी किंचितसा स्थूल होतो. बीएमआय इंडेक्सच्या ‘यलो झोन (ओव्हरवेट)’ मध्ये होतो, पण बॉर्डरलाइनवर त्यामुळे फारसं घाबरायचं कारण नव्हतं. पण इथल्या खाण्यापिण्याच्या वैविध्यामुळे आणि मी तसाही खवय्या असल्यामुळे सगळे पदार्थ, सगळ्या पद्धतीचं जेवण टेस्ट करण्याची माझी जन्मजात हौस, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे वैविध्यपूर्ण खाण्याचं प्रमाण हळूहळू वाढत गेलं. आणि, माझा तो बॉर्डरलाइन बीएमआय इंडेक्स हळूच ‘ओव्हरवेट’ कॅटेगरीकडे झुकू लागला.

माझं वाढतं वजन पाहून माझी फिजिकल ट्रेनर असलेली बायको, “जिममध्ये जा, जिममध्ये जा” असा घोष लावू लागली. स्वतःच्या नवऱ्यालाच तब्येतीत (आणि ताब्यातही) ठेवू शकत नाही ती ट्रेनर इतर विद्यार्थ्यांना कशी काय फिट ठेवणार? असा प्रश्न पडून विद्यार्थी कमी झाले तर काय, ही ही चिंता बहुधा तिला सतावत असावी! ‘जिथे पिकतं तिथे विकत नाही’ या उक्तीप्रमाणे घरातच फिजिकल ट्रेनर असूनही त्याचा काहीच उपयोग होत नव्हता असं नाही, तर मलाच त्याची गरज वाटत नव्हती. कारण जिभेचे चोचले पुरवण्याची पूर्ण जबाबदारी कौलालंपुरमधली हॉटेल्स अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत होती.

ऑफिसातल्या बैठ्या कामाच्या स्वरूपामुळे शारीरिक हालचाली आधीच कमी होत होत्या. त्यात काही कामानिमित्त सिंगापूरच्या ऑफिसमध्ये दीड-दोन महिन्यांच्या प्रोजेक्टसाठी जावं लागलं. ऑफिस चांगी बिझनेस पार्कमध्ये, बुक केलेलं हॉटेलही जवळच होतं, चालण्याच्या अंतरावर. या दीड-दोन महिन्यांत फक्त ऑफिस–हॉटेल–ऑफिस एवढंच आयुष्य उरलं होतं. शनिवार-रविवारही प्रोजेक्टचं काम असायचं. रात्री उशिरा हॉटेलवर परतल्यावर हॉटेलच्याच रेस्टॉरंटमधून, रूम सर्व्हिसने जेवण ऑर्डर केल्याशिवाय पर्याय नसायचा. त्यात खाण्याबरोबरच वाइन आणि बिअरचं प्रमाणही प्रचंड वाढलं. शारीरिक श्रम शून्य, खाण्यापिण्याचा मारा प्रचंड, परिणामी बीएमआय इंडेक्स ‘येलो झोन’ पार करून थेट ओबेसिटीच्या ‘ऑरेंज झोन'मध्ये जाऊन पोहोचला.

प्रोजेक्ट संपून कौलालंपुरला परत आलो, पण वाढलेल्या वजनामुळे लिथार्जी जबरदस्त वाढली होती. काहीही करण्यात उत्साह उरला नव्हता; खाणं मात्र सुरूच होतं. ‘कळतंय पण वळत नाही’ या अवस्थेत बायकोच्या सल्ल्यांकडेही दुर्लक्ष होतच होतं. वजन ९० चा आकडा पार करून शतकाकडे धावू लागलं होतं, तरीही तब्येतीची काळजी घ्यावी असं काही फार तीव्रतेने वाटत नव्हतं. पण पोटाचा अक्षरशः नगारा झाला होता त्यामुळे आत कुठेतरी वजन कमी व्हावं अशी एक सुप्त इच्छा नक्कीच होती. त्या इच्छेला मान देऊन नियतीही काहीतरी प्लॅन करत असावी बहुदा.

एके दिवशी आमच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गाडी पार्क करून लिफ्टमध्ये शिरलो. लिफ्ट सातव्या मजल्यावर थांबली, सातवा मजला कॉमन युटिलिटी फ्लोअर आहे; लहान मुलांचं पार्क, स्विमिंग पूल वगैरे ह्या मजल्यावर आहे. त्या सातव्या मजल्यावर एक छोटी चायनीज मुलगी, साधारण चार–पाच वर्षांची, तिच्या आईसोबत आत आली. मी शिष्टाचार म्हणून तिच्या आईला “हॅलो” म्हटलं.

पण ती मुलगी मात्र माझ्याकडे टक लावून पाहत होती. इतकं रोखून की मलाही थोडंसं कॉन्शस व्हायला झालं. मी तिच्याकडे पाहून हसलो. मी हसल्या हसल्या तिने तिच्या आईला विचारलं, “मॉमी, डज दिस अंकल हॅव अ बेबी इन हिज स्टमक?”

मी एकदम सुन्न झालो. तिची आई कानकोंडी झाली. एकदम खजील होऊन ती अक्षरशः गोरीमोरी झाली आणि घाईघाईने तिने मला “सॉरी” म्हटलं. मीही चेहरा मिश्किल ठेवण्याचा प्रयत्न करून, कसाबसा हसून, “इट्स ओके!” म्हणालो. इट्स ओके म्हणालो खरं…पण घाव वर्मी लागला होता!

त्या दोघी उतरून गेल्यानंतरही ते वाक्य डोक्यात घुमत राहिलं. घरी पोहोचेपर्यंत मी पूर्णपणे विचारांच्या भोवऱ्यात अडकलो होतो. घरी येऊन कपडे बदलले, अंघोळ केली, हॉलमध्ये येऊन बसलो, पण भानावर नव्हतो. बायको कधी जवळ येऊन बसली, कधीपासून काहीतरी बोलत होती, हे लक्षातच आलं नाही. शब्द कानावर पडत होते, पण आत जात नव्हते. शेवटी तिने कोपराने ढोसलं तेव्हा कुठे भानावर आलो. तिने विचारलं, “आज काय झालंय, कसला विचार करतो आहेस एवढा?”

मी गंभीर चेहऱ्याने उत्तर दिलं, “ऑपरेशन अबॉर्शन!”

बायको एकदम प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे बघत, माझ्या कपाळावर हात लावून म्हणाली, “ताप आलाय का? कसलं ऑपरेशन? कोणाचं अबॉर्शन?” मग शांतपणे तिला लिफ्टमध्ये काय झालं ते सगळं सांगितलं. तिनेही प्रचंड प्रयासाने हसू दाबत ते ऐकून घेतलं आणि शहाण्या बायकोसारखं विचारलं, “ऑपरेशन अबॉर्शनसाठी जिम प्लॅन आणि डायट प्लॅन लागेल, बनवून देऊ का?”

लगेचच बायकोकडून जिम प्लॅन आणि डायट प्लॅन तयार करून घेतला. तिला गळ घालून माझ्यासोबत रोज एक तास जिममध्ये यायला लावलं. पुढचे सहा महिने हे ऑपरेशन अबॉर्शन सुरू होतं. दर महिन्याला वजनाचा काटा डावीकडे सरकत होता. सातव्या महिन्यात तो ८० च्या खाली येऊन ७९ वर स्थिरावला. वजन कमी झाल्यावर धावायला सुरुवात केली. हाफ मॅरेथॉनसाठी नाव नोंदवलं आणि ती पूर्ण केली. धावणं अंगवळणी पडलं. मग हायकिंग सुरू केलं. कौलालंपुरच्या आजूबाजूचे जवळपास सगळे डोंगर, टेकड्या काबीज करून झाल्या.

अशा प्रकारे वजन ९५ किलोवरून ७९ किलोवर येत ‘ऑपरेशन अबॉर्शन’ यशस्वीपणे पार पडलं! 😊

Group content visibility: 
Use group defaults

सहा महिन्याचे ऑपरेशन अबॉर्शन 😀

धमाल !

हे जमवलं त्याबद्दल अभिनंदन !

फाटक्या तोंडाच्या त्या गोड मुलीचे कौतुक 😀
Sometimes a pin works better than scalpel

छान ! मस्त !!
( सहज मनात आलं - "मॉमी, डज दिस अंकल हॅव twins इन हिज स्टमक?”, असं त्या चिमुरडीने जर म्हटलं असतं, तर हेच ' ऑपरेशन अबॉर्शन ' तीन महिन्यातच पार पडलं असतं !! Wink )

अभिनंदन . कानपिचक्या द्यायला कधी कधी मोठ्याच गोष्टी लागतात असं नाही . एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा आपल्याला खूप मोठा बदल करायला भाग पाडते . उत्तम लेख .

साकी, आकारात आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

तुम्ही अंमलात आणलेला Diet plan, workout schedule इत्यादी तपशिलाचा फाफटपसारा टाळून थेट लिहिलेला आवडलं.

>> वो भी क्या दिन थे यार....
डिट्टो!
तुझा मागचा लेख वाचताना तंतोतंत ह्याच भावना होत्या.

- (नॅास्टॅल्जिक झालेला) सोकाजी

Operation Successful
मस्तच सोकाजीराव

मस्त लिहिलंय.
हेडिंग वाचून आधी काहीतरी वेगळीच कथा वाटत होती .
त्या लहान्या मुलीचे खरच आभार मानले पाहिजेत तुम्हाला आरोग्याव्या दिशेने स्टेप घ्यायला प्रवृत्त केल्याबद्दल.