माझ्या आजूबाजूला नुकतीच घडलेली एक घटना मला खूप अस्वस्थ करून गेली.
एक आजी-आजोबा आहेत. त्यांना दोन मुलं आणि तीन मुली आहेत. यापैकी एक मुलगा स्वर्गवासी असून उरलेली सर्व मुले-मुली आपापल्या संसारात सुखी आहेत. आजी-आजोबांनी जमीन विकून मिळालेले पैसे दोन मुलांना देऊ केले; पण जेव्हा काही अडचण येते किंवा काही करण्याची वेळ येते, तेव्हा नेहमी मुलीच पुढाकार घेऊन उभ्या राहतात.
काही दिवसांपूर्वी आजीकडे असलेले ६–७ तोळे सोन्याचे दागिने आणि घरात ठेवलेल्या २५ हजार रुपयांपैकी १९ हजार (अशी ऑड रक्कम) चोरीला गेली. घरात जबरदस्तीने घुसल्याच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. त्यामुळे जवळपासच्या सगळ्या नातेवाईकांचा संशय एका नातवावर गेला. कोणी उघडपणे काही बोललं नाही; पण दबक्या आवाजात चर्चा मात्र झाली.
आजीला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र आजीने नकार दिला, तोही एका भीतीपोटी आपल्याला ज्याचा संशय आहे तो जर खरंच चोर निघाला तर? आणि त्यानंतर त्याने स्वतःला काही करून घेतलं तर त्याचं ओझं आपल्या माथी येईल. तक्रार करायला सांगणारी मुलगीसुद्धा नंतर माघार घेत म्हणाली, “उद्या खरंच काही वाईट घडलं, तर ‘तू तक्रार करायला भाग पाडलंस’ असं सगळं खापर माझ्यावर फुटेल. त्यामुळे ज्याचे दागिने आहेत ती व्यक्तीच योग्य तो निर्णय घेईल. आम्हाला तरी प्रॉपर्टीतून काय मिळालं आहे? मग आम्ही का इतके कष्ट घ्यायचे?” अशी तिची भूमिका झाली.
माझ्या मनात मात्र एकच विचार आला कि आजीने तक्रार केली नाही आणि नातवाला (तो जर खरंच चोर असेल तर) योग्य ती शिक्षा झाली नाही, तर ‘घरातली चोरी पचली’ या विचाराने तो नातू उद्या पुढे जाऊन मोठा गुन्हेगार झाला, तर त्याची जबाबदारी आजी स्वतःवर घेईल का?
या सगळ्यात आजोबांनी एक वेगळाच ‘खेळ’ खेळला. त्यांनी नातवाला सांगितलं, “तू चोरी केली असेल तर दागिने परत आणून दे. मी तुला मोठी गाडी घेऊन देईन.” (इथली ‘मोठी गाडी’ म्हणजे सुमारे दीड-एक लाखापर्यंत जाणारी महागडी दुचाकी.)
अशा पद्धतीने दोन दिवसांत दागिने घरी परत आले. (पैसे मात्र परत आले नाहीत; आजोबांनी ते माफ केले.) उलट, नातवासाठी मोठी गाडी बुक करून देण्याचं आश्वासनही दिलं गेलं.
मी हे सगळं प्रकरण खूप कन्सर्नने फॉलो करत होते. पण ज्या पद्धतीने याचा शेवट झाला, ते पाहून माझ्याकडे फक्त हतबुद्ध होण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही.
**************************************************************
कुटुंब ही आपल्याकडे सुरक्षिततेची, संस्कारांची आणि न्यायाची पहिली शाळा मानली जाते. पण हीच शाळा जेव्हा चुकीच्या वागणुकीला मूक संमती देते, तेव्हा समाज घडतो की बिघडतो, याचा विचार करायला भाग पाडणाऱ्या घटना आजूबाजूला घडताना दिसतात.
वृद्ध आई-वडील आयुष्यभर कष्ट करून जे काही उभं करतात, ते वाटपाच्या वेळी ‘मुलांसाठी’ राखून ठेवतात. पण जबाबदारीची वेळ आली की अनेकदा मुलीच पुढे येतात हे वास्तव वारंवार दिसतं. तरीही निर्णयाच्या वेळी त्यांचा आवाज दुय्यमच राहतो.
घरात चोरी होते. बाहेरून घुसखोरी नाही. संशय घरातल्याच एका व्यक्तीवर जातो. तक्रार करण्याचा पर्याय समोर असतो, पण तो ‘नातं तुटेल’, ‘नाव खराब होईल’, ‘काही वाईट झालं तर दोष माझ्यावर येईल’ या भीतीमुळे बाजूला ठेवला जातो. इथे प्रश्न चोर कोण आहे, यापेक्षा मोठा प्रश्न असा उरतो चूक उघडकीस आणणं गुन्हा ठरतंय की काय?
चूक करणाऱ्याला शिक्षा नको, पण त्याच्या भावनांची जबाबदारी मात्र सगळ्यांनी घ्यायची असा विचित्र समतोल साधला जातो. परिणाम असा की गुन्हा मान्य होतो, पण गुन्हेगारी नाहीशी होत नाही. उलट, ती गोड शब्दांत झाकली जाते.
कळस म्हणजे, चूक मान्य केल्यावर शिक्षेऐवजी बक्षीस दिलं जातं. ‘दागिने परत दे, गाडी घे’ असा व्यवहार होतो. इथे मूल्य जपलं जात नाही; सौदा केला जातो. चूक सुधारली जात नाही; ती पचवली जाते.
अशा वेळी प्रश्न फक्त एका कुटुंबापुरता राहत नाही. आज घरातली चोरी माफ झाली, तर उद्या बाहेरची चोरी थांबेल याची खात्री कोण देणार? संस्कार हे उपदेशातून नाही, तर कृतीतून रुजतात. आणि जेव्हा कृती चुकीला संरक्षण देते, तेव्हा समाज घडत नाही तो हळूहळू कुजत जातो.
कदाचित म्हणूनच अशा घटनांचा शेवट पाहून हतबुद्ध व्हायला होतं. कारण इथे हरलेली व्यक्ती एक आजी नसते, किंवा एक कुटुंब नसतं हरलेला असतो तो न्याय, आणि त्याच्यासोबत आपलाच समाज.
***********************************************************************
घराघरातला मौन-संमतीचा गुन्हा
Submitted by दक्षिणा on 5 February, 2026 - 01:57
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लेखिकेच्या विचारांशी सहमत. पण
लेखिकेच्या विचारांशी सहमत. पण त्या आजींच्या भीतीशीही ही सहमत. त्या नातवाने स्वतःला काही करून घेतले असते तर या वयात आजींना उर्वरित आयुष्य कंठणे कठीण गेले असते.
येथे त्या मुलाच्या पालकांनी कठोर भूमिका घ्यायला हवी होती.
चांगला विषय आहे.
चांगला विषय आहे.
चोर घरचा असू शकतो ही बरेपैकी शक्यता असल्याने पोलिसात तक्रार केली नाही हे योग्यच केले.
पुढे जे केले ते अयोग्य आणि हास्यास्पद होते. मुलगा गेला तो आता हातचा. विसरा त्याला..
गुन्हा कबूल करा आणि शिक्षेत सूट मिळवा हे योग्य आहे. मुले चुकतात, पण अभय मिळायची शक्यता ठेवल्यास ते चूक लपवून मोठी चूक करत नाही. पण शिक्षेत सूट ऐवजी बक्षीस दिले तर चुकीचे गांभीर्यच संपले.
लेखात आलेला मुले मुली असमानता हा स्वतंत्र विषय आहे खरे तर. पण प्रॉपर्टी वाटप फक्त मुलांमध्ये होणार असेल तर मुलींनी भांडून आपली वाटणी घ्यायला हवी. आणि हे सर्व मुलींनीच केले पाहिजे. पैश्याची हाव/गरज नसली तरीही. उगाच वाईटपणा कश्याला म्हणून प्रॉपर्टीवरचा हक्क एकदा हसत हसत सोडला की सोबत हे असे आपल्याच घरच्या मॅटर मध्ये बोलायचे हक्क सुद्धा गमावले जातात. आपल्या वाटणीचा पैसा घ्या आणि मग हवे तर भावाला मदत करा, त्यात जास्त मानसन्मान मिळतो.
ह्यात खूप कंगोरे आहेत.
ह्यात खूप कंगोरे आहेत.
मुलीने मीच का बोलू , मला काय मिळालंय अशी दुय्यम भूमिका घेणे, आजीचे स्वतःवर आणि नातवावर असलेले प्रेम त्यातून आलेली अगतिकता, नातवाने ह्याचा गैरफायदा घेणे, आई वडिलांनी मौन राखणे आणि आजोबांनी अत्यंत गैर मार्गाने ते दागिने मुलाकडून परत मिळवणे वगैरे वगैरे.. हे एका दिवसात घडत नाही, मुलं सगळं बघत असतात आणि प्रत्येकाचं पाणी जोखत असतात, जिथे मऊ लागतं तिथे कोपराने खणतात. असो.
मृत्युपत्र केले नसेल तर मुलींनी भांडून वाटा घ्यावा ह्याला अनुमोदन.. हल्ली मुली ही भांडतात पैशासाठी म्हणून मुलींनाच बदनाम केले जाते पण मुलींवर भांडणाची वेळ येतेच का ? तरी ही बहुसंख्य ठिकाणी संबंध बिघडतील म्हणून मुली हक्क सोडतात जातो हे ही वास्तव आहेच. आपल्या मुलांमधली पैशासाठी होणारी भांडण टाळायची असतील, किंवा मुलींना द्यायचं नसेल किंवा वारसा हक्कापेक्षा कमी /जास्त द्यायचे असेल तर मृत्युपत्र करणे हा बेस्ट मार्ग आहे.
आजीची हतबलता समजून येते.
आजीची हतबलता समजून येते.
आजोबांचं वागणं नाही पटलं.
मुलाच्या आई वडिलांनी ह्या प्रसंगी ठाम भूमिका घेणं अपेक्षित आहे.
मला वाटलं आजोबा चोर
मला वाटलं आजोबा चोर पकडण्यासाठी असं आमिष दाखवताहेत, पण त्यांनी खरंच गाडी घेताहेत!!?
खरंतर दागिने मिळाल्यावर चांगला दम भरायला हवा होता तसेच त्याच्यासाठी घराचे दरवाजे कायमस्वरूपी बंद करायला हवे होते.
तुझा कन्सर्न समजला. कदाचित
तुझा कन्सर्न समजला. कदाचित क्लोज असल्याने बारकावे जास्त माहिती असतील. मी आधी नेहमीप्रमाणे ओझरतं वाचलं तेव्हा आमच्या घराबाबत आहे हे असं वाटून धस्स झालेल. आमच्या घरात ती मुलगी होती. ( थोडं पर्सनल लिहिले कारण खूपच रिलेट झाले. या विषयावर चर्चा नको वाटते.).
अशा कोणत्याही प्रसंगात खूप सावध पवित्रा घ्यावा लागतो. पोलीस खूप शहाणे असतात असं नाही. या वयात पोलीस चौकी दाखवली तर त्या मुलावर/ मुलीवर वाईट परिणाम होतील. समाजात बदनामी होईल. मित्र कट होतील. . भावनिक असेल तर आपल्या कुटुंबाशी कनेक्ट व्हायला खूप जास्त वेळ लागेल. हिंसक असेल तर मनात राग राहील.
नातं जपण्याला सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे . आजीने केलं ते योग्य केलं. माझ्याकडून आजीला एक डझन देवगड हापूस. आजोबांनी केलं ते पटलं नाही. पण लगेच मुलगा हाताबाहेर गेला असं पण नाही. या केसबद्दल इतकेच.
जनरली, अशा केस मधे नेमका प्रॉब्लेम काय आहे ते तपासावा. . कुठल्या मोबाईल गेमचा शिकार झालाय का? कुणी ब्लॅकमेल करतंय का हे बघा. पोलिसात जायच्या आधी वकील घ्या. पोलिसांना विश्वासात घ्या आणि त्याचा प्रॉब्लेम शोधा. तो सॉल्व करा. हे करत असताना सतत त्याच्याशी पॉझिटिव्ह डायलॉग ठेला. जे चाललंय ते आपल्याला शिक्षा म्हणून नाही तर भलं व्हावं म्हणून चाललंय हा विश्वास त्याला यायला हवा.
अनुभवातून सांगते. जेव्हा घरात चोरी करणारं कोवळं मूल निघतं तेव्हा त्याला दोष देण्याआधी आपलं काय चुकलं हे बघाव. दुसऱ्याला सल्ला देणं खूप सोपं. मूल आपल्याला येऊन का सांगत नाही हा प्रश्न कळीचा आहे. आपली त्याला भीती वाटते? आपल्याला विश्वासाने सांगणे त्याला योग्य वाटले नाही. याचे कारण शोधून आपल्यात सुद्धा बदल घडवला पाहिजे.
उशीर कधीच होत नाही. संताप केला तर मात्र संधी कधीच येत नाही. संवाद आणि कृती दोन्हीत आपलेपणा, करूणा आणि विवेक हवा. हे इन जनरल लिहिले आहे. यातून गेल्याने जर जवळून पाहिले नसेल तर कसे अनाहूत सल्ले येतात आणि ते जास्त वेदनादायी असते याचा ही अनुभव घेतला आहे.
इतर गोष्टी विपूत बोलेन.
रानभुली पोस्ट आवडली.
रानभुली पोस्ट आवडली.
धाग्यातून केवळ एकच बाजु समोर येते (याला मर्यादा असतात, ओपन फोरम मध्ये सगळे मांडणे शक्य नसते इत्यादि सर्व मान्य आहे, सगळे इथे मांडावे असे म्हणायचे नाहीय), मागे नक्की काय घडत असते कुणा कुणाचे चुकले असते काही सांगता येत नाही. तत्वतः अमुक अमुक करायला हवे होते असे वाटणे वेगळे आणि प्रत्यक्षात ती सिस्टीम कशी आहे त्याने आपल्या वाटते ते अचिव्ह होते की नाही हे वेगळे.
मुलाने सोने चोरले तेव्हा
मुलाने सोने चोरले तेव्हा ठेवले कुठे होते हे सुद्धा बघायला हवे.
कोणीतरी घरचा सामील असू शकतो.
काय माहीत कदाचित आजोबाच असावेत.
चोराला गाडी देणे इतके सहज होत नाही.
एकवेळ बाहेरच्या चोराशी असे डील केले असते की दहा लाखाचे सोने परत कर आणि एक लाख बक्षीस घेऊन जा तर त्यात नऊ लाखाचा फायदा बघितला हे समजले असते.
पण घरच्या मुलाशी असे करणे म्हणजे मुलगा हातचा जाऊ देणे.
गाडी चालवणारा मुलगा म्हणजे वयाने मोठा असेल. ही घटना मोठी असली तरी कदाचित याची बीजे लहानपणापासून रोवली गेली असतील. अश्या similar घटनांत असेच केले गेले असावे त्यामुळे मुलाने सुद्धा बिनधास्त सोने परत केले.
याला अनेक कंगोरे आहेत....
याला अनेक कंगोरे आहेत.... सर्वप्रथम त्याने चोरी का केली? याचा अर्थ घरात एकमेकांवर विश्वास नाही, किवा तो मुलगा कशाच्या तरी आहारी गेला आहे... मला विचारले तर तपास करूनही दागिने सापडले नसते तर त्या मुलाने असा प्रयत्न पुन्हा केला असता.... सावधगिरी बाळगून त्याला रंगेहात पकडता आले असते आणि कोणतेही आमिष न दाखवता त्याला सुधारण्याचा प्रयत्न करता आला असता...
<<<धाग्यातून केवळ एकच बाजु
<<<धाग्यातून केवळ एकच बाजु समोर येते (याला मर्यादा असतात, ओपन फोरम मध्ये सगळे मांडणे शक्य नसते
>>>>>
नुसते धागाच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा आपण जे बघतो आणि अनुभवतो त्यातही सर्वच बाजू समोर आल्या नसतात.
ज्यांनी धागा काढला त्यांनाच नाही तर ज्यांच्याशी हे घडले त्या घरातल्या सर्वांना देखील पूर्णपणे खरे काय ते माहीत नसेल.
चोरी का केली याचा शोध तर सर्वात पहिले घेतला असणार. पहिला प्रश्नच तो असणार..
सगळ्यांचे प्रतिसाद वाचले .
सगळ्यांचे प्रतिसाद वाचले . माझ्या अगदी जवळपास हि घटना घडल्याने मला अधिक माहिती आहे .
इथे काहींनी लिहिले आहे कि आईवडिलांनी कठोर भूमिका घ्यायला हवी होती . पण तो नातू आहे त्याचे वडील म्हणजे आजी आजोबांचा मुलगा या जगात नाही . आणि कॉलेज चुकवायचे म्हणून हा नातू आईची नजर चुकवून आजी आजोबांकडे येऊन रहात असे. या चोरीबाबत त्याच्या आईला कल्पना दिली गेली आहे कि नाही मला कल्पना नाही . कारण ती सून आधीच या आजी आजोबांवर चिडून आहे , त्यातून अधिक तमाशा नको म्हणून आजी आजोबानी हे प्रकरण परस्पर मिटवले असू शकते .
या वरच्या माहितीनंतर बरीच
या वरच्या माहितीनंतर बरीच भावनिक समीकरणे बदलली..
आजीची हतबलता समजून येते. +१
आजीची हतबलता समजून येते. +१
मनीमोहोर मृत्युपत्र करणे
मनीमोहोर मृत्युपत्र करणे गरजेचे आहे आणि शहाणपणाचे लक्षण आहे पण याबद्दल जागरूकता अजूनही आपल्या समाजात नाही . अगदी भल्या भल्या शिकल्या सवरलेल्या लोकांच्यात सुद्धा मी मेल्यावर माझ्या पैश्याचे काय होते मला काय करायचं आहे ? (म्हणजे बाकीचे बसू देत भांडत हा पवित्रा दिसतो )
प्रॉपर्टीसाठी भांडण्याची मुभाच मुलींना दिली जात नाही . इथे मुलींना सरळ कागद हातात देऊन इथे सही करा असे फर्मान सोडण्यात आले होते . लोक आपल्या सोयीने वागतात . दिली ना प्रॉपर्टी मुलांना ? भोगा मग आपल्या कर्माची फळे , असेही मुली मनात म्हणत असतील .
युवी तुमचा एकच प्रतिसाद मला
युवी तुमचा एकच प्रतिसाद मला असा वाटला ज्याच्याशी मी रिलेट करू शकले . मी तर सल्ला दिला होता कि अगदी पोलिसात तक्रार वगैरे करू नका पण बाहेरून सध्या वेषातला एखादा पोलिसांसारखा दिसणारा माणूस आणून नातवाला हग्या दम भरा . पण मी बाहेरची आहे फार लक्ष नाही घालू शकले .
दागिने आणून दिलेस तर गाडी घेऊन देणे हे अमिष दाखवण्यापुरते ठीक होते , दागिने हातात आल्यावर आजोबानी झापडायला हवे होते. पण त्यांनी ते केले नाही , गाडी घेऊन दिली .
घरातल्या चोरीबाबत 2+2 = 4 असं
घरातल्या चोरीबाबत 2+2 = 4 असं करता येत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो.
1. आजीची चूक नाही.सोन्यासाठी नातवाचं भविष्य काळवंडू शकेल,त्याहीपेक्षा त्यांचा मुलगा सून आणि समाज काय म्हणेल याची लाज आणि भिती असावी.
2. आजोबा चुकले असे मला वाटत नाही.कारण एक-दीड लाखापेक्षा अधिक किमतीचे सोनं त्यांनी वाचवले.त्यांनी बक्षीस दिले असे न वाटता व्यवहार जपला.शेवटी मुला सुनेला न दुखावता आणि आपला आर्थिक तोटा टाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
3. इथे आजीच्या मुलीची ही चूक नाही कारण जेंडर बायस हा बराच आई-वडिलांना असतोच. मुलीला ते सहजपणे म्हणू शकतात की तुझ्यामुळे मी पोलिसात तक्रार केली. पण हेच मुलीच्या जागी मुलगा असता तेव्हा आई-वडील गप्प राहिले असते.कारण मुलगा हा म्हातारपणची काठी वगैरे वगैरे.
4.त्यामुळे जवळपासच्या सगळ्या नातेवाईकांचा संशय एका नातवावर गेला ......म्हणजेच नातवाला चोरीची सवय ही आधीपासून असावी एकदम सोन्यावर,कॅशवर डल्ला मारण्यापूर्वी छोट्या मोठ्या चोऱ्या तो करत असावा की ज्या लक्षात आल्या नसाव्यात.
@रानभुली तुमची कमेंट आवडली
@रानभुली तुमची कमेंट आवडली आणि पटली सुद्धा .
कारण तुम्ही जे जे मुद्दे लिहिलेत तेच मुळात कारणीभूत आहेत काही गोष्टी घडण्यास . या मुलाचे वडील बऱ्यापैकी सधन होते . डीएसके बुडाले आणि हे पण बुडाले त्यामुळे वडिलांना दारूचे व्यसन लागले आणि त्यात ते गेले . गणित सोडवताना पहिली पायरी चुकली कि पुढे अख्ख समीकरण चुकतं तसं काहीसं झालंय इथे .
देवकी त्या नातवावर संशय
देवकी त्या नातवावर संशय येण्यास कारण कि तो सोडून इतक्या फ्रिक्वेंटली घरात कोणीच येत नव्हते .
तुम्ही आता दिलेल्या अधिक
तुम्ही आता दिलेल्या अधिक माहितीनंतर असे वाटतेय की वडील नसताना लाडावल्या गेलेला नातु आहे. आजी आजोबा ह्या मुलामधे स्वतःच्या मुलाला बघत असतील. पण त्यांचा अश्या वागण्याने नातु अजुनच बिघडतोय. तुम्ही म्हंटलं त्याप्रमाणे त्याची बाहेर चोरी करण्यापर्यंत मजल जाऊ शकतेच.
भावनीक गुंता मान्य केला तरी नाते जपण्यासाठी असं वागणं कितपत ठीक म्हणावं? अशी मुलं कोडगी असतात, काही बरं वाईट करून घेत नाहीत. आपल्या कृत्याला घरूनच अप्रत्यक्षरित्या पाठींबा मिळतोय म्हंटल्यावर मुजोरी अजूनच वाढेल. वेळेत आळा घालायला हवा, हे त्याच्याच भविष्यासाठी चांगलं आहे.
तो नातू आहे त्याचे वडील
तो नातू आहे त्याचे वडील म्हणजे आजी आजोबांचा मुलगा या जगात नाही..... प्रतिसाद दिल्यावर हे वाचले. मग तर दोघांचे काहीच चुकले नाही. अवघड जागेचे दुखणे आहे.
आजोबांनी झापडावयाला त्यांचे म्हातारपण आड येत असेल किंवा नातवानेच आपला हात पकडला तर काय होईल ही भीती आणि लाज दोन्ही असू शकेल.
कॉलेजमध्ये जाणारा मुलगा जर अशा चोऱ्या करत असेल तर त्याचीही सवय कधीही न जाणारी आहे. दुर्दैवाने हा क्लॅप्टोमेनिया नव्हे तर हातलाशेपण (उचलेगिरी) आहे.
परिस्थिती प्रमाणे प्रत्येक
परिस्थिती प्रमाणे प्रत्येक व्यक्ती निर्णय घेते. काही वर्षांनी समजते काही निर्णय चुकले का बरोबर आले. एकच निर्णय वेगवेगळ्या व्यक्तींत परिस्थितीत कधी बरोबर येईल कधी साफ चुकेल. अशा बाबींत आऊट सायडरने अजिबात सल्ले देऊ नये.
आपल्याला पूर्ण परिस्थिती माहिते नसते, इथे ही धाग्यात थोडी माहिती दिली आहे, पुढे प्रतिसादात माहिती हळूहळू वाढत आहे. त्या व्यक्तींची (आजीआजोबा) मानसिक शारीरिक परिस्थिती... समजा त्यांना मानसिक गरज असेल नातवाला भेटायची तर? अशा परिस्थितीत नातू हातातुन जातोय का काय पेक्षा आजी आजोबांची उरलेली पाच-सात वर्षे आनंदात जाण्याचा विचार ते करणार. आई आपला मुलगा आजी-आजोबा बिघडवताहेत म्हणणार, मुलगा स्वार्थी पणा करत दोन्ही कडचे पळवणार.
मुद्दलात आजी आणि आजोबांना त्यांच्या चोरीचं काही पडलेलं नाही आणि त्यांनी त्यांचा प्रश्न सोडवला तर इथे हाय चेअर चर्चा करुन 'असा समाज बिघडतो' हाच निष्कर्ष परत परत काढण्यात काय हशील?
अर्थात आपल्याला चर्चा करायला आवडते आणि ती करायची माबोकरांचीही गरज असुच शकते.
मला देवकीच्या सगळ्या पोस्ट पटल्या.
हायला
हायला
काय काय नवीनच डोकी चालतात लोकांची
कठीण गणित आहे हे सगळे
अमितव एखादी घटना अगदी
अमितव एखादी घटना अगदी आपल्याशी निगडित असो नसो , माहित असेल आणि त्यावर चर्चा केली तर कुठे बिघडते ?
<<<
<<<
आजोबांनी झापडावयाला त्यांचे म्हातारपण आड येत असेल किंवा नातवानेच आपला हात पकडला तर काय होईल ही भीती आणि लाज दोन्ही असू शकेल
>>>>
+७८६ देवकी
म्हणून म्हटले त्या माहितीनंतर बरीच भावनिक समीकरणे बदलली आहेत.
कारण मुळात आपण ज्या पेरेंटिंग बद्दल चर्चा करत आहोत ती स्टेज कदाचित आधीच पार झाली असेल. आता त्या मुलावर कोणाचाच वचक नसेल.
कदाचित त्या मुलानेच अरेरावी करत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आजोबांना सांगितले असेल की मीच सोने चोरले आहे. गाडी द्या मग मी परत करतो.
म्हणजे बघा, मगाशी आपण ज्या आजोबांना अयोग्य वागलात म्हणून नावे ठेवत होतो त्यांनाच कदाचित सहानुभूतीची आणि मदतीची गरज असेल
बिघडत काही नाही.
बिघडत काही नाही. फक्त चर्चा ही अर्धवट आणि अपुर्या माहितीवर आहे आणि कायम तशीच असणार आहे हे लक्षात असले की झालं.
मला स्वत:ला यात काही चूक बरोबर वाटत नाही. रादर ते मी करुच शकत नाही कारण मी त्या परिस्थितीत नाही.
मात्र हे सगळे व्हेरिएबल माझ्या बाबतीत आले, आणि एकेक कनस्ट्रेन वाढत/ कमी करत त्यांची इंटेसिटी बदलत गेली की मी कसा निर्णय घेईन? ह्याचा विचार करणे माझ्यासाठी मनोरंजक ठरते.
वेगळ्यावेगळ्या परिस्थितीत प्रकृती आणि परिस्थितीनुसार (नेचर आणि नर्चर) माणूस का आणि कसा विचार करतो ह्याचा विचार करणे, त्याची मिमांसा करणे असं सगळं करायला मला मजा येते. बाकी समाज हा असाच आहे, तो वर खाली जातच असतो. तेच तर माणुसपण!
अमितव, किती सुंदर+ मुद्देसूद
अमितव, किती सुंदर+ मुद्देसूद+परखड प्रतिसाद दिला आहे.
असं लिहिणाऱ्यांचा खूप हेवा वाटतो.
अमितव पूर्ण पोस्ट +७८६
अमितव पूर्ण पोस्ट +७८६
अजून एक म्हणजे आपण काय करू याचा विचार करणे जसे मनोरंजक असते तसेच इतर जग कसा वेगवेगळा विचार करते हे जाणून घेणे सुद्धा तितकेच मनोरंजक असते.
आणि बहुतांश जगाच्या मनात जो पहिला विचार येतो त्याहून वेगळा विचार करून बघणे देखील छान एक्सरसाईज असते.
हा एक चांगला case study होऊ
हा एक चांगला case study होऊ शकतो. आपल्याला खात्रीने माहिती नसणाऱ्या anglesचा विचार करणे हाही case studyचा एक भाग आहे.
एक उपकथानक म्हणता येईल आणि थोडे विषयांतर होईल पण एका वाक्याने मला विचारात पाडले - dsk बुडाले अणि हे पण बुडाले. एव्हडी सर्व साठवण एकाच ठिकाणी???? हा जास्त व्याजाचा लोभीपणा का dsk वरचा अतिविश्वास का आर्थिक निरक्षरता? Dsk प्रकरणात एखादे कुटुंब उध्वस्त होऊ शकते हा मला shock आहे.
अमितव अगदी खूप आवडला प्रतिसाद
अमितव अगदी खूप आवडला प्रतिसाद .
बऱ्याचदा आपण अगदी त्या परिस्थितीशी निगडित असलो तरीही आपल्याला सगळे कंगोरे माहिती असतातच या गोष्टीशी हि मी संमत नाही . (दुर्दैवाने )
एका विक्रम- वेताळ कथेसाठी
एका विक्रम- वेताळ कथेसाठी अगदी चपखल घटना आहे ही. सध्या इतकंच..... व्यवस्थित चावून, पचवून, जिरवून मगच यावर लिहीणं सध्या उचित वाटतं आहे....प्रतिसाद वाचले नहीत पण एखादा ईतर प्रतिसादात न आलेला कंगोरा ध्यानात आला तर नक्कीच लिहेन.
Pages