संगीत मैफिलीचा सेल्फी पॉईंट

Submitted by मनोलय ... on 31 January, 2026 - 22:28

*संगीत मैफिलीचा सेल्फी पॉईंट*
(कदाचित, एक टर्निंग पॉईंट …)

माझा मित्र विनायक रानडे…
हा माणूस म्हणजे भन्नाट कल्पनांच्या खजिन्याचा मालक. त्याच्या डोक्यात कल्पना जन्म घेतात, त्या मोठ्या होतात आणि क्षणात एखाद्या आनंदी धबधब्यासारख्या बाहेरही पडतात. आमच्या नाशिकमध्ये दरवर्षी होणाऱ्या अष्टौप्रहर स्वरहोत्र या संगीत महोत्सवात तो भन्नाट कल्पनेची एखादी नवी खिडकी अशी काही उघडतो की त्यातून काहीतरी नवीन फंडा शिकायला मिळतो … यंदाच्या वर्षी त्याने उघडलेली खिडकी होती—

*“संगीत मैफिलीचा सेल्फी पॉईंट.”*

आजचं सेल्फीकेंद्री जग आणि
रंगमंचावर ठेवलेले शास्त्रीय संगीतातले दोन बुरुज… तबला आणि पेटी…
खऱ्याखुऱ्या, जिवंत, स्पर्शासाठी आतुर…
आणि विनायकची एक साधी कल्पना—
“भले तुम्ही सेल्फी काढा, पण या, बसा, वाद्य हाताळा, वेडंवाकडं वाजवा, हात फिरवा, सूर शोधा…आणि त्या क्षणाचा सेल्फी काढून ठेवा…” बस्स!

हळूहळू लोक आले—
कोणी संकोचत, कोणी लाजत, कोणी थेट कलाकाराच्या थाटात. काही बोटं तबल्यावर पडू लागली, काही पेटीवरून फिरू लागली. कधी ताल सापडला, कधी सूर हरवला; पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भाव—

*आज मी या मैफलीचा कलाकार आहे!*

त्या सेल्फी पॉईंटवर उभं राहून हे दृश्य पाहताना मला हसू आवरेना !!! पण त्यातून मला एक जाणवलं—
“कला कळो वा न कळो, कलाकार होण्याची ओढ प्रत्येकाच्या मनात कुठेतरी लपून बसलेली असते.”
मला वाटतं ती ओढ हळूच बाहेर काढणारा हा उपक्रम होता; आणि म्हणूनच हा “मैफिलीचा सेल्फी पॉईंट” म्हणजे कला आणि कल्पना यांचा अद्भुत संगम वाटला मला. हीच तर या महोत्सवाच्या आयोजनातली खरी मेख आहे!

ज्यांना संगीताची गोडी नाही, त्यांना ती लागावी… आणि ज्यांना गोडी आहेच, ती गोडी अभिरुची, संस्कार आणि जिज्ञासेत फुलावी—
हा कला आणि कल्पना एकत्र गुंफणारा विचार विनायकसारखा एखादा वेडा मनुष्यच करू शकतो. आणि हो… त्याला दाद देणारे माझ्यासारखे त्याचे आम्ही अनेक चाहतेही थोडेफार वेडेच आहोत बरं का !!

तर… त्या सेल्फी पॉईंटवर मी हे सगळं मैफिलीचे दृश्य हसत हसत पहात होतो. लोक आले, मैफिलीत बसले, वाद्य उचलली… कुणी ताल धरायचा प्रयत्न केला, कुणी पेटीवर उगीचच बोटं फिरवली, कुणी ‘रियाजात असल्याचा’ चेहरा केला. आणि मग—सेल्फी! त्या सेल्फीत स्वर असो वा नसो, भाव मात्र ठासून भरलेले.

तेवढ्यात आमच्यातलाच एक कलाकार जवळ आला. थोड्या नाराजीने म्हणाला,
“अरे हे काय चाललंय? कुणीही येतो, कसाही तबला बडवतो, कशीही पेटी वाजवतो! कुणाच्या डोक्यातून ही सुपीक कल्पना आली?”

मी काही बोलायच्या आत हेच महाशय पुढे असलेल्या कॅलिग्राफीच्या स्टॉलकडे वळले.
तिथे पेन, कागद, शाई, सगळी साधनसामग्री आयतीच हातात आली. आणि पाहता पाहता त्यांचा जीव रंगला. तिथल्या कलाकाराच्या मार्गदर्शनाखाली
त्यांनी स्वतःचं नाव एखाद्या लहान मुलासारख्या कुतूहलाने अगदी ऐटीत कॅलिग्राफी स्टाईलमध्ये लिहून पाहिलं. बरं तेवढ्यावर समाधान नाही—
“सच्या, याचा मला सेल्फी हवाच!” असा मला हुकूम… मी ही जरा वात्रटच… वाटच पाहत होतो. धावत गेलो. फोटो काढताना अलगदपणे खौट आवाजात इतकंच म्हणालो—

*“चला, म्हणजे शेवटी मघाशी तुला जे खटकत होतं, तेच तू केलंस ! ”*

काडी पडली. स्वारी भडकली. मग आमची जुगलबंदी रंगू लागली.

तो म्हणाला,
“म्हणजे त्या वाद्यांची आणि कागद–पेनाची बरोबरी करतोस तू?”
मी म्हणालो,
“हो नक्कीच. साधनं बदलली, भावना तर तीच आहे ना यार… तुझ्यात आणि इतर लोकांमध्ये काय फरक आहे ? *तुझं आणि त्यांचं कुतूहल सारखंच* … असं म्हणायचंय मला… ”

तो म्हणाला,
“तू उगाच वडाचं साल पिंपळाला लावतोयस!”

मी हसत म्हणालो—
“असेल कदाचित. पण मग तुला स्वतःच्या साधनसामुग्रीला कुणी हात लावलेला चालत नाही पण दुसऱ्याची साधनसामग्री हक्काने वापरावीशी वाटते, याचा अर्थ काय ?

तो चिडत म्हणाला,
“पण हे लोक शिकायला आलेत का इथे?”

मी शांतपणे म्हणालो,
“नसतील, पण शिकायला येणारा माणूसही आधी प्रश्न विचारतोच ना !!

तो पुटपुटला,
“काही गोष्टी सगळ्यांसाठी नसतात…”

मी थोडं थांबून म्हणालो,
*“मग संगीत कुणासाठी आहे?*
*फक्त गाणाऱ्यांसाठी?*
*की ऐकणाऱ्यांसाठी?”*

मी पुढे म्हणालो—
“तुला इथे ठेवलेली वाद्ये लोक हाताळतात ते खटकतं, पण तू स्वतःच्या वाद्याला रोज किती वेळा हात लावतोस? तुझ्या घरचा तंबोरा तीस वर्षे झालीत, धूळ खात पडलाय, तो आणून ठेव की इथे आधी. *तू “लोकांना वाद्यापासून” दूर ठेवतोयस की “वाद्याला लोकांपासून?”*

माझ्यातला पत्रकार जागा झालेला पाहून तो जरा गप्प झाला. मला एकच म्हणायचं होतं की प्रत्येक कलेबद्दल *लोकांच्या मनात कुतूहल असतं आणि असायलाच हवं… पण ते शमवायचं की वाया घालवायचं हे कलाकाराच्या हातात आहे.* कला ही कोणाची मक्तेदारी नसते. ती कलाकाराची नसतेच मुळी… ती रसिकांची असते...”

कदाचित त्याला पटलं, किंवा कदाचित त्याने जुळवून घेतलं. मग दोघांनी मिळून एक फक्कड चहा मारला. वाफाळत्या कपातून निघणाऱ्या वाफेसारखीच त्याच्या मनातली कडवटपणाची वाफ हळूहळू विरत होती.

तो म्हणाला,
“यार म्हणजे खरंच रे, पटतंय तुझं थोडं थोडं… आपणच लोकांना दूर ठेवतोय संगीतापासून… ”

मी म्हणालो,
“हो. पण नकळत… कारण *आधी आपण परंपरेच्या नावावर भिंती उभ्या करतो, आणि मग नंतर आपणच म्हणतो— लोक येत नाहीत.”*

तो थोडा वेळ शांत राहिला. मग म्हणाला,
“च्यायला, आपण इतकी वर्षं रियाज केला, त्याग केला… म्हणून कदाचित वाटतं रे, की हे सगळं इतकं सहज हाताळायला द्यायला नको…”

माझ्यातला पत्रकार गुंडाळून ठेवीत मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो,
“रियाजाचा मान राखायलाच हवा राजा, पण रियाजाचा मान राखायचा म्हणजे लोकांना दूर लोटणं नव्हे— तर लोकांना जवळ घेणं.”

तो हसला. पहिल्यांदाच त्याच्या हसण्यात जरा मोकळेपणा होता.

मी पुढे म्हणालो—
“आज मैफिलीच्या सेल्फी पॉइंट वरून जी बोटं वाजतायत ना ती चुकतायत की बरोबर, हा प्रश्न नाहीये. *आज कोणतीही शक्यता नसताना ती बोटं वाद्याला लागलीयेत—* हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे...”

तो मान हलवत म्हणाला,
“मग आपण हरतो कुठे यार ?”

मी शांतपणे म्हणालो—
*“आपण हरतो तिथे, जिथे आपण परंपरेचा अभिमान आणि स्वतःचा अहंकार यात गल्लत करतो...”*

तो हसला. आणि मला त्या हसण्यात एक आशा दिसली. कदाचित पुढच्या वर्षी तोच एखाद्या मुलाचा हात धरून त्याला त्या सेल्फी पॉईंटच्या तबल्यापाशी आणेल. मला हेही जाणवलं—
या सेल्फी पॉईंटवर लोकांनी फक्त फोटो काढले नव्हते, तर त्यांनी आपापल्या मनात अभिजात संगीतासाठी एक छोटीशी खिडकी उघडली होती... विनायकच्या अशा कल्पनांच्या खिडक्यांतूनच संस्कार आणि परंपरा जिवंत राहते ती अशी… पुढच्या दहा मिनिटांत त्या सेल्फी पॉईंटची जाहिरात अख्ख्या परिसरात करून टाकली!
पण पुन्हा मी त्याला न राहवून एक पत्रकारितलेतलं वाक्य फेकलंच —
*“परंपरेचा अभिमान चांगलाच… पण तो जर माणसापेक्षा मोठा झाला, तर परंपरा वाचत नाही— ती कोंडून मरते.”*

मी कुणाकडून तरी चोरलेल्या त्या वाक्याने तो चांगलाच वरमला. (तशी शब्द आणि वाक्यचोरी ही आजकाल कॉमन झाली आहे म्हणा, पण चोरलेले शब्द आणि वाक्य करेक्ट टाइमिंगला वापरताही आले पाहिजे. असो…) त्या दिवशी एका कलाकाराच्याही मनात एका रसिकासाठी, एक तरी खिडकी उघडल्याचं समाधान मिळालं मला... उद्देश इतकाच होता की विनायक माझ्या क्षेत्राच्या भरभराटीसाठी काहीतरी पेटून उठून करतो आहे आणि त्याच्यावर होणाऱ्या टीकेवर मी गप्प का बसायचं ?

दुसऱ्या दिवशी तर धमालच.
संगीताशी दूरदूर पर्यंत संबंध नसलेल्या दहा–बारा लोकांचे स्टेटस या “मैफिलीच्या सेल्फी”ने झगमगले होते. पोजेस कशाही असोत, पण चेहऱ्यावर असा भाव— जणू आतून कुठेतरी सूर उमलतोय!

मला खूप हसू येत होतं पण अहो, किती छान !! उद्या हेच चेहरे रसिकांमधे दिसणार आहेत… परवा त्यातलेच काही जण तबला, गाणं किंवा नृत्य याचा क्लासही लावणार आहेत… आणि पाहता पाहता अष्टौप्रहर स्वरहोत्रभोवती एक सुंदर संगीत–परिवार उभा राहणार आहे… एखादा गाव संगीतमय व्हायला असंच व्हायला हवं ना !!!

मध्यंतरी मी युरोपला गेलो होतो. मोझार्ट आणि बिथोवीनच्या संग्रहालयात... त्यांच्या वाद्यांना मला हात लावायला मिळाला. तुम्हाला सांगतो, अहाहा काय ब्रह्मानंद! त्या एका स्पर्शाने मी शास्त्रीय संगीत गायक असून देखील त्यांच्या रचनांमधे बराच वेळ हरवून गेलो… विनायकनं नेमकं असंच तर केलंय ना … *माणसं वेडी असतातच हो… पण त्यांना वेड हे लावता आलं पाहिजे. आणि हे वेड फक्त वेडी माणसंच लावू शकतात!* आपण कलाकार बिलाकार असतो ते रंगमंचावरच्या त्या एक तासापुरते; पण नंतर तर माणूसच असतो ना ! पण कधी कधी आपण स्वतःभोवती उगाचच एक अदृश्य कुंपण उभं करून जगतो; एक बुरखा ओढून बसतो…आणि नकळत बाहेर अंधार करून टाकतो. ते कुंपण, तो बुरखा अलगद बाजूला सारणारा माझा हा वेडा मित्र—विनायक रानडे.

ही कल्पना मला स्वतःला इतकी आवडली की या उपक्रमाला प्रतिसाद देण्याची सुरुवात मी माझ्या स्वतःपासून करणार आहे. मलाही अशी काही वाद्ये त्या सेल्फी पॉईंटवर ठेवता आली तर पुढील वर्षी मी ती नक्की ठेवीन. इतकेच नव्हे तर ती हाताळायची कशी यासाठी त्या पॉईंटवर योग्य त्या सूचना देणारा माणूसही असेल. मी एखादं वाद्य वाजवतो, त्या वाद्याचं कुतुहल रसिकांना असणारच, ते शमविण्यासाठी जर अशी संधी मिळत असेल तर ती वाया का घालवावी ? नाही का ? पटत असेल आणि माझ्यासोबत यायची इच्छा होत असेल तर आपलं स्वागत आहे… आणि नसेल पटत तर *“वेड्यांचा बाजार”* अशी कमेंट करून खुशाल सोडून द्या …पण मला आपल्या सूचना, अभिप्राय जरूर कळवा.

या वेड्या आणि सुंदर कल्पनेला माझा मनापासून सलाम!

-सचिन चंद्रात्रे,
(ध्रुपद गायक, नाशिक.)

Group content visibility: 
Use group defaults

भन्नाट कल्पना, आणि तुम्ही लेखातून त्या मागचा विचार, सूत्र ही छान उलगडलं आहे, प्रचारकी न होता सहज संवादातून! त्यामुळे जास्त आवडला लेख.

उत्तम कल्पना.

ज्यांच्या घरात परंपरा नाही ते लोक वाद्यसंगीताकडे काहीश्या असूयामिश्रित कुतूहलाने बघतात. त्यांना जर वाद्य हाताळायला मिळाली तर त्यातूनही नवे कलाकार पुढे येतील.