२८ जानेवारीला मुंबईहून बारामतीला जाणारे विमान कोसळल्याने अनेक मराठी माणसांचे पंख छाटले गेले. सकाळी लवकर उठून कामाला लागणाऱ्या अजित दादांच्या अत्यंत दुर्दैवी अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रात त्या पहाटे भयाण अंधार पसरला. ज्वलंत सूर्याची उब आणि काळोखात चंद्राचा धीर देणारा तो आगळावेगळा तारा कायमचा मावळला.
आयुष्यातील बहुतांश काळ माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस बरोबर युतीत राहून जीव ओतून काम करणाऱ्या अजित पवारांनी २०२३ साली वेगळा मार्ग निवडला. जनतेला दिलेली विकास कामांची आश्वासने पूर्ण करण्यासाठी त्यांनी सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट या पक्षांसोबत महायुतीत सहभागी होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर आपला दावा करून पक्षाचे नाव आणि चिन्ह सुद्धा मिळवले.
साधारण अडीच वर्षे त्यांनी महायुतीत राहून आपले राजकारण केले. ते महायुतीत सहभागी झाल्यानंतर सुरुवातीला दादा विकास कामे तर नेहमी सारखीच करतील पण सत्तेत असलेल्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांच्या दबावामुळे ते आपली शाहू फुले आंबेडकर विचारसरणी उघडपणे जोपासू शकणार नाहीत असा अनेकांनी अंदाज वर्तविला होता. त्या सगळ्या अंदाजांना खोडून काढत दादांनी जसा आपला कामाचा झपाटा, प्रशासनावर पकड, विनोदी शैलीवर वर्षानुवर्षे उमटवलेला ठसा कायम ठेवला तसेच आपले पुरोगामी विचार निडरपणे फक्त मांडले नाही तर कृतीतही उतरवले. दादांनी आयुष्यभर हिंदू मुस्लिम सौख्य टिकवण्याचे, बहुजनांना, अल्पसंख्यांकांना, स्त्रियांना व समाजातील सगळ्या दुर्बल घटकांना बळ देऊन त्यांची प्रगती करण्याचे प्रयत्न केले त्याला महायुतीत सामील होऊन अजिबात खडा पडू दिला नाही. महाराष्ट्र सरकार मध्ये दादा ‘आमचे पुरोगाम्यांचे’ सेनापती होते. उपमुख्यमंत्री असताना त्यांनी कामाचा झपाटा कायम ठेवून ‘कामाचा माणूस’ ही ओळख जपून ठेवली तशी उजव्या विचारसरणीच्या वादळात पुरोगाम्यांचे सेनापती म्हणून शाहू फुले आंबेडकर विचारधारेची ज्योत सुद्धा ज्वलंतपणे तेवत ठेवली.
हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याची वाळवी आपल्या स्वतःच्या पक्षातील काही नेत्यांना लागत आहे हे निदर्शनास येताच त्वरित त्यांना समज देण्यात ते कधी कमी पडले नाहीत. जाती धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांवर वेळोवेळी त्यांनी परखडपणे विरोध दर्शवला. काही मुसलमानांना निवडणुकीत उमेदवारी न देण्याच्या सूचनांनाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्याच बरोबर दुर्बल घटकांना बळ देत असताना कधी मुसलमानांचे लांगूलचालन करण्याची चूक केली नाही. माणसाचा धर्म न बघता निव्वळ त्याचे कर्म बघून त्यांनी विविध जाती धर्मातील लोकांना प्रतिनिधित्व देऊन त्यांच्या पाठीशी परखडपणे उभे राहिले. सक्रिय राजकारणात अनेक महिलांना संधी देऊन त्यांनी स्त्री पुरुष समानता नेहमीच राखली. चुकीच्या गोष्टींना उघडपणे चूक म्हणण्याची धमक त्यांच्यात होती.
जसे बातम्यांमध्ये लाखोंच्या संख्येत दादांचे प्रेमी रडताना, त्यांना शेवटचा नमस्कार करताना, अजित दादा अमर रहे व इतर घोषणा देताना, बॅनर लावताना व विविध प्रकारे दुःख आणि दादांवरचे प्रेम व्यक्त करताना दिसत होते तसे सोशल मीडियावर कोणा गोरगरीबाकडे फोटो विकत घेण्यासाठी पैसे नाहीत म्हणून वर्तमानपत्रात छापून आलेल्या दादांच्या फोटोवर क्षद्धांजली वाहण्याचे, मशिदीच्या दरवाज्यावर दादांचा फोटो लावल्याचे, मद्रश्यातील मुलांनी दादांसाठी कुराणपठण करतानाचे व इतर अनोख्या पद्धतीने भावना व्यक्त करतानाचे व्हिडिओ नजरेस पडले. दादांच्या अकाली निधनामुळे बहुजन समाज, अल्पसंख्याक समाज, महिला यांच्यात निश्चितच पोरके झाल्याची भावना निर्माण झाली आहे. पुरोगामी पक्षांची ताकद कमकुवत करत दादा महायुतीत सहभागी झाले हे पुरोगाम्यांना पटले नसले तरीही महाराष्ट्र सरकार मधील पुरोगाम्यांचा सेनापती म्हणून दादांनी आपली कामगिरी चोख बजावली हे नाकारता येणार नाही.
दादांचा राजकीय वारसदार म्हणून जनता आदरणीय सुनेत्रा पवार व त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे आस लावून बसली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे दादांच्या पश्चात आपले आमदार पक्षात टिकवून ठेवणे, सत्तेत आपले स्थान आणि पदे टिकवून ठेवणे, कार्यकर्त्यांना टिकवून ठेवणे या राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी दादांच्या कुटुंबीयांना त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. पण दादांचा वारसा चालवणे हे केवळ राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यापुरता मर्यादित मुळीच नव्हे. राजकारणावर पकड टिकवून ठेवत सामाजिक बांधिलकी, जनतेचा विकास, पुरोगामी महाराष्ट्राची शाहू फुले आंबेडकर विचारधारा जपणे म्हणजे खऱ्या अर्थाने दादांचा वारसा चालवणे. तो वारसा सद्ध्याच्या काळात दादांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या पक्षातील पुढाऱ्यांना चालवता यावा हीच पुरोगामी विचारसरणी जोपासणाऱ्यांची, ‘आमचा’ समजणाऱ्या प्रत्येकाची खरी आस आणि दादांना खरी श्रद्धांजली असेल.
सालम दलवाई
मिरजोळी, चिपळूण
जनतेला घेऊन पुढे जाणारा नेता
जनतेला घेऊन पुढे जाणारा नेता हरपला हे खरंच.
असो.
असो.