सुंबरान ! .....

Submitted by किंकर on 24 January, 2026 - 01:36

आज २४ जानेवारी, बरोबर एक वर्ष झाले. मागील वर्षी मी भारतात गेलो होतो तेंव्हाची गोष्ट .

पुण्यास कामानिमित्त गेलो होतो ते झाल्यावर वेळ हाताशी होता. त्यावेळी माझा एक मित्र श्री शेखर याने आपण पुणे आणि परिसरात थोडे विनाकारण भटकूया असे सुचवले. आणि मग आमचे कधी सिहंगड तर कधी वेगवेगळी प्रदर्शने, असे अनियोजित भटकणे सुरु झाले .

एके दिवशी सकाळी त्याने गाडी काढली आणि म्हणाला ," चल आज आपण ताम्हिणी घाटात भटकून येऊ ." वेळ भर दुपारची आणि आमची गाडी आणि गप्पाची गाडी वेगात धावू लागली. घाट पायथ्याला असलेल्या मंदिर परिसरात जाऊन दर्शन घेतले. नंतर वाटेतच छान जेवण केले, थोडा शांत निसर्ग अनुभवला आणि परतीचा प्रवास सुरु केला . सर्व काही अगदी सहजच सुरु होते .

गाडी पौड गाव मागे टाकून पुण्याकडे जात असताना अचानक श्री शेखर मला म्हणाला, " चल तुला एका माझ्या ओळखीतील एक कलाकार आणि त्यांनी उभा केलेला एक आगळा वेगळा प्रकल्प दाखवतो. तसे त्यांना भेटून खुप दिवस झालेत पण आज अचानक जाऊन भेटतात का पाहू ! "
,
मग एका ठिकाणी मुख्य रस्ता सोडून त्यांनी गाडी डावीकडे कच्चा रस्त्यावर घेतली. एकूण रस्ता परिसर पाहता याठिकाणी काही प्रकल्प किंवा तत्सम काही असेल का ? अशी मला शंका आली आणि आपला रस्ता बरोबर आहे का ?असा प्रश्न पडला.

शेखर नक्की काय दाखवणार आहे या संभ्रमात मी असतानाच ,त्याने गाडीच्या खिडकीची काच खाली करून समोरून येणाऱ्या वयस्कर गृहस्थांना विचारले , " आजोबा सुंबरान कडे जायचा रस्ता हाच आहे ना?" त्यावर ते म्हणाले," हे काय थोडे पुढे डाव्या अंगाला भिंत आणि एक बंद दरवाजा आहे तिथंच , तिथंच आहे रावसाहेबांचा पसारा!"

माझ्या कानावर 'सुंबरान' शब्द पडला आणि मला माझ्या लहानपणीचे बार्शी, कोल्हापूर, सांगली परिसरातील ग्रामीण वातावरणातील पन्नास वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. कारण या एका शब्दात इतकी ताकद आहे कि बस्स! पाठोपाठ कानात लहानपणी ऐकलेल्या 'सुंबरान मांडिलंऽऽ सुंबरान मांडिलं...' या लोकगीतांची आठवण झाली!

गावकुसा पलीकडून जाणाऱ्या मेंढपाळ आणि त्याच्या मेंढ्यांचे कळप डोळ्यासमोरून तरळू लागले. तितक्यात मगाशी आजोबांनी सांगितलेली खुणेची भिंत दिसू लागली आणि तो बंद दरवाजा. आता मला दोन प्रश्न मनात होते. एक या सुंबरान अशी सुबक पाटी लावलेल्या बंद दाराच्या आत काय असेल? आणि ते आजोबा त्याला रावसाहेबांचा पसारा असे का म्हणाले असतील?

आम्ही गाडीतून उतरून त्या दारावर थाप मारली. पण आतून प्रथम प्रतिसाद मिळाला नाही. मग शेखरने जोरदार आवाज देत "रावसाहेब आहेत का?" त्यांना भेटायचे आहे?" असे जवळ जवळ ओरडूनच विचारले. आतून आमचा आवाज ऐकून तेथील केअर टेकर पटकन आला. त्याने दरवाज्याच्या जवळची एक छोटी खिडकी उघडली आणि पुन्हा एकदा प्रश्नार्थक चेहऱ्यांनी आमच्याकडे पाहत 'आता तुम्ही बाहेरून काय म्हणालात' असा चेहरा करून आमच्याकडे पाहत क्षणभर थांबून पुढे इतकेच म्हणाला, 'सर्व काही अजून पंधरा दिवस बंद आहे.'

तितक्यात पाठीमागून आवाज आला "कोण आहे रे?"

त्यावर शेखरने दाराच्या खिडकीत उभ्या असलेल्या गृहस्थांना सांगितले, "मी रावसाहेबांचा मित्र आहे, सोबत माझा कॅनडा हुन आलेला मित्र आहे त्यांची आणि रावसाहेबांची ओळख करून द्यावयाची आहे. पूर्वी मी या ठिकाणी येऊन गेलो आहे, आणि रावसाहेबांनी त्यावेळी मला 'आलात कधी इकडे तर भेटून जात जा' असे सांगितले आहे" इतके सगळे एका दमात सांगून टाकले.

दारामागे उभ्या असलेल्या त्या केअर टेकरच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलत गेले. जणू नजरेनेच तो मूकपणे थांबा असा इशारा देत आत गेला. मी आणि शेखर आज आपल्याला आत जायला मिळेल का नाही काहीच सांगता येत नाही असं विचार करीत थांबलो. आणि तीन चार मिनिटात आमच्यासाठी ते दार उघडले. आता आमची भेट होणार म्हणून पुढे सरकलो तर वातावरणात एक अनामिक ताण जाणवला. आत जात डावीकडे वळून तीन चार पायऱ्या चढून आम्ही इमारतीच्या पोर्चमध्ये आलो. समोरून रावसाहेबांची कन्या सामोरी आली. माझ्या मित्राने आम्ही कोण कुठून आलो सर्व सांगितले आणि रावसाहेबांना भेटायची इच्छा व्यक्त केली.

समोर असलेली त्यांची कन्या सौ चित्रा स्तब्ध होत म्हणाली, " बाबा ८ जानेवारीला गेले."

शेखर अवाक झाला. आम्हाला कोणालाच क्षणभर काय बोलावे सुचेना. शेवटी शेखर त्यांना म्हणाला, "आम्हाला काहीच कल्पना नव्हती. फारच वाईट वाटले." आणि मला आता उलगडा झाला की त्यांचा केअर टेकर मगाशी अस्वस्थ का होता. अजून पंधरा दिवस सर्व बंद आहे म्हणजे काय? कारण सुंबरान म्हणजे येणाऱ्या आथिती कलाकारांच्या साठी बांधलेले कला दालन अर्थात कलाकाराने कलाकारांच्या साठी बांधलेले एक नितांतसुंदर कलाग्राम होते, जे मला दाखवण्यासाठी माझ्या मित्राने आज अचानक आणले होते.

पण रावसाहेबांना समक्ष भेटण्याचा योग असा केवळ पंधरा दिवसांनी नियतीने हुकवला होता. काल त्यांचे सर्व विधी झाले होते आणि आता त्यांनी उभा केलेल्या या मोठ्या व्यापाचे पुढे काय करावे हे ठरवण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आज तिथे विचारविनिमय करण्यासाठी जमले होते. पण मगाशी माझा मित्र जे म्हणाला - "पूर्वी मी इथे येऊन गेलो आहे. आणि रावसाहेबांनी त्यावेळी मला 'आलात कधी इकडे तर भेटून जात जा'असे सांगितले आहे " हे सौ. चित्राने ऐकले आणि स्वतःचे दुःख बाजूला ठेवत त्यांनी आमचे स्वागत केले.

त्यांनी त्या ठिकाणी आजूबाजूचा रम्य परिसर तुम्ही स्वतः पाहून या नंतर आपण बोलू. परिसर किंवा इमारतीत तुम्हाला फोटो घ्यायचे असतील तर जरूर घ्या अशी मुभापण त्यांनी दिली. मी आणि शेखरने सर्व परिसर अतिशय तल्लीनतेने पाहिला. या प्रकल्पाविषयी आणि रावसाहेबांच्या विषयी आम्ही काही माहिती विचारावी का या संभ्रमात असतानाच, सौ. चित्र त्यांच्या आठवणीने सद्गतीत होत बोलती झाली.

आणि काही वेळा पूर्वी दाराबाहेरूनच परतावे लागेल असे वाटत होते त्या प्रकल्पाची माहिती तर मिळालीच, पण मला न भेटलेल्या रावसाहेबांचे संपूर्ण व्यक्तिमत्व तेही त्यांच्या मुलीच्या तोंडून शब्दबद्ध झाले.

मुंबई म्हटले कि कलाक्षेत्रातील संबंधित लोकांच्या हृदयात जे स्थान जे जे स्कूल ऑफ आर्टचे आहे, तसे पुण्यात अभिनव कला विद्यालयाचे आहे . आणि या नामांकित महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ज्या रावसाहेब गुरव यांनी काम पहिले त्या कलाकर्मीचे स्वकष्टार्जित कलाग्राम म्हणजे 'सुंबरान'.

याठिकाणी 'सुंबरान' हे नाव निवडताना रावसाहेबांना काय म्हणायचं होतं? तर या वास्तूस भेट देणारा कलाकार 'येथील निसर्ग आणि शांत परिसरात रमून जावे आणि आपली कला प्रेरणा पुनरुर्जित करून इथल्या आठवणी घेऊन परत जावे'. सुंबरान हे जिव्हाळायुक्त माहोल तयार करणारे ठिकाण असावे असे रावसाहेबांना अभिप्रेत होते. प्रत्यक्ष तिथे वावरताना त्याचा प्रत्यय पावलोपावली आला, तरीपण मला या ठिकाणी 'सुंबरान' या शब्दाचे इंग्रजीतील अनुवादाचे संदर्भ खूपच कौतुकास्पद वाटले ते म्हणतात -
In Marathi, "Sumbaran" (सुंबरान) refers to a deep, emotional connection to one's ancestral roots, traditions, and village.

हि वास्तू उभारण्याची मूळ संकल्पना रावसाहेब यांचीच. अतिशय कष्टातून अंगी असणारी चित्रकलेची आवड जोपासत त्यांनी त्या क्षेत्रातील शिक्षण घेतले. त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या कलाकारांच्या अडचणींची त्यांना जाणीव होती. आणि अशा कलाकारांना विविध चित्रे साकारण्यासाठी एखादी निवांत आणि निसर्गरम्य जागा असावी या भावनेतून त्यांनी हे कलादालन उभारले.

या ठिकाणी कलाकारांनी यावे, परिसरात आणि आपल्या स्वतः मध्ये असलेल्या कलाकारास जागे करावे आणि काही अभूतपूर्व कलाकृती तयार कराव्यात या शिक्षकी भावनेतून त्यांनी हे दालन साकारले आहे. जागेचा समतल आणि इमारतीचा समतोल साधत उभी राहिलेली सुंबरानची हि दोन माजली वास्तू मनास मोहित करते. त्या ठिकाणी रावसाहेबांच्या काही निवडक चित्रांचे छोटखानी प्रदर्शन देखील होते.

त्या चित्रांविषयी भरभरून बोलताना त्यांच्या मुली भावुक झाल्या. बाबांची धनगरी चित्रे त्यांना नेहमीच त्यांच्या बालपणीची आठवण करून देत असत . रावसाहेबांचे बालपण कोल्हापूर जवळच्या शिरोळ येथील. त्या ठिकाणी पाहिलेली धनगरांची जीवनशैली रावसाहेबांच्या मनावर कायमची कोरली गेली.

बघता बघता दोन तास कसे गेले समजलेच नाही. शेखरला आज अचानक मला हि वास्तू दाखवावी वाटणे, येथे आल्यावर रावसाहेब आपल्यात नाहीत हे सत्य समजणे आणि तशाही परिस्थितीमध्ये रावसाहेबांच्या कुटुंबीयांनी अत्यंत आपुलकीने त्यांच्या या नितांत सुदर उपक्रमाची माहिती देणे, या सर्वावर माझा मलाच विश्वास बसत नव्हता.

एकदा गुणी कलाकार प्रत्यक्ष भेटण्याचा योग नव्हता हि चुटपुट मनात ठेवत आम्ही तेथून निघालो. कारण रावसाहेब हे दोन तासात उलगडणारे कोडे नक्कीच नाही. जेंव्हा निघताना रावसाहेबांचा एक प्रसन्न हास्य असलेला फोटो पहिला तेंव्हा या कलंदर चित्रकाराने जेंव्हा आपली कला 'धनगर' या विषयाला वाहायचे ठरवले तेंव्हा त्याची मनस्थिती कशी असेल असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला. मला वाटते रावसाहेबांनी तो निर्णय घेतलयनंतर मागे वळून पाहिले ते फक्त धनगरी दैनंदिनीकडे! जणू काही रावसाहेब स्वतःशी नेहमीच गुणगुणत असतील -

'काठी नि घोंगडं घेवुन द्या कि आणि मला बी चित्र काढून द्या कि'

आज २४ जानेवारी. सुंबरान मधली ती सायंकाळ. एक वर्ष झाले. पण रावसाहेबांचा तो त्या कलादालनातील 'कपाळी भंडारा ल्यालेला धनगर' डोळ्यासमोरून आजही हालत नाही. या सुंदर वास्तूचे दर्शन तुम्ही पण चुकवू नका. अर्थात या अप्रतिम संधीचे सोने रावसाहेबांच्या आथित्यशील कुटुंबियांच्या मुळे झाले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users