खुनी ओळखणे "असंभव": "अय्यय्यय्ययाहा" असा चित्कार करत गूढ जगात नेणारे टायटल साँग आणि वाद्यांचा कल्लोळ असूनही ऐकावेसे वाटणारे एकापेक्षा एक सुपरहिट गाणे असणाऱ्या ट्रेंड सेटर "गुप्त" चित्रपटात "काजोल खुनी आहे" असे कुणीतरी आधीच सांगितल्याशिवाय चित्रपट पाहताना तसा अंदाज बांधणं प्रेक्षकांना शेवटपर्यंत अशक्य होतं.
त्याचप्रमाणे "असंभव" या नव्याकोऱ्या मराठी चित्रपटातसुद्धा खुनी कोण आहे, हे ओळखणे खूपच अशक्य होऊन जातं, प्रेक्षक कितीही हुशार असला तरी! आणि यातच चित्रपटाचे यश आहे. आपण अंदाज बांधत राहतो पण खुनी वेगळाच निघतो. खुनी माहिती पडल्यानंतरही अजून एक ट्विस्ट येतो!
या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, पटकथा आणि एडिटिंग खूप चांगले आहे. चित्रपट अगदी पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत आपल्याला अगदी खिळवून ठेवतो. चित्रपटात फक्त एकच गाणे आहे, तेही अधून मधून येते. ही आणखी एक चित्रपटाची जमेची बाजू!
मी तर म्हणेन की बऱ्याच काळानंतर मराठीत हॉलिवूडच्या तोडीचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आलेला आहे. अगदी "वुमन इन केबिन नंबर टेन", "डेथ ऑन द नाईल" "मर्डर इन ओरिएंट एक्सप्रेस" सारख्या चित्रपटांच्या तोडीचा हा चित्रपट आहे. अशा चित्रपटांना तर आपण मराठी प्रेक्षकांनी फुल सपोर्ट दिलाच पाहिजे.
खरंच "असंभव" वाटणारी पुनर्जन्मावर आधारित ही कथा, कसलेल्या कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे "संभव" वाटते आणि त्यात थ्रिलर सस्पेन्सचा तडका असल्याने एक दमदार मर्डर मिस्ट्री पण बनते. म्हणजे मागच्या जन्मातील खुनाचे रहस्य सध्याच्या जन्मात उलगडते! शेवटच्या सीनमध्ये प्रिया बापटला बघून मला डंकी चित्रपटातील तापसी पन्नू आठवली.
कथा अशी आहे की, मानसी (मुक्ता बर्वे) ही एक आर्किटेक्ट आहे, जिला वारंवार एकच भयानक स्वप्न पडते, ज्यात ती एका जुन्या रहस्यमय हवेलीत स्वतःची हत्या पाहते. नैनिताल येथे एका प्रोजेक्टसाठी ती आपल्या बॉस (आणि नंतर प्रियकर) आदित्यसोबत (सचित पाटील) जाते आणि तिथे एके ठिकाणी ती स्वप्नातील हवेली प्रत्यक्षात पाहते. त्या हवेलीत आता एक सरदारजी राहत असतो.
मानसीचे हे स्वप्न पडणे बंद व्हावे यासाठी तिला मदत करायला आदित्य त्याचा सायकोलॉजिस्ट मित्र सत्यजीतला (संदीप कुलकर्णी) नैनिताल येथे बोलावतो. तो मानसीला तिचे स्वप्न आणि तिच्या पूर्वजन्मातील सत्य उलगडण्यात तिच्यावर संमोहन (हिप्नॉटिझम) करून मदत करतो. पण हिप्नॉटिझमद्वारे तिच्या पूर्वजन्मात पोहोचूनसुद्धा त्यांना कळते की, मानसीला तर केवळ अर्धसत्य माहिती आहे. मानसीच्या पूर्व जन्मात (तिचे नाव उर्मिला असते) आदित्यसुद्धा असतो (माधव) आणि साधना (प्रिया बापट) असते. मग पूर्ण सत्य कुणाला माहिती असते? त्यासाठी सत्यजित आदित्यवर हिप्नॉटिझम करतो. पण तरीही पूर्ण सत्य उलगडत नाही. आणि मानसीचे स्वप्न पडणे सुद्धा बंद होत नाही.
मग तिघांना एक सुगावा (मानसीच्या पूर्व जन्मातील आणखी एक व्यक्ती) मिळतो आणि त्याआधारे तिघे मिळून त्याचा शोध घेतात. आता पुढेच तर खरा सस्पेन्स आहे.
बऱ्याच कालावधीनंतर मराठीत इतका दमदार स्लिक टाईट एडिटिंग आणि उत्तम कॅमेरावर्क असलेला सस्पेस थ्रिलर मर्डर मिस्ट्री चित्रपट आला आहे. आणि त्यात नैनीताल सारख्या निसर्गरम्य ठिकाणी आणि भव्य देखण्या महालात चित्रीकरण झालेले असल्यामुळे चित्रपट आणखीच प्रेक्षणीय बनतो. नक्की बघायलाच हवा असा हा चित्रपट आहे.
हा चित्रपट ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर आहे.
चेतन आनंदचा 'कुदरत '
चेतन आनंदचा 'कुदरत ' (राजकुमार, काका, हेमा, विनोद खन्ना, प्रिया) बहुतेक याच चित्रपटावरून प्रेरित असावा.
खूपच नवीन प्लॉट आहे असंभव चा
बरैच पिक्चर्स असंभव वरून
बरैच पिक्चर्स असंभव वरून प्रेरणा घेऊन बनवले आसतील.
100 डेज ई., महबूबा, मधुमती
Dead Again, The Awakening, Don't look now इत्यादी.
गुप्त" चित्रपटात "काजोल खुनी
गुप्त" चित्रपटात "काजोल खुनी आहे" असे कुणीतरी आधीच सांगितल्याशिवाय >>> एवढे दिवस हा बघेन बघेन म्हणता होतो.. गेम झाला माझा
उत्तम ओळख.
उत्तम ओळख.
हे परीक्षण वाचून काल चित्रपट
हे परीक्षण वाचून काल चित्रपट पहिला. आवडला. छान आहे. तांत्रिक बाजू उत्तम आहे. कथा, पटकथा, दिग्दर्शन छान आहे. चित्रपटाचा वेग थोडा अजून वाढविता आला असता. गाणी २ सो - सो आहेत. पार्श्वसंगीत छान आहे.