न्यूझीलंड डायरी... *८.पुरोगामी आनंदी न्यूझीलंड..

Submitted by हेमंत नाईक. on 14 January, 2026 - 02:21

८.पुरोगामी आनंदी न्यूझीलंड
.. हेमंत नाईक

शहानवाजने तेथे लेडीज आणि जेन्टस हॉस्टेल एक असतात का? याची विचारणा केली आणि एक नकळत विषय मिळाला आज लिहिण्यासाठीचा.

हॉस्टेल बहुतेक ठिकाणी मुलं मुलींसाठी एकच असतात पण रूम्स वेगवेगळ्या असतात.. रूम पार्टनरही नसतात बहुतेक सिंगल रूमच असतात. हॉस्टेल एक हॉटेल सारखेच असते. फारच कमी ठिकाणी लेडीज हॉस्टेल वेगळे आहेत.जगात सर्वात प्रथम महिलांना १८९३ साला मतदानाचा हक्क देणारे पासून स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते न्यूझीलंड हे महिलांसाठीही खूप सुरक्षीत आहे.

या देशात पंतप्रधान हॉटेल मध्ये टेबल बुक न करता आल्याने त्यांनाही सर्वंसाधारण माणसासारखी वाट बघावी लागते आणि जेव्हा त्यांचा नंबर येतो तेव्हाच टेबल मिळते अशी आणि या लेव्हलची समानता क्वचितच इतरत्र बघण्यास मिळते.

कॉलेजला हॉस्टेल फी खूप जास्त असल्याने आपल्याकडचे विदयार्थी बाहेरच एखाद्यातील बंगल्यातील रूम शेअर करून राहतात. लिव्हीग डायनिंग किचन कॉमन असतें जेवढ्या बेडरूम असतात तेवढे जण त्या बंगल्याचा रेंट शेअर करतात. प्रति रूम हा १०० ते २०० डॉलर प्रती आठवडा असू शकतो. किचन मध्ये भांडे, ओव्हन, गॅस, फ्रीझ, वाशिंग मशीन, डिश वाशर आदी सर्वं असतात. लिविंगचे फर्निचर पण असते. रूम मात्र क्वचितच फर्निश असतें.

सौरभच्या घराजवळ चांगल्या रेटिंगचे पाकुरंगा कॉलेज आहे. त्याचे व जवळपास असलेल्या शाळांचे फोटो नव्हे तर वॉल पेपरच पोस्ट करतो आहे.

येथे वर्षातून दोन तर काही ठिकाणी तीन वेळा कॉलेज मध्ये प्रवेश मिळू शकतो.. तुम्हाला हवा तो आवडीचा विषय तुम्ही निवडू शकतात पण त्याप्रमाणे तुमचे करिअर भविष्यात घडत.

कॉलेज मध्ये भरपूर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी असतात. प्रॅक्टिकल ओरिएंटेड अभ्यासक्रम असतो.

आपल्यासारखे प्रायव्हेट क्लासेसच पीक इथं कुठेही दिसलं नाही. याच मुख्य कारण म्हणजे इथं सर्वांनाच सर्वं मिळू शकते. त्यामुळे सर्वांनाच आर्थिक मदत आहे व कोणतेही आरक्षण ठेवण्याची गरजही नाही. शाळेचे शिक्षण पूर्ण फ्री आहे मात्र कॉलेजला फी आहे. बाहेरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विदयार्थ्यांना तिन पट फी द्यावी लागते. येथील सर्व नागरिकांना सोशल सिक्युरिटी भरपूर आहे. अगदी हेल्थ पासून तर आर्थिक मदतीपर्यंतची . कोणाची नोकरी गेली तरी प्रत्येकास त्याचा घरखर्च आरामात चालेल एवढी सरकार कडून मिळते. त्यावर जीवन चालू शकते. त्यामुळे जीवनाच्या रेस मध्ये धावण्याची सवय आपल्यासारखी येथे कमी असावी.

शर्यत

नित्य ते धावत
असतो आम्ही..
जवळ नाही ते
मिळण्यासाठी गर्दी..

जागा कमी त्या
खूप खूप मागणी..
नित्य तिथे होते
खुप धक्काबुक्की..

जीवनाची शर्यत
कमी इथे पाहिली
न द्वेष न मत्सर काही
चढाओढही नसे कुठली

इस्टेटीचा लोभ हा
फार नसे किविंना हो_
एकच सुंदर घरटे
वाटे त्यांना ते पुरेसे

जीवनानंद भोगण्या
मानव जन्म मिळाला
वाटण्याने मिळते सारे
जीवनाचे मर्म कळे ते

म्हणूनच काय...बऱ्याच वेळा हॅपीनेस इंडेक्स च्या बाबतीत जगात न्यूझीलंड राष्ट्र अव्वल स्थानी असते.

विषमतेची दरीही आपल्यापेक्षा इथं कमी आहे. स्किल्ड प्लंबर हा काही वेळा इंजिनिअर एवढी सॅलरी घेऊन जातो. ह्यूमन लेबर एम्प्लॉय करणे खूप महाग आणि कठीण आहे.

कोणत्याही कामाचा कमीतकमी पे रेट इथं तेवीस डॉलर सुमारे बाराशे रुपये प्रति तास आहे. अगदी पाच मिनिटाचे काम असले तरी तासाचे पेमेंट करावे लागते. त्यामुळे प्रत्येकाकडे घरीच सर्वं प्रकारचे टूल किट असतात. अगदी लॉन कटिंग लेबर पेक्षा ते मशीन विकत घेणे परवडते. इथं घरी गार्डनमधील झाडांच्या फ़ांद्या कापण्यासाठी तीनशे डॉलर्स कोट केले होते. तेवढ्याच किमतीचा बॅटरी ऑपरेटेड ट्री कटर विकत घेऊन तास भरात काम आटोपले. बाहेरदेशी राहण्यासाठी जाणार असाल तर प्लम्बिंग, इलेक्ट्रिक, गार्डनिंग आदीची जुजबी माहिती स्किल असेल तर नक्की उपयोगी पडते.

सर्वं प्रकारच्या कामाला सारखेच महत्व येथे सर्वं देतात त्यामुळे एखाद्या कंपनीत चांगल्या मोठ्या पोस्ट वर असणाऱ्या किवी नागरिकांस आपला मुलगा गार्डनिंग वा प्लंबीग काम करतो हे सांगताना काहीही कमीपणा वाटत नाही.

उद्या मात्र आपण Rotorua येथे पर्यटनास जाणार जाणार आहोत..पृथ्वीच्या पोटातील जिओथर्मल प्रक्रिया अनुभवण्यासाठी!

०३.०४.२४

Group content visibility: 
Public - accessible to all site users