निःस्वार्थ भाव ठेवून दुसऱ्याला मदत करता आली तर माणसाच्या मनाला बरं वाटतं. फक्त ती मदत योग्य व्यक्तीला मिळायला हवी हा माझा अट्टाहास. कारण नवीनच नोकरीला लागल्यानंतर मी भांडुप स्टेशनजवळ गावाहून आलेल्या, सामान चोरीला गेलेल्या कुटुंबाला शंभर रुपये आणि चार वडापाव घेऊन दिले होते. आणि आपण किती किती छान काम केलं या आनंदात दोन दिवस होते. मग तिसऱ्या दिवशी कळलं की अशी सामान, पैसे चोरीला गेलेली कुटुंबं संपूर्ण भारतभर पसरलेली आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या एका गावातल्या लोकांचा हाच व्यवसाय आहे. काही वर्षांनी त्यांचेच एक दुसरे भाऊबंद मला गुवाहाटीलाही भेटले. असो. तर शंभर रुपये अधिक चार वडापावचे पन्नास रुपये असे दीडशे रुपये का होईना पण आपले मेहनतीचे पैसे असे दुसऱ्याने आपल्याला येडं बनवून काढून घ्यावे याचं मला फार फार दुःख झालं.
मग ठरवलं. तुमच्याकडे जे मदत मागायला येतील त्यांना खरंच मदतीची गरज आहे का हे नेहमी पडताळून पाहायचं. आमच्याकडे कामाला येणाऱ्या बाईंच्या घरी दरवर्षी मुलांचे वाढदिवस, बारसे, गणपती उत्सव इतर कार्यक्रम इतके जंगी साजरे केले जातात तेवढे आम्हीही नाही करत. पण त्यांच्या घरी कुणी आजारी पडले की मात्र त्यांचे पैसे संपतात. मग त्यांनी दागिनेच गहाण ठेवलेत, घरच गहाण ठेवलं अशी रडारड करत पैसे मागितले जातात.
दुसरी एक गोष्ट. ऑफिसमध्ये एक काँट्रॅक्टवर काम करणारी बाई होती. ती दर क्षणाला तिच्या गरिबीचं गाऱ्हाणं गात असे. नवरा दारू पित असे. ह्या बाईला कॉन्ट्रॅक्ट जॉबमध्ये तसा काही वाईट पगार नव्हता. पण दर दोन दिवसांनी ती नवीन व्यक्तीजवळ काही ना काही कारण काढून पैशांसाठी रडत असे. बिचारे लोक तिला मदत करून थकत नसत. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तिच्या गरिबीच्या चर्चा. अशी एकही व्यक्ती नव्हती जिने तिला पैशांची, कपड्यांची मदत केली नव्हती. तिला सवयच झाली होती की काहीही लागलं की ऑफिसमध्ये रडायचं. लोक लगेच देतात. स्वाभिमान गेला तेल लावत.
तर हे सगळे नमुने अनुभवल्यानंतर मी मनाशी ठरवलं. च्यायला नाही करायची कुणाला मदत.
पण प्रत्येक वेळेस मी तोंडावर आपटते. तर यावेळी झालं काय लेकीच्या जन्माच्या वेळेस तालुक्याच्या इस्पितळात श्वेता नावाच्या नर्सशी ओळख झाली होती. रात्रीच्या वेळेस बाकी वरिष्ठ नर्स झोपा काढायला जात असत तेव्हा ह्या लहानखुऱ्या नर्सने मला खूप मदत केली होती. लेकीच्या बारशाला बोलवावं म्हणून प्रसादने आणि मी तिचा मोबाईल नंबर घेऊन ठेवला होता. पण बारशाला काही ती येऊ शकली नाही. वर्षभराने त्याच इस्पितळात तपासणीसाठी गेलो असता ती पुन्हा भेटली. आम्हालाही तिला पुन्हा भेटल्यावर आनंद झाला. कसं काय चाललंय वगैरे चौकशी झाली. गेल्या आठवड्यात तिचा मला मेसेज आला.
"ताई एक मदत हवी होती. तुमच्या ओळखीत कुणी व्यक्ती किंवा संस्था आहे का जो मदत करू शकेल. मला काही पैशांची गरज आहे. मी एज्युकेशन लोन साठी अप्लाय केलं होतं. माझं लोन अप्रूव्हही झालंय. पण ते पैसे अकाउंटला जमा होण्याआधी मला त्यांना काही रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून द्यावी लागणार आहे. तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत."
शिक्षणाचा विषय निघाल्याने मी विरघळले. परिस्थिती आर्थिकदृष्ट्या हलाखीची असल्यामुळे मला स्वतःला शिक्षणासाठी हवे ते क्षेत्र निवडता आलं नव्हतं. (म्हणजे खरंच हलाखीची होती बरं का.) तसं बघायला गेलं तर मदत करणाऱ्या बऱ्याच संस्था असतात आणि सरकारच्याही विद्यार्थ्यांसाठी खूप योजना असतात पण त्याबद्दल माहिती नव्हती. सांगायला, मार्गदर्शन करायला चांगले शिकलेले नातेवाईक, शेजारीही नव्हते. आई अशिक्षित आणि वडील कमी शिकलेले. भांडुपच्या त्या कामगारांच्या चाळीत त्यावेळी बारावीच्या पुढे शिकलेला माणूस दुर्मिळ. आईबाबांमध्ये स्वाभिमान ठासून भरलेला त्यामुळे कुणाकडे पैशांसाठीही मदत मागितली नाही. आता जास्त खोलात जात नाही. या गोष्टी आता सहज जरी मित्र मैत्रिणींना सांगितल्या तरी त्यांना खऱ्या वाटत नाहीत. असो. तर यामुळे आवड नसलेल्या क्षेत्रात शिक्षण घेतले. चांगल्या मार्काने पास झाले. पण करियरवर वाईट पारिणाम झाला. या गोष्टी कितीही सोडून द्यायचा विचार केला तरी खंत वाटत राहते. यामुळे झालं काय की ज्यांना गरज आहे अशांना तरी आपण मार्गदर्शन करावे अशी इच्छा कायम मनात राहिली. कुठून तरी या मुलीला मदत करूया अशी इच्छा मनात निर्माण झाली.
"अरे वा. पुढचं शिक्षण घेतेस का?"
" नाही ताई. माझा bsc नर्सिंग कोर्स पूर्ण झालाय. पण फी पूर्ण भरली नसल्याने कॉलेज माझा रिजल्ट आणि प्रमाणपत्र देत नाहीये."
" शिक्षण पूर्ण झाल्यावर एज्युकेशन लोन मिळत नाही गं बहुतेक. ही कोणती बँक आहे?"
"फेडरल बँक."
" तू स्वतः बँकेत गेली होतीस का लोनसाठी? आणि ते किती रुपये प्रोसेसिंग फी मागत आहेत?"
" नाही ताई. मी ऑनलाईन अप्लाय केलं आहे. २३००० रुपये प्रोसेसिंग फी मागत आहेत?"
" एवढी? एव्हढी तर मला होम लोनसाठीही भरावी लागली नव्हती. अग ऑनलाईन फ्रॉड असेल."
" नाही हो. फ्रॉड नाहीये. मी त्यांना विचारलं फोनवर ते म्हणाले की ते फ्रॉड नाही आहेत."
बाई गं. एवढं निरागस कुणी कसं असू शकतं.
"चोर कशाला सांगेल की तो चोर आहे. त्यांनी तुला मेल किंवा मेसेज पाठवला असेल त्याचा स्क्रीनशॉट पाठव."
तिने स्क्रिनशॉट पाठवला. अतिशय चुकीच्या इंग्रजीमध्ये लिहिलेल्या त्या मेलमध्ये असं लिहिलं होतं की डियर श्वेता XXXX तुमचे १ लाखाचे एज्युकेशन लोन अप्रुव्ह झाले आहे. तुम्ही २३००० रुपये आम्हाला पाठवले की लगेच ते पैसे तुमच्या खात्यात जमा करू. म्हणजे सायबर क्राईमचा प्रकार. नेटवर गुगलून पाहिलं तर फेडरल बँक स्टुडन्ट लोन स्कॅमच्या बातम्या दिसल्या. लगेच फोन करून तिला परिस्थिती समजावून सांगितली. बऱ्याच वेळाने तिला पटलं पण ती भरपूर नाराज झाली.
" ताई मला पैशांची गरज होती हो."
शिक्षण झाल्यावर एज्युकेशन लोन कदाचित मिळणार नाही. अन्य काही मार्गाने ओळखीच्या संस्थांकडून मदत मिळू शकेल का हे मी विचारून पाहते असं तिला सांगितलं.
संस्थेच्या लोकांना दोन दिवस कॉल लागला नाही. तोपर्यंत श्वेताचे दहा मेसेज येऊन गेले. विचारलं का हो ताई म्हणून.
संस्थेतल्या बाईंशी बोलणं झालं तर त्या म्हणाल्या की शिक्षण होऊन गेल्यावर स्कॉलरशिप देता येणार नाही. मग आमच्या ऑफिसमधल्या GM पदावर असणाऱ्या भोसले मॅडमना कॉल लावला. त्या CSR मध्ये बऱ्याच कार्यरत आहेत. त्यांच्या ओळखीतल्या एका संस्थेतर्फे ह्या मुलीच्या परिस्थितीची चौकशी करून काही आर्थिक मदत करता येईल असे ठरले. त्याप्रमाणे मी तिला तिच्या कॉलेजची आणि कोर्सची माहिती विचारली. तुला मदत देण्याआधी आम्ही कॉलेजमध्ये चौकशी करणार आहोत. या नावाच्या मुलीने खरंच इथे शिक्षण पूर्ण केले आहे का किंवा तिचे प्रमाणपत्र तुम्ही अडकवून ठेवले आहे का अशा गोष्टी आम्ही तिथे विचारणार म्हटल्यावर ही जरा चपापली. आधी मला न सांगितलेल्या काही गोष्टी तिने सांगितल्या.
" खरं म्हणजे मॅडम मला ना स्कॉलरशिप मिळाली होती पण ते पैसे खर्च झाले."
"असे कसे खर्च झाले?"
तर अगदी खोलात जाऊन माहिती काढल्यावर असे कळले म्हणजे ह्या मुलीला तिच्या नर्सिंगच्या वार्षिक फीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त सूट मिळत होती. कॉलेजची वार्षिक फी एक लाख दहा हजार त्यापैकी ८५००० हजार तिला स्कॉलरशिप म्हणून मिळत असत. वरचे २५००० तिला भरायचे होते. तिला विचारलं, "तुझे हे वरचे २५००० भरायचे राहिले आहेत का."
"नाही. ते मी भरले. तीन वर्षांची स्कॉलरशिप डायरेक्ट कॉलेजमध्ये फी म्हणून जमा झाली पण चौथ्या वर्षांची ८५००० रुपयांची स्कॉलरशिप त्यांनी तिच्या अकाउंटमध्ये जमा केली. तिने फी म्हणून ती कॉलेजमध्ये जमा करणं अपेक्षित होता. तिचं म्हणणं होतं की हे पैसे कुठून जमा झाले हे तिला कळलंच नाही आणि तिच्याकडून ते खर्च झाले. एकूण ६५००० रुपये फी बाकी राहिली होती."
"पण तुझ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे कुठून कसे जमा झाले हे तुला कळलं कसं नाही."
यावर तिच्याकडे उत्तर नव्हतं. नाही कळलं ताई एवढंच म्हणाली. कशासाठी खर्च केले हेही उत्तर तिने स्पष्ट दिलं नाही. अचानक भरपूर पैसे मिळाले ते फ़ार विचार न करता ख़र्च करुन टाकले असं वाटत होतं.
तुला आधीच स्कॉलरशिप मिळाली असताना पुन्हा मोठी आर्थिक मदत देता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं. कोर्स २०२३ मध्ये पूर्ण झाला होता. त्या गोष्टीला दोन वर्षे पूर्ण झाली होती. सध्या ही मुलगी इथल्याच एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते. इथे भरपूर नसला तरी पुरेसा पगार आहे. दर महिन्याला थोडी रक्कम बाजूला काढून ती आतापर्यंत सहज फी भरून प्रमाणपत्र घेऊ शकली असती. तसं का केलं नाही विचारल्यावरही काही उत्तर नव्हतं. आता सहा महिन्यात थोडे पैसे बाजूला काढून फी भरून टाक असा सल्ला दिला तर म्हणाली की सध्या तिला कुणाच्या तरी ओळखीने मुंबईत महिना २८००० पगार असणारी नर्सची नोकरी मिळते आहे पण सर्टिफिकेट नसल्यामुळे सर्व अडकलं आहे असं म्हणाली. ती नोकरी मिळवण्याची तिला घाई होती.
" मी तुला सध्या तरी कुठल्याही संस्थेमार्फत मदत करू शकणार नाही."
"मग ताई संस्थेतर्फे नाही तर तुम्ही तरी मला पैसे देऊ शकाल का?"
"मी नुकताच माझा व्यवसाय सुरु केला आहे. एवढी रक्कम मी तुला देऊ शकणार नाही. सध्याच्या नोकरीमधून काही पैसे बाजूला ठेवलेस तर वर्षभरात फी भरून टाकू शकशील. खरं तर ते तू आधीच करायला हवं होतं. तुझा रिजल्ट मिळाला की मुंबईत काही हॉस्पिटल्स ओळखीची आहेत तिथे तुझ्या जॉबसाठी विचारता येईल."
ठीक आहे ताई एवढं बोलून तिने निरोप घेतला. मला जरा वाईट वाटलं पण तसं सगळं हिच्याच गोंधळामुळे घडलं होतं.
तीन चार दिवसांनी तिचा पुन्हा मेसेज. यावेळी डायरेक्ट... "ताई तुमचा अकाउंट बॅलन्स काय आहे हो?"
एकदम मोठा धक्काच दिला हिने. मला आतापर्यंत माझ्या नवऱ्याने, आईबाबांनी कधी हा प्रश्न विचारला नाही . एकदम डोक्यातच गेली ही.
सर्वात आधी विचारलं कशासाठी विचारतेस. त्यावर उत्तर.. माझा भाऊ रत्नागिरीमध्ये आहे त्याला पाच हजारांची गरज आहे. कशासाठी रत्नागिरीला आहे, कशाला पैसे हवेत हे काहीच नाही. फक्त मागणी.
तिच्या डोक्यात असणारी कल्पना अशी की अकाउंट बॅलन्स विचारल्यानंतर पैसे मागितले की माझ्यावर जरा प्रेशर येईल, एवढे पैसे तर आहेत ना मग काय झाले पाच हजार श्वेताला दिले तर.
सगळे मॅनर्स गुंडाळून खूप झापलं तिला.
मी काही चुकीचं केलं असं मला आता अजिबात वाटत नाही. मदत मागताना तिने बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्या होत्या. तिने स्कॉलरशिपचे पैसे कशासाठी खर्च केले. कोर्स पूर्ण झाल्यावर दोन वर्षे नोकरी करूनही तिने राहिलेल्या फीसाठी पैसे का जमा केले नाहीत या गोष्टीची नीट उत्तरं तिने दिलीच नाहीत. तिला मदतीसाठी नकार दिल्याबद्ल जी काही थोडीफार खंत वाटत होती तीही या घटनेनंतर निघून गेली.
<<मी काही चुकीचं केलं असं मला
<<मी काही चुकीचं केलं असं मला आता अजिबात वाटत नाही>>. तुम्ही तिला मदत करण्यासाठी प्रयत्न केला आणि तिने सुरवातीला जे सांगितले ते खरे निघाले असते तर केली असती सुद्धा. पुढे जे समोर आले त्यानुसार तिने असे तिऱ्हाइत व्यक्तीला पैसे मागणे योग्य वाटत नाही आणि त्यात असा बनाव करून मागणे तर चुकीचेच आहे.
तुम्ही पैसे दिले नाहीत ते
तुम्ही पैसे दिले नाहीत ते योग्यच केलं .ती सुरुवातीपासूनच खोटं बोलत होती याचा अर्थ ती तुम्हाला गंडवतंच होती ,खरी गरज असणारे खोटं बोलत नाहीत .
तुम्ही पैसे दिले नाहीत ते
तुम्ही पैसे दिले नाहीत ते योग्यच केलं>>> ६५००० रुपये जवळच्या व्यक्तीला देतानाही दहा वेळा विचार करेन. ह्या मुलीशी तर फ़ार ओळखसुद्धा नव्हती.
>>>>>>>६५००० रुपये अ-ब-ब!!!
>>>>>>>६५००० रुपये
अ-ब-ब!!!
बरेचदा पैसे देऊन
बरेचदा पैसे देऊन मूर्खपणाबरोबर वाईटपणा पदरी आलाय. अगदी कालच चांगली रक्कम सहकाऱ्याच्या मित्राला दिली आहे. 4 दिवसांत मिळेल म्हणाले आहेत. पण खरं वाटत नाही.
गावाहून आलेल्या, सामान चोरीला
गावाहून आलेल्या, सामान चोरीला गेलेल्या कुटुंबाला शंभर रुपये आणि चार वडापाव घेऊन दिले होते. >>>> हा प्रकार मी देखील केला आहे . अशी जोडपी अजूनही आहेत. परवाच पाहिली.
ताई तुमचा अकाउंट बॅलन्स काय आहे हो?>>>>>> माणसं धजतात कशी असे प्रश्न विचारायला.
बाकी पैशाच्या व्यवहारात माणसाने फार प्रोफेशनल राहावे नाहीतर एकमेकांबद्दल मनं कलुषित होतात.
सध्या फ्रॉडचं प्रमाण खूप
सध्या फ्रॉडचं प्रमाण खूप वाढलं आहे. सावध राहून मदत करणे केव्हांही चांगलंच. सत्पात्री दान श्रेष्ठ.
पण फसवणुकीबद्दल माझ्या वडलांनी जे शिकवलं ते मी पाळतो.
ते म्हणायचे कि "एकदा पैसे आपल्या हातातून गेले कि ते आपले नाहीत असं समजावं. ते परत आले तर आनंद मानावा, नाही आले तर विसरून जावं".
मदत करतानाची आपली भावना ही महत्वाची. काही दोन चार लोकांमुळे ती भावनाच नष्ट होऊ नये, नाहीतर खर्या गरजवंताला मदत मिळणार नाही.
मदत करतानाची आपली भावना ही
मदत करतानाची आपली भावना ही महत्वाची. काही दोन चार लोकांमुळे ती भावनाच नष्ट होऊ नये, ........ हेच पाळत होते. पण समोरचा, ह्या बाईला काय कमी आहे किंवा ani 4 वर्षे दिले नाही तर काय झाले ह्या विचारात असला की राग येतो. मी पटकन नाही म्हणू शकत नाही. असं वाटते की एवढ्याशा पैशाने आपल्याला काय फरक पडणार आहे. तिच्या वेळेला मदत होते ठीक आहे. असं म्हणून भस्मासुराला आमंत्रण देते.
तुम्ही पैसे दिले नाहीत ते
तुम्ही पैसे दिले नाहीत ते योग्यच केलं>>+1
तुम्ही निरागस आहात. पैसे दिले
तुम्ही निरागस आहात. पैसे दिले नाहीत ते योग्यच केलेत. काही खंत बाळगू नका.
तो चुकीच्या इंग्रजीतला ईमेल ही तिनेच ड्राफ्ट केलेला असू शकतो.. काही सांगता येत नाही.
बॅलन्स विचारणे/ पगार विचारणे म्हणजे तर हद्द च झाली भोचकपणाची.
पैसे न देण्याचा निर्णय योग्यच
पैसे न देण्याचा निर्णय योग्यच आहे.
या निमित्ताने माझा एक जुना अनुभव आठवला. आमच्याकडे कामासाठी बाई यायच्या, त्या अधूनमधून पाचसहा हजार उसने घ्यायच्या आणि पगारातून कापून देऊन फेडूनही टाकायच्या. अनेक वर्षे मी त्यांना ओळखत होते. पण एकदा त्यांनी पन्नास हजार उसने मागितले, हे सांगून की नवरा आजारी आहे आणि हॉस्पिटलमध्ये आहे. त्या रडतच होत्या. थोडे प्रश्न विचारल्यावर लक्षात आलं की हे कारण बहुतेक खरं नाही. पण त्यांना निकड तर दिसत होती. मी नवऱ्याला फोन केला तर तो साफ नाही म्हणाला. पण मला असं 'नाही' म्हणणं जमत नाही. मी त्यांना शेवटी वीस की पंचवीस हजार रूपये दिलेच. त्यांचा पगार होता दोन हजार. तीनेक महिने त्यांनी पगार घेतला नाही. सहा हजार वळते झाले. मग एकदम त्या कामावर येईनाशा झाल्या. काही दिवसांनी त्यांचा नवरा आम्हाला भेटायला आला आणि त्याच्याकडून समजलं की या बाईंचं बाहेर अफेअर होतं आणि त्या भानगडीत त्यांनी घरातलं सोनंनाणं विकलं होतं, लोकांकडून उसने पैसे घेतले होते वगैरे वगैरे. पुढे मग त्याने आमचे पाच हजार रुपये परत दिले. बाईंनी थोडे थोडे करत अजून पाचसहा हजार दिले. शेवटचे पाचसहा हजार बुडाले.
तेव्हा या सगळ्या गोष्टींचा डोक्याला त्रास झाला. आपल्याला फसवलं गेलं ही अपमानास्पद भावना तीव्र होती. पण 'उगाच पैसे दिले' असं मात्र तेव्हाही वाटलं नाही आणि अजूनही वाटत नाही. त्यांचं अफेअर असेल, अजून काही असेल. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तेव्हा त्या खरोखर पैशाच्या अडचणीत होत्या ही गोष्ट खरी आहे. कदाचित तो माणूस त्यांना ब्लॅकमेल करत असेल. अशा वेळी त्यांना जमेल तशी मदत आपण केली यात आपलं काही चुकलं असं मला वाटत नाही. शिवाय नंतर त्यांनीही या चुकीची किंमत भोगलीच. त्यांचाही संसार तेव्हा तरी मोडल्यातच जमा होता. पुढे काही संपर्क राहिला नाही.
तुमचा अकाउंट बॅलन्स काय आहे?
तुमचा अकाउंट बॅलन्स काय आहे? अश्या आणि इतक्या थेट (भोचक ) प्रश्नाला ३६ रुपये ६० पैसे वगैरे उत्तर देऊन कटवले असते. फार फार तर मिनिमम अकाउंट बॅलन्स (बँकेनुसार ) ठेवतो एवढेच सांगितले असते.
फारच आगाऊ लोक असतात.
फारच आगाऊ लोक असतात.
बरे झाले, तुम्ही जरा चौकशी केलीत.
आणि रत्नागिरीच्या भावासाठी ५००० रुपये मागणे तर खूपच अती झाले!
अश्या आणि इतक्या थेट (भोचक )
अश्या आणि इतक्या थेट (भोचक ) प्रश्नाला ३६ रुपये ६० पैसे वगैरे उत्तर देऊन कटवले असते. >> खरंच असंच काहीतरी सांगायला हवं होतं
अकाउंट बॅलन्स विचारणे म्हणजे
अकाउंट बॅलन्स विचारणे म्हणजे अतिच झाले. माझ्याकडेही बरेचजण पैसे मागतात. काही सिक्यूरीटी गार्ड यांना एकदाच ३०० - ५०० रू. देऊन मोकळा होतो. ते परत कधीही मागत नाहीत. कारण आधीचे पैसे त्यांनी दिलेले नसतात त्यामुळे परत मागत नाहीत.
घराजवळचा एक दुकानदार चांगल्या परीचयाचा आहे. दर महिन्याला १० ते १५ हजार रु. मागतो आणि आठवड्याभरात परत करतो असे सांगतो. पण ज्या दिवशी त्याने परत देतो असे सांगितले असते त्या दिवशी कधीच परत देत नाही. काहीतरी कारण सांगून ३ दिवस ते ७ दिवस उशीरा परत करतो. पण परत पुढच्या महिन्यात मागतो. असे ७ ते ८ वेळा त्याने पैसे घेतले व परतही दिले (पण उशिरा). मी सुद्धा मागचा अनुभव विसरून त्याला पैसे देतो. अश्या लोकांना नाही कसे म्हणावे हे समजत नाही. एकदा तर माझेच पैसे मागताना मी रडकुंडीला आलो होतो. पण परत निर्लज्ज्यासारखे पुढच्या वेळी त्याने पैसे मागितले व मी परत दिले ही. जरा जास्त ओळख असली की लोकं फायदा घेतात.
मला असल्या गरजू लोकाना मदत
मला असल्या गरजू लोकाना मदत करायला आवडतं. एकदा का मी पैसे दिले की मी ते परत मागत नाही. देणाऱ्याने दिले तर ठीक. समोरचा आपल्याला फसवतोय आणि परत देणार नाही हे माहीत असूनही मी पैसे देतो. एकदा मी कुरुक्षेत्रावर गेलो होतो तिथल्या झाडाखाली बसलो असताना मला अचानक कर्णाबद्दल आदर वाटू लागला आणि मी लोकाना मदत करायला लागलो. त्याआधी मी खूप कंजूष होतो.
>>>>>>माझेच पैसे मागताना मी
>>>>>>माझेच पैसे मागताना मी रडकुंडीला आलो होतो.
आणि तरीसुद्धा देता? काही तरी कारण असेल.
एकदा तर माझेच पैसे मागताना मी
एकदा तर माझेच पैसे मागताना मी रडकुंडीला आलो होतो. पण परत निर्लज्ज्यासारखे पुढच्या वेळी त्याने पैसे मागितले व मी परत दिले ही. >> योगीजी, मलापण फक्त ₹१०,००० ची गरज आहे. २ दिवसात परत करतो.
मला अचानक कर्णाबद्दल आदर वाटू लागला आणि मी लोकाना मदत करायला लागलो. >>
ऑफेन्सिव्ह बाई होती. उर्मट,
ऑफेन्सिव्ह बाई होती. उर्मट, भिकार अॅटिट्युड असलेली.
माझ्या कामवालीने गावी घर
माझ्या कामवालीने गावी घर बांधायचं ठरवले. अर्धा पैशाची तरतूद झाली आणि अर्धे ती दोन टक्के व्याजाने घेणार होती .तिने न मागता मीच तिला म्हटलं, अगं महिना दोन टक्के व्याजाने पैसे घेण्यापेक्षा मी तुला पैसे देते. मात्र मला पाच सहा महिन्यात परत कर आणि ते देखील मागायची पाळी आणू नकोस.तर बरं म्हणाली.तिला एक लाख तीस हजार दिले .माझ्या एफ डी मॅच्युअर झाल्या होत्या म्हणून शक्य झालं. नंतर दोन-तीन महिन्यांनी घर बांधलं वगैरे काहीही जाग केली नाही. एकदा मला लक्षात आल्यावर ती मी विचारलं अगं काय घराचं काय झालं ?तर प्लॉट व्यवस्थित मिळाला नाही त्यामुळे बांधलं नाही .तरी मी म्हटलं नाही की माझे पैसे दे म्हणून मला वाटलं की देईल. शेवटी पाचव्या सहाव्या महिन्यात तिला मी बोलले की अगं तू घर बांधलं नाहीस ना तर आता माझे पैसे दे . मध्ये एकदा तिच्या तोंडून पोस्टात जास्त रक्कम भरलेल्या निसटलं होतं पण मी दाखवलं नव्हतं शेवटी सात महिन्यानंतर मला पैसे माझे मिळाले. तेवढे माझं व्याज गेलं त्याहीपेक्षा मी जिच्यावर खूप विश्वास ठेवायचे तिने असं करावं याचं मला वाईट वाटलं.
त्यानंतरही बरेच किस्से आहेत. ताजा किस्सा 10 जानेवारी 2026 चा आहे. 25000 चार दिवसांत देणार म्हणून वादा आहे.
दरवेळी ठरवते की आता हे शेवटचे म्हणून.
देवकी नको देत जाऊस
देवकी नको देत जाऊस
बरेच लोक पैशाच्या व्यवहाराबाबत स्वच्छ नसतात.
माझ्या कामवालीने गावी घर
देवकी नको देत जाऊस ... यापुढे नाही देणार.
पैसे जाण्याचे दुःख नसते(तेही असतेच म्हणा).पण vait apalyala fasavale जाण्याचे वाटते.
धनश्री धप्पा दिला मधेच.
धनश्री धप्पा दिला मधेच.
दोनदा पंचवीस हजार रुपये म्हणजे पन्नास हजार झाले.
चांगुलपणाचा गैरफायदा घेणे, मऊ
चांगुलपणाचा गैरफायदा घेणे, मऊ दिसले की कोपराने खणणे - हाच आमचा 'सनातन'* धर्म आहे. कदाचित जगात सर्वत्र समान असलेला धर्म म्हणुन पहाता यावे.
सनातन म्हणजे कायमस्वरुपी
* या सनातनचा व भगव्या सनातन हिंदू धर्माचा संबंध नाही.
भोचकपणा किती तो
भोचकपणा किती तो
आधी मी ही मदत केलीय आणि।लोकांचे स्वभाव पाहिलेत
आता देत नाही कोणाला.
मुळात आता कुणाकडे उधारी नको आणि कुणाकडून घ्यायला नको असे झाले आहे मत.
ह्यांच्या काही हजारासाठी परत कोण जन्म घेईल
>>>>>धनश्री धप्पा दिला मधेच.
>>>>>धनश्री धप्पा दिला मधेच.
आता राज्य कुणावर?
मी एकाला त्याच्या मुलाच्या
मी एकाला त्याच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी साधारण लाख सव्वा लाख रुपये आपणहून दिले होते. पण तो पास झाल्याचं, पुढे त्याला नोकरी लागल्याचं ना त्याने कळवल ना त्याच्या पत्नीने ना त्या मुलाने. ते पैसे त्याने परत फेडावे म्हणून मी दिले नव्हते त्यामुळे ती अपेक्षा नव्हती पण त्या मुलाच्या प्रगतीचे अपडेट तरी मला कळवले जातील अशी अपेक्षा होती. एवढी निष्काम कर्मयोगी मी नाही त्यामुळे त्याच वाईट जरूर वाटतं. पण त्याच छान चाललं आहे हे समाधान आहे. असो.
आमची एक कामवाली कायम पंचवीस तीस हजार उसने घेत असे आणि पगारातून फेडत ही असे. पण पुढे माझ्या लक्षात आलं की ती तिची employment गॅरंटी स्कीम होती. किती ही खाडे केले, कधी ही आली, कसं ही काम केलं तरी पैसे वसुलीसाठी तरी मी तिला काढू शकणार नाही असं तिचं लॉजिक होतं. पण एकदा मी " सोडलं तर सोडू दे " असा काळजावर दगड ठेवून तिला नाही म्हटलं. त्याप्रमाणे तिने पैसे नाही म्हटल्यावर पगार वाढवून मागितला .त्यावर ही मी नाही म्हणून ठाम राहिले आणि येऊ नको सांगितलं.
जे होतं ते चांगल्यासाठीच. आताची बाई कामाचा आनंदच आहे पण उसने तर सोडाच मी कधी पगार द्यायची विसरले तरी मागत नाही अशी आहे.
इथले सगळे लोकं एवढ्या मोठ
इथले सगळे लोकं एवढ्या मोठ मोठ्या रकमा उधार देतात... फारच शूरवीर दिसताहेत सगळे.
माझ्या मदतनीस एवढ्या मोठ्या रकमा कधी मागत नाहीत मला.फार फार तर एखादेवेळी महिन्याचा पगार लवकर घेतात.
त्यांना माझा बॅलन्स झिरो वाटत असावा.
>>>>इथले सगळे लोकं एवढ्या मोठ
>>>>इथले सगळे लोकं एवढ्या मोठ मोठ्या रकमा उधार देतात... फारच शूरवीर दिसताहेत सगळे.

माझ्या मदतनीस एवढ्या मोठ्या
माझ्या मदतनीस एवढ्या मोठ्या रकमा कधी मागत नाहीत मला....... माझ्यांनी मागितल्या नव्हत्या तरी आ बैल मुझे मार सवय सुटत नाही.
Pages