
३.विरोधाभास
... हेमंत नाईक
सिंगापूरला ऑकलन्डच्या नेक्स्ट फ्लाईट चीं वाट बघत बसलो असताना दोन तरुण शेजारी बसले होते आणि एकमेकाशी मराठीत बोलत होते.
हल्ली परदेशात आई वडील घरात एकमेकाशी आंग्ल भाषेतून बोलत असल्याने त्यांच्या मुलांना मराठी बोलताना खूप त्रास होतो किंवा येत ही येत नाही.असे हे चित्र आहे. मराठी शब्द कुठेही ऐकले कान तेथे ओढ घेतात.असाच एक किस्सा अमेरिकेत आमच्या मेव्हण्याचा बाबत वास्तवात घडलेला सांगतो, त्यांना अमेरिकेत मुलाकडे असताना एक फोन आला घेतला सवयी प्रमाणे, "कोण बोलताय?" असे मराठीत बोलले गेल्यावर समोरून चक्क मराठीत एक वृद्ध स्त्री मराठी बोलत होती त्यांनी रॉंग नंबर म्हणून तो ठेवणार.. तेव्हा, त्या बाई फोन वर लागलीच बोलल्यात,
"कृपया खाली ठेवू नका, काहीही बोला पण बोला बऱ्यांच दिवसातून मराठी बोलणाऱ्याशी सम्पर्क होतो आहे!! सुनबाई इंग्लिश असल्याने माझ्यासहित मुलगाही घरात इंग्लिश बोलतो दोन अमेरिकेत वाढलेली नातवंड त्यांना मराठीही कमी समजते.!!"
आणि नंतर जवळपास २० ते २५ मिनिटे संभाषण झाले.
मायबोली आमुची
प्रिय ती आम्हाला
गोड नित्य भासे
ऐकू येई जेव्हा कानाला
दुसऱ्या देशी मात्र
_सते वेगळे चित्र
मिसाळण्या तेथे व्हा
त्या बोलीचेही भक्त
अगदी आपल्या देशातही विभिन्न बोली वेगळ्या वेगळ्या राज्यात बोलल्या जातात त्या तुम्हाला तिथे रहात असल्या तर त्या भाषाही शिकाव्या लागतात आणि इंग्लिश तर जागतीक भाषा समजली जाते... तिचे महत्व राहणार असले तरी आपल्या भाषेचे सौंदर्य आणि महत्व प्रत्येक मराठी मनात जपायला हवे.
"मराठी असे आमुची मायबोली..
_विसरणार नाही तिला कधीही."
हे मात्र खरे आहे.
त्या दोघा युवकांना आरामदायी कोचावर बसून गप्पा मारतांना पाहून आणि जवळपास सहा सात तास विमानात माझ्या तोंडास कुलूप असल्याने त्यांच्याशी बोलण्यासाठी मी स्वतःहून सुरुवात केली हळूहळू चर्चा रंगू लागली. ते दोघे मुंबईचे असून सिंडनी येथे जाणार होते.
" दुसऱ्याला बोलत करायचं असल की त्याच्या बद्दल बोललं की तो बोलता होता आणि मग आपण श्रोता होता नकळत बरंच काही शिकून जातो."
बाहेर देशात जातो तो बहुदा सॉफ्ट वेअर मधलाचअसतो म्हणून त्यांना तुम्ही आय टी त आहात का? असं विचारता,
आम्ही शिपिंग कंपनीत काम करतो व्हर्जिन या ब्रिटिश शिपिंग कंपनीत सिडनी ते लंडन पॅसेंजर क्रूझवर कामाला असल्याचे सांगितले. एक जण शेफ तर दुसरा हॉस्पिटॅलिटी म्हणजे क्रूझवर रहाणाऱ्याची सोय बघण्यासाठी व्यवस्थापक होता. दोघेही कंत्राट वर काम करत होते. एकदा शिपवर गेले की सहा महिने मग नंतर दोन महिने सुटी घेऊन भारतात मग परत कामावर. असे सात सागराच्या लाटावर त्याचे जीवन स्वार होत होते.
एकाने तर त्याचे पंधरा दिवसापूर्वी लग्न झाले असल्याचे सांगून तो सहा महिन्यासाठी सिडनी ते लंडन या प्रवासासाठी निघाला होता.
चार पाच वर्ष त्याच्याच कंपनीत असलेला त्याचा दुसरा मित्र त्याच्या नुकत्याच जन्मलेल्या दहा दिवसाच्या गोंडस मुलासाठी त्याचे भविष्य घडवण्यासाठी कामावर निघाला होता.
सहा महिने कुटुंबापासून सातत्याने दूर राहणे किती कठीण आहे त्यांच्या बोलण्यातून कळतं होत... शेवटचा महिना तर एकेक दिवस फुल्या मारून काउंट डाउन केल्यासारखा काढतो.. असे नेहमी दूर राहणारे काय किंवा सीमेवर लढणारे जवान काय दोघेही खूप काळ आपल्या पासून दूर राहून काढतात.
आपण सर्वं खूपच नशीबवान आहोत..
आपल्यांना जास्ती जास्त सुख देण्यासाठी ते करत असलेला त्या दोघांचा त्याग मला जाणवत होता.
प्रवासी क्रूझ मध्ये एका प्रवास्यामागे एक कर्मचारी असतो चार ते पाच हजार वस्तीचे तरंगते गावच जणू. सर्वं फाईव्ह स्टार सुविधा असलेलं. बऱयाच मित्रांनी अशा क्रूझ केल्या असतील. ते दोघेही त्यांच्या सागरसफरीची भरभरून माहिती देत होते.
मायबोली एक असली की परकेपणा नष्ट होतो हे पुन्हा सिद्ध झाले.
तेवढ्यात त्यापैकी नवविवाहित तरुणाला त्याच्या पत्नीचा फोन आला बराच वेळ तो तिच्याशी बोलत होता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव लपत नव्हते. डोळयांत आलेलं पाणी तो दडवत होता पण शेवटी पत्नीस बाय बाय करताना बांध फुटला आणि दोन अश्रू खाली ओघळलेच.तो खिन्न बसला होता. त्याचा मित्र त्याला समजावू लागला.
मलातर त्याच्याशी आता काय बोलावे? ते सुचले नाही. गप्पा नकळत संपल्या होत्या.
या ओळी मात्र मनात रेंगाळल्यात.
शकूनाच्या मेहंदीचा
रंग लाल तसाच शेष
पोटाची खळगी भरण्या
पिया गेला दूर दूर देश
पैशाचा तो लोभ मोठा
सुखासाठी सुखास त्यागा
नियतीचा अजब हा खेळ
पिया गेला दूर दूर देश
आधुनिक या युगाची
नळ दमयंतीची वाटे जोडी
साथ फार ती कमी वेळ
पिया गेला दूर दूर देश
विरह काय लगेच कळले
उष्ण आसवानी भिजले
लाल नविन कोरे वधूवेश
पिया गेला दूर दूर देश
फोन पियाचा आता सहारा
येण्याच्या त्या वाटेवर डोळा
दिला लवकर येण्याचा संदेश
पिया गेला दूर दूर देश_
आपण सर्वांनी नित्य कुटुंबाबरोबर घालवलेलं आयुष्य आणि अशा मंडळींचं वर्षातून आठ दहा महिने कुटुंबाशिवाय खडतर आयुष्य दोन्हीमधला विरोधाभास स्पष्टपणे दिसत असला तरी प्रेमभावना मात्र एकच होती.
आणि
पाच तासापूर्वी झालेला निरव शांततेततील गप्पा शिवाय झालेला अळणी प्रवास आणि या तिन तासात दोन युवकांच्या जीवनात असलेले त्यांचे कथानक आणि त्याच्या बद्दल झालेल्या गप्पा मध्ये तिन तास कसे संपले तेच कळले नाही..
हे दोन्हीही या प्रवासातले अनुभवपण परस्पर विरोधी होते .आपल्या नशिबी किती सुखी जीवन आले याबद्दल या बद्दल मी ईश्वराचे मनोमनी आभार मानले.
आज प्रवासवर्णन बाजूला राहिले प्रवासात एक कथाच मिळाली लिहण्यासाठी..
...हेमंत नाईक.
२८.०३.२४
छान लिहिताय!
छान लिहिताय!
धन्यवाद.. जिज्ञासा.
धन्यवाद.. जिज्ञासा.