
२. मुंबई ते सिंगापूर
नुकतेच सुंदर साजरे झालेलं COEP चे जंगी गेट टुगेदर मध्ये झालेल्या मित्रांच्या भेटीगाठी मुळे मी फुल्ल चार्ज झालो होतो... आईस धुळ्याला बहिणीकडे सोडून मी निर्धास्तपणे न्युझीलंडला जाण्यासाठी मुंबईस पोहचलो.
पॅरेंट व्हिसा तिन वर्षाचा असल्याने ती काळजी नव्हती.
आय टी क्षेत्रात नविन पिढीत खूप मंडळी परदेशात वास्तव्यास गेली असल्याने विमान प्रवास हल्ली खूप बऱ्यापैकी कॉमन झाला आहे.. पूर्वी कुणी परदेशात गेला की त्याची परदेश भ्रमण या विषयावर व्याख्यान होत असत. हल्ली यु ट्यूब वर सर्वं लाईव्ह उपलब्ध असल्याने ती ही आता होत नाहीत किंबहुना ऐकण्याची सवय दोन्ही अर्थाने समाजाची कमी होत चालली आहे. दृकश्राव्य माध्यमामुळे ऐकण आणि वाचण्या पेक्षा बघण्यास महत्व आले आहे. लोकशाही मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कोणी कोणाच्या ऐकण्यात नाही.
सध्याचे राजकारणातही न ऐकण्याचाच बोलबाला आहे... कधी काळी एकाच विचाराची मंडळी दोन विभिन्न पार्टीत गेली आहे.. अगदी इलेक्शनचे तिकीट जाहीर होई पर्यंत हा आट्यापाट्याचा खेळ सुरू असणार आहे.. एकमेकांचे जवळचे मित्र, अगदी नातेवाईक असणारी देखील ही मंडळी आज चक्क एकमेकांविरुद्ध उभी असून चिखलफेक ही करत आहे. असे हे धुळवडीचे चित्र सर्वंच पार्टीत आहे.
एक जुनी गोष्ट आठवते आमच्या गल्लीत गणेशोत्सवात आम्ही कार्यक्रम करण्यासाठी ख्यातनाम मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांना आमंत्रित केले होते. रात्री ९.०० ची कार्यक्रमांची वेळ होती. मी रेस्ट हाऊस वरून पाहुण्यांना आणायला गेलो असताना ते तयार बसले होते. त्यांना गाडीत घेऊन आलो तर गल्लीत एकदम कर्फ्यू सारखा शुकशुकाट होता.. कार्यकर्तेही सर्वं नव्हते.. गाडगीळाचा चेहेरा किंचित उतरला होता.. त्यांनी मंडपातील गणेश मूर्तीस वंदन केले आणि मला म्हणाले,
"कार्यक्रम कसा करायचा? श्रोते येतील की नाही? "
मी म्हणालो,, "बिलकुल काळजी करू नका.. आख्खी गल्ली गर्दीने ओसंडून वाहेल ."
तीस वर्षापूर्वीचे चित्र बदलले आहे. आता मात्र सर्वत्र श्रोते जमवणे कठीण काम आहे.
नेमकी त्याच दिवशी भारत पाकिस्थानचा वन डे सामना आणि शेवटच्या काही ओव्हर्स.. त्या ही रंगतदार..आणि भारत जिंकणार अशी शक्यता ९० टक्के असल्याने कोणीही टिव्ही सोडायला तयार नव्हता आणि कार्यक्रम सुरु होण्याच्या आधी कार्यक्रमांस जाणे म्हणजे वेळेचा अपव्यय होतो असे समजणारे बहुसंख्य रसिक प्रेक्षक होते. कार्यक्रम सुरु झाल्यावर मात्र, वारूळातून जशा मुंग्या बाहेर येतात तसे शेकडोनी दर्दी श्रोते घराबाहेर पडले.कार्यक्रमही उत्तम झाला हास्याची दादही हवी तिथेच अचूक बरोबर मिळत होती.
तुमच्या प्रेक्षकांचा क्लास कलेची जाण असणारा आहे हा नेहमी कलाकारांकडून मिळालेला अभिप्रायही दिला गेला.
सभेत बोलण्यापेक्षा लिहिणे त्या अर्थाने सोपे आहे. बोलतांना एक तर समोर श्रोते प्रेक्षक हवेत आणि हे लाईव्ह प्रेक्षक नव्हे तर जणू परीक्षकच बसले असतात. जरा बोलण कंटाळवाण झाले तर सरळ उठून निघून जातात किंवा खुप टाळ्या वाजवून खाली देखील बसवतात.
समोरची प्रतिक्रिया न कळता अगदी वाटेल ते फक्त्त लिहिता येते.
वाचाल तर वाचाल ही वाचण्याची महत्व सांगणारी उक्ती वाचण्याचे महत्व सांगते."वाचन, विचार आणि अनुभवाशिवाय लिहिणं जमत नाही."
आता मात्र श्रोते जमवणे ही पण इव्हेंट मॅनेजमेंट चा भाग आहे. राजकारणी देखील हल्ली भाषाणाआधी गायकाचा अथवा मनोरंजनाचा प्रोग्राम ठेवतात.शिवराळ आणि जहाल भाषणास गर्दी असली तरी मत देतांना ते एंनकॅश होत नाही. जनताही सुज्ञ असतें.
यामुळे बोलण्यापेक्षा लिहिणे सोपे वाटते.. कुणी वाचलं तर वाचलं नाहीतर बाजू पडलेलं राहील आणि ते लिहिणाऱ्याला कळतंही नाही.
"मनुष्य हा समाज प्रिय प्राणी आहे" , हे माहित असल तरी आजच्या या विमान प्रवासात कोणीही कोणाशी बोलत नसताना पाहून क्षणभर ते खोटे वाटले.बडबड फक्त्त लहान मुलं करत होती बाकी सर्वं आपापल्या गॅझेट मध्ये काहितरी चाळे करत होती.काही जण उगीच समोर असलेल्या स्क्रिनवर विमान किती उंचीवर,काय स्पीडने चालले आहे यावर नजर ठेवून होते.
हवाईसुंदरी हा पेशा सौंदर्यवती व कमी वयांच्या महिलांसाठीच आहे हे इतर स्मार्ट स्त्रीयांवर अन्याय केल्यासारखे आहे..
आणि
"खरं सौंदर्य मनाचे असतें या विचाराला खोटं ठरवणारा वाटला ."
जगात पहिल्या पाचात असलेल्या सिंगापूर एअर लाईन्सच्या हवाई सुंदरीचा बारीक राजस्थानी प्रिंट असल्या सारखा ड्रेस वैशिष्ट्यपूर्ण आहे अगदी पायातील सॅंडल्स देखील त्याच प्रिंटच्या मध्ये होते.निळा,हिरवा, पर्पल आणि मुख्य हवाई सुंदरीचा लाल रंगांचा हा पोशाख आकर्षक होता. या जगातील सर्वात मोठ्या सुमारे सातशे आठशे कपॅसिटीच्या एअरबस ३८० साठी एअर हॉस्टेस आणि इतर असे पंधरा एक तरी Crew Members असावेत.
"त्या हवाईसुंदरीचे वाजवी पेक्षा जास्त मृदू बोलणं आणि शिष्टाचार, त्यांच्या घरात नवऱ्याने पसारा केल्यावर पाळतात का? " ही एक शंका माझ्या मनात डोकावून गेली.
विमान उडताना आणि उतरतानाचे पाच दहा मिनिट वगळता खिडकीतून बाहेर सतत एकसारखे दिसणारे ढगाचे पुंजके आणि विशाल सागराचा निळा रंग पाहून कंटाळा येतो.मात्र खाली तरंगणारे ढग पाहून एक रचना सुचली..
वर दिसणारे ढग
खाली दिसू लागले..
ढगावर उंच उंच
मन उडू लागले..
उंच जाण्याची ओढ
जीवना गती देते..
शिखरी पोहचता
पायथ्याचीं स्मृति येते.
काय करावे आता?
पूर्ण होता ध्येय सारी..
विसाव्यास वेळ नंसे
शिखरावर थांबण्यासाठी..
म्हणतात स्वर्ग तो
उंच गगनी दिसतो..
खर,भूमीच्या कुशीत
पंचभूतांत तो असतो..
उंच असताना ओढ
असते भूमीची नित्य..
सुखरूप लँडिंग होता
जीव पडतो भांड्यात..
खिडक्या बंद विमानातून केलेला प्रवास हा एक घरघर आवाज येणाऱ्या भरगच्च मुकी माणसं असलेल्या वातानुकुलीत खोलीत बसून केलेला अत्यंत कंटाळवाणा वाटतो.. मला तर सोळा तास जायचे आहे...अशा वेळी मध्ये विमान बदलंवण्याचा असलेला सिंगापूर चा स्टॉप दिलासा देऊन जातो.
उत्तम एअरपोर्ट.. ज्वेलशॉपिंग मॉल आणि उंचावर पडणारा रेन वोर्टेक्स हा अजस्त्र धबधबा .. बटरफ्लाय गार्डन.. .फ्री मूवी थिएटर.. सुंदर फिश पॉंड्स.. सर्वत्र असलेली सुंदर फुलझाड असे वैशिष्टपूर्ण चांगी एअरपोर्ट बघताना तिन तास मजेत जातात..
आतातर सिंगापूर एअर लाईन ने दिवसाचा मोठा ले ओव्हर असेल तर फ्री मध्ये तिन तासाच्या चारपाच साईट टूर सुरु केल्या आहेत फक्त्त ट्रान्सीट व्हीसाऑनलाईन काढावा लागतो. तुम्हांला टुरिस्ट बसने बरोबर घेऊन विमानाच्या वेळेवर परत पोहचवण्याची जबादारी गाईडची असते .
या निरव शांततेचा फायदा घेऊन, या प्रवासात या प्रवासावर लिहितो आहे.
शिस्तीत रांगेत बसले सारे
ना आवाज ना गलका..
आजू बाजू कुणी न पाही
स्क्रीनवरी असता नजरा..
नजर नवखी कुणी ती
फिरते भिरभीरणारी..
जाणून घेण्याची जिज्ञासा
नव्याचा शोध घेणारी.
अधून मधून पुरवले
जातात ड्रिंक्स छान.
चिअर्स करण्यासाठी
नाही दुसरा ग्लास..
जेवण व्हेज नॉनव्हेज
होते ते खूप भारी_
केकचे डिझर्ट अन_
बटरचिकनची चव न्यारी.._
शांताताही कंटाळली होती
प्रवास सरता सरत नव्हता .
सिंगापूरला मी पोहचलो
लेख हा लिहिता लिहिता..
हेमंत नाईक
२९. ०३. २०२४
क्रमश :
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
छान लिहितायं..!
छान लिहितायं..!
लेखातल्या कविता देखील मस्त..!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
>>>>>.काही जण उगीच समोर
>>>>>.काही जण उगीच समोर असलेल्या स्क्रिनवर विमान किती उंचीवर,काय स्पीडने चालले आहे यावर नजर ठेवून होते.
हाहाहा आमच्या गटातले आहेत ते. आम्ही नुसती मॉनिटरवरती, नजर ठेउन, विमान चालवतो, सुरक्षित ठेवतो
>>>>>>>>>>"त्या हवाईसुंदरीचे वाजवी पेक्षा जास्त मृदू बोलणं आणि शिष्टाचार, त्यांच्या घरात नवऱ्याने पसारा केल्यावर पाळतात का? " ही एक शंका माझ्या मनात डोकावून गेली.
भारी शंका आहे
धम्यवाद रुपाली, धनश्री आणि
धन्यवाद रुपाली, धनश्री आणि आर्किड..