नुकताच बनारसला गेलो होतो तेव्हा घाटांवरुन फिरत असताना अनेक ठिकाणी श्राध्द विधी व धार्मिक कार्ये चालू होते. ते पहाताना माझे मन माझ्या भूतकाळात गावी गेले. एके ठिकाणी थबकलो. तिथे सव्य अपसव्य चालू होते. जानवे सव्य (डाव्या खांद्यावर) आणि अपसव्य (उजव्या खांद्यावर) हे (यज्ञोपवीत) घालण्याच्या दोन पद्धती आहेत, ज्या धार्मिक विधींनुसार बदलतात; 'सव्य' म्हणजे देवकार्यासाठी डाव्या खांद्यावर, तर 'अपसव्य' म्हणजे पितृकार्यासाठी उजव्या खांद्यावर जानवे घेणे
मुंज अथवा व्रतबंध या सोहळ्यात लहानपणी ब्राह्मण कुटुंबात बटूला म्हणजे ज्याची मुंज करावयाची आहे ती उत्सवमूर्ती ला जानवे तथा यज्ञोपवित हा अलंकार प्रदान केला जातो. जानवे म्हणजे काही धाग्यांचा समूह असलेला वर्तुळाकार समुच्चय. जो डाव्या खांद्यावरुन कमरेपर्यंत अडकवायचा असतो. मुंज विधी झाल्यावर त्याचा दुसरा जन्म होतो. म्हणून त्याला ब्राह्मणाला द्विज असेही म्हणतात. एका आयुष्यात दोनदा जन्म या अर्थाने. मला मुंजीची फार भीती वाटायची कारण गुरुजी म्हणे मुंजीत तुमच्या मांडीत बेडूक भरतात. तेव्हा बेडकाचा साईज व मांडी कापून तो भरायला किती कट मारायला लागेल ? मग रक्त आले तर काय करतात? असे प्रश्न डोक्यात येत. दयाळू गुरुजी छोटासाच कट मारुन तिथे बेडकाचे छोटे पिल्लू भरत असतील अशी समजूत मी करुन घेत असे. तरी एकदा मी मांडीवर छोटासा कट मारुन हळद लावली होती. त्याची खपली पडून खूण दिसायला लागली. आता मुंजीच्या वेळी बेडुक भरायच्या विधीच्या वेळी गुरुजींना सांगायचे अलरेडी माझ्या मांडीत बेडूक भरलाय आता परत भरण्याची आवश्यकता नाही असे ठामपणे सांगायचे. पुरावा म्हणून ही खूणही दाखवायची असे ठरवले. प्रत्यक्ष मुंजीच्या वेळी गुरुजींनी मला तसे काही विचारले नाही व मी सुटकेचा निश्वास टाकला. आजही ती खूण माझ्या उजव्या मांडीवर आहे.
मुंजी मधे जानवे घालतात का तर म्हणे त्या पॉवर असते. तुमचे जन्मभर संरक्षण करते. भूत पिशाच्च हडळ वगैरे मंडळी या जानव्याला घाबरतात व जवळ फिरकत नाही. सोबत तुम्हाला रामरक्षा पाठ असेल तर पॉवर अजूनच वाढते. ब्रह्मसमंध आला तरी डबल पॉवर मुळे त्याला माघारी जावे लागते. जानव्या मधे जर पॉवर असते तर ते जानवे पुण्याला दुकानात विकत कसे काय मिळते? श्रावणी मध्ये जानवं बदलण्याचा सोहळा माझ्या गावी आमच्या रामाच्या देवळात सामुदायिकरित्या करावे लागत असे. तेव्हा असे कळाले की विकत घेतलेल्या जानव्यात पॉवर नसते, श्रावणी विधी करताना जे मंत्रोच्चार करतात तेव्हा त्यात पॉवर निर्माण होते. पहिल्या जानव्यात मुंजीच्या वेळी पॉवर तयार होत असते.
श्रावणी विधी मधे गोमुत्र व पंचगव्य प्राशन करावे लागे. त्यांची मला धास्तीच बसली होती. पण करता काय सुटका नाही. डोळे मिटून तोंड वेडेवाकडे करत गोमूत्र प्राशन करावेच लागे. हा पंचगव्य पदार्थ म्हणजे गायीचे शेण, दूध, दही, तूप व गोमूत्र यांचे मिश्रण असलेला पदार्थ. मग अलरेडी गोमूत्र जर या पंचगव्यात आलेले आहे तर पुन्हा स्वतंत्रपणे गोमूत्र पिण्याची सक्ती का? असा प्रश्न मला त्यावेळीही पडत असे. एकदा शंका म्हणून तपस्वी गुरुजींना विचारलेही होते. त्यांनी सांगितले की गोमूत्रामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे इतरवेळीही गोमूत्र प्राशन केले पाहिजे.
या जानव्याच्या साईजचे मला काही भानगड उकलली नाही. जानवं सिंगल कराव तर लांब व्ह्यायचं, कंबरेच्या खाली जायचे आणि डबल कराव तर् आखूड व्हायचं ,बरगडी पाशीच थांबायचे. मग त्यातल्या त्यात बरा वाटणार जोड उलगडला जायचा व मला जानवे दिले जायचे. बाकी काही असो,पण किल्ली ठेवायला व पाठ खाजवायला मात्र जानव्याच उपयोग व्हायचा. माझ्या ग्रंथपेटिकेला उगीचच छोटे कुलुप लावून त्याची चावी जानव्याला लावल्यावर् मला मोठे झाल्यासारखे वाटे. घरातील तिजोरीची व कपाटाची चावी माझ्या आजोबांच्या जानव्याला असे. ते गावचे पाटील व सावकार होते. ते जानवे सदर्याच्या बाहेर काढून त्यातील किल्लीने तिजोरी उघडून गहाण दागिने आत ठेवीत व पैसे काढून गावकर्याला देत असत. वहीवर त्याचा आंगठा घेत असत. दागिने म्हणजे काय तर सात किंवा आठ पुतळी एक पान, नथ,तोडे,आंगठी वगैरे. त्याला चिठ्ठी लावली जात असे. जेव्हा तो परत दागिने घ्यायला येई त्यावेळी उलट प्रक्रिया होत असे. मुख्य मुद्दा काय तर जानव्याच्या किल्लीने कधी तिजोरी तर कधी भिंतीतले कपाट उघडण्याची लकब मला अतिशय आकर्षित करायची.
लघुशंका करताना जानवे कानावर का अडकवायचे हे मला कधी समजले नाही. आमच्या एका मित्राला त्या जानव्याचा व मूत्रविसर्जनाच्या अवयवाचा संबंध हा एसटीतील कंडक्टर लांबलचक दोरी असलेली ड्रायव्हरच्या केबीन मधील बेल जागेवरुन वाजवतो तसा काही असला पाहिजे असे प्रामाणिक पणे वाटत असे. उगीच आर्किमिडिज म्हणला नव्हता की मला पुरेशा लांबीची तरफ द्या मी पृथ्वी उलथवून दाखवीन.
जानव्याची पॉवर
Submitted by प्रकाश घाटपांडे on 10 December, 2025 - 03:13
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जानवे कानास अडकवले की कुठलीशी
जानवे कानास अडकवले की कुठलीशी नस दाबली जाते आणि मूत्रविसर्जन सुरळीत होते असे काकाफॉ होते.
लेख छान जमलाय. बर्याच
लेख छान जमलाय. बर्याच ठिकाणी हसू आले. नवीन माहीती मिळाली.
पंचगव्य भक्षण, गोमूत्र पिणे
पंचगव्य भक्षण, गोमूत्र पिणे हे वाचूनच मळमळते.
अशा प्रथा का पडल्या असाव्यात समजत नाही.
एसटीतील कंडक्टर…. 😂
BTW, मुंबईतल्या एका मोठ्या आणि प्रचंड गर्दीच्या हॉस्पिटलमधे डॉक्टरवृंद जानवे दिसेल असाच शर्ट/ गाउन घालतात, फार विचित्र वाटतं ते.
>>>>>पंचगव्य भक्षण, गोमूत्र
>>>>>पंचगव्य भक्षण, गोमूत्र पिणे हे वाचूनच मळमळते.
+१
प्रघा आपण स्वतः आपल्या शरीरावरती कट मारणे - हे कै च्या कै वाटतय.
आपण स्वतः आपल्या शरीरावरती कट
आपण स्वतः आपल्या शरीरावरती कट मारणे >>
हा कट हा जयद्रथ न्याय करून टाका.
मिस्किल लेख!
मिस्किल लेख!
पंचगव्य भक्षण, गोमूत्र पिणे हे वाचूनच मळमळते.>>>>> +१.
आजीच्या वर्षश्रद्धावेळी वडलांनी सर्वाना गोमूत्र चमच्याने/पळीने दिले होते. म्हणजे वाटणारा ते घेण्यातून मोकळा. मी नव्हते घेतले.
एखाद्या प्राण्याचे मल मूत्र प्राशन करणे किंवा घरात शुद्धीकरणासाठी शिंपडणे या दोन्ही गोष्टींना बिग नो नो.
Count all Brahmha haters .
Count all Brahmha haters .
प्रघा आपण स्वतः आपल्या
प्रघा आपण स्वतः आपल्या शरीरावरती कट मारणे - हे कै च्या कै वाटतय.>>>>>> पण ते वास्तव आहे. जरा देखील अतिशयोक्ति नाही. आजही ती खूण माझ्या उजव्या मांडीवर आहे
प्रामाणिक नोंदी आणि विनोदी
प्रामाणिक नोंदी आणि विनोदी लेखन.
दोन लग्नप्रसंगात जानव्यामुळे
दोन लग्नप्रसंगात जानव्यामुळे / जानव्याच्या आग्रहामुळे विचित्र स्थिती निर्माण झाल्याचा साक्षीदार आहे.
१} पहिल्या love-cum-arranged marriage, दोन्ही पक्ष पूर्वपरिचित आणि सजातीय असलेल्या लग्नात लग्नमुहुर्ताच्या तासभर आधी “जानवं नसलेल्या वराला मुलगी देणार नाही” असे वधुपिता म्हणाला आणि एकच हलकल्लोळ झाला. वरपिता/ वर जातपात मानत नसल्याने वराचे उपनयन वगैरे झालेले नव्हते, वर जानवे घालत नव्हता.
तिढा.
मग तिथे उपस्थित “विद्वान” पुरोहितांनी तोडगा सुचवला :
काशीयात्रा करून आलेल्या किमान ५ जानवेधारी सज्ञान- विवाहित पुरुषांनी (वधुपिता/ वरपिता / वधु-वराचे भाऊ वगळून) स्वहस्ते वराला सर्वांच्या साक्षीने कोरे जानवे घातले तर तो उपनयन संस्कार झालेला पुरुष मानला जाईल म्हणे !!
वराचे दैव थोर कारण तसे पाच willing पुरुष मंडपात हजर होते… वराने-वरपित्याने तत्वाचा प्रश्न वगैरे करून काही ताणले नाही आणि विवाह नीट पार पडला.
२} दुसऱ्या लग्नात वधु ब्राह्मण तर IAS Officer वर तथाकथित खालच्या जातीतला. मग परंपराप्रिय वधुपित्याने आधी अनेक विधी, कर्मकांड करून वराचे उपनयन वगैरे करून त्याला जानवे घालवले आणि मग त्याच्याशी मुलीचे लग्न लावले - हे दोन वर्षापूर्वी २०२३ साली!
World is far stranger than what we think !
अनिंद्य लै भारी किस्से!
अनिंद्य लै भारी किस्से!
तुमच्या उपायामुळे अनेक
तुमच्या उपायामुळे अनेक नरपुंगव 'पृथ्वी' उलथवायचा प्रयत्न करु पाहतील.
मजेशीर लेख आहे.
मजेशीर लेख आहे.
आमच्यात जान्हवे हा प्रकार नसल्याने त्याचे काही अनुभव नाहीत. पण मला वाटते की जसे लग्न झालेल्या बाईला ती ओळखण्याची निशाणी म्हणून समाजाने गळ्यात मंगळसूत्र घालायला लावले आहे. तसे ब्राह्मणांनी आपण उच्चवर्णीय आहोत हे ओळखण्याची खून म्हणून ही प्रथा सुरू केली असावी.
गोमूत्र आमच्यात सुद्धा प्राशन केले जाते. आणि घरात सुद्धा शिंपडले जाते. रोज नाही हा, तशीच वर्षातून एकदा पूजा वगैरे असल्यास.
मी सुद्धा लहानपणी जे घरचे करतील ते योग्य म्हणत आणि मोठेपणी घरच्यांच्या भावना कश्याला दुखवायच्या म्हणून क्वचित गोमूत्र प्राशन केले आहे.
पण आमच्यात ते पाण्यात टाकून फारच डायल्यूट केलेले असते आणि त्याचाही एखादा थेंब म्हणजे गोमूत्राची ओरिजनल मात्रा एखाद्या स्पर्म एवढी पोटात जात असावी.
शेणापासून बनवणारा खाद्यपदार्थ मात्र माहीत नाही. पण गावी शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून जेवलो मात्र बरेचदा आहे. एखाद्याला हे सुद्धा किळसवाणे वाटू शकते. मलाही आधी कल्पना करून वाटलेले. पण नंतर अनुभव घेतला तसे उलटे आवडले ते
द्रावण जितके डायल्यूट तितकी
द्रावण जितके डायल्यूट तितकी त्याची तितके ते पॉवरफुल असे होमिओपॅथी उपचार पद्धतीत शिकवले जाते.
ते जानवं मोठं लांब असेल तर
ते जानवं मोठं लांब असेल तर लघुशंका करताना वाटेत येईल म्हणून कानाला अडकवलं की लघुशंका विसर्जनाचा मार्ग मोकळा होईल इतकं प्रॅक्टिकल कारण असणार.
मूत्रविसर्जन आणि जानवे …
मूत्रविसर्जन आणि जानवे …
अनेक काकाफॉचे पोटँशियल दडलेला विषय आहे मिलॉर्ड 😀
प्रतिभेचे झरे (pun intended) स्त्रवू द्या लोकहो … धागाकर्ते रागावणार नसतील तरच हां
अमितव +786
अमितव +786
म्हणून टाय गळ्यात बांधतात.. पुढे कंबरेला नाही
त्याचाही एखादा थेंब म्हणजे
त्याचाही एखादा थेंब म्हणजे गोमूत्राची ओरिजनल मात्रा एखाद्या स्पर्म एवढी पोटात जात असावी. >> अरे काय लिहितोस ते वाच कि रे एकदा
(No subject)
तुमच्या उपायामुळे अनेक
तुमच्या उपायामुळे अनेक नरपुंगव 'पृथ्वी' उलथवायचा प्रयत्न करु पाहतील.>>>>>>>