घडतं असंही..

Submitted by SharmilaR on 8 December, 2025 - 02:40

घडतं असंही..

“रोहीत .. अरे उठतोय नं..?” आईचा परत आवाज आला.

आता आई चिडलेली दिसतेय.. बरोबरच आहे तिचं.. सकाळी सकाळी घरातलं सगळं अन् स्वत:चं आवरून निघायचं म्हणजे.. तिला घाई होतेय. माझा डबा.. तिचा स्वत:चा डबा.. त्यात आता बाबां करता दुपारचं पूर्ण जेवण बनवून ठेवणं..

पण मला इच्छाच होत नाहीये उठायची... मी तसाच पडून राहिलो, डोक्यावर पांघरूण घेऊन.
मधे किती वेळ गेला माहित नाही.
“रोहित.. उठायचं असेल तर उठ.. डबा भरून ठेवलाय.. विसरू नकोस.. मी निघालेय आता ..” आईचा मोठ्याने आवाज आला. पाठोपाठ दार बंद झाल्याचा आवाज.

आई निघाली. म्हणजे सकाळचे सहा वाजलेत. मी अजूनही होतो त्याच पोझिशन मध्ये पडलोय.

“रोहित.. उठ.. आवर लवकर.. अजय सरांना वाट नको बघायला लावूस कोपऱ्यावर..” बेडरूमच्या दाराशी बाबांचा आवाज आला.

अजय सर..! आमचे गणिताचे सर. बरोबर आहे. आता उठावच लागेल. माझ्यामुळे त्यांना उशीर नको व्हायला. आजपर्यंत ना कधी गणिताची भीती वाटली ना कधी अजय सरांची. पण आता सगळच बदलत चाललंय. रोज पलिकडच्या कोपऱ्यावर येतात ते मला घ्यायला. अन् परततांना परत तिथेच सोडतात मला. आता ते निघून गेले, तर मला शाळेत सोडायला कोणीच नाही. मग मला घरी परत यावं लागेल.

खरतर मलाही नाहीच जायचं आहे शाळेत. नकोच वाटतं मला हल्ली शाळेत जायला. पण मी दिवसभर घरी असल्याचं कळलं, तर आई प्रचंड चिडेल. आधीच तिची चिडचिड वाढलीय हल्ली. मग तिचं आणी बाबांच भांडण होईल.. तसंही ते रोजच होतंय हल्ली.. पण आता त्यात माझी भर नको.
आईचं ‘समजून घेणं..’ बाकी मुलांकरता असतं. माझ्याकरता नाही. मी उठून माझं आवरायला सुरवात केली.

बाबा आहेत घरी.. म्हणजे आता ते रोज घरीच असतात. पण मला शाळेत सोडायला ते येणार नाहीत. शाळेच्या वाटेवर पण ते येणार नाहीत. नवीन नोकरी शोधताहेत म्हणे... मुळात आहे ती नोकरी किती छान होती.. सगळंच तर सुरळीत चालू होतं.. आणी सोडायचीच होती तर आधीच नवीन शोधायची नं..

आत्ता आत्ता पर्यंत तर मी बाबांबरोबरच जायचो शाळेत. आम्ही दोघंही एकाच शाळेत होतो. त्यामुळे आमचं जाणं येणं बरोबरच व्हायचं. बाबा कॉम्प्युटर टीचर होते शाळेत. बाबा टीचर म्हणून माझी काय वट होती तिथे..! मुलं तर शिस्तीत वागायचीच माझ्याशी पण इतर टीचर्स पण फारसे ओरडायचे नाहीत मला. तशी आणखींन काही टीचर्सची मुलं होती शाळेत. नाही म्हटलं तरी थोडी स्पेशल वागणूक मिळायचीच आम्हाला.

पण आता अचानकच सगळं बदललय. सगळे टीचर्स अचानकच माझ्याशी कोरडेपणाने वागायला लागलेत. म्हणजे मला कुणी रागावतं शिक्षा करतं.. असंही नाही. म्हणजे रागावणं नाही.. अन् माझ्याशी नीट बोलणं पण नाही. सरळ दुर्लक्ष! किंवा माझी नजर चुकवणं..

एकटे अजय सरच माझ्याशी शाळेत नेण्या आणण्या पुरता तरी संबंध ठेवतात. पण तेही आता पूर्वी सारखं.. नाही वागत. .. जेवढ्यास तेवढंच बोलतात. कोपऱ्यापर्यंत येतात, पण घरी येणं टाळतात. मी एक – दोनदा आग्रह केला तरी.., ‘आत्ता कामात आहे.. नंतर कधीतरी..’ म्हणाले. ते तर बाबांचे केवढे घनिष्ट मित्र होते शाळेतले.. म्हणूनच बहुतेक माझं नेणं आणणं करतात ते मोटरसायकल वर.

मी दिसताच वर्गातली कुजबुज थांबते. जणू काही माझ्याबद्दलच सगळे बोलत असावे.. पूर्वी ह्या पैकी किती तरी माझे मित्र जवळचे होते.. तनुष तर बरेचदा घरी पण यायचा माझ्या, होमवर्क.. प्रोजेक्ट करायला म्हणून.. आणी अभ्यासापेक्षा आमचं खेळणं अन् खिदळणंच जास्त व्हायचं.. कॉम्प्युटर गेम्स काय.. दोघातच क्रिकेट काय.. मज्जा यायची..

पण तनुष ने तर माझ्याशी बोलणं केव्हाच थांबवलंय. पूर्वी कसल्या गप्पा व्हायच्या आमच्या..! सिनेमाच्या स्टोरीज पण कसल्या रंगवून सांगायचा तो..! आता किती महीने झाले बरं ह्या गोष्टीला? शाळा सुरू होऊन जेमतेम महिना झाला होता.. म्हणजे जुलै पासून.. आता डिसेंबर संपत आलाय.
मी खूपदा प्रयत्न केला तनुषला विचारायचा.. तर तो काही नं बोलता सरळ निघून जायचा. मला खूप वाईट वाटलं. मी बाबांनाही सांगितल. तर ते म्हणाले ‘जाऊदे.. त्याच्याकडे लक्ष नको देऊस.. मला तर तसाही तो चांगला मुलगा वाटत नाही. बाताड्या आहे नुसता..! केव्हा एकाचे दोन करून सांगेल ह्याचा नेम नाही. त्याची संगत सोडलेलीच बरी.. ’

‘तनुषची संगत वाईट कधीपासून झाली?’ एवढे मूवीज बघून सुद्धा, चांगले मार्क्स मिळवायचा तो. आणि तो तर अभ्यासात पण माझ्यापेक्षा खूप हुशार होता. मला त्याची किती मदत व्हायची. पूर्वी कधी तर बाबा असं काही बोलले नव्हते त्याच्याबद्दल..

बाकी तनुषने संगळ्यांशीच बोलणं कमी केलं होतं म्हणा.. अगदीच गप्प गप्प रहायला लागला होता. आई म्हणते तसच असेल.. ‘काही मुलं लवकर वयात येतात..’ तेव्हा त्यांच्या वागण्यात बदल होतात म्हणे.. आई नर्स आहे. तिला कळतं सगळं.

तनुषचं पण तसंच झालं असेल का? पण मग बाकी कुणात काही बदल का झाले नाहीत..? गेम्स पिरीअड ला आम्ही सगळे खेळतो, तेव्हाही तो कुठे तरी एका ठिकाणी नुसताच बसून असतो . सर रागावले तर नाईलाजाने उठातो.. पण तेही खूपच जबरदस्ती केल्यासारखा..

सगळंच किती बदलत गेलं... आधी तनुषने माझ्याशी मैत्री तोडली. नंतर आता बाबांनी नोकरी अचानक सोडली. सगळ्या टीचर्सचं माझ्याशी वागणं बदललं. आणी आता इतर मुलंही माझ्यापासून लांब झालीत. शाळेत जायलाच नको वाटतय आता..
बाथरूम च्या दारावर थापा पडल्या.. जोर जोरात..

अरे बापरे! उशीर होतोय वाटतं. बाबा तोंडाने शक्यतो काहीच सांगणार नाहीत. शाळा.. उशीर.. असं काहीच नाही. एवढा कसला राग आहे त्यांचा शाळेवर..?
महिना झाला असेल.. एक दिवस तडकाफडकी तिथून मध्येच निघून आले.. मलाही नं सांगता.. त्या दिवशी पण शाळा सुटल्यावर मी आपला रोजच्या सारखा टिवल्या बावल्या करत पार्किंग मध्ये गेलो बाबांची वाट पहायला. सगळ्या स्कूल बसेस गेल्यावर ते यायचे तिथे...
बघतो तर काय अजय सर त्यांच्या मोटरसायकल जवळ उभे होते.

“रोहित.. आज माझ्या बरोबर चल. मी सोडतो तुला घरी.. बाबा गेलेत आधीच..” ते म्हणाले.
“कसं काय..? मला तर काहीच बोलले नाही..” मला आश्चर्यच वाटलं.
“अचानक ठरलं.. चल..”
त्या दिवशी माझ्याबरोबर अजय सर घरी आले. बाबा घरीच होते. चेहरा उतरलेला दिसत होता.

“काय झालं बाबा तुम्हाला? बरं नाही का?” मी विचारलं.
“हं.. तू आवर तुझं.”
नंतर बाबा आणी अजयसर बेडरूमचं दार बंद करून बराच वेळ हळू काहीतरी बोलत होते.
“थोडे दिवस राहिले आहे ह्या वर्षाचे.. मी त्याला नेत जाईन जाईन रोज..” जाता जाता अजय सर बाबांना म्हणाले. दोघेही गंभीर दिसत होते. बाबांनी त्यांना चहा पण नाही विचारला त्या दिवशी..

मी कोपऱ्यावर आलो तर अजय सर लांबून येतांना दिसले. काही नं बोलता ते माझ्याजवळ येऊंन थांबले. मी हळूच म्हटलेलं ‘गुडमॉर्निंग’ त्यांना त्यांच्या हेल्मेट मधून ऐकू गेलं नसावं.
मी शाळेच्या गेटजवळ उतरलो. लवकर आलेली मुलं ग्राउंड वर खेळत होती. मी वर्गाकडे चालायला लागलो. असेंब्ली ची वेळ होईपर्यंत वर्गातच बसलेलं बरं.. कॉरिडॉर मधे तनुष दिसला. त्याच्या बरोबर अवीसर पण होते. अगदी त्याच्या खांद्यावर हात ठेवून.
अवीसर सगळ्याच मुलांशी अगदी बरोबरीने वागायचे. स्कूल कौंसीलर होते ते. संगळ्यांशी हसून खेळून असायचे.. आणी मुख्य म्हणजे त्यांच्याशी बोलतांना, कुणाला मार्कस.. नं केलेलं होमवर्क… असं टेंशन नसायचं. अगदी सहजपणे बोलता यायचं त्यांचाशी.

तनुष ने माझ्याकडे लक्षच दिले नाही. अवीसरांनी मात्र बोलता बोलता माझ्याकडे थोडा हात हलवल्यासारखे केले. ते अगदी मित्रासारख्या त्याच्याशी गप्पा मारत होते. मला आणखींनच एकटं एकटं वाटलं. पूर्वी सतत मित्रांमधे वावरणारा मी आता अगदी एकटा होतो..
***

तनुषचं लक्ष समोरून येणाऱ्या रोहित कडे गेलं. आता नेहमीइतकी चीड.. भीती.. घृणा नाही वाटली, तरी शरीर जरा ताठरलच. तो प्रसंग पुन्हा आठवला.. अवी सरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

“तनुष.. एक लक्षात घे.. ह्या प्रकरणात जशी तुझी काहीच चूक नव्हती नं.. तशी त्याची पण काहीच चूक नव्हती, हे लक्षात घे.. ”
‘सर म्हणतात ते बरोबरच आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्याशी सतत बोलल्या मुळे मला आता जरा बरं वाटतंय. आधी कित्येक दिवस.. महीने.. तर मला काही बोलताच येत नव्हतं. धड रडायलाही येत नव्हतं. सतत काहीतरी गिळगिळीत ओंगळवाणं वाटत रहायचं. सगळ्या जगाचीच किळस वाटायला लागली होती. घरी सगळे विचारत होते.. मी घुम्या सारखा का बसतो..? अभ्यासात लक्ष का देत नाही..? हल्ली लक्ष असतं तरी कुठे..? सगळ्या टेस्टस मधे एवढी घसरण का होतेय..? पण मला काहीच करावसं वाटत नव्हतं. घराबाहेर पडायलाही नको वाटायचं. सतत भीती वाटत होती...’ कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी तनुष ला तो प्रसंग विसरता येत नव्हता.
***

त्यादिवशी संध्याकाळी तनुष नेहमीसारखाच रोहितकडे गेला होता.. थोडा अभ्यास.. थोडं खेळणं.. गप्पा करायला..
“अरे.. तू..? ये.. ये.. पण रोहित बाहेर गेलाय त्याच्या आईबरोबर..” दार उघडताच रोहितचे बाबा म्हणाले..
“ओ.. म्हणजे तसं आमचं भेटायचं नव्हतच ठरलं.. मीच आलो आपला.. ठीक आहे. उद्या येईन..” तनुष परत जायला वळला.
“अरे.. रोहित नसला म्हणून काय झालं..? मी आहे ना. तू ये आत.. नवीन कॉम्प्युटर गेम लोड केलाय..? खेळणार..?”
तनुषला कॉम्प्युटर गेम चा मोह आवरला नाही. शिवाय सर आहेतच की बरोबर खेळायला..
तो बेडरूममध्ये कॉम्प्युटर समोर बसला.
सरांनी गेम लावून दिला. आधी स्वत:च खेळायला सुरवात केली.. दोन लेवल पार केल्या त्यांनी. मग तनुशचे हातही शिवशिवू लागले.
बघता बघता तनुष खेळण्यात रमला.. त्याने तर दुसरी लेवल सहज पार केली. पार गुंगुंन गेला होता तो खेळण्यात.. मागे बेडरूमचं दार बंद करून सर त्याला एवढे चिकटून केव्हा उभे राहिले तेही कळलं नाही. त्याने तिसरी लेवल पार केली मात्र अन् आनंदाने ‘ये.. स्स..’ म्हणत दोन्ही हात हवेत उडवले.. सरांनी पटकन त्याचा हात हातात घेतला.. अन् स्वत:च्या पॅन्ट वर ठेवला..
“अजून खूप खूप गेम आहेत माझ्याकडे.. तू केव्हाही खेळू शकशील..” ते बोलत होते..
तनुषला मोठाच धक्का बसला.. त्याची जीभ जणू चिकटलेली होती.. तोंडातून आवाजही निघेना.. तो शक्तिहीन झाला होता..
सर त्याचा हात तसाच दाबत राहिले स्वत:वर..

तो कसा घरी आला त्या दिवशी.. पुढे काय झालं.. त्याला काहीच आठवत नव्हतं.. आठवत होतं ते गिळगिलेपण.. शिसारी..
‘माझंच काही चुकलं का..? मी का आत गेलो..? ते माझ्या एवढं जवळ उभे होते हे कसं नाही लक्षात आलं..? रोजच तर मी जात होतो तिथे.. स्कूल मध्ये तर ते संगळ्यांशी नीट वागतात.. कॉम्प्युटर लॅब मधे मुलांनी मस्ती केली तरी ते फार ओरडत नाही.. रोहितचे बाबा म्हणून तसे ते सगळ्यांनाच जवळचे वाटतात.. मी कुणाजवळ सांगू काही .. असं काही कधीतरी मुलींबाबत घडतं नं.. मग माझ्यावर विश्वास ठेवेल कुणी?
अवीसरांच्या हे लक्षात आलं. त्यांनीही कदाचित माझा घासरलेला टर्म रिजल्ट बघितला असेल. पण ते रागावत नाही. नीट समजावून घेतात. माझ्याशी खूप बोलायचे ते.. मग मी पण धीर धरून त्यांना सांगितलं सगळ... त्यांना सांगतांनाही भीती वाटतच होती. सगळे टीचर एकमेकांचे मित्र मैत्रिणी असतात... उलट मलाच काही म्हणणार तर नाही नं ते..? पण त्यांना कळलं बरोबर.. मला होत असलेला त्रास त्यांच्या पर्यंत पोहोचला नीट. मुख्य त्यांनी मला आधी बोलायला धीर दिला.. मी संगीतलं त्यावर विश्वास ठेवला.. मला दोष नाही दिला कुठेही..’ तनुष च्या मनात आलं.
त्याने अवीसरांना सांगितलं सगळं.. त्याच दिवशी पासून उदयसर.. रोहितचे बाबा एकदम दिसेनसे झाले स्कूल मधून.. नंतर इतरांच्या बोलण्यातून कळलं.. त्यांनी अचानक नोकरी सोडल्याचं....

अवीसर म्हणाले होते.. तुला जेव्हा बोलवास वाटेल तेव्हा बोल.. मी तर आहेच. पण ज्याच्याजवळ बोलावसं वाटेल त्याच्याजवळ बोल. तुझा वाईट अनुभव पुसून तर नाही टाकता येणार.. पण सतत बोलल्यामुले त्याची तीव्रता कमी होईल.. मनातल्या भावना बाहेत काढत राहिलास नं.. की तुलाच मोकळं मोकळं वाटायला लागेल.. मग मनात तेच तेच विचार नाही येणार तुझ्या..
मी बोललो.. घरी.. जवळच्या काही मित्रांजवळ.. अर्थात रोहित कडे मात्र मला अजूनही बघता येत नाही. चीड संताप दाटून येतोच तो प्रसंग आठवून.. अन् भीती सुद्धा. त्याची चूक नसली तरी.. उदयसर त्याचे वडील आहेत..’

“गुन्हेगाराला शिक्षा मिळाली आहे बेटा.. तुझ्या आसपासही तो माणूस येणार नाही. तू सुरक्षित आहेस आता ..चीयर अप! यू आर अ ब्रेव बॉय.. ” अवी सर सांगत होते..
तनुष ला खूप शांत शांत वाटलं.. त्याचं शरीर सैलावलं.. सकाळची प्रार्थना म्हणायला तो ग्राउंडकडे वळला. त्याचे मित्र होते तिथे त्याची वाट पहात..

*******************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय कथा.पोचली.
दोघांबद्दल वाईट वाटले..+1
लहान मुलांचं निरागस मन काय विचार करेल हे छान मांडलंय. अश्या गोष्टी कायमच्या मुलांच्या मनावर आघात करतात ."सतत बोलल्यामुले त्याची तीव्रता कमी होईल....." हे वाक्य फार महत्त्वाचं आहे या बाबतीत .फक्त अविसरांसारखे दिलासा देणारे शिक्षक हवेत आसपास.

छान कथा !
दोघांबद्दल वाईट वाटले.. +११

दोघांबद्दल वाईट वाटले.. +११
आयुष्यभर हे व्रण त्यांच्या मनावर राहतील...

परिणाम माहित असूनपण लोक असे कसे वागतात ?
हल्ली शिक्षकाने असे अत्याचार केलेल्या खूप बातम्या येतात

धन्यवाद ऋमेष, सिमरन, कुमार सर,धनवन्ती .

ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे.
शिवाय लिहितांना मनावर खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या' God of small things ' चा परिणाम होताच.