आईंचे तीर्थाटन - भाग ४: ग्रामीण जीवन

Submitted by वामन राव on 23 November, 2025 - 03:20

पूर्वीचा भाग: आईंचे तीर्थाटन - भाग ३: अंबाबाईचा उदो उदो

दीड वाजता पन्हाळ्यावरून निघालो. पुढे कणेरी मठाला जायचं होतं. सर्वांनाच भुका लागल्या होत्या. रस्त्यात एका ठिकाणी "हॉटेल सई शुद्ध शाकाहारी" असा बोर्ड वाचून थांबलो. एक कुटुंब नुकतंच बाहेर पडत होतं. त्यांना "जेवण कसं होतं?" असं विचारलं. "चांगलं होतं" असं उत्तर मिळाल्यावर आत शिरलो!

रेस्टॉरंट लहानच पण स्वच्छ दिसत होतं. तिथं मेथीचे पिठलं, अख्खा मसूर, तंदूर रोटी, तूप-भात, सोलकढी अशी कांदा-लसूण विरहित ऑर्डर दिली. जेवण अगदी रुचकर होतं. व्यवस्थित जेवण करून निघालो. कणेरी मठाला पोहोचेपर्यंत साडेतीन वाजले.‌

कणेरी मठाचे प्रवेश द्वार

कणेरी मठाचे नाव सिद्धगिरी महासंस्थान, असे आहे. सिद्धगिरी डोंगरावर हा कणेरी मठ आहे. खरंतर कणेरी मठ हे एक एक बहुआयामी पर्यटन-तीर्थाटन संकुल आहे. इथे उद्यान, ग्रामजीवन संग्रहालय, काड सिद्धेश्वर स्वामी मठ, प्राचीन शिवमंदिर अशी स्थळे आहेत.

त्यातील विशेषतः ग्रामजीवन संग्रहालय प्रेक्षणीय आहे. तेथील पूर्णाकृती पुतळे जुन्या काळातले जीवन खरंच जिवंत करतात. त्यांचे हावभाव, देहबोली, भावमुद्रा अगदी पाहण्यासारख्या आहेत. सर्व काही पाहायला एक दिवस पूर्ण लागेल. आमचे इथे दीड-दोन वाजेपर्यंत येण्याचे उद्दिष्ट होतं पण येईपर्यंत साडेतीन वाजून गेले. अर्थात ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन दिवसभर पायपीट करता आली असती का हा प्रश्न होताच. पण जेवढे पाहिले त्यावर समाधान वाटले.

इथले ग्रामीण प्रदर्शन पाहून दोन महिन्यांपूर्वी अशा प्रकारचे एक प्रदर्शन मॉडेल व्हिलेज, बेंगलोरला पाहिलं होतं त्याची आठवण झाली.

बेंगलोरच्या त्या प्रदर्शनाचा हा एक फोटो -

मॉडेल व्हिलेज, बेंगलोर

कणेरी मठात प्रवेशासाठी / पार्किंगसाठी ₹२०/- शुल्क आहे. यात उद्यान, मठ, मंदिर वगैरे निःशुल्क पाहता येतात. ग्रामजीवन संग्रहालय व इतर ठिकाणांसाठी ₹२००/- प्रवेश शुल्क आहे. वेळेच्या नियोजनाचा विचार करून आम्ही आधी ग्रामजीवन संग्रहालय पाहायचा निर्णय घेतला. तिकिटे घेऊन आत प्रवेश केला.

ग्रामजीवन संग्रहालयात तीन विभाग आहेत.

  1. प्राचीन भारत: (गुहेत) भारतीय समृद्ध प्राचीन इतिहासाचे आणि महान ऋषी-शास्त्रज्ञांच्या विविध कार्यांचे चित्रण
  2. ग्रामीण जीवन: (उघड्या जागेवर) मुघल आक्रमणापूर्वीच्या ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारे पुतळ्यांचे मोठे प्रदर्शन
  3. भारतातील उत्सव: (तिसरा भाग) महाराष्ट्र-कर्नाटकमधील विविध सण कसे साजरे केले जातात, याचे चित्रण

ग्रामजीवन संग्रहालयात सुरुवातीला एका गुहासदृश्य बोळकांडात (प्राचीन भारत विभाग) आपला प्रवेश होतो. त्यात वेगवेगळ्या पौराणिक व ऐतिहासिक प्रसंगाच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत.

भरतनाट्यम प्रशिक्षण -

भरतनाट्यम प्रशिक्षण

गुरुकुलात गुरु-शिष्य -

गुरुकुलात गुरु-शिष्य

शिकारीस निघालेले राम-लक्ष्मण -

शिकारीस निघालेले राम-लक्ष्मण

शबरीची बोरे -

शबरीची बोरे

यशोदा-श्रीकृष्ण -

यशोदा-श्रीकृष्ण

कार्यमग्न कलावंत! -

कार्यमग्न कलावंत

त्यानंतर पुढचा भाग ग्रामजीवन प्रदर्शनाचा आहे. इथे ग्रामीण अर्थव्यवस्था, समाजजीवन, सण-समारंभ, घरगुती प्रसंग इत्यादी दाखवणारी अगणित शिल्पे आहेत.

मिरवणुकीतला प्रचंड रथ -

मिरवणुकीतला प्रचंड रथ

मिरवणुकीतल्या रथासमोरचा जनसमुदाय -

मिरवणुकीतल्या रथासमोरचा जनसमुदाय

हत्ती, अंबारी, माणसे -

हत्ती, अंबारी, माणसे

आई मामींना सर्वत्र फिरणं शक्य नव्हतं. त्यांना एका ठिकाणी बसवून मी व श्रीधर उर्वरीत प्रदर्शन पाहायला निघालो.‌

सिंहाचे रौद्र रूप -

सिंहाचे रौद्र रूप

शंकरासमोरचा नंदी -

शंकरासमोरचा नंदी

शंकर व नंदी थोडे दुरून -

शंकर व नंदी  थोडे दुरून

डोंगरावरील गावाची प्रतिकृती -

डोंगरावरील गावाची प्रतिकृती

प्रदर्शन पाहून मग आई-मामींना घेऊन पुढे गेलो.

पुढे श्री काडसिद्धेश्वर महाराज यांचा मठ व अतिशय प्राचीन (बहुदा सातव्या शतकातील) हेमाडपंथी वास्तूशैलीचेचे शिव मंदिर आहे. शिवमंदिर अतिशय देखणे आहे.

मठ व मंदिराचा परिसर शांत आहे. अध्यात्मिक आहे, आत्मचिंतनास प्रेरित करणारा आहे. तिथे थोडावेळ बसून शांत बसून ध्यान केले.‌ परत जायला निघालो. तेवढ्यात एका शाळेच्या पाचवी-सातवी वर्गांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहलीला आलेले दिसले. त्यांची कोल्हापुरी हेलातली किलबिल ऐकून व एकूणच दंगामस्ती पाहून दिवसभराच्या फिरण्याचा शीणवटा गेला असे आई म्हणाली!

शिक्षकांच्या परवानगीने काढलेला फोटो -

शिक्षकांच्या परवानगीने काढलेला फोटो

साडेआठ वाजता कोल्हापुरात हॉटेलवर परतलो. हॉटेलजवळच असलेल्या लक्ष्मी भोजनालय येथे जेवण करून अंथरुणावर अंग टाकले. दुसऱ्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर जायचे होते त्याचा विचार करतानाच झोप केव्हा लागली हे कळलेही नाही.

टीपा:

  • कणेरी मठ हे स्वच्छ, पर्यटकप्रेमी ठिकाण आहे.
  • हे निवांत पाहण्याचे ठिकाण आहे; सकाळी लवकर निघावे.
  • इथे रेस्टो आहे, खाण्याची चांगली व्यवस्था आहे.
  • इथे राहण्याची व्यवस्थाही चांगली आहे.
  • कोल्हापुर व आजूबाजूचे रस्ते फार चांगले वाटले नाहीत, त्याची तयारी ठेवावी.
  • एकाच दिवसात करायचे असल्यास ज्योतिबा, पन्हाळा, कणेरी या क्रमाने पर्यटन केल्यास सोयीस्कर होईल.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users