
पूर्वीचा भाग: आईंचे तीर्थाटन - भाग २: जय भवानी
सकाळी सहाला उठलो. गाढ झोप झालेली होती. अगदी फ्रेश वाटत होतं. स्नान करून बाहेर पडायला सात वाजले. चहापाणी करून आठ वाजता श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात पोहोचलो. चौकशी केल्यावर दर्शनासाठी एक तास लागेल असे कळले. इथे ज्येष्ठ नागरिकांना दर्शनासाठी वेगळे व्यवस्था नाही असेही कळले. मग संस्थानाच्या कार्यालयात जाऊन ₹७५१/- भरून अभिषेकाची पावती घेतली त्यावर दहा मिनिटात दर्शन झाले.
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी हे आमचे कुलदैवत आहे. बालाजीचे दर्शन घेतल्यावर लगोलग कोल्हापूरला जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घ्यावे मग घरी परत येऊन मांवदं करावं अशी आमच्याकडे रीत आहे. तिरुपती बालाजीचे दर्शन वर्षातून किमान दोन वेळा तरी होतेच पण अनेक वर्षांपासून कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शनाचा योग काही आला नव्हता. तो आज आला. इतक्या वर्षांनी महालक्ष्मीचे दर्शन पुन्हा एकदा झाले. प्रसन्न वाटले.
देवीचे दर्शन, प्रदक्षिणा, देणगी, दानधर्म इ करून गाभाऱ्यातून बाहेर आलो.
एका चौथऱ्यावर एक अबोली रंगाची मांजर दबा धरून बसलेली होती!
बाहेर आल्यावर ज्येष्ठांनी आपापल्या सुनांसाठी हिरव्या बांगड्या व इतर खरेदी केली.
मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वारापासून मुख्य रस्त्यावर आलो. चहापाणी नाश्ता झाला.
माझा आवडता इडली-वडा -
मग कोल्हापूरचा प्रसिद्ध तलाव रंकाळ्याकडे निघालो. तिथे थोडे फोटोबिटो काढले.
लांबच्या कार प्रवासात माझे काही फंडे असतात. रोज सकाळी ओडोमीटरचा फोटो घेणे, टायरची हवा तपासणे हे त्यांपैकीच. टायरची हवा तपासण्याचं काम श्रीधरवर सोपवलेलं होतं ते त्यानं इथं रंकाळ्याला आल्यावर केलं. सगळ्या चाकांमधली हवा एक-एक पॉईंट कमी झाली होती तेवढी पुन्हा भरली.
कोल्हापुरातला पुढचा टप्पा होता ज्योतिबा मंदिर. ज्योतिबाला जाण्याच्या मार्गावर शिवाजी विद्यापीठाचा परिसर लागतो. त्याला वळसा घालून पुढे निघालो. साडेदहाला ज्योतिबाला पोहोचलो. नगरपालिकेचे प्रवेश शुल्क देऊन गावात प्रवेश केला. देवळाच्या प्रवेशद्वाराजवळच एका दुकानात हार फुले वगरे घेतले, तिथेच दुकानाला लागून गाडी पार्क केली व ज्योतिबाच्या दर्शनाला निघालो.
देवळात प्रवेश करताना उजव्या बाजूला हा शिलालेख दिसला.
शब्द-वाक्यरचने वरून कदाचित मागच्या शतकातला असेल असे वाटत होते पण त्याचे प्रयोजन कळले नाही. देवळाच्या आवारात सर्वत्र राणी कलरचा अबीर-गुलाल उधळलेला होता. भाविकांनी कपाळावरही लावलेला होता, आम्हीही लावला.
दहा मिनिटात दर्शन झालं. “जोतिबाच्या नावानं चांगभलं” असा जयजयकार करून बाहेर पडलो.
बासुंदी चहा हा एक प्रकार ज्योतिबाला आहे. माझे स्नेही, पर्यटनप्रेमी, रोमातील मायबोलीकर ऋस्वास यांनी त्याबद्धल मला सांगितलं होतं.
मी काही चहा-कॉफी-दूध घेत नाही मग सोबतच्यांसाठी कदम बासुंदी चहा या दुकानात शिरलो. तिथे त्यांनी तो बासुंदी चहा घेतला. त्यांना तो आवडला असे ते म्हणाले.
मंदिरातील पुजाऱ्यांनी दिलेले झेंडूचे हार गाडीला बांधले व गाडी काढली.
ज्योतिबानंतर पुढचा टप्पा होता किल्ले पन्हाळगड सर करणे! तिकडे निघालो. रस्त्यावर एका ठिकाणी एकपदरी झेंडूची फुले फुललेली दिसली.
पन्हाळ्याला पोहोचण्याआधी या ठिकाणी "श्री शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार असणाऱ्या पन्हाळगडावर आपले सहर्ष स्वागत" अशा फलकाने अशा फलकाने आपले स्वागत होते. .
किल्ल्यावर प्रवेश करताना या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा दिसतो. दोन्ही हातात तलवारी घेतलेली लढाईचे मुद्रा आहे. ते पाहून शाळेतील इतिहासाचे धडे आठवले.
पुढे एका बाजूला “किल्ले पन्हाळगड” असा देवनागरी लिपीतील फोटो शूटिंग पॉईंट तयार केलेला आहे.
त्या बाजूला गाड्यावर ठेवलेली उखळी तोफ आहे तिथे थोडं फोटोशूट करून किल्ल्यात प्रवेश केला.
पन्हाळ्यावर जाणं म्हणजे केवळ चार-दोन फोटो काढून इकडे तिकडे बघून परत येणे नव्हे; पन्हाळ्याची भेट म्हणजे जणू खरोखर इतिहास अनुभवणं! तथापि आधी लिहिल्याप्रमाणे हा तीर्थाटन कार्यक्रम आई व मामी या ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीने व मुख्यता त्यांच्यासाठी म्हणून आखलेला होता. त्यांची शरीर-मन-प्रकृती, चालण्याची, चढण्या-उतरण्याची क्षमता लक्षात घेऊन, शक्य तिथे कारने जाणे व किमान प्रमाणात पायी चालणे असे करत होतो. अधूनमधून रिमझिम पाऊस सुरु होताच. त्या हिशोबाने मग पन्हाळ्याची मुख्य ठिकाणे तेवढी पाहिली.
शिवा काशीद यांचा लढाईच्या आवेशातील पुतळा -
पन्हाळ गडावरील धान्याचे कोठार - अंबरखाना -
पन्हाळ गडावरून दिसणारा ऊन-सावलीचा खेळ -
पन्हाळ्यावरुन दिसणारे विहंगम दृश्य -
किल्ल्यावरील पाण्याचा बारव -
हे काय आहे बरे?
पन्हाळ्याच्या भेटीने #फीलिंग_ऐतिहासिक वाटत होते. अजूनही पाहण्यासाखे खूप काही होते पण वेळेचे नियोजनही महत्वाचे होते. दुपारचा एक वाजून गेला होता. अजून बराच पल्ला गाठायचा होता.
पुढचा टप्पा होता कणेरी मठ...
टीपा:
- कोल्हापूर अंबाबाई महालक्ष्मी मंदिराजवळ इथे महापालिकेचा वाहनतळ आहे. तिथे तशी ₹४०/- दराने गाडी ठेवता येते.
- वाहनतळाची वेळ सकाळी आठ ते रात्री नऊ अशी आहे.
- ताराबाई रोडवर चहा-फराळाच्या (विशेषतः थालीपीठे) गाड्या आहेत.
- ज्योतिबा गावात प्रवेश केल्यावर "इथे कार ठेवा, पुढे जागा नाही" असा हाकारे होतात, त्याकडे दुर्लक्ष करावे.
- ज्योतिबा मंदिराजका, अगदी प्रवेशद्वारापासून पन्नास मीटरपर्यंत कार नेता येते.
- तिथे दुकानात हार-फुले वगैरे खरेदी केल्यास कार पार्क करता येते.
- ज्यांना चालतो त्यांच्यासाठी जवळच बासुंदी चहा मिळतो.
- पन्हाळा पाहण्यासाठी पूर्ण दिवस लागू शकतो त्याप्रमाणे शक्यतो सकाळी लवकर निघण्याचे नियोजन करावे.
- विशेषतः ज्येष्ठांनी पिण्याचे पाणी तसेच मोठा रुमाल, छत्री, शाल वगैरे ऋतुमानाप्रमाणे सोबत ठेवावे.
- पन्हाळगडावर बहुतेक सर्व ठिकाणी कार नेता येते. अगदी थोडेसे पायी चालावे लागते.
- वॉशरूम वगैरे शक्यतो वर चढण्याआधी करून घ्यावे.
क्रमशः
वा… मस्त वर्णन…
वा… मस्त वर्णन…
टिपांसहीत छान माहिती आहे. खुप उपयोगी.
छान.
छान.
तुमचा लेख छान आहेच, पण अंबाबाई म्हटलं की माझा डोळ्यापुढे भाविक/ आस्तिक नसुनही सोज्वळ प्रसन्न रुप येतं. 
पण अंबाबाईचा उदो उदो लिहून, एक आणि तो ही अर्धवट फोटो! हे काही बरोबर नाही. अजुन फोटो टाका की!
गाभार्यात परवानगी नसली तरी मंदिराच्या आवारातील दीपमाळ, आणि एकुणच टुमदार पाषाणातलं मंदीर, परिसरात उंच वृक्ष, दर्शनाला आलेल्या आणि कट्ट्यावर टेकलेल्या बायाबापड्या, मागच्या दाराने बाहेर पडताना परत उंच दिंडी दरवाजा आणि बाहेर खारवलेले आवळे विकणारे. हे असं काही बघायला मिळेल असं म्हणून बीबी उघडलेला
धन्यवाद.
धन्यवाद.
हं, विशेषतः फोटोंबद्धल असं झालंय खरं हे मान्य आहे.
तुळजापूरला मंदिरात फोन नेले नव्हते, फोटो काढायचा प्रश्न नव्हता. आणि सुरुवातीला तरी या तीर्थाटनात फोटो काढण्याकडे मी फारसं लक्ष दिलं नव्हतं. अनेक फोटो श्रीधरनेच काढलेले आहेत.
त्याशिवाय, आई-मामी जरी धडधाकट असल्या तरी साधारणतः सगळीकडे, उदा. विरुपाक्ष मंदिर, हंपी येथे -
तिघांना प्रवेशद्वाराच्या शक्य तितक्या जवळ सोडून मी पार्किंगमध्ये गाडी ठेवायला गेलो. चप्पल स्टॅन्ड काटकोनात दीडशे मीटर दूर आहे. त्या दोघींच्या चपला श्रीधरने उचलून स्टँडवर ठेवल्या. मग ते तिघे आत गेले. तोवर मी कार ठेवून परत आलो. दर्शन झाल्यावर मी गाडी आणायला गेलो. तिथल्या सुरक्षा रक्षकांना "सोबत ज्येष्ठ स्त्रिया आहेत गाडी मध्ये नेऊ द्या" अशी विनंती करून गाडी शक्य तितक्या जवळ नेली. तोवर श्रीधरने दोघींच्या चपला स्टँडवरून उचलून आणून दोघींना घालायला दिल्या. मग ते तिघेजण चालत गाडीजवळ आले.
ऊन-पावसाचा खेळ शृंगेरी पर्यंत सुरु होताच. त्याप्रमाणे दोघींना छत्री धरून नेणे वगैरे कामे श्रीधरने व्यवस्थित केली.
थोडक्यात फोटोंकडे थोडे दुर्लक्ष झाले पण त्या दोघींची सोयसुविधा पाहणे हा मुख्य KPA होता तो साध्य झाला.
छानच लेख, नेटका आणि सर्व
छानच लेख, नेटका आणि सर्व माहिती देणारा.
ठीक आहे. काही हरकत नाही.
ठीक आहे. काही हरकत नाही. तुम्ही वर्णनातून पोहोचवत आहातच.
छान लिहीले आपण. फोटो पण छान
छान लिहीले आपण. फोटो पण छान आहेत.