आईंचे तीर्थाटन - भाग २: जय भवानी

Submitted by वामन राव on 18 November, 2025 - 11:28
श्री तुळजाभवानी

पूर्वीचा भाग: आईंचे तीर्थाटन - भाग १: प्रास्ताविक

तीर्थाटनाचा आज प्रारंभ करायचा होता. सकाळी चारला उठलो. सहाला निघायचे होते पण निघेपर्यंत पावणेसात झाले. घरून निघाल्यावर दहा मिनिटात हैदराबादच्या आउटर रिंगरोडवर पोहोचलो. १२० च्या गतीने जाताना डिवायडरवरची हिरव्या झाडांची पिवळी फुले वाऱ्यावर डोलताना दिसत होती. "प्रवासाच्या शुभेच्छा, पुन्हा भेटू" असेच जणू म्हणत होती!

लवकरच आउटर रिंगरोड एक्झिट ३ वरून हायवे ६५ ला लागलो. हैदराबाद-सोलापूर-पुणे हा रस्ता तेलंगाणाच्या सीमेपर्यंत अगदी चांगला आहे. शक्य तिथे ११०-११५-१२० असा वेग ठेवत मार्ग कापायला सुरुवात केली. सदाशिवपेठ ओलांडून पुढे आल्यावर रस्त्याच्या बाजूला एक बस स्टॉप दिसला तिथे न्याहरीचा ब्रेक घेतला.

मला सकाळी उठल्याबरोबर खायला लागतं. घरून निघताना सुद्धा अहोंनी गरमागरम पोळीचा एक रोल खायला दिला होताच! तरी आता पावणेनऊ वाजत आले होते. भूक लागली होती. अहोंनी खमंग बटाटा भाजी, पोळ्या, आंब्याचं लोणचं, कांदा, लिंबू, दिवाळी फराळाचे इतर पदार्थ असं पॅक करून दिलं होतं. आम्ही चौघांनी आपापल्या डिस्पोजेबल प्लेट्स वाढून घेतल्या.

मागची हिरवी-पिवळी भातशेती पुढचा वाहता हमरस्ता या दोन्हींमध्ये बसून न्याहारी खाऊन पुन्हा मार्गाला लागलो.

तुळजापूरला पोहोचायला साडेबारा झाले. पार्किंगमध्ये कार लावून मंदिरात आलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री तुळजाभवानीच्या चरणी दर्शनासाठी रुजू झालो.

इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी शीघ्र दर्शनाची विशेष व्यवस्था आहे (हे आम्हाला नंतर कळले). आम्ही सगळे दोनशे रुपयांची तिकीट काढून गेलो. त्या दर्शनाला एक तास लागला. आईंच्या तीर्थाटनातले पहिले दर्शन व्यवस्थित सुखरूप पार पडले.

दोन वर्षांपूर्वी कुटुंबासहित पुण्याहून येताना इथे एक दिवस थांबलो होतो. तेंव्हा संस्थान भक्त निवासात मुक्काम केला होता. त्यानंतर आज देवीचे दर्शन झाले.

दर्शन झाल्यानंतर पुढच्या मार्गाला लागलो.

तुळजापूरहून कोल्हापूरला जायचा रस्ता सोलापूरहून जातो. सोलापूरला पोहोचेपर्यंत चार वाजत आले होते. पोटातले कावळे ओरडत होते.

“जाऊ तिथे खाऊ” असा माझा स्वभाव असल्याने सोलापूरचे हॉटेल महावीर प्युअर व्हेज हे ठिकाण आधीच पाहून ठेवलेले होते.

हॉटेल महावीर प्युअर व्हेज

आमच्या मामी वैष्णव आहेत; त्यांना कांदा लसूण चालत नाही. त्यांच्यासाठी इथल्या जैन मेनूतून पालक पनीर, पोळी, भात असं मागवलं. आमच्यासाठी इथली प्रसिद्ध बाजार आमटी थाळी मागवली.‌

झणझणीत बाजार आमटी, मटकीची सुकी भाजी, ज्वारीच्या भाकरी, इंद्रायणी भात, सोलापूरचे विशेष भाजलेले शेंगदाणे, पापड, ताक, कांदा, लिंबू असा भरगच्च मेनू होता.

बाजार आमटी थाळी

भरपेट जेवून बडीशेप खाऊन बिल देऊन बाहेर पडलो व कोल्हापूरच्या मार्गाला लागलो. अधूनमधून तुरळक पाऊस पडत होता.

सांगलीला मायबोलीकर Sharadg म्हणजे प्रा श्री शरद गायकवाड यांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे भेटायचे होते. ठरल्याप्रमाणे त्यांना फोन केला व माझे लाइव लोकेशन शेअर केले.

या प्रवासात मायलेजची वगैरे चिंता न करता शक्य तेवढ्या वेगाने प्रवास करण्याचे उद्दिष्ट होते त्यात मग टाटा निक्सन पेट्रोल कारचा मायलेज १३-१४ च्या पुढे जात नाही. काल रात्री पेट्रोल टॅंकफुल केलेले होते. आता गाडी पेट्रोल भरण्याची वेळ आली होती.

मंगळवेढ्याजवळ एक ठिकाणी गाडी पुन्हा टँक फुल केली.

कोल्हापूरच्या आधी अंकली फाट्यावर प्रा श्री शरद गायकवाड यांची भेट झाली.

त्या संक्षिप्त भेटीत त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. सरांचा मनमोकळा स्वभाव खरंच भावला. कोल्हापूर व पुढे गोव्याला जाण्यासाठी योग्य रस्त्याचे त्यांनी चांगले मार्गदर्शन केले; त्याचा नंतरच्या प्रवासात उपयोग झाला.

त्यांनी मला सांगलीची प्रसिद्ध सेंद्रिय हळद व भडंग दिली मीही त्यांना हैदराबादची प्रसिद्ध कराची बेकरी फ्रूट बिस्किटे दिली. पुन्हा भेटण्याचे वचन देऊन त्यांचा निरोप घेतला व डावीकडे वळण घेऊन कोल्हापूरच्या मार्गाला लागलो.

महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापूर या दोन प्रसिद्ध जिल्ह्यांच्या मुख्यालयांना जोडणारा पन्नासेक किलोमीटरचा रस्ता अतिशय वाईट आहे. रस्त्यावर अनंत खाचखळगे, सध्याच्या पावसामुळे झालेला चिखल, हे सर्व टाळत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाक्या-चारचाक्या अशी सगळी एकूण परिस्थिती परिस्थिती आहे.‌

पश्चिम महाराष्ट्रातील बाकीच्या रस्त्यांच्या अवस्थाही काही फार चांगली आहे असे दिसले नाही.‌

कोल्हापुरात पोचायला दहा वाजले. जोरदार पाऊस पडून गेलेला दिसत होता तिथे मंदिराजवळच महालक्ष्मी भक्तनिवास या हॉटेलात दोन खोल्या बुक केल्या होत्या.त्या खोल्या अपेक्षेइतल्या चांगल्या नव्हत्या, जस्ट ठीकठाक होत्या. पण हे ठिकाण मंदिरापासून जवळ, अगदी पायी चालत जाण्यासारखे आहे ही एक मोठी जमेची बाजू होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते. आजच्या दिवसात ठरविलेले सगळे व्यवस्थित पार पडले होते. श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाने तीर्थाटनाची सुरुवात झाली होती. कोल्हापुरापर्यंतचा बराचसा प्रवासही चांगला झाला होता. किंचित शीण वाटत होता पण एकूण सगळे प्रसन्न वाटत होते.

जेवण करून साडेअकरा वाजता झोपी गेलो.‌

टीपा:

  • तुळजापूरला ₹५०/- शुल्काची इथे कार पार्किंग आहे. तिथून मंदिर ७०० मीटर आहे.
  • मंदिराच्या मुख्य प्रवेशदारासमोर पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था आहे.
  • (तिथून) मंदिराच्या exit पासून मुख्य रस्त्यापर्यंत (तसेच उलट मार्गे) मोफत इ-चारचाकी सेवा सर्वांसाठी उपलब्ध आहे.
  • मंदिरात ज्येष्ठ नागरिकांसाठी शीघ्र दर्शनाची विशेष व्यवस्था आहे.
  • त्याचप्रमाणे इतरांसाठी मोफत दर्शन, ₹२००/-, ₹५००/- VIP अशी दर्शनाची तिकिटे आहेत.
  • देवीला अभिषेक, पूजा, भोगी इ. करण्याची व्यवस्था आहे.
  • तुळजापुरात मुक्काम करायचा असेल तर इथे मंदिर संस्थानाचे भक्त निवास आहे.
  • आम्ही या संपूर्ण तीर्थाटनात दर्शन केलेल्या सर्वच मंदिरांत मोबाइल घेऊन जाता येतात.
  • पण विशेषतः गर्भगृहांत फोटो / विडिओ काढण्यावर बंधने आहेत.
  • विशेषतः मंदिरांत जाताना स्त्रियांनी छोट्या पर्समध्ये फोन, थोडे पैसे, आधार, फोन, अर्धा लिटर पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
  • प्रवासाला निघताना सर्वांनी आपापले आधार कायम सोबत ठेवावे.
  • या लेखाची lead image तुळजापूर संस्थानाच्या अधिकृत संस्थळावरून घेतली आहे.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!
>>>>> पण हे ठिकाण मंदिरापासून जवळ, अगदी पायी चालत जाण्यासारखे आहे ही एक मोठी जमेची बाजू होती.
खरे आहे.

छान लिहताय, तुमचे रेसिपीचे लिखाणच इतके देखणे आणी टापटीपिचे असते त्यामुळे हे सुद्धा तसेच नेटके वर्णन आहे.

मस्त वर्णन. कोल्हापुरला अंबाबाईच्या दर्शनाला गेल्या पाच वर्षात खुप वेळा जायचा योग आलाय आणि दर वेळेस वेगवेगळ्या अंतरावरुन दर्शन घडलेले आहे. गर्दी नसते तेव्हा जवळुन दर्शन आणि जितकी जास्त गर्दी तितके लांबुन दर्शन Happy

आता ते मम्दिर आतुन निट दिसतच नाही. इतके बॅरिकेड्स, गेट आणि लोक असतात. ४० वर्षांपुर्वी एकही गेट नसतानाचे सुंदर मंदिर अद्याप लक्षात आहे.

तुळजापुरच्या देवीचेही दर्शन घेतलेय पण आम्ही गेलो तेव्हा नेमकी श्रावणातली एकादशी होती. खुपच गर्दी Sad हे १५ वर्षांपुर्वीचे चित्र. आता तर बघायला नकोच.

बाजार आमटी ही सोलापुरची खासियत आहे. चव मस्त आहे पण माझ्यासारख्य मिळमिळित जेवणार्‍याच्या डोळ्यातुन व नाकातुन पाण्याच्या धारा सोडल्यशिवाय पोटात जात नाही. बाजरीच्या भाकरीचा चुरा करुन तो आमटीत कालवुन खायचा. बाजुला शिर्‍याची बशी हवीच. नायतर मेलोच Happy Happy एक घास हा आणि एक घास तो. इतकी चविष्ट की मी इतका त्रास होत असतानाही मागुन मागुन खाल्लीय Happy

कोल्हापुर देवळाच्या आजुबाजुला हॉटेलांची गर्दी आहे. ६००-७००-८०० त राती झोपायची व पहाटे आंघोळीची सोय इतके मिळते. संध्याकाळी का सकाळी एक ट्रेन दक्षिणेकडुन येते. ती आली की सगळ्या रुम्स फुल्ल्ल्ल्ल…. तिरुपती वरुन थेट अंबाबाई असा देवदर्शनाचा नवा प्रघात पडलाय गेल्या १५-२० वर्षात.

देवळाच्या परिसरातही खायची मस्त सोय आहे. सगळ्या छान स्वच्छ स्टीलच्या गाड्या रांगेत लावलेल्या असतात. थालिपिठे मस्त मिळतात, अगदी समोर थापुन भाजुन. मी गेले की खातेच Happy

शॉपिंगसाठीची दुकाने तर भरपुर - कपडे दागिने देवाचे सामान. अगदी हवे तसे, हव्या त्या रेंजमध्ये. सर्व प्रकारचे खोटे दागिने ढिगानी मिळतात. सकाळी बायका टोपलीत काचेच्या हिरव्या बांगड्या घेऊन विकायला बसतात. हळदी कुंकू बांगड्या खुप फेमस. मीही घेतलेल्या. अजुनही हातात आहेत, वरचे हळदीकुंकू उडाले. गावी हातात काचेच्या हिरव्या बांगड्या घालणे मस्ट आहे. मी आयुष्यात कधी वापरल्या नव्हत्या. गेली पाच वर्षे वापरतेय Happy

छान लिहिताय. तुळजापूरला गेले नाही कधी, पण कोल्हापूरला दोनतीन वेळा गेले आहे. आवडलं होतं तेव्हा अंबाबाईचं मंदिर आणि एकूण सगळा तो परिसर. परत जायला हवं असं वाटलं तुमचं वाचून.
पुभाप्र!

छान लिहिलं आहे . नेहमीप्रमाणे नीटस ... एवढे सगळे लक्षात ठेवण्यासाठी रोज डायरी त नोंदी केल्या का ?

सर्व प्रतिसादकांचे आभार.

@ साधना, अनुभव छान लिहिलेत.

सोलापूरची बाजार आमटी खायचा प्लॅन वर्षभरापासून होता तो यावेळी पूर्ण झाला!

तिरुपती वरुन थेट अंबाबाई... ‌

>>> याबद्दल पुढच्या भागात येईलच.

एवढे सगळे लक्षात ठेवण्यासाठी रोज डायरी त नोंदी केल्या का ?

नोंदी चार चार तासांनी तुम्ही करत असणार!

>>> हं.‌ वही-पेन ठेवली होती.‌ रोज रात्री झोपण्याआधी दिवसभराचे इतिवृत्त लिहायचा मानस होता.‌‌ पण काही ना काही कारणामुळे जमत नव्हतं. (कंटाळा, दुसरं काय!)

म्हणून दुसऱ्या दिवशीपासून शक्य तेव्हा, जेंव्हाचं तेंव्हा व्हाट्सॲप वर speech to text मेसेजेस लिहून ठेवत होतो. उदा -

गोकर्णहुन मुर्डेश्वरला जाताना शरावती नदी लागते, तिचं पात्र अतिशय विशाल आहे, बघायला सुंदर आहे. हे ठिकाण कासारकोट गावाच्या आधी आहे.

असं.‌

पाहिलेल्या, खालेल्या, फिरलेल्या सगळ्याच गोष्टी नंतर लक्षात राहत नाहीत. ‌त्यासाठी शक्य तिथे ठिकाणांचे, फलकांचे, पावत्या-बिले इत्यादींचे (कॅमेऱ्यात लोकेशन एनेबल करून) फोटो काढणे, त्याचप्रमाणे केलेला खर्च तात्काळ कटाक्षाने व्हाट्सॲप वर लिहीणे यामधून नंतर ट्रॅक करून लिहायला सोपे गेले.

यातल्या अनेक गोष्टींमध्ये (माझा नेहमीचा सहपर्यटक) श्रीधर ची खूप मदत झाली. ‌

टिपा आवडल्या

>>> रेसिपी लिहिण्याची सवय, दुसरं काय! Lol