स्त्री आणि तो प्रवास

Submitted by Jawale chetan on 15 November, 2025 - 23:44
BUS

प्रवास करताना बसमध्ये एक स्त्री तिच्या तंद्रीत असल्यासारखी येऊन बसते. गळ्यात दागिना, नकली पण अतिशय नाजूक सोनेरी साखळी घातलेली. कान, नाक, गळ्यात, मनगटावर, हातात, बोटांमध्ये कोणताही दागिना नाही. खांद्यावर लटकवलेली बारीकशी पर्स हातात, कोणत्याच बांगड्या नाहीत. लांब काळेभोर केस, नीटनेटकी बांधलेली वेणी, सुडोल बांधा, पांढरे चांगले मापात शिवलेले, कोपरापर्यंत असणारे ब्लाऊज, हलकी राखाडी-निळ्या रंगाची साडी घातलेली. साडीवर बारीक किनारी व्यतिरिक्त कोणतीही नक्षी नव्हती.
तिची बसमध्ये बसत असतानाची बॉडी लँग्वेज एकूणच अतिशय सवयीची वाटत होती, जणू रोज हीच हालचाल करावी लागत असल्यासारखी. बसल्यापासून ती खिडकीतून बाहेर, थोडे मागे वळून बस स्टँडच्या प्रवेशद्वाराकडे वारंवार बघत होती.
मी बऱ्याच दिवसांनी दादरला जाण्यासाठी आज बसमध्ये येऊन बसलो होतो. मोठ्या महानगराकडे निघालेल्या या तरुण स्त्रीला आज अवलोकनासाठी निवडले. तसा नेहमीच मी या सर्व प्रवाशांपासून अलिप्त असतो आणि त्या प्रत्येकाची निरखून एक स्टोरी तयार करण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्या त्यात जरा सुंदर, ठळक लक्ष वेधणारी स्त्री हीच माझ्या स्टोरीसाठी मी निवडत असतो.
आज ही स्त्री, रेखीव मोठे डोळे, सुडोल बांधा, तरुणपणा, पाहताच माझ्यातील लेखक जागृत झाला.
बसमध्ये गर्दी नसल्याने, आणि त्यातल्या त्यात ही सुंदर रेखीव आकर्षक स्त्री असल्याने, मी तिला अवलोकनासाठी निवडले. तिच्या शेजारच्या रांगेतून एक सीट मागे बसलो, जेणेकरून तिला नीट न्याहाळता येईल. गॉगल घातल्याने मी कोणाकडे बघतो आहे याचा कोणालाच अंदाज येत नव्हता, त्यामुळे मी पूर्णपणे दुर्लक्षित राहिलो.
ती लग्न झालेली, की लग्न होऊन आता एकटी, की लग्नाचे वय होऊन अजूनही एकटी आहे, याचा अंदाज बांधण्यासाठी तिला न्याहाळू लागलो. आजच्या जगात शेरलॉक होम्स असता तर त्याला हे कोडे उलगडणे कठीण झाले असते! आता लोक साचेबंद आयुष्य जगत नाहीत. गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणून विवाहित समजण्याचे दिवस गेलेत.
बसमध्ये येऊन आता दहा मिनिटे झाली होती. ती कमालीची स्थिर होती. चेहरा शांत होता. फक्त अधूनमधून खिडकीतून मागे वळून कोणाची तरी वाट पाहत असल्यासारखी बघत होती. तिने कंडक्टर, ड्रायव्हर किंवा इतर प्रवाशांची दखल घेतलेली दिसत नव्हती.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिच्या हातात मोबाईल किंवा घड्याळ नव्हते. कानात ईयरफोन्स नव्हते. आजच्या तरुण स्त्रीकडे हे सगळे नसल्याने माझी उत्सुकता वाढली. ती विवाहित-अविवाहित यापेक्षा तिच्याकडे मोबाईल नाही, हेच आश्चर्यकारक वाटू लागले.
ती कुठेतरी नोकरी करत असेल का? सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबईला जाणारी स्त्री नक्कीच नोकरीसाठी जात नसावी. मग ही कोण? हिची कहाणी काय असावी? असा अंदाज बांधत मी छानपैकी बसलो आणि मनात म्हटलं, आजचा प्रवास एक चांगली स्टोरी देणार!
थोड्या वेळाने ती खिडकीतून मागे वळून आनंदाने कोणालातरी स्माईल दिली आणि हात हलवून ओळख दिली. पुढच्या क्षणाला सरळ बघत पुन्हा शांत झाली. जणू ज्याची ती वाट पाहत होती, तो आला आणि तिने त्याला आपली जागा दाखवून दिली असावी. मी उत्सुकतेने वाट बघू लागलो की आता तो व्यक्ती बसमध्ये येईल, तिच्या शेजारी बसेल, गप्पा सुरू होतील, आणि मग माझी ही स्टोरी साधारण बनेल.
पण बसमध्ये चढणारे दोन-तीन म्हातारे सोडून कोणी विशेष आले नाही. कंडक्टरने घंटी वाजवली आणि बस सुटली. ती स्त्री मात्र शांतपणे बसलीच होती. तिच्या चेहऱ्यावर किंवा बॉडी लँग्वेजमध्ये उत्सुकता, आतुरता, काहीच नव्हतं. कदाचित कोणी येणारच नसावे.
बस स्टँड बाहेर पडली. दोन प्रवासी आत आले, पण ते मागे जाऊन बसले. त्या स्त्रीच्या ओळखीचे कोणीच नव्हते. तीही शांत बसली होती. खरी उत्सुकता आता माझीच वाढली.
तिकीट घेताना तिने कुलाबाचे तिकीट घेतले आणि पर्समधून पाचशेची नोट दिली. मी उत्सुकतेने तिची पर्स बघत होतो — पण मोबाईल दिसला नाही. का कोणास ठाऊक, तिच्याकडे मोबाईल नाही यामुळे मी फारच अस्वस्थ झालो.
आजच्या जगात एवढ्या वयाच्या स्त्रीकडे मोबाईल नसणे म्हणजे अपवादच. मला वाटलं, काय काम करत असेल हि, तिला मोबाईलची गरजच नसावी? आजकाल पॅन कार्ड असो, आधार कार्ड असो, तरी मोबाईल नंबर असतोच.
गाडी हायवेवर लागली, मला झोप लागली, पुन्हा जाग आली तेव्हा गाडी ट्रॅफिकमध्ये होती. खिडकीतून वारा येईल या आशेने बाहेर मान काढली. अचानक त्या स्त्रीची आठवण झाली. मी वळून पाहिलं — ती अजूनही तितक्याच शांतपणे बसली होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा, झोप, ग्लानी काहीच नव्हती.
मला एकदा तर वाटलं — तिच्या शेजारी जाऊन बसावं आणि विचारावं, "बाई, तुम्ही काय करता? तुमच्याकडे मोबाईल का नाही?"
पण मी शांत राहिलो. आणि त्याक्षणी मला जाणवलं की खरी स्टोरी आता तयार होतेय — मोबाईलविरहित जीवन जगणारी ही स्त्रीच माझी गोष्ट आहे.
शहापूरला बस थांबली. प्रवासी पटकन खाली उतरले. मीही चहा घेऊन आलो. ती स्त्री मात्र बसमध्येच बसली होती, कुठेच हलली नाही.
ती इतकी अलिप्त राहूनही एवढी शांतपणे कशी काय बसली असेल? काही क्षण वाटलं, ही मतिमंद तर नाही ना? शॉकमध्ये असेल का? औषधांच्या परिणामाने बधिर झाली असेल का?
पण नाही, तिच्या डोळ्यांत लख्खपणा होता, चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. मग मी तिच्याकडे लक्ष देणं कमी केलं आणि प्रवासातील इतर गोष्टी पाहू लागलो.
गाडी विविध थांब्यावर थांबत होती, विक्रेते येत होते. मी पाहिलं, कोणीही त्या स्त्रीशी बोललं नाही, तिनंही कोणाकडे पाहिलं नाही. जणू ती बसमध्ये असूनही कुणाच्याच नजरेत भरत नव्हती.
ती खरंच आहे का, की केवळ मला तिचा भास होतोय असा विचार डोक्यात आला. जाऊन हात लावून पाहावा का? लगेच स्वतःला थांबवलं.
गाडी सायन रोडवर पोहोचली. ती स्त्री शांतपणे उठली, खाली उतरली. तिची चाल तितकीच स्थिर होती. गर्दीतही ती पूर्ण शांतपणे मिसळली, जणू गर्दीने तिच्यासाठी जागा राखून ठेवली आहे.
बस सिग्नलवर थांबली. ती अजूनही गर्दीत स्पष्ट दिसत होती. एक क्षण वाटलं, जावं का तिच्या मागे? कदाचित एखादा नवीन अनुभव मिळेल.
मी घाईघाईनं गर्दीतून तिचा माग काढत होतो. काहीतरी विचित्र जडत्व जाणवत होतं — लोक सरळ चालत होते, पण माझ्यासाठी जणू हवा घट्ट झाली होती, पाय ओढले जात होते. त्या स्त्रीचा बांधा अजूनही दोन-तीन फुटांवर दिसत होता, पण तिला गाठणं अशक्यप्राय झालं होतं.
गर्दीतली लोकं... अचानक जाणवलं, कोणीच तिच्याकडे बघत नव्हतं. जणू ती अस्तित्वातच नाही. मी डोळे चोळून घेतले. पुन्हा नजर टाकली, ती शांत, स्थिर पावलांनी पुढे जात होती. तिचे केस वाऱ्याशिवाय थोडे हलत होते, पाय रस्त्याला टेकत नव्हते.
माझं हृदय जोरात धडधडू लागलं. थोडं अजून जवळ गेलो आणि... थांबलो.
ती एका हॉस्पिटलच्या गेटवर आली. मोठं फलक होतं रेहजा हॉस्पिटल – पोस्ट मॉर्टेम विभाग. ती थेट आत शिरली.
कुणीच तिला थांबवलं नाही. कुणी बघितलंही नाही.
मी थिजल्यासारखा तिथेच थांबलो. एक सुरक्षा रक्षक माझ्याकडे बघून म्हणाला,
"कुठं बघतोयस साहेब? आत कोणी गेलं नाही. गेट तर बंद आहे."
मी सुन्न झालो. मी शपथ घ्यायला तयार होतो की काही सेकंदांपूर्वी ती स्त्री माझ्या डोळ्यांसमोर या गेटमधून आत गेली होती.
हातापायांना थरकाप सुटला. बसमधले विक्रेते, प्रवासी, सगळ्यांनी तिची दखल का घेतली नाही, हे आता समजलं... ती कधीच जिवंत नव्हती.
त्या क्षणी थंड वाऱ्याची झुळूक अंगावरून गेली. खांद्यावर कुणीतरी बर्फासारखी थंड बोटं ठेवली. मागे वळून पाहिलं तर...
तीच होती.
त्याच शांत चेहऱ्यानं.
त्या लख्ख, मोठ्या डोळ्यांनी सरळ माझ्याकडे एकटक बघत.
ती हलक्या आवाजात पुटपुटली —
"माझ्या मागे का आलास?"
मी बोलायचा प्रयत्न केला, पण शब्द अडखळले,
"तू… तू कोण आहेस…?"
ती क्षणभर शांत राहिली. मग हळूहळू तिचे ओठ विकृत हास्यात वळले.
"मी तेच आहे… जे तुला बघायचं नव्हतं.
बसमध्ये फक्त तूच मला पाहिलंस. बाकी कुणालाच मी दिसले नाही. कारण मी त्यांच्यासाठी अस्तित्वातच नाही. पण तू… तू माझ्याकडे खूप वेळ बघत राहिलास… खूप खोलवर."
तिचा आवाज आता मानवी वाटेना. जणू एकाच वेळी अनेक आवाज बोलत होते — बाईचा, मुलाचा, म्हाताऱ्याचा… एक गोंगाट.
माझं हृदय फाटून बाहेर येईल असं वाटत होतं.
ती पुढे सरकली. तिच्या डोळ्यांत काळोख पसरत होता, खोल गर्दीत, ज्यात कुणीही कायमचं हरवून जाईल. मी मागे सरकलो, पण पाय जड झाले होते.
"तुला कळलं का," ती म्हणाली, "का माझ्याकडे मोबाईल नव्हता? का कोणी माझ्याशी बोललं नाही? कारण मी जिवंत नाही. मी त्या बसमधून कधीच उतरत नाही… पण आज तू मला उतरवलंस."
अचानक माझ्या कानाजवळ तिचा थंड श्वास आला.
"आता तुला माझ्यासोबत यावंच लागेल…"
तेवढ्यात माझ्या पाठीमागे हॉर्न वाजला. मी दचकून डोळे मिटले.
क्षणभरात आवाज थांबला.
डोळे उघडले तर… मी परत बसमध्ये होतो.
पण संपूर्ण बस रिकामी होती. ड्रायव्हर नाही, कंडक्टर नाही, प्रवासी नाही. फक्त ती स्त्री माझ्या शेजारी बसली होती.
ती शांतपणे खिडकीबाहेर बघत होती. आणि खिडकीतून दिसत होतं...,
बस सरळ श्मशानभूमीकडे जात होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! छान धक्के दिलेत.
मोबाईल विरहीत जीवन हे स्वप्नं प्रत्यक्षात आणायचं आहे. ते खूप छान हायलाईट केलं आहे.

मस्त
काय गरज होती, शांतपणे आपल्या मोबाईलमध्ये बघायचं सोडून.... Proud

वा

लेखनशैली आवडली.
सर्व प्रेडिक्टेबल असुनही मजा आली कथा वाचायला

बाप रे! मला नाही अंदाज आला.