कोणे एके काळी विमानतळावर ड्युटी फ्री शॉप दिसलं की दारू गोळा करणे ही एक “ड्युटी” मानून, मी ती अगदी निष्ठेनं पार पाडत असे. नाकासमोर चालण्याचा स्वभाव, नाकाला इतर कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू न देता नेमक्या दुकानात घेऊन जाई. हव्या त्या बाटल्या मिळाल्या की त्या ड्युटी मधून एकदाचं फ्री झाल्यासारखं वाटायचं. जरा वेळापूर्वी मुक्त असलेले दोनही कर, करमुक्त दुकानातून घेतलेल्या जड बाटल्या सावरण्यात गुंतले की इतर जाणिवा मुक्त होत ज्यात सर्वत्र दरवळणाऱ्या सुगंधाचीही एक असे. त्यावेळी सुगंध या विषयाचा फारसा “गंध” नव्हता त्यामुळं पन्नास साठ डॉलर्सला उंची स्कॉचची हातभर बाटली मिळत असताना त्याच्या दुप्पट महाग आणि बोटभर मापाची परफ्यूमची बाटली कोण करंटा घेईल असाच विचार मनात यायचा. एकदाच कधीतरी केल्विन क्लाईन कंपनीचा “सी-के फ्री” परफ्यूम घेताना त्यातल्या सुगंधापेक्षा, ठळकपणे दिसणाऱ्या “फ्री” या शब्दानंच माझं लक्ष आधी वेधून घेतलं होतं. अर्थात, “व्हॉट्स इन द नेम” असं शेक्सपिअर आधीच सांगून गेला आहे, म्हणून केवळ नावातच फ्री असलेली ती बाटली माझ्या खिशातल्या तब्बल अठरा पौडांना “खो देऊन” त्या रिकाम्या झालेल्या जागेत बसली.
खरं तर अठरा पौंड ही रक्कम या सुगंधी विश्वात घेऊन जाणाऱ्या जिन्याच्या अगदी तळाच्या पायऱ्यांवरची. जसजसं या विषयात खोलवर नाक खुपसलं तसतशी त्याची व्याप्ती कळू लागली. लहानपणी दिवाळीतला मोती किंवा म्हैसूर चंदन साबण, सुगंधी उटणं, उदबत्त्या किंवा अगदीच चैन म्हणायची झाली तर हिरव्या रंगाचं केवड्याचं अत्तर, एवढाच काय तो विकतच्या सुगंधांशी संबंध. अत्तराची ती लहानशी कुपी देखील रावणाच्या नाभीतल्या अमृताच्या कुपीसारखी अक्षय होती. दिवाळीत अभ्यंगस्नानासाठी, ब्राम्हमुहूर्तावर “उठणं” जिवावर येत असल्यामुळे, “उटणं” तेव्हा फार जवळीक साधू शकलं नाही पण फटाक्यांचा आणि फराळाचा घमघमाट मात्र नाक मुठीत धरून उठवायचा. कधीतरी लग्न-समारंभात स्वागताला शिंपडलेल्या फुकटच्या गुलाबपाण्याचंही अप्रूप वाटायचं. शाळा-अभ्यासात फारशी गोडी नसली तरी जून महिन्यातला पहिल्या पावसानंतरचा मृद्गंध आणि नव्या-कोऱ्या वह्या-पुस्तकांचा सुगंध शाळेत जाण्यासाठी जरा प्रोत्साहन द्यायचा.
पुढे नोकरी-धंद्याला लागल्यावर अंगाला लावायच्या बाटलीऐवजी, “अंगी लागेल” अशा बाटलीशी सलगी केल्यामुळे तेव्हाही कधी सुगंध-संबंध आला नाही (तसंही फक्त “बाटलीशीच” संबंध आल्यामुळे “अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया” असंही कुणी म्हणायचा प्रश्न नव्हता). चाकरीच्या सुरवातीच्या काळात मुंबई लोकल किंवा बेस्ट मधून प्रवास करताना कुठल्याही सुगंधी घमघमाटापेक्षा “घाम-घमाटाचाच” परिचय जास्त झाला. बाजूच्या सीटवरचा, “रॉट्टन…साला!!!” असं ऐकवत चारचौघात आपली बेअब्रू करेल अशी भीती नव्हती कारण त्या बस मधले सगळेच “बेस्ट-स्मेलिंग” असायचे. पण कधीतरी नाक असं कापलं जाऊ नये म्हणून नाक तयार करायचं ठरवलं आणि त्यातनंच “फ्रॅग्रँटिका” या संकेतस्थळाचा वास लागला. सुगंधांचा हा जणू ज्ञानकोशच. विविध देशांतले शेकडो सुगंध, त्यांची निर्मिती करणारी नावाजलेली कसबी नाकं, फुला-पानांच्या, फळांच्या, मसाल्यांच्या, खाद्यपदार्थांच्या, पेयांच्या अशा नानाविध “नोट्स” आणि त्यांच्याशी निगडित आजवर घडवलेले सुगंध बघून वाटलं, अरेच्च्या! एवढ्या मोठया सुगंधी साम्राज्याचा दरवळ आजवर आपल्यापर्यंत कसा बरं पोहोचला नव्हता!
आत्तापर्यंत अंगाला लावायचा सुगंध म्हटला की माझ्या कल्पनेची उडी, फुलं-पानं किंवा फार तर चंदन- कस्तुरी यांच्या पल्याड कधी गेली नव्हती. पूर्वी एकदा, गुलाबाच्या पाकळ्या, दूध, केशर, बदाम वगैरे घातलेल्या चविष्ट, पौष्टिक, सुवासिक पेयाची जाहिरात जेव्हा साबणाची निघाली तेव्हा डोक्याला हात लावला होता. वाटलं, याचा दिग्दर्शक नक्कीच धक्कातंत्राचा बादशाह आल्फ्रेड हिचकॉक असणार. आंबा, अननस, सफरचंद, अंजीर, रास्पबेरी, चेरी ही सगळी फळफळावळ फक्त खाणेंद्रीयावरच नाही तर घ्राणेंद्रियावरही इतकी हुकूमत गाजवू शकते हे आता नव्यानंच कळत होतं. काळी-लाल मिरी, वेलची, जायफळ, केशर, जिरं, धने, दालचिनी या मसाल्यांचा इतक्या खुबीनं वापर करून बनवलेल्या सुगंधांना मसालेदार म्हणावं की “मासलेदार”, असा प्रश्न पडला. काजू, बदाम, पिस्ता, चेस्टनट, हेझलनट आदी “नट” मंडळी गंध-मंचावरही इतक्या उत्तम प्रकारे भूमिका वठवत असतील हेही माहीत नव्हतं. या सगळ्यांचा सुगंधांत एवढ्या कौशल्यानं वापर करणं म्हणजे काही खाण्याची गोष्ट नव्हे.
सुगंध निर्मितीमध्ये पुलंच्या पानवाल्यांसारखे पट्टीचे (नीश) आणि गादीचे (डिझायनर) सुगंध निर्माते बघायला मिळतात. फॅशन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या डियोर, शनेल, लुई विटॉन, गुची, प्रादा, अर्मानी, वर्साची या आणि अशा अनेक कंपन्या, आपल्या इतर प्रसाधनांबरोबर अतिशय उच्च प्रतीचे सुगंधही बनवतात. या क्षेत्रातल्या कंपन्यांनी सुगंधही बनवणं यात तसं नवल नाही. पण मर्सिडीज, फेरारी, जॅग्वर, बेंटली अशा नावाजलेल्या कार कंपन्यांचे सुगंध बघून आधी अचंबाच वाटला. आपली ब्रँड व्हॅल्यू चाचपायला आणि एका नव्या बाजारपेठेचा वास घ्यायला या मोठ्या कंपन्या असेही प्रयोग करतात आणि त्यासाठी सुगंधाच्या किंमतीही बऱ्यापैकी आवाक्यात ठेवतात (त्यामुळेच आज माझ्या ताफ्यात “बेंटली” आहे! असं मी नाक वर करून म्हणू शकतो). दागिने घडवण्यात कुशल असलेल्या काटीए, शोपाँ, बुशेरॉन या कंपन्या तेवढीच कलाकुसर सुगंध घडवतांनाही दाखवतात. काचेच्या शोभिवंत वस्तू बनवणारी सुप्रसिद्ध फ्रेंच कंपनी, ललिक, इतरांसाठी सुगंधाच्या आकर्षक बाटल्या बनवता बनवता स्वतःचेही तितकेच आकर्षक सुगंध बनवून विकते. पण साधारणतः “मासेसला” आवडतील असेच “वासेस” बनवण्याकडे बहुतांश डिझाईनर्सचा कल असतो.
त्याऊलट पट्टीचे सुगंध निर्माते मात्र फक्त आणि फक्त सुगंधांशीच निष्ठा ठेऊन असतात. हे निपुण कलावंत एखादा जोडधंदा म्हणून सुगंध बनवत नाहीत. अर्थातच, जीव (आणि त्याबरोबर बरंच काही काही) ओतून घडवलेल्या काही मिलिलीटरच्या त्या सुगंधी द्रव्यासाठी बरंच “द्रव्य” खर्च करायची तयारी ठेवावी लागते. तेव्हा हे सुगंध परवडण्यासाठी मला कुठलासा जोडधंदा करता येईल का, याचा मी हल्ली विचार करू लागलोय.
शॉपिंगचा कंटाळा असला तरी मोठ्या मॉल्स मध्ये तऱ्हतऱ्हेचे सुगंध मोफत हुंगायला मिळत असल्यामुळं तिथे मात्र आनंदानं जाऊ लागलो. शेल्फवरची बाटली काढून कागदाच्या पातळ पट्टीवर फवारा मारायचा, अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी तल्लीन होऊन सुगंधाचा आनंद घ्यायचा आणि दोन तीन प्रकारचे फवारे हुंगून झाले की कॉफी बीन्सच्या वाटीत नाक बुडवायचं असं चालू झालं. मात्र मॉल्स मधल्या सुगंधांच्या छापील किंमती बघितल्या की ते अर्धोन्मिलित डोळे विस्फारायचे. सुगंध फवारलेल्या कागदी पट्ट्या मग खिशात कोंबल्या जायच्या आणि घरातलं कपाट काही दिवस सुगंधी व्हायचं. कागदाच्या पट्टीवर सुगंधाचा “सेंट पर्सेंट” अंदाज येत नाही, तसंच प्रत्येकाची स्किन केमेस्ट्री सुद्धा वेगळी असते म्हणे. मग कधी कोपराच्या तर कधी मनगटाच्या आतल्या बाजूला नाडीवर फवारा मारून सुगंधाची “नाडी-परीक्षा” होत असे. कधीतरी काउंटरमागच्या "सुवासिनींपुढे", सुगंधाचं आपलं ज्ञान पाजळून जरा भाव खाल्ला की, “सर, देन यू मस्ट ट्राय धिस वन!” असं ऐकत बोटभराची एक-दोन मोफत सॅम्पल्स खिशात पडत. सुगंधी फूल नाही, निदान फुलाची (फुकटातली) पाकळी तरी खिशात पडली म्हणून समाधानानं घरी यायचो.
अखेर नाकाच्या दोन छिद्रांची हौस पुरवायला, खिशाला बरीच छिद्र पाडून झाल्यावर, दुकानातल्या झकपक शोकेसमधले थोडे सुगंध माझ्या जुनाट कपाटात शिरायला कसेबसे तयार झाले. आता एवढे महागडे फवारे भसाभस उडवूनही तासा-दोन तासांनी स्वतःलाच सुगंध येणं बंद झालं की वाटायचं तोतया बाटली तर नाही ना मिळाली! पण मग “नोज ब्लाइंडनेस” बद्दल कळल्यावर “डोळे उघडले”. अगदीच तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर हे म्हणजे “ओलफॅक्टरी ऍडाप्टेशन” किंवा गंध संवेदनशीलता कमी होणे. आपल्या शरीराची ही एक सुरक्षा यंत्रणा. सतत येणाऱ्या एकाच वासाला थोडं बाजूला सारून आपल्या नाकाला आजूबाजूच्या इतर, आणि मुख्य म्हणजे एखाद्या धोकादायक वासाचीही पूर्वसूचना देणं हे त्याचं काम. कस्तुरी मृगाला स्वतःच्याच बेंबीतल्या कस्तुरीचा थांगपत्ता नसतो अशी उपमा वापरून त्याला लेखक आणि कवींनी उगाचच बदनाम केलंय. तो बिचारा सतत स्वतःचीच कस्तुरी हुंगून असाच “नोज ब्लाईंड” होत असणार.
“नोज-स्टॅल्जिक” करण्यातही सुगंध पटाईत असतात कारण आठवणींच्या डिपार्टमेंटमधल्या फाईली काढण्यात, घ्राणेंद्रिय इतर सर्व इंद्रियांच्या पुढे असतं. आजही उन्हाळ्यात माठामध्ये टाकायला वाळ्याची पुरचुंडी आणली की भर्रकन तो सुवास तीन चार दशकं मागं भूतकाळात घेऊन जातो. लहानपणी, उन्हाळ्याच्या सुटीत, वाळ्याच्या ताट्या असलेले मोठमोठाले डेझर्ट कूलर्स लावून, कॉमिक्सच्या गादीवर, आरामात वाचत, लोळत पडलोय असा आभासी देखावा उभा करण्याची ताकद या सुगंधात आहे.
आमच्या आजोबांना तपकीर ओढायची सवय होती तर तिर्थरूपांना अधूमधून तंबाखूची तल्लफ यायची. गम्मत म्हणून शिंक काढायला ओढलेल्या चिमूटभर तपकिरीचा किंवा तंबाखूच्या पुडीला येणारा तो वास नाकात कायमचा घर करून गेला. कॉलेजात असतानाही मित्रांजवळच्या सिगरेटपेक्षा त्या पाकिटाच्या सुगंधाचंच मला जास्त आकर्षण होतं. नंतर गाल चोळत बसावं लागेल या भीतीपोटी तळव्यावर तंबाखू चोळायचं किंवा विडी-काडीचं व्यसन जरी लागलं नाही तरी तळव्याच्या विरुद्ध बाजूला सुगंध चोळायचं मात्र लागलंच. आता असे सुगंध सगळ्यांना आवडतीलच असं नाही. यावरच मित्राशी गप्पा मारतांना अचानक त्याच्या टीनएजर पोरीनं, “बट अंकल व्हाय डू यू वॉन्ट टू स्मेल लाईक टबॅको?” असा भाबडा प्रश्न केला. त्यावर काय उत्तर द्यावं सुचेना म्हणून तंबाखूचा बार लाऊन बसल्यासारखा गप्प बसलो.
"पेय-अपेय" पानाचा दांडगा व्यासंग असल्यामुळे तसे सुगंध हुंगण्याची आवडही आपसूकच निर्माण झाली. सुगंधातून चहा-कॉफीचा आनंद मिळवतांना टॅनिन-कॅफिन वगैरेंची फालतू पर्वा करायची गरज उरत नाही. एखाद्या स्कॉचचा, “नोज - पॅलेट - आफ्टरटेस्ट” अशा तीन टप्प्यात आस्वाद घेण्यात तरबेज असाल तर, सुगंधातल्या “टॉप - मिडल - बेस नोट्स” समजणं आणि त्यांची मजा लुटणं सोपं जातं. एखाद्या गारठलेल्या संध्याकाळी, फायरप्लेसजवळ कोनियाकचा ग्लास घेऊन बसण्याचा उबदार अनुभव हे सुगंध एका फवाऱ्यात मिळवून देतात तर कधी उन्हानं जीव हैराण झालेला असताना जीन टॉनिक वा मॉस्को म्यूलसारख्या थंडगार कॉकटेल्सची तरतरी आणतात. दारूचा वास वाईट म्हणून नाकं मुरडणाऱ्यांच्या माना, हे सुगंध हुंगले की त्या नाकांसकट डोलतात.
पण सुगंधात वापरले जाणारे काही घटक ऐकले तर मात्र नाक खरंच मुरडावंसं वाटेल. हायरेसियमचा मल (घुशीसारखा प्राणी) किंवा सिव्हेट(उदमांजर), बेव्हर या प्राण्यांच्या मलद्वाराजवळ असलेल्या सुगंधी ग्रंथींबद्दल कळलं तेव्हा “परि-मल” या शब्दाची व्याख्या नव्यानं कळली (पुण्यात कसबा पेठेतल्या अत्तराच्या दुकानात इत्र की “शिशी” घेताना हे आठवून गंमत वाटली). स्टर्जन माशाच्या अंड्यांपासून काढलेला केविअर असो वा एका प्रकारच्या झुडपावर चरणाऱ्या बकऱ्यांच्या मांड्या घासून मिळवलेला लॅबडॅनम असो, ऐकायला दोन्हीही जरा चमत्कारिकच. “ब्लॅक गोल्ड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “उद” बद्दलही अशीच उद्-बोधक माहिती मिळाली. ॲगरवूड झाडाच्या जखमेवर एका प्रकारच्या बुरशीने हल्ला केला तर प्रतिकार म्हणून झाडातून जो एक सुगंधी स्त्राव निघतो त्या राळेपासून उद मिळतं. सुगंधी जगतातलं अतिशय महागडं, अरबांना अतिशय प्रिय असलेलं हे प्रकरण, ऐश्वर्याचं आणि प्रतिष्ठेचं प्रतिक मानलं जातं. पण या सर्वांवर कडी केली ती “ॲम्बरग्री”नं. साध्या सरळ शब्दांत सांगायचं तर स्पर्म व्हेल माशानं केलेली ही ओकारी. बराच काळ उन्हाचे, खाऱ्या लाटांचे तडाखे सोसल्यावर या टाकाऊ गोष्टीला सोन्यापेक्षाही जास्त भाव मिळतो.
हे पुरुषांचे सुगंध आणि हे स्त्रियांचे, असला फुकाचा विधिनिषेध पूर्वीच्या काळी प्रचलित नव्हता. पण कालौघात, स्त्रियांच्या नाजूक व्यक्तिमत्वाला साजेसे असे फुलांचे, सौम्य गोडसर सुगंध हे फेमिनाइन तर त्याउलट स्मोकी, स्पायसी, लेदरी दमदार सुगंध म्हणजे मर्दानी असं परिमाणच ठरून गेलं. त्यासाठी तसं ब्रॅण्डिंग आणि जाहिरातबाजी करून दिग्गज कंपन्यांनी विनाकारण सुगंध शौकिनांच्या नाकी नऊ आणले पण त्याचबरोबर “गंध-निरपेक्षांनी” असल्या लिंगभेदाला आव्हान देणारे युनिसेक्स सुगंध बाजारात आणून त्यावरही कुरघोडी केली. लिंगभेदच कशाला, कुठल्या ऋतूत, कुठल्या प्रहरी आणि कुठल्या प्रसंगी कोणता सुगंध लावायचा याचंही “शास्त्र” ठरवल्या गेलं. ऑफिसमध्ये आब राखून असणारे मंद सुगंध, तर पार्ट्या झोडताना इतरांना आपल्या उपस्थितीची दखल घ्यायला लावणारे तीव्र सुगंध. सण-समारंभात संस्कृतीची आठवण करून देणारे सात्विक, पारंपरिक सुगंध तर एखाद्या रोमँटिक डेटवर बिलगायला प्रवृत्त करणारे गोड, गॉरमाँड सुगंध.
आजमितीस सुगंधनिर्मितीत पाश्चात्य देशांचा दबदबा असला तरी ही कला आपल्याला फार पूर्वीपासून अवगत होती. पण ढोबळपणे फरक करायचा झाला तर आपल्या खाद्य परंपरेसारखीच सुगंधी परंपरासुद्धा जरा “तेलकट” आहे. मध्यपूर्वेतही “तेल” काढण्यातलं प्राविण्य आणि इस्लाम मध्ये दारू “हराम” असणं यातून “इतिर”ची उत्पत्ती झाली असावी. तर त्याउलट पाश्चात्यांना असलेलं “अपेय-प्रेम” त्यांच्या परफ्यूम मधूनही प्रकट होतं.
इतिहासात सुगंधाच्या आकर्षणाचे दाखले जागोजागी मिळतात. इजिप्तमध्ये क्लिओपात्रा, फ्रान्समध्ये नेपोलियन आणि चौदावे लुई किंवा आपल्याकडचे राजा कृष्णदेवराय सुगंधांचे भलतेच शौकीन होते. क्लिओपात्राच्या आगमनाआधी तिचा परफ्यूम वर्दी देत असे, युद्धाआधी डोकं शांत ठेवण्यासाठी नेपोलियन त्याचा आवडता कोलन अंगभर चोपडत असे. किंग लुईंच्या काळात सुगंध निर्मितीनं फ्रान्समध्ये एक कला म्हणून पात्रता मिळवली. राजा कृष्णदेवराय तर चार पावलं पुढेच होते कारण त्यांच्या काळात सुगंधांसाठी एक स्वतंत्र सरकारी विभागच होता म्हणे.
अगदी पुराणकाळात डोकावलं तरीही बरीच उदाहरणं दिसतील. महामृत्युंजय मंत्रातल्या "सुगन्धिं पुष्टिवर्धनम्" या शिवस्तुतीनंच सुगंधाचं महत्त्व अधोरेखित होतं. समुद्रमंथनातून निघालेला दैवी सुगंधाचा पारिजातक, इंद्रानं मोठ्या कौतुकानं स्वर्गातल्या वाटीकेत ठेवला होता. पुढे बायकोच्या हट्टापायी इंद्राशी भांडून श्रीकृष्णानं तो द्वारकेत आणला आणि आपल्या अंगणात लावला. महाभारतात “मत्स्यगंधा” सत्यवतीच्या आर्जवामुळे पाराशर मुनींनी तिला “मस्कगंधा” केल्याची गोष्ट तर सगळ्यांना ठाऊक असेलच. कित्येक योजनं दुरूवरुन येणाऱ्या त्या “योजनगंधेच्या” मादक सुगंधावर मोहित होऊन राजा शांतनू जर तिच्या प्रेमात पडलाच नसता तर “एवढं महाभारत” घडलंच नसतं असं माझं प्रांजळ मत आहे.
एवढ्या विभूती जर इतक्या “सेंटी-मेंटल” होत्या, तर मी तरी माझ्या नाकाला काय अन् कसा वेसण घालणार. कितीही संयम ठेवला तरीही नाकावर टिच्चून कधीतरी एखादी नवी सुगंधी बाटली माझ्या कपाटात घुसतेच. पूर्वी स्कॉचच्या बाटल्यांसाठी घराची शोभा वाढवेल असा काचेचा चकाचक मिनीबार बनवावा असं मनांत होतं पण घरात अजून “शोभा” नको म्हणून तो बेत रद्द केला आणि त्या बाटल्या कपाटाच्या एका कोपऱ्यात सरकवल्या. बोल बोल म्हणता कपाटाच्या मोठ्या भागाचा आता या जुन्या-नव्या बाटल्यांनी ताबा घेतलाय. सुदैवानं सुगंधाची बाटली उघडायला काळ वेळेचं बंधन नसल्यानं “काय आज सकाळी सकाळीच का?” अशा टोमण्याची धास्ती नसते. खुशाल कुठलीही बाटली उघडावी आणि त्या सुगंधी लाटेवर स्वार होऊन कुठल्यातरी सफरीवर निघावं. कधी समुद्रावरचा खारा वारा अंगावर घ्यावा, कधी फळांच्या बागेत जाऊन करंडीभर फळं गोळा करावीत, कधी एखाद्या हॉटेलच्या आलिशान लाउंजमध्ये बसावं, तर कधी नुकताच पाऊस पडून गेलेल्या पाईन वृक्षांच्या गर्द रानात शिरावं. क्षणांत कुठंही पोहचवणाऱ्या "टेलिपोर्टेशनचा" शोध अजून तरी लागायचांय पण तोवर कुठलाही लांबलचक प्रवास न घडवता हे सुवास मला हव्या त्या स्थळ-काळात अगदी अलगद "टेलिपोर्ट" करत राहतील.
……काही चित्रं आंतरजालावरून तर काही “AI” च्या कृपेनं लाभली आहेत……
………………………………....@@@@@@................................................













खूप छान लेख. रोचक व मनोरंजक
खूप छान लेख. रोचक व मनोरंजक
सुंदर आहे लेख. लिहिण्याची
सुंदर आहे लेख. लिहिण्याची शैली आवडली !
सुंदर लिहिले आहे. काही चित्रे
सुंदर लिहिले आहे. काही चित्रे बघूनच त्या-त्या सुगंधांचा दरवळ पोहोचला.
गंधप्रेमींशी पटकन गोत्र जुळतं 🙂
Wine and Vine मधे काहीतरी सुंदर कनेक्ट आहे हे नेहेमीच वाटत आले आहे. तुम्ही त्यातला “सुगंधाचा” कनेक्ट फार सुंदर establish केलाय. जियो !
खाणेंद्रिय- घ्राणेंद्रिय हे rhyming सुद्धा brilliant. 👌
टबॅकोचा नाही आवडत पण स्कॉचच्या सुवासाबद्दल “nosey” आहे मीसुद्धा, विशेषतः Glen कुटुंबातल्या. रंग आणि गंधाची जुगलबंदी ❤
वाह वाह लेख म्हणजे मैफिल आहे
वाह वाह
लेख म्हणजे मैफिल आहे
रोचक माहितीपूर्ण लेख.
माहितीपूर्ण रोचक लेख.
वा! खुपच छान लेखन केले आहे.
वा! खुपच छान लेखन केले आहे.
सुंदर लेख
सुंदर लेख
माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख.
माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख. पंचेस आणि शब्दखेळ आवडले
धनश्री, sneha1, झकासराव,
धनश्री, sneha1, झकासराव, सिमरन, निलेश 81, Sparkle, सरनौबत - धन्यवाद
अनिंद्य - "गंधप्रेमींशी पटकन गोत्र जुळतं" - अगदी खरंय.
ग्लेन छानच आहेत पण Islay कुळातल्या हृदयाच्या जरा जास्त जवळ आहेत. टबॅको चे काही सुगंध अवश्य ट्राय करून बघा, जसे बर्बेरी लंडन किंवा मन्सेरा रेड टबॅको.
… मन्सेरा रेड टबॅको.…
… मन्सेरा रेड टबॅको.…
भारी दिसतेय प्रकरण! Evenings / गार वाऱ्यातल्या outdoor celebrations साठी सुटेबल वाटतोय.
सुगंधकुंडली काढली तर अशी दिसतेय:
Top notes are Cinnamon, Agarwood (Oud), Saffron, Incense, Nutmeg, Green Apple and White Pear;
middle notes are Patchouli and Jasmine;
base notes are Tobacco, Madagascar Vanilla, Amber, Sandalwood, Guaiac Wood, Haitian Vetiver and White Musk.
न आवडण्यासारखं काहीच नाही ! ❤
किल्लेदार,
किल्लेदार,
फारच सुगंधी झाला आहे लेख. खूप आवडला.
तुमची लिखाणाची शैली आवडतेच.
तुमचे काही स्वानुभव वाचल्यावर तर अगदी अगदी झाले.
बरीच नवीन माहिती मिळाली.
AI च्या कृपेने लाभलेली चित्रे मस्त आहेत.
छानच लिहिलंय! आवडला लेख.
छानच लिहिलंय! आवडला लेख.