कॅट कॉन्सलर

Submitted by चैतन्य रासकर on 27 October, 2025 - 03:52

"कॅट कॉन्सलर?"
"म्हणजे?"
"कॅट म्हणजे मांजर आणि कॉन्सलर म्हणजे आपले ते.." मी ए.आय. ला विचारत म्हणालो
"ते मांजरींची कॉन्सलिंग करतात" नीरव त्याची मांजर कुरवाळत म्हणाला.
मांजराच कॉन्सलिंग?
बाशिंग, लगीन, मग कॉन्सलिंग हे माहित होतं. मांजराचं कॉन्सलिंग??
माझ्या छातीत एकदम धसिंग झालं.

"काही काय?" आता इरा धसिंगली.
"अगं हा मुका जीव... तिला ही भावना असतात.. मन असतं" आता नीरवची मांजर त्याला कुरवाळीत होती.
मुका जीव सुद्धा म्याव करून हो म्हणाला. मी नीरवच्या मांजरीकडे निरखून बघत म्हणालो. “मांजरी डिप्रेस होतात?”
“त्या दिवशी…” नीरव पार भरल्या डोळ्यांनी म्हणाला “भरल्या दुधाच्या ताटावरून उठून गेली”
मांजरींला ताट भरून दूध? तिच्या वाट्याला वाट्या नाहीत?

“तिला नसेल व्हायचं ताटा खालचं मांजर” इरा म्हणाली
व्हॉट इज ताटाखालचं मांजर? असं मी ए.आय. ला विचारणार, तेवढ्यात नीरव म्हणाला "ही हिमालयीन मांजर आहे"
"ही कळसूबाईची मांजर सुद्धा वाटत नाहीये" इरा म्हणाली.
हे ऐकून नीरवच्या मांजरीने खाली उडी मारून निषेध नोंदवला. ती पळाली.
"थांब बिल्लमा, थांब!" असं म्हणत नीरव तिच्या मागे धावला, ही बिल्ली फारच वल्ली निघाली.

पण मी काय म्हणतो, हिमालयातल्या मांजरी इथे का इमिग्रेट होतात? हिमालयात नोकऱ्या नाहीयेत का? इकडच्या भूमीपुत्री मांजरींच्या नोकऱ्या का घेत आहेत? असे विचार मनात धावून गेले.

नीरव बिल्लमाला परत घेऊन आला आणि म्हणाला.“पण इरा... मुलींना तर आवडतात मांजरी”
“म्हणजे मी काय मुलगी नाहीये?” इरा असं मुलासारखं म्हणाली. "आवडतात मला मांजरी" असं म्हणून इराने बिल्लमाला कवेत घेतलं. तसं बिल्लमाने नख मारले. "आऊच!" इरा हात ओढून घेत म्हणाली. बिल्लमा "म्याऊऊऊ" करत परत तिच्या डब्यात जाऊन बसली.

नीरवने तो स्टीलचा डबा बॅलन्स केला. इरा त्या डब्याकडे बघत म्हणाली "तुझ्या मांजरीला डबा का लागतो?"
"अगं हिची परात हरवलीय"
हिची परात? हे मी खरंच ऐकलं का? का माझे कान बसलेत? मांजरीला परात?
"काय करते ही परातीत? अभ्यंग स्नान?"
"नाही... अगं तिला बास्केट आवडतं नाही. डब्यामध्ये छान बसते."
वाह. आज काय आहे डब्यात? मांजर.

अशी ती आपली दुपारची वेळ, पाऊस बिऊस, विजा बिजा, तो असतो ना तो आपला सोसायट्याचा वारा, काय ते चक्रीवादळ, ते सगळं होलसेल मध्ये आलं होतं. पुराचं पाणी बघावं म्हणून दुर्बीण घेऊन बाहेर पडलो होतो. पाऊस इतका होता की माझी पँट पंचा झाली. पार पंचक्रोशीचं पाणी चाखायला मिळालं. पुरातला गाळ बघत असताना, छत्री उडून गेली, कार्टी होपलेस उडाली. छत्री मागे धावायचं माझं मन होतं, पण वय नव्हतं. तिशीतले आजार आता पंचविशीत चिकटू पाहत होते. गुडघेदुखीमुळे चालता येत नव्हते, म्हणून पुराच्या पाण्यातून वाहत निघालो.
कसं ए.. चालत येत नसेल तर वहावं.

छत्रीसाठी नीरवला फोन केला. त्याने मला थेट कॅट कॉन्सलरकडे बोलावलं. वाहन मिळत नव्हतं म्हणून परत एकदा वाहत निघालो. नीरवने इराला फोन केला."मी आकडा टाकून लाईट चोरतेय" इराने आखडू रिप्लाय केला. पण इरा भाव खात आली. तिने प्लॅस्टिकचं काहीतरी घातलं होतं, तो कधी काळी रेनकोट असावा. नीरव सांगू लागला “बिल्लमा आधी हसत खेळत शी करायची”
“हसत खेळत शी?” इरा इमॅजिन करत म्हणाली.
“हो ना.. पण आता हसत ही नाही, खेळत नाही आणि कधी कधी शी करते” नीरव बिल्लमाला रेनकोट घालत म्हणाला.

कॉन्सलर बाहेर गर्दी होती. आज कॉन्सलिंगवर मान्सून डिस्काउंट देत असतील. पाऊस होता, चिखल आणि त्यात उड्या मारणाऱ्या मांजरी. बहुतांश सगळ्याच मांजरी डिप्रेशन किंवा अटीट्युड मध्ये आल्या होत्या. काही मांजर माता, पिलांची नखं कापत होत्या. काही काहींना मसाज देत होत्या. काही स्वतःचे तर काही मांजरींचे केस विंचरत होत्या. एक मांजर स्वेटरमध्ये दिसली, ते स्वेटर तिच्या मांजर आजीने विणलं असावं. त्यावर लिव्ह, लव्ह अँड म्याव असं लिहिलं होतं. एक मांजर ब्लँकेटखालून फक्त शेपटी हलवत होती, लाजत असेल किंवा सोशल एन्झायटी किंवा दोन्ही एकत्र. एक मांजर वाफ घेताना दिसली. तिला बहुतेक सर्दी झाली असावी.

आम्ही कॉन्सलिंगच्या लाईन मध्ये लागलो, आमच्या पुढची मांजर काजळ घालून आली होती. का तिचे डोळे तसेच होते? मला अजिबातच माहित नाही. त्या मांजरीची मालकीण जाड आहे का मांजर बारीक आहे? यावर आम्ही अतीव चर्चा केली. एवढी मोठी बाई मांजरीवर चुकून बसली असेल. या असा बसण्याचा ट्रॉमा मांजरीने घेतला असावा, म्हणून हे इथे आले असावेत.

“ही तर तुझ्या गर्लफ्रेंडची मांजर आहे ना?” इराने नीरवला विचारले
“हो..”
“ती का नाही आली?”
“ती पुरातले प्राणी वाचवायला गेलीय” नीरव चेहऱ्यावरचं पाणी पुसत म्हणाला. “मागच्या वेळी तिने बैल वाचवला होता”
"कशावरून तो बैल सुसायडल नव्हता" इराने आयडल प्रश्न विचारला.
"पण बैल का सुसायडल होईल?" मी विचारले.
“बैल खूप काम करतो, नसेल त्याला वर्क लाईफ बॅलन्स” इराने बॅलन्स मुद्दा मांडला.
नीरव आता डोळे पुसत म्हणाला “पण नंतर तो बैल तिच्याकडे बघून हसला.”
बैल हसला? बैल हसतो?? कसं? स्मितहास्य का खदाखदा?
“हा बैल फारच सैल निघाला” इरा म्हणाली.

“हे बघ.. मला मरायचंय....मरायचंय असं कसं बैल हंबरेल?” नीरव म्हणाला
“बैल हंबरतो?” मी आणि इरा हंबरलो
"आय मिन मग बैल कसा व्यक्त होतो?"
बैल हसतो? हंबरतो? बैल व्यक्त होतो? बैल आहे का सोशल मीडिया?
“हे बघ इरा… बैलाला वर्क लाईफ बॅलन्स नसतो, म्हणून तो सुसायडल होऊ शकतो” मग नीरव पुढे म्हणाला “मग मांजर का नाही सुसायडल होऊ शकतं?”

बैलाला ही बैल कॉन्सलर पाहिजे. किती दिवस फक्त बैल पोळा करून पानं पुसणार? बैल इतकं काम करतो, पण बैल हा राष्ट्रीय प्राणी का नाहीये? वाघ का आहे? त्यातून बंगालचा वाघ का? महाराष्ट्राचा बैल का नाही? यावर पोट तिडकीने चर्चा केली. एकंदरीत इराने कॉन्सलिंग फारच बैलावर घेतलं होतं. निऱ्याच्या गाय मनावर फारच बैल परिणाम झाले होते. कॉन्सलरच्या बाहेर आम्ही बैलाच्या कॉन्सलिंग बद्दल बोलत होतो. हे बघून काही मांजर मातांनी आम्हाला पाण्यात बघितलं.

तेवढ्यात अचानक कुठून तरी एक बाई आमच्याकडे आल्या.
“हे फक्त मांजरीचं कॉन्सलिंग करतात का?” बाईने विचारलं.
“तसं नाही...” इरा म्हणाली, “इथे कासवांचंही कॉन्सलिंग होतं.” कासवांचं कॉन्सलिंग?? टर्टल कॉन्सलिंग? इरा कॉन्सलिंगची टर उडवत म्हणाली.
“हो. बघा ना, कासवं शंभर वर्ष जगतात... थोडं फार नैराश्य येणारच ना.” इरा कॉन्सलिंग मोडमध्ये म्हणाली.
"मला माझ्या डॉगोचं कॉन्सलिंग करायचंय"
“काय झालं डॉगोला?”
“माझा ना... डॉगो ना.. खूप भुंकायला लागलाय,” बाई म्हणाल्या.
“त्याला दात येत असतील,” नीरव बिल्लमाचे दात तपासत म्हणाला.
“दात किडत पण असतील” इराने लगेच रिप्लाय डागला “आजकालचे दात हो.. फार किडतात हो.”
बाईंना दोन्ही मुद्दे पटले. त्या परत निघाल्या “बरं, मी डॉगोचे दात बघते” असं म्हणत त्या निघून गेल्या.

नीरव बिल्लमाला सनस्क्रीन लावत म्हणाला “हे बघ मला वाटतं.. प्राण्यांना खाऊन घ्यायला हवं”
“काय?”
“प्राण्यांना खाऊन घ्यायला हवं…”
“खाऊन?”
“समजून… समजून... प्राण्यांना समजून घ्यायला हवं” नीरव समजावत म्हणाला.
नीरवने कॅट कॉन्सलरबद्दल परत कॉन्सलिंग करायला सुरुवात केली. हे ऐकून माझे कान्स दुखू लागले. माझा कंठ कान्सपाशी दाटून आला. नीरवला कॅन्सल करावे असं वाटलं.

आम्ही रिसेप्शनवर पोहचलो, दरवाज्याजवळ एक बोर्ड होता. मोठ्या अक्षरात लिहिलं होतं “कॅट कॉन्सलर.” त्याखाली लहान अक्षरात टॅगलाइन “माऊचं मन जाणून घेऊया.” पण कुठलं मन? सबकॉन्शिअस का सुप्राकॉन्शिअस? का दोन्ही?
आम्हाला एक फॉर्म मिळाला. त्यात मांजरीची माहिती लिहायची होती.
‘डेट ऑफ बर्थ?’ असा एक प्रश्न होता.
नीरवने रिसेप्शनवाल्या बाईला विचारलं “मला हिचा बड्डे माहित नाही.”
“असं कसं माहित नाही?” बाईनी विचारलं. त्या शाळेत तोंडी परीक्षा घेऊन आल्या असाव्यात.
“तिचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा तिथे घड्याळ नव्हतं” नीरव म्हणाला.
“पण साधारण श्रावणात झाली असावी.” आता इरा सुरु झाली.
“कुठला श्रावण?”
“साधारण श्रावण”
“अहो कुठल्या वर्षीचा श्रावण?”
“२०२१ चा.”
नीरवने लिहिलं ‘जन्मवेळ: श्रावण २०२१’

फॉर्मवर सहीच्या जागी बिल्लमाच्या पुढच्या दोन्ही पायाचे ठसे घेण्यात आले. “बिल्लमा साक्षर नाही?” असं इरा म्हणाली, तेवढ्यात ऑफिसमधून एक घंटा वाजली, आतून आवाज आला. “नेक्स्ट कॅट प्लीज!” तशी बिल्लमाने खाली उडी मारली, ऑफिसचं दार उघडून आत गेली. बाप रे.. एवढी एक्ससाईटमेन्ट? तिच्या भावनांना वाट मिळणार आहे, म्हणून असेल. आम्ही बिल्लमाचा फॉर्म घेऊन आत गेलो.

कॉन्सलर या काकी होत्या, काकी तरुण दिसत होत्या, असतीलही, आपल्याला काय करायचंय? आम्ही बिल्लमाला काकींसमोर घेऊन बसलो. काकी फोनवर बोलत होत्या.
“पूजा करताना मांजर मांडीवर येऊन बसते?”
बहुतेक मांजरीला टाळ वाजवायची असेल.
“अहो मग उभं राहून पूजा करा.”
फोनवरील व्यक्तीला हे कॉन्सलिंग फारसं पटलं नसावं.
काकी काही वेळ “हम्म... हम्म... हम्म...” करत राहिल्या आणि शेवटी म्हणाल्या “पूजा करून या”
कॉल संपला तसे आम्ही सरसावून बसलो.

काकी बिल्लमाकडे बघत म्हणाल्या “काय आवडतं हिला?”
“उंदीर खाते तशी, पण घुशींची तिला ऍलर्जी ए” नीरव म्हणाला.
“कधीपासून आहे घुशींची ऍलर्जी?" काकी म्हणाल्या
“मागच्या महिन्यात एक घूस उंदीर उंदीर करत गेला” नीरवची स्टोरी सुरु झाली
“काय?”
“एक उंदीर घूस घूस करत गेला... आय मिन एक उंदीर समोरून नाचत गेला, तरी ही जागची हलली नाही”
“सम कॅट्स डू थिंक अबाऊट देअर वेट” कॉन्सलर काकी म्हणाल्या.
सम कॅट्स डू थिंक? बाकीच्या मांजरी निर्विचारितेमध्ये असतात का?

काकींनी बिल्लमाकडे बघत विचारलं, “काय झालंय?”
नीरव म्हणाला “आजकाल ती पहिल्यासारखी म्याव करत नाही.”
“हम्म…”
“आधी फिशटॅंकमधले मासे चोरून खायची. आता फिशटॅंककडे साधं बघतही नाही.”
“हम्म…”
“फारच अबोल झालीय… तासंतास शून्यात बघत बसते.”
फिशटॅंककडे बघतही नाही, शून्यात बघत बसते, तिला चष्मा लागलाय का? मांजरींना चष्मा लागतो का? मांजरीच्या चष्म्याला काय म्हणणार? मांजरीष्मा?

“त्या दिवशी बाल्कनीतून खाली उडी मारली…” नीरव बोलायचा थांबला, त्याला भरून आलं होतं. काकींनी पाणी विचारलं नाही.
“तुमच्या घरात कोणी डिप्रेशनमध्ये आहे का?” काकींनी चौकशा सुरु केल्या
“नाही.”
“घरात भांडण वगैरे?”
“भांडणं तर दार लावून हळू आवाजात करतो”
हळू आवाजात भांडण? जमायला हवीत, शिकायला हवीत.

“तुम्ही बाहेर जाता का? मी बोलते तिच्याशी” काकी म्हणाल्या.
“नाही नाही.. प्लिज” मी पटकन म्हणालो, माझी आर्त इच्छा आतून बाहेर आली.
“ती तुमच्या समोर अशी मोकळी होणार नाही” काकी बिल्लमाला कडेवर घेत म्हणाल्या.
सीसीटीव्ही मधून बघता येईल का असं मी विचारणार होतो, पण जमलं नाही.

“बिल्लमा.. आम्ही बाहेर जातो..” नीरव खुर्चीवरून उठत म्हणाला. तसं बिल्लमाने म्याव केलं,"अरे येड्या मी हिमालयीन मांजर आहे, मला तुझं मराठी कळत नाही” असं बिल्लमा मनातल्या मनात हिमालयीन भाषेत म्हणाली असावी.

कॉन्सलर काकींनी बिल्लमाला सोफ्यावर ठेवलं. त्याला ते कॅट कौच म्हणत असावेत. आम्ही बिल्लमा टाटा केला. तिने तिचा पुढचा पाय उचलून टाटा केला नाही, कारण ही काय अव्हेंजर मधली मांजर नाहीये. आम्ही केबिनच्या बाहेर पडलो.

"बिल्लमा.. बालपण कसं होतं तुझं?" असं आमच्या कानावर आलं. बिल्लमाला बालपण होतं? असेल बाबा.. बालपणात तिचे हाल पण झाले असतील. कोणाचं बालपण सुखात गेलंय? आम्हा तिघांना या बालपणाबद्दल ऐकायचं होतं, पण मांजराचं बालपण चोरून ऐकणं? आमच्या बाल मनाला पटलं नाही. बिल्लमाने म्याव केलं, बहुतेक तिला तिचं बालपण आठवलं असावं.

“कुठे गेलं असेल तिचं बालपण?” नीरवला स्वतःच बालपण पण आठवत नसावं.
“जिन्यावर ना.. जनरली मांजरीचं बालपण, अकाली वृद्धत्व हे जिन्यांवरच जातं” इरा म्हणाली.
“कॉन्सलिंग मध्ये अजून काय विचारतात?” मी विचारलं, माहित पाहिजे ना.
“स्वप्नांबद्दल विचारतात” इरा म्हणाली
“बिल्लमाचे स्वप्नं काय असेल?”
“घुशीला मारून खाणं” नीरव म्हणाला
“स्वप्नात का ती मारेल? स्वप्नं आहे ना ते?” इरा पटकन म्हणाली “स्वप्नात तर घुशीने तिच्यासमोर येऊन देहत्याग करायला हवा” पण मांजऱ्या एवढ्या क्रीएटिव्ह असतात का? क्रिएटिव्हली स्वप्न बघतात का? आम्ही कान टवकारून ऐकू लागलो, पण आतून काहीच आवाज येत नव्हता.
“तुम्हाला काही ऐकू येतंय का?” नीरवने विचारलं.
आम्ही “नाही” म्हणून मान डोलावली. “कदाचित हातवारे करत सांगत असेल” इरा कुजबुजली.
त्या क्षणी आम्ही सगळे इतके शांत झालो होतो की, आमच्या आत्म्याचा आवाज ऐकू आला असता.
मग हलकासा “घुर्र…” असा आवाज आला, घोरतेय की काय?

आम्ही वेटिंग एरियामध्ये बसलो होतो. तिथे बऱ्याच मांजरी वेटिंगला आल्या होत्या, काही शांत, काही चिडलेल्या, काही मांजरी शिंकत होत्या तर काही मांजरी हसत होत्या, बहुतेक ही तिची लाफ्टर थेरपी असावी.

इराने शेजारच्या मांजर-मातेला विचारलं, “काय झालंय तुमच्या मांजरीला?”
त्या गंभीरपणे म्हणाल्या, “माझ्या हिला खूप गिल्ट आलं होतं.”
गिल्ट? मांजरीला? मी थक्क झालो “कशामुळे?”
“आधी खूप उंदीर खायची. दिसला की झडप घालायची.”
इराने पुढे सरसावत विचारलं “पण तुम्हाला कसं कळलं की ती गिल्टी ए?”
बाई पुढे म्हणाल्या “ती उंदीर खाऊन झाल्यावर भिंतीकडे तोंड करून बसायची.”
ढेकर देत असेल.
“मग रात्री झोपेत बोलायची”
“म्हणजे?”
“झोपेत म्याव म्याव करत फिस्करायची..."
बहुतेक तिने खाल्लेले उंदीर तिच्या स्वप्नात येत असतील. कर्मा हिट्स बॅक.
थोडा वेळ आम्ही सगळे शांत बसलो. कारण बाहेरच्या मांजरी चेकाळल्या होत्या. तेवढ्यात एका मांजरीने म्याव करत जांभई दिली. ही व्हीगन असेल. हिला चांगली झोप येत असेल

बेल वाजली. बिल्लमा बाहेर आली. डिप्रेशनमधली मांजर.. कुठे ही जाऊ शकते काही ही करू शकते. म्हणून आम्ही तिला वेटिंग एरिया मध्ये बांधून ठेवलं. आम्ही आत गेलो. नीरव खुर्चीत बसत म्हणाला "काय झालंय डॉक्टर?"
काकींनी चष्मा काढून ठेवला. त्या आमच्याकडे बघत राहिल्या.
काकी तुम्ही काही बोलणार? का आम्हाला गेस करायचंय?
काकी म्हणाल्या "मी बराच प्रयत्न केला, पण तिचं मन जाणून घेता आलं नाही"
"तुम्ही तिला वेळ द्यायला पाहिजे" काकी कागदावर खरडत म्हणाल्या
"किती वेळ देऊ.. म्हणजे मी वेळ देतो.. पण.." नीरव गोंधळला
"तिला फिरायला घेऊन जा, शी इज लूकिंग फॉर लव्ह"
“शी इज अल्सो वरिड अबाऊट हर शी…” नीरव पुढे म्हणाला "तिला एक वेताळ बोका आवडायचा"
"वेताळ बोका?" आम्ही तिघांनी एकत्र विचारलं.
"वेताळ नावाचा बोका"
वेताळ? बोका? काय करायचा तो? पाठीवर चढून प्रश्न विचारायचा?
"पण वेताळ लॉयल नव्हता" नीरव म्हणाला
"बहुतेक त्यामुळे सुद्धा असेल.. तुम्ही तिचं अकाउंट सुरु करा" काकी म्हणाल्या
“अकाउंट? जी पे?”
“इन्स्टा अकाउंट.. तिचे फोटो शेअर करा, रिल्स बनवा” बिल्लमा फ्रॉम हिमालया असं इन्स्टा आयडी ठेवता येईल.
काकी कागद देत म्हणाल्या "तिला या गोळ्या दुधासोबत द्या"
नीरव या गोळ्या उंदरासोबत ही देऊ शकतो. “तिला सात दिवसांनी परत घेऊन या”

आम्ही फारच जड अंतःकरणाने बाहेर आलो. जिथे बिल्लमाला बांधलं होतं तिथे ती नव्हती!!
“बिल्लमा!” नीरव घाबरून ओरडला. “कुठे गेली बिल्लमा… बिल्लमा!”
रिसेप्शनवरच्या बाई घाबरून उठल्या, “इतक्या जोरात ओरडू नका, काही मांजरी झोपल्यात”
नीरव सॉरी म्हणाला, पण बिल्लमा कुठेच दिसत नव्हती. आम्ही काही मांजर मातांना विचारलं, त्यांना ही काही माहित नव्हतं. आम्ही तिघांनी शोधाशोध सुरु केली. “कुठे गेली यार…” नीरव निराश झाला.
इरा म्हणाली, “वेताळ आला असेल… त्याच्यासोबत गेली असेल.”
“पण का?”
“त्यांना पळून जाऊन लग्न करायचं असेल.”
“का?”
“ही हिमालयाची, तो इथला, इंटरकास्ट, म्हणून पळून गेले असतील”
“पण आमचा या नात्याला कधीच विरोध नव्हता…”
मांजरीला विरोध असला तरी करणार कसा? खोलीत बंद करून ठेवणार? का तिचा फोन काढून ठेवणार?

“बिल्लमा…!” नीरव असं ओरडत सैराभैरा धावला, मला धावत येत नाही म्हणून मी फक्त मा..मा… असा एको देत होतो.
आम्ही बरीच शोधाशोध केली, पण बिलम्मा भेटली किंवा मिळाली नाही. मग आम्ही बिल्लमाच्या फोटोच्या प्रिंट काढल्या. "बिल्लमा परत ये, बाबांनी जेवण सोडलं आहे" असं लिहायला सुरुवात केली. "सॉरी टू से" इरा म्हणाली “पण बिल्लमाला लिहिता वाचता येत नाही" नीरवला हा मुद्दा पटला. बिल्लमाचा दूध पितानाचा फोटो आणि त्याखाली "ही बिलम्मा दिसली तर, या क्रमांकावर संपर्क करावा" असं लिहून आम्ही ती पोस्टर्स कॉन्सलिंग ऑफिसच्या बाहेर भिंतींवर लावायला सुरुवात केली.

आता रात्र झाली होती. "तिने असं का केलं?" नीरव म्हणाला.
"तुमच्या सोबत तिला राहायचं नसेल" इरा म्हणाली..
"असं कसं... आम्ही तिला कधी काही कमी पडू दिलं नाही" नीरव म्हणाला
"तिने योग्य तो निर्णय घेतला" इरा म्हणाली.
नीरव म्हणाला “पण तिला काय कळणार? योग्य अयोग्य?”
“मुका जीव, तिला ही भावना असतात, मन असतं” इरा म्हणाली, तसा नीरव हलकेच हसला.
बिल्लमा परत आली नाही.
कदाचित या कॉन्सलिंगमुळे तिला फारच जास्त क्लॅरिटी मिळाली होती...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"बहुतेक त्यामुळे सुद्धा असेल.. तुम्ही तिचं अकाउंट सुरु करा" काकी म्हणाल्या
“अकाउंट? जी पे?”
<<<<<<< Rofl
म्हणजे बिलम्माच्या फ्युचर अपॉइंटमेंट्सचं बिल परस्पर वळतं झालं असतं.

क्या बात है , चैतन्य ! बर्याच दिवसांनी आलात .
नीरव आणि इरा ची नावं वाचली आणि प्रतिक्रिया दिली. आता पूर्ण कथा वाचते Happy

नीरव , इरा यांच्यावरती व्हॅम्पायर गर्लफ्रेन्ड का काही कथा लिहीलेली आहे का तुम्ही? ती फार आवडलेली स्मरते. ही अजुन वाचायचीये.
----------
सापडली - व्हॅम्पायर गर्लफ्रेन्ड

खुसखुशित आहे एकदम ! काही पंचेस एकदमच जमलेत
सबकॉन्शिअस का सुप्राकॉन्शिअस?
पुराच्या पाण्यातून वाहत निघालो.
गोळ्या उंदरासोबत ही देऊ Lol

धन्यवाद सगळ्यांना Happy
बाकी सगळ्यांनी कथा नक्की वाचा, प्रतिक्रिया कळवा.

मस्त Happy

...डोळे पुसत म्हणाला “पण नंतर तो बैल तिच्याकडे बघून हसला.”>>> Biggrin

Lol धमाल लिहिले आहे.वाक्यावाक्यात पंचेस फुटले आहेत. मस्तच.
आमच्या पुढची मांजर काजळ घालून आली होती.>>>>अशी दिसत होती का !
IMG_20251029_084704.jpg

एक मांजर ब्लँकेटखालून फक्त शेपटी हलवत होती, लाजत असेल किंवा सोशल एन्झायटी किंवा दोन्ही एकत्र.>> पण खरंतर मांजरं राग आला की अशी शेपटी हलवतात.ही मला युट्यूब रीलमधून मिळालेली माहिती. त्यांनी शेपटी उभी केली की ते लाडात येतात किंवा त्यांना भूक लागलीय. थोडक्यात शेपटी हलवण्याचा पद्धतीवरून ओळखायची मांजराची भाषा . Lol

कथा आवडली हे बघून छान वाटलं Happy

@ सिमरन.

“दाखव बरं तुझी शेपटी”
तशी लगेच बिल्लमाने शेपटी गुंडाळून घेतली.
“ह्या... म्हणजे काय?"
धिस इज आऊट ऑफ सिलॅबस
Biggrin

. “मागच्या वेळी तिने बैल वाचवला होता”
"कशावरून तो बैल सुसायडल नव्हता" इराने आयडल प्रश्न विचारला.
"पण बैल का सुसायडल होईल?" मी विचारले.
“बैल खूप काम करतो, नसेल त्याला वर्क लाईफ बॅलन्स” इराने बॅलन्स मुद्दा मांडला.
Rofl Rofl Rofl