आई...

Submitted by सव्यसाची on 4 October, 2025 - 09:37

आई...

सकाळी गाण्याची एक सुरेल लकेर स्वयंपाक घरातून कानावर पडली की मी सुखाव्हायचो. आईचे चहा करणे चालू असायचे आणि एकीकडे गाणी गुणगुणणे. मला आनंद व्हायचा कारण गाणं चालू आहे म्हणजेच आज तिची तब्येत त्यातल्या त्यात उत्तम आहे हे त्यातून ध्वनीत व्हायचे. त्यातल्या त्यात म्हणालो कारण वयानुसार गेली काही वर्षे काही ना काही दुखत खूपत होतच. पण तिने कधी त्याचा बाऊ केला नाही.
गायन हा तिचा अतिशय आवडीचा छंद होता आणि तो तिने आयुष्यभर जपला. एक तप पुणे रेडिओवर गाऊन चांगलाच जोपासला. सकाळी अशी लकेर कानावर आली की मी ऐकत ऐकत परत झोपी जायचो किंवा तिच्या आनंदात सहभागी होण्याकरता उठून तिला सांगायचो की माझा पण चहा कर. म्हणजे माझा चहा ती करायचीच पण दूध न घालता ठेवून देत असे. पूर्वी ती हॉलमध्ये चहा प्यायला येत असे पण नंतर नंतर होईना झाल्यावर स्वयंपाक घरातच पीत असे. एकटीच असेल तर सवयीप्रमाणे ती स्वतःशीच बोलत असे. ती बडबड ऐकण्यात पण एक प्रकारचे सुख असे आणि तिला सध्या काय हवे आहे काय नको आहे हेही मला कळत असे. तिच्या स्वभावानुसार ती स्वतः स्पष्टपणे कधी सांगत नसे. तसाही तिचा, आयुष्यात कधीही मला हे पाहिजे मला ते पाहिजे असा आग्रह नव्हता. पण मला तिच्या बडबडीतून कळले की मी ती गोष्ट आणत असे, करत असे. मग तिला आश्चर्य वाटून ती म्हणत असे की मला वाटलंच होतं की तू असं करशील म्हणून.
तिचं हे 'मला वाटलंच होतं' वाक्य आम्हा नातेवाईकांमध्ये गमतीचा विषय होता. अचानक कोणी नातेवाईक आला तरी ती म्हणत असे की मला वाटलेच होते तू आता येशील असं. कधी कधी, मी सांगणारच होते तुला असं असं कर म्हणून पण तू स्वतःहून करतोसच असेही म्हणायची. खूप मस्त वाटायचं. अर्थात बऱ्याच गोष्टी मला न सांगता देखील कळत असत इतका आमचा दीर्घ सहवास होता. पूर्वी ती चहाचे दोन कप स्वतः घेऊन बाहेर येत असे पण पुढे पुढे वय वाढल्यावर तिला ते मोठ्या कष्टाने तोल सांभाळत आणताना पाहून मी आणू लागलो. हल्ली हल्ली मी तिच्याबरोबर चहा पिणार असलो तरी ती आत मध्ये बसत असे पण मग मीच तिला हळुवार आवाजात येतेस का बाहेर असं विचारत असे. मग ती हो चल असं म्हणून बाहेर येत असे.
पाच मिनिटे गप्पा मारून मग ती उठून भिंतीला डावा हात घासत घासत आत जाऊ लागे. पूर्वी मला या गोष्टीचा राग यायचा कारण तिचे हात नेहमीच तेलकट तुपकट असायचे आणि त्यामुळे भिंत खराब व्हायची. पण कधीतरी माझ्या डोक्यात प्रकाश पडला की अरे आपल्या म्हाताऱ्या आईला हे तोल जाऊ नये म्हणून करावंच लागतं आणि तेल तूपही पायाला डोक्याला चोळावच लागतं. आणि येता जाता हात धुणे हेही तिला फार कष्टाचं होतं. हल्ली हल्ली तर नळाला येणारं पाणी देखील तिला बाराही महिने थंड वाटायचं म्हणूनही हात धुण्याचे ती टाळू लागली होती. आणि तोल जाऊ नये याची ती खूपच काळजी घ्यायची ते तिच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. पडले आणि हाड मोडले तर मुलावर फार भार पडेल ही भीती तिला नेहमीच होती. अंथरुणाला खिळणे हे तिला कदापिही नको होते. पूर्वी तो अनुभव तिने तीन चार वेळा तरी पायाचे हाड मोडल्यावर घेतला होता. पण तो थोड्या काळापुरता होता आणि आता उतारवयात तो तिला अजिबात नको होता. शेवटपर्यंत हिंडती फिरती ठेव असं ती देवाकडे मागत असे. मी देखील तिला शेवटपर्यंत हिंडती फिरती हसती गाती ठेव असे देवाकडे मागणे मागत असे. ती गात रहाणे हेही खूपच महत्त्वाचे होते.
तिची खुर्चीत बसून आंघोळ, उभ्याने देवपूजा आणि स्वयंपाक झाला की ती हळूच हॉलमध्ये डोकावत असे आणि थोडीशी घुटमळत असे. मी जर कॉम्प्युटरवर असलो तर काम करतो आहे असं वाटून गुपचूप आत जाऊन थोडा वेळ पडत असे. पण कामात नसलो तर मग सोफ्यावर तिच्या सिंहासनावर येऊन बसत असे आणि तिची टकळी चालू होत असे. तिला सोफ्यावर टेकायला एक भला मोठा तक्क्या करून दिला होता आणि खाली घ्यायला गोल भोकाची गादी पण असायची. त्यामुळे मी त्याला सिंहासन म्हणत असे कारण तिथे फक्त तीच बसत असे. कधी कधी कॉम्प्युटर हातात असला तरी काम करत नसायचो. मग मी तिच्याकडे बघून सिंहासनावर हात थोपटत, 'शोनिमनी, बसा तुम्ही !' असे म्हणत असे. हे नाव मी तिला खूप लहानपणापासून दिले होते. अर्थात मी फक्त एकटाच असेन तिच्याबरोबर तर हे नाव वापरायचो. मग ती पण हसून सोफ्यावर बसत असे. म्हाताऱ्या माणसाला कोणीतरी प्रत्यक्ष बोलायला असणं, आपल्या मुलाबरोबर संवाद असणं, संवाद होणं हे किती पाहिजे असतं ते मला तिच्याकडे बघून कळत असे.
रोजचा स्वयंपाक, पोळ्या सोडून, तीच करत असे कितीही वय झालं तरी. एकतर स्वयंपाकाला बाई लावली तरी ती आपल्या चवीचं करत नाही यावर आमचं एकमत होतं. आणि दुसरं म्हणजे स्वतः केलं की मला अंदाज येतो आणि वेळही जातो असं तिचं म्हणणं. स्वयंपाकाला एक दोन वेळा बाई लावल्या होत्या पण त्यांची कमालीची चालढकल आणि घाई घाईत फालतू काम हे काही तिला आवडत नव्हतं. त्यामुळे त्या सोडून गेल्यावर तीच म्हणाली की नको अजून कोणी. पण एकूणच तिचा स्वतः करण्याकडे कल होताच. त्यामुळे आजारी पडली असेल तरच इतर कामाच्या बाई स्वयंपाक करायच्या किंवा मग मी करायचो. आणि त्याचा अजून एक फायदा म्हणजे तिचं आत बाहेर जाणं-येणं चालू राहिल्यामुळे व्यायाम व्हायचा. नाहीतर तिचे पाय सुजत असत. कोविड काळात कोणीच घरी येऊ शकत नव्हतं तेव्हा तिने रोजच्या पोळ्या करण्याचा घाट घातला होता. पण मी पहिल्या दिवसापासूनच नाही सांगून दोन-तीन दिवसातच तिच्याकडून शिकून घेऊन व्यवस्थित घडीच्या पोळ्या करू लागलो. त्याचे तिला कोण कौतुक होते. मायक्रोवेव्ह ओवन घेतला तेव्हा मला वाटले होते की हिला जमेल की नाही. पण ती त्यात कितीतरी पदार्थ करायला शिकली आणि येता जाता ओव्हनच वापरू लागली. आणि मग त्यात करायला सोपं जातं असं म्हणत आवडीचे पदार्थ करणे सुरू झाले. भाऊ, बहीण येणार असेल तर त्यांना काय आवडतं हे लक्षात ठेवून तो पदार्थ करायची.
आमच्याकडे एक तीन मजली ट्रॉली आहे ज्यावर आम्ही जेवणाचे पदार्थ असलेली सगळी भांडी ठेवतो. मीठ तूप लोणचं हे ठेवायचा पण एक कप्पा आहे. दुपारच्या जेवणाची वेळ झाली की आई पडल्या पडल्या मी काय करतोय ते बघत असायची. मग मी मोकळा झालो की तिच्याजवळ जाऊन विचारायचो, आई जेवायचं का? की आई हो म्हणत उठून त्या ट्रॉलीत अजून काही ठेवायचे का बघून ती ट्रॉली ढकलत बाहेर घेऊन येत असे. लहान मुल पांगुळपाडा ढकलताना कसं दिसतं तशी ती दिसत असे. थोडसं पुढे झुकून आणि वाकून ती ढकलावी लागत असे. ओट्याखाली जी ट्रॉली असते त्याचाच हा अवतार होता. जेवण अर्थातच सिंहासनावर बसून ताट हातात घेऊन आणि मी तिच्या उजव्या बाजूला बसलेला. पूर्वी जेवताना सुद्धा आमच्या गप्पा चालत असत. पण नंतर नंतर तिला ठसका लागायला लागला आणि मग श्वास घ्यायला त्रास व्हायचा त्यामुळे मी कटाक्षाने जेवताना बोलणे कमी करून टाकले. दुपारच्या जेवणानंतर मीच तिला अर्धा तास तरी आडवी होऊ नकोस असं म्हणत थांबवून ठेवायचो. तेव्हा मग आमच्या गप्पा होत असत. गप्पा मारताना मी तिच्या पाठीवर, कमरेवर थोपटत असे व कानोसा घेत असे की कुठे दुखतय का. तसं वाटलं तर मग तिथल्या तिथे चेपून देत असे. थोड्या वेळाने ती उठून ट्रॉली नीट उलटी फिरवून आत मध्ये घेऊन जात असे. ते बघताना मला वाय आकाराच्या रेल्वे ट्रॅक वर, इंजिन एक डबा या ट्रॅकवरून त्या ट्रॅकवर टाकताना असंच दिसेल असं वाटायचं. एखाद्या दिवशी ट्रॉली खूपच जड असेल तर मात्र मी ने आण करत असे. एरवी मात्र तिलाच करू देत असे कारण म्हाताऱ्या माणसांच्या सुद्धा सर्व प्रकारच्या हालचाली झाल्या पाहिजेत असं आपण नेहमीच वाचतो. पूर्वी तिच्याकडून जेवत असताना एखादा तरी घास अंगावर सांडत असे किंवा ट्रॉली मधून काहीतरी घेताना ते खाली सांडत असे. आमची जेवण्याची पद्धत सोफ्यावर बसून मांडीवर ताट घेऊन अशी असे जी तिला तिच्या वयाला अर्थातच त्रासदायक होती. पण तरी मी तिला रागावून असं असं कर म्हणजे सांडणार नाही असं ओरडत असे. नंतर ओरडलो याचे वाईट वाटे. कळतं पण वळत नाही हे आपण आपल्या माणसांच्या बाबतीत किती सहज करतो. पण गेली दोन-तीन वर्ष तिचे सांडणे चार महिन्यातून एकदा, इतपत कमी झाले होते. एवढे तर काय कुणाकडूनही होऊ शकते. तसे मी तिला दोन-तीन वेळा म्हणाल्यावर तिनेही हसून म्हटले होते की हो मी तू सांगतोस त्याप्रमाणे हल्ली काळजी घेते म्हणून सांडत नाही. आणि... आता मीच सांडायला लागलो आहे.
जेवणानंतर आत जाऊन ती पेपर वाचत पडायची. त्यासाठी तिच्या उशाशी एक दिवा लावून दिला होता. थोड्या वेळाने मी आत जाऊन पाहिले की बऱ्याचदा पेपर तोंडावर पडलेला असायचा आणि तिला छान झोप लागलेली असायची. तिचा म्हातारा चेहरा, सुरकुतलेली त्वचा, तोंडाचं बोळकं झालेलं, डोळ्यांवर चष्मा असं सगळं दिसूनही मला ती एखाद्या लहान मुलीसारखी झोपली आहे असं वाटायचं. मग मी तो दिवा मालवून, पण पेपर तसाच ठेवून यायचो. पेपर किंवा चष्मा हलवायला गेलो तर तिला जाग येत असे. एक तर तिला हल्ली कमी झोप लागत असे आणि त्यात झोपमोड ही फारच त्रासदायक गोष्ट ठरायची. मी दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने आतल्या खोलीत जाऊन तिला बघून येत असे की सगळं ठीक आहे ना. मी डोकावून बघायचो तेव्हा जर तिचं माझ्याकडे लक्ष गेलं तर कधीकधी गोड हसून विचारायची काय रे आई बरी आहे ना बघतोयस ना. मी नुसताच हसून परत बाहेर येत असे.
दुपारचा चहा ही एक आमच्यातली फार मोठी आनंदाची गोष्ट होती. पूर्वी दुपारचा चहा सुद्धा तीच करत असे पण नंतरची बरीच वर्ष मी करू लागलो. तिची एक वेळ तरी या कामातून सुटका करावी असं वाटलं कारण ती सकाळी माझ्या आधी उठत असे त्यामुळे सकाळी मी चहा करायचा प्रश्न नव्हता. चार वाजले की आत जाऊन बघायचं जागी आहे का. बऱ्याचदा जागीच असायची आणि वाटच बघत असायची माझी. पण नाहीतर अगदी हळू आवाजात हाक मारायची. डोळे उघडले तर मग विचारायचं चहा करू का. हे आपलं उगाच, कारण नाही म्हणेल अशी शक्यता नव्हतीच. पण ती स्पष्ट हो म्हणाली म्हणजे झोप चांगली लागली असा त्याचा अर्थ असे आणि ते ऐकायला माझे कान आसुसलेले असत. काही बोलली नाही तर मात्र बघावे लागे की ताप आलाय का अंग दुखतय का किंवा आणखी काही होत आहे का. मी चहा करायला लागलो की आवाजावरून मी दूध कधी टाकतो आहे हे तिला कळत असे आणि मग ती सिंहासनावर येऊन बसत असे. चहा पिणे शांततेत होत असे कारण मध्येच बोलायला गेली तर तिला ठसका लागण्याची शक्यता होती. पण नंतर मात्र तिची टकळी जोरात चालू व्हायची. पेपर मध्ये काय वाचले त्यावर किंवा घरगुती घडामोडींवर किंवा मग नेहमीच्याच पूर्वीच्या आठवणी. विषय अगदी, तिची आई एखादी भाजी कशी करायची इथपासून लग्न, लिव्ह इन नातं, वृद्धाश्रमाचा फायदा तोटा, मुळव्याध की भगंदर झालंय, असे कुठलेही असत. शेवट मात्र बऱ्याचदा आज जुलाब झाला की दगड, याने होत असे. त्यामुळे तो फक्त याच विषयावरचा सिनेमा आम्ही दोघांनीही एकत्र पाहिल्यावर खूप हसलो.
मला काम नसेल तर, अलिखित नियम होता की चार ते साडेपाच असा दीड तास, दिवा लावायचा नाही. आहे त्याच सूर्यप्रकाशात बसायचं. त्यामुळे आपोआप नुसत्या गप्पा व्हायच्या. ती नेहमी म्हणायची की पूर्वी जेव्हा गीत रामायण प्रसारित झाले तेव्हा टेपरेकॉर्डर नसल्यामुळे नंतर ती गाणी फारशी ऐकता आली नाहीत. मग मी एके दिवशी चहानंतर तिला मोबाईलवर गीत रामायणाची रोज दोन-चार गाणी लावून द्यायला सुरुवात केली. ही गाणी मोबाईल मध्ये कशी आली हा तिचा प्रश्न कारण हा तर काही टेप रेकॉर्डर नाही. एरवीही मोबाईलवर कोणाचे ॲप वरचे फोटो दाखवले की विचारत असे की हे यात कसे आले. कॉम्प्युटरवर तिला दाखवले तर तिला हा प्रश्न पडत नसे पण मोबाईल सारख्या छोट्या जागेत ते कसे आले असा बहुतेक तिचा प्रश्न होता. किंवा कॉम्प्युटर सगळं काही करू शकतो हे तिच्या आता पचनी पडले होते पण मोबाईल हाही एक प्रकारचा कॉम्प्युटरच आहे हे तिला कळत नव्हते. तर आम्ही ते गीत रामायण खूप आनंदाने ऐकले आणि शेवटचे गीत हे नेमके दसऱ्याला लावले गेले ज्याचा तिला आणखीनच आनंद झाला. तिची एक इच्छा बऱ्याच वर्षांनी पूर्ण झाली होती. तसेच तिला नाट्यसंगीताची खूप आवड होती आणि ती मी तिला अधून मधून ऐकवत असेच. कधी कधी मी एखादे नाट्यगीत गुणगुणत असे तेव्हा ती मला आश्चर्याने विचारायची की हे जुनं गाणं तुला कसं माहित.मी म्हणायचो की लहानपणापासून तुझ्या तोंडूनच ऐकत आलो आहे. मी गाताना वरच्या पट्टीत जाता येत नाही म्हणून अचानक पट्टी बदलायचो. आणि कधीकधी दोन गाण्यांचं एकत्रिकरण करायचो. याचं तिला फारच हसू यायचं.
आज चहा नंतर फारशी बोलत नसेल तर मी तिच्या उजव्या दंडावर लहान मुलासारखा नाक डोकं घासून किंवा मोठ्या माणसासारखा डोक्यावर डावा हात ठेऊन 'शोनिमनी, काय म्हणताव तुम्ही, काही म्हणताव की नाही? To be or not to be च्या धर्तीवर बोलावं की बोलू नये असं वाटतंय का?' असं विचारत असे. मग ती हसून एखादा विषय चालू करायची. जर तरीसुद्धा बोलणे चालू नाही झाले तर मात्र नक्कीच काहीतरी चांगलेच दुखत खूपत असे. मग त्यावर उपाय शोधला जायचा. असा आमचा दुपारचा चहा अतिशय आनंदाचा असे. आता हीच चहाची वेळ मला खूप खायला उठते.
दुपारच्या गप्पा झाल्यावर ती आत जाऊन शब्दकोडे सोडवत असे. हल्ली हल्ली बऱ्याचदा पूर्ण सोडवू शकत होती. कधी कधी मी थोड्या वेळाने आत जाऊन सुटलं नसेल तर मदत करायचो. तिला संध्याकाळचं खरं तर काहीतरी वेगळं खायला हवं असायचं पण करणार कोण ही अडचण होती. आणि तिला भूकही चांगली असायची. तरी ती बऱ्याचदा थालीपीठ, धिरडं, इडली, डोसा, ढोकळा, उकड, सांजा, पोहे, सँडविच, लोणी लावलेले भाजलेले पाव, घोसाळ्याची भजी, साबुदाण्याची खिचडी असं काय काय करत असे. आज भाऊ किंवा बहिण येणार आहे असं जर आधी कळलं असेल तर त्यांच्या आवडीचं ती करणारच. असं वेगळं काही करणार नसेल तर ती रात्रीची म्हणून साडेपाचला पोळी खाऊन घ्यायची. सुरुवात सकाळच्या भाजी बरोबर पण शेवटचे एक दोन घास तरी तिला काहीतरी वेगळं लागायचं. हापूस आंब्याच्या कैरीचं लोणचं किंवा एकूणच लोणचं तिच्या आवडीचं होतं. पण नंतर नंतर रक्तदाब वाढतोय म्हणून ते मी कमी करायला लावलं. क्वचित कारळ्याची चटणी शेंगदाणा चटणी असं आणून ठेवलेलं असायचं किंवा तिने स्वतः केलेली लसणाची चटणी असे. पण तरी हल्ली हल्ली ती पिठीसाखर तूप खात असे आणि मग माझा ओरडा खात असे. तू संयम ठेवत नाहीस असं म्हटल्यावर ती एकदा इतक्या आर्त आवाजात 'प्रयत्न करते रे मी' असं म्हणाली की मला एकदम गलबलून आलं. आपण पटकन बोलून टाकतो पण त्याचा तिला त्रास होतो. मी पटकन तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हटलं असू दे घे तू. मग मी तिला ओरडणे सोडले व स्वतःच तिला सांगू लागलो की आता तू अमुक दिवशी पिठीसाखर खायला हरकत नाही. तिला मधुमेह होता आणि इन्सुलिनचे पेन जेव्हा सुरू झाले तेव्हा मला धाकधूक होती की तिला जमेल की नाही. पण केवळ त्यासाठी मी रोज अडकलेला राहू नये म्हणून तिने नेटाने ते कसे घ्यायचे हे शिकून घेतले आणि त्यातील नळकांडी संपली किंवा सुई मोडली तर ती कशी बदलायची तेही ती शिकली. मी तिचे कौतुक केले तर ती फक्त हसली व नेहमीप्रमाणे कुठलातरी भलताच विषय तिने चालू केला. हीच सवय माझ्यातही आली आहे अचानक विषय सोडून भलतंच काहीतरी बोलायची. नंतर डॉक्टर बदलले आणि त्यामुळे इन्सुलिन पण बदलले. मला वाटले होते की पेन तेच वापरता येईल पण बहुतेक या कंपन्यांनी मुद्दाम नळकांडीमध्ये अगदी थोडासा फरक करून तसं वापरता येणार नाही याची काळजी घेतलेली दिसली. त्यांचं पेन खपावं म्हणून असेल. पण त्यामुळे आईला मात्र नवीन पेनाची नळकांडी बदलता येईना. आता तिचं वयही वाढलं होतं आणि नवीन काही शिकता येणं अवघड झालं होतं. तरीही तिने दोन वेळा प्रयत्न केला पण जमलं नाही आणि मग मला सांगू लागली. पहिल्यांदा तिला वाटलं मी नेहमीप्रमाणे आरडाओरडा करणार की इतकं सोपं कसं येत नाही. पण मी 'अगं आता या वयात तुला ते समजून घेणं अवघड आहे. पहिल्यांदा समजून घेतलंस तेही खूप होतं. आणि ते मागच्या पेनासारखं नाहीये म्हणून तुला जमत नाहीये त्यामुळे तू मला सांगत जा' असं म्हणून तिला ते करून दिलं आणि दोन्ही गालांचा एकत्र गालगुच्चा घेतला. मी चिडलो नाहीये हे पाहून तिला चांगलंच हायसं वाटलं पण आपल्याला करता येत नाही याचं तिला वाईट वाटतंय हे स्पष्ट दिसत होतं.
आपण आई-वडिलांना किती गृहीत धरतो. अमुक गोष्ट आपल्यासाठी सोपी असली तरी त्यांच्यासाठी ती खूप अवघड असू शकते शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा. हात अस्थिर असतात, दृष्टी थोडी अधू असते, डोकं तेवढं तल्लख नसतं आणि मुलगा ओरडेल या भीतीने आणखीनच चुका होतात. पण हे मला कोविड नंतर कळलं असं म्हणता येईल कारण त्या काळात तिची काही कामं मी करू लागलो आणि मला कळू लागलं की तिला ही गोष्ट का जमत नाही किंवा तीचच जास्त बरोबर आहे. पण कळलं आणि मी ओरडणं खूपच कमी केलं हेही नसे थोडके. अजिबात एकदाही ओरडायचं नाही असं खूप ठरवलं पण ते मात्र जमलं नाही याची खंत वाटते. पण गंमत अशीही आहे की मी आवाज चढवला की ती लक्ष देत असे आणि मग तिला काही गोष्टी कळत असत आणि काही गोष्टी समजुतीच्या स्वरात सांगितल्या की कळत असत.
महानगर टेलिफोन निगमने हात वर केल्यानंतर मात्र मोठी पंचाईत झाली. आता स्मार्टफोन शिकणे आले आणि ते काही केल्या तिला बिचारीला जमेना. मग नेहमी वादावादी. मी चांगलाच घाबरलो कारण मी बाहेर असलो तर आमचा संपर्क तुटायची वेळ आली. शेवटी तेही तिने खूप कष्ट घेऊन माझा ओरडा खाऊन आम्हा तिघा भावंडांना फोन करता येईल आणि तिला आलेला फोन घेता येईल इतपत आत्मसात केले. तिची गंमत अशी की मी शांतपणे तिला विचारलं की आता कसा घेशील कोणाचा आलेला फोन तर तिला जमत नसे पण मी आवाज चढवला की तिला आठवत असे. ती विसरू नये म्हणून मग मी महिन्यातून एक दोन वेळा तिच्या बाजूलाच बसून तिला फोन करत असे किंवा तिला करायला लावत असे. पण या तिच्या प्रचंड त्रासासाठी आणि आमच्या भांडणासाठी टेलिफोन निगमला आणि पर्यायाने ज्याने त्याचा खेळखंडोबा केला त्या सरकारला कधीही याबाबत माफी नाही. माझ्या आईसारखे कितीतरी असतील ज्यांचा इतरांशी संबंध केवळ या कारणामुळे तुटला असेल.
संध्याकाळी पोळी खाऊन झाली की नंतर टीव्ही बघणे हा कार्यक्रम असे. तिच्यासाठी आतल्या खोलीत वेगळा टीव्ही होता. मी मध्येच दारातूनच काय म्हणताय असं विचारायचो. मग ती आपलं बोळकं तोंड पूर्ण विस्तारून आनंदी डोळ्यांनी माझ्याकडे बघून छान हसायची. जीव हरखून जायचा. पूर्वी मी त्या धारावाहिकांना खूप वैतागत असे, काहीही दाखवतात म्हणून. पण नंतर नंतर मी तिच्याबरोबर म्हणून एखादी धारावाहिक पाहत असे. त्यात तिला समाधान असे की मी पूर्वी ओरडायचो तरी आता एखादी धारावाहिक मला आवडते आहे. आणि मला समाधान म्हणजे त्यात काय घडलं यावर आम्ही गप्पा मारू शकायचो. रविवारी मात्र संध्याकाळी धारावाहिक नसायच्या. मग चहा पिताना आमची चर्चा होत असे की आज कुठला सिनेमा पहायचा का. असा कुठलाही सिनेमा विशेषतः जुनासुद्धा कधीही पाहता येतो याचं तिला कायम आश्चर्य वाटत राहिलं. ती हमखास एखादा जुना मराठी सिनेमा किंवा हिंदी सिनेमा सांगत असे. नवीन सिनेमाची कथा तिला कळतच नाही असे तिचे म्हणणे. मुख्य म्हणजे गाणी चांगली असलेला सिनेमा पाहिजे. सहा सात वाजले की मी तो सिनेमा तिला बाहेरच्या टीव्हीवर लावून देत असे. मीही कधी कधी पूर्ण सिनेमा बघत असे. बघताना ती आठवणी सांगत असे की हा सिनेमा मी कसा, कुठे बघितला पूर्वी ते. पुण्यातल्या विजय आणि भानूविलास या दोन सिनेमाघरांच्या मध्ये तिचे घर होते त्यामुळे तिला रात्रीच्या शांततेत दोन्हीकडून गाणी ऐकायला येत असत. त्यामुळे सिनेमाच्या चर्चेमध्ये त्यात कुठली गाणी आहेत हे ती आधीच सांगत असे व म्हणून तो सिनेमा बघायचा असे. अर्थात जुन्या हिंदी सिनेमांमध्ये कथेला फारसा अर्थ नसायचाच म्हणा किंवा तरीही मुख्यता गाण्यांसाठीच ते सिनेमे बघितले जायचे.
साधारणपणे पंधरा दिवसांनी एखाद्या संध्याकाळी बहिणीची चक्कर असायची. मग आई टीव्ही सोडून बाहेर येऊन गप्पा मारायला बसायची. तिला तिच्यासाठी काही हवं आहे का हे विचारून बहिण बाहेरून आणून देत असे. 12 13 दिवस झाले की आम्ही वाट बघू लागायचो. मी तर आईजवळच राहायचो पण भाऊ आणि बहीण देखील अगदी हाकेच्या अंतरावर राहतात आणि त्यामुळे येऊन जाऊन असतात हे तिला खूपच आधार वाटणारे आणि समाधान देणारे होते.
साडेआठच्या ठोक्याला जेवण झाले की ती परत आत जाऊन धारावाहिक पाहत बसे व नंतर झोपण्यासाठी आडवी होत असे. एखादे पुस्तक वाचत पडे. किंवा नुसतीच उजव्या कुशीवर झोपून उजवा हात वर खाली करत, तर्जनी हलवत अंतराळात बघत असे. ही तिची तर्जनी ती स्वस्थ असली की कायम चालू असे. म्हणजे कुठल्यातरी आठवणी चालू आहेत मनात. मग मी झोपायच्या आधी एक पंधरा मिनिटे आत जाऊन तिच्या पलंगावर बसत असे आणि विचारत असे, आली का झोप? मग ती ठरलेले उत्तर देणार झोप नाही आली पण पडलेय आपली. हल्ली झोप लागतच नाही. पण थोड्यावेळाने पाहिले तर तिला छान झोप लागलेली असे. यावेळेसही मी विचारत असे की ठीक आहे ना सगळं? पाय वगैरे दुखत आहेत असं म्हणाली तर मग चोळून देऊ का असं विचारलं तर नको म्हणत असे. कोणाकडून काही करून घेणे हे तिला फारसे माहीतच नव्हते. मी आपणहून केलं तर मात्र नाही म्हणत नसे. काहीच नाही तर मी तिच्या पाठीवर थोपटत असे डोक्यावरून हात फिरवत असे आणि ती गप्पा मारत असे. थोड्या वेळाने दमली की गप्प होत असे. मग चला झोपा तुम्ही असं प्रेमाने आदरार्थी संबोधन करून तिच्या डोक्यावर एक हलकीशी पापी घेऊन मी बाहेर येत असे. माझी झोप तशी सावध आहे आणि त्यामुळे तिला रात्री तीन-चार वेळा तरी उठावे लागत असे तेव्हा मला ती आता निघाली आहे हे कळत असे. कपाटाला धरल्याचा आवाज किंवा पलंगाला धरल्याचा आवाज मला कळत असे. तसा आवाज आल्यानंतर समजा ती ठरलेल्या वेळेत मला बाहेर आलेली दिसली नाही तर मी उठून आत डोकावून बघत असे. एक दोन वेळा असं झालं होतं की तिला ताप आला होता आणि त्यामुळे काही सुधरत नव्हतं. मग ती टेबलाला धरूनच बराच वेळ उभी राहिली होती. अशा वेळेस पडण्याची भीती असते. ती न्हाणीघरापाशी दिसली की मी पडल्या पडल्या तिच्या हालचाली बघत असे. ती आत जाऊन आली की दिवा बंद केल्यावर माझ्या दिशेला बघत असे आणि मी झोपलेला दिसलो की समाधानाने आत जात असे. क्वचित कधीतरी मी स्वयंपाकघरात असे आणि तिला दिसलो नाही की मग ती 'आत्ता तर होता इथे आता कुठे बाहेर गेला की काय रात्रीत' असं पुटपुटत खिडकीपर्यंत जाऊन माझी बाईक आहे का हे बघून येत असे. मग मी हळूच येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला की कृतककोपाने म्हणत असे आहेस वाटतं घरातच. मी घरात असणे हे तिला खूपच आधार वाटणारे होते. ती आत जाऊन पलंगावर बसली की सुखरूप पोचली म्हणून मी झोपी जात असे. मी कधी बाहेरगावी गेलो असलो तर भाऊ किंवा बहिण घरी येऊन रहात असत.
२०१७ पर्यंत मी नोकरीला असा ऑफिसला जात होतो. पण हल्ली ती एकटी राहायला घाबरते आहे आणि कंटाळते आहे हे माझ्या लक्षात आले होते. पण आता नोकरी आहे म्हणजे जावं तर लागणारच आहे हे तिने समजून घेतले होते. पण रात्रीतरी घरी असतो यातच समाधान होते. मला देखील काय करायचे कळत नव्हते पण कर्म धर्म संयोगाने ती नोकरी जूनच्या सुमारास सुटली. मग मी वैयक्तिकरित्या घरी बसूनच करायचे काम करायला सुरुवात केली. आईने मला सांगितले की तुला जायचे तर जा नोकरीवर माझी काळजी करू नकोस पण मला माहित होते की तिला दडपण येत आहे. तेव्हा मी तिला म्हणालो की मला आता चरितार्थासाठी पैसे मिळवायची गरज राहिलेली नाही. जे आहेत त्यात आपलं नक्की भागेल. त्यामुळे मी आता घरूनच काम करेन. तेव्हा तिला खूपच हायसं वाटलं होतं. 2023 मध्ये एक उत्तम नोकरी आपणहून चालून आली होती आणि लगेच हजर व्हायचे होते तेव्हा काय करावे असा थोडासा मी विचारात पडलो होतो. मग दुपारी चहाच्या वेळेस मी तिला सांगितले की नोकरी घेतली तर मला ऑफिसला जावे लागेल तर काय करू. आईने दोन क्षण थांबून मला फक्त एवढेच म्हटले की 'पण तू तर म्हणाला होतास की तुला पैसे कमवण्याची गरज नाहीये'. मी म्हटले हो बरोबर आहे तुझे. आणि दुसऱ्याच दिवशी माझा नकार कळवून टाकला. आमच्यात तो विषय परत कधी निघाला नाही. यासंदर्भात एक आठवलं ते म्हणजे एकदा मी तिला घरखर्चासाठी पैसे आणून दिल्यावर ती मजेत म्हणाली की आला पगार माझा. मी तिला म्हटले हा पगार नाही हे पेन्शन आहे असं म्हण पाहिजे तर. तुला जेव्हा कधी काम थांबवावेसे वाटेल तेव्हा सांग आपण लगेच सगळ्या कामांना माणसे ठेवू.

मध्यंतरी कोविड आला. त्यातलं हे करू नका ते करू नका अशा बऱ्याच सूचना ऐकल्यावर आम्ही दोघांनी हे असलं काही आपल्याला जमणार नाही असं न बोलताच ठरवूनच टाकलं. आम्ही नेहमीसारखेच जगत राहिलो. अर्थात बाहेरच्यांशी संबंध बंद झाला होताच. पण भाज्या धुऊन घ्या, येता जाता हात धुवा, घरात सुद्धा मास्क लावून बसा वगैरे गोष्टी काही केल्या नाहीत. आईला तर मास्क लावला की लगेच गुदमरल्यासारखे होत असे. कोविड झाला आणि मरायला टेकलोच तर मरून जायचं, जास्त खर्चिक उपचार करत बसायचं नाही असंच तिचं म्हणणं होतं आणि माझ्या बाबतीतही माझं तेच म्हणणं होतं. अर्थात म्हणायला सोपं, प्रत्यक्षात आणायला अतिशय अवघड असतं. पण या चर्चेमुळे आम्ही दोघेही तणाव विरहित नेहमीचं आयुष्य जगत होतो. २०, २१ मध्ये तरी कोणाला कोविड झाला नाही पण २२ मध्ये तिला झाला. पण तो अगदीच सौम्य होता आणि पाच दिवस रुग्णालयात राहून ती परत आली.
२०२१ मध्ये पाठीवर गळू होणे आणि ते कापून काढावे लागणे यासाठी ती पाच दिवस रुग्णालयात जाऊन आली. आणि नंतर सुद्धा दोन महिने कमरेवर झालेल्या गळूचे प्रकरण चालू होते. तेव्हा मात्र तिला आता आपण जावे असे प्रकर्षाने वाटत होते कारण बऱ्यापैकी अंथरुणाला खिळल्यासारखे झाले होते. पण मला वाटत नव्हते की तिची जायची वेळ आली आहे. रुग्णालयात जायच्या एक महिना आधी तिला पणती झाली होती आणि तिला बघून, मांडीवर घेऊनपण झालं होतं. पण आता परत येते की नाही रुग्णालयातून आणि पणतिचा सहवास अजून मिळतोय की नाही ही धाकधूक होती. पण नशिबाने त्यातून ती बरी झाली आणि दोन चार वेळा का होईना पणतीशी छान भेट झाली. ती बरी झाली आणि आठवड्याभरातच परत स्वयंपाक करू लागली. 86 वय होतं पण तशी ती टणक होती. शेवटपर्यंत अगदी ताठ चालायची. आणि आपली कुठलीच गोष्ट दुसऱ्याला करावी लागते आहे हे तिला कधीच पटलं नाही. शेवटपर्यंत मला हिंडती फिरती ठेव असं तिचं देवाकडे मागणं असे आणि मी देवाला म्हणत असे की तिला शेवटपर्यंत हिंडती फिरती हसती गाती ठेव आणि मला सुद्धा ती असेपर्यंत ठणठणीत ठेव की जेणेकरून तिला सांभाळायला मी कायम उभा असेन. ती गात राहणं फार महत्त्वाचं होतं. त्याने दोघांच्या मागण्या मंजूर केल्या.
२०२४ साल अतिशय छान गेलं. कधी नव्हे ते तिची साखर आणि रक्तदाब दोन्ही उत्तमरीत्या आटोक्यात राहिलं. तिची तब्येतही सुधारली. एक दोन नातेवाईकांकडे चालत जाऊन आली. गेल्या दोन-तीन वर्षात ती त्यांच्याकडे गेलीच नव्हती. दिवाळीत नेहमीप्रमाणे आम्ही दोघांनी मिळून चकल्या केल्या. आधी ती नाहीच म्हणायची गेले दोन-तीन वर्ष पण मी आग्रह केला की म्हणायची ठीक आहे तूच सगळं करणार आहेस म्हणतो आहेस तर करूया. तिला पूर्ण होत नसे पण अजूनही काहीतरी आपल्या हातून होऊ शकतंय यात आम्हा दोघांना मोठे समाधान असे. पीठ मळणे आणि पहिली चकली तळून बघणे एवढं ती करू शकायची. दोन वर्षांपूर्वीपर्यंत तर ती करंज्या करायलाही मदत करत होती. यावर्षी मात्र मळण्याचे काम मी केले. तिने पहिल्या दोन-तीन चकल्या पाडून तळून बघितल्या.
आमच्या नेहमीच्या जवळच्या रुग्णालयावरून जाता येता मी म्हणत असे नको रे बाबा आता परत आईला इथे यायला लावूस. शेवटचं ती कोविड साठी जाऊन आली होती तेव्हाच तिने सांगितले होते की आता मला परत रुग्णालयात जायचे नाही. पण...
२०२५ जानेवारी मध्ये अचानक काहीच कारण नसताना तिची साखर दुपारी एकदम खाली गेली आणि तिला आकडी आल्यासारखं करू लागली. साखर तपासली तर ३३ होती. हाका मारल्या तर अगदी क्षीण प्रतिसाद देत होती. हाताच्या मुठी घट्ट वळून काहीतरी विचित्र आवाज काढत होती. आता जाते की काय असंच मला वाटलं होतं. जिवाचं अगदी पाणी पाणी झालं. लगेच रुग्णालयात घेऊन गेलो आणि त्यांनी कुठले तरी इंजेक्शन ताबडतोब दिले. अक्षरशः दहा मिनिटात ती शुद्धीवर आली. मी जवळ जाऊन आई काय म्हणतेस असं विचारल्यावर मी पुढे केलेला हात घट्ट धरून ती जे काही सुंदर हसली ते अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे. जीव भांड्यात पडणे हे मी त्या दिवशी अनुभवले. तिने मी बरी आहे असं बोलायचा प्रयत्न केला पण तोंडातून शब्दच फुटला नाही. पण मला कळले तिला काय म्हणायचे आहे. अजून दहा मिनिटांनी ती व्यवस्थित बोलू लागली. त्यावेळेस चार दिवस रुग्णालयात राहून आली. वाटले की चला गंडांतर टळले. पुढचे दोन-तीन आठवडे रक्तदाब आणि साखर नियमन करण्यामध्ये गेले. बोटाला टोचून टोचून ती अगदी कंटाळली. पण तरी करून घेत राहिली. स्वयंपाक तर रुग्णालयातून घरी आल्याच्या दोन दिवसातच तिने चालू केला. पण तरी पहिले पंधरा दिवस मीच तिला सांगितले की मी करतो तू फक्त बाजूला बस. आता मात्र तिला अवजड कुकर इकडून तिकडे हलवताना उचलून न ठेवता कट्ट्यावरून खेचत नेताना पाहिले आणि मनात चर्र झाले. जी गोष्ट ती सहज करू शकत होती तीच तिच्यासाठी कधीतरी करता येणार नाही इतकी पाळी येऊ शकते हे कधी माझ्या मनातच आलं नव्हतं. तीन-चार आठवड्यानंतर साखर आणि रक्तदाब दोन्ही गोष्टी आटोक्यात आल्या होत्या आणि स्थिर झाल्या होत्या. मात्र आता ती थोडा जास्त वेळ पडून राहायला लागली होती. जानेवारी महिन्यात त्या साखरेच्या प्रकरणात शरीरांतर्गत काहीतरी वाईट बदल झाले असणार. पण तिची सहनशक्ती खूप होती त्यामुळे जास्त काही होत असेल तरी ती सांगत नसे किंवा तिला वाटतच नसे की आपल्याला जास्त काही होतंय. तिला पायाला लावायला एक मलम आता डॉक्टरांनी सांगितले होते. ते मी तिला सकाळ संध्याकाळ लावून द्यायचो पण ती म्हणत असे मीच लावेन पण ते पोटरीच्याही खाली असल्यामुळे तिला जमत नसे. पण बाकीचं नेहमीचं सगळं मात्र स्वतःचं स्वतः करत असे.
मी आता तिच्या देखरेखीखाली तिच्या चवीचा स्वयंपाक करायला शिकत होतो. थोडाफार जमायलाही लागला होता. सगळं नेहमीसारखं चालू झालं होतं पण आता ती अधून मधून म्हणत होती किती दिवस आता राहिलेत कोणास ठाऊक. मी तिला म्हणायचो की मला तर तू कायमच पाहिजे आहेस पण तुला जोपर्यंत जगण्यात आनंद वाटतो आहे ते सगळे दिवस आपण आता किती दिवस राहिले आहेत याचा विचार न करता आनंदात जगू. तिच्या जानेवारीतल्या दुखण्यामुळे मात्र माझी मानसिक तयारी हळूहळू व्हायला लागली होती जी आधी कधीच झाली नव्हती. मे महिन्यात आमच्या घरी एक देवपूजेचा कार्यक्रम होता. तो नीट तिच्या हातून पार पडावा असं आम्हाला सगळ्यांनाच खूप वाटत होतं. त्यासाठी काय तयारी करावी लागेल कोण कोण येणार आहे वगैरे आम्ही बोलत होतो पण ती मात्र म्हणत होती की होणार की नाही नीट कळत नाहीये.

१६ मार्च २०२५
सकाळी तिचे गाणे ऐकू आले. मस्त वाटलं. आता उद्या साखर तपासून परवा डॉक्टरांकडे जाऊ असे ठरवले होते. तिची आंघोळ झाली. देवपूजा तर मी पाच-सहा वर्षांपूर्वीच माझ्याकडे घेतली होती. एकदा उभ्या उभ्या देवपूजा करताना तिच्या हातून दोन वेळा ताम्हन खाली पडलं आणि काही सुधरत नाहीये असं म्हणाली. मग मी तिला घट्ट मिठीत धरून हळूहळू करून पलंगावर नेऊन बसवलं. तेव्हापासून देवपूजा मी करू लागलो. आज तिने भाजी केली, ताक केलं. कुकर बनवून ठेवला आणि नंतर फक्त गॅसवर चढवायचा होता. आता आमटी थोड्यावेळाने करू म्हणून ती नेहमीप्रमाणे जाऊन आराम करत पडली. थोड्यावेळाने जवळपास एक महिन्यानंतर दादा तिला भेटायला आला. तासभर आम्हा तिघांच्या छान गप्पा झाल्या. मग ती आमटी करायला म्हणून उठून बसली पण लगेच म्हणाली की आज तू आमटी कर मला होईल असं वाटत नाही आणि लगेच परत पडली. आज आयुष्यात पहिल्यांदा तिने मला स्वयंपाकातलं हे तू कर असं सांगितलं. मनात थोडीशी पाल चूकचुकली. दुपारचं जेवण व्यवस्थित झालं. चार वाजताचा चहा आणि त्यानंतर गप्पाही उत्तमरित्या झाल्या. सकाळी छातीत थोडं दुखतंय असं म्हणाली होती पण आत्ता चहाच्या वेळेस आता नाही दुखत आहे असं पण म्हणाली. आत्ता खरंतर बहिण यायची पण वेळ झाली होती कारण तिला येऊन पंधरा दिवस झाले होते. पण तिने काही कारणामुळे ते उद्यावर ढकललं होतं ते आम्हाला माहित नव्हतं. रात्रीचं जेवणही नीट झालं. मग ती स्टार प्रवाह परिवार पुरस्कार बघत बसली. तासाभराने साडेनऊ वाजता मी नेहमीप्रमाणे तिच्या जवळ जाऊन विचारले काय कसा आहे प्रोग्रॅम? माधुरी दीक्षित येऊन गेली की नाही? तर छान हसून म्हणाली हो येऊन गेली आणि चांगलं मराठी बोलते.
मी तिच्या डोक्यावर थोपटून, उद्या सकाळी चहा प्यायच्या आधी आपल्याला साखर तपासायची आहे याची आठवण करून दिली आणि बाहेरच्या खोलीत येऊन टीव्ही बघत बसलो. पंधरा वीस मिनिटांनी मला श्वास अडकल्यावर आवाज येतो तसा आवाज आला आतल्या खोलीतून. मी धावतच आत गेलो तर खुर्चीत बसलेल्या तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. असं तिला पूर्वी एक दोन वेळा झालं होतं पण तेव्हा घास घेताना किंवा पाण्याचा घोट घेताना ठसका लागल्यावर मग श्वास घ्यायला त्रास झाला होता. आत्ता तर ती काहीच खात पीत नव्हती. तरीसुद्धा असं झालं होतं. मी घाबरून तिला चेहऱ्याला धरून हलवलं आणि आई आई अशा हाका मारल्या. पहिल्या श्वासाच्या वेळेस तिला कळत होतं की कोणीतरी आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहे. म्हणून तिने अगदी क्षीण असा प्रतिसाद देण्याचा प्रयत्न पण केला. दुसरा श्वास घेताना मात्र तिला तेही कळत नाहीये हे माझ्या लक्षात आलं. ती वर बघत होती आणि तोंड उघडं होतं. तिसरा श्वास घेताना मात्र मला तिचे डोळे चक्क विझलेले दिसले आणि मला कळले की तिचा प्राण गेला आहे. तिने इतका वेळ तोलून धरलेले मस्तक हळूहळू खाली लटकले. दोन क्षण गेले मला नक्की काय झाले आहे ते जाणवायला. मग मी पटकन तिच्या कपाळाचा आणि दोन्ही गालांचा पापा घेतला आणि लगेच ॲम्बुलन्सला फोन केला. आपण वाचतो की कधी कधी पटकन प्रयत्न केले तर माणूस वाचू शकतो. ज्या दिवसाची धास्ती गेली दोन-चार वर्ष वाटत होती आणि एक दोन वेळा तर स्वप्नात तशी परिस्थिती आहे असं वाटून घाबरून जागा झालो होतो, तो दिवस, तो क्षण आज प्रत्यक्षात चालू होता. स्वप्नात मला कळायचं की हे स्वप्न आहे आणि मी फक्त ठरवून जागं व्हायची गरज आहे. पण आज स्वप्नात असण्याचं सुख नव्हतं. रुग्णवाहिका येईपर्यंत मी तिच्या छातीवर दाब देऊन आणि कृत्रिम श्वास देऊन प्रयत्न केला. मला छाती भरते आहे हे कळायचं पण मग तो श्वास नुसता गर्र आवाज येऊन बाहेर पडायचा. उपयोग काही झाला नाही. मनात असाही विचार येऊन गेला की तिचा आत्मा हे माझे प्रयत्न आत्ता बघत असेल का. चालू असलेला टीव्ही बंद केला आणि जाणवलं की आता या टीव्हीचं काम संपलं. आणि त्या धारावाहिक बघण्याचंही प्रयोजन उरलं नाही. रुग्णालयाने त्यांच्या पद्धतीने तपासून सांगितले की ती गेली आहे. भावा बहिणीला आधीच कळवले होते आणि ते त्याप्रमाणे घरी आले होते. आता रात्रीच नेण्याच्या ऐवजी सकाळी लवकर नेऊ असे ठरवले. यावर्षीचा उन्हाळ्याचा एसी आज पहिल्यांदा लावला तोसुद्धा देह खराब होऊ नये म्हणून. रात्रभर जागेच होतो आम्ही. सकाळी सगळं आटोपून दुपारपर्यंत घरी आलो. संध्याकाळी सगळे आपापल्या घरी गेले आणि मी एकटा उरलो.
घरात कुठेही नजर टाकली तरी तिच्या वापरातल्या वस्तू दिसत होत्या आणि जाणवून देत होत्या की यांचा उपयोग आता संपला आहे. आता त्या परत कधीच आईच्या हातून तरी वापरल्या जाणार नाहीयेत. तिची फणी, कंगवा, पेन, धार्मिक पुस्तक, काहीबाही लिहून ठेवलेली वही, वेगवेगळी मलमं, डोळ्यात घालायचं औषध, नारळाचं तेल, गोधडी, या गोष्टी तिच्या चष्म्यामधून माझ्याकडे पाहत होत्या. खुर्चीवर तिचा आज वापरलेला पंचा होता आणि एक छोटा नॅपकिन पण होता जो ती सतत जवळ बाळगायची. घरात घालायच्या चपला खुर्चीपाशी होत्या ज्यातील उजवी चप्पल अर्ध्या इंचाने जास्त जाड करून घेतली होती. पूर्वी तिच्या मांडीचे हाड मोडले असताना ते सांधताना पायाची लांबी थोडी कमी झाली होती आणि पाय थोडा बाहेरच्या बाजूला फिरलाही होता. या चपला आता नवीन करायला झाल्या आहेत असं आमचं परवाच बोलणं झालं होतं आणि येत्या आठवड्यामध्ये मी त्या करून घेणार होतो.
स्वयंपाक घरात तर काय तिचचं राज्य होतं त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये तिची आठवण होती. अगदी वरच्या कट्ट्यावर असलेली एखादी प्लास्टिकची बरणी हात पोहोचत नाही म्हणून ती धुण्याच्या काठीने ढकलत ढकलत पुढे पाडायची आणि मग तिच्या दुसऱ्या हाताने शिताफीने झेल घ्यायची. पण त्याचे फिरकीचे झाकण ती कधी कधी नीट लावायची नाही आणि मग तिच्या हातून कधीकधी गोष्टी सांडायच्या. पूर्वी मी तिला ओरडायचो की लावतानाच झाकण नीट लावत जा ना. पण आता वाटतं निदान तीच सांडलवंड करायला तरी ती कायम पाहिजे होती. चहा करायला घेताना अजूनही मी चुकून माझा आणि तिचा कप कट्ट्यावर काढून ठेवतो. तिच्या कपाला दोन वर्षांपूर्वीच तडा गेला आहे पण त्यातून चहा मात्र अजिबात सांडत नाही त्यामुळे तोच वापरला जात होता कारण त्यातून तिला न सांडता चहा आणणं आणि पिणं करता यायचं. पण आता कधीतरी असाच चांगला कप आणावा असं आमचं बोलणं झालं होतं. तिचा शुगर फ्री पावडरचा डबा आता तिथे पडून आहे. मिसळणाचे डबे मला जाणीव करून देत असतात की आता त्या डब्यांवरून कधीही आईचा हात फिरणार नाहीये आणि आता मला तिच्या चवीचं जेवायला मिळणार नाहीये. आईच्या हाताची चव ही काही वेगळीच असते. माझ्या हातच्या पोळ्या मात्र तिला आवडत होत्या याचा मला खूपच आनंद आहे. गेली काही वर्ष कवळी चावते म्हणून कवळी न लावताच ती जेवत असे. त्यामुळे सगळेच पदार्थ मऊ असावे लागत. माझ्या पोळीचा तिला अजिबात त्रास होत नसे हेही महत्त्वाचे होते. जेवणाच्या ट्रॉलीमध्ये आता एकच ताट वाटी ठेवताना खूप वाईट वाटतं. मी अजूनही ट्रॉली घेऊन बाहेर येतो आणि तिच्या सिंहासनासमोर नेहमीप्रमाणे ती ठेवून म्हणतो, 'शोनीमनी, बसा जेवायला.' रात्री उरलेल्या दुधाचे विरजण लावताना तिची हमखास आठवण येते. नंतर दुधाचे भांडे घासायला टाकताना ती रोज त्यातली साय खरवडून खायची. मला खरंतर अशी साय खायची सवय नाही पण आता आईची आठवण म्हणून खातो. तिचा आंघोळीचा साबण पण आता तसाच पडून आहे.
सहज म्हणून साठलेली सगळी रद्दी चाळून शब्दकोडी वेगळी काढली. म्हटलं बघूया किती पूर्ण सोडवली गेली आहेत ते. सात आठ कोडी मिळाली. एकही पूर्ण सुटलं नव्हतं पण एका शब्दकोड्यात फक्त एकच आडवा शब्द, पहिल्या रकान्यापासून सुरू होणारा, अडला होता. आणि ते माझं चार अक्षरी नाव होतं. योगायोगाची गंमतही वाटली आणि उदासही वाटलं. मी ते नाव आईच्याच पेनाने भरून कोडं पूर्ण केलं आणि जपून ठेवलंय.
तिची कवळी आणि ती ठेवायचा डबा, टूथब्रश, जुना कंगवा आणि फणी, एक दोन जुन्या चपलांचे जोड, एक-दोन जुने चष्मे, शेवटच्या दिवशी वापरलेला गंगेच्या पाण्याचा गडू असं काय काय विसर्जन करून आलो. तो गडू पाण्यावर उपडा पडला आणि त्यामुळे बराच वेळ तरंगत राहिला. तो लाटांमुळे हळूहळू माझ्यापासून दूर जात होता. त्या गडूकडे पाहताना मला एकदम भरून आलं आणि जाणवलं की संपलं सगळं. मला धाय मोकलून रडायला येत नाही पण रडावसं वाटत होतं. आता मी याची देही याची डोळा या जन्मी तरी आईला कधीच पाहणार नाही. तिची ती प्रेमळ नजर आणि प्रेमळ हास्य आता कधी दिसणार नाही आणि तिचा मऊसूत स्पर्श आता कधीही होणार नाही हे मला ती गेल्यावर खऱ्या अर्थाने कळलं. बाहेरून आलो आणि चावी नसली की तिला खिडकीतून आई म्हणून हाक मारायचो आणि तिचं आले हे ऐकून आणि तिला सावकाश जपून जपून येताना बघून मला खूप आनंद व्हायचा. आता आई अशी हाक मारायला तीच नाही. आम्हा दोघांचं एक सुंदर असं जग निर्माण झालं होतं ते आता संपलं हे सारखं सारखं जाणवत राहतं.
एक समाधान प्रचंड आहे की ती शेवटपर्यंत हिंडती फिरती हसती गाती राहिली. तिचं ओझं कधीच दुसऱ्यावर झालं नाही. अवर्णनीय, अमर्याद आणि निर्व्याज अशी आईची माया मात्र आम्हा सगळ्यांना कायम मिळाली.

१८ मार्च २०२५
आज सकाळी गाण्याची लकेर कानावर आली नाही आणि जाणवलं की आता ती कधीच ऐकू येणार नाहीये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Sad अगदी मनापासुन लिहिलेय.

आई नेहमी सकाळी उठवायला ताई म्हणुन फक्त एकदाच मला हाक मारायची. दिवसाची सुरवात तिच्या आवाजाने व्हायची. ती गेल्यावर फक्त एकदाच मला ती हाक स्पष्ट ऐकायला आली होती. भासच असणार पण इतका स्पष्ट…

बापरे! अंगावर काटा आला वाचून.
किती निर्मळ लिहिलंय!!
आई लेकाच्या या निर्व्याज नात्याला सलाम.
तुम्ही धीराने घ्या. खूप केले तुम्ही आईचे.
डोळ्यांत पाणी आले वाचून.
माझ्या आईला वाचून दाखवले थोडा पार्ट !

मी काल पूर्ण वाचलं. पण काय प्रतिक्रिया द्यावी,‌ हे सुचत नव्हतं. बारीक सारीक गोष्टी लिहीलंय. त्यामुळे तुमचं नातं, आई-मुलामधला प्रेमाचा बंध, घर डोळ्यासमोर आलं.

काय म्हणू? स्वतः:ला सावरा. आवडणाऱ्या ॲक्टिव्हिटी -छंदांमधे मन रमवा. हे सांगायला सोपं, करायला किती कठीण आहे, ह्याची कल्पना आहे. पण पुढे तर जावं लागतंच.

अगदी खोलवर पोचलं.
यातल्या अनेक आठवणी तर माझ्याच वाटल्या. माझ्या आईलाही ग्रॉइनमध्ये हेअरलाइन फ्रॅक्चरमुळे बेडरेस्ट सांगितली गेली होती. तेव्हापासून स्वयंपाक आणि अगदी चपात्या करणं माझ्याकडे लागलं. तोवर मदत करायचोच. आता ती मदतनीस झाली. फुड प्रोसेसरमध्ये कणीक मळणं - तिने ती नीट करणं - बिछान्यात बसूनच लाटून देणं आणि मी त्या भाजणं . बेड रेस्ट संपल्यावरही हे असंच राहिलं.
त्यानंतर तिचं एकटीने बाहेर जाणं बंद झालं. तोवर ती बाजारहाटही करीत असे.
कोविड - १० दिवसांचं हॉस्पिटलायझेशन - शेवटची घशातली घुरघुर - फक्त तेव्हा ती दुपारच्या जेवणानंतर झोपली होती.

माझी आई स्टीलच्या पेल्यातून चहा प्यायची आणि आमच्या तिघांच्या - मी , आई आणि बाबा - चहासाठी पाणी मोजायला तोच पेला घ्यायचो. ती गेल्यावर सकाळी काही दिवस तो पेला नकळत घेतला जायचा आणि ती नाही याची जाणीव प्रकर्षाने व्हायची.

आई गेल्यावर तिच्या आठवणी लिहून काढल्याने माझं दु:ख हलकं झालं होतं. तुमचंही होवो.

काल वाचल पण काही सुचल नाही, खुप वाईट वाटले. तु देशात कधी गेलास माहिती नाही, पण तु शेवट पर्यंत आई सोबत होतास हे किती चांगले. सावरायचे बळ मिळो तुला.अगदी डोळ्या समोर आल्या तुझ्या आई.

आपल्या मुलाची प्रेमळ सोबत आपल्यासोबत आहे या गोष्टीने तुमच्या आईंना नक्कीच खूप समाधान वाटले असेल.
आईंना श्रद्धांजली

फार हृद्य लिहिले आहेत. किती लोभस नाते होते तुमचे आईबरोबर. आईचे नसणे आयुष्यभर जाणवते. ती नसते पण तरीही आपल्याबरोबर सतत असतेच. येणारा काळच थोडी सवय करून देईल तिच्या प्रत्यक्ष नसण्याची. तुमच्या आईंना श्रद्धांजली!

गुरुजी, उत्तम लिहिले आहेस, फेबु वर बातमी बघितली होती, वाचून पुन्हा वाइट वाटले. ही एक जखम लवकर भरुन येत नाही. ओम शान्ती !

माय लेकाचे सुंदर नाते तर आहेच...पण एक गोष्ट बोलल्याखेरीज राहवत नाहीये..
की या सर्व प्रवासात तुम्हाला बायको नसल्याने, हे प्रेम तितकेच छान, सोपे सरळ आणि निर्मळ राहिले.
त्यावर असूयेचे, तुलनेचे, अपेक्षांचे सावट कधी चढले नाही!!
तुमचीही कुतरओढ झाली नाही.
I am sorry if I am getting too personal !

अगदी आतून लिहिलं आहे. तुम्हां दोघांच्या नात्याला सलाम!
काळ हेच औषध होय.

असं ओरडत असे. नंतर ओरडलो याचे वाईट वाटे. कळतं पण वळत नाही हे आपण आपल्या माणसांच्या बाबतीत किती सहज करतो. ... .... अगदी अगदी.सध्या मी यातून जातेय.

इथे अप्रस्तुत आहे तरीही लिहिते.मुलाने दम मारला तर आयामंडळी जास्त रागावत नाही.पण मुलीने तसं केले तर फुगा होऊन बसतात ही एक मौज आहे.

काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाही!
किती मनापासून प्रेमाने काळजी घेतलीत तुम्ही आपल्या माणसाची!
भरत म्हणतो तसं लिहून काढल्याने तुमचं दु:ख हलकं व्हायला मदत होवो.

किती ह्रद्य लिखाण. तुमच्या आईबरोबरच्या नात्याबद्दल किती तरलेनेनं तुम्ही लिहू शकलात. हे लिहील्याबद्दल आभार.

सव्यसाची, तुम्हाला हे दु:ख पचवायला बळ लाभो. लिहून मोकळं होता येईलच असे नाही. तुम्हाला रडायला खांदा देऊ शकत नाही की पाठीवर हातही फिरवू शकत नाही. त्यामुळे फक्त सहसंवेदना व्यक्त करतो.

सर्वांना धन्यवाद ! आई हा विषयच असा आहे की प्रत्येक वाचकाला त्याच्या आईची आठवण येऊन हा लेख मनापर्यंत पोहोचेल हे नक्की.
रिमझिम, मी परत आल्याला आता बरीच वर्षे झाली. त्यामुळे दीर्घकाळ आईचा सहवास मिळाला.
इथल्या काही मायबोलीकरांना मी का परत आलो हे माहीत होते, जसे की वाटसरू. त्यांच्यापर्यंतही ही माहिती पोहोचावी असे वाटले. आणि मायबोलीवर बऱ्याच काळात मी काही लिखाण केले नव्हते. यानिमित्ताने तेही झाले.
छल्ला, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. एकटाच असल्यामुळे कुठलीही गुंतागुंत, कुतरओढ झाली नाही.
देवकी, अगदी बरोबर. आईकडून मुलाला थोडे झुकते माप मिळतेच Happy

अनेक वेळा वाचून गेले पण प्रतिसाद काय लिहावा हे सुचत नव्हते.
अगदी मनातले तरी ही साक्षीभावाने लिहिले आहे असं वाटलं वाचताना.
ह्या जगात आई असणे आणि आई नसणे ह्यात जमीन अस्मानाचा अस्मानाचा फरक आहे. त्याच वेळी मातृ वियोग होणे अटळ आहे, तेव्हा सांभाळून रहा.

मला नीट वाचताच आलं नाही. दोन वेळा प्रयत्न केला. आई जाण्याचं दुःख झालंय सोसून. अचानक गेली कोव्हीडमधे, तेही ६१ वर्ष वय फक्त. मला अजिबातच बोलता येत नाही मोठ्या दुःखांबद्दल, ती दुःखंही sacred होऊन बसतात.
असो. तुम्हाला बळ मिळो. आपल्या रूपाने ती आपल्या सोबत आहे असेच समजू.

अस्मिता, अगदी माझीच स्थिती लिहिली आहेस..
मी पण इथे फक्त प्रतिसाद वाचते.. मूळ लेख वाचायची अजून पण तयारी नाहीय... आई जरी अचानक नाही गेली तरी ते दुःख अजून तितकेच त्रासदायक आहे...

फार दिवस झाले
वाचेन म्हणून ठेवलेला लेख
आता वाचून झाला

खूप हृद्य आठवणी आहेत लेखात
तुमचं नातं किती छान सांभाळलं दोघांनीही
म्हातारपणाचा बाउ न करता स्वावलंबी असणारी तुमची आई आणि तुम्ही दोघेही भारी आहात
आई आहेच, जात नसते कुठे
Happy

काय लिहू ते कळत नाहीये. फार हळूवार आणि नितळ आठवणी मांडल्या आहेत तुम्ही. वाचताना डोळे भरून आले!
दुःख वाटल्याने हलके होते म्हणतात. तसे या लेखाने ते कणभर तरी हलके झाले असेल तरी खूप झाले!
तुमच्या आईला श्रद्धांजली!

फार प्रयत्नपूर्वक वाचून पूर्ण केले, सव्यसाची. हृद्य लिहिले आहे. माझी आई गेली त्याला एक महिना झाला. वाचताना तिच्या आठवणी दाटून आल्या.