आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई
हे गाणे श्री गदिमा यांनी एका लहान मुलीच्या तोंडी लिहिले आहे कि लहानपणी आई कसा जाच करते, ते मी तिची आई झाले तर तिला दाखवून देईन या अर्थाने.
आता स्थिती उलटी होऊ घातली आहे. मुलगा किंवा मुलगी आज आईबापांना जास्त दिवस सांभाळतो अशी स्थिती आली आहे
हि आज अनेक घरात दिसणारी कहाणी आहे. सत्य घटनांवर आधारित आहे. नावे अर्थात बदलली आहेत.
शंकरराव पाटील हे खान्देशातील एक बडे प्रस्थ. ते आणि पार्वतीबाई एरंडोल येथे एका मोठ्या वाड्यासारख्या घरात राहत असत त्यांची भली मोठी शेती होती आणि व्यापार होता.
त्यांना वसुधा नावाची एकुलती एक मुलगी. पुढे तिचे लग्न एका सुस्थितीत असलेल्या घरी करून दिले.
जावई वसंतराव आर्किटेकट असून मुंबईत व्यवसाय करत असे. वसंतराव अत्यंत सुस्वभावी हसतमुख आणि मितभाषी होते.
वसंतराव आणि वसुधा याना एक गोंडस मुलगा होता. हे तिघे आपल्या मुंबईतील दोन बेडरूमच्या घरात राहत असत. वसंतरावांचे आईवडील मुंबईतच दुसऱ्या घरात राहत असत.
दुर्दैवाने शंकरराव याना कसला तरी कर्करोग झाला आणि मुंबईत टाटा रुग्णालयात उत्तम उपचार करून केवळ ५३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
पार्वतीबाई गावच्याच घरात राहत होत्या. कारण तेथे त्यांचे भाडेकरू आणि इतर सर्व नोकर चाकर होतेच. शंकरराव गेले तेंव्हा त्यान्चे वय केवळ ४८ होते.
अंगात धमक होती शिवाय सासरचा आणि माहेरचा पैसा होता. मुलगी जावई जाऊन येऊन होते.
करायला कोणी नाही म्हणून गावची शेती विकून टाकली. घर (वाडा) होता तो तसाच ठेवला. कालांतराने भाडेकरू सुद्धा सोडून गेले.
मग वाडा पाडून तेथे दुमजली इमारत बांधली. दोन मोठे फ्लॅट ठेवले आणि बाकी विकून टाकले. पार्वतीबाई एका फ्लॅट मध्ये राहत आणि शेजारचा तसा बंदच होता.
जशी साठी जवळ आली तसे मुलीने निर्णय घेतला आता आईला एकटे ठेवायला नको. मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले आणि पार्वतीबाई कायमच्या मुलीच्या घरी राहायला आल्या.
कानाला ऐकू कमी येऊ लागले तसे त्यांच्याशी बोलायला इतरांना मोठ्याने बोलावे लागे. यासाठी त्यांना मुलीने एका चांगल्या कानाच्या तज्ज्ञाला दाखवले त्याने कानाला वयपरत्वे कमी ऐकू येऊ लागले आहे त्यासाठी यंत्र लावा म्हणजे स्पष्ट ऐकू येईल असा सल्ला दिला.
अर्थात मला काही कमी ऐकू येत नाही आणि मी काही कानाला यंत्र लावणार नाही असे पार्वतीबाईनी ठणकावून सांगितले.
त्यातून जरा चांगले यंत्र पंचवीस हजार रुपयाला येते असे ऐकल्यावर तर त्या कान नाक घसा तज्ज्ञांच्या सात पिढ्यांचा उद्धार झाला
सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही तसे पार्वती बाईंचे होते. दोन बेडरूम पैकी एक बेडरूम मध्ये त्यांनी आपला डेरा टाकला आणि नातवाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागले.
नातू इंजिनियरिंग ला गेला तसा हॉस्टेल ला गेला त्यामुळे आता घरात पार्वतीबाई मुलगी आणि जावई असे तिघेच.
पार्वती बाईंचा स्वभाव चिडचिडा झाला होता. आपल्या बेडरूम मध्ये त्या दुसरे कोणतेही सामान ठेवू देत नसत. मुंबईत खोल्या लहान म्हणून जातायेता मुलीकडे उद्धार चालू असे. त्यातून आपले सामान बेडरूम मध्ये ठेवले तरी त्या मात्र बाहेरच सोफ्यावर बसत असत.
दिवसभर काहीही काम करत नसत कि बाहेर जात नसत. त्यामुळे वजन प्रमाणाबाहेर वाढलेलं होतं त्यामुळे गुढघे दुखीचा त्रास चालू झाला होता. नको तितके खाल्ल्यामुळे आणि वयपरत्वे गॅसेस चा त्रास होता.
त्यामुळे बाहेर सोफ्यावर बसून वेळी अवेळी कायम ओ~~ब्बा अशी भयाण ढेकर देत असत.
दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता त्यांना जेवायला लागायचे. जावई दुपारी एक दीड ला जेवायला आला तरी त्या त्याची वाट पाहत नसत किंवा रात्री आठ वाजेपर्यंत थांबण्याची त्यांची तयारी नसे. त्यामुळे मुलीला त्यांना प्रथम वाढून द्यायला लागायचे.
आपण गरम गरम जेवून झालं आणि मुलगी जेवायला बसली कि त्या बेडरूम मध्ये जाऊन ठणठणीत आवाजात अग मला सुपारी आणून दे, माझं औषध आणून दे, पंखा कमी कर, पाणी आणून दे अशी काहींना काही मागणी करून तिला जेवणावरून उठवत.
त्यांनी दीड ला झोपायची सवय लावून घेतली होती. जावई परत गेला आणि मुलगी मागचं आवरून अडीच वाजता झोपायला गेली कि तीन वाजता यांचा गजर सुरु होत असे, अग मला चहा करून दे. चहा बरोबर मारीची बिस्किटं लागत असत.
चहा झाला कि चार वाजता त्या आपल्या जुन्या भ्रमणध्वनीवरून कोणा तरी मैत्रिणीला बाहेरच्या खोलीत सोफ्यावर बसून फोन करत असत आणि मग अर्धा तास मोठ्या आवाजात त्यांचं बोलणं चालत असे.
त्यांना मुलीने सांगितले कि संध्याकाळी जरा बाहेर जाऊन ये चार बायका भेटतील वेळ चांगला जाईल पण नाही माझे गुढघे दुखतात आता चार जिने ( दोन मजले) कोण उतरणार आणि परत चढणार? असे सांगितले. बिचारी मुलगीच संध्यकाळी बाहेर जात असे बाजार करून चार मैत्रिणीना भेटून परत येत असे.
परत आल्या कि मला जळजळ होते आहे जेवायला वाढ हा तगादा सुरु होत असे. मुलगी स्वयंपाक करे पर्यंत त्या टीव्ही वर कुठल्या ना कुठल्या मालिका लावून बसत. आता नीट ऐकू येत नसे म्हणून मोठ्या आवाजात टीव्ही लावला जात असे ज्यामुळे कोणत्याही खोलीत त्याचा भरपूर आवाज येत असे.
सात ला त्या जेवायला बसत. जावई आठ वाजता परत आला तरी सारखं मला हे दे ते दे करत मुलीला नवऱ्याबरोबर चार गोष्टी बोलायला सवड देत नसत.
नातू इंजिनियर होऊन नोकरीला लागला तो नोकरी नंतर रात्री उशिरापर्यंत बाहेरच असे त्यामुळे त्याचे फारसे नडत नसे. पण यथावकाश त्याचे लग्न झाले तेंव्हा नातसुनेला या गोष्टी खटकत असत. यामुळे नातवाने आखाती देशात नोकरी पत्करली आणि तो बायकोला घेऊन तिकडे निघून गेला.
सुटीवर आला तरी तीन चार दिवस घरी येत असे मग आठवडा भर सासरी( पुण्याला) जाऊन परत जाताना एक दोन दिवस राहून परदेशात जात असे.
नातू काही आजी जिवंत असेपर्यंत तिकडची नोकरी सोडून परत आला नाही.
पुढे वयामुळे पार्वतीबाई जास्तजास्त गलितगात्र होत गेल्या पण त्यांचा ताठा कधी कमी झाला नव्हता. शेवटची दोन वर्षे त्या अक्षरशः अंथरुणात होत्या पण मुलीने कधी तोंडातून अक्षर काढले नाही.
जावई भला माणूस होता त्यामुळे किंवा खेड्यातील पार्श्वभूमीमुळे आपल्या आईला वृद्धश्रमात ठेवावे असा विचार मुलीने कधीही केला नाही.
शेवटची आठ नऊ वर्षे त्या परावलंबी झाल्यामुळे वसुधाताईंना कुठे दूर सहलीला किंवा पर्यटनाला जाणे पण अशक्य झाले होते. त्यांची स्वतःची पण साठी जवळ आल्याने त्यांची दमछाक होत असे. अर्थात घरात काही कुरबुरी होती असतील पण त्या आमच्या पर्यंत आल्या नव्हत्या
वसुधा ताईंची चुलत बहीण माझ्या संपर्कात असल्यामुळे यातील काही गोष्टी ज्या अन्यथा बाहेरच्याला दिसल्या नसत्या त्या आमच्या लक्षात आल्या. "पार्वती काकू आपल्या मुलीला फार छळतात" या शब्दात तिने आम्हाला सांगितले तेंव्हा या बाबीचे गांभीर्य आमच्या लक्षात आले
हि स्थिती पार्वती बाईंचे वय वर्षे ८४ मध्ये निधन होईपर्यंत कायम होती.
म्हणजे आईने मुलीला १९ वर्षे सांभाळले आणि मुलीने आईला २४-२५ वर्षे.
आज डॉक्टर म्हणून मी लोकांच्या घरी जातो तेंव्हा या अशा अनेक कथा ऐकायला आणि पाहायला मिळतात.
समाजमन अजूनही अशा वृद्धांना वृद्धाश्रमात ठेवण्याच्या बाजूने तयार झालेलं नाही.
घरातच राहून वृद्धांची काळजी घेणारी माणसे मिळू शकतात पण मागच्या पिढीतील लोकांचे अशा गोष्टीवर पैसे खर्च करावे अशी मनोवृत्ती सुद्धा नाही.
या प्रश्नाला नक्की असे उत्तर नाही. प्रत्येक कुटुंबाला आपला प्रश्न आपल्या आहे त्या परिस्थितीतच सोडवावा लागतो.
बऱ्याच वेळेस हे प्रश्न घरच्या बाईलाच सोडवावे लागतात आणि मुंबईत तर जागांचे भाव आभाळाला भिडलेले असल्याने एक अतिरिक्त खोली असणे हि चैन आहे आणि ती बहुसंख्य लोकांना परवडत नाही.
अतिरंजित आणि एकतर्फी चित्र
अतिरंजित आणि एकतर्फी चित्र आहे. अर्थात असं कुठे घडतही असेल. पण सार्वत्रिक म्हणावं असं आहे का याबद्दल शंका आहे. पात्रांची वयंही कमी वाटतात. नव्वदी जवळ आली तरी अॅक्टिव्ह असलेले बरेच लोक पाहण्यात आहेत.
पार्वतीबाईंनी गावची संपत्ती विकून मिळालेल्या पैशांचं काय केलं? तो पैसा मुंबईत मोठं किंवा वेगळं लहान घर घ्यायला वापरता आला असता.
शेवटचा वृद्धाश्रमात राहायला जाण्याचा (ठेवण्याचा असे मुद्दाम लिहीत नाही) मुद्दा मान्य आहे. त्यावर अनेकदा अनेक जागी लिहून झालं आहे, म्हणून पुन्हा इथे लिहीत नाही.
इतका गडगंज पैसा होता तर दोन
इतका गडगंज पैसा होता तर दोन ऐवजी तीन खोल्यांचं घर का नाही घेतलं?
आणि असं अॅनेक्डॉटल लिहून नक्की काय सांगायचं आहे असं झालं.
तंतोतंत हेच एक अगदी जवळच्या
तंतोतंत हेच एक अगदी जवळच्या नात्यात घडले. त्या आईने नवर्याची काही वर्षे काळजी घेतली व पुढे एकटी काही वर्षे राहिली. मुळचा चिडका स्वभाव. ऐकू येणे कमी होत गेले त्यामुळे बहुतेक एक स्वत:चे विश्व डोक्यात तयार होवू लागले. जावयाबद्दल काहितरी अढी होती मनात तिने उग्र रूप घेतले. पुढे सिनाइल डिमेन्शिया (?) असे निदान झाले. ५८-६५ या वयातली मुलगी , ६३-७० वायतला जावई, आणि ८० ते ८७ वयातली रागीट, उग्र आई - असे सगळेच खरे तर म्हातारे.
वाढणारी वयोमर्यादा, वृद्धाश्रमांची कमतरता तसेच ती संस्कृती नसणे/न स्विकारणे याने हा प्रश्न गंभीर होत जाणार आहे.
अशी अनेक उदाहरणे मी स्वतः
अशी अनेक उदाहरणे मी स्वतः पाहिली आहेत व यात काहीही अतिरंजित काहीही नाही.
खरच डोकेदुखी असतिल असे लोक.
खरच डोकेदुखी असतिल असे लोक. कसं डील करायचं? मैत्र निवडता येते, नातेवाईक नाही.
मुलीनेच ठणकवायला हवे होते.
छान लेख.
छान लेख.
अशी बरीच उदाहरणे पाहिली आहेत.
अशी बरीच उदाहरणे पाहिली आहेत.
जो पर्यन्त पुर्णतः स्वावलंबी आहे तो पर्यन्त जसे चालले आहे तसे चालु द्यावे. मुलीने साठी मध्ये घरी. नेण्याऐवजी ७०-७५ मध्ये घेउन गेली असती तर त्या काळात (१०-१५ वर्ष) सगळे सुखाने जगले असते.
ह्यातल्या आईचा जो स्वभाव आहे
ह्यातल्या आईचा जो स्वभाव आहे तसाच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त उग्र स्वभाव माझ्या आईच्या आईचा होता. माझी मावशी गावातच लग्न केलेली त्यामुळे ती आजीच्या तावडीतुन सुटलीच नाही. तिला इतके प्रचंड छळले आजी व मामाने त्याला तोड नाही. शारिरिक कष्टाची कामे करुन घ्यायची, मावशी आजारी असली तरी दुर्लक्ष करुन आधी काम कर म्हणुन प्रेशर घालायचे आणि वर मानसिक छळही करायचा असे मावशीने आयुष्यभर सहन केले. तिने स्वतःचे सासर आणि माहेर दोन्हीकडे बैलासारखे काम केले, कसलेही सुख वाट्याला आले नाही. कामाची इतकी सवय की तिला सुखाने स्वस्थ बसवतच नसायचे!! आणि गावातल्या दोन मामांपैकी एकावर आजीची प्रिती, ती मावशीला त्याच्यासाठी राबवुन घ्यायची तर दुसरा आजीची अप्रिती असलेला मामा ‘त्याचे करतेस तर माझेही करायला हवे‘ म्हणुन राबवुन घ्यायचा.
माझी आई व दुसरी मावशी लग्न करुन शहरात आल्या म्हणुन बचावल्या. त्यांना कधी माहेरपण लाभले नाही, माहेरी जाऊन कधीही राहिल्या नाहीत. आजी मात्र मुंबईला आली की हट्टाने व हक्काने दोन्ही मुलींकडे येऊन राहायची आणि यथोचित पाहुणचार करुन घ्यायची. मुलींची तितकी आर्थिक परिस्थिती आहे का हा विचार कधी केला नाही. प्रिती असलेल्या मामाचे करावे लागायचे ते वेगळेच, लेखाचा तो विषय नाही.
मुंबईच्या मावशीबरोबर आजीचे प्रदीर्घ काळ भांडण व वाद सुरु होते ज्यात आजी नेहमी तिला तुझ्या मुलांचे कधी भले होणार नाही असे शाप द्यायची. दुर्दैवाने मावशीच्या मोठ्या मुलीचे लग्न झाल्यावर तिचा नवरा व नंतर ती असे दोघेही जवळपास विस वर्षे आजारी पडले, मुलबाळ होऊ शकले नाही. त्यामुळे शाप बाधला असे तिघी बहिणींचे मत झाले.
गावातल्या मावशीने आपल्या आईने आपल्या मुलांना शाप देऊ नये म्हणुन कायम पडती बाजु घेऊन आईने जे सांगितले ते सगळे केले. तिच्यावर कायम हे शापाचे मानसिक दडपण राहिले. तिने माझ्या काकाशी लग्न केल्यामुळे ती मला खुप क्लोज होती आणि मी गावी कायमचे राहायला गेल्यावर हळुहळु ही तिच्या आयुष्याची चित्तरकथा तिने मला सांगितली. आजीचा स्वभाव मला माहित होता पण इतका त्रास ती मुलीला देईल ही कल्पना मी केली नव्हती.
माझी मावशी शेवटी कर्करोगाने गेली.
आपल्या परिचयाबाहेर खुप मोठे जग आहे. ते आपल्याला अतिरंजीत वाटत असेल तर ते परिचयात यायलाच नको असे मी म्हणेन. कारण ते जग खुप वाईट आहे.
बापरे ! ऐकावे ते नवलच.
बापरे ! ऐकावे ते नवलच.
साधना , तुमचा किस्सा सुद्धा भयंकर आहे.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.
आपल्या परिचयाबाहेर खुप मोठे
आपल्या परिचयाबाहेर खुप मोठे जग आहे.. ....... अगदी खरे आहे.
आपल्या परिचयाबाहेर खुप मोठे
आपल्या परिचयाबाहेर खुप मोठे जग आहे.. .......
>>> +१
नात्यात एक उदाहरण पहाते आहे . त्यामुळे एक्दम रिलेटॅबल
काहीही अतीरंजित नाही.
काहीही अतीरंजित नाही.
नेहमीचीच उदाहरणे आहेत.
काही उदाहरणात तर पालक मुलींना छळून काढतात आणि मुलगा नावाला असतो आपला संसार सांभाळत आणि करणार्या मुलीला नावं ठेवणं चालुच.
माझ्याबालमैत्रीणीचा हा किस्सा आहे. तिची आई राक्षिशीण वाटेल अशी विचारांची आहे पहिल्यापासूनच.
रोजचे हेच बोलणं असतं तिचं.
काही आई वडिल खुप स्वार्थी किंवा एकलकोंडी होतात.
बरीच उदारहरणं पाहिलीत.
आपल्या आजुबाजुला घडत नाही किंवा आपल्याबरोबर घडलं नाही की दुसर्याची बाजुच खोडुन काढणे किंवा त्याचा अनुभव कसा खोटा असे करणे म्हणजे बालीशपणा वाटतो त्याचा/तिचा. असो.
उभं आयुष्य स्वार्थीपणे,
उभं आयुष्य स्वार्थीपणे, अत्यंत अप्पलपोटेपणानी जगल्यावर फक्त “मी म्हातारा /री झालोय म्हणून” अपत्यांकडून मानसम्मान, unlimited-unconditional सेवाचाकरी अपेक्षित असणारे, ते हक्काने वसूल करणारे आणि न मिळाल्यास मुलांची येथेच्छ बदनामी करणारे भरपूर जेष्ठ नागरिक पाहाण्यात आहेत. लेखातल्या उदाहरणाचे अजीबात आश्चर्य वाटले नाही.
आता ५०-६० च्या वयात असलेल्या पिढीसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे actually. पुढच्या आणि मागच्या दोन्ही पिढ्यांचे tantrums सांभाळत स्वत: sane रहाणे सोपे नाही.
>> आता ५०-६० च्या वयात
>> आता ५०-६० च्या वयात असलेल्या पिढीसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे actually. पुढच्या आणि मागच्या दोन्ही पिढ्यांचे tantrums सांभाळत स्वत: sane रहाणे सोपे नाही.<<<
+१०००००
अनिंद्य + १
अनिंद्य + १
>>>>>आता ५०-६० च्या वयात
>>>>>आता ५०-६० च्या वयात असलेल्या पिढीसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे actually. पुढच्या आणि मागच्या दोन्ही पिढ्यांचे tantrums सांभाळत स्वत: sane रहाणे सोपे नाही.
असावे. परंतु हे सर्वच पीढ्यांत होत असावे का? ५०-६० पर्यंत आपण मधली पिढी झालेलो असतो.
अनिंद्य, अगदी. वरच्या लेखातले
अनिंद्य, अगदी. वरच्या लेखातले काहीही अतिरंजित वाटले नाही. मी तर त्रासदायक, हेकट ज्येष्ठच जास्त पाहिलेत, शांत - मृदू वगैरे फारच क्वचित. माणूस म्हातारा झाला की आपोआपच चांगला कसा होईल, उलट अजून दुस्वासी आणि कडवट धार येते स्वभावाला बरेचदा. तरूणपणी पण हे लोक विशेष नसतातच फक्त ज्येष्ठ असणं ढालीसारखं वापरायचं. सध्यातरी आपण पुढे जाऊन असे ज्येष्ठ व्हायचं नाही एवढं ठरवलं आहे. वयाचा आणि मॅच्युरिटीचा काहीही संबंध नाही.
>>>>>>गावातल्या मावशीने
>>>>>>गावातल्या मावशीने आपल्या आईने आपल्या मुलांना शाप देऊ नये म्हणुन कायम पडती बाजु घेऊन आईने जे सांगितले ते सगळे केले. तिच्यावर कायम हे शापाचे मानसिक दडपण राहिले.
होय! असे असते. असे १००% असते.
हे गाणे श्री गदिमा यांनी.....
हे गाणे श्री गदिमा यांनी.....
मला या गाण्यावरचाच लेख वाटला होता
या समस्येचा अनुभव नसल्याने नो कॉमेंट्स.
आजूबाजूला अशी उदाहरणे पाहिली आहेत पण त्यांच्या घरात डोकावून नाही. आणि स्वतः अनुभवल्याशिवाय किंवा झळ बसल्याशिवाय त्यातील त्रास समजत नाही. सुरुवातीचे एक दोन अतिरंजित वाटल्याचे प्रतिसाद त्यातून आले असावेत. लेख वाचल्यावाचल्या ते प्रतिसाद वाचून मलाही काही वावगे वाटले नाही कारण माझेही अनुभव याबाबतीत तोकडेच आहेत. पण जग आपण बघतो अनुभवतो तेवढेच नसते याच्याशी सहमत.
साधना, तुमच्या मावशीची खरेच
साधना, तुमच्या मावशीची खरेच दया आली...
कोणाशीच नीट न वागणाऱ्या त्या आजीच्या शाप इतका परिणामकारक होतो हे पाहिले की हे कलियुग आहे असा विश्वास बसतो माझा.
नात्यातील एक म्हातारी बाई अशीच आहे, सगळ्यांकडून सेवा करून घेते पण स्वतः कुणासाठी काही करत नाही, तरी सगळे तिला घाबरून असतात... अगदी सोसायटी मध्ये पण बायका तिला घाबरतात..
उपद्रवमूल्य खूप जास्त असते अश्या लोकांचे...
कधी भेटू नये असे लोक.
यात काहीही अतिरंजित नाही.
यात काहीही अतिरंजित नाही. भीडेपोटी किंवा कर्तव्यापोटी सेवा करणाऱ्या मुलांना छळणारे असंख्य ज्ये ना आहेत. दूर्दैवाने त्यांच्या टॅंट्रम्सना आळा घालण्याइतका खमकेपणा सर्वांकडेच नसतो. त्यामुळे असल्या कुटुंबात पुढच्या पिढ्यांचे जगणे नासून जाते. अशा माणसांना अर्थातच पर्वा नसते.
लेखातला अनुभव अजिबात
लेखातला अनुभव अजिबात अतिशोयक्ति नाही, तसे खुप अनुभव एकिव आहेत आणी पाहण्यात सुद्धा आहेत..
मला साधनाने लिहलेला अनुभव वाचुन जास्त वाइट वाटल..आपल्याच मुलिला शाप देणार्या, बोल लावणार्या आइच काळीज काय असेल?
बाकि आयुष्यमान वाढलेल असल तरी बायका अजुनही गाव खेड्यात किवा शहरातही चान्गल चुन्गल, पौष्टीक ,फळ खाण यापेक्षा शिळपाक वैगरे खातात..पुरुष जेवायला नसतिल तर पुर्ण स्वयपाक सुद्धा काही घरात अजुनही बनत नाही..त्यामुळे ६० पासुनच थकलेल्या असतात..त्यामुळे जिवनमान वाढलय पण करता काहिच येत नाही हे खुप जणीच्या बाबतित आहे.
शिवाय हसुन खेळुन राहणारी व्यक्ती स्वतःच आणी दुसर्याच आरोग्यही चान्गलच ठेवते..कटकटे लोक स्वत:ही सुखाने जगत नाहि ना दुसर्याला जगु देतात.
ही तर घरोघरची कहाणी आहे हल्ली
ही तर घरोघरची कहाणी आहे हल्ली. 60-70 मधले सून-मुलगा आणि नव्वदीतले सासु-सासरे अनेक घरात आहेत. मजा ही की हे नव्वदीतले लोक त्यांच्या पन्नाशीपासूनच "वय जालं" म्हणत सूनेकडून सेवा करून घेतात पण त्या सुनेला मात्र साठीतही सेवाच करावी लागते.. कारण सुनेच्या सुना परगावी/परदेशी किंवा नोकरीच्या, आणि त्यांची मुलं उशीरा झालेली चारपाच वर्षाची असतात.. अशाप्रकारे ही साठीची सून जवळपास 35-40 वर्षं सासुसासरचया दबावाखाली, सेवा करत काढते.
सर्वायवल ऑफ फिटेस्ट!
सर्वायवल ऑफ फिटेस्ट!
इथल्या लोकांच्या परिचयातील.. जे शिकले सवरलेले, शैक्षणिक, आर्थिक सुस्थितीत आहेत, त्यांच्या सहज परिचयात अशा बायका नीट खात नसतील आणि स्वतःची स्वखुशीने आबाळ करून घेत असतील तर त्यांच्याबद्दल जराही सहानुभूती नाही.. सॉरी टू से! रडगाणे गाणारी माणसं माझ्या डोक्यात जातात. आनंदात जगावे, काही तडजोडी केल्या तर मनापासून आनंदात कराव्या. आनंदात करता येतील तितक्याच कराव्या.
बाकी जगात सगळ्याप्रकारचे लोक आहेत. त्यातून आपण खमकेपणा शिकावा. हे शाप, देव, धर्म, परंपरा, कुटुंबकबीला, श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबद्दल डोळस तिटकारा स्वतःच्या आणि पुढच्या पिढीत कसा निर्माण होईल ते बघावं. मनाला उभारी द्यायला देव आणि श्रद्धेचा टेकू कदापि घेऊ नये, इतर पर्याय शोधावे.
@साधना,
@साधना,
शाप लागतात यावर माझा विश्वास नाही. कावळ्याच्या शापाने गाय अजिबात मरत नाही. पण शापांना लोक घाबरतात हे पाहीलेले आहे. आणि मग त्या दुष्टात्म्यांना घाबरुन जगतात.
धनश्री अगं माझाही विश्वास
धनश्री अगं माझाही विश्वास नाही आणि तो बाधला असेही मला वाटत नाही. पण सर्व डोकी सारखी नसतात.
स्त्रियांना पहिल्यापासुन खुप कंडिशन केले जाते. मुखदुर्बळ/भिडस्त असणे हा स्वभाव आहे तर ’तु बाई आहेस तर अमुक तमुक करायला हवे’ हा बाहेरुन केलेला संस्कार आहे. माझ्या गावच्या मावशीच्या बाबतीत हे दोन्ही झाले आणि ती पिचत राहिली. तिने अवाक्षर काढले नाही, आतल्या आत जळत राहिली. तिच्या बहिणींवर बाहेरुन संस्कार झाला पण त्या भिडस्त नव्हत्या. संस्काराला जागुन त्यांनी जमेल तितके केले पण ते करताना आईचे वाभाडे काढत राहिल्या.
गावी माझे सगळे नातलग असले तरी मी स्वतंत्र राहते. मावशीला हजारदा सांगितले माझ्याकडे येऊन कायमची राहा, तिकडे जाऊच नकोस. ती यायची आणि दोन दिवसात परत जायची. कंडिशनिंग झालेले ते डोक्यातुन काढुन टाकु शकली नाही. त्रास देणार्याला आपण जावुन काही बोलावे तर तो म्हणतो ज्याला त्रास होतोय तो काही बोलत नाही तर तुला काय होतेय.
स्वभाव ही खुप विचित्र गोष्ट आहे. बुलीजना बरोब्बर बुलीईंग सहन करणारे लोक भेटतात. कोणी बुलिईंग सहन केलेच नाही तर बुली काय व कोणाला बुलीइंग करणार?? पण असे होत् नाही ना.
पंचवीस तीस वयाच्या अगोदरच
पंचवीस तीस वयाच्या अगोदरच प्रत्येकाने काही विरंगुळ्यासाठी छंद लावून घ्यायला हवेत. तेव्हा वयात उत्साह खूप असतो आणि त्रासाचे काही वाटत नाही. नंतर साठीनंतर वेळ कसा काढायचा हा प्रश्न पडत नाही. सरावाने छंदात मन रमते आणि म्हातारा/ती दोन चार तास घरातून कटणार असल्याने घरातील तरुणांनाही जरा मोकळा श्वास घेण्याला अवधी मिळतो.
मागल्या लोकांचं झालं ते जाऊ द्या, आपलं काय हे आता ठरवा.
मागल्या लोकांचं झालं ते जाऊ
मागल्या लोकांचं झालं ते जाऊ द्या, आपलं काय हे आता ठरवा.>>> हे कसे करता येईल? आपल्याही गळ्यात आहेत की लोड.
मी आता लोड बनायच्या वयात आलेय
मी आता लोड बनायच्या वयात आलेय
तेच तर जाई !
तेच तर जाई !
By the time, आपण मोकळे होऊ, तोपर्यंत सगळा उत्साह आणि उमेद संपलेली असेल.
जन्म दिला म्हणून फुल वसुली करून घेतात ही लोक....!
Pages