घरटं ५

Submitted by रानभुली on 19 September, 2025 - 11:51

मागच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा.

रात्रीच्या अंधारात कंपनीच्या गेस्ट हाऊस वर चार जण बसले होते.

द्वारकानाथ, ते दोघे संन्यासी आणि राजवर्धन उर्फ हर्षवर्धन महात्मे.

द्वारकानाथ आणि दोघे संन्यासी बंगालीत बोलत होते.
ते सगळंच्या सगळं हिंदीत भाषांतर करून सांगणे थोडं जिकीरीचं होत होतं.
पण द्वारकानाथ प्रयत्न करत होते. कधी कधी काहीच्या काही अर्थ निघत होते. त्यामुळं गोंधळ उडत होता.
पण एकंदरीत हर्षवर्धन समजून घेत होता.

परिस्थितीच तशी होती.
संन्याशांनी बातमी सांगितली होती.

आदेश आला होता.
गुमनामी बाबांवर सरकारचा कडक पहारा होता. गुमनामी बाबा , हनुमान बाबा आणि अन्य काही लोक ज्यांच्या नावाने ते सुभाषबाबू असल्याच्या अफवा उठत होत्या अशा सर्वांशी संपर्कात असलेल्यांवर सुद्धा नजर ठेवण्यात येत होती.

या यादीत आता द्वारकानाथांचं नाव होतं.
आणि जर द्वारकानाथांशी जास्त संबंध ठेवले तर हर्षवर्धन वर सुद्धा नजर ठेवायला सरकार कमी करणार नव्हतं.
राज्य सरकार तसं मवाळ होतं. पण केंद्राकडून कडक धोरण आखलं जात होतं.

ही गुप्त बैठक कदाचित शेवटचीच.
नंतर मग सार्वजनिक ठिकाणी झाल्या तर झाल्या भेटी. मुद्दामून लक्ष आकर्षित करून घ्यायचं नाही असं ठरत होतं.

हर्षवर्धनला बराच काळ कुणी काही सांगत नव्हतं.
त्याने बरेच प्रश्न विचारले. ज्याचा अर्थ पूर्णपणे द्वारकानाथांना समजत नव्हता. पण काय विचारायचं असेल हा अंदाज नक्की आला होता.
त्यांनी एक जुना झालेला नकाशा काढला.

त्याच्यावर एक कविता असलेला कागद टाचणीने टोचलेला होता . गुरूदेव रविंद्रनाथ टागोरांची कविता होती.

रात्र काळोखी आणि जंगल अनंत
लखलख मार्ग लखलख जण
ते जोडत राहतात प्रयत्न
काळोखाच्या गुहेत टिकून राहण्याचे
पण कुठे ?
(इथे वाक्य तोडलेले होते. रविंद्रनाथांच्या कवितेत किंचित बदल केलेले लोकेंद्रनाथांच्या लक्षात आले)

कोण कुणासोबत , ना तुला ठाऊक ना मला
ना आपल्या कुणालाच
पण दृढ विश्वास आहे कि
आनंद कधीही येईल, कोणत्याही क्षणी'
(इथे आयुष्यभराचा हा शब्द गाळलेला होता )
ओठात हसू घेऊन

जाणीवा तेवत ठेवा
सुगंध, स्पर्श, आवाज, गाण्यांचे सूर
आपल्याला भिजवतील, आपल्यातून जातील,
आपल्याला आनंददायी धक्के देतील.
मग कदाचित वीज चमकेल:
ज्याला मी त्या क्षणी पाहतो त्याच्या प्रेमात पडतो.
मी त्या व्यक्तीला हाक मारतो आणि ओरडतो: '
हे जीवन धन्य आहे!
तुमच्यासाठी मी इतके मैल प्रवास केला आहे !'
जवळ आलेले आणि अंधारात , जंगलात
निघून गेलेले ते सर्व -
मला माहित नाही की ते अस्तित्वात आहेत की नाहीत.
तरी पण हा अंधार नाहीसा होईल
उदय होईल उषेचा
जंगलावर पहिला सोनसळी किरण पडेल
अंधारगुहेतून आपण बाहेर पडू..

द्वारकानाथ चिंतेत पडले.
जर ठाकूरांचीच कविता द्यायची तर अस्सल का नाही ?
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ठाकूरांच्या कवितेचं आणि या नकाशाचं नातं काय ?

त्यांनी आता हर्षवर्धनची मदत घ्यायचं ठरवलं.
भावना एव्हढी सच्ची होती कि भाषेचा अडथळा पार करून अर्थ पोहोचला.

हर्षवर्धनने मग त्याची ट्रंक उघडली.
त्यातून काही कात्रणे काढली.

गुरूदेवांचं कोरिया कनेक्शन. गुरूदेव उत्तर कोरीयात गेले होते. का? कशासाठी ? आजवर गूढच राहीलेलं.
गुरूदेवांच्या मृत्यूनंतर कोरीयाचं विभाजन झालं. चारच वर्षे आधी गुरूदेव जगाचा निरोप घेते झाले.
त्या आधीच कोरीयाची फाळणी कशी होणार हे शिजत होतं.
गुरूदेव उत्तर कोरीयाला गेले होते.
या भागात रशियाच्या हालचाली होत्या.
सुभाषबाबू पण स्टालीनला भेटायला गेले होते. पुढे जपानला गेले.
जपान वरून तैवानला येताना अपघात झाला. त्यात सुभाषबाबू गेले असाच दावा केला जातो.
पण गुमनामी बाबांमुळे हा क्लेम निकाली निघाला होता.

सुभाषबाबूंबरोबर एक खजिना होता.
त्यात ४३ किलो सोन्यासहीत अमाप पैसा होता. आणि..
जर ही गोष्ट खरी असेल तर जगाला माहीत नसलेला पण रशियाने आधी बनवलेला अणुबाँब सुभाषबाबूंकडे होता.

सरकारलाही आणि पाश्चात्य जगाला त्या सोन्यात रस नव्हता.
मध्यंतरी तो खजिना सापडला त्याची परस्पर विल्हेवाट लावली अशा बातम्या किंवा अफवा उठल्या होत्या.
पण हे सर्व पाश्चात्य जगाचा दबाव झ्गारून देण्यासाठी रचलेले डाव असू शकत होते.

जर या गोष्टीचा संबंध उत्तर कोरियाशी असेल तर मग ही कविता उगीच नाही.
त्यात केलेले बदल हेतूपुरस्सर केलेले असणार.

हर्षवर्धनने त्याचा अनुवाद हिंदीत करायला सांगितला.
पण एव्हढं कुठलं जमतंय त्या तिघांनाही.

द्वारकानाथांनी कशी बशी शेवटची ओळ भाषांतरीत केली.

मला माहित नाही की ते अस्तित्वात आहेत की नाहीत.
तरी पण हा अंधार नाहीसा होईल
उदय होईल उषेचा
जंगलावर पहिला सोनसळी किरण पडेल
अंधारगुहेतून आपण बाहेर पडू..

या ओळी त्याने लिहून घेतल्या. पुन्हा पुन्हा वाचल्या.
आणि त्याचे डोळे आनंदाने लकाकले.

"अरूणाचल प्रदेश ! "
"काय ? अरूणाचल प्रदेश काय ?"
" म्हणजे, आपल्याला अरूणाचल प्रदेशात शोध घ्यायला हवा. जंगलातल्या गुहेचा उल्लेख आहे यात."
" म्हणजे... म्हणजे.... युरेका ! जिथे सूर्याचा पहिला किरण पहाटे पडतो असा जंगलाचा हिस्सा "
" इट मेक्स सेन्स !"
"मग उत्तर कोरियाचं काय ?"
" नाही समजलं ?"
" काय ?"
"सुभाषबाबूंनी ते उत्तर कोरीयात वेगळ्या नावाने लपवून ठेवलं होतं. तेव्हां कुणाला शंका येण्याचं ़ कारण नव्हतं. आणि चीनमार्गे ते अरूणाचल प्रदेशात आणलं "
" बरोबर. चीनने या भागावर हक्क सांगितल्याने ब्रिटीशांची हालचाल इथे कमीच होती "

" हा नकाशा मग तूच बघ आणि व्यवस्थित समजावून सांग सर्वांना "
पण आता हे सगळं एकमेकांना समजावून सांगणं अवघड होत होतं.

इतक्या सीक्रेट गोष्टीची वाच्यता कुणासमोरही नको होती. अगदी जवळच्या माणसांसमोरही.
पण नाईलाज होता..
त्यांच्यावर आता सरकारची नजर होती.
आता या भेटी शक्य नव्हत्या. नकाशाबद्दल बोलायची ही शेवटची वेळ.
भाषा अडसर होती...
दुभाष्याची फार फार गरज होती.
विश्वासू दुभाष्याची !

अभिरूपाच्या आयुष्याला कलाटणी मिळणार होती.
कायमचीच !

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन भाग पटपट येत आहेत. उत्कंठा वाढत चालली आहे.
एक छोटी शंका, रशियन ऍटम बॉम्ब हलवणे शक्य होते का?
खास करून जेव्हा सुभाषबाबू ब्रिटिशांना गुंगारा देत वावरत होते ?

आतापर्यंत ही कथा कदाचीत सत्य घटनेवर आधारीत असेल असं वाटतं होतं.
आता कथेने वेगळंच वळण घेतलं आहे, उत्सुकता ताणली गेली आहे.
पुढील भाग पण लवकर टाका Happy

मध्ये जरा खंड पडलाय तर जुने भाग पुन्हा वाचणार. हा वाचून झाला की प्रतिसाद देणार आहेच मात्र --
पुढला भाग दसऱ्यानंतर चालेल एकवेळ पण ती ग्रेनोला स्मूदीची रेसिपी मात्र लवकर द्यावी.