मागच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा.
आज पहाटे पहाटेच अभिरूपाच्या आवाजात गच्चीवरच्या खोलीतून बैरागी भैरवचे सूर घुमत होते.
सहा वाजत आले तसं तिने भजन म्हणायला सुरूवात केली.
तिचे वडील देवळातून आले होते. अशा प्रसन्न वातावरणात लेकीचा गोड स्वर कानावर पडल्याने ते आनंदीत झाले.
एकदम वर गेलं कि मग मूड जाईल म्हणून ते स्वयंपाकघराजवळच्या चौकात ओट्यावर बसून राहीले. रूपाच्या आईने ते दृश्य बघितलं आणि आपल्याकडून काही चुकलं कि काय म्हणून लगबगीने ती त्यांना कही हवंय का म्हणून विचारू लागली.
लोकेंद्रनाथांनी तिला हातानेच गप्प बसण्याची खूण केली.
"लेकीचं गाणं ऐकताय होय ? " म्हणत आई थोडी दूर बसली. तिचा ऊर अभिमानाने भरून आला होता.
लक्ष केंद्रीत करण्यासाठी बैरागी भैरवसारखा राग नाही.
पण तिचं लक्षच केंद्रीत होत नव्हतं.
सारखा सारखा एक चित्रपट मनःचक्षूंच्या समोर चालत होता.
लोकेंद्रनाथांनी मिटून घेतलेले डोळे उघडले.
शंकराचं भजन बंद झालं होतं. अजून ओडव ओडव जातीचाच राग आळवला जात होता.
पण हे काय ?
मधेच संपूर्ण जातीचा भैरव सुरू झाला. कृष्ण भजनाची हिंदी बंदीश सुरू झाली.
" ओठत बाज मुरली आज. वृंदावन कुंज मे ए ए ए "
"लेकीचं चित्तं एकाग्र नाही आज. "
म्हणत ठाकूर उठले.
"खाली आली कि माझ्याकडे पाठव. "
म्हणत ते उठले. थोड्या वेळाने त्यांनी आवाज दिला तेव्हां धोतराचा सोगा काढून त्याचं एक टोक हातात धरलं होतं.
आज एकदम ठाकूरांच्या तोर्यात स्वारी म्हणत आई बघत राहिली.
शुभ्र सदरा आणि मोत्यांच्या माळा, पानाचा डब्बा सगळं घेऊन ते बाहेर पडले.
"रूपाला बोलवलंत आणि तुम्ही कुठे चाललात ?"
" येतो लगेच "
तिकडे रूपाचं काही ध्यान लागत नव्हतं.
कृष्णाच्या जागी कुणी तरी भलतंच दिसत होतं.
कृष्णाशेजारी राधा उभी होती.
अचानक गायीच्या ठिकाणी मोटार यायची.
कृष्णाने कमरेत घट्टं पण मांडीत ढगळ असलेली काळी पँट नेसलेली होती. ब्रिटीशांचा असावा तसा पांढरा सदरा.
मघाशी जेवताना बाहेर काढलेला पण आता पुन्हा आत खोचला होता .
तिने मानेला झटका दिला.
ते दृश्य किम्चितसं हललं,
जेलीसारखं पुन्हा एकमेकात मिसळलं आणि पुन्हा डोळ्यासमोर आलं.
परक्या माणसाच्या पुढ्यात मुलींनी जायचं नसतं.
पण बाबाने हाक मारली म्हणून ती गेली.
आईने विचारायला सांगितलं "जेवण नाही आवडलं का ?"
तिला एकदम ऑकवर्ड वाटत होतं. आईचं पण ना. कुठे काय विचारावं !
पण दोन तीन वेळा आईने पण हेका सोडलाच नाही तेव्हां हर्षवर्धननेच विचारलं.
" काही सांगायचंय का ?"
" काही नाही आई विचारतेय कि जेवण आवडलं नाही तुम्हाला. कमी जेवलात "
" अरे बापरे ! एव्हढा तुडुंब जेवलोय आज कि आता पोट फुटायला आलंय . आणि जेवण तर एकच नंबर झालेलं. मटण तुम्ही केलेलं ना ?"
ती लाजली.
"मी पण बनवतो बरं का. आमच्या कोल्हापुरी पद्धतीचं मटण एकदा खाल्लंत तर आयुष्यात विसरणार नाही. पण या जेवणाची चव मी सांगू शकत नाही. असं मटण जगाच्या पाठीवर कधीच खाल्लेलं नाही "
आईने विचारलं काय म्हणतात पाहुणे ? रूपाने बंगालीत तिला समजवून सांगितलं.
"उरी बाबा, पुरूष असून जेवण बनवतात ?"
आता हे सांगणं फारच जिवावर आलं होतं. आई म्हणजे आईच.
पण त्याने विचारल्यावर ती बदलून म्हणाली "आईला विशेष वाटतंय कि पुरूष स्वैपाक करतात "
हर्षवर्धनने स्मित केलं.
"एक दिवस बनवून खायला घालेन."
तिने धिटाईने विचारलं
"इथे ?"
त्याने खट्याळ हसत विचारलं "मग येणार का महाराष्ट्रात माझ्या हातचं जेवायला ?"
ती लाजून चूर झाली.
पण आईला दिसू नये म्हणून खाली वाकून पायाच्या अंगठ्याला उचलून घेत काटा काढण्याचा अभिनय करू लागली.
"काय म्हणात होते गं ते ?"
"काही नाही गं आई. "
म्हणत ती जे वर पळाली ते पहाटेच जागी झाली होती.
पहाटेपासून तिचे ध्यान करायचे, राग आळवण्याचे प्रयत्न फोल झाले.
मग स्वत:वर चिडून ती खाली आली.
सगळं उरकल्यावर आईने बाबांचा निरोप दिला.
बाबा स्टडीत बसले होते. कालचा तो लखोटा त्यांच्या हातात होता.
रूपाला बघून त्यांनी तिला जवळ बसायला सांगितलं.
" हे बघ. हर्षवर्धन एक चांगला मुलगा आहे. पण हे आपलं गाव आहे. लोक बोलतात. म्हणून वागण्या बोलण्यात अदब असू दे. सोबत फिरताना अंतर ठेवलं पाहीजे. तुझा बाबा लिबरल आहे पण शेवटी जननिंदे कडे काणाडोळा केलेला पण घातकच असतो. काय ?"
"हो बाबा"
"हर्षवर्धनला गरज पडेल तशी दुभाषी म्हणून मदत करायची. पण तो काय करतो यात जास्त रस घेऊ नको. काही कानावर पडलं तरी लक्ष देऊ नको. आणि महत्वाचं म्हणजे लक्षात राहीलं तरी तोंडावाटे बाहेर पडू देता कामा नये. "
"बाबा असं काय आहे ?"
" असं काही नाही. पण आपले पाहुणे आहेत तर आपण हे पथ्य पाळायचं. अजून तू बाहेर पडली नाही. ना तुझा भाऊ पडलाय. बाहेर वावरताना अशा गोष्टी पाळायच्या असतात."
"ठीक आहे बाबा "
बाबा असं का बोलत होते हे तिला समजत नव्हतं.
थोड्या वेळाने मोटार येणार म्हणून ती बाहेर जाऊन येते म्हणाली.
***********
महाकालीची पूजा आटोपून आता कोपर्यातल्या कृष्णाच्या मंदीराकडे जायला ती वळाली.
सकाळी सकाळी भजन नीट म्हणता आले नाही यासाठी क्षमा मागायची होती.
मंदीराचा दरवाजा उघडलेला नव्हता तरी कृष्णाची ती हसरी सुंदर मूर्ती दरवाजाच्या जाळीतूनही दिसत होती. तिने डोळे मिटून हात जोडले. माफी मागितली आणि डोळे उघडले तर मधुसूदनाच्या चेहर्यावर खट्याळ भाव असल्याचा तिला भास झाला.
यांच्यापासून काय लपणार ? म्हणत ती माघारी वळाली.
तर मागून आवाज आला.
तर परोमिता हात उंचावून तिच्याकडे बघत हसत होती.
" ए रूपा, काय गं विसरलीस का ?"
" अय्या परोमिता ? विसरतेय कशाला ? तीन दिवस पण नाही झाले भेटून "
" तसं नाही गं ! आता आमची आठवण नाहीच येणार तुला "
" ए कोड्यात नको बोलूस. काय म्हणायचंय सांग पटकन. घरी लवकर जायचंय ?"
" बास का ? तू जरी नाही सांगितलंस तरी आम्हाला कळलंय सगळं "
" अगं काय ? "
" बंबई का बाबू आलेत म्हणे तुझ्याकडे ?"
" बंबई का बाबू ?"
" हं ! जसं काही कळलंच नाही. देव आनंद गं "
" कोण देव आनंद ?"
" नको सांगूस "
" ओह ! अगं ते बाबांचे पाहुणे आहेत. त्याचं काय ?"
" मग ? मज्जा आहे ना एका माणसाची "
" अगं काहीच्या काहीच. सांगितलं ना बाबांच्या कंपनीच्या कामासाठी आलेत ते "
" ओळख करून दे ना !"
" अजिबात नाही . काही तरी बोलशील आणि फजिती माझी होईल "
" काय गं ! अजिबात मैत्रीला जागायचं नाही का ?"
" चल , मी निघते, उशीर होतोय, तू पण जा घरी "
" बरं बाई ! बंबई का बाबू वाट बघत असतील "
यावर दाबून ठेवलेलं हसू एकदम बाहेर पडलं. दोघी हसू लागल्या.
आख्ख्या गावात बातमी झाली होती. आणि हिला खबर लागली म्हणजे आता सगळ्या मैत्रिणींना समजलं असेलघरासमोर "
बंबई का बाबू ! मजेशीर नाव दिलं होतं.
*******************************************
घरासमोर मोटार येऊन थांबलेली होती. सगळे वाट बघत होते.
बाप रे ! उशीर झाला बहुतेक.
" अगं रूपा , किती वेळ ?"
ती काहीच बोलली नाही.
"बरं चल बस गाडीत "
आई, तिलोत्तमा ती स्वत: मागे आणि पुढे बाबा आणि बंबई का बाबू बसले होते.
गावाच्या बाहेर यायला गावातल्या पायवाटेने आलं तर वीस मिनिटं लागतात. मग जंगल.
पण मोटारने यायचं तर हमरस्त्याला जा. मग थोडं अंतर हमरस्त्याने कापायचं. पुढे जाऊन वळण घेऊन दुसर्या बाजूने गावाच्या बाहेरच्या शीवेवर यायचं. अर्धा तास लागला.
इथून मग पायी जावं लागायचं.
गर्द झाडीतून रस्ता जात होता. थोडं पुढे गेलं कि किंचितशा उंचवट्यावर असलेलं शुभ्र रंगातलं भव्य मंदीर.
कसलाही डामडौल नसताना हे मंदीर मनात श्रद्धा उत्पन्न करायचं.
संगमरवर लावलेल्या , सोन्या चांदीने मढवलेल्य़ा मंदीरात खर्चानेच जीव दडपतो.
इथे निसर्गाच्या सान्निध्यात नास्तिकही भाविक होऊन जातो.
बाबा उतरले. मग सगळे एक एक करून उतरले.
बाबा म्हणाले "सर्वांनी दर्शन करून घ्या, तोपर्यंत मी आलोच"
ते थेट संन्याशांच्या आश्रमाकडे चालू लागले.
हर्षवर्धन त्यांच्याकडे बघत होता.
आई म्हणाली "त्यांना सांग दर्शन आटोपून घ्यायला "
तिने हिंदीत सांगितले.
त्याने बाबांकडे पाहिलं आणि चेहर्यावर प्रश्नार्थक भाव आणले.
ती फक्त म्हणाली "आयेंगे, आप चलिये "
दर्शन घेऊन झालं तरी बाबा आले नव्हते म्हणून ते मंदीराच्या मागे पाय मोकळे करायला निघाले.
एका झोपडीकडे त्याने बोट दाखवलं
" इथे कोण राहतं ?"
तिने लगेच त्याचा हात खाली केला.
"तिकडे बघायचं सुद्धा नाही "
" का?"
" ती बाई तंत्र मंत्र करते. गावकरी तिला घाबरतात. "
" म्हणजे ?"
" म्हणजे मांत्रिक आहे ती बाई . कुणी तिच्या जवळ जात नाही "
" मग बघायलाच पहीजे"
म्हणत तो तिकडे निघाला.
त्याच्या मागे आई आणि रूपा धावल्या.
पण तो पोहोचला सुद्धा.
गोंगाट ऐकून दार उघडलं.
ती बाहेर येत होती.
*********************************
डोक्यावर पांढया केसांच्या जटा.
हे एव्हढं मोठं कुंकू, कपाळाला भस्म फासलेलं. अंगावर काळीपुटं चढलेली.
डोळ्यात कसली तरी घाण होती.
कंबरेत थोडी वाकलेली.
" आलास तू ? माहिती होतं तू येणार "
ती बंगालीत नाही चक्क हिंदीत बोलली.
रूपा अवाक झाली.
"ए पोरी , ए , याला झाडावरच्या घरट्यात अंगठी ठेवायला सांग ना "
असं म्हणत ती विकट हास्य करू लागली.
ते एव्हढं भेसूर होतं कि त्यामुळे का होईना हर्षवर्धन मागे फिरला.
ती हसतच राहिली.
रूपाची आई भयंकर चिडली होती.
केव्हढा अविचार.
आता बाबांचा ओरडा कुणी खायचा ?
"तू का सांगितलंस तिच्याबद्दल ?"
" अगं मला काय माहिती कि हा धावायलाच लागेल म्हणून "
" बाबांना काय सांगायचं ?"
इकडे याला काहीच समजत नसल्याने त्याने विचारलं , "काही चुकलं का माझ्याकडून ?"
दोघी गप्पच. काय बोलणार.
"ती अंगठीचं काय बोलत होती ?"
" श्शू, ती हिंदीत बोलली म्हणून आईला समजलं नाही. आता नाही परत कधी तरी सांगेन "
त्याच्य़ा डोक्यात तेच होतं.
अंगठी झाडावरच्या घरट्यात का ठेवायची ? कुणाची ?
****************************************************************
बाबा तिथून हाका मारत होते.
"रूपा, हर्ष या जरा "
आई ला काय करावे समजेना.
"आई तू गाडीत बस. संन्याशांच्या आश्रमाजवळ नको यायला "
" अगं पण तू ?"
" बाबा बोलवताहेत ना ? मग ?"
बाबांनी ओळख करून दिली.
"हे पंडीत भवानी चरण पाठकांचे वंशज "
" ओह ! नमस्कार " म्हणत तो पाया पडला.
त्या संन्याशाने आशिर्वाद दिला.
तिच्या डोक्यात प्रश्न घोळत होते. संन्याशाचे वंशज ?
जणू काही तिच्या मनातले ऐकू आल्यासारखे ते म्हेणाले.
" बेटा अडीचशे वर्ष झाली. पंडीत भवानी चरण पाठकजी यांचाही परिवार होता. त्यांनी नंतर संन्यास घेतला. जसं मी पण घर, परिवार सोडून आलो तसंच "
मग बाबांकडे वळून ते म्हणाले " हिला सोबत ठेवणार आहात का ?"
"तेच तर सांगितलं ना. मला थोडी येते हिंदी, पण इतकी नाही. तुम्हाला तर अजिबातच नाही. आणि काळजी नका करू. माझीच मुलगी आहे. इथलं काहीही बाहेर जाणार नाही"
आणि मग ते एका गंभीर विषयावर बोलू लागले.
ती मधे मधे भाषांतर करत होती.
जसं जसं तिला समजू लागलं तिच्या अंगावर रोमांच फुललं.
हे लोक काही तरी गुप्त काम करत होते आणि त्याचा संबंध सुभाषबाबूंच्या जिवंत असण्याशी होता.
इतकंच नाही तर तिचे बाबा या कामात बरीच वर्षे गुंतलेले होते.
आणि हर्षवर्धन ?
अजून काही क्लिअर नव्हतं. पण नक्कीच यांच्यावर महत्वाची कामगिरी सोपवलेली होती.
मग तिला जायला सांगण्यात आलं.
" गाडी घेऊन घरी जा , आईला पण ने. आम्ही चहाच्या वेळेपर्यंत येतो"
ती घरी येताना ते नाव आठवत होती.
पंडीत भवानी चरण पाठक
कुठे ऐकलंय ?
एव्हढ्यात तिने आश्रमाच्या दिशेने जयघोष ऐकला.
"वंदे मातरम !"
बंकिमबाबू ? देवी चौधरानी ?
भवानी चरण पाठक ....
म्हणजे संन्याशांचे बंड झालेले त्याचे नेते ?
आणि यांचा सुभाषबाबूंशी काय संबंध ?
बंबई का बाबू पण रहस्यमय होत चालला होता.
तिकडे हर्षवर्धनलाही बरेच प्रश्न पडले होते.
क्रमश:
त्या बाईचे वागणे गूढ वाटते.
त्या बाईचे वागणे गूढ वाटते. स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित काही सांकेतिक शब्द असावेत असा कयास. कथा आवडते आहे.