
माझी संस्मरणीय लंडनची भटकंती
ही भटकंतीची गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे. आम्ही मुलीकडे लंडनला गेलो होतो. आमचा मुक्काम आठ दहा दिवसच असणार होता पण तरी ही ती दोघं ऑफिसला गेल्यावर आपण काय करायचं घरात हा प्रश्न माझ्या मनात होताच. जणु काही मुलीने माझ्या मनातलं ओळखलं आणि मला परदेशात फिरायचा अनुभव शून्य असला तरी “ तुम्ही गावात जाऊन थोडं तरी लंडन बघून या आम्ही ऑफिसला गेल्यावर ,” असा तिनेच यावर तोडगा काढला.
स्मार्ट फोनचा जमाना आला नव्हता त्या काळातली ही गोष्ट असल्याने गुगल मॅप्स, मुलीशी कायम फोनवर कनेक्टेड अश्या गोष्टी तेव्हा अस्तित्वातच नव्हत्या त्यामुळे त्या नाहीत तर काय करायचं असं ही वाटतं नव्हतच. अगदीच वाटलं तर लंडनच्या त्या प्रसिद्ध टेलिफोन बूथ वरून मुलीला फोन करायचा एवढा दिलासा पुरेसा होता दोन्ही पार्ट्यांसाठी. आणि मला तसं ही एकदा तरी त्या ऐतिहासिक, आयकॉनिक बूथ मधून फोन करायची खूप इच्छा होतीच. पण अजून एकदा ही तो योग आलेला नाही आणि आता येईल अशी आशा ही नाही.
आम्ही बिग बेन आणि आसपास फिरून यायचं निश्चित केलं. जावयानी रात्री माझं होम वर्क घेतलं. मला एक नकाशा काढून दिला आणि ट्रेन कुठे बदलायची, बस कुठपर्यंत आणि कुठली घ्यायची आहे, वाटेत खुणेसाठी कोणती दुकानं, कोणते लँडमार्क्स दिसतील हे ही सगळं सांगितलं त्यामुळे आत्मविश्वास वाढला थोडा. तसेच “काकू, एवढ्या जाताय तर फोटो वगैरे काढा छानपैकी “ म्हणून त्याचा कॅमेरा तर दिलाच प्लस कॅमेऱ्याचे फिचर्स ही समजावून सांगितले.
लंडनच म्हटलं तरी ती राहत होती एक लांबच्या उपनगरात जिथे ट्यूब नव्हती. त्यामुळे बसने आधी ट्यूब स्टेशन पर्यंत जायचं आणि मग त्या जगप्रसिद्ध ट्यूब ने असा प्रवास होता. मुलं ऑफिसला गेल्यावर आम्ही ही निघालो. बस पटकन् मिळाली आणि ट्यूब स्टेशन पर्यंत व्यवस्थित पोचलो. आता बदली वगैरे काही करायचं नव्हतं. एकच ट्यूब लाईन आम्हाला बिग बेन पर्यंत घेऊन जाणार होती. थोडावेळ ट्यूब ने आम्हाला आजुबाजूचं लंडन दाखवलं आणि मग मात्र हळू हळू करत ती लंडनच्या पोटात शिरल्यावर आजूबाजूला पसरलं काळोखाचं साम्राज्य आणि साथीला होती ती ट्यूबची धडधड… ट्यूब मध्ये अर्थातच पिन ड्रॉप शांतता पण पहिलाच प्रवास असल्याने माझी एक्साईटमेंट शिगेला पोचली होती. त्यात बरोबर कोणी नाही, आपलं आपण जायचं म्हणून अधिकच छान वाटत होतं. मुलं असली बरोबर की आपण बिनधास्त असतो हे खरे आहे पण आपण त्यांच्या मागे मागे जातो फक्त. बाकी आपल्याला जास्त काही कळत नाही. असो. आपल्या डोक्यावर लंडन मधल्या असंख्य इमारती, रस्ते , गाड्या, माणसे एवढच नव्हे तर एखादी ट्यूब ही आहे ह्या विचाराने फारच थ्रिलिंग वाटत होतं.
आमचा प्रवास जवळ जवळ संपतच आला होता. आता थोड्याच वेळात आपण बिग बेन च्या समोर असणार, फोटो काढणार वगैरे स्वप्न बघत असतानाच कहाणीत ट्विस्ट आला. गाडीचे दरवाजे बंद असून ही किती तरी वेळ झाला गाडी स्टेशनवरून हलायलाच तयार नव्हती. काही लोकं अस्वस्थ होऊन येरझारा घालायला लागले. काही उतरून ही गेले. आम्ही मात्र बसून होतो आता सुरू होईल ह्या आशेवर. तेवढ्यात एक वर्दी मधला माणूस हातात कर्णा घेऊन आला आणि तांत्रिक बिघाडामुळे ही गाडी पुढे जाणार नाही अशी घोषणा त्याने केली. हे ऐकल्यावर उरले सुरले ही उतरले गाडीतून आणि त्यामुळे आम्हाला ही उतरावच लागलं.
आदल्या दिवशी केलेल्या होमवर्क मध्ये ह्याचा अभ्यास केला नव्हता त्यामुळे ही गाडी कारशेड ला गेली की इथे आपली मागची गाडी येईल असा मुंबई लोकल ट्रेनसारखा विचार करून उतरलो गाडीतून आणि प्लॅटफॉर्म वरच्या बाकावर बसलो. पण गाडी हलायचं नाव घेत नव्हती आणि तुम्हाला सांगते नॉन रश आवरला ते ट्यूब चे प्लॅटफॉर्म नवख्याला तरी थोडे घाबरवणारेच असतात. गाडी आली की मिनिटं दीड मिनिट हालचाल असते, लोक धावत धावत वर जातात की पुन्हा सगळा शुकशुकाट. त्यामुळे तिथे बसणं ही थोडं भीतीदायकचं वाटल्याने स्टेशनच्या बाहेर आलो. उत्तर माहित असलेला एक ही प्रश्न ह्या नवीन प्रश्नपत्रिकेत नव्हता. सगळच अन सीन आलं होतं. पण आता आपणच काही तरी करायला हवं म्हणून मुलीने दिलेला "कोणाला काही विचारू नका आणि कोणी काही विचारलं तर सांगू ही नका “ हा सल्ला झुगारून तिथे उभ्या असलेल्या पोलिसाला इथून बिग बेन ला जायला बस कुठून मिळेल हे विचारलं आणि त्याने सांगितल्याप्रमाणे बस स्टॉप वर आलो.
गर्दी नसलेलं ट्यूब स्टेशन
पाच दहा मिनटात बस आली. आम्ही बसमध्ये चढलो तर ड्रायव्हर म्हणाला “ ओन्ली कॅश नो कार्ड…” ( एवढ्या वर्षात आता बसमध्ये " ओन्ली कार्ड नो कॅश " एवढा बदल झालाय.) माझ्याकडे कॅश होती पण सगळ्या नोटा होत्या. एक्झॅक्ट चेंज नव्हती. आणि तिथला एक विचित्र नियम म्हणजे तुम्ही जास्त पैसे दिलेत तर ड्रायव्हर परत नाही करणार. करा ती रक्कम टी एफ एल ला दान. अर्थात प्रत्येक ठिकाणी पौंडाचे रुपये करण्याची माझी मानसिकता बघता तिकिटासाठी जास्त पैसे मोजणं मला शक्यच नव्हतं. त्यामुळे उतरलो खाली नाईलाजाने . पण नंतर आलेल्या बसमध्ये कार्ड स्वाईप करायची सोय होती म्हणून वाचलो.
दहा पंधरा मिनिटातच लांबून बिग बेन चा टॉवर दिसायला लागला. एवढ सगळ होईपर्यंत दुपार झाली होती. आणि भर दुपारी लंडनचे रस्ते माणसांनी फुललेले होते. रस्त्यावर असंख्य गाड्या होत्या. सगळीकडे हालचाल, चैतन्य दिसत होतं. मजल दर मजल करत बस नदीच्या पुलावर आली. पुलावरून लंडनचा मोठा व्ह्यू नजरेत आला आणि आणि मनात ही भरला. पुलावरून नागमोडी वळणं घेत असलेली थेम्स नदी आणि तिच्या दुतर्फा असलेल्या इमारती छान दिसत होत्या. सूर्यप्रकाशात तिचं पाणी ही मस्त चमकत होतं. आणि वाऱ्यामुळे पाण्यावर उठणारे तरंग तर फारच सुंदर दिसत होते. पुढच्या पाचच मिनिटांत एक वळण घेऊन बस थांबली आणि आम्ही बिग बेन च्या अक्षरशः पुढ्यातच उतरलो.
(फोटो कधी तरी नंतर काढलेला आहे. )
बिग बेन च्या आवारात खूप गर्दी होती. त्याचं कारण पुढच्या दोनच मिनटात कळलं जेव्हा दोन वाजले म्हणून त्याच्या ताशी टोल्यांचा धीरगंभीर आवाज आसमंतात घुमला. तसा तो सगळा परिसर नेहमी माणसांनी गजबजलेलाच असतो. तिथल्या गर्दीचा एक भाग होऊन आम्ही ही सगळं बघत होतो. फोटो काढत होतो . भर गावात असलेली , अगदी नदी काठावर, शेकडी वर्षापूर्वी बांधलेली पण अजून ही सुस्थितीत असलेली त्यांची पार्लमेंटची भव्य इमारत पाहताना खूपच नवल वाटत होतं. त्या समोरच आहे राजघराण्याच चर्च म्हणजेच वेस्ट मिनस्टर ॲबी. इथे धर्म आणि राजकारण हातात हात घालून उभे आहेत. ते चर्च पाहताना टीव्ही वर पाहिलेले शाही लग्नाचे सोहळे माझ्या डोळ्यासमोर येत होते.
त्यादिवशी तिथे पोचे पर्यंतच सगळी ताकद खर्ची पडल्याने जास्त कुठे फिरलो नाही. घरी जातानाचा प्रवास काढून दिलेला नकाशा उलटा फिरवला आणि केला. मुलीने. " करू नका " सांगितलेल्या गोष्टी करण्याचाच तो दिवस असावा . " इथे बाहेर चहा कधी घेऊ नका , तुम्हाला आवडणार नाही " हे तिने सांगितलेलं असून ही मी चहा घेतला कोरा आणि बिन साखरेचा (वास कोणता होता ते आता लक्षात नाही) आणि विशेष म्हणजे मला तो आवडला ही. असो.
संध्याकाळी मुलगी ,जावई घरी आल्यावर त्यांना आधी फोटो दाखवले आणि मग ही स्टोरी सांगितली. त्यावर " मला खात्री होती काही अचानक झालं तर तू नीट निभावून नेशील म्हणूनच एकटं पाठवलं तुम्हाला " हे तिचे शब्द आणखी आत्मविश्वास वाढवणारे होते. ह्या सगळ्याच फलित काय झालं तर उरलेले सगळे दिवस बस ट्रेन ट्यूब ने आम्ही लंडन खूप फिरलो. तरी हा पहिला प्रवास कायम लक्षात राहिला आहे.
हेमा वेलणकर.
स्मरणरंजन आवडले!
स्मरणरंजन आवडले!
मस्त..
मस्त..
तुमच्या नजरेतून लंडन आधीही पाहिले आहे. पण हा असा पहिला अनुभव कायम स्पेशल बनून राहतो.झिम्मासारख्या चित्रपटात देखील हेच तर दाखवतात
बिनगाइडचा बेभरवशाचा प्रवास
बिनगाइडचा बेभरवशाचा प्रवास फार मजेशीर असतो आणि आठवणीत राहतो.
भटकंती आवडली.
वा ! खूप सुंदर प्रवासवर्णन.
वा ! खूप सुंदर प्रवासवर्णन. फोटोज अजून येऊ द्या ना.
आवडलं.
( अवांतर : लंडन म्हटल्यावर त्या पिक्चरची आठवण झाली नाही असं होणार नाही.
संजय भावे, ऋ, srd आणि रानभूली
संजय भावे, ऋ, srd आणि रानभूली ... सर्वांना धन्यवाद...
रानभूली, तेव्हाचे फोटो नाहीयेत. हा जो चिकटवला आहे ती ही नंतरच कधी तरी काढलेला आहे.
काय मस्त प्रवासवर्णन केलेत
>>>>>>> मला तसं ही एकदा तरी त्या ऐतिहासिक, आयकॉनिक बूथ मधून फोन करायची खूप इच्छा होतीच.
आपले माबोकरही साध्यागोष्टी मध्ये ग्लॅमर शोधण्यात पटाईत आहेत
हाहाहा
काय मस्त प्रवासवर्णन केलेत ममो. खरच साहसी आहात. नवरा जर परगावी गेला, मलाच जास्त लांब जायला भिती वाटते. इतर वेळीही कुठे एकटी गेले की मोबाईलची बॅटरी संपेल का , चक्कर येइल का असे वाटत असते. नशीबाने चक्कर आयुष्यात कधीच आलेली नाही. फक्त एकदा ग्रँड सेन्ट्रलच्या अतिभव्य ७ मजले एलेव्हेटरवरती, व्हर्टिगोसम वाटलेले.
पण एकटे फिरायला माझी बरीच काचकूच असते.
तुम्ही किती मस्त निभावुन नेलत. कौतुक आहे. _/\_
फोटो फारच छान आहे ममो. लेख
फोटो फारच छान आहे ममो. लेख नेहमीप्रमाणे उत्तम.
मस्तच लिहिलंय ममो!
मस्तच लिहिलंय ममो!
लेख नेहमीप्रमाणे उत्तम. नेहमी
लेख नेहमीप्रमाणे उत्तम. नेहमी आईवडील मुलांना सूचना देतात पण परदेशात पहिल्यांदा फिरताना मुलं सूचना देतात .हे फार मस्त असतं
एकाचवेळी मुलं पालक झाल्यासारखं.
आईवडील हरवणार नाहीत हे कुठेतरी माहीत असतं, तरी काळजी असतेच. पण तुम्ही छान निभावून नेला प्रसंग.
सुंदर प्रवासवर्णन.
सुंदर प्रवासवर्णन.
छान लिहिलंय. ती सगळी
छान लिहिलंय. ती सगळी प्रसंगमालिका समोर उभी राहिली.
सामो, प्राचीन, वावे, सिमरन,
सामो, प्राचीन, वावे, सिमरन, शर्मिला, भरत धन्यवाद...
सामो तेव्हा स्मार्ट फोन असतात हे माहितच नसल्याने काही वाटलं नाही. आता साधी वॉक ला गेले तरी मुलगी फोन घ्यायची आठवण करते.
फोटो फारच छान आहे ममो. >> फोटो मी काढते त्याच सगळं श्रेय जावयांना आहे. कॅमेरा वापरण्याची भीती गेली त्याने थोड ट्रेनिंग दिल्याने. बटण एखाद वेळी चुकीची प्रेस केली तर कॅमेरा मोडत नाही , पुन्हा रीस्टोअर करता येत हा कॉन्फिडन्स ही आला त्यामुळे. आणि आता तर खूपच सोपं झालंय मोबाईल मधल्या कॅमेऱ्यामुळे फोटो काढणं.
आईवडील हरवणार नाहीत हे कुठेतरी माहीत असतं, तरी काळजी असतेच >> अगदी अगदी.. रिव्हर्स पेरेंटहुड म्हणतात ते हेच...
ट्यूब स्टेशन चा गर्दी नसलेला
ट्यूब स्टेशन चा गर्दी नसलेला एक फोटो मिळाला तो ऍड केला आहे.
अगदीच संस्मरणीय झाली की ही
अगदीच संस्मरणीय झाली की ही भटकंती.
छान लिहिलंयत
अनपेक्षित वळणाची भटकंती आवडली
अनपेक्षित वळणाची भटकंती आवडली!
आशिका , छन्दिफन्दि धन्यवाद .
आशिका , छन्दिफन्दि धन्यवाद .
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहिलं आहे ममो.
छान लिहिलं आहे ममो.
पहिल्या प्रवासात हा हिसका दाखवायची ट्युबची परंपरा दिसते आहे.
). तशीही मित्राला भेटण्यापूर्वी निरुद्देश भटकंती करायची होती. मग उतरुन वर आलो. मॅप्स मध्ये बघुन दिशांचा अंदाज घेऊन मिळेल त्या बसने थोडा पुढे जाऊन वेगळ्या रंगाच्या लाईन वरचे स्थानक आल्यावर तिकडे उतरलो. पहिल्या बसलेल्या रंगाचा लाईनचा फक्त गोंधळ असेल असा कयास होता. पश्चिम रेल्वेवर गाडी घसरली तरी मध्य नीटच चालते.. खरंतर नाही... पण असो.
मग तिकडून ट्युब घेऊन टॉवर ब्रिज, पिकॅडली, कॅनडा एंबसी, रिकामीशी डबल डेकर दिसल्यावर ती घेऊन गेली तिकडे, १० डाउनिंग स्ट्रीट, स्कॉटलंड यार्ड.... तरी त्यात राजवाडा राहिलाच... तर असा निरुद्देश (या क्रमाने नाही, नाहीतर लंडनचे जाणकार (रीड फा, ममो) माझा अमरिश पुरी करतील) फिरत फिरत दुपार पर्यंत किंग्ज्स क्रॉसला प्लॅटफॉर्म नं ९ आणि ३/४ ला आलो.
गेल्या भारतभेटीत लंडनला मोठा थांबा होता, त्यामुळे बाहेर पडून जमेल तितकी लंडन मधील प्रेक्षणीय स्थळे पाहुन येऊ म्हणून ट्युब मध्ये बसलो. भल्या पहाटेची वेळ होती त्यामुळे सकाळी कामाला जाणार्या चाकरमान्यांनी डबा लगेचच भरुन गेला. थोडावेळ व्यवस्थित प्रवास केल्यावर ट्युब एकेका स्थानकावर आणि अध्येमध्ये ही बराच काळ थांबू लागली. चालकाने दोन तीनदा मोघम उद्घोषणा दिली, पण हे असं किती वेळ चालणार त्याला ही कदाचित माहित नसेल. मग एका स्थानकावर ट्युबने अंगच टाकलं. काहीही उद्घोषणा न देता १५-२० मिनिटं थांबली असेल. एकेक लोक उतरू लागले. मी जिकडे जिकडे जायचं तिकडे कसं जायचं, काय ट्रान्सफर घ्यायच्या हे बघुन निघालो होतो. मध्येच हाईड पार्कला उतरुन रस्त्यावर कुठल्या बस मिळतील हे काही बघितलं न्हवतं. फोन होता पण मला रोमिंग चालू करायची अजिबात इच्छा न्हवती. अगदीच वेळ आली तर केलं असतं, पण कन्स्ट्रेन मध्ये जगायची मजा आवडते. (म्हणजे अशा पोस्टींच्या जिलब्या पाडता येतात
मग जेवण आणि गप्पा उरकुन गुमान एलिझाबेथ लाईनने जास्त पैसे देऊन हिथ्रोला आलो. ट्युब गोंधळ अजुनही चालूच होता, त्यात पुढचं विमान चुकायला नको.
एकुण भटकणे हाच हेतू साध्य करायचा होता.
मस्तच लिहिलंय ममो!
मस्तच लिहिलंय ममो!
देवकी, अमित हर्पेन धन्यवाद.
देवकी, अमित हर्पेन धन्यवाद.
अमित चांगलाच दणका दिला ट्यूब ने तुम्हाला ही. अर्थात त्यामुळे भटकंतीची मजा जास्त घेता आली असेल. मस्त लिहिलं आहे.
काही झोल झाला तर ट्यूब च्या नळकांड्यातून घरी नक्की पोचू हा कॉन्फिडन्स ह्या पहिल्या प्रवासामुळे आम्हाला आला. आणि आम्ही उरलेले सगळे दिवस बिनधास्त फिरू शकलो.