लिओ ऑप्टसची दंतकथा (भाग सातवा) : अंधारपोकळीतील भास

Submitted by यःकश्चित on 27 August, 2025 - 10:40

प्रकरण सातवे

अंधारपोकळीतील भास

----------------------------------------------------------------------------------------------------------------

क्लिक व दगडाचा आवाज होऊन, हिफास्टसने त्या धातुपट्टीवर प्रचंड शक्तीने प्रहार केला. इतका घणाघाती प्रहार झाला की त्यातून ऊर्जेचा एक उष्ण लोळ बाहेर पडला. ऊर्जेच्या दाबाने आम्ही थोडेसे मागे सरकलो गेलो. हिफास्टसचा हातोडा धरलेला हात प्रहार करून हलकासा वर उचलला गेला आणि प्रहाराने चपटी झालेली ती आयताकृती धातूपट्टी अलगदपणे ऐरणीवरून उडून तेलांच्या दिव्याच्या समोर असलेल्या मोकळ्या जागी पडली. दिव्याच्या प्रकाशाने ती पट्टी चमकत होती. त्यावर असलेल्या कुविचाराच्या कोड्याच्या जागी आता नवीन अक्षरे उमटली होती, त्याच जुन्या ग्रीक लिपीत.

उर्जेच्या दाबाने मागे सरकलेलो आम्ही पुन्हा एकदा त्या मूर्तीच्या जवळ आलो. जोसेफने पुढे येताना बॅगेतून पुस्तक काढून डाव्या हातात धरलेच होते, उजव्या हाताने ती पट्टी उचलून तो नव्याने उमटलेल्या या अक्षरांचा अर्थबोध करू लागला. इतक्या वेळा अर्थ लाऊन जोसेफला त्या लिपीतील काही चिन्हे पुस्तकाविनाच समजू लागली होती. त्यामुळे यावेळी त्याला अर्थ लावयला जास्त वेळ नाही लागला. काहीच मिनिटात त्या नवीन शब्दांचा अर्थ त्याने आमच्यासमोर सादर केला -

कुविचाराची साथ, निखाऱ्याची रंगत,
विवेकाला जडते, सावल्यांची संगत।
हिफ़ॅस्टस म्हणे —
“घडव शस्त्र, पण जाळू नको घर”,
संतुलनानेच घडतं जीवनाचं स्वरूप अमर।

मोजक्या शब्दात हिफास्टसने केवढा मौलिक संदेश दिला होता.

हेच होतं सभामंडपात सांगितलेल्या “अगम्य भाषांनी लपवलेल्या संकेताचे ज्ञान”, जे आम्हाला सभामंडपात नेऊन प्रस्थापित करायचं होतं. जोसेफने ती धातूपट्टी काळजीपूर्वक आपल्या बॅगेत ठेऊन दिली.

पण आता पुन्हा सभामंडपात जाणार कसे ! जिथून आलो होतो तो दरवाजा आता बाहेर अथेन्समध्ये जात होता आणि पुन्हा त्या अरण्यातील चौथऱ्यांचा गुप्त मार्ग कसा कार्यन्वित करणार होतो आम्ही ! त्यातून स्मिथ बाहेर जाण्याचा प्रयत्न करतानाची आकाशवाणी - बाहेर गेलात तर आत विसरता आणि आत आलात तर बाहेर. त्यामुळे तोही मार्ग बंद होता. त्या कांस्यमूर्तीच्या आजूबाजूला कोणता नवीन दरवाजा तयार झाला का हे आम्ही पाहत होतो. पण त्या ज्ञानसंकेताची धातूपट्टी सोडून मंदिराच्या या भागात काहीच हालचाल झालेली दिसली नाही. त्यामुळे मंदिराच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडू आणि मग पुन्हा एकदा एल्यूसिसला जाऊन पुढे काय होईल ते पाहू, या विचाराने आम्ही तिघे एकत्रच मुख्य दरवाज्याकडे वळलो. तिकडे पाहतो तो काय - मुख्य दरवाजातून अथेन्सचे दृश्य जाऊन पुन्हा एकदा तो दरवाजा आपल्या मूळ रूपात परत आला होता. आम्ही ज्या भुयारातून आलो होतो त्या भुयाराचा मार्गही आता स्पष्टपणे दिसत होता.

हरवलेली वस्तू सापडल्यावर होतो तसा आनंद आम्हाला झाला. आम्ही पुढे त्या दरवाज्यातून भुयारात प्रवेश केला. अजूनही त्या भुयारातल्या मशाली तश्याच जळत होत्या. त्या भुयारातून पुढे जात असताना माझ्या मनात हा विचार आला, की या मशालींना इतकं वेळ जळण्यासाठी इंधन कुठून मिळत असावे पण हे सगळं इतकं अतार्किक होतं की असे प्रश्न मनात येणं हाच वेडेपणा ठरला असता.

जोसेफ सर्वात पुढे, त्याच्यामागे मी आणि मागे स्मिथ, असे आम्ही भुयारातून पुढे जात होतो. जोसेफ परत जाताना देखील तितक्याच कुतूहलाने त्या भिंतींचे निरीक्षण करत होता. जोसेफची ज्ञानप्राप्तीची भूक आणि कुतूहलाची तहान न संपणारी होती.

पुढे जाताच आम्ही सभामंडपातून आत आल्यावर बंद झालेला तो सिंहासनाचा दरवाजा आता उघडलेला होता. एक एक करून आम्ही त्या दरवाज्यातून पुन्हा सभामंडपात आलो. सर्वात मागे असलेल्या स्मिथनी सभामंडपात प्रवेश करताच पुन्हा एकदा तो दगडी दरवाजा जमिनीत जाऊन त्या जागी पूर्वीसारखे हिफास्टसचे सिंहासन तयार झाले. आता त्या सिंहासनाला भगव्या रंगाची किनार आली होती. त्यावर असलेले अग्नीचे आणि हातोड्याचे चिन्ह तश्याच भगव्या रंगात चमत होते.

मी आणि स्मिथ हा सिंहासनात झालेला बदल पहात असताना जोसेफ त्या मध्यवर्ती मेजाजवळ जाऊन आम्हाला बोलवत होता. आम्ही त्याच्याजवळ जाताच त्याने आपल्या बॅगेतून ज्ञानसंकेताची धातूपट्टी बाहेर काढून समोरच्या मेजावर असलेल्या हिफास्टसच्या हातोड्याच्या चिन्हावर ठेवली.

दोन सेकंद काहीच घडलं नाही. पण तिसऱ्या सेकंदाला ती धातूपट्टी हलकीच हलत हलत हातोड्याच्या दांड्याच्या रेषेत सरळ झाली, आणि चांदीसारख्या दिसणाऱ्या त्या पट्टीचा रंग बदलून ती आता भगवी झाली. पुढच्याच सेकंदाला भट्टीत टाकलेल्या धातूसारखी वितळून त्या हातोड्याच्या चिन्हात झिरपून गेली. आता तो हिफास्टसचा हातोडा भगव्या रंगात, आतल्या बाजूने एखादा लाईट लावल्यासारखा, प्रकाशित झाला होता.

जोसेफ लहान मुलासारखा उत्साहित झाला होता. स्मिथच्या चेहऱ्यावर देखील खजिन्याच्या एक पाऊल जवळ गेल्याचा आनंद दिसतच होता. मीदेखील आनंदी होतो, पण माझ्या डोक्यात पुढे काय करायचं याचं गणित आकार घेत होतं.

“ जोसेफ महाशय, हिफास्टसचे एक कोडे झाले सोडवून पण अजून ११ कोडी सोडवायची आहेत, अर्थात ११ ठिकाणी जाऊन ११ ज्ञानसंकेत आणायचे आहेत. ”

पाण्याचा एक घोट घेत जोसेफ बोलू लागला, “ होय डॅनी, आता पुढच्या देवतेच्या पवित्र स्थानी आपल्याला निघावे लागेल आता. मला वाटते आपण आपला पुढचा टप्पा म्हणून हर्मसच्या मार्गावर संकेत शोधूयात ” -

तो बोलत असतानाच स्मिथ शेजारीच असलेल्या डायोनिससच्या चिन्हाचं निरीक्षण करत बोलू लागले - “ मला काय वाटतं जोसेफ, आपण ह्या शेजारीच असलेल्या उत्सवांच्या देवतेच्या मार्गावर जाऊयात का ? बहुतेक एक एक करून रांगेने ही कोडी कार्यन्वित होत आहेत. पाहा हे डायोनिससचे चिन्ह, मद्यप्याला, चमकत आहे. ”

स्मिथना काय चमकताना दिसलं म्हणून आम्ही दोघे त्यांच्या जवळ जाऊन खांद्यावरून डोकावून पाहू लागलो. डायोनिससचा मद्यप्याला हलक्या भगव्या रंगात चमकत असल्यासारखा वाटत होता, पण त्यांच्या खांद्यावरून न डोकावता, बाजूने वेगळ्या अंशातून ते चिन्ह इतर चिन्हासारखेच दगडी दिसत होते.

“ मि. स्मिथ, हे चिन्ह चमकत नाहीये, ना कोणती यंत्रणा कार्यन्वित झाली आहे. हा शेजारच्या हिफास्टसच्या चमकणाऱ्या चिन्हाचा प्रकाश पडून हे चिन्ह चमकल्याचा ‘आभास’ होत आहे. तुम्ही बाजूला येऊन इथून पहा.”, असे म्हणत जोसेफ, स्मिथना उभं राहायला जागा करून देत, दोन पावलं मागे आला. स्मिथ वेगळ्या अंशातून न चमकणारं चिन्ह पाहून खजील झाले.

“ पण आता तुम्ही म्हणताच आहात तर आपण डायोनिससच्या सिंहासनाकडे जाऊन मार्ग शोधूया. आधी काय आणि नंतर काय, एक एक करून आपल्याला सगळीच कोडी सोडवावी लागणार आहेत. चला डायोनिससचे सिंहासन पाहुया. ”, हे बोलत बोलतच जोसेफ डायोनिससच्या सिंहासनाकडे चालू लागला.

आम्हीही त्याच्या मागे त्या सिंहासनाजवळ पोहोचलो. डायोनिससच्या सिंहासनावर कोरलेल्या ओळींचे त्याने भाषांतर केले -

उत्सवात त्याच्या जल्लोष खास,
उन्मादाच्या गर्दीत मद्याचा वास,
एकच प्याला अन् घडे वास्तवाचा भास !

“डायोनिससचे वर्णन आहे. उत्सव, मद्य आणि नाट्य यांचा देव. आता इथे आपल्यासाठी कोणते कोडे आहे आणि ते कुठे आहे याचा शोध घेऊयात.”, जोसेफने एका वाक्यात डायोनिससची माहिती दिली आणि लगेचच सिंहासनाच्या आजूबाजूला काही दिसते का ते पाहू लागला.

स्मिथ आणि मीदेखील त्या सिंहासनाचे निरीक्षण करू लागलो. त्या सिंहासनावर वेलींची नक्षी होती आणि सिंहासनाच्या पाठीशी मद्याच्या प्याल्याची आकृती होती. वेलींची नक्षी त्या स्तंभांवरच्या नक्षीप्रमाणे साधी नव्हती, अतिशय गुंतागुंतीची, काही ठिकाणी दाट काही ठिकाणी विरळ होती. सिंहासनाच्या पुढच्या बाजूस ती नक्षी अजूनच दाट होत गेली होती. कदाचित द्राक्षाच्या वेली असाव्यात त्या. तो मद्याचा प्याला आताच्या काळातल्या वाईन ग्लाससारखा, पण प्राचीन चषकासारख्या पद्धतीचा दिसत होता. खालच्या बाजूस एक चकती, मधला भाग प्याला धरण्यासाठी निमुळता केलेला आणि त्याच्यावर मदिरा ओतण्यासाठी बनवलेला उभा खोलगट भाग, पिण्याच्या बाजूने थोडा बाहेर वळलेला. प्याल्याच्या वरच्या भागावर, जिथे मदिरा ओतली जाते, त्या भागावर आडव्या रेषा मारलेल्या खाचा होत्या, जसे की एकावर एक आडवी चकती ठेऊन त्या प्याल्याची रचना केली आहे.

मी त्या प्याल्याच्या आकृतीच्या अगदी जवळ जाऊन पाहू लागलो. निमुळत्या भागाच्या खालची चकती थोडी बाहेर आल्यासारखी वाटत होती. मला ती दरवाज्याची कळ असावी असे वाटून मी ती आत दाबली. ती आत दाबली गेली नाही. का कुणास ठाऊक, माझ्या मनात काहीतरी कल्पना येऊन मी ती चकती, जुन्या काळच्या रेडिओवर फ्रीक्वेंसी बदलायला आडवे चक्र फिरवतात, तशी उजवीकडे फिरवली. तोच एक क्लिकचा आवाज येऊन त्या प्याल्याच्या वरच्या भागात असलेल्या आडव्या चकत्या, ज्यांना मी थोड्या वेळापूर्वी खाचा समजलो होतो, त्या एक एक करून बाहेर आल्या. त्याच बरोबर सिंहासनावरची वेलींची नक्षी देखील शिल्पकाम केल्यासारखी बाहेर आली.

त्या क्लिकचा आवाज ऐकून जोसेफ आणि स्मिथ माझ्या बाजूला येऊन पाहू लागले. जोसेफने त्या वेलींवर हात फिरवून पाहिले. खरोखरीच त्या दगडाच्या वेली आता आकृत्या आणि नक्षी न राहता, कोरीव शिल्पकाम केल्यासारख्या दिसत होत्या. जोसेफ सिंहासनाच्या पुढच्या बाजूला असलेली ती वेलींची गुंतागुंत नीट निरखून पाहत म्हणाला,

“हे पहा, इथे समोरच्या बाजूने जी वेल आहे तिच्या मागे दगडावर काही वर्तुळ दिसताहेत. काही वेलींचे देठ इथे तुटल्यासारखे वाटत आहे. किंवा शिल्पकाम अर्धवट सोडून दिले आहे अश्या त्या अर्ध्याच वेली आहेत.”

मला लक्षात आलं काय प्रकार आहे ते. मी मागच्या वेळी प्याल्याची सर्वात खालची चकती जशी फिरवली होती, तशीच मी आता प्याल्याच्या वरच्या भागात बाहेर आल्या चकत्यांपैकी पहिली चकती तशीच उजवीकडे फिरवली. तोच आणखी एक क्लिक झाला आणि जी वर्तुळे जोसेफ दाखवत होता, त्यातील काही वर्तुळे त्यांच्यावरच्या नक्षीसहित फिरली.

“वाटलंच होतं ! माझा अंदाज खरा ठरला. मी जेंव्हा ही खालची चकती फिरवली तेंव्हा वरच्या भागाच्या चकत्या बाहेर आल्या. तू जेंव्हा ते वर्तुळ आणि अर्धवट दिसणाऱ्या वेली दाखवलं तेंव्हा लक्षात आलं की या वेलींची काही विशिष्ठ नक्षी आहे, जी या चकत्या फिरवून आपल्याला पूर्ण आकारात आणायची आहे. मग मी ही पहिली चकती फिरवून पाहिले आणि तू पाहिलीच वर्तुळे कशी फिरली ते.”

“वा डॅनी द डिटेक्टिव ! चला मग ही नक्षी पूर्ण करूया.” - जोसेफ

मग मी आणि जोसेफ त्या चकत्या फिरवून नक्षी पूर्ण करण्याच्या कामाला लागलो. पण मुळातच खरं नक्षीचा आकार काय असावा याचा अंदाज नसल्यामुळे वर्तुळाच्या परिघावर ज्या वेलींचे देठ अपूर्ण होते, त्या वेलींना बाजूला असलेल्या वर्तुळाच्या देठाशी मिळवून काही बनवण्याचा प्रयत्न करू लागलो. चकती उजव्या बाजूला फिरवल्यावर वर्तुळे घड्याळातील काट्यांच्या दिशेने फिरायची, आणि डाव्या बाजूला फिरवल्यावर काट्यांच्या उलट दिशेने फिरायची. एकूण १० वर्तुळे होती. बराच वेळ प्रयत्न करूनही आम्हाला त्या वेलींचा निश्चित असा आकार समजेना. पुन्हा माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी त्या पहिल्या चकतीला फिरवून बाजूच्या वेलीच्या देठाशी जुळवले आणि ती चकती आत दाबली. आश्चर्य ! ती चकती यावेळी आत गेली आणि क्लिकचा आवाज येऊन समोरच्या बाजूचे पहिले वर्तुळ बाहेर येऊन स्थिर झाले.

आता आम्हाला दिशा मिळाली. याच पद्धतीने आम्ही एक एक करत दहाच्या दहा चकत्या फिरवून, त्या आत दाबून सर्व १० वर्तुळे स्थिर केली. वर्तुळे स्थिर होऊन त्यांच्यावर असलेल्या वेलींची नक्षी आता पूर्ण झाली होती, पण त्या नक्षीतून कसलाच अर्थबोध होत नव्हता. काही ठिकाणी गोल, त्रिकोण आणि काही रेषा दिसत होत्या पण कळत नव्हतं ते काय आहे ते.

आम्ही तिघे मागे येऊन २-३ पावले दूर उभे राहून काही समजतं का ते पाहू लागलो. दूर उभे राहून वेलींचे काही आकार इंग्रजी अक्षरांसारखे भासत होते. मी जोसेफच्या ते निदर्शनास आणून देण्यासाठी त्याच्याकडे वळून म्हणालो,

“जोसेफ ते पहा ५, ७, ९ क्रमांकाचे वर्तुळ इंग्रजी p, b, o अक्षरासारखे वाटत आहे.”

जोसेफच्या तल्लख बुद्धीला माझ्याआधीच ही गोष्ट दिसली होती आणि त्याने आपले ग्रीक लिपींचे पुस्तक काढून हातात धरले होते. तो एकदा वेलींकडे आणि एकदा पुस्तकात पाहून पाने उलटीत काही लिहित होता. मी पुढे काही विचारणार इतक्यात पुस्तक बंद करून तो ओरडला -

डिथरॅम्बस (dithyrambos)

- आणि त्याचबरोबर हिफास्टसच्या सिंहासनासारखेच दगड वर उचलले जाऊन, दगडांच्या घासण्याचा आवाज करत त्यांच्या जागांच्या अदलाबदली होऊन, तिथे आधीसारखेच एक द्वार तयार झाले.

मी आर्श्चर्याने जोसेफकडे पाहत म्हणालो -

“जोसेफ हे काय आहे ? डिथरॅम्बस ? म्हणजे काय ?”

जोसेफने आमच्याकडे पाहून हलकेच हसत आमचे ज्ञानवर्धन करू लागला.

“Dithyrambs हा प्राचीन ग्रीक काव्यप्रकार आहे जो विशेषतः देवता डायोनिससच्या स्तुतीसाठी रचला जात असे. या शैलीतील कविता अत्यंत उन्मादी, नाट्यमय आणि भावनांनी भरलेल्या असतात. Dithyramb हे कोरसद्वारे सादर केलं जातं, ज्यात गायक वर्तुळाकार नृत्य करत, aulos वाद्याच्या साथीत देवतेच्या जीवनातील घटनांचे वर्णन करतात. या प्रकारात लयबद्धता आणि छंद हे पारंपरिक नियमांपासून मुक्त असतात, त्यामुळे त्यात एक प्रकारचा सर्जनशील अराजक असतो. Aristotle ने dithyrambs ला ग्रीक शोकनाट्याचा उगम मानलं आहे. या शैलीतून मानवी उन्माद, मोह, आणि विसर्जन यांचा गूढ अनुभव प्रकट होतो, जो प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच नाही तर आत्मचिंतनाचीही संधी देतो. सिंहासनाच्या समोरच्या भागात वेलींनी तयार झालेला शब्द हा ग्रीक लिपीतील dithyrambos होता. हे पहा - ”

असे म्हणून त्याने ते लिपींच्या पुस्तकातील अक्षरांचे पान आमच्यासमोर धरले, ज्यावर त्याने पेन्सिलने सर्व अक्षरे एकत्र करून ग्रीक लिपीतील शब्द लिहिला होता.

διθύραμβος

अगदी तसाच शब्द त्या सिंहासनावर उमटला होता.

“अद्भुत”, इतका वेळ फक्त निरीक्षण करत असलेले स्मिथ आश्चर्य आणि नवीन माहिती मिळाल्याचं कौतुक अश्या मिश्र भावनेने बोलू लागले, “इथे पावला पावलावर नवनवीन आणि रोचक माहिती मिळत आहे. खरोखरीच हा खजिन्याचा प्रवास अधिकच रोमांचक होत चाललाय. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आम्ही दोघे कदाचित ही कोडी सोडवू शकलो नसतो आणि आता एडविन पळून गेल्यानंतर माझ्याच्याने एकट्याने हे अशक्यच होते. प्राचीन पुराणांचे जोसेफ एवढे ज्ञान मला आणि एडविनला एकत्रितपणे देखील नाही.”

“चला तर मग या दरवाज्यातून आत जाऊन पाहूया डायोनिससचे पवित्र स्थान कसे आहे.”, जोसेफ.

आम्ही तिघे एक एक करून त्या दरवाज्यातून आत गेलो. मागल्यावेळी प्रमाणेच इथेही अंधार होता. यावेळी मी मोबाईल काढून आधीच फ्लॅश मारला. पण लिओ ऑप्टसच्या रहस्याप्रमाणेच या अंधारातही काही तरी गूढ होते. फ्लॅशच्या प्रकाशात आम्हाला आमचे चेहरे सोडून काहीच दिसत नव्हते. जशी त्या सभामंडपात शुभ्रधवल पोकळी होती, तशी इथे आत कदाचित अंधारपोकळी होती. ना भिंत ना जमीन काहीच दिसत नव्हते. तसेच चाचपडत आम्ही काही पावले पुढे सरकलो, तोच तो मागचा दरवाजा आधीसारखाच पुन्हा बंद झाला.

आता आम्ही फक्त दिशाहीन नव्हतो, दृष्टीहीन पण झालो होतो. या अंधारात, जिथे आमचा मोबाईलचा फ्लॅशपण निकामी ठरला होता, तिथे आम्ही काय आणि कसे शोधणार होतो.

आम्ही तिघेही आजूबाजूला काही भिंत, स्तंभ वा तत्सम काही मिळते का म्हणून हवेत हात फिरवत होतो. पण काहीच लागत नव्हते. मी सर्वात पुढे चालत होतो. त्या अंधारात जमीन देखील दिसत नव्हती, त्यामुळे ज्या अदृश्य पटलावर आम्ही उभे तो भाग पायाने चाचपडून पुढे सरकत होतो. खरंतर त्या अंधारपोकळीत काहीच दृश्यमान नसल्याने हे पुढे मागे उजवीकडे वा डावीकडे आहे हे देखील समजत नव्हते. पण आत प्रवेश केल्यापासून ज्या दिशेला आमची तोंडे होती, त्या दिशेने आम्ही सरकत होतो.

काही वेळ असाच चाचपडण्यात आणि सरकण्यात गेल्यानंतर स्मिथ हताश होऊन म्हणाले,

“मला वाटत आहे की आपण या अंधारकोठडीत अडकलो आहोत.”

“पण स्मिथ, पुढे जाण्याचा काहीतरी मार्ग इथे असणारच म्हणूनच दरवाजा उघडला गेला. नाहीतर दरवाजा उघडलाच गेला नसता.”, मी काहीतरी युक्तिवाद मांडून माझ्याच मनाची सकारात्मक समजूत घालत होतो.
“पण हा फसवा मार्ग देखील असू शकतो.”, जोसेफने आमच्या मनात आणखी एक शंकेचे पिल्लू सोडले, “कदाचित आपल्याला अडकवण्यासाठी हा मार्ग बनला असू शकतो. किंवा -”

मधेच वाक्य बोलायचे सोडून तो विचार करू लागला.

“किंवा काय जोसेफ ? काही मार्गदर्शक विचार येतोय का डोक्यात ?”, त्याच्या वाक्य अर्धवट सोडण्याने मी उतावीळ होऊन जोसेफला विचारले.

तो अजूनही विचार करत होता. काही वेळ विचार करून तो म्हणाला,

“किंवा असे असू शकेल की आपल्याला हे सिंहासनाचे दरवाजे एका विशिष्ट क्रमानेच उघडायचे असतील. ज्यात योगायोगाने आपण पहिला हिफास्टसचा दरवाजा उघडला पण दुसरा दरवाजा डायोनिससचा नसावा.”

“पण आता मागे तरी कसे जाणार, जोसेफ ? जिथून आपण आत आलो तो दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकला आपण. त्यामुळे तो मार्ग बंद आहे. आणि तसेही या अंधार पोकळीत तो दरवाजा कसा शोधणार आहे ?”, मी शंका उपस्थित केली.

जोसेफ काहीच न बोलता आणखी विचार करू लागला.

अंधारपोकळीत अडकण्याच्या कल्पनेने आता आमचे मन अस्वस्थ होऊ लागले. मी आणि स्मिथ चुळबुळ करू लागलो. मोबाईलच्या मंद प्रकाशात स्मिथच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. जोसेफ शांतपणे वरच्या बाजूस अंधारातल्या शून्यात पाहून गूढ विचार करत होता. विचार करता करता त्याने डोळे मिटले. काही क्षण असेच शांततेत गेले.

त्याच्याही मनात काहीशी अस्वस्थता असावी. कारण मिटलेल्या पापण्यातूनही त्याच्या बुबुळांची जलद गतीने होणारी हालचाल दिसत होती. या अंधारपोकळीच्या अस्वस्थ वातावरणात, इतका वेळ त्याच्या मनात चालू असलेले विचार आता त्याच्या ओठावर येत होते. स्वतःशी बोलल्यासारखा तो काहितरी पुटपुटत होता.

“नाट्य, मद्य आणि उन्मादाचा देव - उत्सवांचा जल्लोष करणारा - अंधार - सत्याची दिशा - वास्तवाचा भास - प्रकाश - प्याला - dithyrambs”

काही वेळ तो असंच काहीसं असंबंध तुटक तुटक शब्द बोलून, अचानक तो काही क्षण शांत झाला आणि त्याच्या तोडक्या मोडक्या विचारांची शृंखला पूर्ण होऊन तो आता वाक्ये पुटपुटू लागला.

“डायोनिसस, नाट्य आणि उन्मादाचा देव, त्याचा मार्ग प्रकाशाचा किंवा अंधाराचा नाही, तो उन्मादाचा मार्ग आहे. प्रकाश आणि अंधार हे परस्परविरोधी नसून, एकमेकांच्या अनुपस्थितीचे प्रतिबिंब आहेत. प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव, आणि अंधार म्हणजे प्रकाशाचा. पण या दोघांच्याही पलीकडे जे आहे, ते म्हणजे आभास - सत्याचा मुखवटा. सत्य हे स्थिर नसतं, ते सतत बदलतं, आणि म्हणूनच ते अस्पष्ट असतं. वास्तवाचा अभाव मनुष्याला दिशाहीन करतो, कारण त्याला आधार हवा असतो - भिंत, जमीन, प्रकाशाचा. पण कल्पनेच्या अभावाने वास्तवच दिशाहीन होतं. कारण कल्पना हीच वास्तवाला अर्थ देते, रूप देते, आणि दिशा देते.”

तो काय बोलतोय हे आम्हाला व्यवस्थित कळत नव्हते. मी आणि स्मिथ गोंधळून त्याच्याकडे पाहत होतो. त्याची विचार शृंखला अखंडितपणे चालूच होती.

“डायोनिससचा मार्ग म्हणजे हाच उन्माद , जिथे कल्पना आणि विसर्जन यांचा संगम होतो. जिथे नाट्य हा केवळ अभिनय नसतो, तर आत्मदर्शनाचं साधन बनतं. आणि जिथे अंधार हे अज्ञान नसून, अंतःप्रवेशाचं द्वार ठरतं. या मार्गावर चालताना, मनुष्याला स्वतःच्या भ्रमांशी सामना करावा लागतो. आणि त्या भ्रमांतूनच त्याला स्वतःचं सत्य सापडतं - जे ना प्रकाशात आहे, ना अंधारात, तर उन्मादाच्या मध्यवर्ती क्षणात. डायोनिससचा मार्ग म्हणजे तो क्षण, जिथे दिशा हरवते, पण अर्थ सापडतो.”

तो बोलायचा थांबला. आता त्याचा चेहरा समाधानी दिसत होता. त्याने डोळे उघडले. इतकं बोलूनही आम्हाला आणखी स्पष्टीकरणाची गरज होती. ते जोसेफ देईल म्हणून आम्ही त्याच्याकडे आतुरतेने पहात होतो.

तो बोलू लागला, “हा अंधार नाही, हा एक आभास आहे, वास्तवाच्या अभावाचा. इथे पुढचा मार्ग मिळण्यासाठी आपल्याला कल्पनाशक्तीची गरज पडणार आहे. डायोनिससच्या पवित्र स्थानी जाण्यासाठीचा मार्ग आता आपल्याला प्रत्येकाला वेगळा होऊन स्वतःची कल्पनाशक्ती आणि विवेकबुद्धी वापरून चालायचा आहे. इथे कोणीच कोणाची मदत करू शकणार नाही.”

“पण म्हणजे नेमकं करायचं काय आहे ?”, स्मिथ दुप्पट गोंधळून म्हणाले.

“सांगतो. आता जेंव्हा मी डोळे मिटून विचार करत होतो तेंव्हा माझ्या डोक्यात काही विचार आले. त्या विचारांच्या गर्दीत हरवताना माझ्या मेंदूचा एक भाग या कोड्याचा आणि त्याचा देव डायोनिससचा विचार करत होता -”

“हो तो विचार आम्ही ऐकला.”, मी जोसेफचे वाक्य तोडत बोललो. पण जोसेफने बोलण्याच्या आवेशात माझ्या वाक्याला पूर्णपणे दुर्लक्षित करून पुढे बोलतच राहिला.

“त्याच वेळी माझ्या मेंदूच्या दृश्य हाताळणाऱ्या भागाला काही द्राक्षांच्या वेली, जुना ग्रीक रंगमंच, कोणतातरी वृक्षाच्छादित पर्वत, आकाश, त्या आकाशात उडणारे पक्षी असे दृश्य दिसले. जसे की मी त्या क्षणी त्या निसर्गात उभा आहे. काही क्षण काही ज्वाळांचा भासदेखील झाला. त्याच वेळी मला लक्षात आले. या अंधारात आपल्याला मार्ग नाही मिळणार. आपल्याला आपले डोळे मिटून ह्या होणाऱ्या कल्पनेच्या भासातून मार्ग शोधायचा आहे.”

मी आणि स्मिथनी एकमेकांकडे पाहिले आणि मी जोसेफला प्रश्न केला, “भासांतून मार्ग शोधायचा हे समजलं पण त्या डोळे मिटून तयार होणाऱ्या भासात शोधायचे काय ? आणि समजणार कसे की हा मार्ग आहे की आणखी कोणता सापळा आहे ? आणि जर हा मार्ग मिळाला नाही तर काय होईल ?”

“ते मीही सांगू शकत नाही. कारण आपली प्रत्येकाची कल्पनाशक्ती वेगवेगळी असेल, त्यामुळे तुम्हाला डोळे मिटून काय दिसेल हेही मला सांगता येणार नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कल्पनाविश्वात असणार आहात. इथेच तुम्हाला तुमची स्वतःची विवेक बुद्धी वापरून पुढे मार्ग शोधावा लागणार आहे. त्यामुळेच मी म्हणालो की इथे कुणीच कुणाची मदत करू शकणार नाही. आणि हो अजून एक - कदाचित या मार्गावर काही भास तुमच्या मार्गात अडथळे आणून भ्रम तयार करतील. त्या भ्रमात शहाणपण टिकवून मार्गक्रमण करायचे आहे. हीच डायोनिससची कसोटी आहे.”

एवढे बोलून जोसेफ शांत झाला. या परिस्थितीत आता दुसरा कोणताच मार्ग न दिसल्याने, काही क्षण विचार करून आम्ही तिघे तयार झालो. इथे डोळे बंद करून कल्पनाशक्ती जागृत करायची होती. पण माझ्या मनात आणखी एक भीतीचा विचार आला, जर डोळे मिटूनही कोणतीही दृश्य दिसलेच नाही तर ! प्रयत्न तर करून पाहूयात म्हणून मोबाईलचा फ्लॅश बंद करून मोबाईल खिशात ठेवला आणि मी डोळे मिटले.

काहीच दिसले नाही. परत मी डोळे उघडले. इथे अंधारच होता. डोळे बंद करणे आणि उघडणे यात काहीच फरक नव्हता. दोन्हीकडे अंधार ! मी पुन्हा डोळे बंद करून जोसेफने सांगितलेल्या वर्णनाचा विचार करू लागलो.

द्राक्षवेली… पर्वत… निसर्ग.. डायोनिसस..

सगळे विचार मनात आणून झाले पण काहीच दृश्यमान झाले नाही. हे खरच काहीतरी अतार्किक होते. आत्तापर्यंत मी इतक्या केसेस हाताळल्या पण अशी वास्तवाशी मेळ नसलेली पहिलीच केस आली होती. त्यात जास्त मदत तर जोसेफचीच होत होती. त्यालाच या पुराणांची जास्त माहिती होती. माझ्या बहुतांश केसेस या खुनाच्याच असायच्या. नाही म्हणायला ती जादूगार रिकार्डोची केस तेवढी किंचित अतार्किक होती. एका प्रयोगाला आपल्या सहकाऱ्याला कपाटात बंद करून गायब करण्याच्या खेळात तो सहकारी खरोखरीचा गायब झाला होता. रिकार्डोच्या विरुद्ध कोणताही पुरावा आणि त्या सहकाऱ्याचा देह किंवा मृतदेह न सापडल्याने रिकार्डो खुनाच्या/अपहरणाच्या आरोपातून सहिसलामत वाचला होता. न्यायालयाने निर्दोष मुक्तता करूनही पुढे काही वर्ष पोलिस त्या सहकाऱ्याच्या तपासात होते. पण त्यांनाही हाती काही न लागल्याने ती केस फाईल तशीच बंद झाली. काही लोकांच्या मते त्या रिकार्डोने काही वैयक्तिक वैरभावातून त्या सहकाऱ्याला कैद करून ठेवले होते, पण तो सहकारी रिकार्डोच्या ताब्यातून सुटून देश सोडून पळून गेला, तर काही म्हणत की रिकार्डोने त्याचा खून केला आणि गावाबाहेर नेऊन त्या सहकाऱ्याचे प्रेत जाळून त्याची अशी विल्हेवाट लावली की तो मृतदेह पोलिसांना कधीच सापडला नाही. त्या गावच्या शेरीफने मला याच अनाकलनीयतेमुळे केसमध्ये सामील केले होते पण अखेरपर्यंत काहीच न मिळाल्याने ती केस तशीच अनुत्तरीत राहिली.

तोच मला त्या बंद डोळ्यात कुठलीशी दिव्यांची लुकलुक झाल्यासारखी दिसली. डोळे न उघडता त्या दिशेने मी वळालो आणि वारा आल्यासारखा रंगांचा एक झोत माझ्या दिशेने येऊन मागे निघून गेला. दुसऱ्याच क्षणाला तिथे एका इमारतीच्या मागे असलेल्या छोट्या बोळात मी उभा असल्याचं जाणवलं. मी सभोवताली नजर टाकली. जुनाट दगडी पद्धतीच्या जमिनीवर मी उभा होतो. ती जागा फारशी साफ नव्हती, काही ठिकाणी चिखल होता, काही ठिकाणी नुकताच पाऊस पडून गेल्यासारखं पाणी साचलं होतं. ज्या इमारतीच्या मागे मी उभा होतो त्या इमारतीच्या भिंतीला कचरा गोळा करून ठेवलेल्या २-३ काळ्या पिशव्या होत्या. शेजारी एक जुनाट लाकडी दरवाजा होता. दरवाजाच्या शेजारी जमिनीच्या बाजूस एक छोटीशी खिडकी होती, त्या इमारतीतल्या तळघराचा झरोका असल्यासारखी. त्या पोपडे उडलेल्या दरवाजाच्या वर एक दिवा लुकलुकत होता.

आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते. ना स्मिथ ना जोसेफ. मला कळले मी त्या डायोनिससच्या आभासी विश्वात होतो. आणि क्षणभरातच मला कळून चुकले की नेमका कुठे होतो. ज्या जादूगार रिकार्डोच्या केसबद्दल मी विचार करत होतो त्याच रिकार्डोच्या घराच्या मागे मी उभा होतो. त्या इमारतीत खाली त्याचे जादूचे प्रयोग करण्याचे दालन होते आणि वरच्या मजल्यावर तो राहत होता. त्या दुमजली इमारतीला एक तळमजलाही होता जिथे तो त्याच्या प्रयोगांची तयारी करायचा.

मी त्या समोरच्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. सरळ मार्ग थेट प्रयोगाच्या मंचावर जात होता आणि उजवीकडे तळमजल्यावर जाण्यासाठी एक छोटासा जिना होता. मी त्या जिन्याने खाली गेलो. बरीच अडगळ होती तिथे. मी याआधीही ही जागा पाहिली होती केसच्या तपासाच्या वेळी, त्यामुळे मला ते दृश्य नवीन नव्हते. एका कोपऱ्यात जादूच्या प्रयोगासाठीचे सामान होतं, दुसऱ्या कोपऱ्यात जुन्या झालेल्या मोडक्या वस्तू आणि कपाट होतं. एका भिंतींवर लॉकेट, कोट आणि काही प्रयोगाचे कपडे टांगले होते, तर दुसऱ्या भिंतींवर काही आरसे लावले होते. मी त्या आरश्यात पाहिलं, तर मला धक्काच बसला. माझं प्रतिबिंब त्या आरश्यात दिसत नव्हतं. पण लगेच मला लक्षात आलं की आपण या आभासी दुनियेत आहोत. त्यामुळे अश्या अतार्किक गोष्टी इथे होऊ शकतात. मधल्या भागात मोकळी जागा होती आणि त्याच्या बरोबर वरती एक कडी असलेला छोटा चौकोनी दरवाजा होता. हाच तो दरवाजा असावा जिथून कपाटातील व्यक्ति खाली उतरत असावा आणि प्रेक्षकांसाठी जो गायब व्हायचा. छताच्या बाजूला लाकडी फळ्या होत्या. मी स्टेजच्या बरोबर खाली उभा होतो. त्या लाकडी फळ्यांच्या फटीतून हलकासा प्रकाश येत होता. त्यातल्या एका फटीतून मी पाहिले आणि मला दुसरा धक्का बसला.

वरती जादूगार रिकार्डोचा जादूचा प्रयोग चालू होता. हा आभास मला का दिसत असावा ! त्याच्यावर झालेल्या केसनंतर त्याने जादूचे प्रयोग करण्याचे सोडून दिले होते. त्यामुळे हा आभास त्याआधीच्या काळातला, म्हणजे ४ वर्षांपूर्वीचा असावा. मी वाचलेल्या केसच्या फाईल्समधून माहितीतून माझ्या डोक्यात हा बनला असावा.

जादूगार रिकार्डो बोलत होता आणि प्रेक्षक त्याच्या नुकत्याच केलेल्या जादूवर टाळ्या वाजवत होते. रिकार्डो बोलत बोलत इकडे तिकडे चालत होता त्यामुळे त्याच्या पावलांचा त्या लाकडावर चालण्याचा आवाज येऊन काही ठिकाणी सैल झालेल्या लाकडांची कुरबुरही ऐकू येत होती.

“आता सादर आहे, या मंचावरचा सर्वात अद्भुत खेळ, ज्यांने भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावली, असा अनोखा भन्नाट खेळ, खास रशियावरून मागवलेला, जादूई कपाटाची शक्ती - अदृश्य होईल व्यक्ती”

तोच खेळ होता, ज्यात तो सहकारी गायब झाला होता. मी स्टेजवर कोण आहे ते पाहू लागलो आणि तिसरा धक्का बसला.

तो तोच सहकारी होता, ज्याच्या नाहीश्या होण्याने रिकार्डोवर केस झाली होती. रिकार्डोने प्रेक्षकांना आतून बाहेरून, पुढून मागून कपाट दाखवले आणि सहकाऱ्याला आत जायला सांगितले. तो सहकारी चालत चालत कपाटाच्या आज जाऊन उभा राहिला. रिकार्डोने कपाट बंद केले. मला तो माझ्या वरचा आणि कपाटाच्या खालचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. रिकार्डोने काही मंत्र म्हणल्यासारखे केले आणि दरवाज्यावर आपली जादूच्या प्रयोगाची छडी आपटत तीन वेळा ठक् केले आणि व्यक्ती गायब झाल्याची घोषणा केली.

तेवढ्यात त्या सहकाऱ्याचा मृतदेह माझ्यासमोर पडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो सहकारी माझ्याकडे पाहून हसला. अचानक घडलेल्या या घटनेने मी एकदम बिथरलो आणि चार पावलं मागे आलो. मला बसलेल्या त्या चौथ्या धक्क्याने मी घाबरून जाऊन डोळे उघडले.

त्याच क्षणाला पुन्हा एकदा तो अंधारपोकळीमधला काळोख माझ्या डोळ्यात भरला. इथेही कुणीच नव्हते, ना स्मिथ ना जोसेफ. पण त्या अंधार पोकळीत आपण पुन्हा अडकले जाऊ नये म्हणून मी डोळे बंद केले.

परत एकदा मी त्या आभासी विश्वात जादूगार रिकार्डोच्या तळघरात पोहोचलो. मी स्वतःला समजावले, हे एक आभासी विश्व आहे. घाबरण्यावही काही गरज नाही. हा आपण वाचलेल्या केस फाईल्सचा परिणाम आहे. नेमका त्याच खुनाच्या दिवशीचा देखावा तयार होतोय.

वरती प्रयोग तसेच चालू होते. रिकार्डो आपला सहकारी तळघरात आहे या समजुतीने कपाट सरकवून पुढचे खेळ करू लागला.

तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला देह अजूनही माझ्याकडेच पाहत नव्हता. मात्र यावेळी त्याचे हसू गायब झाले होते. मला कळत नव्हते या खेळाच्या दिवशी असेच घडले असावे का ? त्या केसला ४ वर्षे झाली होती. पण आता माझ्यातला गुप्तहेर जागा झाला. मी त्या सहकाऱ्याच्या जवळ जाऊन त्याचे निरीक्षण करू लागलो. त्याच्या शरीरावर कुठेच शस्त्राने वार केल्याची काही खुण नव्हती. मग हे इतके रक्त आले कुठून ! त्याच्या नाकाजवळ बोटे नेऊन मी पाहिले, तो सहकारी मृत पावला होता. मी त्याचे कपडे तपासले. तिथेही काही हत्यार वा तत्सम वस्तू नव्हती. मी वर पाहिले, लाकडी फळीचा दरवाजा आपोआप बंद झाला होता. त्या सहकाऱ्याच्या पाठीवर काही निशाण आहे का हे पाहण्यासाठी मी त्याला पालथा करण्यासाठी वाकलो तोच तो सहकारी अचानक गायब झाला. पाचवा धक्का !

परत मी घाबरून उठून मागे गेलो. माझ्या छातीतील धडधड वाढली होती. त्या तळमजल्यावरील दृश्य पुन्हा, मी आलो होतो तेंव्हासारखे पूर्ववत झाले. त्याच कोपऱ्यातील वस्तू, कपाटे, भिंतीवरचे कपडे आणि आरसे सगळं काही तसंच झालं. मी पुन्हा एकदा त्या आरश्यात पाहिलं. आता त्या आरश्यात प्रतिबिंब दिसत होतं पण ते माझं नव्हतं !!

त्या मेलेल्या सहकार्याचा चेहरा होता तो. माझी बुद्धीच काम करेनाशी झाली. हा कसला आभास ! इथे माझी कसोटी होती. या आभासी विश्वात मला धैर्य दाखवून टिकायच होतं. मी स्वतःला समजावलं की हे सर्व आभास आहेत. वास्तव नाही. शांत राहून आता पुढचा मार्ग शोध.

मी त्या आरश्याच्या जवळ जाऊन नीट प्रतिबिंबाचं निरीक्षण करू लागलो. त्या आरश्यावर द्राक्षांच्या वेलींची नक्षी होती. आरश्याच्या एकदम वरच्या भागात छोटासा मद्याचा प्यालाही होता. त्यातून आता एक जांभळसर द्रव ओघळू लागला आणि आरश्याच्या काचेवरून ओघळत खाली गेला. तो ओघळ पुसावा म्हणून मी आरश्यावरून हात फिरवला.

त्याचबरोबर त्या खोलीत हलकासा जांभळा प्रकाश पाडून जमीन थरथरू लागली. त्या कंपासोबत खोलीतील वस्तुही थरथरू लागल्या. जादूचे सामान जे लाकडी होते त्याचा चुरा होऊ लागला. जे धातूचे होते ते फुटल्यासारखा आवाज करून टणा टणा उडू लागले. १-२ उडणारे तुकडे मी वाकून चुकवले. वरच्या लाकडी छतातूनही आता खूप सारी धूळ पडू लागली. भिंतीवर टांगलेले कपडे खाली पडू लागले. माझ्या शेजारच्या भिंतीवर असलेल्या आरश्यातला पहिला आरसा तडकला आणि ठळ्ळ असा आवाज करत खाली पडला. त्याच्यामागून दुसरा, मग तिसरा.

अंधार आणि प्रकाशाच्या पलीकडच्या, वास्तवाच्या अभावातल्या, आभासांच्या क्षणांचा डायोनिससच्या कसोटीतला उन्माद सुरू झाला होता.

आता फक्त माझ्यासमोरचा सहकाऱ्याचा चेहरा दिसलेला चौथा आणि शेवटचा आरसा शिल्लक राहिला. त्याच्यावर असलेल्या वेली वाढत जाऊन त्या आरश्याच्या कडेच्या लाकडाला पूर्णपणे वेढू लागल्या. ती वेल वाढत जाऊन वरच्या मद्याच्या प्याल्यापर्यंत पोहोचली. त्या मद्याच्या प्याल्याला हलकासा तडा गेला.

…आणि तोही आरसा फुटणार इतक्यात -

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अबब, केवढा तो पसारा (सॉरी, आवाका Happy ) अन् तो अभ्यास!
खरं सांगायचं तर लिंक तुटली आहे आता, येवढी मोठी गोष्ट झाली आहे. त्यात ते कूट प्रश्न... जंजाळ आहे. ह्यात हात घालणाऱ्या लेखकाला सलाम!

अरे व्वा, नवीन भाग तो पण इतका मोठा..
थोडा वाचून झाला. सावकाश समजून घेऊन वाचते आहे.
कथासूत्र खूप छान, एकदम वेगळे आहे.
आणि हे भाषांतर नाही हे तर जास्त वैशिष्ट्यपूर्ण आहे.

यःकश्चित, वेळ घ्या, निवांत लिहा.
पूर्ण झाल्यावर प्रत्येक भागात पुढे आणि मागे जाण्यासाठी लिंक्स द्या.
पूर्ण झाल्यावर वाचणार आहे. Happy

नवीन प्रतिसाद लिहा