तू सुखकर्ता तू दुःखहर्ता ..

Submitted by छन्दिफन्दि on 23 August, 2025 - 02:13

PC: चित्र AI निर्मित आहे.

“या वर्षी आपला पहिला नंबर पक्का आहे. कशावरून म्हणजे काय? आपली थीमच तशी आहे. अगदी बाप्पा पासून सगळं कसं एकदम environment friendly, आणि डोळ्याचं पारणं फेडणारी देखील…” राघव म्हणाला.
“ तर तर… गणपती पेपर मशेपासून बनवलाय सांगूनही त्याला खर वाटतं नव्हतं.. आणि तो दुसरा तर ट्युलिपचा बगीचा बघून वेडाच झाला. पाकळीला हात लावून बघायला लागला, त्याचा विश्वासाचं बसत नव्हता की ती कागदाची आहेत..”
“ती एक परीक्षक , तिला तर म्हणे केशराचा वासही येत होता आपला केशरमळा बघून.
हा हा हा… आणि ते मागच्या हिमालयावरच खरं बर्फ.. तेही आपल्या या हवेला.. ठार वेडावले. त्यांचा वासलेला ‘आ’ बंद व्हायला ३० सेकंद लागली, तेव्हाच बक्षीस कन्फर्म झालेलं…”

“अरे येवढी मेहनत घेतलीये, पैसे उभारले... पहिला नंबर तो मंगताईच है!”
“हो रे ते एक कुलकर्णी सोडले तर झाडून सगळ्यांनी भरभरून देणगी दिलीय… “
“त्या कुलकरण्याच तसच आहे.. आता G- Pay आहे तर ह्याच कधी नेटवर्क चालत नाही, कधी फोन बंद असतो… शेवटी खनपटीला बसलो तेव्हा कुठे पाचशे तरी ट्रान्स्फर केले त्याने. अरे काकू पण असच करायच्या.. पूर्वी जेव्हा देणगी पुस्तक घेऊन जायचो.. ह्या बंडल मोजत बसल्यात पण एक नोट सुटेल तर शप्पथ..”

“ अरे गप्पा आवरा… कामं करा … ते ढोल बांधायचे राहिलेत बघा अजून. उद्या खोटी व्हायला नको मिरवणुकीच्या वेळी.
आणि काय रे मुलांनो, तुम्ही पळापळी कसली करताय… अरे ती खुर्ची पडली बघ .. नशीब कुणाच्या पायावर नाही पडली..”
“ अरे गुलाम चोर काय गुलाम चोर…?हा कुठला खेळ काढलात नवीन? लेझिम प्रॅक्टिस करायला आलाय ना, मग ती करा सुरू! उद्या रीलं काढायची असतीलच.. त्यासाठी तरी नीट तालात करा..
ए लाव रे ते गाणं.. कुठलं काय.. ठरलयं ना तुमचं नवीन कुठलस ते.. “लंबोदराय.. विघ्नेश्वराय..”.
"फक्त आवाज हळू.. दहा वाजत आलेत. ”

“अहो नाना, किती तणतणताय..? टेक अ चील पिल.. तुम्ही घरी जाऊन झोपा आता शांतपणे. आम्ही आहोत ना. उद्या सकाळी डायरेक्ट पूजेला या. बघतं राहाल इतकं सगळं परफेक्ट झालं असेल.. ”, मक्याने नानांना जरा आवरलं.. कसलं त्यांची बोळवणचं केली म्हणा ना!

“अरे बरं झालं कटवलस त्यांना. स्वतः स्वस्थ बसत नाहीत आणि उगाच आपल्या डोक्याला शॉट देतात. “
“ तर काय? संध्याकाळी ह्यांना उद्याच्या मिरवणुकीच टेन्शन आलेलं.. कारण काय तर तिकडे वर गुजरातेत चक्रीवादळ येणारे त्याच…
म्हटलं, नाना, आपल्याकडे भाद्रपद असूनही एक काळा ढग नाहीये आकाशात. उन्हात फिरून फिरून स्किन रापली आमची. आणि तुमचं काय भलतंच. म्हणे पर्यावरण जपणारा, कागदी लगद्याचा, गणपती आहे.. सुखरूप विसर्जन झालं पाहिजे.. हे आणि ते. सुरू राहीलं असतं. तेव्हढ्यात नानीने हाक मारली म्हणून सुटलो.”

“चल आता एकदा शेवटची तालीम करून घेऊ. ए पिंट्या, राक्या, बेन्जो … चला पटापटा.. उशीर झाला कि परत कोणी ओरडत यायच्या आधी आटपून घेऊ यात. “ मक्याने लेझीम घेऊन पकडापकडी खेळत मंडपभर मुक्त संचार करणाऱ्या सगळ्या पोराटोरांना आवाज दिला.
तेव्हा कुठे ढोल, रेकॉर्ड , लेझीम, झांजांच्या गजरात तालीम सुरू झाली.

“अरे, हा आवाज कसला..? ”
“ वारा सुटलाय वाटतं .. पण येवढढा? अरे पाऊस पण पडायला लागलाय.. एकदमच जोराचा येतोय… आपलं लक्षच नाहीये. त्या गाणी लेझिमच्या आवाजात काही ऐकायला पण नाही आलं बहुतेक.”

एव्हाना येवढा वेळ चाललेली गणपतीची गाणी, गप्पा सगळं बंद पडत चाललेलं..

“अर्धा तास झाला तरी पाऊस थांबायची लक्षण नाहीत. मंडप waterproof असला, तरी येवढा पाऊस-वारा त्याला झेपेलं का.. त्या झडी आत येऊन हळू हळू करत जमीन ओली होतेच आहे. तू आधी त्या मुलांना त्यांच्या बिल्डिंग खाली तरी सोडून ये. तसही आपल्याला आज इथे थांबायचं आहेच.”

“अरे अरे तो पुढचा खांब बघ कोसळतोय… हो ना छप्पर पण इतकं वरखाली होतंय की उडूनच जाईल अस वाटतंय… गळायला पण लागलयं बघ. तळी साठतायत आता. “
“पहिले ते ढोल, लेझिम सगळं स्टेजखाली मावतय का ते बघा.. आम्ही दोघे ताडपत्री मिळतायतं का ते बघतो.. “
“नानांची पहिली बत्तिशी खरी ठरली म्हणायची.. आता दुसरीचा बंदोबस्त करायला हवा. बाप्पाच्या वरचं छत ३ पदरी आहे म्हणून ठीक आहे. पण हे असच चालू राहील तर काही खरं नाही. त्या ट्युलिप ना एव्हढ्या आत पाणी कुठून लागलं काय माहीत? रंग पण जायला लागलाय. यार आता खरंच टेन्शन आलंय..”

“आपण ही ताडपत्री ओढून धरलिये पण तिचा किती उपयोग होतोय तो बाप्पाच जाणे.. फोन ही बंद पडलेत, पाणी घोट्याच्या वर जायला लागलयं.. बाप्पा‌, एरवी खुट्ट झालं की आम्ही तुझा धावा करत असतो पण आता आमची पाळी. तुला काही होऊन देणार नाही.. काही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही.”
“ ओ नो! लाईट गेले .. वाटतचं होत… एव्हढ्या पावसात ते होणारच होत. अरे काही तरी बोला .. बोलत रहा. ह्या काळोखात काही दिसतही नाहीये.. “

“ समोर अचानक एवढा प्रकाश की आग कुठुन आलं.. तेही पावसात? .. नक्की काय आहे ते..?
“ओह! वीज पडली समोरच्या नारळावर…” राघवचा कापरा आवाज अंधारात चिरत गेला...

कोणी काहीच न बोलता जागच्याजागी तसेच ती ताणून धरलेली ताडपत्री घेऊन उभे राहिले, तोंडावर आपटणाऱ्या पाण्याची, झोंबणाऱ्या वाऱ्याची, पाऊलाजवळ साठत चाललेल्या तळ्याची तमा न बाळगता....

***
कधीतरी डोळे उघडले. हात पाय जागेवर आहेत का ह्याची जाणीवही गेली होती, आपण उभ्या उभ्याही झोपू शकतो हा साक्षात्कार प्रत्येकाला झाला होता. पुढचा मंडप पूर्ण कोलमडलेला, खुर्च्या आडव्या तिडव्या पडलेल्या.. ट्युलीपचा बगीचा, केशराचा मळा नावालाही शिल्लक नव्हते.. पूर्ण लगदा झालेला.. पोटात धस्स झालं, काळजाचा ठोका चुकला, बाप्पाकडे पाहिलं आणि विश्वास बसेना.
एकीकडे सुर्यमहराजांनी निरभ्र आकाशात आगमन केलेलं. सोनेरी उन्हाची तिरीप त्या ताडपत्रीतून चुकार आतमध्ये येऊन बाप्पाच्या स्नेहल चेहऱ्यावर विसावली होती.

निवेदन :
___________________________________
शब्द : लंबोदर, खुर्ची, बगीचा, चक्रीवादळ आणि ग़ुलाम

गेल्या वर्षी वरील सर्व शब्दांचा समावेश करून गोष्ट लिहायची असं एक आव्हान होतं. गणपती उत्सवाचं वातावरण असल्यामुळे, अर्थातच बाप्पाचा उत्सव केंद्रस्थानी ठेवून ती लिहिली गेली.
आपले नेहमीचे व्याप सांभाळत (सार्वजनिक) गणेशोत्सव दणक्यात पार पडावा यासाठी झटणाते सर्व स्वयंसेवक आणि कॉलनी कॉलनीत मोठ्या हौसेने उत्सव साजरा करणारी मंडळे यांची ही गोष्ट, त्यांनाच समर्पित!

गणपती बाप्पा मोरया!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users