गोष्ट एका प्रेमाची!

Submitted by पराग र. लोणकर on 22 August, 2025 - 08:11

गोष्ट एका प्रेमाची!

पुस्तक बदलण्यासाठी वाचनालयात जाण्यासाठी प्रिया घराच्या बाहेर पडली आणि काही अंतरावरूनच तिला मोटरसायकलवरून राजा येताना दिसला. तिचा चेहरा एकदम खुलला. राजा जसा थोडा जवळ येऊ लागला तसं त्याच्या मागे बसलेली सोनाली प्रियाला दिसली आणि प्रियाचा चेहरा एकदम पडला. तिच्या अगदी जवळ येऊन राजाने मोटरसायकल थांबवली.

“काय लायब्ररीत का?” त्यानं हसत तिला विचारलं.

“होss येतोस का?” आपण काहीतरी वेड्यासारखा प्रश्न विचारला आहे, हे प्रियाला तो प्रश्न विचारताच लक्षात आलं.

“अगंs आम्ही पिक्चरला चाललोय.” राजा अगदी सहज तिला म्हणाला.

त्यावर, “ओकेss बायss” असं म्हणत प्रिया ताबडतोब चालायला लागली. मागून सोनाली आणि राजाचं हसणं तिला ऐकू आलं; जणू तिला चिडवत असल्यासारखं- निदान तिलातरी ते तसं वाटलं.

राजा आणि प्रिया हे खरं तर अगदी बालपणापासूनचे मित्र-मैत्रीण. एकाच कॉलनीत राहत असल्यामुळे त्यांच्या आयांचं एकमेकांकडे जाणं व्हायचं आणि लहान वयातील ही दोघंही आपल्या आयांबरोबर असायची. अगदी भातुकली खेळतानाच्या दिवसांपासून राजाला आपला नवराच मानला होता प्रियानं. राजाच्या मात्र मनात तसं काहीच नव्हतं. त्यामुळे तारुण्यात पदार्पण करताच जवळच्याच कॉलनीत राहणारी सोनाली राजाला आवडली आणि देखणा, हँडसम राजा सोनालीलाही आवडला. आपोआपच दोघांची जोडी जमली.

ही जमलेली जोडी तोडून राजाची आपल्याबरोबर जोडी जमवणं हे आपल्या बापालाही जमणार नाही याची प्रियाला जाणीव होती. कारण राजा जेवढा हँडसम होता इतकीच सोनालीही तोडीस तोड होती. अगदी चित्रपटातली नायिकाच! सौंदर्यात- अगदी लाखात एक असलेल्या सोनालीला शंभर किंवा हजारात एक असलेली प्रिया स्पर्धा देऊच शकणार नव्हती.

त्यामुळे प्रियाने तशी या स्पर्धेतून हार मानलेलीच होती, पण राजामध्ये गुंतलेल्या जीवामुळे त्या दोघांना एकत्र पाहिले की ती सैरभैरही होत होती.
इकडे प्रियाच्या आई-बाबांचं तिच्यासाठी स्थळं बघणं चालू होतं आणि राजाच्या बाबतीत आपलं ‘मिशन इम्पॉसिबल’ आहे याची जाणीव असल्यामुळे प्रियानंही या वरसंशोधनास विरोध केला नव्हता.

असंच एके दिवशी देशपांडे गुरुजी काही स्थळांची यादी घेऊन प्रियाच्या घरी आले होते. आपल्या बॅगेतून त्यांनी काही मुलांचे फोटो बाहेर काढले. त्यातील प्रियाच्या आणि तिच्या घराच्या दृष्टीने योग्य स्थळांचा विचार करून ते त्यातील काही फोटो बाजूला ठेवत होते तर काही फोटो प्रियाच्या वडिलांसमोर ठेवत होते. स्वाभाविक मानवी वृत्तीनुसार प्रियाच्या वडिलांचं लक्ष वारंवार त्या बाजूला ठेवलेल्या फोटोंकडेच जात होतं. त्यातील एका मुलानं त्यांचं लक्ष चांगलंच वेधून घेतलं. त्यांनी गुरुजींना त्या मुलाबद्दल चौकशी केली.

“खरं तर तुमची नजर अगदी पारखी आहे. हा मुलगा खरंच खूप चांगला आहे. देवांश रानडे याचं नाव. पण सॉरी! प्रियासाठी इथं काम होईल असं वाटत नाही.” गुरुजी प्रियाच्या वडिलांना म्हणाले.

“का बरं?” वडिलांनी विचारलं.

“अहोs फारच मोठी फॅमिली आहे. कुटुंबाचा फार मोठा व्यवसाय आहे. मुलगा तोच व्यवसाय पाहत आहे. अक्षरश: गडगंज संपत्ती आहे.”

“ओहह! म्हणजे त्यांना पण तितकेच तोलामोलाचे लोक लागणार!” वडील म्हणाले.

“तसं नाही. मंडळी खूपच चांगली आहेत, तशी त्यांची काही अपेक्षा नाही. त्यांना सून दिसायला मात्र अगदी लाखात एक असायला हवी आहे.”

“अहो आपली प्रियाही काही कमी नाहीये. स्मार्ट आहे, चांगली शिकलेली आहे. गुरुजी, करा ना येथे प्रयत्न! शेवटी देवाच्या मनात असेल, तेच होईल.” प्रियाच्या बाबांनी आपला आग्रह कायम ठेवला आणि मग देशपांडे गुरुजींनी दोन्ही बाजूंची एक बैठक लगेच फोनवरच ठरवून टाकली.

ठरल्या दिवशी कांद्या-पोह्यांचा कार्यक्रम झाला आणि अपेक्षेप्रमाणे मुलाकडच्यांकडून दुसऱ्या दिवशी नकार आला. प्रियाचा जीव राजामध्येच अडकलेला असल्याने तिला या नकाराचे फारसे काही वाटले नाही. तिचे आई-बाबा मात्र इतकं मोठं आणि चांगलं स्थळ आपल्या हातून गेलं यामुळे बऱ्यापैकी नाराज झाले.

*

साधारण चार-पाचच महीने झाले असतील, राजा प्रधानची पत्नी म्हणून, प्रधानांच्या घराची लाडकी सून म्हणून प्रियानं प्रधानांच्या घरात प्रवेश केला.

लग्नाच्या दिवसभराच्या दगदगीने दमून राजा आणि प्रिया रात्री आपल्या खोलीत आले.

बिछान्यावर बसून प्रियाचा हात आपल्या हातात घेऊन राजा तिला म्हणाला,

“प्रिया, खूप खूप थॅंक्स! सोनालीचं आणि माझं खरं तर एकमेकांवर किती प्रेम होतं! पण तिनं अचानक दगा दिला आणि मी मानसिक दृष्ट्या अगदी कोलमडूनच गेलो होतो. आई-बाबांना काय करावं कळत नव्हतं. त्यावेळी तू धावून आलीस, माझा हात धरलास. माझ्याशी लग्न करण्यास तयार झालीस. आणि त्यामुळेच मी सावरू शकलो. नाहीतर त्या वेळच्या त्या मन:स्थितीत मी अगदी आत्महत्याही करून मोकळा झालो असतो. खरंच खूप थॅंक्स!” असं म्हणून भावनाविवश झालेल्या त्यानं प्रियाच्या मांडीवर आपलं डोकं ठेवलं. तो इतका दमला होता, की काही क्षणात तो तसाच झोपीही गेला.

प्रिया मात्र पूर्ण जागी होती. ती आनंदीही होती आणि मनातील गिल्टमुळे थोडी डिस्टर्बही!

तिला रानडेंकडून आलेल्या नकाराची संध्याकाळ आठवली. रानडे कुटुंबियांच्या अपेक्षा माहीत असल्याने हा नकार तसा अपेक्षितच होता. काही कल्पना डोक्यात येऊन, प्रियानं देशपांडे गुरुजींना फोन लावला आणि देवांश रानडे याच्यासाठी सोनालीचं स्थळ सुचवलं.

देशपांडे गुरुजी थक्कच झाले. आपल्याला नकार देणाऱ्या एका गडगंज कुटुंबाला दुसऱ्या एखाद्या मुलीचं स्थळ सुचवणं, यासाठी मनाचा कमालीचा मोठेपणा लागतो, या विचारानं प्रियाचं त्यांनी अगदी तोंडभरून कौतुक केलं आणि फोन ठेवल्या ठेवल्या ते कामाला लागले.

पुढील घडामोडी एकदम वेगाने घडल्या. रानडे कुटुंबीयांना सुंदर, देखणी सोनाली आवडून गेली. त्यांचा सोनालीला होकार आला.

राजा आणि त्याचं कुटुंब मध्यमवर्गीय होतं. त्यामुळे बिचारी सोनालीही विचारात पडली. राजावरील आपलं प्रेम की आयुष्यभराचं वैभव या विचाराच्या कात्रीत ती सापडली आणि शेवटी प्रॅक्टिकल विचाराचा विजय झाला आणि राजाशी असलेला आपला संपर्क तोडून ती देवांशला होकार देऊन मोकळी झाली. दोन्हीकडच्या मंडळींना लग्न पार पाडण्याची घाई असल्याने आणि थांबण्याचेही काहीच कारण नसल्याने लग्नसोहळाही काही दिवसात संपन्न झाला.

साध्या, सरळ, सज्जन राजाने कसलाही विरोध केला नाही. तो स्वत: मात्र निराशेच्या गर्तेत सापडला. अर्थातच प्रिया त्याच्या मदतीला धावून गेली आणि तिच्या सोबतीने तोही लवकर स्वत:ला सावरू शकला. प्रियाशी काही दिवसात लग्न करून तोही मोकळा झाला.

आपल्या मांडीवर झोपलेल्या राजाच्या डोक्यावरून हात फिरवत प्रिया हे सर्व आठवत होती.

रानडे कुटुंबियांसाठी सोनालीचं स्थळ प्रियानं सुचवलं आहे, हे कुणालाही सांगणार नाही, असं वचन तिनं देशपांडे गुरुजींकडून घेतलं होतं. हाही त्यांना तिच्या मनाचा मोठेपणा वाटला होता.

आता हे वचन ते कधी मोडू नयेत, इतकीच प्रार्थना प्रिया करत होती...

**

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कसली भारी आहे ही मुलगी.
सोनालीने ती प्रॅक्टिकल आहे हे दाखवलं म्हणजे खरंतर तिचं खरं रूप दाखवलं. पण तरीही राजाला खरं काय ते कळलं तर तो प्रियालाच दोष देणार.
तसंही प्रिया आणि राजाचं लग्न झाल्यावर देशपांडे गुरुजींना प्रियाचा डाव लक्षात येईलच.

मस्त आहे!
अर्ध्यात ट्विस्ट कळूनही शेवटपर्यंत वाचायला मजा आली Happy
छान सुचली आहे. यावर पिक्चर निघेल.
अर्थात पिक्चर मध्ये हे भांडे फुटल्यावर होणारा ड्रामा सुद्धा असेल.

करीब करीब सिंगल आणि सैय्यारा पाहून झिंगलेल्या दर्शकांसाठी/वाचकांसाठी उतारा .
वास्तवाचे दर्शन करवणारी कथा, म्हणून आवडली.

मस्त मस्त… आवडली..

आजच्या काळातल्या सोनालीचीही फारशी चुक कुठे आहे. आणि नवराही प्रेम करणारच अशा सुंदरीवर.

प्रियाच्या मनासारखे झाले हे उत्तम झाले.

सर्वांना खूप खूप धन्यवाद! येथील प्रतिसादांमुळे खरंच खूप उत्साह वाढतो!

@पीनी = तसंही प्रिया आणि राजाचं लग्न झाल्यावर देशपांडे गुरुजींना प्रियाचा डाव लक्षात येईलच. (हे कसं ते माझ्या लक्षात आलं नाही. कारण गुरुजी राजाला ओळखत नाहीत. सोनाली आणि राजा यांचं प्रेमप्रकरण चालू आहे आणि प्रिया राजावर प्रेम करत आहे, हे गुरुजींना माहीत असणार नाहीये. अर्थात माझ्याकडून काही चुकत असणे शक्य आहे.)

छान आहे कथा. अजून संवाद टाकून वाढवता आणि खुलवता आली असती.
राजाला खरं काय ते कळलं तर तो प्रियालाच दोष देणार>>> तरी प्रिया म्हणुच शकते की मी फक्त स्थळ सुचवले. इतकंच जर सोनाली ला प्रेम महत्वाचं असतं तर तिने श्रिमंत स्थळाला नकार दिला असता Wink Wink गिरे तो भी टांग उप्पर!

नवीन प्रतिसाद लिहा