भाग पहिला: https://www.maayboli.com/node/87035
भाग दुसरा: https://www.maayboli.com/node/87043
दुसऱ्या दिवशी लवकर जरी उठलो असलो तरी शांभवीचं सगळं आवरून तयार व्हायला थोडा अधिक वेळ लागला. सासूबाई आणि मावशी सगळं आटपून वेळेत तयार झाल्या होत्या. आता पाऊस थांबला होता पण वातावरण ढगाळ होतं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार काश्मीरमध्ये आठ ते दहा एप्रिल पाऊस असणार होता. आज आम्हाला चरार-ए-शरीफ आणि युसमर्गला जायचं होतं. दोन्ही ठिकाणं बडगाम जिल्ह्यात आहेत. इलहामला रात्री नाश्त्याबद्दल विचारलं होतं. त्याच्याकडे नऊ वाजता नाश्ता मिळणार होता पण आम्ही तेव्हाच फिरायला बाहेर पडणार होतो म्हणून त्याला साधा ब्रेड बटर द्यायला सांगितला. होमस्टेमध्ये एक झेक स्त्री तिच्या पंजाबी नवऱ्यासोबत काश्मीर पाहायला आली होती. त्यांचाही आज युसमर्ग पाहायचा प्लॅन होता. यासिन वेळेत न्यायला आला. आज त्याचीही तब्येत ठीक नव्हती. त्याचा ड्रायव्हरशी अजून संपर्क होऊ शकला नव्हता म्हणून आज तोच आम्हाला फिरवणार होता.
युसमर्गच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. वाटेत यासिन आम्हाला बऱ्याच ठिकाणांची माहिती सांगत होता. त्याने आम्हाला काश्मिरी धाटणीची जुनी घरे दाखवली. त्यांचा फोटो आम्हाला घेता आला नाही. मुख्य शहरातले फोटो आम्हाला फारसे काढता आले नाही.
चरार-ए-शरीफ दर्गा आम्हाला वाटेतच लागणार होता पण आम्ही युसमर्गहून परत येताना तिथे भेट देणार होतो. ब्रेड बटरने आमचं काही फारसं भागलं नसल्याने आम्हाला पुन्हा भूक लागली होती. आम्ही दर्ग्याच्या समोर गाडी थांबवाली आणि तिथे असणाऱ्या एका छोट्या हॉटेलमध्ये गेलो. तिथे एक भल्या मोठ्या पुरीसारखा पदार्थ तळत होते. तो प्रसादने मुद्दाम मागून घेतला. खायला बरा लागला. चहा आणि छोलेपुरी मागवली. शांभवीला लाडू आणि कुरमुरे खायला दिले पण तिला आमच्यासमोर असणारे वेगळे पदार्थ खायचे होते. आजूबाजूला काही दुकानं होती, त्यांच्या दर्शनी भागात हिरव्या रंगाचा तळ असणारी भांडी एकावर एक रचून ठेवली होती. यासिनला विचारलं तर तो म्हणाला, ही मांसविक्रीची दुकानं आहेत.
खाऊन झाल्यावर पुन्हा युसमर्गच्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या आजूबाजूला सफरचंद, पेअर आणि बदामाच्या बागा होत्या. पानही दिसू नये एवढी झाडं फुलांनी बहरली होती. यासिन सहज त्या झाडांमधील फरक समजावून सांगत होता. वाटेत गुराखी मेंढ्याचे कळप घेऊन जाताना दिसत होते. एक वाईट गोष्ट म्हणजे एवढ्या सुंदर स्वर्गासारख्या जागेला कचऱ्याचे गालबोट लागले होते. आम्हाला वाटलं, वाढत्या पर्यटनामुळे कचरा झालाय. यासिन म्हणाला की गावातल्या लोकांनीच हा कचरा केलाय.
युसमर्ग हे श्रीनगरच्या पश्चिमेला आणि गुलमर्गच्या दक्षिणेला पीरपांजाल पर्वतरांगांतील हे एक गवताळ पठार आहे. चहुबाजूने पाईन आणि फरच्या झाडांनी वेढलेले हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने आतापर्यंत फारसे माहीत नव्हते. दूधगंगा नदी इथूनच उगम पावते. असं म्हणतात की येशू ख्रिस्त या इथे येऊन गेला होता म्हणून या जागेला युसमर्ग म्हणतात. अर्थात याचा संदर्भ कुठेही आढळत नाही. श्रीनगरपेक्षा इथले लोक फेरन हा त्यांचा पारंपरिक पोशाख घातलेले जास्त प्रमाणात दिसत होते. इथल्या थंडीत वापरायला हा पोशाख अगदी सोयीचा. हातही आतमध्ये घेता येतात. यावर यासिनने एक गंमत सांगितली. पूर्वी एका पर्यटकाला त्याच्या ट्रीपच्या पहिल्याच दिवशी युसमर्गला घेऊन आला होता. इथे आल्यावर त्याने फेरन घातलेल्या लोकांना पाहिलं आणि यासिनला विचारलं," यहापे लोगोंके हात क्यो नही हैं"?
मुसळधार पावसात दिसणारे युसमर्ग
पाईनचे जंगल
लांबवर पसरलेली गवताळ कुरणे, उजवीकडे युसमर्गचा जलाशय
सुंदर पण बंद असलेले 'जेकेटीडीसी'चे रिसॉर्ट
प्रवेशद्वारावर मोजून आठ गाड्या होत्या. यासिन सांगत होता सोनमर्ग गुलमर्गला हजार गाड्या सीजनला सहज असतात. आम्ही गाडीतून उतरल्यावर घोडेवाले मागेच लागले. सांगून समजावूनही ऐकेनात. ते लोक पिच्छा सोडतच नाहीत. त्यात एका आजोबांच्या वयाच्या घोडेवाल्याला बघून मला खरंच वाईट वाटलं. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी इथे 'नीलनाग सरोवर' हे उत्तम ठिकाण आहे . मला तो ट्रेक करायची इच्छा होती पण सध्या जमण्यासारखं नव्हतं. पुढे कधी जमेल की नाही माहीत नाही. एप्रिलच्या हल्ल्यानंतर युसमर्ग पर्यटनासाठी बंद केले गेले होते. आता पुन्हा सुरु झाले आहे का याची कल्पना नाही. आम्ही थोडा वेळ कुरणांवर असंच फिरायचं ठरवलं. यासिनने सांगितलं की इथे जम्मू आणि काश्मीर राज्य पर्यटन मंडळाचा रिसॉर्ट आहे. फिरायला जाण्यापूर्वी तिथे जेवणाची ऑर्डर देऊन या. आम्ही तिथे गेलो तर ते बंद होते. त्याच्या आसपास चिटपाखरूही नव्हते. यासिन म्हणाला," देखिये, अभी टूरीजम का पीक सीजन हैं और सरकारी रिसॉर्ट बंद पडा हैं."
आसपास खाण्यापिण्याच्या फार सोयी दिसत नव्हत्या. एक छोटंसं हॉटेल दिसलं. एक काश्मिरी तरुण ते चालवत होता. आम्ही साधं पण अतिशय चविष्ट असं जेवण तिथे जेवलो. पहिल्यांदाच प्रसिद्ध काश्मिरी कहावा प्यायलो. त्याने आम्ही कुठून आलो वगैरे चौकशी केली. हा मुलगा अतिथंडीच्या काळात पर्यटन बंद असते तेव्हा भारताच्या अन्य राज्यात जाऊन काश्मिरी हस्तकलेच्या वस्तूंच्या विक्रीचे काम करत असे. नंतर अनेक लोकांशी बोलताना आम्हाला कळले की पर्यटनाचा हंगाम नसतो तेव्हा बरेच लोक अन्य राज्यात अशा वस्तूंच्या विक्रीसाठी जातात. पण कोविडच्या काळात या मुलाचं काम बंद पडलं. मग इथे येऊन त्याने शेती सुरु केली. हे हॉटेल सुरु केलं.
जेवण झाल्यावर आम्ही तिथे थोडं फिरलो. आम्हाला इथल्या भटक्या जातीच्या गुज्जर लोकांची मातीची बसकी घरं दिसली. या घरांना 'ढोक' म्हणतात अशी माहिती गुगलने दिली. सहा महिने ते लोक या घरात राहतात. बर्फ पडायला सुरुवात झाली की जम्मूला स्थलांतर करतात. यासिनने आम्हाला एक प्रकारच्या बेरीची झुडुपं दाखवली. त्याला लालभडक रंगाची फुले आली होती. आता काही दिवसांनी बेरी तयार होतील. मग ते इथले स्थानिक लोक खातात.
भटक्या गुज्जरांची घरं (ढोक)
परत येताना चरार- ए - शरीफला थांबलो. आपण इतरत्र जशा मशिदी पाहतो, त्यांच्या घुमटापेक्षा या मशिदीची रचना वेगळी होती. बर्फ साचून राहू नये म्हणून असे असावे . हा दर्गा सूफी संत शेख नुरुद्दीन नूरानी म्हणजेच नंद ऋषींच्या स्मरणार्थ १४६० मध्ये बांधली होता. मुस्लिम आणि हिंदू दोघांनाही हे आदराचे स्थळ आहे. १९९५ मध्ये दहशदवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जुनी मशीद नष्ट झाली. सध्या जी मशीद आहे ती नव्याने बांधलेली आहे . त्याबद्दल काश्मिरी लोकांच्या मनात अजूनही सरकारबद्दल राग आहे. त्याची एक झलक रात्री जेवताना दिसली. १९९४ मध्ये हिजबुल मुहाजिद्दीनच्या हारून खान उर्फ मस्त गुलने त्याच्या सहकाऱ्यांसोबत या दर्ग्यात आश्रय घेतला होता. त्यानंतर सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत आतंकवाद्यांनी दर्ग्याला आग लावली आणि सातशे वर्षे जुनी धार्मिक वास्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ३० आतंकवादी मारले गेले पण मस्त गुल पळण्यात यशस्वी झाला.
चरार-ए-शरीफ दर्गा
दर्ग्याचे सध्या बंद असलेले मुख्य प्रवेशद्वार
इथे स्त्रियांना मुख्य दरवाजातून प्रवेश नव्हता. त्यांनी बाजूच्या दरवाज्यातून आत जाऊन जाळीतून दर्शन घ्यायचे. मी शांभवीला घेऊन पुढे गेले. दरवाज्याजवळ असणाऱ्या माणसाने मला पाहिलं आणि खुणेने डोकं झाकून घ्यायला सांगितलं. मी जॅकेटचा हूड डोक्यावर घेतला. त्याने मान डोलावली. शांभवीला तिची टोपी घातली तर तिने ती भिरकावून दिली. स्कार्फ तिच्या डोक्याला बांधायचा प्रयत्न केला तोही तिने काढून फेकून दिला. तेवढ्यात दर्ग्यातून काही तरुण मुली बाहेर आल्या. त्या सर्वजणी एवढ्या सुंदर होत्या ना! शांभवीला बघून त्यांनी तिचे गालगुच्चे घेतले आणि माझी तिला स्कार्फ बांधायची खटपट बघून म्हणाल्या "अरे छोड दो. छोटी बच्ची तो हैं. इनके लिए सब माफ होता हैं. ऐसेही लेके जाओ अंदर." आत गेलो तर पाय रुततील एवढा मऊ गालिचा आत अंथरला होता. शांभवीला घेऊन खाली बसले तर ती घोडा घोडा करत खेळायला लागली. तिथल्या लहान मुलींना खेळण्यासाठी हाका मारून बोलवायला लागली. मग पाचच मिनिटात आम्ही तिला घेऊन बाहेर आलो.
प्रसाद ज्या दरवाज्यातून आत गेला त्या दरवाजातून सारे पुरुष ये-जा करत होते. आत कॅमेरा न्यायला बंदी असल्याने कॅमेऱ्याची बॅग बाहेर ठेवणे क्रमप्राप्त होते. शेवटी घाबरत घाबरत प्रसादने कॅमेरा आणि मोबाईल असलेली बॅग बाहेर ठेवली. त्याची घालमेल बाहेर असलेल्या दारवान आणि सुरक्षा रक्षकाने पाहिली असावी. "आपका कोई सामान यहा पे चोरी नहीं होगा. आप घबराईये मत." असे म्हणून त्या रक्षकाने त्याला धीर दिला. दर्ग्याच्या मुख्य भागात सर्वांना जाता येत नाही. मात्र जाळीतून आत असलेल्या कबरीचे दर्शन घेता येते. आतली प्रकाशयोजना अगदी सुंदर होती. विविध रंगांच्या काचांमुळे रंगीबेरंगी प्रकाश अक्षरशः सर्वत्र नाचत होता. तेवढ्यात प्रसादला तिथे आलेल्या एका मध्यमवयीन माणसाने हाक मारली आणि त्याची विचारपूस केली. शेवटी काश्मिरी भाषेत प्रसादसाठी त्याने 'गाऱ्हाणे' घातले आणि शेंगदाणे-फुटण्याचा प्रसादही दिला. अपेक्षेप्रमाणे त्यानेही ख़ुशी मागितली. पण बॅग आधीच बाहेर ठेवलेली असल्याने प्रसादकडे पैसे नव्हते. त्याने तसे सांगितल्यावर तो माणूस फारसा नाराज न होता निघून गेला. बाहेर आल्यावर बॅग घेऊन आधी कॅमेरा वगैरे गोष्टी तपासून पाहिल्या! दारवानाने विचारले, "आप कहासे आए हो? आप मुस्लिम हो?" प्रसादने नाही म्हटल्यावर तो दारवान म्हणाला, "भगवान सबका होता है! कशमीर में मजे करना." दर्ग्याच्या बाहेर आपल्याकडे कशी प्रसाद विकण्याची दुकानं असतात तशी हलवा विकणारी दुकानं होती. आम्ही थोडा हलवा विकत घेऊन खाल्ला.
दर्ग्यासमोर असलेली दुकानांची रांग
वेगवेगळ्या मिठाईच्या पदार्थांनी सजलेलं दुकान
ही ती भली मोठी पुरी आणि बाजूला शिऱ्यासारखा गोड हलवा
वाटेत यासिनने एका ठिकाणी गाडी थांबवली. तिथे बरीचशी सफरचंद आणि पेअरची झाडं फुलली होती. आम्ही तिथे थांबून बरेच फोटो काढले.
सफरचंदाची फुलं
सफरचंदाची फुलं (जवळून)
पिअरची फुलं
परत आलो तेव्हा अंधार होत आला होता. यासिनने सांगितलं की त्याच्या ड्राईवरशी त्याचा संपर्क झाला असून तो आता उद्यापासून तुम्हाला फिरवेल. रात्रीचे जेवण इक्राम मध्येच घेतले. इलहामच्या कुटुंबियांसोबत गप्पा मारताना त्यांना सहज आम्ही काय काय पाहिलं त्याबद्दल सांगत होतो. चरार - ए - शरीफचा विषय निघाल्यावर इलहामच्या बाबाने ती १९९४-९५ ची अतिरेकी लपून बसल्याची गोष्ट आम्हाला सांगितली आणि अगदी हळहळत म्हणाला. " सैन्याने अतिरेक्यांना पकडायच्या सबबीखाली आमची जुनी मशीद जाळून टाकली. अगदी जपानी पद्धतीचं लाकडी सुबक बांधकाम होतं ते." आग अतिरेक्यांनी न लावता भारतीय सैन्यानेच लावली हा त्यांचा समाज अगदी पक्का होता. डोळ्यातून सैन्याबद्दलचा राग दिसत होता. आम्ही आम्हाला मिळालेल्या सल्ल्यापैकी महत्वाचा सल्ला वापरला. प्रत्युत्तर करायचं नाही. या विषयावर चर्चा करायची नाही. फक्त ऐकून घ्यायचं.
क्रमश:
पुढचा भाग: https://www.maayboli.com/node/87065
छान झालाय हा ही भाग.
छान झालाय हा ही भाग.
चरार ए शरीफ नाही बघितलं. त्या मोठ्या पुऱ्या इकडल्या उरुसातपण ठेल्यावर दिसतात.
आर्मी...... आमच्या ड्रायव्हरचा एक मित्र आमच्या ट्रॅव्हलर मध्ये थोडा वेळ चढला होता. त्याला बिजबेहराला उतरायचे होते. आम्हा सगळ्यांबरोबर तो पण आम्ही नेलेला घरगुती चिवडा मजेत खात होता. वाटेत पुलवामा फाटा लागला तेव्हा आम्ही ड्रायव्हरला विचारले की इथून जवळच आहे का स्पॉट? त्यावर तो नविन माणूस म्हणाला तो हल्ला सरकारनेच केला. आम्ही सगळे आधी गप्प राहिलो. पण मग मी त्याला म्हटले.... एक बोलू का?... तर "जी जी... बोलिये ना" म्हणाला. मग मी विचारलं की त्या वेळी 'जैश ए मुहम्मद' ने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती त्याचं काय?
त्यावर एकदम नरमून म्हणाला की पता नाही फिर.. हो सकता है .... अल्ला ही जाने. नंतर बिजबेहरा आल्यावर उतरताना त्याला आवडलेल्या चिवड्याचे दिलेले पॅकेट घेवून गेला. सगळा खाणार म्हणाला
पता नाही फिर.. हो सकता है ...
पता नाही फिर.. हो सकता है .... अल्ला ही जाने.>>>>
आवडला हाही भाग. सफरचंदाची
आवडला हाही भाग. सफरचंदाची फुलं काय सुंदर आहेत!
चरार-ए-शरीफ हे नाव लहानपणी बातम्यांमधे ऐकल्यामुळे चांगलंच लक्षात राहिलं आहे.
छान झाले आहेत तीनही भाग.
छान झाले आहेत तीनही भाग.
ती हलवा पुरी इदला मिळते की
ती हलवा पुरी इदला मिळते की मोहम्मद अली रोडला.
नुसता मैदा आणि डालडा असतो भरम्साठ.
वाचतेय..
वाचतेय..
छान चाललीय सफर.
छान चाललीय सफर.
सफरचंदाची आणि पिअरची फुले आधी चित्रात - विशेषतः वॉटरकलर्स पेंटिंग्ज् मधून - बघितली होती. पण ती सफरचंदाची आहेत हे आता माहीत झाले.