लिओ ऑप्टसची दंतकथा (भाग सहावा) : अगोरा टेकडीवरचे मंदिर

Submitted by यःकश्चित on 7 August, 2025 - 14:45

प्रकरण सहावे

अगोरा टेकडीवरचे मंदिर

----------------------------------------------------------------------------------------------------------------

पुन्हा एकदा दगड घासल्याचा आवाज आला आणि त्याचबरोबर लोहाराने लोखंडावर मारलेल्या हातोड्यासारखे काही आवाज झाले. त्या अंधुक प्रकाशात फक्त काही दगडी भिंती आणि दूर सरळ कुठेतरी जाणारा एक भुयारी मार्ग दिसत होता. हा आवाज कुठून येत होता ? यावेळच्या क्लिकने आणखी कोणता दगडी चौथरा वर आला का ते पाहावे म्हणून मी मोबाईल काढून त्याचा फ्लॅश मारणार होतो, तोच पुन्हा एकदा तो क्लिक वाजला आणि आमच्या समोरच्या भुयारी मार्गावर असलेल्या भिंतींवरती असलेल्या मशाली एकामागून एक जोडीने, आधी आमच्या जवळच्या समोरासमोरच्या २, त्यानंतर पुढच्या २ अश्या करत, सरळ त्या भुयारी मार्गाने एका लयीत प्रज्वलित झाल्या. समोर दिसत असलेला तो भुयारी मार्ग आता प्रकाशाने पूर्ण उजळून गेला होता. दगडी भिंतीवर लोखंडी शंक्वाकृती खाचेत त्या मशाली लावलेल्या होत्या. प्रत्येक मशालीवरचे नक्षीकाम अतिशय रेखीवपणे केलेलं होतं. प्रकाशित झालेल्या त्या मार्गावरून आम्ही पुढे चालू लागलो. आता त्या उजळलेल्या भिंतींवर अग्नी, हातोडा, तलवारी, ढाली या आकृत्या स्पष्टपणे दिसू लागल्या. सर्व आकृत्या हिफास्टसच्या संदर्भातल्या होत्या, हे कळायला आम्हाला जोसेफ इतके ज्ञान असण्याची गरज नव्हती. हिफास्टसच्या सिंहासनाने दाखवलेल्या मार्गाने आम्ही पुढे चाललो होतो.

एक ८-१० मशाली ओलांडल्यावर आम्हाला भुयाराच्या पुढच्या बाजूस भिंत दिसू लागली. त्या भिंतीवर कोरिंथियन पद्धतीचे दोन स्तंभ बनवले होते आणि त्या दोन स्तंभांच्या मध्ये असलेल्या जागेत हिफास्टसचे हातात त्याचा चिरपरिचित हातोडा घेऊन ऐरणीवर घाव घालतानाचे शिल्प कोरले होते. त्या शिल्पाच्या खालच्या सोडून बाकी ३ बाजूस आगीच्या ज्वाळा बनवल्या होत्या. खालच्या बाजूला काही ग्रीक अक्षरे होती.

यावेळी न विचारताच न सांगताच जोसेफ बॅगमधली वही काढून भाषांतर करू लागला.

मी बाजूच्या भिंतीचे निरीक्षण करत होतो. स्तंभांच्या बाजूच्या भिंतीवर देखील आधीसारखीच अग्नी, हातोडा इत्यादि हिफास्टससंबंधित चित्रे कोरली होती. स्मिथ हिफास्टसच्या काही हातोड्याचा घाव मारण्याऱ्या शिल्पाचे अगदी जवळून जाऊन निरीक्षण करत होते.

“ या भिंतीवर हिफास्टसच्या हातोडा, अग्नी आणि ऐरणीशिवाय काहीच नाही. पुन्हा पुन्हा ठराविक अंतराने त्याच प्रतिकृती आहेत.”, मी माझे निरीक्षण सांगितले.

“ या शिल्पात देखील काहीसे विशेष वाटत नाही. हिफास्टसचा हा घाव मारणारा हात काटकोनात आहे, त्याच्या बरोबर खालच्या बाजूला समान अंतरावर ऐरण आहे. त्याच्या बाजूच्या या दोन्ही ज्वाला एकसारख्या आकृतीच्या आहेत आणि त्याच्या दोन्ही पायांच्या अंतराने हा इथे समद्विभुज त्रिकोण तयार झालेला आहे.”, स्मिथनी आपल्या भौमितिक दृष्टिकोनातून त्या शिल्पाचे वर्णन केले.

इतकं वेळ भाषांतर करण्यात मग्न असलेला जोसेफ आता पुस्तक बंद करून त्या शिल्पासमोर आला. “या शिल्पाखालच्या ओळींचे हे भाषांतर आणि आपला पुढे जाण्याचा मार्ग.”, जोसेफने वाचून दाखवले.

एका ठिणगीने होई नेहमीच याची सुरुवात,
स्पर्शाने होई सृजन वा, अंत विनाशात
वास्तव्याने सर्वत्र कधी बाह्य कधी आत,
वेळीच रोखला नाही, निश्चित भस्मसात।

“वाह नवीन कोडं !”, मी उत्साहात बोललो, पण त्यामानाने जरा सोपे वाटले. जसे जसे खजिन्याच्या जवळ जाऊ तशी कोडी अवघड व्हायला हवी पण हे कोडे बाकीच्या कोड्यांच्या मानाने सोपे, म्हणजे सरळ अग्नीची माहिती देणारे वाटले.

तेवढ्यात स्मिथ जवळ जवळ ओरडलेच, “अग्नी”, त्यांना आपण पहिल्यांदाच लिओ ऑप्टसचे कोडे सोडवल्याचा आनंद झाला होता.

“ वाह मि. स्मिथ ! तुम्ही पण आता कोडी सोडवू लागलात.”, कौतुक करून त्यांना झालेला आनंद जोसेफने पुढच्याच वाक्यात हिरावून घेतला, “ बरोबर ! याचे उत्तर अग्निच वाटते, पण याचे पुढे करायचे काय ?”

स्मिथ थोडेसे हिरमुसले, पण डोकं चालवून त्यांनी मार्ग पण सुचवला, “जोसेफ, तुम्ही तिकडे चौथऱ्याजवळ जसे लायटर पेटवले तसे इथेही पेटवा. म्हणजे अग्नी ओढला जाऊन पुढचा मार्ग दिसेल.”

“पण मि. स्मिथ, इथे या मशालींमध्ये अग्नी आहेच ना. जर अग्नीने मार्ग दिसणार असता, तर या मशालीतील ज्वाला केंव्हाच ओढली जायला हवी होती.”, मी स्मिथना उत्तर दिले.

स्मिथना माझे बोलणे पटले होते. ते थोडे आणखी हिरमुसले पण आपण सोडवलेल्या पहिल्याच कोड्याला रेटून नेण्याच्या उद्देशाने ते म्हणाले, “बरोबर आहे तुमचं म्हणणं विल्सन, पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे !”

असे म्हणत त्यांनी जवळच्या भिंतीवरली मशाल त्या खाचेतून उचकटली आणि हिफास्टसच्या शिल्पाकडे घेऊन जाऊ लागले. त्यांना थांबवण्याच्या हेतूने मी जोसेफकडे पाहिले, पण जोसेफने हातानेच मला “करू दे त्यांना प्रयत्न” असा इशारा करून मला थांबवले. स्मिथनी त्या शिल्पाच्या समोर जाऊन जोसेफसारखेच गुडघ्यावर बसून मशाल पुढे धरली. काहीच घडले नाही. ते उभे राहिले आणि मशाल छातीच्या उंचीपर्यंत नेली. तरीही काही बदलले नाही.

आता स्मिथ हताश झाले. एका हाताने तशीच मशाल उंचीवर धरून आमच्याकडे वळत बोलले, “बरोबर आहे तुमचे विल्सन. याने काहीच नाही झाले. कदाचित अग्नी हे उत्तर नसावे.”

“नाही स्मिथ, उत्तर अग्नी हेच आहे.”, जोसेफ निराश झालेल्या स्मिथना सांगू लागला, “ठिणगीने याची सुरुवात, म्हणजे आगच. स्पर्शाने होई सृजन व अंत विनाशात म्हणजे धातूंना आगीने वितळवून हवा तो आकार देऊन शस्त्र, शिल्प, तत्सम कलाकृती यांचे सृजन होते किंवा तीच आग जर थांबवली नाही तर ती वाढत जाऊन सर्व जळून खाक होते. हेच शेवटच्या ओळींत सांगितले आहे, वेळीच रोखला नाही तर निश्चित भस्मसात. कधी बाह्य कधी आत म्हणजे अग्नीच जो कोठेही असू शकतो, आत म्हणजे चुलीत किंवा भट्टीत आणि बाहेर म्हणजे जंगलात शहरात किंवा आणखी बाहेर विचार केला तर पृथ्वीच्या बाहेर अवकाशात सूर्य म्हणजे देखील अग्नीचा गोलच आहे.”

हे ऐकून स्मिथ जरासे आनंदले.

“पण तुम्ही म्हणल्याप्रमाणे लायटर सारखी युक्ती वापरून इथे काही होणार नाही. आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल.”

जोसेफचे बोलणे पटून स्मिथनी आपला मशाल धरलेला हात खाली घेतला.
“मग आता पुढे काय - ”, स्मिथ विचारत असतानाच जोसेफ त्यांचे वाक्य तोडत ओरडला, “मागे पहा मि. स्मिथ”

हिफास्टसच्या दुसऱ्या हाताने धरलेली धातूची पट्टी चमकू लागली. स्मिथनी जेंव्हा हात खाली घेतला तेंव्हा नकळतपणे तो त्या ऐरणीसमोर आला आणि त्या मशालीची आग ऐरणीवरच्या धातूपट्टीला पोहचून ती धातू गरम होतो तशी गरम होऊ लागली होती. स्मिथना काय झाले हे समजताच त्यांनी ती मशाल तशीच ऐरणीजवळ धरून ठेवली. धातूपट्टी गरम होत होती. त्या शिल्पाच्या भोवती असलेल्या ज्वाळांची आकृती प्रज्वलित होऊन भिंतीत विरून गेली.

मी आणि जोसेफ काय होत आहे ते पाहू लागलो. स्मिथनी त्या भुयारातील यंत्रणा कार्यान्वित केली होती. आम्ही त्या शिल्पाकडे आतुरतेने पाहत होतो. स्मिथनी ती मशाल धातुपट्टीच्या आणखी जवळ नेली. तोच हिफास्टसच्या हातोडा धरलेल्या हाताची मुठ आवळली गेली. काही वेळापूर्वी स्मिथनी सांगितलेला तो हिफास्टसचा ९० अंशातील हात कोपऱ्यातून १८० अंशात वळला आणि गरम झालेल्या त्या धातुपट्टी असलेल्या ऐरणीवर जोरात आदळला. त्या प्रहाराने लोहाराने लोखंडावर घाव मारल्यासारखा मोठा आवाज होऊन ती धातूपट्टी चपटी झाली आणि दगडात अडकवून साखळी सरकल्याच्या आवाजाबरोबर हिफास्टसचे शिल्प असलेली ती भिंत वर उचलली गेली.

आम्ही तिघेही पुढचा मार्ग दिसल्याने आनंदी झालो. स्मिथ साहजिकच जरा जास्त खुश होते. स्मिथ भिंतीकडे जाऊन जिथून मशाल घेतली होती त्या खाचेत परत ठेऊन आले. आम्ही तिघेही भिंत सरकून तयार झालेल्या त्या प्रवेशद्वारासमोर उभे होतो.

त्या प्रवेशद्वारापलीकडे एक दालन होते. ते द्वार मोठे असल्याने आम्ही तिघांनी आत एकदम प्रवेश केला.
हे दालन म्हणजे एखाद्या मंदिराचा गाभा असल्यासारखे वाटत होते. आयताकृती दालन होते ते. कोरिंथियन पद्धतीचे बांधकाम असलेल्या त्या भिंतींवर ग्रीक देवता आणि हिरोंच्या पराक्रमाच्या गाथा कोरल्या होत्या. काही ठिकाणी हिफास्टसचे शस्त्र बनवतानाचे शिल्प होते. समोरच्या भिंतींवर हिफास्टसने बनवलेले शस्त्र घेऊन देवतांचे शिल्प होते. जुने झाल्यामुळे काही शिल्प आणि पेंटिंगचे पोपडे उडलेले दिसत होते. आम्ही तिघेही त्या जागेचे नीट निरक्षण करत होतो.

जोसेफ पुढे काही पावलं टाकत बोलू लागला, “ मला हे अथेन्समधील अगोरा टेकडीवर असलेल्या हिफास्टसच्या मंदिरासारखे वाटत आहे.”

पण मला हे थोडे अशक्य वाटले, एल्युसिसच्या सभामंडपातून अथेन्सच्या अगोरामध्ये आम्ही कसे काय येणार !

जोसेफच्या पाठोपाठ काही पावले पुढे टाकताच आम्हाला त्या भुयारासारख्या भिंतीत रोवलेल्या मशाली दिसल्या आणि त्यांच्या पुढेच काही पावलांवर एका चौथऱ्यावरती हिफास्टसची कांस्य मूर्ती दिसली. तिच्या हातात हातोडा होता. आम्ही भुयारात पाहिलेल्या हिफास्टसच्या शिल्पासारखीच ऐरणीवर हातोड्याचा प्रहार करणारी ती मूर्ती होती. त्या मूर्तीसमोर तेलाचे दिवे जळत होते, जसे की अजूनही रोज कुणीतरी त्या मूर्तीची पूजा करत आहे. त्या दिव्यांच्या प्रकाशात हिफास्टसची कांस्य मूर्ती चमकत होती.

एवढ्यात स्मिथनी मागे वळून पाहिले आणि त्यांच्या तोंडून अस्पष्ट आश्चर्योद्गार निघाले, “हा दरवाजा बदलला.”

तसे आम्ही ज्या दरवाज्यातून आलो तो दरवाजा पाहू लागलो. आम्ही जिथून आलो तो भुयारी मार्ग दरवाज्याच्या पलीकडे न दिसता आम्हाला आकाश आणि काही झाडे दिसली.

त्या दिशेने थोडे पुढे होऊन पाहताच आम्हाला साक्षात्कार झाला की आम्ही खरेच अगोराच्या टेकडीवरच्या हिफास्टसच्या मंदिरात पोहोचलो होतो. आम्ही इथे कसे पोहोचलो याचं तार्किक स्पष्टीकरण देणं अशक्य होतं. स्मिथ आणि जोसेफदेखील माझ्यासारखेच संभ्रमित झाले होते. पण ज्ञानगर्भात पाऊल टाकल्यापासून अश्या घटना घडल्या होत्या की त्यांचे तर्कसंबंध लावणे अशक्यच होते.

राहून राहून मला एक प्रश्न सारखा सतावत होता की लिओ ऑप्टसनी इसवीसन पूर्व पाचव्या शतकात या रहस्यांची आणि कोड्यांची रचना कशी केली असेल ! तंत्रज्ञानाच्या अभावात ही जादूसदृश्य यांत्रिकी त्यांनी कशी बांधली असावी ! सारे काही तर्कबुद्धी सोडाच पण आमच्या कल्पनेच्याही बाहेरचे होते.

आम्ही तिघेही आता थोडे पुढे जाऊन दरवाज्याच्या आणखी जवळून त्या बाहेरच्या दृश्याचे अवलोकन करत होतो. टेकडीच्या पायथ्याशी असलेले अगोरा गाव आमच्या दृष्टीपथात आले. दरवाजापासून काहीच अंतरावर मंदिराच्या बाह्य अंगास असलेले सहा डोरिक स्तंभ दिसले. त्यांच्या पुढे काही दगडी पायऱ्या होत्या आणि पुढे टेकडीवर येऊन जाऊन लोकांनी तयार केलेली पायवाट होती.

“मी म्हणालो होतो, त्याप्रमाणे हेच ते अगोराचे हिफास्ट्सचे मंदिर आहे. सॉक्रेटिसच्या काळात याचे निर्माण झाले होते. नंतर कालौघात याची थोडी दुरावस्था झाली पण ग्रीक इतिहासात सर्वात जास्त जपले गेलेल्या काही स्मारकांपैकी हे एक आहे. १८ व्या शतकात काही काळासाठी हे मंदिर चर्च म्हणून वापरण्यात आले. पण नंतर २० व्या शतकाच्या मधल्या काळापासून हे मंदिर ऐतिहासिक स्मारक म्हणून नोंदले गेले आणि पुढे ग्रीक संग्रहालय म्हणून जपले गेले.” - जोसेफ.

“वाह ! म्हणजे आपण त्या ज्ञानगर्भातून बाहेर आपल्या विश्वात परत आलो म्हणायचे !”, स्मिथ खुश होत म्हणाले.

बाहेर सूर्य दूरच्या डोंगरांमागून डोकावू लागला होता. वातावरण बऱ्यापैकी थंड होते. ते पाहून सध्या पहाट झाली असल्यासारखे वाटत होते. म्हणजे जवळपास रात्रभर आम्ही तिकडे ज्ञानगर्भात थांबलो होतो. किंवा अडकलो होतो हेही म्हणता येईल.

“पण मिस्टर स्मिथ, तुम्हाला ती आकाशवाणी आठवते का ?”, स्मिथना मी काहीतरी आठवून देत म्हणालो, “आपल्याला या मंदिरातून काहीतरी घेऊन त्या ज्ञानगर्भात स्थापित करायचे आहे. त्यामुळे आपण बाहेर आलो तरी पुन्हा आपल्याला तिकडे जावेच लागणार आहे.”

“ होय जोसेफ, पण आपल्याकडे पाणी किंवा काही खाण्याचे पदार्थ नाहीत. त्यातून पुन्हा एकदा तिकडे अडकलो तर पुढे केंव्हा बाहेर पडू याची शाश्वती नाही. त्यामुळे मला वाटते आता आपण बाहेर आलोच आहोत तर, अथेन्समध्ये जाऊन थोडाफार खाद्य-पेय संचय करू आणि पुन्हा एकदा टॅक्सी करून एल्यूसिसकडे रवाना होऊ.”

स्मिथ यांचा प्रस्ताव मला पटला पण कुठेतरी काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखे वाटत होते. मी जोसेफ काय विचार करतोय हे पहायला जोसेफकडे मान वळवली. चेहऱ्यावरून त्यालापण माझ्यासारखेच विचार आल्यासारखे वाटत होते. मी त्याला विचारणार इतक्यात तोच पुढे येऊन बोलू लागला,

“ स्मिथच्या बोलण्यात तथ्य आहे खरे. पण मला हे कळत नाहीये की आपण बाहेर जाऊन पुन्हा त्या काळाच्या पलीकडच्या सभामंडपात जाणार कसे ! कारण एल्युसिसच्या अरण्यात उभे राहून आपण त्या चौथऱ्याच्या कड्या ओढल्या होत्या आणि यंत्रणा कार्यान्वित केली होती. आता पुन्हा त्या कड्या तिथे असतील काय यात शंका आहे. त्यामुळे बाहेर जाऊन पुन्हा सभामंडपात जाण्याची शाश्वती नाही.”

“ आणि त्याचबरोबर आपल्याला हेही विसरून चालणार नाही की ज्या भुयारातून आपण आलो होतो तोच दरवाजा आता अगोराच्या मंदिराचा दरवाजा बनला आहे, त्यामुळे जरी आपण इथे थांबलो तरी आल्यामार्गाने पुन्हा परत जाण्याचाही काही मार्ग नाही.”, मी परिस्थितीची दुसरी बाजू स्पष्ट केली.

वारंवार दिशाहीन होणे ही आता आमची नियती बनली होती.

तरी एकदा बाहेर जाऊन पाहूया असे म्हणत स्मिथ त्या प्रवेशद्वाराकडे जाऊ लागले. स्मिथ दरवाज्याच्या जवळ पोहोचताच त्यांच्या पायाच्या खाली दरवाजाच्या अलीकडची पण दरवाज्याला लागून असलेली फारशी आत दाबली गेली आणि कुठूनतरी आकाशवाणीसदृश घोषणा ऐकू आली -

बाहेर पडलात तर आत हरवता
आत आलात तर बाहेर विसरता

त्या आवाजाने स्मिथ पुढे जायचे थांबले. त्यांनी दरवाज्याच्या बाहेर टाकण्यासाठी उचललेलं पाऊल मागे घेऊन पुन्हा मंदिराच्या आतच ठेवले. पुन्हा एकदा आम्ही पुढे काय करायचे या प्रश्नाभोवती विचार करू लागलो.

ते काय होते जे आम्हाला शोधायचे होते ?

जोसेफ परत आत त्या कांस्य मूर्तीकडे चालू लागला. जोसेफच्या पाठोपाठ आम्हीही त्या मूर्तीजवळ आलो. तिघेही आम्ही आपापल्या नजरेतून त्या मूर्तीचे निरीक्षण करू लागलो.

“जोसेफ, इकडे मला काहीतरी अडकल्यासारखे वाटत आहे.”, मी त्या मूर्तीच्या मागच्या बाजूने निरीक्षण करत असताना मला त्या मूर्तीच्या चौथऱ्याच्या मागे एक खाच दिसली. त्यातून काहीतरी धातूसदृश वस्तू बाहेर डोकावत होती. ही एखादी कळ होती, की त्या अरण्यातल्या कडीसारखी यंत्रणा कार्यन्वित करण्याची योजना होती ! मी आणखी काही विचार करायच्या आत जोसेफने पुढे येऊन ती धातूसदृश वस्तू बाहेर ओढली.

कुठून एखादा आवाज येऊन काही कार्यन्वित होते का याची मी वाट पाहू लागलो. स्मिथ माझ्याजवळ येऊन त्या वस्तूकडे पाहत होते.

भुयारात ऐरणीवर असलेल्या धातूपट्टीसारखीच पण एका विशिष्ठ प्रकारच्या धातूची पट्टी होती. लोखंडासारखी कडक पण चांदीसारखी चमकत असणारी ती पट्टी आम्हाला ज्ञात नसलेल्या कोणत्यातरी वेगळ्याच धातूपासून बनली होती. जोसेफ ती पट्टी उलटी सुलटी करून त्यावर काही मार्ग दिसतो का हे पाहू लागला.

“ जोसेफ, मागच्या कोड्यासारखी ही पट्टी त्या ऐरणीवर ठेऊया का ? म्हणजे हिफास्टस त्यावर प्रहार करून आपल्याला पुढचा मार्ग दाखवेल! ”, मी डोकं चालवत एक शक्यता बोलून दाखवली.

जोसेफने माझ्या बोलण्याला दुजोरा देत ती धातुपट्टी ऐरणीवर ठेवली. ना मूर्ती हलली ना कसली आकाशवाणी झाली. त्या मंदिरात जळणाऱ्या मशालीतल्या आगीचा आवाज सोडता काहीच ऐकू आलं नाही. त्या आगीच्या आवाजाने काहीसे आठवून स्मिथ बोलले,
“आपण आधीप्रमाणे इथली मशाल घेऊन धातुपट्टी तापवूयात का ? म्हणजे धातूपट्टी गरम होऊन आकार देण्यासाठी तयार होईल आणि त्यावर हिफास्टस प्रहार करेल. “

स्मिथ बोलता बोलता जवळच्या भिंतीतली मशाल काढून घेऊन आले आणि ती मशाल पुढे करून धातूपट्टी गरम होईल अश्या स्थितीत धरून उभे राहिले. आम्ही तिघेही उत्सुक होऊन त्या हातोडा धरलेल्या हिफास्टसच्या आवळलेल्या मुठीकडे पाहत होतो. काही सेकंदांनंतर धातुपट्टी गरम झाली खरी पण हिफास्टसने प्रहार नाही केला. स्मिथनी आणखी थोडावेळ ती मशाल तशीच धरून ठेवली पण त्याने काहीच घडले नाही. बदल म्हणायला तेवढी एक धातुपट्टी लाल होऊन होऊन थोडी प्रसरण पावली, परंतु हिफास्टसचा प्रहार नाही झाला.

या कोड्यातील आणखी कोणता दुवा राहून गेला का हा विचार तिघांच्याही मनात आला. त्या जीर्ण मंदिरात आणखी काही शोधायचे राहून गेले होते की या कोड्यासाठी काही वेगळीच कृती अपेक्षित होती ! मी आणि जोसेफ पुन्हा एकदा त्या सभोवतालचे निरीक्षण करू लागलो. स्मिथदेखील मशाल पुन्हा जागेवर ठेऊन आमच्याबरोबर तो दुवा शोधू लागले.

मूर्तीच्या चारही बाजूला फिरून आम्हाला काहीच मिळाले नाही. मंदिराच्या भिंतींवर असलेल्या जुन्या चित्रांत आणि शिल्पांत काही मिळते का हे पाहण्याचे आमचे प्रयत्न ही निष्फळ ठरले.

“ स्मिथ, तुमच्या पूर्वजांच्या रोजनिशीत आणखी काही माहिती होती का ?”, मला काहीसे आठवून मी स्मिथना प्रश्न विचारला.

“ नाही डॅनी, तिथे केवळ त्या पेटीचा उल्लेख होता, जो मी तुम्हाला दाखवलेलाच होता. त्याव्यतिरिक्त आणखी काही माहिती माझ्याकडे नाही.”, स्मिथ काहीतरी आठवत बोलले.

“ आणि जर काही अतिरिक्त माहिती असेल तर ती एडविनला माहिती असू शकेल.”

आम्ही दोघांनीही चमकून स्मिथकडे पाहिलं, एकाच वेळी आमच्या तोंडून आश्चर्याने उद्गार निघाले - “ एडविनला ? ”

“ हो कारण घराचे साफसफाईचे काम तोच करायचा. त्यामुळे जर घरात आणखी काही दस्तावेज असतील तर ते त्याला माहीत असण्याची शक्यता आहे. अजून एक महत्वाचे कारण म्हणजे माझे आजोबा ‘ रेजिनाल्ड स्मिथ’ यांना जेंव्हा ती पेटी दुसऱ्या वेळी मिळाली, तेंव्हा ती एडविनच्या आजोबांनी म्हणजेच ‘ मिरांबे ’ यांनी शोधून काढली होती. जॉर्जचे भाचे वेडे झाल्यामुळे लपवलेली पेटी जरी बंदिस्त असली तरी त्याची वार्ता आमच्या कुटुंबात रोगाच्या साथीसारखी पसरली होती, अदृश्य विषाणूसारखी आमच्या पूर्वांजांना संक्रमित करून. हवेतील हे विषाणू कधीच पूर्णपणे नष्ट होत नसतात - ते कुठेतरी झोपलेले असतात, विस्मृतीच्या पडद्यामागे, जागे होण्याच्या योग्य क्षणाची वाट पहात. त्यामुळे काही पूर्वजांनी त्या पेटीचा शोध घेतला, पण त्यांना ती मिळाली नाही. कदाचित तो खजिना शोधणे नियतीने माझ्या नशिबात लिहिले होते. कारण पेटी मिळूनही माझ्या आजोबांना आणि बाबांना त्याचे गूढ उकलणे जमले नाही. माझ्या बाबांनी - थिओडोर स्मिथ - यांनी माझ्याकडे जेंव्हा ही पेटी हस्तांतरित केली तेंव्हा ही माहिती सांगितली होती.”

मी आणि जोसेफ ही नव्याने मिळालेली माहिती पचवत होतो.

“ म्हणजे मि. स्मिथ, माझा अंदाज खरा होता. हा एडविन तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे आणि तुमचा वापर त्याने फक्त कोडी सोडवण्यासाठी केला. ज्याक्षणी सर्व बाराची बारा कोडी कोडी सोडवली गेली, त्याच क्षणी ती उत्तरे घेऊन तो खजिना एकट्याने हडपण्यासाठी फरार झाला.”, मी माझी गुप्तहेर बुद्धी चालवली.

“पण डॅनी मी तुम्हाला याआधीही बोललो होतो, एडविन असे का करेल. झुबेरी क्वामे, म्हणजे जॉर्जच्या वडिलांनी ज्यांना विकत घेतले ते आफ्रिकन गुलाम, त्यांच्यापासून मिरांबे, एडविनचे वडील अमानी आणि आता एडविनपर्यंत सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे आमच्याकडे काम करत होते आणि आहेत. एडविनची भाषा आता नोकरदारांसारखी नाही हे जरा नजरेत येण्यासारखे आहे, पण ती बदलत्या काळाची प्रगती आहे. वास्तविक १९व्या शतकात कृष्णवर्णीयांच्या हक्काचा लढा झाल्यानंतर माझ्या आजोबांनी मिरांबेना आमच्या कुटुंबाची चाकरी सोडून स्वतःचं घर बांधून स्वतःचा नोकरी व्यवसाय करण्याची मोकळीक देखील दिली होती. पण मिरांबे आमच्या कुटुंबाशी मालक-नोकर नात्याहून जास्त गुंतल्यामुळे ते आमचे घर सोडून गेले नाही. त्यामुळे ते आणि त्यांचे वंशज आमच्याकडे तशीच चाकरी करत राहिले आणि आम्हीही पुढच्या पिढीला कधी नोकरांसारखी तुच्छतेने वागणूक दिली नाही, त्यामुळे आजही एडविन मला साहेब न म्हणता रॉबर्ट म्हणतो. पण याचा अर्थ असा नाही की एडविनने माझा कोडी सोडवण्यासाठी वापर केला!”

“मोह, लोभ, वाईट विचार ! हे मनाच्या रणभूमीत अंधाराच्या सेनापतीसारखे अचानक उतरतात. ना निमंत्रण, ना इशारा. ते येतात जणू कर्माच्या गूढ पायवाटेने. एकदा मनात शिरले की, ते विचारांच्या जंगलात अग्नी पेटवतात, जिथे विवेक धुरात हरवतो आणि आत्मा स्वतःशीच युद्ध करतो. त्यांचं जाणं म्हणजे अंतर्मनाची अग्नीशुद्धी, जिथे प्रत्येक कोपऱ्यात राख उरते. तुम्ही म्हणल्याप्रमाणे एडविनच्या पूर्वजांनी असेलही केली निष्ठेने चाकरी, तो खजिन्याचा वाईट विचार त्यांच्या मनात आला नसेल पण एडविनला तो वाईट विचार नाही आला किंवा नाही येणार याची निश्चित खात्री तुम्ही देऊ शकता का ?”

स्मिथ निरुत्तर झाले. त्यांच्या डोळ्यांत विचारांचा धूर होता, जणू विश्वास आणि शंका यांचं द्वंद्व चालू होतं.

“ तुम्ही म्हणता ते खरे नसेल किंवा असेलही पण मी फक्त माझा अनुभव सांगितला.”

“ आणि मीही माझा दृष्टीकोन सांगितला. खरे काय आणि खोटे काय ते आपण नंतर शोधूच पण सध्या या अगोराच्या मंदिरातला दुवा शोधून हिफास्टसचे कोडे आधी सोडवू.”

मला मूकसंमती देत स्मिथ पुन्हा एकदा दुवा शोधण्यात व्यस्त झाले. जोसेफ आमच्या संभाषणात भाग न घेता तल्लीन होऊन दुवा शोधत होता. तो आता पुन्हा एकदा जवळून बारकाईने त्या कांस्य मूर्तीचे निरीक्षण करू लागला. ऐरणीच्या जवळ जाऊन पाहताना अचानक तो ओरडला,
“ डॅनी, स्मिथ दोघेही इकडे या.”

तो का ओरडला हे पाहायला आम्ही त्याच्याजवळ गेलो. ती धातुपट्टी आता थंड होऊन पुन्हा मूळ रंगात परत आली होती पण गरम झाल्याने प्रसारण पावलेला आकार तसाच राहिला होता.

“ ही पहा, यावर काही अक्षरे उमटली आहेत.”, जोसेफ त्या पट्टीच्या पृष्ठभागाकडे बोट दाखवत म्हणाला.

मी आणि स्मिथ, दोघांनी वाकून त्या पट्टीच्या जवळ जाऊन पाहिलं. त्या धातुपट्टीवर भुयारात दिसलेली तीच ग्रीक अक्षरे दिसली.

“ हे तर त्या भुयारातल्या ग्रीक कोड्यासारखे वाटत आहे.”, मी जोसेफकडे पाहात म्हणालो.

“त्यासारखे नाही डॅनी, तेच कोडे आहे. अगदी त्याच शब्दात, ज्याचे उत्तर अग्नी होते.”, जोसेफ.

मी थोडा थांबलो. माझ्या मनात आतापर्यंतच्या प्रत्येक घटनेचा धूर फिरत होता - संवाद, संकेत, सावल्या. आणि त्या धुरातून एक विचार स्पष्ट होत होता.

“नाही जोसेफ, त्या कोड्याचे उत्तर अग्नी नव्हते कधीच !”, मी आतापर्यंत झालेल्या सर्व घटना आणि संभाषणांना एकत्र आणून विचार केला आणि मला ज्याचे आकलन झाले होते, ते माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

“म्हणजे ? आता गुप्तहेर डॅनी विल्सन यांच्या बुद्धीची कमाल पाहायला मिळणार, असं दिसतं.”, जोसेफ माझ्या डोळ्यातली चमक पाहून लहान मुलासारखा उत्साहित झाला होता.

“ हो. पहिल्या वेळी हे कोडं तू वाचून दाखवल्यापासून मला हा प्रश्न पडला होताच. कारण इतकं सोपं कोडं लिओ ऑप्टस का बांधतील ! अग्निचं सरळ सरळ वर्णन त्या ओळींत होतं. कोड्याला कोडं तेंव्हाच म्हणता येईल जेंव्हा त्यात सरळ आणि सोप काहीच नसतं. खरे कोडे म्हणजे वास्तवाचा तो थर जो प्रत्यक्षाच्या आडून लपलेला असतो. सहजता आणि सरळता यांच्यामुळे प्रश्न निर्माण होत नाही - गुंता निर्माण करणारी गुंतागुंत हीच कोड्याची आत्मा.”

“मग खरे उत्तर काय आहे ? आणि जर अग्नी उत्तर नसेल तर स्मिथच्या मशालीच्या अग्नीने पुढचा मार्ग कसा दाखवला ?”

“ योगायोग ! स्मिथनी जाणूनबुजून ती मशाल ऐरणीजवळ धरली नव्हती, त्यांचा हात अनवधानाने त्या ऐरणीजवळ गेला आणि त्या दरवाज्याची यंत्रणा कार्यरत होऊन दरवाजा उघडला गेला. अग्नी हा हिफास्टसच्या सर्जनाचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे कोड्याची सुरुवात अग्नीपासून झाली. पण त्यावेळी सुद्धा मी हाच विचार करत होतो की लिओ ऑप्टसचे कोडे इतके सरळ नसणार. या कोड्यात काहीतरी गर्भितार्थ दडला असला पाहिजे. काही वेळापूर्वी मी स्मिथना एडविनबद्दलचा माझा दृष्टिकोन सांगत होतो, त्याचवेळी माझ्या सुप्त मेंदूने मला या कोड्याचे उत्तर सांगितले -

‘वाईट विचार.’

कुविचार हे या कोड्याचे खरे उत्तर.”

जोसेफ उत्साहाने आणि स्मिथ आश्चर्याने माझ्याकडे पाहत होते. मी कोड्याचा आणि उत्तराचा संबंध सांगू लागलो,


“ एक ठिणगीने होई याची सुरुवात. वाईट विचार हे कधीच एकदम येत नाहीत, मनाच्या अंधारात दडलेल्या सुप्त मोहातूनच याची सुरुवात होते. आधी पाकीटमारी, मग रस्त्यात थांबवून लूट, घरफोडी, आणि मग बँकेची तिजोरी, अश्या मार्गानेच एक चोर अट्टल दरोडेखोर बनतो. पण हाच मोह, मत्सर जेंव्हा इर्ष्या बनतो, तेंव्हा जर त्या ईर्ष्येला व्यवस्थित हाताळले तर ती व्यवसायात वा नोकरीत वैयक्तिक प्रगतीही करू शकते. स्पर्शाने होई सृजन. पण जर तोच मत्सर चुकीच्या पद्धतीने वाढत गेला तर, नक्कीच अंत विनाशात होतो. हे विचार कधी मनात असतात तर कधी आपल्या सभोवतालची माणसे आपल्या मनात भरवत असतात. असे हे वास्तव्याने सर्वत्र असलेले कुविचार, जर वेळीच रोखले नाहीत तर मग त्या व्यक्तीचा विनाश निश्चित आहे. जीवनाच्या प्रवासात अनेक वळणे अपरिहार्य असतात, पण योग्य रस्ता सोडून भरकटलेल्यांचा प्रवास सुखकर होत नाही.”

माझे हे उत्तर ऐकून स्मिथ स्तंभित झाले आणि जोसेफ दिग्मूढ झाला होता. काही क्षण हे तत्वज्ञान पचवण्यात गेले. कुणीच काही बोललं नाही. विवेक आणि मोह-मत्सरांच हे द्वंद प्रत्येकाच्या मनात असतेच. पण इतक्या खोल जाऊन कुणी विचार करत नाही. लिओ ऑप्टसच्या या कोड्याने आम्हाला द्वंद्वचिंतन करायला भाग पाडले. लिओ ऑप्टस आणि हिफास्टसने आमच्या अंतर्मनाचा एक दरवाजा उघडला होता. आता प्रतिक्षा होती कोड्याचा दरवाजा उघडण्याची.

अचानक जोसेफच्या डोळ्यात मला चमक दिसली. जोसेफ लगबगीने पुन्हा भिंतीवरची ती मशाल घेऊन आला, ऐरणीवर अग्नी धरत पुन्हा एकदा त्या धातूपट्टीला गरम करू लागला आणि जोरात ओरडला -

“वाईट विचार ! कुविचार !”

हिफास्टसच्या कांस्य मूर्तीचे डोळे उघडले गेले. हलकासा एक क्लिक झाला. हातोडा धरलेली हिफास्टसची मुठ आणखी घट्ट झाली. मूर्तीच्या मागून कुठूनशी समशीतोष्ण वाऱ्याची झुळूक आली. त्या वाऱ्याने मूर्तीसमोरचे तेलाचे दिवे विझण्याऐवजी आणखीच तेजस्वी झाले. हिफस्टसचा तो हातोड्याचा हात वरती गेला…

….आणि क्लिक व दगडाचा आवाज होऊन, हिफास्टसने त्या धातुपट्टीवर प्रचंड शक्तीने प्रहार केला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा, नवीन भाग, तो पण इतका मोठा..
निवांत वाचते.
जितका वाचला तितका भाग जमलाय एकदम.
नॅशनल treasure सारखा सिनेमा बघतेय असे वाटतेय.

@धनवंती: जरा लांबला भाग.. पण काही skip पण करू शकत नव्हतो.. त्यामुळे मोठा झाला

नॅशनल treasure सारखा सिनेमा बघतेय असे वाटतेय. >>> बापरे अजून तेवढी भारी कथा जमायची आहे ! शिकतोय अजून effective कथालेखन कसे करायचे

@सोनाली : ऑफिसच्या कामामुळे यावेळी जरा उशीर झाला लिखाण करायला.. पुढचे भाग लवकर टाकेन.

दोघांनी वाचून अवश्य सांगा मला जर काही सुधारणा असतील तर.. किंवा कुठे जर अनावश्यक ताणले गेले आहे असे वाटले तर Happy

in advance आभारी आहे _/\_

वा! मस्त !
शनल treasure सारखा सिनेमा बघतेय असे वाटतेय. >> माझ्याही मनात हाच विचार आला! सेम पिंच Happy