दरोडा
जाई जुईच्या मांडवात पडलेल्या फुलासारखं अंगावर उन्हाचे शिंतोडे वागवत थोरल्या वाड्यात आमराईवरनं जायची यायची रखमाची वाट काही चुकली नव्हती. पण आज मात्र तिच्या पावलांचे ठसे आमराईच्या झाडाच्या मातीतून गेले होते. चंद्रावरल्या खळग्यासारखे रानभर तिच्या पायाची निशाणी उगवून आली होती. थोरल्या मालकीणबाईंचा हुकूमच तसा होता.
"रखमे उद्या वाड्यात येताना आमराईतनं चार सहा आंबे घेऊन ये. कच्च्या कैऱ्या काही कामाच्या नव्हेत. आंबाच आण,पाडाचाही चालेल पण आंबाच हवा कसे? घेऊन ये बाय तेवढं"
दगडाचा नेम धरून जमिनीवर पडू लागलेले आंबे रखमेने पदरात झेलले. जणू आभाळातून चांदण पडावं तसं तिनं हिरव्या लुगड्याच्या पदरात काहीस झेललं. आंब्याच्या झिम्म्याच्या ओझ्यानं भरलेला पदर खेचून वाड्याकडे रखमा रवाना झाली. वाड्यातल्या त्या बंदिस्त खणाकडे तिची सावली हरणाच्या वेगाने पोहोचली. ओटीसाठी सजवलेल्या चांदीच्या तबकात रखमेनं आणलेले आंबे थोरल्या बाईसाहेबांनी अगदी अलगद हाताने ठेवले. तशी रखमाई भरुन पावली. गालावरची पाकळी रुंद करुन तोंडभरुन हसली आणि कुठल्याश्या सुखाच्या हिंदोळ्यावर डोलत राहिली.
रखमा पाठ टेकून राहिलेल्या भिंतीच्या पलीकडील न्हाणीघरातून बायांचे हास्याचे तुषार उडू लागले होते. 'रत्ना'च्या नाजूक कोवळ्या अंगाला सुंगधाच्या तेलाची स्निग्ध बोटे मायेचा स्पर्श करीत होती. हळदी चंदनाच्या लेपानं रत्नाच नाजूक मन पाण्यावरल्या पानासारखं हुळहुळत होतं. शिकेकाईच्या पाण्यानं तिला न्हाऊ माखू घालणाऱ्या घरच्याच ओळखीच्या स्त्रियांच्या नजरा तिला अनोळखी वाटू लागल्या. त्यांच्या थट्टा मस्करीने तिच्यावर चढलेला लज्जेचा भृ़ंगा तिला अंतर्बाह्य छळत होता. या बायामाणसांच्या दाटीवाटीत कसनुस करणार तिच अडनिडं मन कधी हसत होतं, कधी त्रासत होतं, कधी हळव उदास होतं होतं. खरतर या मनालाच काय सांगाव नि काय समजून घ्याव हेच कळत नव्हतं. त्यामुळे रेशमाचा गोंडा एखाद्या खिळ्यात अडकावा नि दूर दुर रेशमाचे जाळे पसरत जावं अशी अवस्था रत्नाची झाली होती.
तोवर इकडे रखमाच्या थोरल्या बाईसाहेबांनी म्हणजे रत्नाच्या आज्जीने त्या बंदिस्त कणाचा जणू उद्यवनाचा भास निर्माण केला होता. सोप्यातल्या झोपाळ्याचा माचा आता रत्नाचे न्हाणाचे मखर होऊन पानफुला सोबत गुजगोष्टी करत होता. हरेक खुंटीला अडकवलेले आंब्याचे डहाळे गळ्यातल्या कंठा अलंकारासारखेच शोभून दिसत होते. समईच्या सातही कळ्या हे आनंदाचे चित्र सगळ्यापुढे स्पष्ट करत होत्या. पण रत्नावलीच्या कानात मात्र नव्या जाणिवांच्या गुपितांचे गुंफे बायामाणसं विणतच होत्या. कुणी ताई तिच्या न्हाणाच्या मखराची गोष्ट तिला सांगत होती. तर कुणी माई तिच्या लटक्या लटक्या रागाला वारा घालत होती. तर कुणी तिकडची आठवण काढुन तिच्या प्रेमाची तार छेडत होती. उंची साडी नेसलेल्या व अबोली कुंदाच्या गजऱ्याचे दागदागिने ल्यालेल्या रत्नाचा जीव मात्र भर दिवसाही काजव्यासारखा लुकलुकत होता. औक्षणदिव्यासोबतच जणू आपला जीवच आज्जीने रत्नाला ओवाळला होता. भरजरी वस्त्रात दबल्या गेलेल्या रत्नाचा ओचा फळांच्या ओटीनं भरगच्च भरला होता.
आता रत्ना ऋतूस्नात झाल्यानं तिला सासरी धाडणं ओघानं आलंच होतं. त्याआधी रत्नाचे वडील चिंतोकाकांनी विठोबा सोबत रत्नाच्या खुशहालीचा सांगांवा धाडला. तर रत्नाची आई मंदाकाकीनं मुरडीच्या कानोल्याची दुरडीभरुन शिदोरी रत्नाचे सुख सांगत तिकडील मंडळीस पोहचती केली होती. सांगावा व शिदोरी घेऊन विठोबा तिकडे रवाना झाला. विठोबाला जाण्याकरिता दो दिवस नि येण्याकरिता दो दिवस चार दिवसाची तर परीटघडी पक्की होती. तोवर या झाडावरले पाखरु त्या झाडावर नि त्या झाडावरुन फडफडत पुन्हा त्याच त्याच शोधात बुडालेलं पाखरु इतकेच रत्नाने जोखले होते. विठोबाकडून तिकडून येणाऱ्या निरोपाकडं रत्नाच लक्ष लागून राहिले होते. तर इकडे रखमाबाईदेखील विठोबाच्या वाटेला डोळे लावून बसल्या होत्या. अखेर रखमेची ठरल्याप्रमाणे चार दिवसाने रुखरुख थांबली. तिकडील माघारचा सांगांवा घेऊन विठोबा थोरल्या वाड्यात परतला.
||श्री||
ति.रा.रा चिंतोपंत यांस-
श्री महादेवाचा शि.सा न.वि वि
चि. सौ रत्ना ऋतूस्नात झाल्याची बातमी समजली. खूप आनंद वाटला. आता सौ रत्नावली व श्री चिदानंद यांच्या सहजीवनाचे नवीन पर्व चालू होईल. जीवाला समाधान वाटले. परंतु एक मोठी दुविधा आमच्यापुढे येऊन ठाकली आहे. गावात व मुलखात सध्या मोठमोठे दरोडे पडत आहेत. क्वचित एकदोन ठिकाणी अघटितही घडून आल्याने भितीचे सावट सर्वदूर पसरले आहे. अश्यावेळी सदसद्विवेकबुद्धीस स्मरुन आपणास सांगणे आहे की या संकटाची सावली थोडीबहुत दूर होताच चि सौ रत्नावलीस घेऊन यावे. अन्यथा एखादा चांगला दिवस नक्षत्र पाहून आम्ही व मंडळी स्वत: येऊ तिकडे. सवारीच्या बैलगाडीतून सुनबाईस तिच्या घरी आणू. कसे? हेच योग्य ठरेल. बाकी सर्व क्षेमकुशल आहे. कसलीही चिंता करु नये.
कळावे
लोभ असावा.
ता.क. विठोबासोबत सौ रत्नावलीकरिता मौल्यवान जिनसा पाठविल्या आहेत त्या तिचकडे सुपूर्द कराव्यात.
तिकडील घराकडून ही आनंदाची वार्ता समजताच रत्नाच्या अंगाअंगावर मखमली मोरपीस फिरत राहिले. उठता बसता जेवता खाता वेडीला एकच वेड लागलं होतं. त्याच्या डोळ्याच्या तळ्याशी त्याची वाट पहात राहण्याचं. दिवसरात्र कानाला एकच आवाज ऐकू येत होता तो म्हणजे घुंगरांच्या गाडीचा. माडीवरल्या पडवीच्या खिडकीला दुपारनंतर ठाणच मांडून रहायची. नजर जाईल तिथवर पहात रहायची घुंगराची गाडी. अन नजरेच्या पल्याडही पाहण्याचे तिचे डोळे धाडस करायचे. अगदी तिन्हीसांज ओलांडून अंधार पसरु लागला की अदृश्याने नकाशे बांधलेल्या नक्षत्रांना पुढले भविष्य विचारायची. भविष्याचा पथ कुणालाच न कळल्याने जो तो तिला मेघांचा धुसर धुक्याचा झुलता साकव दाखवायचा. त्यापल्याडच्या पाण्याच्या आरशात सुखाचे बिंब हलतसे रहायचे. त्यावर डहुळणाऱ्या फांदीच्या स्पर्शाने तिचे हात रक्तबंबाळ व्हायचे. परंतु त्यांच्याशी वायदा केल्याचे कंदीलाच्या काचेला ती बजावायची. अन चंद्राच्या निळसर साक्षीनंतर सूर्य दुसरा दिवस दाखवायचा. कदाचित दुसरा दिवसही हेच ओझे अंगाखांद्यावर वागवित तिच्यापुढे यायचा.
दरोडेखोर त्यांच उत्पन्न कमवून पुष्कळशा श्रीमंतांना कफल्लक करुन त्या गावातून ते चालतेही झाले. त्यानंतर एका प्रवाश्यानं तिकडील खबरेचं पत्र चिंतूकाकांकडे पोचतं केलं. वाळूच्या एकेक कणासारखा रत्नावलीने एकेक क्षण तिकडील निरोपासाठी पणाला लावला होता. तिच्या अपेक्षेनुसार पानभर चिठ्ठी तर आली होती. परंतु त्यातला मजकूर निराशाजनक होता. तिथल्या मुलखात साथीचा आजार पसरला होता. या आजाराचा गुंजभर असलेला विषाणू सहा फुटाचा माणूस गिळंकृत करुन टाकत असल्याचं पत्रात नमूद केलं होतं. पत्रातील सांगण्यानुसार त्या मुलखातली मानवी संपत्ती धोक्यात आली होती. पुन्हा एकदा काही दिवसांकरिता कदाचित काही महिन्यांकरिता रत्नाचं सासरी जाणं रखडलं होतं.
चातक पक्षी स्वाती नक्षत्रातून ओघळलेला पावसाचा मोतीथेंबाची वाट पाहतो तशीच गत रत्नाची झाली होती. तिकडील निरोपाच्या चाहूलीची वाट पाहत पाहत निराशेच्या गर्तेत दोर नसलेल्या घागरीसारखी फिरत राहिली. मागाहून विठोबाच्या दोन चार खेपा रत्नाच्या सासरघरी झाल्या. सासरघराकडून आलेला प्रवासीही चार हेलपाटे तिच्या माहेरघरी टाकून गेला. परसात वाढत चाललेल्या जांभळीच्या झाडागत नवनवीन ज्ञात अज्ञात कारणाने रत्नाचं जाणं लांबलं होतं. तेही ठीकच होत तस. पण एक दिवस अचानक विजेसारखी एक बातमी येऊन कोसळली. रत्नावलीचा नवरा एकाएकी रात्रीतून घरातून परागंदा झाला होता.
घड्याळाचा लंबक मागे पुढे हिंदोलत राहतो. तसा रत्नाच्या जीवाच्या अरण्यात सुर्यप्रकाशासारखा येणारा तो दिवस मागेपुढे घुटमळत होता. तिच्या लग्नाचा दिवस. अवघी आठ वर्षाची चिमुरडी भातुकलीतल्या बाहुला बाहुलीच्या खेळाला भुलणारी लग्नाच्या बोहल्यावर चढली होती. मीच का पहिला हार घालायचा म्हणून रुसूनही बसली होती. त्याउपर नवऱ्याने नकटी म्हणून चिडवल्यावर मांडवात रडूही साजरं केलं होतं. या क्षणांची वर्तुळ गोल घारीसारख्या तिच्यासमोर घिरट्या घालत होती. चिदानंदाशी विवाह झाल्यानं ती सौभाग्यवती तर होतीच. पण चिदूने सर्वसाक्ष दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याकरिता अजून ती अखंड कुमारिका होती.
कालचक्राची गती थांबणारी नव्हती. रत्नाच्या पाठच्या बहीणींचे लग्न सोहळे होऊन संसार उभे राहिले होते. गुंफागुंफीच्या विणलेल्या जाळ्यात उभ्या राहिलेल्या वेलीला आपसूक फुल यावीत तशी चिमुकली पावलंही त्या दोघींच्या अंगणात खेळत होती. रत्ना मात्र सगळं सुखदुःख पारख्या नजरेनं पहात होती. सारीपाटाचा डाव मांडायला तिचे नशीबही राजी व्हायचे नाही. तिची धगधगत्या वेदनेच्या ज्वाळा कुणापर्यंत पोहचत नव्हत्या असं नाही. पण त्या विझल्या जात नव्हत्या. कुठल्यातरी असंबद्ध मानसिक कर्माचे मांजर तिच्या पायी घुटमळत रहायचे. त्या मांजराला काही तिच्या पापपुण्याचा ताळा माहित नसायचा. ते केवळ घुटमळत रहायचे. तेवढच तर ठाऊक होतं त्याला. माहेरघरी खाललेल्या अन्नाची बटिक म्हणून रत्ना वापरायची. सासरघरच्या उंबऱ्यानेही तिला पुष्कळ पुकारलं होतं. पण जिथं चिदा नाही तिथ रत्ना कशी राहील? याच एका माणसाच्या ओढीनं सगळं सासर तिनं तिच्या मायेत दडवलं होतं. जणू एखाद्या रेशीमकिड्यानं आपल्या अंतर्गत लाखमोलाच काव्यासारखं दीर्घ कौशेय जपावं.
त्यादिवशी-
ती परसातल्या आडाचं पाणी घागरी घागरीनं उपसतं होती. तिच रोजच नेमाचंच ते काम. त्यामुळे सरावलेला हात विचाराआधी रहावरुन घागरीवर पोहोचत होता. धीम्या धीम्या गतीने भरलेल्या घागरी ओढून विहीरीबाहेर आल्या होत्या. कोयंड्यात कडी आपसूक बसावी तशी कमरेवरची घागर स्थिर झाली. पण डोईवरल्या बारक्याश्या कळशीनं मात्र घात केला होता. कळशीचा तोल सुटल्यानं रत्ना ओलेती झाली. जणू सचैल स्नान घडाव तस तिच अंगअंग पाण्यानं भिजून गेलं. पर्णावरुन पाणी ओघळून पडाव तस पाणी केसातून तिच्या लुगड्यात झिरपत होतं अन निथळतही होतं. काजळाच्या डबीसारख तिनं जपलेलं सौंदर्यही तेही मोत्याच्या सरीसारखे ओघळू लागले होते. परंतू तिच्याकडं कोणते तरी दोन डोळे स्थिरावल्यासारखे झालेत हे तिनं सुप्त मनान ओळखलं. भिंगरी फेकावी तस तिनं त्या दोन नेत्रपाखरांकडं एक कटाक्ष टाकला. समोरच्या बंद वाड्याची दारं व खिडक्या उघडल्या गेल्या होत्या. तिच्या कटाक्षानं त्याची छबीही तिने क्षणार्धात चित्रासारखी टिपली. माडीवरल्या सज्जातून कुणीस तिला न्हाहाळत होतं. त्या कटाक्षाचे वेगळेपण ठसठशीत तिला जाणवत होतं. त्याला गंध नव्हता, रंग नव्हता, मखमाली काटे मात्र होते. त्या नजरेचा कोश तिनं तिच्याही नकळत लपेटून घेतला व चालती झाली.
तिन्हीसांज उलटून गेल्यावर-
नेहमीप्रमाणं पुरुषांची पंगत उरकून बराच वेळ झाला होता. बायकांची पंगत बसायला अवकाशसा होता. पुन्हासा भात तपेल्यात शिजत होता. त्याला दणकून वाफ येईपर्यंत गप्पांचे वाफे पेरले गेले होते. रत्ना तशीही अबोल तशात आजची ती नजरबंदी तिच चित्त थाऱ्यावर कुठे होतं. गवताच्या पात्यासारख डुलत होतं. वाफ येतासरशी झुळूकीनं बगीचा हलावा तश्या खांबाला भिंतीला टेकून बसलेल्या बाया गोलाकार वर्तुळात विस्कळीत झाल्या. कित्येक वर्ष बंद असलेल्या धाकला वाड्यात कुणी राजगायक रहायला आल्याची वर्दी गावभर. नि गावभर फिरुन सोफ्यातून थेट बायकांच्या पंगतीत स्वयंपाकघरात पोहोचली होती. ती बातमी ऐकता ऐकता भाजीत कमी पडलेलं मीठ रत्ना लावून घेत होती. तेव्हा तिच्या बांगड्या किणकिणू लागल्या. दो घडीचही गुपित छपून जाईना. तेव्हा डाव्या हातानं उजव्या हाताला आपसूक मुकं केलं. पानावर बसलेली रत्ना उगाचच खजील झाली. याची दखल फारशी कुणी घेतली नाही. कारण उघडपणे काही जाणवलच नाही. सारी रत्नाच्या मनाची चलबिचल.
खजिन्याच्या कोठारात त्याच्या मालकाचे आगमन होताच त्याच्या केवळ किरकोळ वाटाव्या अशा आज्ञांनी बंद दरवाजे खुले होत जातात. तसच काहीस पुढे घडून आलं. रत्नाच्या पाणी भरायची वेळ अन त्या कमानीच्या नक्षीनं सांभाळलेला सज्जाचा दरवाजा उघडायची एकच वेळ असायची. दृष्टादृष्टीनं मुकपत्र कुणी कुणाला पाठवले जायचे. तर कधी ती उशीरा पोहचायची तर कधी चार चार दिवस बंद दरवाजा तिची विचारपुस करायचा. जणू पाठशिवणीचा खेळ चालायचा. आता मात्र एकदाही डोईवरली कळशी हेंदकाळली नाही. कारण नजरानजरेच फुल वेणीत खोचून ती पाठमोरी व्हायची. त्या डोळ्यांचे चुंबक तिला खेचू पहायचे. पण तिच्या दंडाला बांधलेला सत्य असत्याचा दोर या बालखेळातून तिला दूर सारायचा. तो मात्र तिथेच रेंगाळत रहायचा. पण बोलाफुलाला गाठ पडते म्हणातात ना. तसे या दोघांमधल्या उर्जेला अचानक आकार सापडला आणि शेजारच्या यमुनेच्या रुपानं तो प्रगट झाला.
पट्टीचे तबलावादक असणाऱ्या शामुकाकांची यमुना गोड गळ्यानं पहाटे ओवी गायची तेव्हा अर्धझोपेतली रत्ना जागी व्हायची. तिच्या सुरात सुर मिसळून रत्नावली देखील गाऊ लागायची. धाकल्या वाड्यात रहायला आलेल्या राजगायकाकडे यमुनेची गाण्याची शिकवणी सुरु होणार होती. यमुनेला सोबत होईल व रत्नाचाही जीव गमेलं अस अनूमान शामुकाकांनी चिंतोबाबापुढ योजलं. जणू रत्नाच्या मनातील पाचूला पैलू पडू लागले होते. अखेरीस तो दिवस उजाडला. संपूर्ण क्षितीज लालसर झाले होते. त्या लालीच्या छायेत जणू सगळीच सृष्टीची दृष्टी सांडून गेली होती. त्या राजगायकाच्या घरात रत्नाचे पहिले पाऊल पडले. खरतरं ज्या नजरेनं तिचे चित्त चोरले होते. त्याहुनही त्या गायकाच्या गोड आवाजाने तिचे हृदय व्याकुळ झाले होते.
त्याच्या स्वरांची वलय तिच्या सभोवती जणू प्रतिविश्व साकारायची. ज्याचा अधिपती तो राजगायक 'शशीनाथ' असायचा. त्याने भूप आळविताच तिच्या मनाची पक्षीण जागृती स्वीकारायची. तर बिलावल साकारताच तिचा देह जाणीवेचा व्हायचा .त्याने सारंग गाताच तिच्यातली स्वाभाविक नदी खळखळाट करत वाहत रहायची. तर त्याने तोडी आळविताच दूरदूर वनांतरी भटकणारे तिच्या काळजाचे हरीण त्याच्या पावलापाशी येऊन बसायचे. तर कधी ती जोगिया गाऊन शब्दावाचून तिचे दुःख सहज मांडून जायची. तर कधी चंद्रकंस गाता गाता विरहाची वेदना चांदण्यानी बांधलेले मौक्तीक हार तोडून टाकायची. शशीनाथाला ही स्वरांच्या भाषेत गुंफलेली कोडी उलगडणे फारसे काही अवघड नव्हते. तिचे जीवनकहाणी आता सर्वदूर श्रुत होती. त्यापासून शशीनाथ अनभिज्ञ नव्हता. तिच्या वाट्याला आलेल्या शापभोगाकडे तो करुणेने पहात होता. या करुणेच्या वारुळातील दुःखाच्या मुंग्या दूरदुरपर्यंत जाऊन पोहोचल्या होत्या.
त्यादिवशी-
थोरल्या वाड्यासमोर उभ्या असलेल्या टांग्यांमध्ये बांधलेल्या सामानाची गठळी एकावर एक टांगेवाला रचत होता. हेच चित्र पुढल्या मागल्या टांग्याचे दिसत होते. सगळे घरदार कोकणातल्या महादेव काकांच्या लेकीच्या लग्नासाठी रवाना होऊ लागले होते. रत्नावलीने मात्र जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे रत्नावलीसोबत घराच्या दिमतीला रखमा व विठोबा थांबले होते. टांगेवालाने लगाम हाती धरताच घोडा सज्ज झाला. चाबकाचा फवारा उडण्याआधीच घोड्याच्या पायातलं घुंगर वाजल अन मंडळी गावाकडे रवाना झाली. टांगे दुरवर एक ठिपका होईपर्यंत रत्ना व रखमा त्याकडे पहात राहिल्या
या लग्नाच्या निमित्तानं तिच्या सासरघरच्या नात्यागोत्याच कोणतं तरी माणूस आडव येऊन तिला गाठेल याची पक्की खूणगाठ रत्नाजवळ होती. अशा प्रसंगाची माती अंगाखांद्याला चोळण्याऐवजी अशावेळी एक खोल गर्त खणून त्यात दडी मारण्याच बळ तिन अंगिकारल होतं. कारण ओढावलेल्या अपघाताचा दोषही तिन आपल्या कपाळी गोंदून घेतला होता. 'अवदसा' हा तिच्या प्राक्तनावर बसलेला शिक्का पुसण्याऐवजी त्याचीच धूळपाटी ती गिरवित राहिली होती. एकाचवेळी ती कौमार्य सहाय्य झालेली वयात आलेली किशोरी होती त्याचवेळी ती माथी ल्यालेले सौभाग्याचे द्रव्य जपणारी कांताही होती. तिची कोणतीही ओळख तिचे अस्तित्व जाळून टाकणाऱ्या ठिणग्याच होत्या. यामध्ये तिला शीतल वाटावी अशी एकच गोष्ट तिच्याजवळ होती ते म्हणजे शशीनाथचे वेल्हाळ सुर. धागा उभा आडवा करत वस्त्र विणले जाते तसेच शशीनाथाच्या स्वरांनी तिच्याभोवती काहीतरी गुंफले गेले होते. जे अगदीच त्या दोघानांही अनाम, अजाण व अपरिचित होते.
दुपारची उन्ह भिंतीतल्या कोनाड्यात डोकावू लागली होती. आकाश निरभ्र झाले होते. त्याचा निळसर रंग त्याने जमिनीवरील सजीव निर्जीव दोहीतही उधळून दिला होता. थोरला वाडा माध्यानीचं भोजन उरकून वामकुक्षी घेणाऱ्या माणसांसारखा उसंत घेत होता. तर राजगायकाचा वाडा मात्र स्वरश्रुतींच्या गायनाने घट उजळावा तसा प्रकाशित होत होता. त्याचा उजेड रत्नावलीच्या अंधाऱ्या खोलीत कधीचाच पोहोचला होता.
शशीनाथाने आळवलेल्या यमनाच्या सुरावटीनं तिच्या पावलांना ओढ लागली. वाकळ शिवणारे तिचे हात तत्क्षणी थांबले. पैंजणाचा नाद करत पाऊले जिना चढून वर पोहोचली. शशीनाथ यमन रागाची सुरावट आळवित होता. त्या रागातील रागिणी प्रियकराच्या भेटीसाठी आतुरलेली होती. तिने चढविलेले सोळा शृंगारात तिच्या प्रियतमाचेच नाव ओवले होते. तिच्या श्वासाने त्याचाच ध्यास घेतला होता. तिच्या तनामनात एखाद्या विशाल सागरासारखा तो पसरला होता. त्यामुळे तिच्या देहात तिच्याच अंतरंगात तिला लपण्यासाठी कोणती जागाच नव्हती. तिच्या पैंजणातील नुपूर त्याला गुजगोष्टी सांगण्यास आतूर झाले होते. तिच्या कटीचा मेखला प्रेम व वेदना यांचे क्षितिज सांधत होता. तिच्या हातातील बांगड्या त्याच्यावर लटका राग धरुन रुसून अबोलश्या व्हायचा प्रयत्न करत होत्या. तर कानातील डुल त्याचा हट्ट पुरविण्यास नकार देता देता हाकारत होते. गळ्यातला लांब रुद हार त्याचे लक्ष विचलित करत होता. तर माथ्यावरील बिंदी या शोभेच्या लयीत त्याच्याकडेच निरखून पहात होती. एकूण एक तिचा अलंकार जणू त्याचाच झाला होता. केवळ सुवासाने आंधळा झालेला वेणीतील सोनचाफा तिची पाठराखण करत होता. अखेरीस तिचा लाडका प्रियकर दोघांमधे असलेल्या ओढीच्या उलट्या वाहणाऱ्या नदीतून पोहत तिच्या दारात पोहोचला. आरश्यात आपले स्वतःचे प्रतिबिंब न ओळखू शकलेल्या प्रेयसीनं दारात ठकलेल्या तिच्या प्रियतमास ओळखले. पण त्याच्या येण्यानं इतकावेळ उत्कंठेने दाखविलेला विरह डोळ्यात अश्रू घेऊन आला. तिचा अश्रू त्याने तळहाती झेलताच त्याचा परिमळ झाला. कदाचित तो वणवण करित शोधलेले घर त्याला तिच्यात सापडले ती ही त्याच घरात स्थिरावली. त्याने तिला सूर्य चंद्र तारे अवकाश साऱ्याची ओळख करुन दिली. शृंगार रसाच्या मोहिनीचे जाल कोळिष्टकासारखे हळूहळू पसरत गेले. या मोहिनीनं मायेनं दाखवलेल्या सरोवरात हंसाची जोडी विहरत राहिली. रात्रीच्या अंधाराने हा क्षण नजरबंद केला. अन रात्र समईच्या ज्योतीसाक्ष दूर डोंगर चढू लागली. तेव्हा निद्रेनं या प्रेमवीरांना आडोसा बहाल केला. या आडोश्याला फिके झालेलं काजळ दृष्टीस पडणार नव्हते, ना मुंडा हात सापडणार होता, ना चोळाबोळा झालेला शेला . प्रेमाच्या मधुर रसाची गोडी या प्रियकर प्रेयसीनं अनूभवली होती. शशीनाथाने आळविलेल्या रागिणीशी शशिनाथ व रत्ना जणू एकरुप झाले होते. कदाचित त्यातील प्रियकर व प्रेयसी तेच दोघे होते. जी शशीनाथाच्या स्वरातील भाव होऊन प्रगट झाले होते. ते प्रत्यक्षात वास्तवातही घडून गेले होते.
एखादे संमोहन उतरल्यावर जाग यावी तशी रत्नावली भानावर आली. साडीचा विस्कटलेला पदर सैल होवून सुटलेला अंबाडा तिनं पुर्ववत केला तरी तिच्यातला बदल तिला ठाऊक तर होताच. कुठल्या क्षणाच्या तप्त हाताने या दरीत ओढलो गेलो याची रत्नावली खंत करु लागली. तात्काळ कुठल्यातरी उंच कड्यावर उभे राहून हा देह विर्सजित करावा असे तिला वाटू लागले. अन्यथा घराकडे जाण्याची वाट कधीच सापडू नये अश्या अनेक भावनांनी तिच्याभोवती फेर धरला. त्या चकव्यातून निसटण्याचा मार्ग तिला दिसेनासा झाला. दिसेल तरी कसे? पश्चातापाच्या दग्ध पाण्यानं तिचे डोळे डबडबले होते. या स्थितीचा शेवट कसा करावा तिचे तिलाच कळेनासे झाले होते. कुठल्याही अस्वस्थतेला लय न सापडलेली गती असते तीच तिच्या पायानं पकडली होती. थोरल्या व धाकल्या दोन्ही वाड्यात फारसे अंतर नव्हते. पण रत्नावलीसाठी ते अंतर दोन ध्रुवाइतके वाटले. ती वाड्याच्या आत येताच सोप्यात टांगलेल्या पिंजऱ्यातल्या राघुनं तिच्याकडं पाहून शीळ घातली. तिला आजूबाजूचे काहीच दिसणारे नव्हते ना ऐकू येणारे होते. तिच्या बंदिस्त खणात ती जाऊन पोहोचली. भिंतीस पाठ टेकून एखाद्या मुर्तीसारखी अचल होऊन बसली. कितीतरी वेळ हा पुतळा तिने सांभाळला. पण त्याच्या कठीणत्वाचे ओझे ती वागवू शकत नव्हती. रत्नाच्या काळजात उठलेल्या तिरमिरीनं तिला चुलीपुढं आणून सोडलं होतं. चुलीतला विस्तव तिने तळहातावर झेलला होता. त्याचा चटकाही तिला बसत नव्हता.
परंतु तिच्या या अवस्थेकडे पाहुन कुणीतरी कळवळलं. तिच्या हातातला विस्तव त्यानं झटकून दिला. आणि तिच्या हातावर अलवार फुंकर घातली. तू कोण? कसा आलास? या प्रश्नाचे घोंगडे तिने पसरण्यापुर्वीच तो तिच्याशी बोलू लागला.
"रत्नावली ओळखलंस का मला? मी चिदानंद तुझा नवरा. माझ्या अश्या अवतारात तू मला ओळखणं शक्य नाही. माझ्याजवळ वेळ कमी आहे. तेव्हा मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐक. आपला देश संकटात आहे. मी देशकार्यात सहभागी झालो आहे. इंग्रजांविरुद्ध असलेल्या गुप्तकटात मी सामील आहे. म्हणून मी घर सोडून निघून गेलो. आम्हाला सांगणेच तसे होते. गुप्तता रहावी म्हणून मी घरीही कोणता निरोप पोहचवला नाही. आता काही दिवसातच मी यातून मोकळा होईन. मग आपण आनंदाने संसार करु. आजची रात्र तुझ्या घराचा मला आसरा दे. सूर्य उगवण्यापुर्वीच मी निघून जाईन"
वाढलेल्या दाढी जटा, किरकोळशी झालेली अंगकाठी रत्नानं चिदानंदला ओळखणे शक्यच नव्हते. तो घर सोडूनच अडीच तीन वर्षे होऊन गेली होती. त्यापुर्वी चार वर्षामागं तिनं त्याला गावच्या यात्रेकरिता गेल्यावर पाहिले होते. त्याचे डोळे जर एकटक लावून तिने तेव्हा पाहिले नसते तर कदाचित आजही ती चिदूला ओळखू शकली नसती. त्याच्या कथनानंतर तिने त्याला एकच सवाल केला?
"तुमच्या घरावर खरच दरोडा पडला होता का? "
"हो दुर्दैवानं हे खरय. कुणाच्या जीवाला काही धोका नाही झाला. सोन चांदी रोकडं उचलून नेले. जे गुप्तपणे राखले होते ते शिल्लक राहिले. पण तू काळजी करु नकोस. तुझ्या नवऱ्यावर विश्वास ठेव. गेलेली संपत्ती तो मिळवून आणेल"
त्याचे बोलणे ऐकून रत्ना तोंडातल्या तोंडात पुटपुटत होती.
"दरोडा पडली ही खोटी कहाणी नव्हतीच. लुटालुट झाली. पुरती लुटालुट झाली. दरोडा पडला"
-----अनघा देशपांडे
Image Source : Google
Painting by Raja Ravi varma
किती सुरेख लिहिलं आहे
किती सुरेख लिहिलं आहे
खूप छान लिहीलेय.
खूप छान लिहीलेय.
खूप अलवार लिहिले आहे.
खूप अलवार लिहिले आहे. नायिकेची तगमग पोहोचली...
शेवट मला नीटसा समजला नाही. पण
ड पौ
शेवट मला नीटसा समजला नाही. पण
शेवट मला नीटसा समजला नाही. पण लिखाणाची शैली आवडली. लेखिकेवर जी ए चा परिणाम झालेला दिसतोय. ते ठीक आहे. पण स्वतःची शैली निर्माण करायला काय हरकत आहे? अजून लिहा.
कदाचित माझी चूक होत असेल. दुसऱ्या कुणा वाचकांना असे वाटले नाही क?
कथा खूप रेंगाळली आहे असा फील आला. संवाद अजिबात नाहीत. संवाद असले तर वाचक थोडा alert होतो.
हे माझे मत.
छान कथा!
छान कथा!
अती अलंकारीक लिहीण्याच्या नादात थोडी पाल्हाळीक वाटते.. !!
वातावरण निर्मिती जास्तीही नको आणि कमीही ....... हे कथालेखकाला आव्हान असते खरे !
शैली चा मला अ तिरेक वाटला.
शैली चा मला अ तिरेक वाटला. कथा छान.
उपमांचा ओव्हरडोस झालाय.
उपमांचा ओव्हरडोस झालाय. पहिल्या तीन परिच्छेदांत कंटाळून सोडून दिली.
शब्दबंबाळ झाली आहे.
शब्दबंबाळ झाली आहे.
>>> दुसऱ्या कुणा वाचकांना असे
>>> दुसऱ्या कुणा वाचकांना असे वाटले नाही क? - मला वाटले
>>> संवाद अजिबात नाहीत. संवाद असले तर वाचक थोडा alert होतो - सहमत
कथा अर्धी वाचली
मात्र माझ्या प्रतिसादाचा अर्थ लेखिकेने नकारात्मक घेऊ नये कृपया, हे फक्त एक मत आहे
जी ए - ही आठवण मलाही झाली
लेखनशैली छान आहे
बेफ़िकीर जी धन्यवाद.
बेफ़िकीर जी
धन्यवाद.
कथेच्या अखेरीस
कथेच्या अखेरीस
mage Source : Google
Painting by Raja Ravi varma
असे लिहिले आहे.
मला का हे चित्र दिसत नाहीये?
सुरुवात प्रॉमिसिंग वाटली पण
सुरुवात प्रॉमिसिंग वाटली पण नंतर खूपच पाल्हाळीक झाली.
चांगली लिहिली आहे कथा. थोडी
चांगली लिहिली आहे कथा. थोडी जास्त अलंकारिक झाली आहे हे खरं आहे, पण तरीही आवडली वाचायला.
शशीनाथाला दरोडेखोर का ठरवावं,
शशीनाथाला दरोडेखोर का ठरवावं, हवेलीच आपला राखून ठेवलेला ऐवज बहाल करत असेल तर?
हो, उपमा जास्त झाल्यात, संवाद असा एकच- शेवटी २ वाक्य.. शब्दबंबाळ असली तरी अलंकारिक ललित व्यक्तीचित्र म्हणून खपेल, कथावस्तू फार मोठी नाही. पण लिहीत राहा.. वाचायला आवडेल
मनापासून धन्यवाद आपल्या
मनापासून धन्यवाद आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल
आपल्या सर्वांच्या सुचनांबद्दल निश्चितच विचार व चिंतन करेन. कथालेखन तंत्र अश्याच सुचनांमधून प्रतिक्रियेतून उलगडत जाते. लेखकाला त्याची मदतच होते. धन्यवाद सर्वांचे
अनघा, तुम्ही मायबोलीकरांच्या
अनघा, तुम्ही मायबोलीकरांच्या सूचना एकदम सकारात्मक रित्या घेतल्या.
मनापासून आवडलं. पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा. लिहीत्या रहा.
@केशवकुल जी
@केशवकुल जी
आपण म्हणता ते खरे आहे. कॉलेजलाईफमध्ये जी ए अधिक वाचलेत त्यावेळी ते खूप परिणामकारक होते. त्यामुळे साहजिक ती छाया पडत असेल. त्याबद्दल मी चिंतन करते.
@बेफिकीर जी
धन्यवाद आपल्या सुचनांबद्दल. त्यावर जरुर चिंतन करेन
@अजिंक्यजी
तुम्ही म्हणत आहात ते खरे लेखन ललिताच्या अंगाने लिहिले आहे. तसेच व्यक्तीचित्र म्हणत आहात ते ही योग्य ठरेल कारण कथेत अनेक पात्र अंतर्भुत असतात. प्रत्येक पात्राला त्याचे वैशिष्ट्य असते. मी कावेरीची तगमग मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ललित म्हणल्यास हरकत नाही.
तिने शशीनाथाला दरोडेखोर म्हटले नसून स्वतः ला म्हटले आहे. ती स्वतःचे अस्तित्व चिदानंदची पत्नी म्हणून जपते आहे. पण तिला प्रेमाचीही ओढ लागली आहे. हीच घालमेल मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे रत्नाच्या दृष्टीने तिच स्वत: दरोडेखोर आहे