लागलीसे आस

Submitted by nimita on 6 August, 2025 - 23:21

"बाळा, ऊठ लवकर. अजून उशीर केलास तर सकाळचा नाश्ता नाही मिळणार आणि आज तर दुपारचं जेवण यायला सुद्धा जरा उशीरच होईल ! मग नंतर नको म्हणू - 'भूक लागली, काहीतरी खायला दे.' ...

छोट्या राघूची आई त्याला उठवत म्हणाली. आईचा आवाज ऐकून राघूनी हळूच आपले डोळे किलकिले करून बाहेर नजर फिरवली. समोरच्या बाल्कनीचं दार आज चक्क चक्क उघडं होतं- आणि तेही इतक्या सकाळी ! त्यामधून आत येणारी सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरीप राघूच्या मऊमऊ पिसांच्या गादीला अजूनच ऊबदार बनवत होती. राघूनी आपल्या पंखात चोच खुपसून पुन्हा एकदा डोळे मिटले. किती मस्त वाटत होतं असं कोवळ्या उन्हात लोळत पडायला !

पण त्याचा हा आनंद काही फार काळ टिकू शकला नाही. पुन्हा एकदा त्याला आपल्या चोचीने हलवत त्याची आई म्हणाली,"ऊठ रे बाळा, ते बघ- ताई आल्या सुद्धा आपला नाश्ता घेऊन. अरे वा, आज तर तुझ्या आवडीचा गुलाबी पेरू आहे त्यांच्या हातात. "

गुलाबी पेरुचं नाव ऐकताच राघूनी पटकन डोळे उघडून पाहिलं. खरंच की ... ताईंच्या हातात राघूची ती स्पेशल वाटी होती आणि त्या वाटीत गुलाबी पेरूच्या छोट्या छोट्या फोडी होत्या - अगदी वाटीभरून !

राघू पटकन उठला आणि त्याच्या आवडत्या झोपाळ्यावर जाऊन बसला - त्या छोट्याशा झोपाळ्यावर बसून हलके हलके झोके घ्यायला खूप आवडायचं राघूला. आत्ताही एकीकडे झोपाळ्यावर झुलत झुलत तो ताईंनी समोर धरलेल्या पेरूच्या वाटीतल्या त्या लुसलुशीत फोडी अगदी आवडीने खात होता. त्याला तसं आनंदी, समाधानी बघून त्याच्या आईचं मन भरून आलं. आपल्या चोचीने पंख नीट करायचा बहाणा करून तिने हळूच आपले अश्रू टिपले.

तिला आपल्या या मुलाची नेहेमीच काळजी वाटायची. त्याचे विचार, त्याचे प्रश्न, त्याच्या असंख्य शंका - सगळं काही जगावेगळं होतं. तिला एक प्रसंग आठवला- जेव्हा राघूनी पहिल्यांदा आपले छोटे नाजूकसे पंख पसरून त्याची पहिलीवहिली छोटीशी भरारी घेतली होती तेव्हा तो याच झोपाळ्यावर येऊन विसावला होता. त्या काही क्षणांच्या परिश्रमात देखील त्या इवल्याशा जीवाला दम लागला होता. पण झोपाळ्यावर बसून हलके हलके झोके घेत तो म्हणाला होता,"माझे पंख अजून मोठे होतील ना तेव्हा मी अजून उंच उडेन." त्यावेळी त्याच्या चेहेऱ्यावर दिसणारा तो ध्येयपूर्तीचा आनंद, ते समाधान बघून तेव्हाही आईचे डोळे असेच भरून आले होते.

"आई, अगं कुठे लक्ष आहे तुझं? ताई बोलतायत तुझ्याशी." राघूच्या या वाक्याने त्याची आई भानावर आली. तिने ताईंकडे वळून बघितलं; त्या तिच्यासाठी सुद्धा तिचा आवडीचा नाश्ता घेऊन आल्या होत्या- दोन बटाटेवडे आणि ब्रेड. "धन्यवाद," रोजच्या सवयीनुसार ती चिवचिवली. ताईंनीच शिकवलं होतं त्यांना हे; कोणीही आपल्याला काहीही खायला दिलं की 'धन्यवाद' म्हणायचं.

तिच्याकडे हसून बघत, तिच्या पंखांवरून एक प्रेमळ हात फिरवत ताई पुन्हा राघूच्या दिशेने वळल्या. त्याला आपल्या हातांनी पेरूची एक एक फोड देत त्या त्याला शिकवत होत्या- "स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा... म्हण बघू तू पण. स्वा तं त्र्य दि..." ताई शिकवत होत्या खऱ्या पण राघू मात्र एकीकडे त्यांचं बोलणं ऐकत, मिटक्या मारत पेरू खाण्यातच गुंग होता.

थोडा वेळ प्रयत्न करून ताई म्हणाल्या,"आत्ता मी जरा घाईत आहे, त्यामुळे आत्ता एवढीच शिकवणी पुरे झाली. पण मी परत आल्यावर आपण पुन्हा पुढे सुरू करूया. आज दिवसभरात तू जर हे वाक्य म्हणलास तर रोज तुझी आवडती तूप लावलेली पोळी देईन मी तुला खायला."

ताईंचं ते वाक्य ऐकून राघूनी चमकून वर बघितलं, पण तोपर्यंत त्या घराचं दार बंद करून बाहेर निघून गेल्या होत्या. राघूनी वळून आपल्या आईकडे बघितलं. ती जरी तिच्या आवडीचा नाश्ता खात असली तरी तिच्या चेहेऱ्यावर तो नेहेमीचा आनंद दिसत नव्हता.

"काय झालं आई? आज सकाळपासूनच तू खूप उदास वाटते आहेस? आणि या ताई इतक्या सकाळी कुठे गेल्या गं? आज काही विशेष आहे का? गुलाबी पेरू, बटाटे वडा आणि तूप लावलेली पोळी सुद्धा! ताईंचा वाढदिवस आहे का आज?" राघूनी उत्तराच्या अपेक्षेनी आईकडे बघितलं- पण ती तर स्वतःच्या विचारांत गुंग होऊन समोरच्या खिडकीतून बाहेर बघत होती. राघूनी तिच्या कुशीत शिरत पुन्हा तेच प्रश्न विचारले तेव्हा भानावर येत आई म्हणाली,"नाही रे बाळा, आज आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. खूप महत्वाचा दिवस आहे हा. आज देशात सगळीकडे अगदी आनंदीआनंद असतो, लोक अगदी जल्लोषात साजरा करतात आजचा दिवस."

"कोणता दिन? ताई पण मगाशी असंच काहीतरी शिकवत होत्या मला. स्वा...तं... त... स्वातंत्र्य... आई, मला जमलं की म्हणायला. आता मला रोज तूप पोळी देतील ताई." त्या नुसत्या कल्पनेनीच राघूचे डोळे चमकले. त्यानी आईकडे बघत विचारलं,"पण हे स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय असतं गं आई? आणि सगळे जण या दिवशी इतके खुश का असतात?"

राघूला आपल्या पंखांच्या कवेत घेत त्याच्या आईनी त्याच्या त्या निरागस प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली, "स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मर्जीप्रमाणे जगणं, आपल्याला जे काही करायची इच्छा असेल ते करणं. जेव्हा आपण स्वतंत्र असतो ना, तेव्हा आपल्याला इतरांवर अवलंबून रहावं लागत नाही, आपण कसं वागायचं ते आपणच ठरवू शकतो." आई अजूनही बरंच काही सांगत होती, समजावत होती. राघूही अगदी लक्ष देऊन सगळं ऐकत होता. हळूच आईच्या कुशीतून बाहेर निघत राघू त्याच्या आवडत्या झोपाळ्यावर जाऊन बसला आणि मनसोक्त झोके घेऊ लागला. आईकडे बघत त्यानी विचारलं,"आई, बघ, मी अगदी मला हवे तसे झोके घेतोय." आपले इवलेसे पंख पसरून त्यानी एक छोटीशी भरारी मारली आणि पुन्हा झोपाळ्यावर येऊन विसावला. बाल्कनीच्या उघड्या दारातून बाहेर बघत तो एकीकडे आईच्या बोलण्यावर विचार करत होता. झोके घेत असताना तो अचानक थांबला, स्वतःशीच बोलत असल्यासारखा म्हणाला,"खरं म्हणजे मला बाहेरच्या त्या वेलाच्या फांदीवर बसून झोके घ्यायची इच्छा आहे- कितीतरी दिवसांपासून! आणि त्याच्या शेजारी ते पेरुचं झाड आहे ना, तिथले पेरू सरळ झाडावरूनच खायचेत मला. असे कापून वाटीत घालून आणलेले खाताना पोट तर भरतं पण मन नाही भरत गं."

थोडा वेळ विचार करून आईकडे बघत त्यानी विचारलं,"आई, मला जे आवडतं, जे करावंसं वाटतं ते मी करू शकत नाही; म्हणजे मला स्वातंत्र्य नाहीये का ?" त्याच्या स्वरातला तो काहीसा उदास भाव ऐकून आईचे डोळे पाणावले. काहीही न बोलता तिने राघूला पुन्हा एकदा आपल्या पंखांच्या उबदार कवेत घेण्याचा प्रयत्न केला; पण तिच्या जवळून उडून तो थोडा लांब जाऊन बसला. मनाशी काहीतरी निश्चय केल्यासारखे त्यानी आपले पंख पसरले आणि उंच भरारी घ्यायचा प्रयत्न केला; पण काही क्षणांतच तो खालच्या मऊ गवतावर येऊन आदळला. त्यानी पुन्हा एकदा बाल्कनीच्या दाराच्या दिशेनी भरारी मारली, पण त्याचा तो प्रयत्नही फसला. त्याची ही धडपड बघून त्याच्या आईच्या जीवाची मात्र तगमग होत होती. तिने त्याच्या दुखऱ्या पंखांवर हळुवारपणे आपली चोच फिरवायला सुरुवात केली. तिच्या मनात आलं,'तुझ्या पंखांप्रमाणेच तुझ्या दुःखी मनावर पण मी प्रेमाची फुंकर घालू शकले असते तर किती बरं झालं असतं बाळा!' आणि त्याक्षणी तिला एक गोष्ट जाणवली - 'आता आपल्या बाळाला सत्य परिस्थितीची जाणीव करून द्यायला हवी. हीच योग्य वेळ आहे.' आपल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत ती राघूला म्हणाली,"राघू, तू कितीही प्रयत्न केलास, कितीही मोठी भरारी घेतलीस तरी तू तिकडे बाहेर नाही जाऊ शकणार. कारण ताईंनी आपल्याला या एका पिंजऱ्यात बंद करून ठेवलंय; आपण आपल्या मर्जीने नाही राहायला आलो या पिंजऱ्यात- तरीही जोपर्यंत ताई आपल्याला इथून बाहेर काढणार नाहीत तोपर्यंत आपली इच्छा असो वा नसो- आपल्याला या पिंजऱ्यातच राहावं लागेल. तू मगाशी तुझ्या स्वातंत्र्याबद्दल जो प्रश्न विचारलास त्याचं खरं उत्तर ऐकायचं आहे का तुला?" आईच्या या प्रश्नावर राघूनी चमकून आईकडे बघितलं. आई आपल्याच तंद्रीत असल्यासारखी बोलत होती- "आपण जरी आपल्या ताईंच्या घरी रहात असलो तरी हे आपलं घर नाहीये. आपलं खरं घर तिकडे बाहेर आहे- खुल्या आसमंताखाली, मोकळ्या हवेत!" स्वतःच्या आजूबाजूला नजर फिरवत ती पुढे म्हणाली,"पण आपलं सगळं विश्व या छोट्याशा पिंजऱ्यात अडकून पडलं आहे. आपण इतर पक्ष्यांसारखे मोकळ्या आकाशात उडू शकत नाही; आपल्याला हवं ते, हवं तेव्हा खाऊ-पिऊ शकत नाही; आपल्या इतर जातबांधवांच्या बरोबर मिळून मिसळून त्यांच्या सारखं स्वच्छंदी आयुष्य जगू शकत नाही. आणि म्हणूनच आपली मर्जी असो वा नसो, आपल्याला आपल्या प्रत्येक गरजेसाठी ताईंवरच अवलंबून राहावं लागतं."

आईच्या तोंडून हे कटू सत्य ऐकल्यावर राघू अजूनच हिरमुसला. त्याच्या मनात एकाच वेळी संताप, त्रागा, असहायता, उद्वेग, दुःख असे अनेक भाव गर्दी करायला लागले. कसाबसा स्वतःला सांभाळून घेत तो म्हणाला,"आपल्याला न विचारता, आपल्या इच्छेविरुद्ध असं या छोट्याशा पिंजऱ्यात डांबून ठेवलंय ताईंनी, आणि स्वतः मात्र अगदी उत्साहात त्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा करतायत. त्यांच्या प्रमाणेच आपल्यालाही मुक्तपणे जगावंसं वाटत असेल- इतकी साधी गोष्ट सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही का गं?"

त्यानंतर बराच वेळ राघू बाहेर दिसणाऱ्या निरभ्र आकाशाकडे अगदी एकटक बघत होता. पण डोळ्यांत तरळणाऱ्या अश्रुंमुळे आता तेही अंधुक दिसायला लागलं होतं. त्याच्या आवडता झोपाळा , समोरच्या वाटीतल्या पेरूच्या फोडी- यातलं काहीच आता त्याचं मन रमवू शकणार नव्हतं.

राघू आणि त्याची आई- दोघेही आपापल्या विचारांत इतके मग्न झाले होते की ताई दार उघडून घरात कधी आल्या तेसुद्धा त्यांना समजलं नाही. आत आल्याआल्या ताई सरळ राघूच्या पिंजऱ्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. खूप खुशीत होत्या त्या आज. पिंजऱ्यातल्या वाटीत एक लाडू ठेवत त्या म्हणाल्या," हा लाडू मुद्दाम आणलाय मी तुमच्यासाठी. आज स्वातंत्र्यदिन समारंभात सगळ्यांना लाडू मिळाले होते." पण राघू आणि त्याच्या आईकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे ताईंना थोडंसं आश्चर्य वाटलं. मग राघूच्या पंखांवरून हात फिरवत त्या म्हणाल्या," राघू, आता आपली शिकवणी पुन्हा सुरू करू या. तुला रोज तूप पोळी हवी आहे ना? मग म्हण बघू- स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा."

पण राघू काहीच बोलत नव्हता.थोड्या वेळापूर्वी अगदी सफाईदारपणे 'स्वातंत्र्य' हा शब्द उच्चारणारा राघू आता अगदी शांत बसला होता. स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळलेल्या त्या निरागस जीवाला आता त्या तूप पोळीचा आणि गुलाबी पेरूचा अजिबात मोह वाटत नव्हता.

आता त्याला फक्त एकाच गोष्टीची आस लागली होती- पिंजऱ्याच्या गजांमधून दिसणाऱ्या त्या समोरच्या आकाशात उंच आणि मुक्त भरारी घ्यायची आस! आणि डोळ्यांसमोर फक्त एकच स्वप्न तरळत होतं- त्याच्या आणि आईच्या स्वातंत्र्याचा मंगलदिवस साजरा करण्याचं अनमोल स्वप्न!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप हृदयस्पर्शी.

मी एक पोपट पाळलेला. आधी उत्साहाने आणलेला पण नंतर त्याला असे डांबुन ठेवणे बरोबर वाटले नाही. तो चार पाच वर्षे होता आमच्याकडे. त्याचा दरवाजा उघडाच ठेवायचो, जावेसे वाटले तर जाऊ दे म्हणुन. एके दिवशी गेला उडुन. परत या भानगडीत पडले नाही.

कॅलिफोर्निया असताना आम्ही खूप रानचिमण्या/मुनिया आणल्या होत्या - सोडायलाच आणलेल्या होत्या Happy आणि मग सोडल्यावर त्या उडताना चिवचिवाट करुन गेल्या Happy
फार गोड गोष्ट आहे.