या पूर्वीचे लेख :
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग १ :
https://www.maayboli.com/node/86819
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग २ :
https://www.maayboli.com/node/86841
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ३ :
https://www.maayboli.com/node/86863
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ४ :
https://www.maayboli.com/node/86883
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ५ :
https://www.maayboli.com/node/86909
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ६ :
https://www.maayboli.com/node/86938
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ७ :
https://www.maayboli.com/node/86979
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ८ :
https://www.maayboli.com/node/86987
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ९ :
https://www.maayboli.com/node/87011
अल्मोडा ते मुंबई - काठगोदाम मार्गे
अल्मोडा रेस्ट हाऊस आवार फार छान आहे. मागे एक छोटीशी टेकडी आहे. तिथे आजूबाजूचे लोक फिरायला जाताना दिसले. आम्हीही जाऊन आलो. प्रसंन्न सकाळ आणि निवांतपणा होता. सकाळी सकाळी नंदादेवी मंदिरात जायचे बर्याच लोकांचे ठरले व ते गेले सुद्धा. आम्हाला जरा उशीराने कळाले. आम्ही मग अर्ध्या रस्त्यात जाऊन अंदाज घेऊन वेळेअभावी परत फिरलो. दरम्यान सकाळी थोडे फोटो काढले.
अलमोडा रेस्ट हाऊस :
अलमोडा रेस्ट हाऊस : समोर बाग छान मेनटेन केली होती :
सकाळी चालताना रस्त्यात एका इमारतीवर अशी भित्तीचित्रे रेखाटलेली दिसली :
भित्तीचित्रे :
आणि हे नवीन पद्धतीप्रमाणे : आय लव्ह अल्मोडा :
काल बस मधे इथली कुमाऊ गाणी लावली होती. यात्रींना ही गाणी आवडताहेत म्हटल्यावर इथल्या व्यवस्थापक बाईंनी आमच्या बरोबर निघताना ताल धरला. त्या जश्या स्टेप्स करत होत्या तश्या त्यांना पाहून आम्ही करत होतो. निघताना तिकडच्या पद्धतीप्रमाणे अगदी नाकावर येणारा टिका लावणे आणि सगळ्यांचे औक्षण झाले. सवयीने "हरहर महादेव"चा जयजयकार करत आमच्या बसेस कांची धामला निघाल्या.
कांचीधाम : हा बाहेरूनच फोटो मिळाला. आत परवानगी नाही
कांची धामला गर्दी होतीच. आपण बाहेरच चपला काढून एका मार्गाने आत शिरतो. उजव्या बाजुला देवी, महादेव, हनुमान, कृष्ण अशी बाहेरूनच दर्शन घेऊन शेवटी एका मंदिराच्या बाहेर येतो. इथे नीम करोली बाबांचे आसन आणि एक फोटो ठेवलेला आहे. ही सगळी खरंतर मोठी मंदिरे आहेत. पण आपण आतही जात नाही. बाहेरूनच दर्शन घेत चालायचे आणि बाहेर पडायचे. त्यामुळे मला दर्शन घेतल्या सारखे वाटलेच नाही. गणपतीत मांडवात जसे लाईनीत जातो देखावा बघतो आणि तसेच लाईनीतून बाहेर पडतो तसेच वाटले. बरीच लोकं श्रद्धेने इथे येतात पण ती श्रद्धा नेमकी कशी जागृत होते असे वाटले कारण कुठेही मिनिटभर सुद्धा थांबता येत नव्हते. लोक तर अखंड येतच होते. कदाचित, त्यामुळे त्यांचाही नाईलाज होत असावा. इथले वातावरण अनुभवायला रहायची काही सोय आहे का ते बघावे लागेल.
बाहेर मात्र दुकानात बाबांच्या भरपूर गोष्टी विकायला दिसत होत्या. आज म्हणे ही गर्दी कमी होती म्हणून थांबावे लागले नाही. ते एक बरे झाले. नाहीतर तासंतास थांबून हे असले दर्शन घ्यावे लागले असते तर घोर निराशा झाली असती. गर्दीत आमचा ग्रुप पुढे मागे झाला. गाड्या जरा लांब थांबल्या होत्या. एक खूण सांगून गाईडने सगळ्यांना तिथे थांबायला सांगितले. सगळे जमल्यावर आज भीमतालला जेवण होते तिकडे निघालो. सकाळी दर्शन वेळेत झाल्याने हाताशी पुरेसा वेळ होता. भीमतालला लोकांनी परत थोडे फोटो सेशन केले. इथे प्रत्येक लोकेशनचे फोटो विकायला होते. म्हणजे ओम पर्वत, आदिकैलास, गौरीकुंड असे प्रोफेशनल कॅमेराने काढलेले ६ फोटो. एकेक किंवा ६ फोटोंचा संचही तुम्ही घेऊ शकता. काहींनी टीशर्ट होते ते घेतले. आवर्जून त्यांना सांगितले की टी शर्ट आधी दाखवले तर यात्री ते घालून एकत्र ओम पर्वत किंवा आदि कैलासला ग्रुप फोटो काढू शकले असते. मी यापैकी काहीही न घेता निवांत भीमताल बघत बसले.
जेवणे होईपर्यंत २ वाजले होते. आमचे दिल्लीची गाडी ३.१५ची होती. दक्षिणी बंधूनी त्यांची व्यवस्था केली होती. अजून दोन एक दिवस ते उत्तराखंडात असणार होते. जेवणे झाल्यावर भीमतालहून त्यांची गाडी त्यांना घेऊन गेली. बाकी आम्ही काठगोदामला पोहोचलो. सगळ्यांचा निरोप घेतला. गाडी फलाटावर उभी होती. दरवाजा उघडल्यावर आत मधे बसलो. दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु झाला होता. वादळीवाऱ्यामुळे एक मार्ग बंद पडला होता. रस्त्यामधे थांबत थांबत ११च्या सुमारास आम्ही दिल्लीला पोहोचलो. गुजराथी मैत्रिणींचे पहाटे परतीचे विमान होते. आमची पुढची गाडी पहाटे ४ची होती. वेटिंग रुम मधेच थोडा आराम करून पहाटेची गाडी पकडली आणि गाढ झोपी गेलो. सकाळी कधीतरी जाग आली. आता खालचा बर्थ असल्याने खिडकीतून बाहेरचे दिसत होते. पण सततच्या प्रवासाने दमलो होतोच. हा सगळा प्रवास झोपू झोपू केला. मधे माझे पुस्तक वाचून संपवले. सकाळी जेंव्हा घरी पोहोचलो तेंव्हा "संपला बाई प्रवास!" म्हणून हुश्य केले. अर्थात यात्रा सुखरूप झाल्याचा आनंद हा थकव्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होता.
समारोप:
शेवट आहे म्हणून समारोप म्हणावे की मनोगत ते तुम्हीच ठरवा.
आदिकैलास यात्रेची माहिती, कैलास मानसरोवर यात्रेची माहिती करून घेताना अनपेक्षितपणे झाली. माझ्या बकेटलिस्टमधील जागा. सहज म्हणून धुंडाळताना अनमोल असे काही गवसावे अशीच अविस्मरणीय, सुखद यात्रा. या यात्रेने अतीव समाधान तर दिलेच पण स्वत:बद्दलची सजगता दिली. हिमालयात जाताना फिटनेस का महत्वाचा असतो त्याची जाणीव दिली. उगाच ऊठले आणि हा मी चाललो हिमालयात असे करणे योग्य नाही, (आम्ही जरी असेच केले असले तरी) हा धडा दिला.
मी आधी जसे म्हणाले तसे खरोखर प्रत्येक श्वासातले अंतर आणि प्रत्येक श्वासाची किंमत इथे कळते. आपण एरवी किती सहज आरामदायी जीवन जगत असतो ते इथे आल्यावर जाणावते. आपण निसर्गापुढे किती क्षुद्र आहोत व जीवन कसे क्षणभंगूर आहे हे पदोपदी हिमालय दाखवून देतो. कितीही उंचा जा, अजून अजून उंच पर्वतरांगा दिसत रहातात. जणू आव्हान देतात, पाहू किती उंची गाठू शकताय ते. रांगोळी भरताना जसे विविध रंगी छोटे छोटे डोंगर काढतो तशी ही निसर्गाची रांगोळी. वलीयकरणातून हिमालयाची निर्मिती झाल्याने ते वळ्यारुपी पर्वत अगदी वेडेवाकडे एकमेकांपुढे वसलेले आपल्याला दिसतात. मधे जणू जागा सोडायचीच नाही असे ठरवून अहमिकेने उंच उंच होत जाणारे निसर्गाचे रौद्र रुप. शिवाला शोभेलसे. म्हटले तर रौद्र म्हटले तर शीतल.
या अश्या पर्यटनाने एकूणच सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागतो असे मला वाटते. नुसते रोज धावण्यापेक्षा कुठेतरी थांबणेही गरजेचे असते. आपल्याकडे वानप्रस्थाश्रम याचसाठी तर असतो नाही का. मलाही वयानुसार थोडे आवरते घ्यायला सुरुवात करायला हवी, याची आत कुठेतरी जाणीव झाली आहे. मनाची शांती हाच निरामय आयुष्याचा पाया म्हणतात. त्यासाठी एकदा तरी हिमालयात जायला हवे.
आदिकैलासबद्दल माहिती मा. मोदींच्या भेटीनंतर जास्त प्रमाणात आंतरजालावर उपलब्ध झाल्याचे दिसते. अजूनही खूप जणांना याबाबत माहिती नाही. परंतू उत्सुकता अनेकांनी व्यक्त केली होती. सगळ्यांशी एवढे फोन वर बोलण्या पेक्षा लिहूनच काढू असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.
मला प्रोत्साहित करणाऱ्या लेखकांची मी आभारी आहे. त्यांचे लेखन वाचूनच, आधी कैलास मानसरोवर आणि मग आदि कैलासला जायची इच्छा निर्माण झाली. मायबोलीवरील शब्दमहर्षीं साठी आधीच मनात आदरभाव होता. इथे लिखाण करताना, फोटो अपलोड करताना तो दुणावला. सगळे सांभाळून इथे नियमित लिहिणे खचितच सोपे नाही.
मी आजिबात चांगली छायाचित्रकार नाही. फोटो काढायचे विसरतेच मी. याऊलट शंतनूने जागोजागी फोटो काढून, व्हिडिओज बनवून आठवणी कायम केल्या आहेत. आम्ही कॅमेरा घरी विसरलो तरी मोबाईलमधून सुंदर फोटो काढणे हे त्याचे कौशल्य. त्याने ते सगळे फोटो मला या लेखमालेसाठी दिले म्हणून त्याचेही आभार. मला लिहायला वेळ लागत असूनही शांतपणे तुम्ही सगळ्यांनी वाट पाहिली वेळोवेळी कधी सोशल मिडियावर तर कधी वैयक्तीक कळवून, प्रतिक्रिया देऊन माझा उत्साह वाढवलात. या लेखमालेने काही नवीन ओळखी झाल्या तर काही खूप जुनी माणसे परत संपर्कात आली. ही सगळी या आदिकैलासाची किमया.
हिमालय जादूगार आहे. नर्मदेप्रमाणेच हिमालयही परत परत तुन्हाला बोलावत रहातो. नाभीपर्यंत आम्ही ज्या मार्गाने गेलो त्या मार्गाने पूर्वी पासून ऋषीमुनी, राजे, महाराजे कैलास मानस सरोवर दर्शनाला गेले आहेत. कैलासला जाऊन त्यांनी मोक्ष मिळवला म्हणून ही मोक्षाची वाट मानली जाते. त्यामुळेच सिक्कीम कडून नथूलापास द्वारे मार्ग होऊनही या पूर्वजांच्या वाटेवरून चालणे लोक पसंत करतात. अश्या मोक्षाच्या वाटेवर, अर्ध्यापर्यंत, गाडीने का होईना आम्ही जाऊन आलोत. पुढचे बोलावणे श्रीशंकर कधी पाठवतात, त्याची वाट पहाते आहे.
ओम नम: शिवाय ||
सुंदर झालं प्रवासवर्णन!
सुंदर झालं प्रवासवर्णन! समारोप खासच आवडला. हिमालय परत परत बोलावतो हे अगदी खरं.
छान प्रवासवर्णन. हे वाचून आदि
छान प्रवासवर्णन. हे वाचून आदि कैलासला जायची इच्छा होते आहे.
छान झाली लेखमाला. शेवटचे
छान झाली लेखमाला. शेवटचे मनोगतही आवडले.
धन्यवाद वावे, माझेमन आणि जयु!
धन्यवाद वावे, माझेमन आणि जयु!
छान प्रवासवर्णन. हे वाचून आदि कैलासला जायची इच्छा होते आहे. >> पुढचे गटगच ठरवूयात
पूर्ण सिरीज वाचली. हिमालयाचा
पूर्ण सिरीज वाचली. हिमालयाचा विरह मनात साचलाहे.
तुमचे सुंदर-विस्तृत प्रवासलेखन वाचून आदि कैलास जमण्याजोगे दिसते आहे, पुढे नगाधिराजाची इच्छा !
पूर्ण भाग एक पाठोपाठ वाचून
पूर्ण भाग एक पाठोपाठ वाचून काढले. छान लिहिले आहे. मनोगत ही आवडले.
सुंदर लिहिले आहे
सुंदर लिहिले आहे
फोटो तर नेत्रसुखद आहेतच
जय शंभू शंकर
सगळे भाग वाचले. सुंदर ओघवते
सगळे भाग वाचले. सुंदर ओघवते लिहील आहे. वाचून एकदा जाऊन येऊया अशी इच्छा मनात आली आहे. बघू आता श्रीशंभू कधी बोलावतात ते !
सध्या काही प्रापंचिक गडबडीत
सध्या काही प्रापंचिक गडबडीत आहे. त्यामुळे काही भागांवर प्रतिक्रिया दिल्या गेल्या नाहीत.
खूप छान अनुभव आणि त्यापेक्षाही उत्तम लेखन. असेच निरनिराळे अनुभव घ्या आणि लिहीत रहा.
सविस्तर प्रतिक्रिया नंतर.
अनिंद्य, अश्विनी११,
अनिंद्य, अश्विनी११, झकासराव, जाई आणि अनया - प्रतिसांदांसाठी खूप खूप धन्यवाद !
त्यामुळे काही भागांवर प्रतिक्रिया दिल्या गेल्या नाहीत. >> हो ना! तुमची नेहमीची पहिली प्रतिक्रीया मिस केली मी
समजू शकते पण. काळजी घ्या.
तुमचे सुंदर-विस्तृत प्रवासलेखन वाचून आदि कैलास जमण्याजोगे दिसते आहे, पुढे नगाधिराजाची इच्छा ! >> अनिंद्य, तुम्हाला लवकरच बोलावणे येवो!
बघू आता श्रीशंभू कधी बोलावतात ते ! >> तुम्हालाही बोलावणे यावे लवकरच, ही प्रार्थना जाई
आता लिखाण पूर्ण झाल्यावर एक
आता लिखाण पूर्ण झाल्यावर एक शंका आहे. गौरीकुंडला आपण जवळपास १६००० फूट उंची गाठतो तिथे विरळ हवेचा त्रास होतो. कैलास मानससरोवरलाही असाच त्रास होतो का ? म्हणजे इथे त्रास झाला तर अगदी मानससरोवरलापण होईल का ?
वा ! छान झाली लेखमाला.
वा ! छान झाली लेखमाला.
कैलास - मानस यात्रेत विरळ
कैलास - मानस यात्रेत विरळ हवेचा त्रास होतो. अगदी उच्च फिटनेस असलेल्या व्यक्ती सोडल्या, तर इतर जनतेला निरनिराळ्या प्रकारे त्रास होतो. भूक न लागणे, उलट्या होणे, श्वास कोंडणे इथपासून अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. गुंजी ते गुंजी असे बरेच दिवस विरळ हवेत राहायचं असतं.
गुंजी - नाबिढांग- लिपूलेख हा भारतातील भाग. मग तिबेट मुक्काम, कैलास परिक्रमा, मानससरोवराकाठी मुक्काम आणि पुन्हा परतीचा प्रवास इतके दिवस. कैलास परिक्रमेतील सगळ्यात उंचावरचा भाग म्हणजे डोल्न्मा पास. त्याची उंची एव्हरेस्ट बेस कँपपेक्षा ही जास्त आहे.
धन्यवाद अनया! आम्हाला नाभीला
धन्यवाद अनया! आम्हाला नाभीला सांगत होते की इथून फक्त ५० किमी वर मानस सरोवर आहे. पण मला जोलिकाँगला जरा त्रास झाला त्यावरुन अंदाज घेण्याचा प्रयत्न करतेय. पुढे जायचा प्लॅन करावा की नाही असेही एकदा वाटून गेले.
कुमारजी धन्यवाद!
फिटनेससाठी प्रयत्न चालू ठेवा.
फिटनेससाठी प्रयत्न चालू ठेवा. जमेल नक्की. जरूर जाऊन या. फार विलक्षण अनुभव आहे.
खुप सुंदर लेखमाला. तिकडे
खुप सुंदर लेखमाला. तिकडे जावे ही खुप इच्छा असल्यामुळे या विषयावरचेसगळे लेख मुद्दाम वाचते. हे सगळे लेखही परत परत वाचले आणि आवडले. फोटो बघितले की रमणीय उत्तराखंड आठवत राहते. ह्या मालिकेतले सगळे फोटो आवडले.
वर बिरळ हवेबद्दल विचारणा झालीय - मानससरोवर खुप उंचीवर आहे, बीपीचा त्रास असलेल्यांनी अजिबात जाऊ नये. तिथे गेल्यावर होणारे मृत्युही खुप आहेत पण बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. जे भारत सरकारतर्फे जातात त्यांची दोन वेळा कडक फिट्नेस टेस्ट होते त्यामुळे फिट नसलेले लोक आपोआप वगळले जातात. एका मित्राच्या ऑफिसातले एक गृहस्थ भारत सरकारतर्फे गेले होते ते तिथे गेल्यावर मृत्यु पावले.
माझी नणंद नेपाळमार्गे गेली होती. तिच्या ऑफिसातले एकजण तिथे गेल्यावर मृत्यु पावले. तिच्या ऑफिसने तिकडे जाण्यासाठी रजा मिळणार नाही असे सांगितले तरी ती गेली. मानस सरोवराला पोचायच्या आदल्या दिवशी तिचा ऑक्सिजन खुप
कमी झाला, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तिने तिथुन मला फोन केला, फोनवर बोलवत नव्हते इतका त्रास होत होता. तिथेही तिने मृत्यु पाहिले ज्यामुळे आत्मविश्वास डळमळीत झालेला. मी तिला तात्काळ मागे फिरायला सांगितले. जीव वाचला तर परत जाता येईल. सुदैवाने तिने सल्ला ऐकला आणि ती पुढे गेली नाही.
त्यामुळे फिटनेस नसेल आणि बिपी वगैरे असेल तर जाऊ नये असे मला वाटते.
गेली काही वर्षे उत्तराखंडात नैसर्गिक आपत्ती कोसळताहेत ज्यांचे मुळ तिथे रस्ते काढण्यासाठी केली जात असलेली झाडांची कत्तल व सुरुंगांचा वापर हे आहे असे अनेक तज्ञांचे मत आहे. येणार्या पर्यटकांच्या लोंढ्यांसाठी हॉटेले बांधली जाताहेत.
गेल्या आठवड्यात आलेला पुर ढगफुटीमुळे नव्हता तर वरचा एक ग्लेशियर अचानक फुटला व त्याखालचे पाणी लोंढ्यासारखे धावत सुटले. नदीचे पात्र काही ठिकाणी वळवुन त्यात हॉटेले उभी केली होती. ग्लेशियरच्या पाण्याचा सुटलेला लोंढा मुळ पात्राप्रमाणे वाहात गेला आणि सोबत ती सगळी हॉटेले घेऊन गेला.
पर्यावरणाला न पेलवणारा पर्यटकांचा ओघ कमी करणे सरकारला शक्य नाही, सरकारची तशी इच्छा नाही. पर्यटकांनी स्वत: जायचे बंद केले तर हे होईल. त्यामुळे एक पर्यटक म्हणुन मी उत्तराखंडात जायचे नाही असे सध्या ठरवले आहे. इच्छा खुप आहेत पण एकतर माझा जीव मला प्यारा आहे आणि दुसरे म्हणजे पर्यटकांची गर्दीचा भाग बनायचे नाही.
धन्यवाद अनया!
धन्यवाद अनया!
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद साधना!
उत्तराखंडातून, जुन, जुलैमधे दरवर्षीच अश्या बातम्या येऊ लागल्या आहेत हल्ली, म्हणूनच मला मे मधेच जायचे होते.
जीवावर बेतेल असे काही करण्यात मतलब नाहीच. अगदीच पटले. पण फिटनेस सुधारून जेवढे जाता येईल तेवढे जायची इच्छा मात्र जरूर आहे.
निसर्गाचा ऱ्हास तर सातत्याने होत आहे आणि लोकं वेड्यासारखी फिरतायत. ते कुठेतरी थांबायला पाहिजे पण कसे? मागच्या महिन्यात अंधारबनात बाकीचे ट्रेकस् बंद झाल्याने जवळपास ३ते ४ हजार लोक ट्रेकला होते. माणसांचेच बन झाले.. सगळीकडेच ही परिस्थिती होतेय. त्यामुळे ज्यांना खरच आवड आहे त्यांची गैरसोय होतेय. कठीण आहे सगळे
निकु, छान झाली लेखमाला मनोगत
निकु, छान झाली लेखमाला मनोगत तर फारच आवडले शब्द न शब्दाशी सहमत! आम्ही खलिया टॅापपर्यंत ह्याच मार्गाने २०१९ मध्ये गेलो होतो त्या आठवणी ताज्या झाल्या. कैंची धामबद्दल वाचून आश्चर्य वाटलं. नीम करोली बाबांच्या खोलीत बसून आम्ही ध्यान केलं होतं. सहा केवढी गर्दी वाढली… हिमालय साद घालत्च असतो …. मी सांगते ना आम्ही काठगोदामच्या गेस्ट हाऊसमध्ये असताना एक बॅच परतली होती. त्यात काही मराठी मुली होत्या त्यांच्याकडून वर्णन ऐकल्यावर एकदा तरी ही यात्रा करावी असं वाटलं….. अन् दुसऱया दिवशी एक बॅच निघाली होती त्यांना टीका लावणं औक्षवण करताना बघून तर असं वाटलं त्यांच्या गाडीत जाऊन बसावं… पण साधना म्हणते तसं आता ह्या गर्दीचा भाग व्हायचं नाहीये…
चांगली आहे परिक्रमा.
चांगली आहे परिक्रमा.
(पण जाणार नाही.)
मंजूताई, एसआरडी धन्यवाद! मी
मंजूताई, एसआरडी धन्यवाद! मी म्हणेन की उलट आत्ताच १/२ वर्षे बरी आहेत. नुकते लोकांना माहित पडतेय त्यामुळे अजून गर्दीचा महापूर नाहीये अजून. त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने होमस्टे बनतायत त्यानी नक्कीच गर्दी आवाक्याबाहेर वाढेल.
लोकांना हे लिखाण आवडतेय हे वाचून छान वाटतेय
म्हणजे मे मध्ये जावे लागेल.
म्हणजे मे मध्ये जावे लागेल.
हो साधना, मे मला तरी आयडीअल
हो साधना, मे मला तरी आयडीअल पिरेड वाटतो नाहीतर सप्टे/ऑक्टो मधे. मुंबईच्या उन्हाच्या काहीलीतून उत्तराखंडात गेल्यावर कसं गार गार वाटते.
दोन महिन्यांपूर्वी Himachali
दोन महिन्यांपूर्वी Himachali Traveller channel ने ही यात्रा दाखवली ती पाहिली होती. एकूण उत्तराखंडची कल्पना आली. तसेच कॅरावॅन किंवा कँपर वॅन काय हेसुद्धा समजले. ठिकाणे धार्मिक झाली की गर्दी होतेच पण सुखसोयी अथवा सोयी म्हणू वाढतात.
धार्मिक कारण न ठेवता निसर्ग पाहाणे हे एक माझे आवडते कारण आहे. पण तिथे न जाताही निसर्ग दाखवणारे काही यूट्यूबर आहेत. Wildlifewithmanishkadam channel ने तुंगनाथ, चोपता वगैरे ठिकाणचे पक्षी दाखवले.
तुम्ही लेखनातून तिकडची गंमत सांगितली. आभार.
काही प्रवाशांना थंडी सहन होत नाही आणि जीवावर बेतते. याचे कारण सहलीच्या धावपळीच्या आराखड्यात शरीराला हवामानाची सवय होण्यास अवधीच मिळत नाही. हेच लोक दरवर्षी थोडी सहल करून परत आले तर त्यांना मोठी सहल झेपेल. पैसे जास्ती जातील पण आनंदाची सहल होईल. मी दिल्लीला असतो तर बऱ्याच फेऱ्या मारून गंमत अनुभवली असती. आणि मुख्य म्हणजे एकटाच गेलो असतो स्थानिक बस/ शेअरिंग टॅक्सीने सवडीने आणि सावकाश.
मी दिल्लीला असतो तर बऱ्याच
मी दिल्लीला असतो तर बऱ्याच फेऱ्या मारून गंमत अनुभवली असती. आणि मुख्य म्हणजे एकटाच गेलो असतो स्थानिक बस/ शेअरिंग टॅक्सीने सवडीने आणि सावकाश. >> काय मनातले बोललात