कशाला काय म्हणायचं?

Submitted by वामन राव on 15 July, 2025 - 10:15

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात, महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे मराठी बोलली जाते त्या त्या प्रांतात एकाच वस्तूला वेगवेगळी नावे, वेगवेगळे शब्दप्रयोग असतात. भिन्न प्रांतातील लोक अशा एकाच वस्तूबद्धल किंवा एकाच वस्तूच्या काही उपप्रकारांबद्दल बोलत असतील तर अनेकदा गोंधळ उडतो. फळे-फुले-भाज्या यांबद्दल तर हा प्रकार अनेकदा घडलेला आढळून येतो. कित्येक जणींच्या माहेरी एक आणि सासरी दुसराच शब्दप्रयोग असतो. संयुक्त कुटुंबात अशा स्त्रियांची अनेकदा धांदल उडते.‌

उदाहरणार्थ, इंग्लिश मधील bottle gourd किंवा हिंदीमधील लौकी या भाजीला मराठीत दुधी, दुधी भोपळा, कद्दू अशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. सर्वपरिचित टोमॅटोला ईशान्य विदर्भात भेदरे म्हणतात!

फळे, फुले, भाज्या यांची नावे आणि सामान्यतः आढळून येणाऱ्या इतर वस्तूंची नावे यांना आपापल्या भागात काय म्हणतात याची चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.

एखाद्या वस्तूला आपल्या भागात काय म्हणतात, त्या वस्तूचे संक्षिप्त वर्णन आणि शक्य असल्यास फोटो, माहित असल्यास इतर भागात काय म्हणतात, असे प्रतिसाद द्यावेत.

- वामन राव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा.
मराठीच्याच अनेक बोली शिकून होतील.

मस्त धागा.

  • कडव्या वालांची उसळ/ डाळिंबी
  • उपमा/ उपीट/ सांजा
  • वरणफळे /बट्ट्या

>>> मस्त धागा.
मराठीच्याच अनेक बोली शिकून होतील.

हं. पाककृतीत सर्वात शेवटी घातली जाणारी, सुगरणी-बल्लवाचार्य यांची आवडती, हिरवी, कोवळी, लुसलुशीत अशी कोथिंबीर, तिच्यापासून सुरुवात करूया.

मला वाटायचं, कोथिंबीर म्हटलं की सर्वांनाच समजेल पण विदर्भाच्या काही भागात कोथिंबिरीला सांबार किंवा सांभार म्हणतात. निझामी राजवटीतील फारसी-उर्दू प्रभावाने मराठवाड्यात काही जण कोतमीर म्हणतात आणि तिचा अपभ्रंश होऊन विशेषतः ग्रामीण भागात कोतरीम असेही म्हणतात!

कोकणात-उत्तर महाराष्ट्रात काही वेगळी नावे आहेत का?

कोथिंबीर

>>> उपमा/ उपीट/ सांजा

आमच्याकडे रव्याचा तिखटमिठाचा प्रकार म्हणजे उपमा त्यालाच काही मोजके जन उपीट असेही म्हणतात. सांजा मात्र गोडाचा असतो पण शिऱ्यापेक्षा वेगळा असतो.

वरणफळे /बट्ट्या
/ डाळ ढोकळी
गुजरात वेशीला असलेल्या भागात त्यालाच डाळ ढोकळी म्हणतात.

पोळी/ चपाती
पोळी/ पुरणपोळी

वरणफळे

= चकोल्या सुद्धा म्हणतात.

हैदराबादेस याला फार मजेदार संबोधन आहे

“दाल का दुल्हा“ 😀

डाळिंबी नाही, आम्ही डाळिंब्यांची उसळ म्हणतो.
पुण्यात ज्याला (तिखटाचा) सांजा म्हणतात, त्याला आम्ही चक्क तिखटामिठाचा शिरा म्हणायचो. आता मीही सांजाच म्हणते.
तुपाच्या फोडणीचा, हळद न घातलेला असतो तो उपमा.
सांजा हा गोडाचा. तो घालून सांज्याच्या पोळ्या करतात.
दोडक्यांना घोसाळी.

उपयुक्त धागा. Happy

अळशी = जवस (हे मायबोलीच्या सगळ्या पाककृतींसंबंधित धाग्यांवर एकेकदा तरी यावंच लागतं. ती परंपरा कायम राहावी म्हणून इथेही! Proud )

>>> दाल का दुल्हा
Lol

उप्पू म्हणजे मीठ, मावे/ मावू म्हणजे मैदा/ आटा. त्यावरुन सौदिंडियन लोकांनी उपमा केला. रणवीर ब्रारच्या उपमा रेसिपी च्या सौजन्याने.
नमकीन आटा म्हणजे उपमा.

विदर्भात झोपाळ्याला पाळणा म्हणतात.
मला हे खरंच माहिती नव्हतं. एका पुस्तकात एक तरूण मुलगा रात्री दारू पिऊन येतो आणि तर्र असल्याने रात्रभर पाळण्यावर झोपतो, असं वाचून धक्का बसला होता. एवढा मोठा मुलगा पाळण्यात मावेल कसा? असा प्रश्न पडला होता. मला लहान बाळाला झोपवतात, तो पाळणा माहिती होता!
बऱ्याच वर्षांनी हा उलगडा झाला.

>>> "दाल का दुल्हा"

थोडं गुगलिंग केल्यावर दिसलं, बिहारात दाल की दुल्हन म्हणतात!

दाल की दुल्हन पूर्वांचल + बिहार भागात करतात.

रेसिपी थोडी(शीच) वेगळी आहे, म्हणजे घटक आणि शेप चा फरक असतो.

>>> विदर्भात झोपाळ्याला पाळणा म्हणतात.

आमच्याकडे मराठवाड्यात बंगई म्हणतात!

  • झोका == नागपंचमीला स्त्रिया, मुली खेळतात, जो झाडाला उंच बांधतात तो
  • पाळणा == विशेषतः लहान मुलांना झोपवण्यासाठी खास तयार केलेला असतो तो
  • बंगई == वाड्यात किलचनाला टांगलेली, चांगलीच मोठी असते ती

अवांतर: ८० च्या दशकात सरकारी आग्रहाने पाळणा लांबवायचे ते आठवले! Lol

>>> साबुदाण्याच्या खिचडीला नागपूर विदर्भात उसळ म्हणतात असे ओळखीच्यांकडून समजले

हो! आमच्याकडेही (मराठवाड्यात) उसळ म्हणजे भिजवलेल्या साबुदाण्याचा उपमा!.

करंजी = कानवला / कान्हवला = गुजीया

जेंव्हा गुजीया शब्द माझ्यासाठी नवीन होता तेंव्हा एका कलिगने सांगितले, "होली पे खाने मे गुजीया बनायी थी". मला ते गुजचे अनेक वचन वाटले. मनात म्हटलं भांग जास्त झाल्याने जेवणात खाण्याऐवजी नुसत्या गप्पाच मारल्या असतील.

>>> उसळ नाही उस असेल.

हो, ते विदर्भात फारच असते. विशेषतः शब्दातील शेवटचे अक्षर असेल तर ते त्याचा उच्चार असाच करतात!

पिंपरी-चिंचवड-रावेत भागांत आमचे बरेच नातेवाईक राहतात. त्यांच्याकडे नेहमीच जाणे होते. मागच्या वर्षी एकदा एक घरगुती कार्यक्रम होता. तिथे जेवताना आमचे एक मराठवाड्यातील नातेवाईक ठेचा (ग्रामीण मराठवाडी बोलीत ठेसा) वाढा म्हणाले तर तो केटरिंग वाला म्हणाला तो खर्डा आहे. वरण वाढा म्हणाले तर तो म्हणाला ती आमटी आहे! जेवण रुचकर झाले होते पण आधी ते जेवायचे की आधी केटरिंगवाल्यांची पारिभाषिक शब्दसूची पाठ करून ठेवायची असा त्या नातेवाईकाला प्रश्न पडला असेल!

>>>>>>>पण आधी ते जेवायचे की आधी केटरिंगवाल्यांची पारिभाषिक शब्दसूची पाठ करून ठेवायची असा त्या नातेवाईकाला प्रश्न पडला असेल!
हाहाहा

गवार - बावच्या किंवा बावची म्हणतात कोकणात काही ठिकाणी, माझ्या सासुबाई म्हणायच्या.

घोसाळयाला बाबा पारोसे म्हणायचे, कोकणात काही ठिकाणी म्हणतात. आई गिलके म्हणायची, मी घोसाळे म्हणते आणि शिरा असलेले शिराळे.

जेवण रुचकर झाले होते पण आधी ते जेवायचे की आधी केटरिंगवाल्यांची पारिभाषिक शब्दसूची पाठ करून ठेवायची असा त्या नातेवाईकाला प्रश्न पडला असेल! >>> Happy Happy

मस्त धागा आहे.

एवढा मोठा मुलगा पाळण्यात मावेल कसा? >>> Lol त्या सरकारी घोषणेचा विदर्भात काहीच इफेक्ट झाला नसेल. झोपाळे लांबवून काय होणार आहे!

पतंगाचा मांजा बांधलेला असतो व पतंग उडवताना हातात धरून फिरवावे लागते त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? पुण्यात आसारी म्हणायचो आम्ही. इतरांकडून "चक्री" शब्द ऐकलेला आहे.

तिचा आस हातात धरून फिरवतात लिहीणार होतो पण आस चा अर्थ कोणत्या भागात काय निघेल सांगता येत नाही Happy

मस्त धागा.
कोकणात ज्याला ‘तवस’ म्हणतात त्याला सांगलीकडे ‘वाळूक’ म्हणतात.

त्या सरकारी घोषणेचा विदर्भात काहीच इफेक्ट झाला नसेल. झोपाळे लांबवून काय होणार आहे!>> Biggrin
आस चा अर्थ कोणत्या भागात काय निघेल सांगता येत नाही >> Lol
रच्याकने : आस म्हणजे कॉर्ड ना?
तवसं ना?

>>> तिचा आस हातात धरून फिरवतात लिहीणार होतो पण आस चा अर्थ कोणत्या भागात काय निघेल सांगता येत नाही
Lol

>>> झोपाळे लांबवून काय होणार आहे!
उलट पाळणे लांबवल्यामुळे त्यात मोठी माणसंही मावू लागली असं असेल. Proud

गवारीला कोकणात 'चिटक्या' पण म्हणतात. पण रंग थोडा वेगळा असतो.

आमटी कोकणात बर्‍याच प्रकारची असते. (मिरच्या, सांडगे, आंबाडी, टोमॅटो, शेंगा, कैरी, सुकी/ओली कोलंबी..... डाळ).. पिवळसर रंगाची खोबर्‍याच्या रसात शिजवलेली ती आमटीच. फक्त डाळीची आमटी वेगळी असते.

Pages