सोबत. . . अखेरच्या क्षणांची

Submitted by कुमार१ on 29 June, 2025 - 23:06

दीर्घकालीन दुर्धर आजार अनेकांच्या वाट्याला येतात. संबंधित आजाराचे सर्व उपचार करून डॉक्टर्स थकले की शेवटी रुग्णाच्या नातेवाईकांना अंतिम सल्ला दिला जातो तो म्हणजे,
“आता मृत्यूची वाट पाहण्याखेरीज आपल्या हातात काही नाही”.
खरंय, अशा केसेसमध्ये मृत्यू हा अंतिम आणि नैसर्गिक ‘उपाय’ ठरतो.

अशा तऱ्हेने त्या रुग्णाचे आयुष्यातील अखेरचे पर्व चालू होते आणि ते किती काळ चालेल हे अनिश्चित असते. आपल्या जिवलग अथवा कुटुंबीयांच्या मृत्यूची चाहूल लागणे हा कुतुहलमिश्रित दुःखद विषय असतो. प्रत्यक्ष मृत्यू होईपर्यंत कुटुंबीय अथवा सेवक अशा कोणाला ना कोणाला तरी रुग्णाची सोबत करावी लागते. त्या दृष्टिकोनातून पाहता, मृत्यू जवळ आला असता रुग्णात कोणते शारीरिक बदल होतात आणि इतरांना त्याच्यात कोणती लक्षणे अथवा चिन्हे दिसतात यांचा आढावा या लेखात घेतोय. तो सामान्यज्ञान म्हणून सर्वांनाच उपयुक्त ठरावा. त्याचबरोबर या अंतिम घटिकांमध्ये रुग्ण-सोबत्याने रुग्णाची कशी काळजी घ्यावी आणि काय पथ्ये पाळावीत याचाही थोडक्यात उल्लेख करतो. (या लेखात फक्त नैसर्गिक मृत्यूच विचारात घेतला आहे).

आता पाहूया महत्त्वाची मृत्यूपूर्व लक्षणे :
निरिच्छता
अंथरुणाला खिळलेला रुग्ण वेळ जाण्यासाठी एरवी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत मन रमवित असतो. जसे की, पेपर वाचन, संगीत श्रवण, टीव्ही पाहणे आणि किरकोळ कौटुंबिक हितगुज. मात्र तब्येत जशी गंभीर होते तसतसा त्याचा या सर्व दैनंदिन गोष्टींमधला रस झपाट्याने कमी होतो. किंबहुना त्याची कशाचीच इच्छा नसणे आणि शांतपणे नुसते पडून राहणे हा एक महत्त्वाचा बदल इतरांनी लक्षात घेण्याजोगा. अशा प्रसंगी प्रेमभराने रुग्णाचा हात हातात घेतला असता रुग्णाला भावनिक आधार वाटू शकतो.

ढासळते अन्न-पाणीग्रहण
खाण्यापिण्याची वासना शमविणे हा तर आयुष्यभरातला सर्वोच्च आनंद असतो. परंतु मृत्यूसमीप अवस्थेत खाण्यापिण्याची वासना प्रकर्षाने कमी होते. आजारामुळे शरीरात काही रासायनिक बदल झालेले असतात व त्यामुळे शरीराची अन्नपाण्याची गरज देखील खूप कमी होते. अशा प्रसंगी, कोणीतरी आपल्याला भरवतंय ही भावना रुग्णाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची ठरते.
आता अन्न पाणी देताना शरीरपोषण वगैरे मुद्दे बाजूला ठेऊन रुग्णाचे आवडते पदार्थ झेपेल अशा पद्धतीने देणे श्रेयस्कर. बळेबळे खाऊ घालणे तर टाळलेच पाहिजे. बरेच रुग्ण घन आहार घेण्यास नाखुश असतात. अशा वेळी बर्फाचा तुकडा अथवा गोठवलेल्या फळांच्या रसाचा तुकडा चघळायला दिल्यास बरे वाटते. एखादा रुग्ण तोंडाने गिळूच शकत नसल्यास त्याला मुद्दाम भरवता कामा नये; चुकून असे केल्यास अन्नकण श्वासनलिकेत जाऊन परिस्थिती बिकट होते.

झोप
रुग्णाचा झोपेचा कालावधी प्रमाणाबाहेर वाढू लागतो आणि तो वाढतच राहतो. अत्यंत थकव्यामुळे त्याला डोळे उघडण्याचे कष्टही पेलत नाहीत. अशा परिस्थितीत तो कित्येक तास झोपून असला तरीही त्याला उठवण्याच्या फंदात पडू नये.

संभ्रमावस्था आणि चित्रविचित्र भास
टप्प्याटप्प्याने काळ, वेळ आणि ठिकाण यांचे भान राहत नाही. जवळच्या व्यक्तीही अनोळखी वाटू लागतात. चित्रविचित्र भास होणे हे देखील या अवस्थेचे एक वैशिष्ट्य. असे भास शुश्रुषा केंद्रात ठेवलेल्या वृद्धांच्या बाबतीत तर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात. रुग्णाच्या नजरेसमोर दिवंगत प्रिय व्यक्ती येऊ शकतात आणि जुन्या आठवणींचीही गर्दी होते. जेव्हा रुग्ण अशा स्वरूपाची वर्णने करू लागतो तेव्हा सोबतच्या व्यक्तीने त्यात ‘हो हो करून’ सामावून जाणे हिताचे असते; उगाच रुग्णाचा भ्रम दूर करण्यात अर्थ नसतो.

अस्वस्थता व कासाविसी
जागेपणी रुग्ण कमालीचा अस्वस्थ असतो आणि त्याच्या जीवाची अक्षरशः तगमग होते. अशा वेळेस झोप लागणे कठीणच. एकंदरीत बुद्धिभ्रंश झाल्याची ही अवस्था असते. अशा वेळेस त्याचे शांतपणे ऐकून घेऊन धीर देणे हे हितावह. गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने सौम्य गुंगी आणणारी औषधे देता येतात.

अनियंत्रित मलमूत्रविसर्जन
लघवी आणि/अथवा शौच नकळत होऊन बसणे हा या स्थितीतील एक महत्त्वाचा बदल आहे. त्याने रुग्णाचा आत्मसन्मान ढासळतो आणि त्रस्तता वाढते. त्यातून पुढे त्वचेचा दाह आणि जंतूसंसर्ग देखील होऊ शकतो. या प्रकाराची वेळच्यावेळी स्वच्छता राखणे हे परिचारकाच्या दृष्टीने महत्त्वाचे काम ठरते. कित्येक तास जर लघवी झालेली नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने मूत्रमार्गातील नळीची व्यवस्था करावी लागते. मृत्यू समीप आला असता असता लघवीचे प्रमाण खूप कमी होते आणि ती बरीच गडद रंगाची असते.

दृष्टी आणि श्रवण दुर्बलता
मृत्यूपूर्व काही तासांमध्ये या दोन्ही महत्त्वाच्या संवेदना बऱ्याच कमी होतात. किंबहुना प्रकाश आणि आवाज या दोन्ही गोष्टीची सहनशीलता बरीच घटते. या दृष्टीने रुग्णाच्या खोलीतील प्रकाश मंद असावा आणि आजूबाजूला मोठे आवाज करणे टाळावे. शरीराच्या सर्व विशेष संवेदनांमध्ये ऐकण्याची थोडीफार क्षमता जवळजवळ शेवटपर्यंत टिकून राहते.

वर उल्लेखलेली महत्त्वाची लक्षणे रुग्णाचे सोबती अथवा कुटुंबीयांना दिसून येतात आणि मृत्यूची चाहूल लागते. मात्र कधीकधी काही रुग्णांच्या बाबतीत वरील परिस्थितीत अचानक सुधारणा झाल्यासारखे वाटते परंतु ती अल्पकाळ टिकते आणि परिस्थिती पुन्हा एकदा वेगाने बिघडू लागते. तात्पुरत्या सुधारलेल्या अवस्थेत जिवलगांच्या अखेरच्या भेटीगाठी घडू शकतात.

मृत्यूपूर्व परिस्थितीत डॉक्टर किंवा नर्सने रुग्णाची तपासणी केली असता काय महत्त्वाच्या गोष्टी दिसून येतात ते आता पाहू.

शारीरिक तपासणीच्या नोंदी
१. तापमान : आयुष्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये शरीराचे तापमान 1C ने बऱ्याचदा वाढते. शरीरातील दाह, कर्करोगप्रक्रिया अथवा चयापचयातील बिघाड त्याला कारणीभूत असतो. अशा प्रसंगी मुद्दामहून औषधे देण्याची गरज नसते; कपाळावर किंचित थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या तरी पुरते.

२. त्वचेतील बदल : मृत्यूपूर्वी काही तास त्वचा लाल होऊ शकते आणि घामाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढते. मात्र मृत्यूच्या नजिक पोचताना अचानक शरीर तापमान एकदम कमी होते आणि त्वचा निळसर दिसू शकते. जसजसे रक्ताभिसरण अत्यंत मंद होते तसे संपूर्ण शरीर थंड पडू लागते. काही वेळेस चेहरा फिकट पिवळसर पडतो आणि हा पिवळेपणा तोंडाभोवती अधिक दिसून येतो.

३. श्वसनातील बदल : श्वसनाचा वेग बराच मंदावतो आणि उथळ आणि अनियमित श्वास घडू लागतात. दोन श्वासांमधील कालावधी देखील वाढतो. तर कधीकधी काही श्वास भराभर घेतले जाऊन पुढे काही क्षण श्वसन थांबल्यासारखे होऊ शकते. एकंदरीत ही अनियमितता वाढतीच राहते.

४. जागृतावस्था : अखेरच्या तासांमध्ये शरीराचा प्रवास जागृतीकडून कायमच्या बेशुद्धीकडे सुरू होतो. त्यावेळेस बऱ्याच जणांच्या बाबतीत गिळण्याची आणि घशातील द्रव खाकरून स्वच्छ करण्याची क्षमता संपुष्टात येते. घशात साठलेल्या द्रवातून जेव्हा श्वसन होते त्यातून मोठमोठे आवाज येऊ लागतात. सामान्य भाषेत याला मृत्यूची घरघर लागली असे म्हणतात. काही रुग्णांच्या बाबतीत हा अनुभव येतो. ही घरघर कुटुंबीयांसाठी अर्थातच चिंताजनक असते परंतु रुग्ण मात्र तिची जाणीव होण्याच्या पलीकडच्या अवस्थेत गेलेला असतो. अशा वेळेस त्याच्या डोक्याखाली मोठी उशी देऊन अथवा त्याला कुशीवर वळवून पहावे. घरघर फारच असह्य वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे देता येतात. घरघर लागलेल्या रुग्णांपैकी सुमारे 75% च्या बाबतीत सुमारे 48 तासात त्यांचा जीवनप्रवास संपतो.
. . .

चित्रपट व तत्सम दृश्य माध्यमांमधून दाखविला जाणारा मृत्यूपूर्व क्षण हा खरोखरच फिल्मी असतो ! त्यात आत्यंतिक प्रेमालाप, गुपितकथन किंवा प्रेमिकांचे हात मिळवून देणे इत्यादी रंजक गोष्टींची रेलचेल असते. परंतु वास्तव मात्र या कल्पनारंजनापासून फार दूर असल्याचे दिसते. खरोखरीच असे सुखाचे क्षण ज्यांच्या वाट्याला आले असतील ते भाग्यवानच. तसेच बऱ्यापैकी निरोगी व्यक्तींचे झोपेतले मृत्यूही सुखदायी.

परंतु वास्तवातील बहुतांश चित्र काय दिसते ? जराजर्जर रोगावस्थेतल्या मृत्यूचे दर्शन केविलवाणे असते. शरीरभर फोफावलेला कर्करोग, मेंदूचे ऱ्हासकारक गंभीर आजार, मोठे अपघात किंवा शरीराच्या सर्व महत्त्वाच्या अवयवांनी पत्करलेली शरणागती, अशा अनेक प्रसंगीचा मृत्यू बघणे हे अतिशय वेदनादायकच. घरी झालेला मृत्यू त्यातल्या त्यात बऱ्या वातावरणातला म्हणायचा. एखाद्यावर हीच वेळ जर रुग्णालयात दीर्घकाळ ठेवून आली तर तिथले वातावरणात अधिकच शोकाकुल व रोगट असते.

आपल्यातील अनेकांनी आपल्या कुटुंबीय अथवा जिवलगाचे असे मृत्यू जवळून पाहिले असतील आणि ते अखेरचे दृश्य देखील आपल्या स्मृतीत असेल. मृत्यू तर अटळ आहे. यास्तव प्रत्येकावर कधी ना कधी एखाद्या मृत्यूशय्येवरील व्यक्तीची सोबत करण्याचा प्रसंग येणार आणि अखेरीस एखाद्या दिवशी आपणही त्या शय्येवर कायमचे विसावणार आहोत. आयुष्यातले ते अखेरचे क्षण सर्वांनाच कमीत कमी त्रासदायक व्हावेत ही सदिच्छा व्यक्त करतो.
*************************************************************************************************************
संदर्भ :

  1. https://cancer.ca/en/living-with-cancer/advanced-cancer/signs-that-death...
  2. https://hospicefoundation.org/when-death-is-near-signs-and-symptoms/
  3. https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0885392401004213
  4. विविध वैद्यकीय पाठ्यपुस्तके
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप महत्वाचा लेख
शेवटच्या क्षणामध्ये केव्हा केव्हा कुठलीतरी अचानक खूप जुनी स्मृती आठवते असे आधीही वाचलेले आहे
शिवाय जवळचे आणि स्वर्गवासी झालेले नातेवाईक आणि मित्रमंडळी दिसतात वै ऐकलेलं आहे.

आभार !
. . .
* अचानक खूप जुनी स्मृती आठवते
>>> या रोचक मुद्द्यावर बरेच संशोधन चालू आहे.
सध्याच्या दृष्टिकोनानुसार, मृत्यूपूर्वी मेंदूत एकदम gamma लहरींचा संचार होतो आणि त्यांच्यामुळे त्या व्यक्तीला गत आयुष्यातील अत्यंत जुन्या आठवणी देखील एकदम ताज्याप्रमाणे आठवतात. यालाच वैज्ञानिकांनी ‘आयुष्याचा फ्लॅशबॅक’ असेही म्हटलेले आहे.

https://www.scientificamerican.com/article/why-dying-people-often-experi...

खूप महत्वाचा लेख!
वर दिलेली बरीचशी लक्षणं आईच्या बाबतीत घडली आहेत. तिला जाण्याआधी दोन दिवस भ्रम झाला होता. आढ्याकडे बघत खूप बडबड करायची पण बोललेलं आम्हाला काही कळत नव्हते. एक दिवस आधी बडबड खूप पण आवाज फुटत नव्हता. गेलेल्या व्यक्ती बोलत असतात असं म्हणतात…खखोदेजा …शेवट लक्षात आला तसं आम्ही सगळे तिच्याजवळ बसून होतो तिचा हात हातात घेऊन. तिने घरी मृत्यु यावा अशी इच्छा व्यक्त केली होती तिची इच्छा आम्ही पूर्ण केली..

खूपच छान लिहिले आहे.
अतिशय संवेदनशील विषयावरचे संयमी भाषेत लिहिलेले लिखाण.
खूप आवडले.

धन्यवाद लोकहो !
* तिने घरी मृत्यु यावा अशी इच्छा व्यक्त केली होती >>>> होय, जवळपास सगळ्यांनाच असे वाटते आणि ते स्वाभाविक आहे.

* हा विषय संवेदनशील आहे खरा. किंबहुना तो लेखनासाठी घेताना देखील नकोसे वाटत होते परंतु महत्त्वाचा असल्याने अखेर घेतला. गेल्या वर्षभरात चार परिचितांचे मृत्यू कर्करोगाने झालेले पाहिले तेव्हापासून मनात घोळत होता.

लेख वाचून मन भूतकाळात गेले. 27 सप्टेंबर 1989 ला वडील मृत्यूशय्येवर होते. माझे त्यावेळी लग्न व्हायचे होते.पुण्यात स्वत:चे वा भाड्याचे घर नव्हते. मी मुंबईहून बदलून पुण्यात आलो होतो व सरकारी निवासस्थानासाठी अर्ज दिला होता. पण मिळाले नव्हते तो पर्यंत मी माझ्या प्रकाश सोनवणे या मित्राच्याच रुमवर चव्हाणनगर पोलिस हेडक्वार्टर येथे रहात होतो. वडीलांनाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यावर तिथे आणले होते.कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात ते होते. काही काळाचेच ते सोबती होते. ते अर्धवट ग्लानीत बोलत होते.माझ्या मुलाचे लग्न आहे आणि मलाच मांडवात का जाउ देत नाहीत ही लोक? असे काहीसे ज्याला वातात बडबडणे असे म्हटले जाते. यावरुन त्यांच्या चक्षुपुढे काय दृष्य तरळत असावे याचा अंदाज उपस्थितांना येत होता. नैनं छिंदंति शस्त्राणि नैनं दहति पावक: । असे स्वत:शी म्हणत असतानाच त्यांना शेवटची घर घर लागली व त्यांनी प्राण सोडला.
नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे’ या ओळी ऐकताना आपल्या हृदयात कालवाकालव होते.मृत्युशय्येवरील रुग्णाजवळ अनेकदा जवळच्या व्यक्ती जमलेल्या असतात आणि अखेरच्या क्षणी किमान निरोपाचे काही शब्द बोलता यावेत, अशी त्यांची इच्छा असते. रुग्ण संवाद साधण्या -न साधण्याच्या सीमारेषेवर घोटाळत असतो. त्याला प्रत्यक्ष देता येत नाहीत, अशी उत्तरे तो त्याच्या विचारप्रक्रियेत आणि स्वतःच्याच दृष्टिपटलावर त्या त्या व्यक्तीला आणून देतो. त्या दृष्यपटांच्या लहरी आपल्याला मॉनिटरवर पाहता येतात. एखाद्या व्यक्तीची माफी मागण्यापासून ते एखाद्याचे आभार मानण्यापर्यंत किंवा एखादी खंत व्यक्त करण्यापासून ते समाधान व्यक्त करण्यापर्यंत शेकडो भावनांची ही आंदोलने असू शकतात. असे एक संशोधन मध्यंतरी वाचले होते.
वडील विज्ञानाचे शिक्षक. हायस्कूल मधे हेडमास्तर होते. पण जुन्नर तालुक्यात अन्य गावांच्या शाळेत होते. ओतूर,नारायणगांव,पिंपळवंडी,आळे अशा गावांतील हायस्कूलमधे होते.आमच्या बेल्हे गावातील हायस्कूल मधे ते नव्हते. आजोबा गेल्यावर मात्र मास्तरकी सोडून घरची परंपरागत शेतीच पाहू लागले होते. मी डॉक्टर होउन गावातच घरी दवाखाना टाकावा व सोबत परंपरागत शेती पहावी ही त्यांची इच्छा. नुसत्या शेतीवर अवलंबून रहाण्यात आता काही अर्थ नाही. उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हे आता संपले आहे. त्यानुसार मला त्यांनी गावी दहावी झाल्यानंतर पुण्यात टिळक आयुर्वेद कॉलेज ला BAM&S कोर्सला प्रोव्हिजिनल प्र्वेश मिळवून दिला. तेथील प्राचार्य त्यांच्या परिचयाचे होते. मला त्यावेळी त्यातले काही कळत नव्हते. पण त्यावर्षी BAM&S च्या अभ्यासक्रमात मॉडर्न मेडीसीन हा भाग काढून टाकला व तो कोर्स शुद्ध आयुर्वेद BAMS असा केला. अभ्यासक्रमात मॉडर्न मेडिसीन न शिकवणे हे त्यांच्या दृष्टीने अयोग्य होते. म्हणून माझा BAMS चा प्रवेश रद्द केला व मी पुढे 11 वी सायन्सला गेलो. मी काही हुशार नव्हतो त्यामुळे बारावी नंतर मला मेडीकल ला प्रवेश मिळाला नाही व बी एस्सी च्या लाईनला गाडी गेली व कसेबसे एकदाचे बीएस्सी झालो.

लेख नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण..!

लेख वाचून माझ्या वडिलांची आठवण आली. माझे वडील जवळ-जवळ चार वर्ष पॅरालिसिसमुळे अंथरुणात पडून होते. लघवीला पिशवी कायम होती. सगळं पलंगावरच होतं. आधी हाताने जेवायचे. हळूहळू ते सुद्धा बंद झालं. आईने त्यांचं सगळं केलं. आम्ही बहिणी जाऊन - येऊन जमेल तशी त्यांची सेवा करायचो. त्यांना सारखं स्वप्नं पडायचं की मी ह्या आजारातून पूर्णपणे बरा झालोयं .. पुन्हा पहिल्या सारखाच हिंडतोयं - फिरतोयं असं .. मला नेहमी त्यांना पडणाऱ्या स्वप्नाबद्दल सांगायचे.. मला खूप वाईट वाटायचं .. त्यांना औषधोपोचर सुरू होते पण प्रत्येक गोष्टीला मानवी मर्यादा असतात. इलाज नव्हता.

मृत्यूच्या शेवटच्या दिवसांत त्यांना थोडे भ्रम व्हायचे.. त्यांचे आई-बाबा , काका- काकू जे हयात नव्हते ते त्यांना दिसायचे.. त्यांना घ्यायला आलेत असे म्हणायचे. आई एकटी असायची त्यांच्यासोबत. ती पण भांबावून जायची.

वडिलांच्या मृत्यूच्या तीन दिवस आधी मी गेले होते त्यांना भेटायला. त्यांच्या पायावर , पाठीवर जखमा झाल्या होत्या.. मी त्या साफ करून त्यात पावडर भरली होती.. त्यांची ती अवस्था पाहून त्यांच्यासमोर व आईसमोर न रडता , खंबीरपणाचा कितीही आव आणला असला तरी घरी येऊन बाथरूममध्ये किती तरी वेळ मी रडले होते. कणा-कणाने शरीर झिजत जाणे काय असते ते डोळ्यासमोर पाहिलं होतं. शत्रूच्या वाट्यालाही असा आजार, वेदना येऊ नयेत असं वाटलं. मृत्यूला कुणीही चकवा देऊ शकणार नाही, निसर्ग नियमानुसार प्रत्येकालाच मृत्यू येणार पण आपलं रक्ताचं माणूस अश्या रितीने हळूहळू खंगत, संपत जाणं मनाला खूप क्लेशदायक होतं.

तीन दिवसांनी सकाळीच आईचा फोन आला की आज वडिलांची तब्येत जास्त आहे. मी लागलीच निघाले. त्यांचा श्वास धीम्या गतीने सुरू होता. आम्ही बहिणी, सगळे नातेवाईक जमले होते. त्यांचे डोळे उघडे होते. थोड्या- थोड्या वेळाने आम्ही चमच्याने त्यांना पाणी देत होतो. डॉक्टर म्हणाले की , आता उपचार करण्याच्या पलीकडे गेलेत ते..
पाजलेलं पाणी तोंडातून ओघळून जात होते.. मी जेव्हा पाणी पाजायला लागले तेव्हा मानेने नको पाजू म्हणाले. आता सगळं संपलंयं .. हेच त्यांच्या डोळ्यात शेवटचे भाव होते.. जणू सांगत होते, आता इथून निघायची वेळ आलीयं.. मी ते दृश्य कधीच विसरू शकणार नाही. त्या दिवशी दुपारी दोन वाजता त्यांचे निधन झाले. दिव्यातले तेल संपले की जशी वात हळूहळू विझत जाते तसातसा त्यांचा श्वास धीम्या गतीने बंद झाला. सगळं शांत झालं.

घाटपांडे काका आणि रुपाली ह्यांचा अनुभव वाचून देखील वाईट वाटले.
कुमार सर जवळचे नातेवाईक जाणे म्हणजे देखील दुःखदायक फार

अंतिम समयी होत असेल असेच संपूर्ण भूल उतरताना मनुष्याचे स्मृतिकोष उघडत असावेत.
सासरेबुवांचे operation झालेले, पूर्ण भूल उतरताना नंतर मी पूर्ण रात्र सोबत होतो. अख्खी रात्र झोपू शकलो नव्हतो.
कारण त्यांच्या खूप जुन्या आठवणी बाहेर येत होत्या आणि जणू ते तिथेच आहेत से समजून उठायला बघत होते.
कोणीतरी त्यांचे नातेवाईक गेलेत आणि मला जायला पाहिजे असे म्हणून उठत होते. सतत समजावून सांगून झोपवत होतो मी. थोड्या वेळात दुसरीच आठवण. तहान लागलेली आणि पाणी मागत होते. पण पोस्ट operation ठराविक तास पाणी द्यायचे नाही असे डॉनी बजावून सांगितले होते त्यामुळे चिडत होते. मी जावई असल्याने थोडं तरी ऐकत होते. त्यांची मुलं असती तर फार राग राग केला असता त्यांनी.
दवाखान्यातून घरी आलो. आठवडा गेला मध्ये
छान recovery सुरू होती.
टाके काढायला सुरवात झालेली.
आणि आठ की दहाच दिवसात अचानक पहाटे हार्ट अटॅक येउन देवाघरी गेले. आमच्याच समोर. तरी तात्काळ अंबुलन्स अरेंज होउन पहिल्या15 मिनिटात हॉस्पिटलमध्ये नेले होते त्यांना. पण हाताला लागले नाहीत आमच्या.
फार trauma अनुभव. वय जेमतेम 29.
हे वाचताना relate देखील झाले.
संवेदनशील विषय आहे.
आणि तो तसाच मांडलात.
वरच्या ह्या 2 पोस्ट वाचून मलाही लिहावेसे वाटले.

आपणा सर्वांचे अनुभव हृदयद्रावक आहेत.
असे प्रसंग अतिशय दुःखद असतात परंतु तुम्ही सर्वांनी ते चांगले शब्दबद्ध केले आहेत. अशा लेखनातून भावनांचे विरेचन होत असते.

मला हृदय विकाराचा जोरदार झटका यावा असं मरण्यापेक्षा असं वाटतं.
गुलजार आठवले....

मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको
डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुँचे
दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन
जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आए
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको

दत्तात्रय साळुंखे ही कविता फार दिवसांनी समोर आली.
कधी काळी प्रिंट मिडिया मध्ये वाचलेली
आवडलेली
डायरीत लिहून ठेवलेली.
बच्चनच्या आवाजात ऐकू येते वाचताना.
एका अत्यंत जवळच्या व्यक्तीसोबत पत्रव्यवहार व्हायचा ( landline फोन होते तरीही ) त्यात ह्या ओळी लिहिलेल्या आठवत आहेत.
Somehow मृत्यू विषयी काहीतरी लिहिलेलं त्यात ही कविताही होती.

सुंदर कविता. खरेच खूप दिवसांनी अचानक सामोरी आली.
खरेच, मृत्यू आहे, म्हणूनच जीवनाचा तोरा आहे!

स्वर्गवासी झालेले नातेवाईक आणि मित्रमंडळी दिसतात वै ऐकलेलं आहे.
>>>
हे ऐकलेले होते. वडिलांनी शेवटच्या आजारात ज्या दिवशी ते शेवटचे शुद्धीत होते तेव्हा एका मृत नातेवाईकाचा उल्लेख केला होता. खरं तर ते नातेवाईक अगदी घनिष्ट नव्हते पण तोपर्यंत सर्वात शेवटी स्वर्गवासी झाले असे तेच होते.

बऱ्यापैकी निरोगी व्यक्तींचे झोपेतले मृत्यूही सुखदायी.
>>>
माझे काका म्हणजे आत्येचे यजमान अतिशय सज्जन माणूस. त्यांनी खूप लोकांना आर्थिक मदत केली होती. त्यांचे असे अचानक झोपेत निधन झाले.

मुंबईतल्या आमच्या शेजारच्या ताईंच्या कॅन्सरग्रस्त मातोश्री अखेरचे क्षण मोजत होत्या. गणेशोत्सवाचे दिवस होते. कर्ण्यावर 'नको देवराया अंत असा पाहू' गाणे लागले. मग मी संयोजकांना भेटून वस्तुस्थिती सांगितली. ते गाणे त्यांनी ताबडतोब थांबवले. 'आई तुझी आठवण येते' हे गाणे तेव्हा गाजत होते. तेही वगळायला मी त्यांना विनंती केली. तेही त्यांनी मान्य केले. कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली म्हणून लिहिले.

बाकी मी तसे कोणाचेही मरण पाहिले नाही. माझी आई २००४ साली तिच्या वयाच्या वयाच्या ८१व्या वर्षी श्वासविकाराने दादरच्या धन्वंतरी इस्पितळात २र्‍या मजल्यावरील आयसीयू मध्ये गेली. इस्पितळात मी रात्रीचा तळमजल्यावर झोपत असे. दिवसा मी कामावर जात असे. ती दिवसा गेली. छत्र गेले. पण मरण पाहिले नाही.

परंतु मी मात्र ठरविले आहे की आता ७३ वर्षांचे वय. हातपाय थकले की टीव्हीसमोर जमिनीवर अंथरूण टाकायचे. रीमोट हाताशी ठेवायचा आणि अन्नपाणी सोडायचे. पाचसहा दिवसात सारे संपेल. सर्वांना दम देऊन सांगून ठेवले आहे की इस्पितळात न्यायचे नाही. थेट डॉक्टरना बोलावून प्रमाणपत्र घ्यायचे आणि अंत्ययात्रा काढायची. आपल्या स्वा. सावरकरांनी असेच केले होते. ते मुंबईत दादरला राहायचे. आमच्या घरापासून जवळच. म्हणून मला ठाऊक.

असो. एका कटू विषयावरील असला तरी विचारप्रवर्तक लेखाबद्दल डॉ. कुमारसाहेबांस धन्यवाद.

सर्वांचे अनुभव वाचतोय.
*अन्नपाणी सोडायचे. पाचसहा दिवसात
>>>> प्रायोपवेशनासाठी मनोधैर्य खूप लागते. माझ्याजवळ तरी ते नाही.

संवेदनशील लेख आहे. डोळ्यासमोर माझ्या बाबांचा अंतकाळ तरळला.

<<<सामान्य भाषेत याला मृत्यूची घरघर लागली असे म्हणतात.<< शास्त्रीय कारण आता कळले.
एखाद्या आजारी व्यक्तिचा मृत्यु जवळ आला आहे कि नाही हे पुर्वीच्या जुन्या जाणत्या लोकांना काही लक्षणांवरुन कळायचे. माझ्या मोठ्या काकु
सांगायच्या कि त्या व्यक्तीच्या कानाच्या पाळ्या लुज पडतात. नाकाचा शेंडा वाकडा होतो. थोड्क्यात शरीराचा र्हास व्हायला अवयवांच्या टोकाकडुन सुरुवात होते.
माझ्या बाबांच्या अंतसमयी हि लक्षणे दिसु लागली होती. तसे तर बाबांचे वय ७२ होते. बाबांना माईल्ड हार्ट ऍटेक आला फेब्रुवारी २००९ मधे.
पण मृत्यूची लक्षणे सहा महिने आधीपासुनच लक्षणे दिसु लागली होती. दात विरळ होत चालले होते. डोळ्याच्या बाहुल्या ज्या आधी काळ्या होत्या त्या पांढरट दिसु लागल्या होत्या.

मी त्यांच्या मृत्युचा सम्पुर्ण तारखेनुसार प्रवास इथे लिहीला आहे.
https://www.maayboli.com/node/25364

लेख फार आवडला. या विषयावर तुम्हाला लेख लिहावा असं सुचणे हेच फार रोचक आहे.
ती वेळ आल्यावर हा लेख नक्की आठवेल. तुम्ही दिलेले संदर्भ ही वाचतो.
या अशाच विषयावरील बिइंग मॉर्टल हे अतुल गवांदे यांचं पुस्तक आठवलं. ते स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांचे वडील ही होते. त्यांच्या वडिलांच्या शेवटच्या दिवसातील काही घटना आणि त्याकडे वैद्यकीय व्यवसाय कसा बघतो आणि आपण काय लक्षात ठेवावं हे त्यात सुरेख सांगितलं आहे. तुमचा लेख ही तसाच जपून ठेवण्यासारखा झाला आहे.

>>>>>आयुष्यातले ते अखेरचे क्षण सर्वांनाच कमीत कमी त्रासदायक व्हावेत ही सदिच्छा व्यक्त करतो.
खरोखर!

कुमार सर, वैद्यकिय दृष्टीकोनामधून शेवटच्या क्षणांचे विवेचन उत्तम केलेले आहे. बरेच काही माहीत नव्हते.

धन्यवाद !
सर्वजण प्रतिसादांतून चांगले व्यक्त होत आहेत. हा लेख का लिहावासा वाटला यासंबंधी हे मनोगत :
नुकत्याच घडलेल्या अहमदाबाद विमान अपघात घटनेत कित्येक मृतदेहांचा कोळसा झालेला होता; प्रत्येक मृतदेहाचे सर्व अवयव मिळतील याचीही खात्री नसते. 21 वर्षांपूर्वी आपल्याकडे झालेल्या सुनामीत काही बेटे संपूर्णपणे वाहून गेली होती. त्यामुळे कित्येक मृतदेहांचा पत्ताही लागला नाही. MH 370 या विमान अपघातात तर सर्व प्रवाशांना जलसमाधी मिळालेली होती. या सर्व घटनांनी मनात कुठेतरी खोलवर आघात केलेला होता. हे प्रसंग असे आहेत की जिथे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना त्याचे शव सुद्धा बघायला मिळत नाही. त्यांच्या दृष्टीने ही दुःखाची परिसीमा आहे. आपला जिवलग तर कायमचा नाहीसा झाला आणि त्याचे अंत्यदर्शन सुद्धा झाले नाही या तीव्र वेदनेची आपण कल्पनाही करू शकत नाही.

त्या तुलनेत इतर सर्व प्रकारच्या मृत्यूंमध्ये (नैसर्गिक अथवा अनैसर्गिक) मृतदेह कुटुंबीयांसमोरच असतो आणि रीतसर अंत्यसंस्कारही करता येतात. कुटुंबीयांच्या डोळ्यादेखत झालेले असे सर्व मृत्यू त्या दृष्टीने ठीकच म्हणायचे.

मृत्यूविषयक अशा अनेक विचारांनी मनात काहीसा कल्लोळ माजला होता. त्यातूनच या लेखाची निर्मिती झाली.

लेख आवडला.

मध्यंतरी Death is but a dream या एका हॉस्पिस डॉक्टरने लिहिलेल्या पुस्तकाबद्दल माहितीपट पाहिला होता त्याची (आणि हे तेव्हा हे पुस्तक वाचायचं ठरवून राहून गेल्याचीही!) आठवण झाली.
अमितने उल्लेख केलेलं 'बीइंग मॉर्टल'ही वाचनीय आहे.

* ईतक्या दिवसाचा सोबती आहे.हे निदान कसे*
>>>>> चांगला प्रश्न.
असा अंदाज वर्तवण्याचे Prognostication हे एक शास्त्र आहे. यानुसार वर्तवलेला अंदाज हा ठराविक रेंजमध्ये असतो; इतकेच दिवस किंवा महिनेच असे अचूक कोणीही सांगू शकत नाही. डॉक्टरांनी हा अंदाज बांधण्यासाठी खालील तीन गोष्टींचा विचार करावा लागतो :

  1. संबंधित रुग्णाचा पुरेसा अभ्यास
  2. रुग्णाच्या तब्येतीत दैनंदिन होत असणारे बदल
  3. संबंधित आजाराचा आजपर्यंतचा विदा

उदाहरणार्थ, परिस्थितिनुसार उरलेल्या आयुष्याचे अंदाज असे :

  • काही दिवस ते काही आठवडे : रुग्णाची निरिच्छता, श्वसन दुर्बलता, हातपाय थंड पडलेले आणि बराच कमी रक्तदाब
  • काही आठवडे ते काही महिने : वाढता अशक्तपणा, ढासळते अन्न-पाणीग्रहण
  • काही महिने ते एक वर्षापर्यंत : धीम्या गतीने होणारी शारीरिक दुर्बलता आणि अधूनमधून उफाळणारा आजार

वरील गोष्टी विचारात घेऊन काही महत्त्वाच्या आजारांसाठी ठराविक प्रारूपे बनवलीत. जसे की, Palliative Prognostic Score, Seattle Heart Failure Model, इ.

खूप महत्वाचा लेख! नेहेमीप्रमाणे महितीपूर्ण.
मृत्यूच्या क्षणी आधी हृदय बंद पडते का आधी मेंदूचे काम थांबते?

महत्वाचा आणि अवघड विषय

काही वेळेस मृत्यूच्या वेळेस हात पाय झाडले असं म्हणतात, तसं खरंच होतं का आणि असं का होतं? वेदना जाणवत असतात म्हणून का?

Pages