या पूर्वीचे लेख :
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग १ :
https://www.maayboli.com/node/86819
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग २ :
https://www.maayboli.com/node/86841
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ३ :
https://www.maayboli.com/node/86863
पिथौरागड ते धारचुला
एकूण प्रवासाचे अंतर -९२ किमी
पिथौरागड रेस्ट हाऊसची खासियत म्हणजे हे भरपूर फुलझाडांनी सजवले आहे. इथले मॅनेजर श्री. गुरनानी यांना पर्यावरणाची विशेष आवड असल्याने यांनी सगळे आवार अनेकविध झाडांनी सजवले आहे. सकाळी सगळ्या जणांचे परत उल्का माता मंदिर, शहीद स्मृतीस्थल असे फोटो सेशन झाले. काल रात्री आलो तेंव्हा अंधार होता. आता दिवसा उजेडी पहाण्याच्या निमित्ताने मॉर्निंग वॉक झाला छोटासा. आम्ही दोघांनी संपूर्ण आवाराला फेरा घातला. वर दुर्गेचे अजून एक मंदिर आहे. तिकडे एकदम मोठ्या मोठ्या कमळासारख्या पांढऱ्या शुभ्र फुलांचा वृक्ष होता. ती फुले हाताला लागतायत का हे पहायच्या निमित्तने, मी आपल्याला झाडावर चढता येते का याचीही चाचपणी केली.
सकाळचे लांबवर पसरलेले पिथौरागड :
शहिद स्मारक : इथेच आम्ही काल रात्री श्रद्धांजली वाहिली :
शहिद स्मारक १ :
आवारातील सजावट :
जिने सुद्धा सजवले आहेत :
पिथौरागड रेस्ट हाउस मधील काही फुले :
हा अजून एक :
ह्या झाडावरुन ओळखता येतय का कुठलं फुल असेल : अनंता सारखेच वाटले :
विविध फुलझाडे सकाळचे वातावरण प्रसंन्न करत होती. सकाळी ७.३०लाच नाश्ता करुन ८.३० पर्यंत निघायचे असे सांगितलेले. त्याप्रमाणे सगळे तयार झालो खरे पण निघायला वेळ होता. इथे महपौरांच्या बरोबर एक छोटेखानी कार्यक्रम होता. त्यांची वाट पहाणे चालू होते. तोवर लोकांनी भजने म्हणून आपापले गळे साफ करुन घेतले.
शेवटी एकदाच्या त्या आल्या. आता त्यांच्या पतिदेवांची वाट पहाणे सुरु झाले. पण त्यांनी फार विलंब केला नाही. त्या येईपर्यंत आमच्या सगळ्यांकडून गुरुनानींनी शिवमूर्तीचे पूजन करुन घेतले होते. आम्हाला स्वच्छ हिमालयाची शपथ दिली गेली. गुरुनानी अतिशय श्रद्धाळू आणि तितकेच निसर्गप्रेमी आहेत. त्यांच्या युट्युब चॅनेलवर वेगवेगळे व्हिडीओ तुम्ही पाहू शकता.
महापौर सगळ्यांशी बोलल्या. कालच्या यात्रींच्या मुलाखती त्यांनी दूरदर्शनवर पाहिलेल्या दिसत होते. त्यांनी व यजमानांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. त्या दोघांबरोबर महिला मंडळा कडून १ व १ पुरुष मंडळींच्या हस्ते वृक्षारोपण झाले. तशीच 5 रोपे गुंजी साठी आम्ही बरोबर घेतली. थोडेफार इतर सामान जे गुंजीला न्यायचे होते ते घेतले आणि निघालो.
आजचे जेवण धारचुलालाच होते. रस्त्यात जौलजिबी येथे काली नदीजवळ शंकराचे मंदिर दिसते ते वरुन रस्त्यातूनच बघायचे ठरले. तसेच इथपासून समोर नेपाळचे डोंगर दिसायला लागतात. आमचे गाईड श्री. पद्मसिहजी खुपच उत्साही आणि सकारात्मक व्यक्ती होते. वेळोवेळी अश्या जागा ते दाखवत. पण दुपारचे तिथले ऊन भयंकर असते. आम्ही जौलजिबीला होतो तेंव्हा खूप ऊन होते म्हणून थांबलो नाही.
पुढे थोडा चहाचा थांबा घेतला. वळण या शब्दाला लाजवेल असा नागमोडी रस्ता होता. मधे मधे दाट जंगलाचे भाग लागत होते. काठगोदाम पासूनच तुम्हाला ही हिरवाई भुरळ घालू लागते.
दुपारच्या १.३० ते १.४५ च्या दरम्यान आम्ही धारचुलाला पोहोचलो.
आज बरोबर आणलेली कागदपत्रे जमा करायची होती. जेवण झाल्यावर सगळ्यांनी कागदपत्रे तिथेच रेस्टहाऊस मधे जमा केली. सगळ्या कागदपत्रांबरोबर आधारकार्ड व पॅनकार्डाचीही प्रत त्यांनी घेतली. आता रिकामावेळ झोपेत सत्कारणी लावायचा असतानाच "नेपाल आओगे?" अशी विचारणा झाली.
धारचूलामधून दिसणारा नेपाळ :
धारचूलाला काली नदीवर एक पूल बांधण्यात आला आहे. तो ओलांडला की नेपाळ. इथे नेपाळ बरोबर रोटी बेटीचा व्यवहार चालतो. रोज सकाळी नेपाळहून माणसे भारतात येतात व संध्याकाळी परत जातात. इथल्या के एम व्ही एनचे कर्मचारी देखील नेपाळहून येतात रोज.
पुलाच्या दोन्ही बाजूला दोन्ही देशांचे कस्टम ऑफिस आहे. आधार कार्ड दाखवून प्रवेश मिळतो.
हेच ते नेपाळकडचे प्रवेशद्वार / कस्टम ऑफिस :
आमच्या बरोबर आमचे गाईड श्री. पद्मसिंहजी पण आलेले. त्यामुळे झटपट काम झाले. के एम व्ही एनचे यात्रेकरु सांगितले की सोडत होते. पलिकडे खरतर आकर्षक असे काही दिसत नव्हते. पण मला नेपाळकडून भारताची बाजू बघायची होती. न जाणो त्या नील आर्मस्टाँगला जशी पृथ्वी सुंदर दिसली तसे वेगळे रुप मलापण दिसावे.
नेपाळमधे गल्लीबोळातून एक फेरफटका मारला. छोटी छोटी दुकाने असलेल्या दोन गल्ल्या म्हणजे बाजार होता इथला. आपल्याकडे धारचूला तर तिकडे दार्चुला असे गाव आहे. जिल्ह्याचे ठिकाण असावे कारण जिल्हा न्यायालय नामक २ खोल्यांची वास्तू आम्हाला दिसली. आपल्याकडच्या पूर्वीच्या काळातील एखाद्या लहानश्या खेडेगावात गेल्यासारखे वाटले.
लहान रस्ते, लहान लहान घरे. त्यांचे बांधकामही कच्चे दिसत होते. ठीकठाक होते सगळे. पण लाल झेंड्याचा पगडा दिसत होता. त्या छोट्याश्या गावाच्य मानाने पक्षाचे ऑफीस बऱ्यापैकी मोठे होते. नेपाळी माणसे मात्र हसतमुख दिसत होती. पूल ओलांडल्यावरच नेपाळमधे स्वागत आहे असा फलक लावण्यात आलेला आहे. बाजुला नेपाळचे राष्ट्रगुरु म्हणून पू. गोरक्षनाथांचा फोटो आहे. माओवादाचा ( किंवा समाजवादाचा?) पगडा असणारा नेपाळ भारतातील एका नाथांना मानतो.. गंमतच!
नेपाळमधे स्वागत आहे :
नेपाळकडून दिसणारी काली नदी :
हाच तो आपल्याला परत भारताकडे घेऊन जाणारा पूल व समोरचा भारत :
परत आल्यावर मात्र तासभर विश्रांती घेतली. सतत बसून अंग आखडून जात होते. थोडे सैलावले की बरे वाटायचे. इथे कालीनदीच्या तटावरच रेस्ट हाऊस बांधले आहे. त्यामुळे नदीचा खळखळाट अगदी खोलीतसुद्धा ऐकू येतो. अगदी रोरावत, वेगाने काली नदी धावत असते. अगदी कालीमातेचेच रुप. थोडावेळ रुमला असलेल्या गॅलरीतून हे रौद्र पण मोहकरुप पहात बसले तोच अंधारून आले. नदीचा आवाज अंधार चिरत जातो अगदी. आत्ताच हिचा आवाज असा.. हिला पूर आला तर काय होत असेल.. नकोच तो विचार.
संध्याकाळी ७.३० ला सूपाबरोबर उद्याची माहिती देण्यात आली. आज एक प्रायव्हेट ग्रुपही आमच्या बरोबर मुक्कामाला होता. त्यांनीही या माहिती प्रसारणात सहभाग घेऊन शंका विचारल्या. उद्या गुंजीला हवा थंड असणार आहे तेंव्हा थोडे गरम कपडे घालूनच निघा. कानटोपी, स्वेटर हाताशी ठेवा. विरळ हवेत लगेच झोपायला न जाता तिथे फिरा, तास दोन तास बाहेर घालवा इ. सूचना तिथले मॅनेजर अगदी कळकळीने देत होते. सगळ्याची नोंद घेऊन त्या दुसऱ्या ग्रुपशी थोड्या गप्पाटप्पा करून आम्ही आमच्या खोलीत गेलो. आता उद्या पासून दोघांना स्वतंत्र खोली नाही. स्त्रिया वेगळ्या व पुरुष वेगळे असे रहाणार होतो. त्या दृष्टीने सामान तपासले आणि झोपेची आराधना करण्यास सुरवात केली.
क्रमश :
पुढील भाग इथे वाचा
हाही भाग मस्त. नेपाळभेटही
हाही भाग मस्त. नेपाळभेटही झाली
तो वृक्ष पांढरा मॅग्नोलिया. याचे अनंत प्रकार आहेत. उत्तराखंडात जास्त करुन हाच दिसतो.
आम्ही पिथोरागडला यात्रेला
आम्ही पिथोरागडला यात्रेला जाताना जेवायला थांबलो होतो. धारचुलाला मात्र दोन्ही वेळा मुक्काम होता. तेव्हा रस्ता नसल्याने धारचुला-गुंजी मधे ३ की ४ मुक्काम व्हायचे. आता एका टप्प्यात पोचता येतंय. फार सुंदर परिसर आहे.
२०१३ ला उत्तराखंडमध्ये ढगफुटी होऊन पूर आले. फक्त एका बॅचची यात्रा झाली. त्यात माझी एक मैत्रीण होती. परत येताना त्यांना गुंजी ते पिथोरागड हेलिकॉप्टरने आणलं होतं. तिथून दिल्ली आणि घरी. सगळं वेळापत्रक विस्कळीत झालं होतं. पण सगळे सुरक्षित घरी पोचले.
तुमचं वर्णन वाचून यात्रेच्या फार आठवणी येत आहेत. तुम्ही छान लिहीता आहात. आवश्यक ते सगळं येतंय. आटोपशीर आणि आकर्षक.
पुढचे भाग लवकर लवकर लिहा.
ॐ नमः शिवाय
तो वृक्ष पांढरा मॅग्नोलिया.
तो वृक्ष पांढरा मॅग्नोलिया. याचे अनंत प्रकार आहेत. उत्तराखंडात जास्त करुन हाच दिसतो. >> माहेती बद्दल धन्यवाद साधना. फुले अगदी कमळासारखी आणि टप्पोरी होती छान.
हेलिकॉप्टरने आणलं होतं. ....पण सगळे सुरक्षित घरी पोचले. >> या साठीच लोकं कुमाऊ मंडल बरोबर जातात असे काही लोक आम्हाला म्हणाले.
आम्हाला ते गुंजीला भेटले. पूर्वी कुमाऊ बरोबर यात्रा केलेली त्यांनी. प्रायव्हेटवाले पैशाला महत्व देतात तर कुमाऊवाले यात्रींना.
अर्थात मला फक्त कुमाऊ मंडलचाच अनुभव आहे. पण ही माहिती त्या भेटलेल्या लोकांनी दिली.
वाचतेय...
वाचतेय...
मस्त. धारचुलाचं गेस्ट हाऊस,
मस्त. धारचुलाचं गेस्ट हाऊस, काली नदीचा आवाज, तो पूल सगळं आठवलं.
आम्ही पण त्या पुलावरून पलिकडे जाऊन आलो होतो.
धारचुला ते गुंजी थेट जाता येत असेल तर भारीच आहे! आधी सिरखा, गाला, बुधी आणि मग गुंजी एव्हडे मुक्काम होते. पण ते सगळे कॅम्प सुंदर आहेत.
न जाणो त्या नील आर्मस्टाँगला जशी पृथ्वी सुंदर दिसली तसे वेगळे रुप मलापण दिसावे. >>>>
आधी सिरखा, गाला, बुधी आणि मग
आधी सिरखा, गाला, बुधी आणि मग गुंजी एव्हडे मुक्काम होते. पण ते सगळे कॅम्प सुंदर आहेत. >> हो ते गाडीने जातान मिस होते. पण बुधी पासून चालत जाणे म्हणजे केवढे अंतर आहे. आमच्यातल्या काकूंनी सांगितले की पूर्वी बुधी पासून घोडे करत असत. खूप मोठा चढ आहे तो. आता म्हणे रस्ता पण बदलला आहे.
मस्त लिहिताय. प्रत्यक्ष जाऊन
मस्त लिहिताय. प्रत्यक्ष जाऊन आल्याचा फील येतोय
खूप मोठा चढ आहे तो >>>>
खूप मोठा चढ आहे तो >>>> बुधीहून निघालं की प्रचंड मोठा चढ आहे साधारण ३ किलोमिटर. ती चियालेखची चढाई. ती चढली की वर फुलों की घाटी आहे. ('व्हॅली ऑफ फ्लॉवर' ह्या ट्रेकचा भाग नव्हे). पुढे थेट नाभीढांगपर्यंत मग थोडे थोडे चढ उतार आहेत. तुम्ही कालापानी नाभीढांगला पण गेला असाल ना ?
तुम्ही कालापानी नाभीढांगला पण
तुम्ही कालापानी नाभीढांगला पण गेला असाल ना ? >> हो ओम पर्वत दर्शन हा यात्रेचा भाग होताच.
त्या छियालेकच्या चढावर आता ३६ वळणे असलेला रस्ता झालाय. पण चालत जाणे म्हणजे खडा पहाड चढणे वाटले.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद जाई!
वाचतोय.
वाचतोय.
धारचुला ते गुंजी थेट जाता येत असेल तर भारीच आहे! >>>
रस्त्यामुळे खूपच सोय झाली असली तरी मला रस्ता झाला म्हणून जरा वाईटच वाटतंय.
ॐ नमः शिवाय|