Submitted by यःकश्चित on 17 May, 2025 - 12:16
पाठलाग
पाठलाग व्यर्थचि झाला त्या कस्तुरीमृगा पाठी
अत्तरही दुर्लभ झाले अन् मृगजळही नाही हाती ।।
धावला सश्याच्या मागे आंधळा खुळा शिकारी
वेगात समय निसटला सोबत कुणी ना साथी ।
तेजाचा किरण पाहण्या धुंडाळली रात्र सारी
उदयाच्या उषःकाली ज्योतीस मिळेना वाती ।
सौख्याच्या लोभापोटी वेदना मनी दडविली
भाग्याची रेषही पुसली नैराश्य रिकाम्या माथी ।
मरण्याचे कोडे सुटले पण जिंदगी अपुरी पडली
मातीतुनीच उगवलो अन् व्हायचे अखेर माती ।।
- यःकश्चित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा