गुलकंद ( मराठी चित्रपट)

Submitted by छन्दिफन्दि on 14 May, 2025 - 14:46

गुलकंद ..
नावातच केवढा गोडवा! चित्रपटही एकदम झकास - अगदी पोट धरून हसवणारा, कधी किंचित हळव करत नेणारा..

सई आणि समीर च्या मुलीचं तिने स्वतःच लग्न ठरलेलं असतं. तर भेटायला ते पाहुणे येणार असतात. अर्थात त्या मुलाचे वडील म्हणजे प्रसारक ओक आणि आई इशा डे. प्रसाद ओक सई ताम्हणकर चा पूर्वाश्रमीचा प्रियकर.. प्रसाद तिला लग्नाचा विचारणार असतो पण काहीतरी घटना घडतात आणि समावेश त्याला तडकाफडकी शहर सोडून त्यावेळी जायला लागतं. आता 25 वर्षांनी दोघं एकमेकांसमोर आले की काय होणार मग त्यांचे कुटुंबीय त्यावर कसे रिऍक्ट होणार लग्नाचं काय होणार वगैरे वगैरे सगळी गंमत म्हणजे तयार झालेला हा गुलकंद.

समीर सईच्या घरातलं शेंडेफळ म्हणजे अर्थातच आगाऊ (आणि हुशार) जसं बहुदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात असते. त्याने काम pn छान केलंय. समीर आणि इशाचं अफाट टाइमिंग, धमाल ॲक्टिंग - या वेड्या जोडगोळीने धमाल उडवून दिली आहे. इशाचा अभिनय बघताना ‘पुत्र नसावा असा’ या सिरीजची वारंवार आठवण येत होती तर समीरचा ऑफिसमधला बायकांचा बॉस ही मध्ये मध्ये आठवत होता.
इतर सगळ्यांचीही कामे उत्तम. सई ताम्हनकरने - एका लग्नाळू मुलीची आई, गृहिणी, बायको, तसेच पूर्वाश्रमीची प्रेयसी - खूप छान सादर केलिये. विशेष आवडलं ते पंचवीस वर्षांनी भेटलेल्या जुन्या प्रियकराला मुलीच्या भावी सासऱ्याच्या रूपात बघते तेव्हा.. सुरुवातीला त्या जुन्या प्रेमात ती वाहत जाते की काय असं वाटत असतानाच तिच्यातली आई, बायको जागी होते तो सर्व तोल - समतोल तिने फार छान दाखवलाय आणि सांभाळलाय.
प्रसाद आणि सई हे दोन्ही कसलेले/ प्रथीतयश कलाकार असले तरीही त्यांनी स्वतः मागे राहून समीर ईशाला बॅटिंग करायला पूर्ण मैदान मोकळं दिलंय.. त्या दोघांनीही त्याचा चांगलेच चौकार आणि षटकार मारले आहेत.
उत्तम संवाद, पटापट पुढे जाणारी किंवा गुंतवून ठेवणारी कथा मांडणी..
दोन तास तुम्हाला खिळवून ठेवणारा आणि हसून हसून पुरेवाट लावणारा पण मध्येच डोळ्याच्या कडा लावणारा धमाल चित्रपट म्हणून जरूर बघा.

एक सांगायला आवडेल,
बे एरियातील चित्रपट गृहात घडलेला हा प्रसंग - इथे एका वीकेंडला एकच चित्रपट गृहात दोनच शो लागलेले.
चित्रपट सुरू होताना आमच्यासमोर व्हीलचेअरमधून एक मुलगी आली.
चित्रपट संपल्यावर बाहेर आलो, तर ती मुलगी ( बहुविकलंग किंवा स्पेशल ) खूप आनंदात भराभरा व्हीलचेअर घेऊन थेटरच्या खालच्या भागात एक चक्कर मारून आली. ती गुलकंदाच पोस्टर शोधत होती, त्याच्याबरोबर फोटो काढायला. दुर्दैवाने त्या थिएटरला शनिवारचे दोनच शो असल्यामुळे तिला पोस्टर काही मिळालं नाही तिला.
तिच्या पालकांशी बोलताना कळलं की तिला पूर्ण चित्रपट फारसा समजला असे नाही पण तरी ती अतिशय खूश होती. समीर चौगुले इशा डे हास्यजत्रेतले तिचे फेवरेट कलाकार तिला मोठ्या पडद्यावर दिसले म्हणून तिचा आनंद ओसंडून वाहत होता. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या टीमने त्यांच्या नकळत (अशाही) कित्येक लोकांना इतका/ असा आनंद दिलाय (असे किस्से ऐकून होते ते प्रत्यक्षात बघायला मिळालं ) ह्याबद्दल पूर्ण टीम चं विशेष अभिनंदन आणि कौतुक !

जाता जाता महत्वाचं..
एकाच आठवड्यात दोन नवीन ( हा आणि थांबायचं नाय..) , अतिशय भिन्न आणि तितकेच चांगले मराठी चित्रपट बघायला मिळाले. ह्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे खूप चांगले अभिप्राय/ प्रतिसाद ही मिळतायत ..
तेव्हा आता मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाकारतात छापाचं रडगाण बंद करून प्रेक्षकांच्या मानसिकतेचा किंवा एकंदर आवडीचा अभ्यास करून चांगले चित्रपट बनवतील तर त्यांचेही पुढीलअनुभव चांगले असू शकतील.

****

गुलकंद चित्रपट आणि हाय जत्रेची टीम यांच्यासाठी हा एक धागा..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतंत्र धागा काढला हे छान केले. अन्यथा मी येत्या विकेंडला बघून काढलाच असता Happy
नुकतेच बायको तिच्या मैत्रीणींसोबत बघून आलीय. तिला फार आवडलाय.
एक माझा गैरसमज होता तो तुमच्या लेखाने क्लीअर झालाय. मला वाटलेले की लग्नानंतरचे अफेअर दाखवले आहे. पण हे आधीचे निघाले. हि सिच्युएशन आवडली.

छान लिहीलेय.
हास्यजत्राचे दिग्दर्शक असतील तर बघायला हवा. ती त्यांची पोस्टाची मालिका पण मस्त होती.

सचिन मोटे.

त्यांची पोस्टाची मालिका पण मस्त होती. >>> खरय.. आवडलेली.

मराठीत धमाल कॉमेडी चित्रपट चोरीचा मामला वाटलेला आणि त्यानंतर हा.. एकदम बांधीव, खुसखुशीत आणि जलद script आणि पूर्ण वेळ खिळवून ठेवणारा अभिनय .

मराठीत धमाल कॉमेडी चित्रपट चोरीचा मामला वाटलेला आणि त्यानंतर हा.. >>>> +१००

मी हास्यजत्रा नेमाने पाहतो. त्यामुळे हा चित्रपट बघायची उत्सुकता होतीच. समीर आणि इशाची फुल्ल बॅटिंग आणि सई / प्रसाद चासंयत अभिनय खुप आवडला.

समीर चौगुले आणि त्याच्या विहिणीचे सीन धमाल होते , केवळ त्या दोघांनी सुसह्य केलाय सिनेमा, नाहीतर शेवटपर्यन्त नसता पाहिला !
प्रसाद ओक - सई तामह्णकर टडोपा सीन्स अगदीच बोरींग !

सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

प्रसाद ओक - सई तामह्णकर टडोपा सीन्स अगदीच बोरींग !>>> असेत असेल. मला नाही जाणवलं.

समीर आणि इशाची फुल्ल बॅटिंग आणि सई / प्रसाद चासंयत अभिनय खुप आवडला.>>> +१

मी पाहिला काल. एक नंबर. एकापाठोपाठ एक असे दोन मराठी मनोरंजक आणि अभिनयसमृद्ध चित्रपट बघितले या आठवड्यात.
सविस्तर नंतर लिहितो. आज बिजी आहे. पण कोणी आज रिकामटेकडे बसले असेल तर एखादा बघून या हे सांगायला ही पोस्ट Happy

अगदी अगदी झालं हा review आठवून. Happy
खूप छान काम केलं आहे समीर आणि ईशा ने. फार भोळी आहे Mrs. माने>>>> +१
ईशा डे मला आधीपासून आवडते.. भाडिपाच्या ९ to ५ आणि एक दोन सिरीज मध्ये होती ती.

***

रिकामटेकडे बसले असेल तर एखादा बघून या>>

रिकामटेकडे बसले असेल तरच का.. वेळ काढून बघायलाही चांगला वाटला मला. Happy

आज आईसहीत बहीणी, भाऊ, चुलत, मामे, आते नातेवाईक असे मिळून सर्व जण गेलेत गुलकंदला.
एकोणीस तिकीटांचा हातभार. Happy

बघितला. चांगला आहे. इशा डे सगळ्यात आवडली. सुरवातीला ती थोडी caricaturish वाटत होती पण नंतर तीच सर्वात उठून दिसली. तिचा शेवटचा सीन effective होता. समीर चौघुलेचंही bearing सुरवातीला हास्यजत्रेच्या skit सारखं होतं पण नंतर त्याने वेगळे रंगही भूमिकेत भरले. त्याची आणि इशाची केमिस्ट्री एकदम मस्त!

चित्रपट जरा अजून क्रिस्प करता आला असता. सई-प्रसाद चे सीन्स कंटाळवाणे वाटले. सई खूपच तरूण दिसते भूमिकेच्या मानाने. त्या दोघांच्या गाण्याचीही काही जरूर नव्हती. प्रसादबद्दल काडीचीही सहानुभूती वाटत नाही, तो संधिसाधू बनेल वाटतो. शेवटचं गाणं चांगलं आहे.