परीघ

Submitted by किरण कुमार on 25 April, 2025 - 04:09

" अंड्या , लूक अ‍ॅट दॅट राईट कॉर्नर , इट्स अमेझिंग , इट इज अ मास्टरपीस "

इंदोरच्या एका वस्तूसंग्रहालयाच्या भव्य दालनात डाव्या बाजूचा शिलालेख वाचत असताना कानावर पडलेल्या या वाक्याने आनंदने सहज उजवीकडे नजर टाकली आणि तो शिलालेख विसरून तिकडे वळाला .
अविरत सळसळणाऱ्या पिंपळाच्या वृक्षावर अचानक वीज पडावी आणि त्यानं एखाद्या स्थितप्रज्ञाचे रूप घेऊन एकटक वीजेकडे पाहत रहावं तसे आनंदचे शरीर त्या नीरव शांततेत एकटेच हरवले .
" इट इज जस्ट इम्पॉसिबल......... , ही मूर्ती इथे कशी आली "
" कोणी गाईड आहे का माहिती द्यायला , प्रोफेसर साठे कुठे आहेत "
आनंदने केदारला दिलेल्या उत्तरात त्याची गोंधळलेली आणि तेवढीच अवघडलेली अवस्था स्पष्ट झाली होती.
दुर्मिळ वस्तूंच्या त्या संग्रहालयात लोणार सरोवरातील तरंगणारे दगड , अश्मयुगीन आणि मध्ययुगीन पात्र , सातवाहन काळातील स्थापत्य शैली दाखवणारी काही शिल्प ,अजूनही बऱ्याच प्राचीन गोष्टी होत्या पण या सर्वात अवघ्या पंचवीस वर्षापूर्वी तयार केलेली ही कालभैरवाची मूर्ती असण्याचे ठोस कारण आनंदला समजले नव्हते .
गाईड म्हणून बरीच वर्षे काम करत असलेल्या एका वयस्क माणसाला आनंदने पकडून त्या मूर्तीजवळ आणले आणि विचारले

" ह्या मूर्तीबद्दल सांगा , ही पारगाव वरून इथे कोणी आणली ? "

गाईड थोडासा आश्चर्यचकीत होऊन बोलू लागला
" यु आर ॲप्सलुटली राईट , ही मूर्ती पारगाववरून आणली आहे ."
" तशी ती फार जुनी नाही पण ही ज्याची एकमेव प्रतिकृती आहे ती मूळ मूर्ती खजुराहो मध्ये आहे . ती मूळ मूर्ती पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने इथे आणणे शक्य झाले नाही . पारगावातल्या शिवमंदिरात अगदी तशीच मूर्ती असल्याचे कळाले तेव्हा संग्रहालयाच्या लोकांनी पारगावच्या ग्रामस्थांना मूर्त्तीसाठी विनंती केली . पारगावचे मंदिर दरवर्षी पुराच्या पाण्यात जात होते त्यामुळे अनेक मुर्त्यांची झीज झाली होती , काही तर तुटल्याही होत्या कदाचित त्यामुळेच ग्रामस्थ मूर्ती द्यायला तयार झाले असावेत आणि मूर्ती इथे पोहचली "

" पण तुम्हाला या मूर्तीबद्दल कसे माहिती ? " गाईड म्हणून आलेल्या इसमाने कपाळावर प्रश्नचिन्ह कोरले होते.

" ही मूर्ती माझ्या आजोबांनी बनविली आहे ."

आनंद बोलता बोलता भूतकाळात हरवला . जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या त्या शैक्षणिक सहलीतून तो कधीच तीस वर्षांपूर्वी त्याच्या आजोबांनी चालू केलेल्या मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत पोहचला होता.
" ती तुझ्या पायाजवळची छिन्नी दे इकडे , आणि तांब्या भरून पाणी आण जरा प्यायला "
आजोबांचा तो आदेश हसत हसत पाळणाऱ्या आनंदाला त्याचे बालपण आठवले .
" आजोबा , आता डोळे नि कान काढणार का तुमी , केवढी बारीक हाय ही छिन्नी "
त्याने सहज विचारलेला प्रश्न आणि त्यावर आजोबांनी " कळायला लागलं जणू तुलाबी मूर्तिकाम " म्हणत त्याला दिलेले उत्तर अजूनही आनंदाच्या कानात घुमत होते.

दक्षिण भारतातून मराठी मुलखात स्थायिक झालेल्या या गिरी कुटुंबाची एक वेगळीच कहाणी होती . राजाराम शिल्पकलेत प्रवीण , त्यात द्रविडी आणि हेमाडपंथी दोन्ही प्रकारच्या मंदिर बांधकामाची स्थापत्यशैली तो सहज हाताळत होता . एवढेच नाही तर तो उत्तम मूर्तिकारही होता. पोटापाण्यासाठी त्याने इकडे यावं काय आणि बघता बघता पंचक्रोशीत त्याचे नाव व्हावे काय. मराठी मुलखातही त्याने अनेक सुबक मुर्त्या बनवून विविध मंदिरांना दिल्या होत्या . राजाराम मूर्तिकार मंदिराच्या डागडुगीचे किंवा काही भाग नव्याने बांधायचा झाल्यास त्याचे पैसे घ्यायचा पण कोणत्याच मूर्तीचे त्याने कधीच पैसे घेतले नव्हते . ' देवाला बनविणारे आणि विकणारे आपण कोण ?' असे विचार त्याच्या सुपीक डोक्यात कायमचे स्थिरावलेले होते . या गोष्टीचा अनेकदा आर्थिक फटका बसायचा पण त्याने त्याला फारसा फरक पडला नव्हता कारण वर्षातले आठ दहा महिने त्याच्या हाताला बक्कळ काम मिळत होते . कालांतराने कामाचा व्याप वाढला तेव्हा घराजवळच मूर्ती बनविण्यासाठी त्याने छोट्या जागेत छप्पर उभे करून कार्यशाळा सुरू केली .गावातील काही विद्यार्थी तिथे बांधकाम आणि मूर्तीकाम शिकायलाही येऊ लागल्याने त्यालाही कामात हातभार लागला . आनंद राजारामच्या थोरल्याचा मुलगा म्हणजेच नातू . त्याने लहानपणापासून आजोबांची कला जवळून पाहिली होती. आपल्यालाही अशी कला आत्मसाद व्हावी असे लहान असतानाच त्याला वाटायचे . पुढे वडिलांच्या नोकरीनिमित्त गाव आणि आजोबा दोन्हीपासून आनंद दूर गेला होता. प्राथमिक ,माध्यमिक आणि उच्च शिक्षणातून उसंत मिळेपर्यंत त्याचे आजोबा कोणाला काही शिकविण्याचा अवस्थेत राहिले नव्हते. आनंदला चित्रकला आणि शिल्पकला या दोन्हीत रस होता . त्यात अजून प्राविण्य मिळविण्यासाठी मोठ्या प्रयत्नांनी त्याने जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला प्रवेश मिळविला . आज आजोबांनी बनविलेली मूर्ती पाहून त्याला शिल्पकला केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात आई ,वडील, भाऊ ,काका , मित्र शिक्षक या सगळ्यांना ढकलत परिघाचे बोट धरत माघारी फिरून त्याच मूर्ती प्रशिक्षण कार्यशाळेत गेल्याचा आभास झाला होता.
एव्हाना बराच वेळ शांत उभा असलेल्या आनंदला केदार आणि अनिलने चक्क हलवून वर्तमानात आणले होते.
" काय रे , तू कसे ओळखले , ही मूर्ती तुझ्या आजोबांनी बनविली आहे . इथे तर खाली कोणाचे नावही नाही "
अनिलच्या प्रश्नाने आनंद भानावर आला होता .
" ह्या मूर्तीच्या एकाच पायात तीन कडी आहेत बघ , ही आजोबांची खास पद्धत आहे . पूर्वी मूर्तीवर कोणाचेही नाव किंवा निशाणी कोरण्याची प्रथा नव्हती , तरीही मूर्ती नेमकी कोणत्या कुटुंबाने बनविली हे कालांतराने समजावे यासाठी प्रत्येक कुटुंबाने आपली एक ओळख मूर्तीवर ठेवायला सुरूवात केली . ती आज शेकडो वर्षानंतर चालूच आहे . ही मूर्ती बनवताना पायात कोरलेल्या तीन कड्या म्हणजे आमच्या कुटुंबाची ओळखच आहे. "
" च्यायला , भारीच की, ग्रेट आहेत रे आजोबा तुझे
' शिल्पकार - जी. राजाराम '
ते पहा , मागे भिंतीवर............ छोट्या पाटीवर नावपण लिहिले आहे " केदारलाही आनंदाच्या आजोबांचा अभिमान वाटल्याने तो सहज बोलून गेला .

पर्यटनाची आवड असलेल्या आनंदचा कोडॅकचा कॅमेरा नेहमीप्रमाणे गळ्यात त्याने लटकवलेला होता. आजोबांच्या नावाच्या पाटीचा आणि मूर्तीचा फोटो काढण्याचा मोह आनंदाला तसाही आवरता आला नसता.
' क्लिक..... क्लिक...... क्लिक...... क्लिक.....' चार फोटो काढले गेले .

' आता हे फोटो आजोबांना दाखवू , काय धमाल येईल ' असे स्वतःशी पुटपुटत आनंद त्या रात्री निवांत झोपला . यात्रेच्या निमित्ताने का होईना एका महिन्यानंतर सगळेच काका , चुलत भाऊ त्यांची मंडळी गावाकडे पोहचली . आनंदने गाडीतून उतरताच आजोबांची कार्यशाळा गाठली त्याला खात्री होती आजोबा घरी सापडणार नाहीत , ते अजूनही कार्यशाळेतील मूर्तीं किंवा तिथल्या गराड्यात असतील .
कार्यशाळेचे फाटक एका बिजागिरीतून निसटले होते . धाप टाकत असलेल्या खिडक्या वाऱ्याने कुरकुर करत होत्या . कार्यशाळेची रया गेली होती . यात्रेमुळे आज कोणी शिकाऊ मूर्तीकार आले नसावेत असा अंदाज त्याने बांधला , एकंदरीत लादीवर पडलेला पालापाचोळा , मूर्त्या बनविण्यासाठी आवश्यक असणारे जेमतेम दगड पाहता आनंदाच्या लहानपणी पाहिलेली कार्यशाळा हीच आहे का हा त्यालाही पडलेला प्रश्न होता . आजोबांची भेट होत नाही तोवर त्याच्या परिघाचा प्रवास संपणार नव्हता . कोपऱ्यात मांडलेल्या काळ्याकुट्ट टेबलावर आपले थरथरणारे हात ठेवून खुर्चीवर बसलेले आजोबा बंद खिडकीच्या बारीकशा कवडश्यातून काहीतरी बघण्याचा प्रयत्न करताना आनंदला दिसले तसे त्याने हुरळूनच "आजोबा " अशी मोठ्याने हाक मारली .

" कोण आनंदा का रे , लांब श्वास घेत त्याचे आजोबा उत्तरले
" किती वर्षांनी आला रे बाळा , विसरला का रे तू हे गाव , तुझ्या आजीला आणि मलापण ? "
सणसणीत कानाखाली बसावी अन् टचकन डोळ्यात पाणी यावं अशी अवस्था आनंदाची झाली होती. आज तब्बल पाच वर्षांनी त्याची आणि आजोबांची भेट होत होती . आपण आपल्या शिक्षणात , कामात इतके व्यस्त झालो आहे की आजोबांना भेटायला एवढी वर्षे लागली याची आनंदला लाज वाटू वाटली .
" बरं असू दे , ये बाळा , कशी आहे सुनबाई , बरी आहे ना , पोटुशी हाय ना, काळजी घे " आजोबांनी जवळ घेत आनंदच्या डोक्यावरुन हात फिरवला .
" तू ममईला शिकला नव्ह हे मूर्तीकाम मोठ्ठ्या कालीजात , मग आता हे चालव आपलं गुऱ्हाळ पुढं . "
" तिकडे शहराला बसून चालवलं तरी चालतय बघ "
" इथ जनाबाईचा वशा हाय सांभाळायला . तुला वाटलं तव्हा येत जा आणि बनव की इथपण मूर्त्या . अजून आपल्याकड तीन चारशे मूर्त्या असत्यात बघ वर्षाकाठी करायला . मला काय दिसत नाय आता . बघ तूच काय करायचे ते. "

आजोबांना दाखविण्यासाठी आणलेले फोटो अजूनही आनंदच्या हातातच होते . आधी आजोबांच्या प्रश्नाचे उत्तर देणे त्याला गरजेचे वाटले .
" चालतंय की आजोबा , मी चालवतो ही कार्यशाळा . एवढा हातातला प्रोजेक्ट संपला की मीच येतो इथ्थ कायमचा . आपला वारसा चालवायला पाहिजे.......... "
" तसेपण सगळेच काका आणि बाबा नोकरीला ......त्यांच्याकडून नाय होणार हे पुण्याचं काम "

" बरं ते जाऊ द्या , हे बघा माझ्याकडे कसले भारी फोटो आहेत ते "
हातातले फोटो आजोबांच्या हातात ठेवत आनंद उद्गारला
" थांबा , चष्मा देतो तुमचा ,इथेच आहे ना ? "
आनंदने देवळीच्या बाजूला खुंटीवर लटकलेल्या कापडी पिशवीत हात घातला आणि जाड भिंगाचा चष्मा बाहेर काढला , धूळीचा थर आपल्या सद-याच्या कोपराने पुसला आणि चष्मा आजोबांच्या डोळ्यावर चढवला .
राजारामने ते फोटो पाहताच स्मितहास्य केले . " तुझ्याकडे कसे काय रे फोटो या पारगावच्या कालभैरवाचे "
" किती जुनी झाली आसल आता ही मुर्ती , त्यात पारगावचं मदिर गोदेच्या काठालाच , पाणी लागून झिजली आसल ना ?
" तसं नाही आजोबा , सध्या शाबूत आहे इंदोरात "
घडलेली सर्व कहाणी आनंदाने आजोबांना घडाघडा सांगितली .
" आजोबा , बघा एक दिवस माझी पण मूर्ती अशीच ठेवतील लोकं संग्रहालयात , खाली पाटीपण असेल ' शिल्पकार - जी. आनंद राजाराम ' म्हणून "
राजारामच्या चेहऱ्यावर का कुणास ठाऊक पण तीव्र चमक झळकली , मोठ्याने हसूनच
" व्हय तर , नातू कुणाचा हाईस , पण एक लक्षात ठेव .... "
राजारामाचे वाक्य मध्येच तोडत आनंद मोठ्याने बोलला
" हेच ना , मूर्तीचे पैसे घ्यायचे नाहीत , देवाला बनविणारे आणि विकणारे आपण कोण "
" आंग अशी , सोळा आणे बराब्बर "
पुन्हा एकदा आजोबा नातवाची जोडी खळखळून हसली . आज परिघाचे दोरीचे टोक सुटून दुसऱ्याच परिघाच्या दिशेने सरकत चालले होते.

कार्यशाळेच्या बाहेर बघ्यांची गर्दी झाली होती , आनंदाचे आई , वडील , काका ,भाऊ दुरूनच आनंदाला एकट्याने बडबड करताना पाहत होते. आनंदाचे आणि आजोबांचे घट्ट नाते तसे नात्यातल्या सर्वांनाच माहीत होते. आजोबा देवाघरी गेले तेव्हा आनंद तब्बल दहा दिवस गप्प राहिला होता. त्यानंतर दैनंदिन कामकाज जरी व्यवस्थित चालत असले तरी दिवसातून एकदातरी आजोबांचा विषय त्याच्या तोंडून निघायचा .आजोबा गेल्याचे अजूनही त्याने स्वीकारलेले नव्हते. चार अर्धवट राहिलेल्या भग्न मूर्त्या अजूनही शेवटचा हात लागण्याच्या प्रतीक्षेत होत्या. गंज लागलेल्या छिन्या पत्र्याच्या डब्यात तोंड खुपसून एकमेकाला बिलगल्या होत्या .पाच वर्षापूर्वी जुनाट कुलूपाने बंद केलेले फाटक आनंदाने कुठल्या चावीने उघडले होते की वरून येऊन राजारामनेच हा सगळा खेळ रचला होता हे गूढ शेवटपर्यंत कोणालाच उलगडले नव्हते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
- किरण कुमार , पुणे

Group content visibility: 
Use group defaults