मी दक्षिणात्य चित्रपटांचा आस्वादक कसा बनलो ?

Submitted by ब्लू कोलंबसे on 21 April, 2024 - 04:01

२०१२ – मी तेलुगु गाण्याच्या प्रेमात पडलो. आणि प्रवास चालू झाला.

तेलुगू सिनेमा आणि मी !

मी 2012 मध्ये माझ्या मित्राच्या – ऋषिकेशच्या(धर्माबाद, नांदेड) – तेलूगु गाण्याच्या प्रेमाने ती अवीट गोडीची गाणी ऐकू लागलो. मग ती समजून घ्यावी, म्हणून ती भाषा (अगदी त्याला ‘तेलगू’ नव्हे, तर ‘तेलूगु’ असे म्हणावे इथून) त्याच्या मित्राकडून (त्याचे मुळ गाव – काकीनाडा, आंध्र प्रदेश) शिकू लागलो. तो मुलगा तीन महिन्यांसाठी सीए कोचिंगला पुण्यात आलेला.

त्याकाळात गाण्यांबरोबरच त्यांचे ते ‘हटके’ चित्रपट पाहण्याचाही चसका लागला, विशेषतः मस्त हळुवार लव्ह स्टोरीज ! मग काय, मस्त तेलुगू चित्रपटांची वाट पाहिली जायला लागली. तो मित्र होते चित्रपट PD वर आणून द्यायचा आणि मग मी ऋषिकेशबरोबर माझ्या ‘आसुस मिनी बुक’वर चित्रपट पाहायचो, त्यातली आवडती गाणी 2G कीपॅड मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे आणि मग ते तेलूगु गाणे शब्दासहित पाठ होईपर्यंत ऐकणे सुरू झाले.

कोत्ता बंगारू लोकाम (तेलुगु, अर्थ: नवे सोनेरी जग) चित्रपटातील गाणी आजही तितकीच अवीट गोडीची वाटतात .
तेलुगू चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या स्टोरीज, त्यातल्या VFX,ॲक्शन, गाणी, फ्रेश- कूल म्युझिक आणि त्या गाण्याची भाषा कळू लागल्यामुळे समजत असणारा भावार्थ, यामुळे हिंदी-मराठीपेक्षा तेलुगू चित्रपट अधिक जवळचे वाटू लागले. हळू मराठी-हिंदीचा हात सुटत गेला आणि उत्तम चित्रपटाचा ध्यास असणारी ओढ वेगाने दक्षिणेतील प्रत्येक भाषेतल्या उत्तमोत्तम चित्रपटांचा शोध घेऊ लागली.

2012 पासून 2015 पर्यंत बहुतेक सर्व तेलुगू स्टार्सचे मसाला मूव्हीज आणि उत्तम मनोरंजन करणारे हटके मुव्हीज पाहून झाले होते. त्यातही कोणता दिग्दर्शक काय प्रकारचे चित्रपट बनवतो, (उदाहरणार्थ पुरी जगन्नाथचे GANGSTERपट आणि शेखर कमुल्लाचे विशिष्टपणे विविध फ्रेम्स एकत्र जोडणारे आणि तरुण विषयाचे चित्रपट),कोण तेलुगू सिनेमात प्रयोग करतो आणि गाण्यातील उत्कृष्ट स्टेप्स कशा प्रत्येक तेलुगू चित्रपटात महत्त्वाच्या असतात, हे एव्हाना कळू लागले होते.

मग एकदा त्यातील ‘ दे मार’, सुपरस्टारर चित्रपट आणि आणि हटके, नव्या दमाच्या कलाकार-दिग्दर्शकाचे प्रयोगशील, असे माझ्या चित्रपट निवडीत दोन तट पडले. मग जुने कल्ट तेलूगु सिनेमेही पाहिले. त्याच वेळी त्यांच्या आघाडीच्या स्टार्सचे नविन चित्रपटही न चुकता भक्तिभावाने पाहत होतोच.

त्याच वेळी काही तेलगू चित्रपटांचे ‘विकी’अध्ययन करत असताना असे समजले की, बरेच फेमस, यशस्वी तेलुगू चित्रपट आपले मूळ तमिळ भाषेतील चित्रपटात दाखवतात. तर अशा रिमेक करणाऱ्या या तेलुगू चित्रपटांचे मूळ त्यामुळे चित्रपट पाहण्याची इच्छा मनात उत्पन्न झाली. मात्र या अगम्य (तमिळ) भाषेत मी पुढे जाऊन साक्षर होईल याची कणभरही कल्पना त्यावेळी नव्हती.

तामिळ सिनेमा आणि मी!

मग पुन्हा हा चित्रपट पाहण्याचा अति दक्षिणेकडचा प्रवास सुरू झाला.

तमिळ सिनेमा !

डझनाहून अधिक तेलुगू चित्रपट पाहिल्याने आणि त्याला सबटायटल्सची जोड असल्याने तेलूगु भाषा ‘पोटापुरती’ (इथे सिनेमा पाहण्यापुरती) जमू लागली. तेलूगु एवढे जमत असल्याने तमिळ चित्रपट सबटायटलसकट पाहताना 15 टक्के उत्तम कळायचे. म्हणजे तेलूगु – निजम या शब्दाचा अर्थ खरे, आणि हा उच्चार व अर्थ तमिळमध्येही तोच ! त्यामुळे तमिळ चित्रपट तोडकेमोडके का होईना, कळू लागले. माझ्या या त्या (काकिनाडाच्या) मित्राने ही तमिळ भाषा बरीच अवघड आहे, असे सांगितले होते, मात्र मी मराठी होतो, कन्नडा अर्धी मातृभाषा होती आणि ती तेलुगूची बहीण, मग एवढ्या फौज फाट्यानिशी तमिळ शिकणे अवघड नव्हते. मग काय, निघालो या अतिप्राचीन भाषेतील अनवट चित्रपटांचा धांडोळा घेण्यासाठी, इंटरनेटचा हात धरून !

सुरुवातीला तमिळ चित्रपटांसाठी चुकीच्या स्पेलिंग मुळे वेगळेच चित्रपट येऊन बसायचे laptop मध्ये, कालांतराने काही उत्तम website मिळाल्या, ज्यांनी योग्य आणि क्लासिक फिल्म्स पदरात टाकायला सुरुवात केली. Best/Must watch/10 top Tamil Films असे सर्च करून ती लिस्ट तेव्हा(२०१२-१३) अक्षरशः बाजूला कागदावर लिहून काढायचो आणि एक एक donwload करून पाहायचो. २०१५ साली अपुऱ्या साधनांमुळे व संथ ३G स्पीडमुळे प्रचंड मेहनत असायची एखादा चित्रपट पाहण्यासाठी. एखादी हमखास आणि योग्य तोच चित्रपट देणारी website मिळाली की, लागलीच तिला बुकमार्क करून तिच्या सर्चबार वर कागदांवर लिहिलेल्या चित्रपटांचा रतीब लावायचा.

Subtitle मिलना : समंदर में खसखस …

कधी कधी चित्रपट मिळाला, तरी तो असायचा DVD Rip प्रकारातला, म्हणजे क्वालिटी उतम, पण subtitle नाहीत. मग पुन्हा त्यासाठी पुन्हा सर्च बारवर बोटे आपटून आपटून, हर एक subtitle त्या मूळ चित्रपटाच्या वेगाशी जोडून पाहायचं, या खटाटोपात ५-१० subtitle च्या झिप filesची रास फोल्डरमध्ये साचून राहायची. दरवेळी ही match making करताना भाषेचं अल्प ज्ञान कमी यायचं, कारण त्यामुळे योग्य subtitle file निवडणं सोपं जायचं.

याकाळात तेलूगु भाषेतले चित्रपट आता मी अलगद subtitle चा हात सोडवून पाहू लागलो. २०-३० चित्रपटांनंतर ठराविक रोजच्या वापरातील cinematic शब्दांची ओळख पटू लागली. काही वेळा हव्या त्या तेलूगु/तमिळ चित्रपटाचे dubbed हिंदी version YouTube वर सहज मिळायचे, मात्र तो आतून येणारा ‘वरीजीनल’चा आग्रह इतका प्रबळ असायचा की, मी या dub मालाला – चित्रपट हा माझ्या must watch लिस्ट मधला असला, तरीही – हात ( इथे वाचा ‘डोळे’) लावायचो नाही. त्यामुळे कित्येक must watch चित्रपट आजही पहिले नाहीत. (आता लवकरच बघेन).

अखेर तमिळवर subtitle च्या सहाय्याने ‘हात’ बसायला लागला. तमिळ चित्रपटांची जातकुळी त्यांच्या तेलूगु भाऊबंदाप्रमाणे (मुख्यतः व्यावसायिक) असली, तरी नव्या दमाचे प्रयोग उत्तम व्हायला सुरुवात होऊन इथे बरच काळ लोटला होता. Aaranya Kaandam ,Kaka Muttai, सारखे चित्रपट वरचेवर बनायला सुरुवात झाली होती. हे तमिळ चित्रपट प्रेम वाढत असताना एका वर्षी जून २०१३ मध्ये कॉलेजमधून चेन्नईमध्ये महिनाभर इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. मग काय, तिथून एका आठवड्यात आपल्या master लिस्ट मध्ये असलेल्या, तिथे मिळतील तेवढ्या CD, DVD आणण्याचा सपाटा सुरु झाला. पुन्हा घरी आपल्यावर त्यातल्या बऱ्याचशा CD गंडलेल्या होत्या, वरच्या पोस्टर पेक्षा दुसऱ्याच वेगळ्या तमिळ फिल्म आत असायच्या. तरी काही मात्र बरोबर मिळाल्या. पुन्हा मग तमिळ मधील कमल, रजिनी पलीकडची, तरुण रक्ताची कलाकार-दिग्दर्शक मंडळी दिसायला लागली.

इलैराजापलीकडे असणारा अन नेहमीच ताजा भासणारा रहमान, युवान शंकर राजा, हरीस जयराज, तमन आणि विजय अंटोनी माझ्या मोबाईलची प्लेलीस्ट व्यापू लागले. मग त्यांचा cult/classic/Hit आणि ‘दे मार’/व्यावसायिक आणि मग शेवटी ‘हटके’ प्रयोगशील सिनेमा पाहून झाला. मग स्टार्सच्या चालू रिलीजची इत्यंभूत माहिती ठेवू लागलो. धनुष, विचारी चित्रपट करणारा सूर्या, कार्ती, विजय दलपती आणि विजय सेतुपति आदींचे चित्रपट नित्यनेमाने शोधून पाहू लागलो. (२०१५)

मराठी हिंदी चित्रपट आता इतके मागे राहिले होते की, माझ्या दृष्टीपार होते. एखाद दुसरा अपवाद; जास्तीत जास्त ‘सैराट’ किंवा अनुराग कश्यपचा ‘मुक्काबाज’ सोडला ,तर त्या काळात ओढ हा या तरुण, ताज्या दमाच्या, फ्रेश कथानकाच्या आणि कष्टाळू अशा तमिळ, तेलुगू चित्रपटांसाठीच होता.

आता ‘तमिळ’मध्ये स्थिरावलो (2015). पुढे काय, तर मल्याळम ! (त्यावेळी या भाषेचा नावाचा उच्चार ‘मलयाळम’ असतो, हे माहीत नसण्याचा तो काळ!) 2016 मध्ये मला दक्षिण तमिळनाडूमधील तिरूनेलवेली या जिल्ह्यात उमेदवारीची (इंटर्नशिपची) संधी तीन महिन्यांसाठी मिळाली. तिथे आत्तापर्यंत ग्रामीण तमिळनाडू, जे चित्रपटात पाहिले होते, ते प्रत्यक्षात अनुभवता आले. मुख्य म्हणजे शहरी व ग्रामीण तमिळ बोलण्याचा तीन महिने उत्तम सराव झाला. इंग्रजी मध्ये पाट्या नसल्याने तमिळ वाचन लेखन सुधारले. मीही या कामाचा आणि वास्तवाचा पुरेपूर फायदा उठवत तमिळ भाषा लिहा-वाचायला-बोलायला शिकून घेतली. याचा फायदा पुढे चित्रपट बघताना, मलयाळम शिकताना किंवा पुढे चित्रपट पाहत असताना त्याची संस्कृती व कथेचा भूगोल समजण्यासाठी खूप मदत झाली.

(मी तमिळ साक्षर कसा झालो याची ब्लॉग लिंक) https://experienceandinsights.wordpress.com/2020/02/11/%e0%a4%ad%e0%a4%b...

2016 ची पावसाळी रात्र ! मी ‘चार्ली’ हा पहिला मलयाळम चित्रपट पहिला आणि मी सुखावलो. त्याकाळी दिवसभर आणि रात्रभर तमिळ चित्रपटाचा रतीब चालू होताच. आता मलयाळम चित्रपटांकडे वळण्याची दोन प्रमुख कारणे होती :-

एक. बहुतांशी चित्रपट हे विकिपीडियावर मलयाळम चित्रपटांचे अधिकृत रिमेक दर्शवत होते.

दोन. कमिंग ऑफ एज चित्रपट म्हणून ‘प्रेमम’ आणि ‘चार्ली’चा फेसबुकवर लिहिलेला सौरभ पाटीलचा रिव्ह्यू पाहून मला मलयाळम चित्रपटामध्ये काहीतरी फ्रेश नक्कीच आहे, हे जाणवले.

पुन्हा मूळ चित्रपट पाहण्याची इच्छा म्हणून मलयाळम चित्रपटांकडे वळलो. तमिळमध्ये मारधाड/फॉर्म्युलाबाज कमर्शिअल चित्रपट खूप जास्त प्रमाणात होते. मलयाळम चित्रपट हे वेगळेच प्रकरण होते. मराठी सारखे घट्ट कथाबीज, उत्तम छायाचित्रण आणि स्टार किंवा फॉर्म्युला चित्रपटाच्या पलीकडे जाणारे हे आशयघन चित्रपट होते. तमिळ भाषा आता चांगलीच शिकलो असल्याने 15% मलयाळम समजत होतीच. म्हणजे तमिळ मधील ‘कोण’(yaar),’मी’(naan), ‘जीवन’(vaazhakai), थोडे’(konjam), हे शब्द मलयाळममध्ये अर्थासकट सारखेच होते. या सर्वनामांचे आणि शब्दांचे साधर्म्य असल्याने मजा आली शिकताना.

मलयालम चित्रपट : कलेचा अत्युच्च अविष्कार !

आणि मी ‘खऱ्या’ चित्रपटांच्या दुनियेत प्रवेश केला. काय ती अप्रतिम कथाबांधणी. ते gods own country चे सुंदर लोकेशन्स, उत्तम दर्जाची, न चोरलेली, ओरिजनल गाणी, संगीत, दुलकर, निवीन फहादचे संयत अभिनय दर्शन आणि आशिक अबु, लीजो जोस, विमल सारखे प्रयोगशील तरुण दिग्दर्शक. जोडीला बिजीबल, शान रेहमान, गोपी सुंदरसारखे गाणी देणारे संगीतकार. पण या सर्वांवर कडी म्हणजे अतिशय चोखंदळ व भरभरून, मात्र विवेकी असे प्रेम देणारे मलयाळम प्रेक्षक ! यांच्या धाकातल्या प्रेमाने उत्तमोत्तम (आणि अधिक उत्तम) चित्रपटांची निर्मिती तेथे होत होती आणि अशा चित्रपटांची रीघ माझ्या laptop मध्ये लागली.

2016-17 पूर्णपणे मलयाळम चित्रपटांनी वेढून गेले. मग ते जुने (२०११ पर्यंतचे) टॉप टेन, must watch वाले सर्च, मलयाळम चित्रपटांसाठी गुगलवर टाकले जाऊ लागले आणि नवनवे, प्रयोगशील चित्रपटांचे पेटारे खुले होऊ लागले. माझा मलयाळम चित्रपट आस्वादाचा प्रवास तोपर्यंत चालू राहील, जोपर्यंत मलयाळमची प्रयोगशीलता चालू असेल आणि आज 2021 साली याबद्दल लिहितानाही मी तितकाच मल्याळम चित्रपटाचा तितकाच fan आहे जितका 2016 साली होतो.

… आणि हे नोंदवण्यास आनंद वाटतो की, २०११ पासून हा कमिंग ऑफ एज सिनेमा मलयाळममध्ये येण्यास सुरुवात झाली. त्याआधी त्यांचे 1980-90 मधले ‘अदुर बालकृष्णन’वाले सुवर्ण क्षण संपून 2000 ते 2010 मध्ये तमिळसदृश मारधाडपट चालू होते किंवा लव स्टोरीचा रतीब. मामुक्का-मोहनलाल आपल्यापरीने कमर्शियल आणि एखादा चिवड्यातल्या शेंगदाण्याप्रमाणे एखादा क्लासिक/हटके चित्रपट करायचे. मात्र 2011 नंतर, विशेषतः ‘साल्ट न पेपर’ या चित्रपटानंतर या चित्रपटसृष्टीने कधी मागे वळून बघितले नाही आणि मग लोकडाऊनमधील ऑगस्ट २०२० मध्ये ॲमेझॉनवर रिलीज झालेला ‘सी यू सून’ आणि अगदी आत्ताआत्ताच्या ‘जोजी‘ (२०२१) या चित्रपटापर्यंत ही त्यांची प्रयोगशील मालिका आणि उत्तमोत्तम विषयाच्या चित्रपटांच्या निर्मितीचे शिखर हे चित्रपटसृष्टीशी पादाक्रांत करत राहिली. 2012 पासून सर्व भाषांमधील प्रयोगशील किंवा cult गाणी मी ड्राइव्हवर जपून ठेवली. प्रत्येक भाषेतील ‘बाप’ संगीतकार नवनव्या धून बांधत गेला आणि मी त्याच्या प्रेमात पडत गेलो.

कुंबलांगी नाईट्स (मलयाळम) मधला ‘शाजी’ नेहमीच त्याच्या weird नजरेमुळे लक्षात राहतो. फहादने मोठ्या खुबीने विक्षिप्त शाजी रंगवला आहे.
माझा असुस मिनी नोटबुक 45 मलयालम, 55 ते 70 हून अधिक तेलूगु चित्रपटांनी भरला होता. तो मधल्या काळात पूर्ण करप्ट झाला. त्याच वेळी मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती आणि त्यासाठी काही लिखाणही ड्राइव्हवर करून ठेवतो.

पुढे माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनमुळे म्हणून मी एक वर्ष या सर्वांपासून दूर राहिलो. आता 2020 मध्ये मात्र लोकडाऊनच्या काळात ‘सिनेमा गल्ली’मधून खूप वर्षांनी या दाक्षिणात्य चित्रपटांच्या आठवणी जाग्या झाल्या आणि माझ्यासारखेच अनेक भाषांमधील चित्रपट रसिक मला तिथे भेटले . मी या दाक्षिणात्य भाषा चित्रपटांचा आस्वादक कसा झालो, हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला, मग मी तो स्वतःला विचारला आणि या गोष्टीचा मागोवा घेण्याची सुरुवात झाली आणि त्यातूनच हे लिखाण आकारास आलं.

राष्ट्रीय पुरस्कार कृत चित्रपट, दाक्षिणात्य वरचष्मा आणि सुवर्ण कमळ

2011-12 च्या सुमारास ‘सुवर्ण कमळा’चा परिचय झाला आणि मग विकिपीडियाच्या यादीत मराठी ‘देऊळ’, ‘एलिझाबेथ…’ , ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ बरोबरच इतर विभागात बरेच तमिळ, मलयाळम आणि क्वचित कन्नडा व बंगाली सिनेमा दिसायचे. मग त्यांची कथा विकी..च्या पेजवर जाऊन वाचू लागलो. (तेव्हा २G होतं.) त्यातून अजून चित्रपट पाहण्याचा इंटरेस्ट वाढायचा. पुढे Must Watch..सर्च करण्याआधी हे दरवर्षीचे सर्व विभागातील उत्तम चित्रपट शोधायचा नादच लागला. त्यांचा प्लॉट पहिल्यांदा वाचायचो. खूप आवडला तर, मिळालेल्या data मधून त्याचा ट्रेलर पाहायचो, मग एखादं गाणं पाहून त्यातून ती कथा समजून घ्यायचा आटोकाट प्रयत्न करायचो. चित्रपट तर सहजी मिळायचा नाही, एकदम कल्ट क्लासिक असायचा; त्यामुळे युट्युब वरची गाणी पाहून तो समजून घ्यायचा आटोकाट प्रयत्न व्हायचा.

बऱ्याच प्रादेशिक भाषेतील अप्रतिम चित्रपटांनी गेल्या दशकात (२०११-२०) खूप आनंद दिला.
हा मार्ग मला हळूहळू दर्जात्मक चित्रपटांची दारे उघडू लागला. कालांतराने गल्लाभरू तेलूगु चित्रपटांबरोबरच क्लासिक दाक्षिणात्य चित्रपटही आता मनाची जागा व्यापू लागले होते.

ॲमेझॉन, नेटफ्लिक्स आणि ओटीटी

याच काळात या हे चित्रपट आणि वेब सिरीज बघणं सहज साध्य केलं स्मार्टफोन – फोरजी – टेलीग्राम अकाउंट यांनी. आणि या सर्वांची एकजूट मला या तीनही इंडस्ट्रीजबद्दल अपडेट देण्यात आणि नवनवे चित्रपट पाहण्यास सहाय्यकारी ठरली.

(हा लेख मी सिनेमा गली (Public Group on Facebook) जॉईन केल्यावर सप्टेंबर २०२० मध्ये लिहिला आणि तो टायपायला एप्रिल २०२१ उजाडलं. पुढे मी ब्लॉग लिहायला चालू केला. त्याचवेळी पाहिलेल्या जवळपास १००० बहुभाषिक सिनेमांबद्दल पुढच्या आयुष्यात लिहीन. या बहुभाषिक चित्रपटांची नावेही मी माझी व्यवस्थापकीय कौशल्ये वापरून एकगठ्ठा एक्सेल शीटमध्ये सेव केली आहेत.)

Group content visibility: 
Use group defaults

Nanpakal Nerathu Mayakkam
हा सिनेमा बघितला आहे का?

छान लिहिलाय लेख आणि रिलेट झाला कारण मी पण साऊथ सिनेमे पंखा....वर उल्लेखलेले सगळे चित्रपट पाहिलेत

कोत्ता बंगारू लोकाम (तेलुगु, अर्थ: नवे सोनेरी जग) चित्रपटातील गाणी आजही तितकीच अवीट गोडीची वाटतात .">>>> यातली गाणी अजूनही रिपीट मोडवर असतात..

Nanpakal Nerathu Mayakkam>>>> मी पाहिलाय..माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक..मामुट्टी कमाल आहे यात..

Nanpakal Nerathu Mayakkam पाहिला आहे. आणि भयंकर आवडला. तमिळ व मल्याळी मातीच्या प्रादेशिक व भौगोलिक संस्कृतीशी परिचय असला, तर हा चित्रपट बघण्याची लज्जत न्यारीच! मला लिजो जोस पेळ्ळीशेरीकडून असा सुंदर आणि त्याच्या आधीच्या चित्रपटापेक्षा अनोखा असा हा अनुभव अगदीच अपेक्षित नव्हता!

सुंदर लेख. लेखाचा पुढचा भाग - आवडलेल्या चित्रपटांची यादी आणि त्यात काय आवडले हे सांगितले तर वाचायला आवडेल.

खतरनाक .. _/\_
अगदी अस्सल चित्रपट प्रेमी आहात
मलाही आवडतात दक्षिणेकडचे चित्रपट.. पण भाषा शिकायची हिंमत नाही.. साधे सब टायटल वाचायचा सुद्धा आळस.. त्यामुळे मी हिंदी डब च बघतो.. त्या ओरिजनल ची मजा नाही हे खरे असले तरी ठिक आहे.. तेवढेच वेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि कलाकार बघितले जातात.. माझ्यासारखे असे जगात बरेच जण आहेत जे फेसबुक वर एखादी क्लिप बघून युट्युब वर तो पिक्चर शोधायला जातात.. नेटफ्लिक्स वर सुद्धा मी हिंदी डब ऑडियो आहे का चेक करत असतो.. जिथे सापडतो तर बघतो.

सुंदर लेख. लेखाचा पुढचा भाग - आवडलेल्या चित्रपटांची यादी आणि त्यात काय आवडले हे सांगितले तर वाचायला आवडेल.<< धन्यवाद. मी सर्व देशांतील व सर्व भाषांमधील पाहिलेल्या चित्रपटांची यादी व इतर बऱ्याच
चित्रपटसंबंधी गोष्टी एका ओपन एक्सेल शीटमध्येठेवल्या आहेत. ती लिस्ट खूप मोठी आहे. टप्प्याटप्प्याने रिलीज करण्याचा प्रयत्न करेन. चित्रपटाबद्दल लिहिताना चित्रपट/सीन/गाणी यात त्यांनी काय वेगळं केलं व ते कसं भन्नाट होतं हे लिहायला आवडेल. नक्की लिहीन. (बराच मजकूर माझ्या ब्लॉगवर आहे. लिंक - https://experienceandinsights.wordpress.com/category/%e0%a4%ac%e0%a4%a6%...)