होम स्टे/ बजेट हॉटेल्स आणि रेस्टोरंट सुचवा

Submitted by अजिंक्यराव पाटील on 19 April, 2024 - 13:46

नमस्कार मायबोलीकर..
येत्या 2 महिन्यात पुणे ते गोवा आणि परत असा प्लॅन आहे. 8 ते 10 दिवसांचा विचार आहे. आम्ही 2 जोड्या स्वतः च्या गाडीने प्रवास करणार आहोत. खालील ठिकाणी/ जवळपास होमस्ते, हॉटेल आणि रेस्तरांत सुचवा.

पहिला मुक्काम: हरिहरेश्वर/श्रीवरधन/ बागमंडला भाग

दुसरा: बागकर हाऊस MTDC मुरुड हर्णे जवळ ठरतंय, उपलब्ध नसल्यास इतर option असावेत.

तिसरा: गणेशगुळे

चौथा: धामापूर/ मालवण तारकर्ली

पाचवा: गोव्यात कुठेही चालेल (दोन दिवसासाठी)

सहावा: कोल्हापूर

सातवा: महाबळेश्वर

गोवा आणि महाबळेश्वर साठी 2000 पर्यंत आणि इतर मुक्कामात त्याहून कमी बजेट असेल. बजेट बाहेर असेल तरी नक्की सुचवा. बदल्यात मी एक पुणे ते पुणेची छान सर्व पर्यटन स्थळांची लिस्ट आणि अनुभवांचं बैजवार वर्णन नक्की देईन!

Group content visibility: 
Use group defaults

(अवांतर प्रतिसाद)
पाच समुद्रकिनारे लागोपाठ कशाला? तारकर्ली येथे कर्ली नदीतून हाऊस बोट फिरवत होते(केरळ - बॅकवॉटर्स पद्धत)ते बहुतेक करायचे असेल. पण त्या सोयी अजून सुरू आहेत का?) अन्यथा तेच तेच समुद्रावरचे खेळ सर्व ठिकाणी.
एक समुद्र किनारा एक डोंगर हिल स्टेशन आणि एक धार्मिक ठिकाण एवढं ठीक आहे. कोकणात खाड्या ओलांडण्यासाठी फेरी बोटी आहेत त्यांचा अनुभव घ्यायचा असावा. बाकी आता उन्हाळा आणि सुट्ट्या असल्याने कोल्हापूर (पन्हाळा), महाबळेश्वर येथे चांगली हॉटेल्स भरलेली असणार किंवा महाग असणार.

खरं आहे, पण इथंच मागे चर्चा झाली होती कि प्रत्येक किनारा, प्रत्येक ठिकाणचा समुद्र वेगळा असतो. हरिहरेश्वर, श्रीवर्धन, गुहागर बीच शांततेसाठी आवडतात, पाळंदे बीच वर फोटो खूप छान येतात ह्या बीच ची खासियत म्हणजे बराच उथळ भाग.. संध्याकाळी प्रकाश परावर्तित होतो आणि मिरर इमेज सारखे फोटो येतात.. दाभोळ वरून खाडी पार केल्यावर गोपाळगड, अंजनवेल म्हणजे कड्यावरन अथांग सागर दर्शन!
अंजनवेल दीपगृहाच्या बाजूला एक hidden place आहे, डोंगर कडा.. जवळपास 100, 150 मीटर तरी उंच असेल, त्या कड्यावर बसायचं, खाली काही घळी तयार झालेल्या आहेत कातळात, त्यात जेव्हा लाटा जोरदार येऊन फुटतात तेव्हा येणार गुप्प असा आवाज, उसळणार पांढरेशुभ्र पाणी, या महान निसर्गात आपण किती यकश्चित आहोत याची होणारी जाणीव! धामापूर - समुद्रव्यतिरिक्त असलेलं कोकण बद्दल इथेच वाचलं होतं, तेव्हापासून इच्छा आहे जायची, मालवण तारकर्ली water sports साठी, आणि गोवा असंच, गोव्यासाठी!

धामपुर ला अवश्य जाऊन या.. तिथल्या वातावरणाच्या प्रेमात पडाल... चिवला बिच वर जा.. साळगावकरांचे गणेश मंदिर जरुर भेट द्या..

अर्णे पेक्षा कर्देला मुक्काम चांगला राहील. किनारा हॉटेल म्हणून एक सी फेसिंग रूम्स असलेले हॉटेल आहे. बाहेर गार्डन मधे जेवायची सोय आहे. आजूबाजूला राहण्यासाठी कॉटेजेस आहेत. मुरूडला समुद्राला लागूनच कॉटेज रेस्टॉरंट कम लॉज आहे. इथे मच्छीखाऊ आणि मद्यप्रेमींचा मुक्काम असतो. नावे लक्षात नाहीत आता. दापोलीला राहिलात तर कृषीविद्यापीठाच्या जवळच एक सुरेख बंगला आहे. स्टाफ आहे.जेवणाची व्यवस्था आहे. प्रत्येक रूमला अ‍ॅटॅच्ड टॉयलेट बाथरूम आहे. नाव लक्षात नाही. चौकातले जे फेमस रेस्टॉरंट आहे त्याच्या मागच्या लेनमधे शेवटी आहे.

दापोलीत राहणे सोयीचे पडते. जेवणाची सोय. संध्याकाळी मार्केट मधे फिरता येते. आणि दोन्ही बाजूचे किनारे चारचाकी वाहनातून पाहता येतात. आम्ही पहाटे पाचच्या आधी निघून केळशी, कर्दे, हर्णे मुरूड असे फिरायचो. पहाटे लवकर गेल्यास हिवाळ्यात डॉल्फिन्स बघायला मिळतात.

गोव्याला कलंगुट बीच जवळ कामत हॉलिडे होम आहे तिथे राहिलो होतो, वीस वर्षांपूर्वी. 2 BHK अपार्टमेंट मिळते रहायला. स्वतःची गाडी असेल तर चांगला ऑप्शन आहे. पणजी पासून चाळीस किलोमीटर आहे पण.

असेच अजूनही अपार्टमेंट स्टे हॉलिडे होम असतील, तुम्हाला सोयीस्कर ठिकाणी चौकशी करा.

जुजबी सोयी पण माफक दरात चालणार असतील तर
गुहागरास दुर्गादेवी देवळाच्या आवारात भक्तनिवास आहे. दिवसभर भटकंती असताना रात्री निवारा व स्नानादि गोष्टींपुरेशी सोय म्हणून हा चांगला पर्याय आहे. विशेषतः समुद्रकिनारा अगदी जवळ आहे. तसा तो गुहागर च्या सगळ्या लॉजिंग वस्तीला जवळपास असतोच म्हणा. फक्त इथे जरा वेळ, बुकिंग ची वेळ नियमावली वगैरे आहे. हवं असल्यास विपूत सांगू शकेन. गेल्या आठवड्यात तरी गुहागर, हेदवीला फार गर्दी नव्हती.

नक्की सांगा प्राचीन, या बद्दल एक व्हिडिओ पाहिल्याचे आठवतेय..

धन्यवाद मानव.. वीस वर्षांपूर्वी म्हणजे बरीच जुनी गोष्ट झाली, तपास करतो. एक दिवस पूर्व आणि एक दिवस पश्चिम गोव्यासाठी ठेवायचा विचार आहे.

आचार्य, दापोलितल्या बंगल्याचे डिटेल विपु करता येतील का.? आमच्यासोबत एक जोडपे हनिमून कपल आहेत. तर मद्य वगैरे पासून लांबच राहायचा प्रयत्न आहे