वटवृक्ष!

Submitted by मार्गी on 18 April, 2024 - 02:09

आज १८ एप्रिल. माझे आजोबा तीर्थस्वरूप नारायणराव वेलणकर अर्थात् नाना आजोबा जाऊन १४ वर्षं झाली. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. वस्तुत: आजोबांबद्दल नातवाने बोलणं म्हणजे एखाद्या नवोदित कलाकाराने हरिप्रसाद चौरासियांसारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल बोलणं आहे! कारण आम्ही नातवांनी जे आजोबा पाहिले ते त्यांचं शेवटच्या टप्प्यातलं रूप होतं. अस्ताला जाणार्‍या मंदप्रभ सूर्याला बघणं होतं. त्या तुलनेत मुलगा- वडील हे नातं जास्त जवळचं आणि अनेक गोष्टी दीर्घ काळ समान प्रकारे अनुभवणारं. एकमेकांना जवळून अनुभवण्याची संधी‌ देणारं. पण कधी कधी जास्त प्रखर आणि त्यामुळे डोळ्यांवर अंधारी आणणारंसुद्धा. जशा खूप लांबच्या गोष्टी दिसू शकत नाहीत, तशा खूप जवळच्याही गोष्टी अनेकदा दिसू शकत नाहीत अशी काहीशी स्थिती असलेलं मुलगा- वडील नातं. त्या तुलनेत आजोबा- नातू किंवा नात हे काही बाबतीत जास्त सुखद नातं. प्रखर सूर्याचं सौम्य झालेलं तेज आणि अंतरामुळे वाटणारी ओढ!

वयातलं अंतर आणि आयुष्यातले मोठे फरक असले तरी ह्या वटवृक्षाची सावली आणि शीतलता नातवांना व नातींनाही अनुभवायला मिळाली होती. लहानपणीच्या त्यांच्या आठवणी अजूनही मनात येतात. डोळ्यांपुढे स्पष्ट दृश्य येतं, ते सकाळच्या वेळी गच्चीत सूर्यनमस्कार घालत आहेत. शाखेत जाणं, लोकांशी बोलणं, त्यांच‌ं सततचं लिहीणं अशा गोष्टी शिस्तबद्ध पद्धतीने करत आहेत. ते तसे इतरांसाठी काहीसे कठोर असले तरी नातवांसाठी मात्र अतिशय सौम्य. तब्येत ठीक नसली तर सोबत बसणारे किंवा आई- बाबांकडे काही हट्ट करायचा असेल तेव्हा लगेचच मदतीला तत्पर असलेले!

त्यांनी सिव्हिल इंजिनिअर म्हणून केलेलं काम, त्यांचं सामाजिक काम आणि त्यांनी जोडलेली माणसं ह्यांची फार कल्पना लहानपणी कधीच आली नाही. कारण अनेकदा गोष्टी कळायला काँट्रास्ट लागतो. आपल्याकडे जे चालतं, तेच जगात चालत असलं पाहिजे असं वाटायचं. त्यामुळे ते कोण होते, कसे होते आणि आमचेच नाही तर इतर किती अनेकांचे वटवृक्ष होते, ह्याची स्पष्ट जाणीव खरं तर ते गेल्यानंतर लोकांच्या भावना बघूनच झाली. ते गेले त्यावेळी प्रा. शेषराव मोहिते ह्यांनी त्यांच्या आठवणी खूप सुंदर लिहील्या होत्या. वेगळी‌ विचारधारा व वेगळ्या पिंडाचे असूनही आजोबा त्यांना किती जवळचे वाटले व त्यांच्यात आणि आजोबांमध्येही वयाचं मोठं अंतर असूनही ते कसे मित्र बनले होते ह्याबद्दल त्यांनी छान लिहीलं‌ आहे. त्यांचा लेख http://niranjan-vichar.blogspot.com/2010/04/blog-post_25.html इथे वाचता येऊ शकेल.

आजोबांचा जन्म १९२४ चा म्हणजे हे तसं शतक महोत्सवी वर्षं! त्या काळी ते सिव्हिल इंजिनिअर झाले व संघकाम करण्यासाठी म्हणून नागपूर सोडून १९६० च्या सुमारास परभणीमध्ये राहायला आले. व्यवसाय करत संघाचं व इतर सामाजिक काम करत राहिले. पुढे वेगवेगळ्या संस्थांच्या जडण घडणीत त्यांनी हातभार लावला. परभणीतल्या योग मित्र मंडळाच्या कामातही ते सक्रिय होते. त्यांच्या प्रेरणेतून बाबा, काका, आत्या अशा पुढच्या पिढीनेही सामाजिक क्षेत्रात योगदान दिलं. पण ह्या गोष्टींच्या पलीकडेही त्यांचा ठसा उमटलेला आज जाणवतो. आणि आज जेव्हा जगातला काँट्रास्ट दिसतो तेव्हा हा वटवृक्ष किती खोलवर गेलेला आणि किती उंच विस्तारला होता हे जाणवतं. खरं तर ते दिवस व तो काळ- तो ज़माना वेगळाच होता.

त्याकाळी म्हणजे साधारण १९६०- १९८० च्या परभणीमध्ये घरी अनेक जण नेहमी वार लावून जेवायला यायचे. अनेकांची घरी सतत उठबस असायची. किती तरी विद्यार्थ्यांना आजोबा आणि आजीने मदत केलेली आहे. आजच्या काळाच्या अगदी विपरित म्हणजे तेव्हा जे जे लोक घरी यायचे किंवा बाहेर ज्यांना भेटणं व्हायचं ते सगळे अनोळखी तर नाहीच नाही पण मित्रच असायचे. दुकानदार, घरात किंवा इतर ठिकाणी काम करणारे, शिक्षक, सरकारी कर्मचारी असे सगळे. आजी किंवा आजोबा आणि नंतरच्या काळात बाबा कधी कोणा अनोळखी माणसाला भेटतच नसावेत. इतकी माणसं जोडलेली आणि जपलेली असायची. आणि हे सगळं एफर्टलेस होतं. इतकं त्यांच्यामध्ये ते मुरलं होतं. अगदी सहजपणे ते आजीला संगीताच्या साधनेसाठी प्रोत्साहन द्यायचे व त्यांच्या मुलींना मनासारख्या गोष्टी करू द्यायचे. ही गोष्ट तेव्हाच्या छोट्या गावात काळाच्या खूपच पुढची होती. त्यामुळे बाहेरच‌ं जग बघेपर्यंत हे काही वेगळं आहे हे जाणवलंच नाही.

नातू म्हणून कधी हे इतकं खोल असेल असं तर वाटलंच नाही आणि कधी त्यांच्या असण्याचं बर्डनही वाटलं नाही. हसत खेळत त्यांचं बोलणं असायचं. शाळेतले सगळे शिक्षक आजोबांचे मित्र असल्याचा किती आधार वाटायचा! क्रिकेटच्या मॅच बघण्याची त्यांची आवड. आणि गोष्ट सांगण्याची तर खूप आवड. "निघाले महाराज!" हे दोन शब्द त्यांच्या प्रत्येक गोष्टीत असायचे. आजोबा व आजीसोबत टॉकीजमध्ये जाऊन बघितलेला "हम आपके है कौन!" नंतरच्या काळात ते एकटेच बसून खूप दीर्घ लेखन करत असायचे. अटलजींच्या कवितांचा भावानुवाद, वेगवेगळ्या धार्मिक व सामाजिक विषयांवर खूप लिहायचे.

अस्ताला जाण्यापूर्वी शेवटी शेवटी ह्या सूर्याला विस्मरणाचं ग्रहण लागलं. त्यामुळे कदाचित अनेकांच्या मनामध्ये त्यांच्या विस्मरणाचीच आठवण जास्त लक्षात असेल! पण भले मंदप्रभ झालेला सूर्य अस्त पावल्यानंतर लोकांनी जे बोलून दाखवलं, ज्या आठवणी सांगितल्या त्यातून त्या सूर्याची "प्रभा" किती होती हे कळत गेलं. आज आजोबांना जाऊन चौदा वर्षं झाली असली तरी परभणीतले जुने लोक अजूनही त्यांची आठवण काढतात. ह्या वटवृक्षातल्या पारंब्या आज दूरवर पोहचलेल्या दिसतात.

- निरंजन वेलणकर 09422108376
18 एप्रिल 2024

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहे.
तुम्ही आमचे आडनाव बंधू दिसलात म्हणून जास्त आपुलकीने वाचलं गेलं.

छान लिहिलंय. सूर्याची आणि वडाची , दोन्ही उपमा आवडल्या.
पहिल्यांदाच तुमच्या लेखनात इतके इंग्रजी शब्द वाचले.

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! Happy

@ मनीमोहोर जी, अरे वा, मस्तच!

@ भरत जी, मन:पूर्वक धन्यवाद सर की, तुम्ही माझे लेख इतके वाचता! मी तपासलं. तसे फार इंग्रजी शब्द नाही आहेत. कुठे कुठे प्रवाह व सहजतेच्या गरजेमुळे आले आहेत. Happy

सिव्हिल इंजिनिअर = स्थापत्य अभियंता
काँट्रास्ट = विरोधाभास
एफर्टलेस = सहज
बर्डन = ओझं
मॅच = सामना
टॉकीजमध्ये = चित्रपटगृहात