कृष्णा कॉटेज

Submitted by संप्रति१ on 13 April, 2024 - 22:24

'कृष्णा कॉटेज'

सोहेल खान - मानव
ईशा कोप्पीकर - दिशा
अनिता रेड्डी - शांती
व्रजेश हीरजी- टल्ली
राज झुत्शी- लेखक ऊर्फ प्रोफेसर सिद्धार्थ दास

कट टू :
'कहीं अनकहीं बातें' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. पुस्तकाच्या लेखकानं थोर रशियन लेखक चेकॉव्ह यांच्यासारखी दाढी मिशा राखलेली आहे. भाषणात लेखक सांगतोय की सदर पुस्तकात साडेनऊ लव्ह स्टोऱ्या आहेत.

उरलेली अर्धी कोणती, ते आता या सिनेमाच्या माध्यमातून दाखवणार आहेत.‌

कट टू:
स्थळ जेसी कॉलेज. शुकशुकाट आहे. कॉलेजचे प्राचार्य गुपचूप 'ते पुस्तक' एका अडगळीच्या रूममध्ये टाकून देताना दिसतात.‌ आणि सहकाऱ्यांना कडक सूचना देतात की ही रूम अजिबात उघडायची नाही. आणि नंतर बहुतेक आपल्याला उद्देशून म्हणतात की, कुछ राज बंद ही रहें तो ज्यादा अच्छा है.‌

म्हणजे इथं आता कुतुहल चाळवलं गेलेलं आहे.‌ हे प्राचार्य म्हणजे लगान सिनेमातले 'मुखिया' आहेत, बाय द वे.

त्रिकोणी चेहरा व अमानवी नाक असणारा मानव चार वर्षं अमेरिकेत काढून परतलेलाय. तो, त्याची गर्लफ्रेंड शांती, ईशा आणि मित्र टल्ली, अक्षय, कबीर, नुपूर वगैरे आता जेसी कॉलेजमध्ये कसलंतरी शिक्षण घेतायत.

विद्यार्थी दशेत असलेल्या मानव-शांतीची सगाई होतेय.
सगाई दरम्यानच आकस्मिक भयकारी बॅकग्राऊंड म्युझिक निर्माण होऊन एक झुंबर खाली कोसळतं. मानव हवेतल्या हवेत एक छलांग मारून दिशाला वाचवतो.
आता सगाई मध्येच सोडून सगळेजण दिशाला घरी सोडण्यासाठी चाललेत. परंतु अचानक बर्फाची एक पारदर्शक भिंत गाडीपुढे येते आणि अपघात होतो. जवळच असलेल्या सुनसान हवेलीत हे लोक जातात. तिथं वाऱ्यानं उडणारे पडदे, भिंतीवर टांगलेली पेंटींग्ज खाली कोसळणं, मागनं कुणीतरी दबक्या पावलांनी येऊन गळा दाबणं, हूल देणं, गाडीच्या टायर्समध्ये अचानक बॉम्बस्फोट होणं, वगैरे सगळे प्रकार घडतात.

हे सगळे वेडे चाळे दिशाचा बॉयफ्रेंड श्री.अमर खन्ना करत आहे. त्याचं पूर्वीच निधन झालेलंय परंतु तो अजूनही दिशाला ताप देत आहे. जीव रेंगाळतो मानसाचा. काय करणार.!

उषा नाडकर्णी तिथंच रस्त्यावर येरझाऱ्या घालत आहेत. 'ये लोग कैसे जानते है अमर खन्ना को?'' एवढं स्वगत बोलून त्या निघून जातात. रहस्य वाढतच जातं.
हे लोक दिशाला घरी सोडण्यासाठी गेले होते. परंतु घर कुठल्यातरी वेगळ्याच शहरात, किंवा परराज्यात आहे की काय कळत नाही. शूटींगचं लोकेशन परस्पर बदललंय की ह्या लोकांनी?

कट टू :
हे विद्यार्थी कॉलेजच्या लायब्ररीत वगैरे पण जातात. आणि योगायोगानं तिथं 'ते' पुस्तक आहे. नुपूर ते पुस्तक घरी नेऊन वाचतेय. चेहऱ्यावर तीव्र भयाचा धक्का बसल्याचे भाव.!एकटीच आहे बिचारी घरात. किंचाळत मदतीसाठी फोनकडे जाते. परंतु त्याचवेळी लॅंडलाईन फोनमधून ठिणग्या उडणं,
लाईटचं व्होल्टेज कमी जास्त होणं, कुणाचातरी अभद्र रडण्याचा आवाज, वगैरे प्रकोप घडतात.‌ असहाय आहे आपली नुपूर. काय होईल आता तिचं? या भावनेसोबत सीन तिथं संपुष्टात येतो.
निष्कर्ष - पुस्तक भुताळी आहे.!

कट टू :
नकली चेकॉव्ह ऊर्फ लेखक ऊर्फ प्रोफेसर सिद्धार्थ दास प्राचार्यांना झापत आहे की, "ते पुस्तक लायब्ररीत कसं काय पोचलं? ते पुस्तक विनाश फैलावणारं पुस्तक आहे. पन्नास हजार प्रती छापलेल्या. त्या प्रती पाच वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवलेल्या. पण एकसुद्धा प्रत पोचू शकली नाही. पुस्तकं नेणारे दोन ट्रक मध्येच दरीत कोसळले होते. शिवाय पुस्तक नेणारं एक आख्खंच्या आख्खं जहाजही बुडून गेलं. आणि एका ट्रकाला तर आपोआप आगच लागलेली. अशा या महाडेंजरस पुस्तकाची शेवटची आणि एकमेव प्रत तुमच्या कॉलेजात आहे. त्यामुळेच मी तुम्हाला बजावलं होतं की ते नीट लॉक करून ठेवा.‌ पण तुम्ही ते सांभाळलं नाही. आता बसा बोंबलत."
(प्राचार्य काही बोलत नाहीत. हतबल दिसतायत. त्यांच्या वतीने मी बोलतो. काय काय करायचं प्राचार्यानं ? पोरांच्या हाणामाऱ्या सांभाळायच्या की मास्तरांचं पॉलिटिक्स सांभाळायचं की बोकांडी बसलेला संस्थाचालक सांभाळायचा की रोजचं कार्यालयीन काम सांभाळायचं? आणि त्यात आता हा कुणीतरी भामटा चेकॉव्ह त्याच्या पुस्तकाचं भारूड सांगायलाय. अरे बाबा तुला कुणी सांगितलेलं असलं भुताळी पुस्तक लिहायला ?लिहिलं ते लिहिलं, माझ्या कशापायी गळ्यात मारून गेलास? मी काय पुस्तकं सांभाळणाऱ्यांपैकी वाटलो काय? )

टल्ली हे संभाषण ऐकतो. आणि नियोजन करतो की मनहूस पुस्तक परत लायब्ररीत ठेवून यायचं. परंतु मध्येच ते पुस्तक कबीरच्या हातात पडतं. आणि तो ते उघडून नुसती नजर फिरवतो तर लगेच त्याला एक प्रकारचा करंट मारतो. आणि डोळेबिळे पांढरे..! तर त्यालापण प्रचिती येते, किंवा समजा मस्ती नडते, असं म्हणावं लागेल..!

कट टू :
मानवाची दिशाबरोबर जवळीक वाढलेलीय. तो म्हणतोय की दिशाबद्दल त्याला कसलीतरी अजीब कशीश वाटते आहे. कशीश म्हणजे गुरूत्वाकर्षण, एकप्रकारची खेच.! म्हणजे पिच्चर आता लव्ह ट्रॅंगलच्या हायवेला लागलेलाय सुसाट.

परिणामी शांती हिच्या ठायी सवतीमत्सराचा विकार उत्पन्न झालेलाय. त्यातच तिला एके रात्री उषा नाडकर्णी मागनं येऊन दचकवतात. उषा नाडकर्णींनी मघाचीच पांढरी फुलाफुलांची साडी नेसलेलीय. आता त्याच साडीवर लाल शाल पांघरून हिंडत आहेत. फॉर ए चेंज..!

उषा नाडकर्णी म्हणजे दिशाची आई. त्या सांगतात की दिशा तर बावीस वर्षांपूर्वीच मरून गेलेलीय.
ओह् माय माय..! उषा नाडकर्णी तर कहाणीत दरवेळी एक नवीनच ट्विस्ट घेऊन येतायत. आणि काही कळायच्या आत निघूनही जातायत.

कट टू :
मानवचा कसलातरी डान्स परफॉर्मन्स आहे कॉलेजात. गायकी, डान्स, गिटार आणि ॲक्टिंग. असा चौफेर परफॉर्मन्स करावा लागतोय मानवाला. आणि जमत तर ह्यातलं काहीच नाहीये..!

शांतीला टेलिफोन बूथमध्ये फोन येतो. बूथच्या वरच्या काचेवर रक्ताचे थेंब पडतायत आकाशातून. म्हणजे आता वरून एखादं प्रेत कोसळणार अशी आपल्याला आयडिया येतेच. हिंदी पिच्चर बघून बघून तेवढे मुर्दाड तर आपण झालेलोच असतो. तर मग कोसळतं वरनं प्रेत. धडाम्म धूम्म. शांती घाबरून किंचाळत पळत सुटते. अशावेळी प्रोटोकॉल प्रमाणे रस्ता जसा निर्जन सुनसान असायला पाहिजे, तसा आहे. शांती कालिमातेच्या मंदिरापुढे बेशुद्ध होऊन पडते.

आता एंट्री होते रती अग्निहोत्रींची. प्रॉपर साग्रसंगीत मेकअप इयररिंग्ज, ज्वेलरी इत्यादींनी लगडलेल्या कॉस्च्युममधी सुनसान स्थळी त्या प्रकटलेल्या आहेत मध्यरात्री.
त्या शांतीला घरी घेऊन जातात.
डॉक्टर येतात आणि म्हणतात की,"हे ट्रॉमामुळं झालंय. शांती काही दिवस बोलू शकणार नाही. पण थोड्या दिवसांच्या विश्रांतीनंतर आपोआप ठीक होईल."
ढोबळ निदान, ढोबळ इलाज.! सगळ्यांचं समाधान !!
(बाकी, शांती काही दिवस बोलू शकणार नाही. त्यामुळे दिशाचं रहस्य तिला कुणाला सांगता येत नाहीये. त्यामुळे आता शांतीला बोलण्याची उबळ येईपर्यंत ते रहस्य लांबणीवर पडलेलंय. किंवा खरंतर त्यासाठीच डॉक्टरनं 'न बोलण्याचा आजार' सांगितलेलाय. येतंय ना लक्षात??)

रती अग्निहोत्री या पिशाच्चविद्या, ज्योतिषशास्त्र, ऑरा रिडींग, आणि तंत्रसाधना या क्षेत्रांतील तज्ज्ञ आहेत. मजबूत बायोडाटा आहे. भूतपिशाच्चांना कंट्रोल करण्याची क्षमता अंगी बाळगून आहेत. त्यांच्या कपाळी नागमोड्या वळणाची नक्षीदार डिझाईनची चमकदार टिकली लावलेली आहे. त्यामुळे कळतंच की ही स्त्री म्हणजे काही साधारण काम नाहीये..!

आणि शिवाय त्या डेमोपण दाखवतात. ओंजळीत शुभ्र तांदूळ घेऊन मूठ बंद करतात. थोड्या वेळानं तांदूळ लाल झालेला दिसतो. त्याआधी २००२ साली 'राझ' पिच्चरमध्ये श्री. आशुतोष राणांनी पिवळा लिंबू लाल करून दाखवला होता. इथं तांदळावर प्रयोग केलेलाय. शेवटी काय, रंग बदलणं महत्वाचं.

कट टू :
आत्म्याला बोलवायचं नियोजन. घरभर शेकडो मेणबत्त्या लावलेल्यायत. एक सुरक्षित मंत्रभारीत वर्तुळ आखलेलंय. टल्ली म्हणतो, अमरच्या आत्म्यास आमंत्रित करा. रती अग्निहोत्री डोळे मिटतात. आतल्या आत ब्रह्मांड स्कॅन करतात. आणि स्पष्ट करतात की असा कुठलाच आत्मा नाहीये. असता तर आला असता.‌

मग शांती म्हणते की दिशाच्या आत्म्याला बोलवा. रती अग्निहोत्री डोळे मिटतात. खळबळ माजते. बॅकग्राऊंड म्युझिकवरनं कळतं दिशा नावाचा आत्मा आहे.! म्हणजे जिवंतपणी आपण ज्या नावानं वावरतो, पिशाच्चदुनियेत पण आपलं तेच नाव चालू राहतं. मनमोहक कन्सेप्ट आहे हा.
(बाकी, आता समजा दिशाच्या आत्म्याला बोलावलं आणि तिथं समजा ऑलरेडी मरून गेलेल्या दिशा नावाचे लाखो आत्मे घोंघावत आले तर परिस्थिती कशी हॅंडल करणार आहेत रती मॅडम? झेपणार आहे का ते ?)

आता रहस्य उलगडायचं तर आपल्याला लेखक उर्फ प्रोफेसर दास यांच्या घराकडे जावं लागेल, रती अग्निहोत्री सल्ला देतात.
परंतु तिथं पोचेपर्यंत उशीर होऊन गेलेला आहे. खुर्चीत बसल्या बसल्याच प्रोफेसर दास गतप्राण होऊन गेलेलेयत.‌ प्राणपखेरू उडून गेलेलेयत. प्राणांचा हंस उडून गेलेलाय!!

परंतु प्रोफेसर दास यांच्या घरात पुढचा सुराग सापडतो.‌ धागेदोरे हाती लागतात. त्यामुळे आता मानवाला तुरंत शिमला या ठिकाणी जावं लागतं. तिथे बर्फातून घसरता घसरता त्याला अजून एक रहस्य उलगडतं. वस्तुस्थितीचं विराट स्वरूप त्याच्या त्रिकोणी चेहऱ्यावर कोसळतं.
म्हणजे ह्यात पुनर्जन्माची पण भानगड येण्याची लक्षणं दिसायला लागली आहेत. तेवढंच राह्यलंय आता.

बाकी, ही मंडळी घरदार कॉलेज वगैरे सोडून कुठंही बोंबट्या मारत भटकत आहेत, हे एवढा वेळ विसरलोच होतो. पण आलाय आता शेवटाकडे सिनेमा.
पण इथं श्रेया घोषालचं एक अप्रतिम गाणं येतं- 'बेपनाह प्यार है आ जा, तेरा इंतजार है आ जा'. आणि मग तेच ऐकत बसावं म्हणतो. चांगलंय रात्री ऐकायला.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त
सिनेमा पाहिला नाही
पण आता अंदाज आला

मस्त खुसखुशीत लिहीलंय. मूव्ही पण योग्य निवडलाय भाजण्याकरता.
काहीशी फारेंडी शैली असल्याने मजा आली. बाकि तुमचा अस्सल बाणा आहेच. कुतूहल पण चाळवलं गेलं.

खूप वर्षे बघायचा ठरवतोय. पण जमतच नाही. अधून मधून काही सीन्स पाहिले आहेत. आता लोहा गरम है चलो कृष्णा कॉटेज म्हणून बघतोच.

मानवचा कसलातरी डान्स परफॉर्मन्स आहे >> इथे जरा गडबडलोच. मग परत मागे जाऊन वाचल्यावर संदर्भ लागले.

प्राचार्य काही बोलत नाहीत. हतबल दिसतायत. त्यांच्या वतीने मी बोलतो. )))) हसून हसून फुटायला झालं... Proud
जबरी लिहिलंय एकदम!

परंतु घर कुठल्यातरी वेगळ्याच शहरात, किंवा परराज्यात आहे की काय कळत नाही.

काय काय करायचं प्राचार्यानं ?>>>> Rofl Rofl

त्रिकोणी चेहऱ्याचा मानव >>> प्रेमाचा त्रिकोण सुचित करण्याच्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा तुम्ही मजाक उडवून रायले नं.

पन्नास हजार प्रती छापलेल्या. >>> मराठी प्रकाशकांना वि. सु. ‘ये फिल्म काल्पनिक घटनाओं पर आधारित है। इसका वास्तविकता से कोई संबंध नही है।’

शांती काही दिवस बोलू शकणार नाही. त्यामुळे दिशाचं रहस्य तिला कुणाला सांगता येत नाहीये. >>>> बोलू शकणार नाही ठीकाय. पण लिहून दाखवायला काय हरकत आहे? कॉलेजमध्ये आहे म्हणजे निदान अक्षर ओळख तरी झाली असेल ना?

ओंजळीत शुभ्र तांदूळ घेऊन मूठ बंद करतात. थोड्या वेळानं तांदूळ लाल झालेला दिसतो. >>> आय थॉट चित्रविचीत्र फिनॉमेना दाखवणे हे भुताच्या स्कीलसेटमध्ये येतं?

आता रहस्य उलगडायचं तर आपल्याला लेखक उर्फ प्रोफेसर दास यांच्या घराकडे जावं लागेल>>>> अगेन फोनवर नस्तं का बोलता आलं?
इथे मुलांवर खुनाचा आळ आणण्याची सुवर्णसंधी लेखक-दिग्दर्शकाने गमावलीय अध्यक्षमहोदय!

एकंदरीत असं वाटतंय की पिक्चर नाही पाहिला आणि फक्त ‘बेपनाह प्यार’ गाणं ऐकलं तरी चालेल.

धमाल आहे परीक्षण. आता बघावाच लागणार पिक्चर.
दिशा आत्म्याचा गोंधळ टाळायला पुढच्या वेळी आत्म्याला आधी आधार कार्ड नंबर सांगायला लावून तो जुळला तरच आत ये म्हणता येईल की काय असा विचार करतेय.

पुढच्या वेळी आत्म्याला आधी आधार कार्ड नंबर सांगायला लावून तो जुळला तरच आत ये म्हणता येईल की काय असा विचार करतेय. >>> आमच्यासारखे भूत असेल तर फोनच्या नोट्स कश्या चेक करणार आधार नंबरसाठी? त्यापेक्षा पासपोर्टवरचे पूर्ण नाव आणि सोबत 'मदर्स मेडन नेम' हा ऑप्शन चालणार नाही का?

सिक्रेट प्रश्न पण लागेल, माझ्या 30 वर्षापूर्वीच्या शेजाऱ्याच्या पाळीव कुत्र्याचे नाव वगैरे

अनु Lol
३० वर्षांपूर्वीच्या हे एपिक आहे!

सिक्रेट प्रश्न पण लागेल, माझ्या 30 वर्षापूर्वीच्या शेजाऱ्याच्या पाळीव कुत्र्याचे नाव वगैरे

नवीन Submitted by mi_anu on 15 April, 2024 - 03:39

एकाच नावाचे लाखो कुत्र. असतात्,ते येतील

"सिक्रेट प्रश्न पण लागेल, माझ्या 30 वर्षापूर्वीच्या शेजाऱ्याच्या पाळीव कुत्र्याचे नाव वगैरे" - Happy

ह्या प्रश्नांची उत्तरं खरी देणं आवश्यक नसून, स्वतःच्या लक्षात राहतील अशी द्यायची असतात हे बर्याच लोकांच्या लक्षात येत नाही. Happy

"खरी दिली की लक्षात राहण्याची शक्यता जास्त असते." - बरोबर आहे, पण अनावधानानं किंवा कॉमन नॉलेजमधून ती माहिती कुणाच्या तरी हाती लागण्याची पण शक्यता असते. उदा. तुमच्या कुत्र्याचं नाव समजा 'टॉमी' आहे तर ही माहिती अनेकांना असू शकते. पण तुम्ही सिक्रेट प्रश्नाचं उत्तर देताना 'अलेक्झांडर' किंवा 'बंडोपंत' दिलं तर ते guess करणं तितकंसं सोपं जाणार नाही.

सीक्रेट प्रश्न लक्षात राहणे आणि त्याचे दिलेले उत्तर लक्षात राहणे हा गुलबकावलीच्या फुलाची गाठ पडण्यासारखा योग आहे.

वत्सहो , तिथे सगळ्या साईट्स वर सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर लिहायचं असतं.
तुमच्या आईचं मेडन नेम काय - पानकोबी
तुमचा आवडता रंग कोणता - पानकोबी
तुमच्या चाइल्डहूड बेस्ट फ्रेंडचं नाव काय - पानकोबी
Its like your master password. अर्थातच ते शक्य तेवढं विचित्र आणि फक्त तुम्हाला माहित असावं.

“ तिथे सगळ्या साईट्स वर सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर लिहायचं असतं.” - मोरोबा, यू नेल्ड इट. काहीही लिहा, पण तुम्हाला लक्षात राहिल आणि इतरांना guess करता येणार नाही असं हवं इतकंच.

ओ माय गॉड अरे हा शिनिमा बघिटलाय राव मी. सिटिइप्राईडच्या पायर्‍यांवर कृष्णाकॉटेजचं स्टिकर ब्रँडिंग केलेलं. हे असं पहिल्यांदाच म्हणूनही लक्षात राहिलं असेल.

या अशा अभूतपूर्व ब्रँडिंगच्या व्यतिरिक्त लक्षात राहिलेली वस्तू म्हणजे रती अग्निहोत्रीच. सोहेल होता काय? सलीम सर पण त्याला बळजबरीने लक्षात ठेवत असतील तिथं आपली काय बात नाही का. अस्तू.

जवळजवळ बालवय असल्याने सिनेमा प्रेमाने बघितलेला, हेही आठवलं. सलीमसर बघू शकले नसतील या विचाराने आता आपण तरी बघितला- याबद्दल जरा बरं वाटलं. आपली मुलं सारखा कुणाचा ना कुणाचा कशा ना कशा प्रकारे जीव घेतात, हे कुठच्या बापानं कसं सहन करावं? अस्तू.

काल संध्याकाळी कुठल्या तरी चॅनेलवर कृष्णा कॉटेज लागलेला बघून ते चॅनेल लावलं. दुपारी सव्वादोन ते रात्री सव्वादोन इतका वेळ कृष्णा कॉटेज हा एकच पिक्चर चालू राहणार आहे हे बघून मला वाटलं इथेही भुताटकी झाली की काय Lol पण मग टीव्हीवर गोविंदा दिसला आणि मी चॅनेल बदललं.

पण मग टीव्हीवर गोविंदा दिसला आणि मी चॅनेल बदललं.
>>
जुना गोविंदा असताना चॅनल का बदलायचं??
सध्याचा (गेल्या १० -१२ वर्षांतला) असता तर मात्र नक्की बदलायचं. तो आता तेच तेच (संदर्भहीन) बोलतो अन् त्याच त्याच गाण्यांवर तोच तोच नाच करतो. अन् फॅन्स ना त्याच्याकडून हेच हवं आहे हे डोक्यातून काढायचं मनातही आणत नाही...

मस्त लिहिलंय! हा सिनेमा पाहिलाय. सुरुवातीचा काही भाग सोडता बाकीचा सिनेमा पडद्यावर येणाऱ्या प्रत्येक पात्रावर, हे भूत असणार असा संशय घेत पाहिला होता.
ग्राइंडरसह पॉलिशिंग पेपरने घासून गोल बनवलेल्या नाकाची पिताश्रींची 3D फोटोकॉपी = सो 'हेल' खान.

खुर्चीत बसल्या बसल्याच प्रोफेसर दास गतप्राण होऊन गेलेलेयत.‌ प्राणपखेरू उडून गेलेलेयत. प्राणांचा हंस उडून गेलेलाय!!<<<<<
एकच गोष्ट तीन वेगवेगळ्या वाक्यांत! बहुधा लेखकालाच जास्त धक्का बसलेलाय दास (हे ऑटोकरेक्टने आधी 'डास' लिहिले होते) गचकल्याचा... Proud

पूर्वजन्मात शांती नव्हती हे बरंय बाकी! नाहीतर अख्ख्या ट्रँगलचे पुनर्जन्म सांभाळता सांभाळता त्याचा 'डेंजरस इश्क' झाला असता. (तो पण महान अ नि अ मटेरियल आहे. एकदा एअर इंडियाच्या विमानात बघावा लागला होता. दुसरा काही पर्याय पण नव्हता आणि विमानातून उतरून लोक पळून पण जाऊ शकत नव्हते.)

मस्त Lol
यानिमित्ते एक गोष्ट लक्षात आली म्हणजे एका भावाचा चेहरा त्रिकोणी नाक गोल आहे (सोहेल )आणि एका भावाचा चेहरा गोल नाक त्रिकोणी आहे (अरबाज ) कशी काय भूमिती जमवली असेल त्यांच्या पप्पांनी कोण जाणे

गोविंदा मला कधीच फारसा आवडला नाही. Happy हिरो नं. १ चांगला आहे. बाकी त्याचा कुठला पिक्चर पूर्ण बघितलेला पण नाही मी बहुतेक.

हा सिनेमा मस्त आहे, इशा मस्त दिसते & अभिनय पण तिच्याच एकटीच्या खांद्यांवर आहे. नक्कीच बघा लोकहो.

डेंजरस इश्क' झाला असता. (तो पण महान अ नि अ मटेरियल आहे. एकदा एअर इंडियाच्या विमानात बघावा लागला होता. >>>> श्रद्धा एक तर हे सांगतेस & परिक्षण लिहिण्याचे मना वर ही घेत नाहीस Angry