बिनशर्त कविता - विडंबन

Submitted by संप्रति१ on 13 April, 2024 - 04:35


लाभले आम्हास भाग्य, आम्ही उठतो दुपारी
जाहलो खरेच धन्य, आम्ही फोडतो सुपारी

धर्म, पंथ, जात सर्व मानतो भपारी
अवघ्या जगात फक्त जाणतो सुपारी

आमुच्या मनामनास सांधते सुपारी
आमुच्या मुखामुखात रंगते सुपारी
आमुच्या उराउरात मावते सुपारी
आमुच्या सख्यासख्यांत नाचते सुपारी

आमुच्या घशाघशांत दाटते सुपारी
आमुच्या जिभांवरून डोलते सुपारी
आमुच्याच चळवळींस लाभते सुपारी
आमुच्याच अळीमिळीत लाजते सुपारी

आमुच्या ध्वनिमधून वर्षते सुपारी
आमुच्या सभासभांत गर्जते सुपारी
आमुच्या डब्याडब्यांत सांडते सुपारी
आमुच्या रूळांवरून धावते सुपारी

चवकशा असंख्य हीच टाळते सुपारी
संकटी जीवास खास जन्मते उभारी
इडापीडा टळोन दूर मारते भरारी
आपुल्या घरात फड रंगतो सकाळी
आपुल्या घरात मस्त झोपतो दुपारी

ऊन हाल जाळ राळ सोसवेना जिव्हारी
अन् शेवटी सुतासारखी सरळते सुपारी

-- (कविवर्य श्री. सुरेश भट यांची 'बिनशर्त' क्षमा मागून)

-----++---------++++++----------+++++++
-----++----------++++++----------++++++

भीती च आम्हा तुझी सदा या गडगडणाऱ्या शहा,
अस्मानीच्या सुलतानीला 'बिनशर्त' देती जिव्हा.

काळ्या पाठीवरी कोरली पाठिंब्याची लेणी,
पोलादी चौकडी खेळती खेळ जीवघेणी.

ईडीच्या या ऊन्हात शिजला
चौकशीत घामाने भिजला
आत्मरक्षणासाठी झिजला

दिल्ली ची ही सुपारी फोडितो
महाराष्ट्र यांचा.

-- (वंदनीय शाहीर साबळे यांची मनःपूर्वक क्षमा मागून)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_