माझी नर्मदा परिक्रमा : शूलपाणी ची झाडी

Submitted by Narmade Har on 6 April, 2024 - 06:34
शूलपाणीच्या झाडीतील भिल्लां सोबत प्रस्तुत लेखक

माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळावरील लेखांक ८२ मधील लेखनाचा संपादित सारांश

आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . या भागातील भिल्लांना नर्मदामातेचे भाऊ मानतात म्हणून मामा म्हणतात . तर नक्कर मामाच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती . घर अतिशय साधे होते परंतु त्यातील विटा नक्षीदार पद्धतीने बाहेर काढून त्रिमितीय नक्षी तयार करण्यात आली होती . घराला सुंदर असा रंग देखील देण्यात आला होता . आतून शेणाने सारवलेल्या खोल्या भिंती ऐवजी गवताच्या तट्ट्यांनी शेकारल्या होत्या . कौलांमुळे उन्हाचा दाह कमी होत होता . अंगणामध्ये गाई म्हशी शेळ्या कोंबड्या होत्या . मी दारात उभा राहून नर्मदेहर असा आवाज दिला . नकरसिंग ची आई दारात आली एका झोपडीकडे हात करून तिथे आसन लावायला सांगितले . स्वतः नक्करसिंग आणि त्याचा भाऊ सेमलेटची होळी खेळायला गेले होते . खेळायला म्हणजे स्वतः भुत्या म्हणून तिथे नक्करमामा चा तो भाऊ नाचत असे . नक्कर सिंगची पत्नी पाणी देऊन गेली
. मी उतरलो होतो त्याच खोलीमध्ये यांची आटा चक्की होती . जाता जाता तिने मला धान्याकडे लक्ष ठेवायला सांगितले . मला तेव्हा त्याचा अर्थ कळाला नाही परंतु काही वेळाने जेव्हा बाहेरच्या शेळ्या कशा चटकन आत मध्ये येऊन धान्य किंवा पीठ खाऊन जातात हे पाहिले तेव्हा राखण करण्याचे महत्त्व कळाले . यातली एक काळी पांढरी शेळी तर एवढी हुशार होती की कितीही अडवले तरी ती पीठ खाऊनच जायची ! शिवाय एक मारकुटी म्हैस देखील होती . तिच्याशी देखील मी खूप खेळलो . ती अत्यंत तापट होती .

याची आई म्हातारी होती परंतु खंबीर व करारी होती . सर्व घरावर तिचा वचक आहे असे मला जाणवले . घरातील सर्वजण भंगुरई बघण्यासाठी सेमलेटला गेलेले होते . सासु सुना दोघीच घरात होत्या . त्यामुळे दोघींचा वावर थोडासा मुक्त होता . मला देखील त्यांनी फारशी बंधने घातली नाहीत . उलट मला त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या अंगणात बोलवले . अंगणामध्ये एक बाज ठेवलेली होती . त्याच्यावर घरातील मुख्य पुरुष झोपायचा . एका बाजूला पिण्याच्या पाण्याचा रांजण जमिनीपासून वर बांधलेल्या लाकडी टेबलावर मातीत गाडून ठेवला होता . ही पद्धत इकडे सर्वत्र आढळते . या दोघींकडून मला आदिवासी प्रथा परंपरां बद्दल बरीच माहिती कळली . त्यांनी मला आधीच कल्पना देऊन ठेवली की येणारी सर्व माणसे प्रचंड दारू पिऊन आलेली असतील त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू नये . किंवा मोजकेच बोलावे . माझा स्वभाव बोलका आहे हे म्हातारीच्या लक्षात आले ! एकंदरीत आदिवासी कुटुंबामध्ये स्त्रियांचा फार मोठा वाचक असतो असे मला जाणवले . म्हातारीची सुनेपुढे अक्षरशः दहशत होती . म्हातारीला चार शब्द वाकडे बोलले की इथल्याही सुनेला लगेच आनंद व्हायचा ! सुनेची चूक दाखविताच म्हातारी खुश व्हायची ! घरोघरी मातीच्या चुली ! इतक्यात डोंगर उतारावरून यात्रा संपवून येणारी माणसे दिसू लागली . सूर्य पश्चिमेला मावळत होता आणि हा डोंगर पूर्वेला होता त्यामुळे सूर्याच्या उजेडामध्ये उंच च उंच माणसे डोंगर उतरताना दिसू लागली ! ही माणसे चमचम चमकत होती ! नक्की काय प्रकार आहे कळत नव्हते . सर्वच जण थोडे जवळ आल्यावर लक्षात आले की त्यांनी आपल्या डोक्यावर मोठ्या मोठ्या टोपल्यांच्या साह्याने मोरपिसे बांधलेली होती . शिवाय त्याला लटकवलेले आरसे चमकी वगैरे चमकत होते .
बहुतेक वाघाला मोठा प्राणी समोर उभा आहे असे वाटावे म्हणून हा वेष तयार झाला असावा असे वाटते कारण दुरून पाहताना खरोखरच सात-आठ फूट उंचीची माणसे येत आहे तसे वाटत होते .बांबूच्या मोठ्या मोठ्या कामठ्या वापरून मजबूत अलंकार तयार केले होते . आणि ते उत्कृष्ट सजवले होते . या सर्वांच्या कमरेला विशिष्ट आकाराचे वाळवलेले भोपळे होते व त्याचा आवाज खूप दूरपर्यंत घुंगरासारखा ऐकू यायचा . शिवाय मोठी मोठी घुंगरे होती ती वेगळी . अंगावर पांढऱ्या रंगाचे पट्टे व गोल काढून गळ्यात उंबराच्या माळा घातल्या होत्या .हातात काठ्या ,भाले ,तलवारी , धनुष्यबाण , फाल्या अशी हत्यारे होती . काही पुरुष स्त्रीच्या वेषामध्ये देखील नटले होते . काहींनी अंगावर रंगीबेरंगी चिन्ध्या गुंडाळल्या होत्या . सोबत धीर गंभीर वाजणारे ढोल , ढोलकी व थाळी अशी वाद्ये होती . एकाच रंगाच्या घागरा चोळ्या व चांदीचे ठसठशीत दागिने घातलेल्या स्त्रिया होत्या . मुलांच्या गळ्यात साखळ्या होत्या . उतरणारे सर्व लोक आमच्यासमोरूनच जात होते . मी उठून सर्वांना सामोरा गेलो . आणि येणाऱ्या लोकांशी भरपूर चर्चा केली , गप्पा मारल्या . काही उत्साही तरुणांनी माझ्यासोबत फोटो काढले . मी त्यांच्यासोबत ढोल वाजवला . त्यांचे ताल आत्मसात करून घेतले . इथे प्रत्येक गोष्ट आदिवासी लोक आपल्या स्वतःच्या हाताने बनवितात . अगदी ढोला साठी लागणारे कातडे देखील स्वतः मिळविले व कमविले जाते . केवळ चारच छिद्रे व पाचवे तिरके छिद्र असलेली सुंदर व एक सू री वाजणारी बासरी देखील यांच्याकडे होती . ती देखील वाजवून पाहिली . तिच्यावर वाजणारी विवक्षित धून आणि ढोलाचा धीर गंभीर खर्जातला आवाज थेट ध्यानामध्ये घेऊन जाई ! इथे तरुणांनी माझ्यासोबत जे फोटो काढले ते माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी पाठवून दिले . नर्मदा मातेची असीम कृपा कशी आहे पहा ! या आदिवासी लोकांना त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये पाहण्याचे भाग्य मला लाभले ! नाहीतर आजकाल हे सर्व लोक आधुनिक पेहराव करतात ! परंतु आजही महत्त्वाच्या सणासमारंभाला आपला पारंपारिक वेष ते पुन्हा धारण करतात . या आदिवासी पेहरावाचा आनंद सर्वांनी घ्यावा !
image476.pngimage478.png
इतक्यात नकरसिंह आणि त्याचा भाऊ तिथे आले . भाऊ भुत्या झाला होता . मी माझा परिचय त्याला करून दिला आणि त्याच्या घरी आज मुक्कामी असल्याचे सांगितले . त्याला फार आनंद झाला . आणि त्याने सांगितले की सणाच्या नियमानुसार आज तो घरी झोपायला येऊ शकत नाही . आज हे सर्व तरुण जंगलामध्ये चिकन मटन शिजवून खातात आणि दारू पिऊन झोपी जातात . असे सांगेपर्यंत सर्वजण गोल करून मोहाची दारू प्यायला बसले सुद्धा ! उद्या होळी होईपर्यंत हे लोक आपले कपडे बदलणार नव्हते आणि आपल्या घरी देखील जाणार नव्हते . हे सर्व पावरी आदिवासी किंवा भिल्ल लोक आहेत .त्यांची भाषा पावरी . आडनाव लावताना सोळंकी पावरा अशी आडनावे लावतात .आणि जात लिहिताना डावरा किंवा दावरा अशी जात लिहितात . होळी हाच यांचा प्रमुख सण आहे . हेच लोक पूर्वी लुटालूट करायचे . परंतु आता चित्र बदलले आहे . आता यांच्या मदतीशिवाय हा टप्पा पार करता येणे अशक्य आहे ! एक पिढी पूर्वीपर्यंत हे लोक केवळ लंगोटीवर फिरायचे . आणि स्त्रिया फक्त अर्धा घागरा घालायच्या .उपवस्त्र देखील नेसत नसत . आता हे लोक अंगभर कपडे घालतात . यूट्यूबर लोकांनी जगातल्या अनेक प्रांतातील पेहराव बदलून दाखवले आहेत त्याचे हे एक उदाहरण ! प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये पकडण्याच्या त्यांच्या अट्टहासामुळे लोकांनी आपले नैसर्गिक राहणीमान बदलून टाकले आहे ! या लोकांची याहा मोगा नामक एक देवी आहे .जी गुजरातमध्ये वडफळी जवळ आहे .तिलाच हे मानतात . मध्यप्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील नंदुरबार या भागामध्ये सर्वत्र हे लोक फक्त पावरी भाषाच बोलतात . यांच्या गाडीवर याहा मोगा किंवा जय आदिवासी असे लिहिलेले असते .हे लोक चिवट , तापट परंतु परिक्रमावासींसाठी मात्र उपकारक आहेत .नवीन मुले थोडीशी ब्रिगेडी झाल्यासारखी वाटतात . हे लोक लहान मुलांनाही खुशाल दारू पाजतात . दारू पिणे इथे सन्मानाचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते . मोहाची दारू औषधी देखील असते . पोट साफ करण्याचे काम ही दारू करते . अर्थातच योग्य प्रमाणात घेतली तर . प्रस्तुत लेखक व्यक्तिगत जीवनात अपेयपान व सुरापानाचा कडक निषेध करतात याची कृपया नोंद घ्यावी . ही सर्व माहिती आपणा करता जशी आहे तशी देत आहे इतकेच .
इथली लहान मुले एक जात शूर , भित्री , बुजरी व नागडी उघडी असतात .एखादा परिक्रमावासी दिसल्याबरोबर जीवाच्या आकांताने एक दीड किलोमीटर दूरवरून डोंगरावरून पळत खाली येतात .यांना पडण्याचे , घसरण्याचे ,आपटण्याचे जणू भयच नसते . हलकीफुलकी मुले टणाटण उड्या मारत खाली येताना पाहून मला भीती वाटायची . एका गोळीसाठी हा सर्व आटापिटा ! या भागातील मुलांना पुण्या मुंबईकडच्या परिक्रमावासींनी बिघडवले आहे असे पालकांचे स्पष्ट मत आहे . सतत गोळ्या खाऊन इथल्या मुलांचे दात कधी नव्हे ते किडू लागले आहेत . त्यामुळे यांना शक्यतो चॉकलेट गोळ्या दिल्या नाही पाहिजेत . परंतु असे जरी असले तरी देखील तुम्हाला बघून ही एक दीड किलोमीटर पळत येणार हे निश्चित आहे . त्यामुळे त्यांना काहीतरी खाऊ द्यावाच लागतो . मी इतके सूत्र पाळले की प्रत्येक मुलाला चॉकलेट देताना प्लास्टिक पर्यावरणासाठी कसे घातक असते हे समजावून सांगितले आणि प्लास्टिक माझ्याकडे जमा करून घेतले आणि मगच गोळी खायला सांगितली . ठराविक अंतराने एखाद्या चुलीमध्ये मी ते प्लास्टिक नष्ट करायचो .
Screenshot_२०२४-०३-३०-१६-४४-१९-६५_3d9111e2d3171bf4882369f490c087b4.jpg
आता हळूहळू या भागामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत . सोलरची वीज देखील घरोघरी आलेली आहे . साध्या विजेचे जोडदेखील प्रत्येक गावात पोहोचले आहेत . इथले लोक अतिशय निर्भय आहेत हे मात्र अगदी खरे . राहून राहून असे वाटते की ही लढाऊ जमात पोलीस लष्कर किंवा निमलष्करी दलामध्ये पाहिजे . तेच त्यांच्यासाठी योग्य स्थान आहे . असो .
Screenshot_२०२४-०३-३०-१६-०८-१५-६६_3d9111e2d3171bf4882369f490c087b4.jpg
नक्करसिंह सोळंकी , भादल

ती रात्र अतिशय संस्मरणीय अशी गेली . हा माझा ७३ वा मुक्काम होता . संध्याकाळपर्यंत घरातील सर्वजण परतले . खूपच मोठे कुटुंब होते . भरपूर लहान मुले होती . कोण कोणाचे कोण आहे हे कळणार नाही इतकी माणसे होती . नकरसिंगचा जो भाऊ भुत्या बनला होता त्याच्या हातामध्ये एक वडिलोपार्जित अप्रतिम अशी तलवार होती . माझ्या काही शस्त्रविद्या पारंगत मित्रांमुळे या शस्त्रांचे थोडेफार ज्ञान मला झालेले आहे. त्यानुसार ही एक अप्रतिम तलवार होती . हिचा धातू देखील अप्रतिम होता आणि बऱ्यापैकी वापर देखील झालेला होता . ही तलवार घेऊन तो झोपण्यासाठी खाली गावामध्ये निघून गेला . एक तरुण भाऊ जो काहीच बनला नव्हता तो मात्र घरी थांबला . प्रचंड दारूच्या नशे मध्ये असलेला हा घराच्या आत मध्ये ठेवलेला ढोल काढून वाजवू लागला . आपण गणपती मध्ये जो गजाढोल बघतो त्यापेक्षा थोडासा आकाराने मोठा आणि लाकडाच्या खोडापासून बनवलेला अतिशय जड परंतु अतिशय अप्रतिम असा हा ढोल असतो . तो ठेवण्यासाठी लाकडाचे एक मेज बनवलेले असते. आदिवासींच्या नियमानुसार कोणीही अचानक येऊन वाद्य वाजवू शकत नाही . त्यातले ज्ञान आहे अशीच व्यक्ती हात लावू शकते . हा डोळे मिटून धीर गंभीर ढोल वाजू लागला . मी एक ढोलक उचलून त्याला हळूहळू साथ देऊ लागलो . माझा ताल पक्का आहे आणि तो जो ताल वाजवतो आहे तो मला कळलेला आहेत हे लक्षात आल्यावर आमची चांगली जोडी जमली . आम्ही दोघांनी हे वादन चालू केले आणि उत्स्फूर्तपणे घरातील लहान मोठ्या मुली मुले आणि सर्वच जणांनी हातात हात घालून आमच्या भोवती फेर धरला . आणि आदिवासी नृत्य करायला सुरुवात केली . हे सर्व अतिशय धीर गंभीर शांत आणि स्वाभाविकपणे उत्स्फूर्तपणे घडलेले होते . यात कुठलाही दिखावा भपका अजिबात नव्हता ! मैयाची निर्मळ भावंडे ! मामालोक ! तास दोन तास वादन झाले . त्यानंतर मला नकर सिंग च्या बायकोने भाकरी आमटी आणून दिली . भोजनप्रसाद झाल्यावर मी पुन्हा ढोलावर गेलो . रात्री बारा वाजेपर्यंत मी अखंड ढोल वाजवत होतो . मंडला दिंडोरी भागातील आदिवासी लोकांचे जे ताल आहेत त्याच्यात आणि इथल्या तालामध्ये खूप साधर्म्य होते . लय देखील एकसारखी ठाय होती . जोवर जागे आहेत तोवर घरातील सर्व नृत्य करत राहिले . हा त्या वाद्याचा मान असतो . ते वाद्य वाजत आहे आणि तुम्ही लोळत पडले आहात असे कोणी करत नाही . नकरसिंगच्या बहिणी उत्तम शिवणकाम करत . आता देखील अख्या गावाचे कॉस्च्युम्स त्यांनीच शिवलेले होते . त्यांचे एका बाजूला शिवणकाम सुरू होते . घरामध्ये खोल्या फारशा नसतात . आम्ही ढोल वाजवत होतो ती एक पातळी . फुटभर उंचीच्या पायरीच्या पातळीत सारे घर . त्याला मध्ये एक लांबच लांब आडवी भिंत . आत स्वयंपाक घर . बाकी झोपायला सर्वजण अंगणामध्ये येत .
त्या ढोलाचा धीर गंभीर आवाज इतका जबरदस्त होता की त्याने मी अक्षरशः ध्यानावस्थेमध्ये गेलेलो होतो . एकच एक ठेका एकच एक ताल तुम्ही सलग दोन-तीन तास अतिशय ठाय लयी मध्ये अखंड वाजवत राहिलात तर तुम्हाला उन्मनी अवस्था निश्चितपणे प्राप्त होते . तसेच आमचे झाले होते . अखेरीस तो भाऊ वाजवता वाजवता ढोलावरच झोपला . मग मात्र मी भानावर आलो आणि वादन थांबवले . आणि ताबडतोब झोपायला निघून गेलो . एक परिक्रमावासी वाद्यवादन करत आहे त्याचा सन्मान म्हणून मला कोणीही थांबवण्याची सूचना वगैरे केली नाही ,उलट मला साथ दिली ,त्याचे मला फार कौतुक वाटते . अतिथी देवो भव या वचनाचे याहून सुंदर पालन ते काय असू शकते !
त्या ढोलाच्या तालाने माझ्या मनाला एक संथपणा आणला होता . पडल्या पडल्या माझ्या कानामध्ये तो ताल वाजत राहिला . हा ताल ओळखीचा वाटत होता . डोळे मिटल्या-मिटल्या माझ्या डोळ्यासमोरून काही दृश्य झरझर सरकू लागली . परिक्रमेतून उलटा चालत मी जबलपूर ला पोहोचलो . तिथून उलटी दृश्य पहात पहात हळूहळू लहान झालो . बालपणीचा माझा अवतार पाहता पाहता तान्हे लेकरू झाला . आणि त्यानंतर माझ्या जन्माचा प्रसंग आठवला .एका क्षणामध्ये मी एका द्रवामध्ये तरंगतो आहे असे दिसू लागले . आणि माझ्या लक्षात आले की मी माझ्या आईच्या गर्भामध्ये आहे . आणि आता पुन्हा एकदा तोच ताल मला ऐकू येऊ लागला ! हा ताल होता माझ्या आईच्या हृदयाची धडधड ! तो ताल आणि हा ताल यात खूप साम्य होते ! नव्हे नव्हे हाच तो ताल ! नर्मदा मातेच्या उदरामध्ये अतिशय खुशाल पणे पडलेल्या एका लेकराच्या कानावर पडणारा नर्मदा मातेचा हृदय नाद होता तो ताल ! परिक्रमा म्हणजे जणू गर्भवासच ! गर्भाला जसे अन्न पाणी सर्वकाही आईकडून मिळते तसेच परिक्रमा वाशीला सर्व काही नर्मदा माई देते . गर्भारमाता जिथून जशी जाईल तिथून तिथून गर्भाला जावेच लागते परंतु मातेची सोबत असल्यामुळे आणि तिच्याशी नाळ जुळलेली असल्यामुळे त्याच्या जीवाला कुठलाही धोका होत नाही . तसेच परिक्रमेमध्ये परिक्रमावासीचे होते . नर्मदा माता जिथून कुठून जाईल तिथून फक्त आपण जात राहायचे . बाकी सर्व चिंता तिला असते . आपण फक्त साक्षी भावाने पहात राहायचे . या परिक्रमे नंतर प्रत्येक माणसाचा आवर्जून पुनर्जन्म होतो ! पूर्वजन्मीचे संस्कार , वासना , ईषणा , अहंकार , विचार सारे सारे नष्ट होऊन जाते . उरते ते फक्त एक तान्हे बालक .
आणि आता या बाळाला माहिती असते की काहीही हवे असेल तर फक्त आईला हाक मारायची !
नर्मदेssssss हर !

मागील पुढील लेखन वाचण्यासाठी
mazinarmadaparikrama.blogspot.com वर भेट द्यावी ही नम्र विनंती . लेखन आवडल्यास जरूर कळवा .

Group content visibility: 
Use group defaults

कधी वाचतो कधी utube वर ऐकतो....आश्रम चालवणारे आणि परिक्रमा करणारे यांची एक परस्परांना आदर, स्नेह देणारी एक वेगळीच दुनिया आहे. आजूबाजूचे ग्रामस्थ देखील खूप आदरातिथ्य करणारे मला या जन्मी नाही नाही पुढील जन्म तरी नर्मदा तिच्यावर वस्ती असावी आणि एक वेगळी निर्मळ, निस्वार्थ, फक्त माणूसपण जपणारी जीवनशैली अनुभवायला मिळावी अशी खूप तीव्र इच्छा मनात जागलीय. तुमचेच नाही इतर अनेक परिक्रमावासींचेहघ अनुभव खूप आनंददायी आहेत.
खूप धन्यवाद.

> > > आश्रम चालवणारे आणि परिक्रमा करणारे यांची एक परस्परांना आदर, स्नेह देणारी एक वेगळीच दुनिया आहे. > > >
बहुतांश आश्रम चालविणारे कधी ना कधी परिक्रमा करून आलेले असतात असे मी पाहिले . किंबहुना ज्याने परिक्रमेतील परिश्रम अनुभवले आहेत तोच ते कमी करण्याच्या दृष्टीने आश्रम चालविण्याचा विचार करतो . पूर्वपरिक्रमावासी आश्रम संचालक आणि नुसते आश्रम संचालक यांच्या वर्तनातला फरक जाणवण्या इतपत असतो .

नर्मदे हर!
माझे ही सध्या वाचन+ श्रवण चालू आहे. सुंदर रित्या वर्णन करत लिहीलेले अनुभव कथन वाचताना / ऐकताना छान वाटत आहे. खुप नवीन
माहिती ही मिळत आहे. त्याबद्दलही आभार.

पायी परिक्रमा घडावी अशी अभिलाषा नर्मदार्पित आहे. तिच्या कृपे वरच सर्व आहे.