उगम

Submitted by सायली मोकाटे-जोग on 4 April, 2024 - 21:06

गणितं सोडवताना तुम्हाला असं कधी वाटलंय का की या गणिताचा उगम नेमका कुठून झालाय? मला हा प्रश्न स्वयंपाक करताना नेहेमी पडत आलाय. जेवणातला साधा भात तो काय. चिखलात ती भाताची रोपे लावायची, पीक घ्यायचं… मग कापणी, मळणी, कणसातून निघालेल्या दाण्यांना पॉलिश… असा तो तांदूळ आपल्या घरात येतो. त्याच्यापासून किती पदार्थ. नानाविध भातांचे प्रकार आहेत, पेज, खीर, इडली डोसे, पोहे, चुरमुरे, पिठीचे मोदक, उकड, पापड… पापडात पापडखार घालायचा शोध कोणी लावला? तळणी केव्हा आणि कशी सुरु झाली? असे अनेक प्रश्न आहेतच.

बाकीची असंख्य धान्यं, सणावारींचा फराळ, पंगतींचा थाटमाट, मिठाया नि घरोघरी सुगरणींच्या कौशल्यातून पेश होणारे एकेक पदार्थ आणि त्यातून उत्पन्न खाद्यसंस्कृती!

तसं स्वयंपाकाचंही एक गणित असतंच ना. जेवायला माणसे किती? सामग्री काय? रांधायला लागणारा वेळ? कुठल्या भाज्या आहेत? पाककृती कोणती? करणं सोपं की अवघड? हे सगळं पाहावं लागतं. त्याचं झालं असं की घरात ‘डाळ ढोकळे’ करायची फर्माईश निघाली. प्रत्यक्षात त्यादिवशी स्वयंपाकापेक्षा वेळेचं गणित महत्वाचं होतं. तुरीचं वरण शिजवा, मग कच्च्या पोळ्यांचे तुकडे त्या आमटीत उकळवून मुरायची वाट पाहा… कामांच्या रामरगाड्यात ‘झटपट’ उदरभरणाची सोय करावी लागते अशावेळी स्वयंपाक ही कला आहे हे लक्षात घ्यावे आणि आपल्यातल्या प्रयोगशील कलाकाराला जागवावे. 

मुलांच्या शाळेत कसं चित्रांवर वेगवेगळ्या डाळी चिटकवून रंग भरतात… तसं मी ही डाळींच्या डब्यांकडे पाहायला लागले. लाल रंगाची मसूर डाळ, फिकट पिवळी मुगाची डाळ, धम्म हरभरा डाळ आणि आणखी गडदशीर ती तुरीची डाळ. चला, कुकर न लावता झटपट शिजते ती मसुरीची डाळ. तो डबा उचलताना नेमका बाजूला पेने पास्ताचा डबा दिसला. पोळीचा प्रश्न असा हातोहात सुटला. आता आवश्यक होतं ते कौशल्य… साहित्य बदलले तरी चवीत फरक नको. अमेरिकेत अनेक पाककृतींच्या संकेतस्थळावर यादीत अमक्याची ऍलर्जी असल्यास किंवा हे नसल्यास ते वापरा असे पर्याय असतात तसं. शेवटी जे होईल ते चवदार जमून आलं पाहिजे. 

फ्रिजमध्ये कोहळ्याचा तुकडा होता. कुठल्याही डाळीला सुंदर चव देतो, पोटाला गारवा देतो. थोडे मटार होते सोललेले. खडे मसाले घातले की पदार्थाला वेगळा साज येतो. चिंचेऐवजी मिक्सरवर टोमॅटो फिरवून घेतला. पास्ता नरमेपर्यंत फोडणीत लवंग, मिरे, तमालपत्र, तिखट, मसाला, भाज्या घातलेली डाळ मस्त शिजून आली. तिला घोटवून त्यात पाणी वाढवून उकळी दिली आणि पास्त्याला हलकेच त्यात सोडून दिले. वरून चवीनुसार मीठ, थोडे तूप सोडले. गुळाची आवश्यकता भासली नाही. घाईचा मामला, त्यावर सरबराईची उस्तवार टाळून पटापट बाऊलमध्ये (वाडग्यांमध्ये) परसली… गरमागरम! यात एक गुपित असं की गृहकृत्यदक्ष गृहिणीची माया ओतली की सगळं छान जमून येतं.

नेहेमीच्या रुळलेल्या पदार्थकृतीला नवी आवृत्ती लाभली. कुणास ठाऊक कदाचित हीच आवडत राहिली तर पारंपरिक तुरीच्या वरणाहून पास्ता घातलेल्या मसुरीच्या डाळ ढोकळ्यांची चलती राहील. पदार्थांचा उगम कुठून, कसा, केव्हा झाला हे महत्वाचे नसते. वेळेवर पोटातल्या वैश्वानराला आहुती मिळाली की काम झाले!

~

सायली मोकाटे-जोग

https://sayalimokatejog.wordpress.com/2024/03/31/ugam/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults