असेल माझा हरी..(१)

Submitted by SharmilaR on 1 April, 2024 - 06:04

असेल माझा हरी..(१)

“खरं सांगायचं…, तर मला जरा टेंशनच आलंय.. सगळं कसं जमणार…., मला एकटीला.. माहीत नाही..” वसुधा जरा घाबरतच बोलली. तिचा हा खालच्या आवाजात, घाबरत बोलण्याचा टोन. मुलाशी त्याला आवडणार नाही, असं बोलण्याकरता राखीव असायचा.

“त्यात कसलं आलंय टेंशन..? तिथे बसायचं, इथे उतरायचं.. मी असणारच आहे इथे घ्यायला.. तुला काय प्रॉब्लेम आहे..?” श्रेयसच्या बोलण्यातला हा कडक टोन खास आई करताच असायचा.

आईशी मृदु मऊ आवाजात बोलणं, त्याला माहीतच नव्हतं. जणू आईशी जरा प्रेमा बीमा ने बोललं तर आई लाडावून.. बिघडूनच जाईल. त्याच्या लहानपणी जशी भीती, त्याच्या आईला त्याच्याबद्दल वाटायची, तशीच भीती आता त्याला आईबद्दल वाटत असावी.

त्या दोघांच संभाषण, एरवी तसं छान असायचं.. एकदा बोलायला लागली दोघं, की अगदी तास दोन सुद्धा चालायचा त्यांचा फोन... पण वसुधाने ‘काही जमत नाही..’, ‘भीती वाटते..’ असं काही म्हटलं तर श्रेयसची सटकायची..

‘आपल्या आईला काही जमत नाही, असं असूच कसं शकतं..?’ वया बियाचं तर कारण त्याला अमान्यच होतं. ‘म्हणजे.. साठी हे काय कारण झालं का, काही नं जमायला..? अजून कमीत कमी पंधरा वर्षे तरी, वय ह्या विषयावर काही बोलायचं नाही. म्हणजे.. तब्बेत फक्त ठणठणीत ठेवायची. बाकी काही नाही. चांगलं खायचं प्यायचं.. हवं तिथे भटकायचं.. चार मैत्रिणी जमवायच्या.. मज्जा करायची... आणी आता अमेरिकेत ये म्हणतोय, तर मुकाट्याने यायचं. बसं.. उगाच काही फालतू कारणं द्यायची नाहीत....’

आता हे खरं होतं, की त्याच्या अशा वागण्यामुळेच, वसुधा एकदम टुकटुकीतपणे सगळं जमवून घ्यायची.. अगदी ऑनलाइन शॉपिंग पासून, ते एकटीने कुठे तरी बूकिंग करून, एकटीनेच जाण्यापर्यंत.. नं जमवून सांगतेय कुणाला?

मुलाला तर नाहीच, पण सुनेला पण काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता. प्रिया तशी खूपच गोड मुलगी होती. पण.. एकतर ह्या हल्लीच्या पोरी! सासूशी कसा संवाद साधतात कुणास ठाऊक. शिवाय प्रिया काही वर्षे तिच्या आई वडिलांच्या नोकरीमुळे मुंबईत होती, तरी ती मुळची हरियाणाची. वसुधाच्या मराठी मिश्रित हिंदी इंग्लीश मध्ये, प्रिया पर्यन्त सगळ्या भावना कशा पोचवायच्या हा प्रश्न होताच.

नवीन सुनांबद्दल आजूबाजूच्या घरांतून.. मैत्रिणींच्या.., नातेवाईकांच्या बोलण्यातून कळायचं.. हल्ली लग्न झालेल्या मुलींचे, तासन तास बोलणे होते.. , ते म्हणे फक्त त्यांच्या आईशी. अगदी सकाळी उठल्यापासून, सगळ्या गोष्टी आईला सांगायच्या असतात त्यांना. अन् यूट्यूब वगैरे एरवी कितीही वापरले, तरी सगळ्या रेसिपीज मात्र फक्त आपल्या आईलाचं विचारायच्या असतात.

वसुधाची तर ह्या सगळ्याला काहीच हरकत नव्हती. किंवा हरकत नव्हती.. म्हणण्यापेक्षा तिला ते बरंच वाटत होतं. म्हणजे कसं.. एकदा मुलाचं लग्न झालं, की आपली जबाबदारी संपली. आता तो, ती.. अन् तिच्या घरचे (म्हणजे तिची आई) बघून घेतील पुढचं. आपण आपलं मुलाला ‘दिल्या घरी तू सुखी रहा..’ म्हणायचं. सांगितलय कुणी नसत्या जबाबदऱ्या अंगावर घ्यायला..? बाकी आपली मुलं आपल्याला कितीही आवडत असली, तरी त्यांचं लग्न झाल्यानंतर जरा लांबच रहायला हवं त्यांच्यापासून, ह्या विचारांची ती होती.

आणी वसुधा तर तशीही सुने पासून हल्लीच्या सास्वां सारखी, जरा जपूनच राहत होती. तिच्याशी प्रत्यक्ष संबंध तर कधी फारसा आलाच नव्हता. लग्न झालं, तेव्हा चार दिवस गडबडीत ती इथे राहिली तेवढंच. तो वेळही लग्नाची धावपळ.. नंतर त्यांची अमेरिकेत जाण्याची बांधाबांध .. ह्यातच गेला होता.
तसे त्या दोघींचे, फोन वर अगदी गोड गोड संबंध होते. म्हणजे वसुधा प्रियाला आठवड्यातून दोनदा तरी ख्यालीखुशालीचे फोन करायची.. तिच्या सगळ्या स्टेटसला, डीपिला लाइक करायची. संगळ्यावर छानच कमेन्ट द्यायची.. अन् प्रिया पण आठवड्यातून चारदा तरी तिला ‘गुडमॉर्निंग आँटी’ चे फोन करायची. लग्नाआधी पासून जे आँटी रिलेशन सुरू झालं होतं, ते अजून आँटी मोड मध्येच होतं.

श्रेयस प्रिया च्या लग्नाला दोन वर्षे होतील आता. आता पर्यंत खूपदा त्या दोघांनी तिला अमेरिकेत बोलावलं होतं. पण आता पर्यंत वसुधाने त्यांच्याकडे रहायला जाणं, ह्या ना त्या कारणाने टाळलंच होतं.

म्हणजे नुसता देश बघायला जायला म्हणून तिची हरकत नव्हती. तशा तिने काही ‘उठाओ बॅग.. और निकल पडो..’ टाइप च्या परदेशी टूर केल्या पण होत्या. पण नुसतं टुरिस्ट म्हणून जाणं वेगळं...... आणी तिथे प्रत्यक्ष घरात जाऊन महिनों महीने राहणं वेगळं. रोज श्रेयस प्रिया असणार त्यांच्या कामात. एकटीने तिथे बाहेर बिहेर जाणं काही जमणार नाही.. करायचं काय मग, त्या बंद घरात चोवीस तास? फक्त शनिवार रविवार कडे डोळे लावून बसायचं? सगळंच परावलंबन.

इथे निदान शेजारी पाजारी आहेत.. मैत्रिणी आहेत. घरातलं काम आहे.. घरातलं काम! तो तर महत्त्वाचाच मुद्दा होता तिथली भीती वाटण्याचा. त्या अमेरिकेतल्या घरातली कामं आपल्याला जमणार आहेत का..? त्यामुळे श्रेयस प्रियाने कितीही आग्रह केला तरी वसुधाने टाळलंच होतं तिथे जाण. ती तिथली लाइफ स्टाइल काही आपल्याला झेपेल असं तिला वाटत नव्हतं.

पण आता ह्या वेळची गोष्ट जरा वेगळी होती...
.................................................
(क्रमश:)

असेल माझा हरी..(२)
https://www.maayboli.com/node/84934

असेल माझा हरी..(३)
https://www.maayboli.com/node/84937

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पण आता ह्या वेळची गोष्ट जरा वेगळी होती...>> नातवं ड ये णार असेल. फ्री का बेबी सिटिंग अँ ड पोस्ट डिलिव्हरी केअर. सर्व ममव पालकां नी अमेरिका वारी करायचे मेन कारण. आता ही बाई घरचे साजूक तूप, मेतकूट, आंब्याचे ताजे लोणचे, कोल्हापुरी मसाला.( लेकासाठी मटन करायला) सर्व घेउन जाईल. प्रवासात व्हेज ऐ वजी नॉनव्हेज तिला सर्व्ह केले जाईल. तिला उपास पडेल. मिडल सीट मिळेल. पण नातू होईल. व ती सहा महिने कृतकृत्य होउन सर्विस करेल.

आत्ताच्या आत्ता रिफुज करुन ब्राझिल ला पार्टी करायला निघून जावे हा फुस. यो लो गर्ल.

छान कथा पुभा प्र.

नातवं ड ये णार असेल. फ्री का बेबी सिटिंग अँ ड पोस्ट डिलिव्हरी केअर. सर्व ममव पालकां नी अमेरिका वारी करायचे मेन कारण. >>> no surprises here. हाहाहा

अमा rocks> चला वीकेंडला गोव्याला तरी जाउन येउ बहिण लोक्स. ये क्या बाळंतपण करते बैठना.

अमा,
अमेरिकेत काय किंवा भारतात काय.... भारतीय लोकांना आई सासू ला पर्याय नाही.

अमेरिकेत काय किंवा भारतात काय.... भारतीय लोकांना आई सासू ला पर्याय नाही.
>>>>>>

हे मात्र खरे आहे. आमच्याकडे दोन्ही होत्या. एक घरात तर एक शेजारी चालत पाच मिनिटे अंतरावर.
अश्या प्रसंगी हा फार मोठा आधार असतो जो मागच्या पिढीतून आला तर आश्वासक वाटतो.