हजार गणिते.....

Submitted by किरण कुमार on 28 March, 2024 - 08:21

हजार गणिते आयुष्याची चुकली होती
नंतर मजला सुंदर कविता सुचली होती

भरून गेली असे वाटले लोकांना पण
जखमेवर त्या भळभळणारी खपली होती

अजून माझा आला नाही बहर सुखाचा
पडली ती तर फळे उन्हाने पिकली होती

स्टेशनवरती धावत गेला तिला भेटला
स्तब्धतेत मग निर्दय गाडी सुटली होती

चिंचा , बोरे, फळा , बाकडे, उदास खिडकी
आठवणींची मनात शाळा जपली होती

या कर्जाचे ओझे झाले फांदीलाही
उतरवला तो देह तरीही झुकली होती

वनात सीता , सभेत कृष्णा छळली गेली
तीच कहाणी पुन्हा नव्याने घडली होती

सिग्नलवर तो विकतो आहे बालपणाला
का सटवाई नशिबी त्याच्या निजली होती

सुखी चेहरा विदूषकाचा मतला झाला
सल हृदयाची मक्त्यामध्ये लपली होती

-किरण कुमार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संपूर्ण गझलच सुंदर पण हे दोन शेर काळजात घुसले रे... क्या बात. जियो.

स्टेशनवरती धावत गेला तिला भेटला
स्तब्धतेत मग निर्दय गाडी सुटली होती

या कर्जाचे ओझे झाले फांदीलाही
उतरवला तो देह तरीही झुकली होती